मेंदूवर सतत येणारा ताण कमी करायचा असेल तर या १० अफलातून ट्रिक्स ट्राय करून पहाच!
===
रोजच्या जगण्यात आपल्यावर अगदी हलका तणाव नेहमीच असतो. आपल्याला या तणावाची इतकी सवय झालेली असते की, त्याचा आपल्या मनावर किंवा शरीरावर काही विशेष परिणाम जाणवत नाही.
मात्र कामाच्या ठिकाणी किंवा घरात एखादी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास आपण अगदीच खचून जातो.
याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्या सुरु असलेला लॉकडाऊन.
कोरोनाचा कहर आणि तो रोखण्यासाठी सरकारनं उचलेलं पाऊल म्हणजे २१ दिवसांचा लॉकडाऊन.
यापुर्वी सलग २१ दिवस घरात बसण्याची सक्ती कधीही करण्यात आली नव्हती.
ही प्रक्रिया योग्य आणि अत्यंत गरजेची आहे यात शंका नाही, मात्र यामुळे घराघरात सध्या वादाला सुरुवात होताना दिसते.
वर्क फ्रॉम होम, त्यात घरातल्या कामांचा डोंगर, दिवसभर सगळेच घरी असल्याने मतभेद यांमुळे एकाक्षणी मेंदुवरचा ताबा सुटून भांडणही होत आहे.
त्यामुळे येणारं नैराश्य, कोरोनाची भिती, चिडचीड यांचा अनुभव तुम्ही सुद्धा घेत आहात?
मग हा लेख वाचणं तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
कारण निराशेच्या वेळी आपल्या मनातील भावनांचा निचरा करून शांतता अनुभवणे फार गरजेचे असते.
तणावाच्या वेळीही मेंदू शांत आणि प्रसन्न ठेवण्याच्या या दहा क्लृप्त्या जाणून घ्या आणि नेहमीच आनंदात रहा.
१. ध्यान धारणेसाठी वेळ द्या
ध्यानधारणेने शरीर आणि मनावर अनेक चांगले परिणाम जाणवतात. सुरुवातील हे थोडं अवघड वाटतं. काही लोकं एक दोन दिवस ध्यान धारणा करतात आणि तिसऱ्या दिवशी कंटाळतात.
परंतु नियमितपणे ध्यानधारणा करण्याची सवय लावून घेतल्यास याचा शारीरिक आणि मानसिक तणावाशी सामना करण्यास मदत होते.
यामुळे तुमच्यातील काम करण्याचा उत्साह टिकून राहतो. दररोजच्या दिवसातील फक्त १० मिनिटे ध्यानधारणेसाठी द्या आणि स्वतःच फरक अनुभवा.
२. कृतज्ञता व्यक्त करा
अनेकदा आयुष्यात संकटांची मालिकाच सुरु होते.
अशावेळी आपण जे चांगले आहे त्यावरील लक्ष हटवून आयुष्यात जे काही वाईट घडत आहे त्यावरच जास्त जोर देतो.
परंतु, अशा संकटाच्या वेळीही तुमच्याकडे ज्या जमेच्या बाजू असतील त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करा.
दिवसातून किमान अशा तीन गोष्टी लिहून काढा ज्या तुमच्याकडे आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटते. यामुळे दैनंदिन आयुष्याकडे पाहण्याचा सम्यक दृष्टीकोन प्राप्त होईल.
३. नेहमी सकारात्मक विचार करा.
जेंव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते तेंव्हा बहुतेक वेळा आपले मन नकारात्मक विचारात गुंतून राहते.
परिस्थिती जशी आहे त्यापेक्षा ती अधिक वाईट होऊ शकते याच्या अनेक कल्पना मानाने रंगवून झेलल्या असतात.
त्यामुळे मनावरील ताण आणखीन वाढतो. अशावेळी मन स्थिर न राहता भरकटते.
अशावेळी पुढे काय? हा प्रश्न विचारून नकारात्मक कल्पना करणे किंवा विचार करणे थांबवा. सतत पुढे काय असा प्रश्न आपण विचारतो तेंव्हा आपल्या मनात भीती निर्माण होते.
सकारात्मक विचार आणि काम करण्यावर भर द्या, ज्यामुळे मनाला शांती मिळेल.
४. रोजचा दिनक्रम किंवा दिनचर्या निश्चित करा.
रोज तेच तेच करण्याने कंटाळा येतो हे खरे असले तरी, वस्तुतः दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींचा दिनक्रम पाळल्यास त्याचा आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर देखील चांगला परिणाम होतो.
जेंव्हा आपला दिनक्रम ठरलेला असतो, तेंव्हा आपल्या मनातील गोंधळ कमी होतो आणि दैनंदिन जीवनात निर्णय घेण्याची वेळ की वेळा येईल.
यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतून राहण्याऐवजी काहीतरी चांगले आणि मोठे काम आपल्या हातून होऊ शकते.
तुम्ही जर प्रदीर्घ काळ तणावात राहिलात तर याचे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
नियमित व्यायाम करणे, पौष्टिक नाश्ता करणे यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील तंदुरुस्त राहील.
५. प्रयोगशील रहा.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्ती भिन्न असते. एका व्यक्तीवर ज्या गोष्टीमुळे ताण येतो, तीच गोष्ट केल्याने दुसर्या व्यक्तीचा ताण कमी होऊ शकतो.
दिवासातील कोणत्या वेळी, म्हणजे सकाळी, दुपारी, रात्री, तुम्ही फ्रेश आणि ताजेतवाने असता ते पाहून, ती वेळ नोंदवून ठेवा. यावेळी जास्तीत जास्त जे काही चांगले करता येईल ते करा.
तुमच्या स्वतःच्या सूचना तयार करा आणि या काळात तुम्ही काय करू शकता याची एक यादी देखील तयार ठेवा ज्यामूळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.
६. आपली स्वतःची मते तपासून पहा.
अनेकांना इतरांनी त्यांच्याबद्दल काही मतं व्यक्त केल्यास किंवा काही टिप्पणी केल्यास त्याची भीती वाटते.
परंतु, सगळ्यात मोठी टीका ही आत्मटीका असते. अनेकदा कठीण प्रसंगावेळी आपण स्वतःलाच दोष देत असतो किंवा स्वतःच स्वतःचे अवमूल्यमापन करत असतो.
अशावेळी आपल्या मनात कोणते विचार येतात आणि आपल्यातील टीकाकाराचे म्हणणे काय आहे ते नीट ध्यानात घ्या. या विचारांवर लक्ष ठेवा आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा.
मनातील नकारात्मक विचार आपण रोखू शकत नाही पण, त्यापासून दूर निश्चितच राहू शकतो.
७. रोजनिशी लिहा.
आपल्या मनातील विचारांवर लक्ष ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे रोजनिशी लिहिणे.
आपल्या डोक्यात जे जे विचात येतील ते कागदावर लिहून काढणे हा स्वतःला शांत करण्याचा एक चांगला पर्याय आहे.
आपले विचार एखाद्याला बोलून दाखवल्यावर जसं मन हलकं होतं तसाच परिणाम हे विचार लिहून काढण्याने देखील होऊ शकतो.
नियमित रोजनिशी लिहिल्याने तुमच्या विचारांवर आणि भावनांवर तुमचे नियंत्रण राहील. तसेच, तुमच्या भावना तुम्हाला योग्य शब्दात मांडता येतील.
८. कामाची यादी तयार करा
अनेकदा एकाच वेळी आपल्याला अनेक कमी उरकायची असतात.
अशावेळी एक काम करत असताना आपल्या मनात अचानक दुसर्या कामाचा विचार येतो आणि हातातल्या कामावरही आपण नीट लक्ष देऊ शकत नाही.
म्हणून रोजच्या कामाची त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार एक यादी बनवा.
एकानंतर एक काम करायला घेतल्याने कामाचा ताण कमी होईल आणि काम उरकल्याचे समाधान देखील मिळेल.
९. आपल्या मित्रांचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
जेंव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी तुमचे मित्र किंवा तुमच्या जवळची अनुभवी व्यक्ती यांचा सल्ला अवश्य घ्या.
त्या परिस्थितीपासून दूर असलेली व्यक्ती त्या परिस्थीचे तटस्थपणे निरीक्षण करून, वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करून तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याबद्दल योग्य तो सल्ला देऊ शकते किंवा मार्गदर्शन करू शकते.
जेंव्हा तुम्ही तुमच्या विश्वासू व्यक्तींच्या संपर्कात असता तेंव्हा तुम्ही स्वतःला अधिक सुरक्षित समजाल.
तुम्ही एखाद्या विश्वासू व्यक्तीजवळ जेंव्हा तुमचे विचार बोलून दाखवता तेंव्हा कदाचित त्या तणावात्मक परिस्थितीवर तुम्ही काही तोडगा शोधू शकाल.
१०. अलिप्त रहा.
जेंव्हा अचानक काही तणावाची परिस्थिती उद्भवते आणि अशा परीस्ठीशी टक्कर देण्याची तुमची मानसिक तयारी नसते तेंव्हा, काही काळ त्या परिस्थितीपासून स्वतःला अलिप्त करा.
स्वतःच्या मनातील विचार, भावना जाणून घ्यायला आणि मनातील द्वंद्व शांत व्हायला थोडा वेळ द्या.
जेंव्हा तुमच्या मानतील गोंधळ मिटेल आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याइतपत तुमची मनस्थिती शांत होईल तेंव्हा तुम्ही त्या परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकाल.
===
by- inmarathi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा