फूड अॅलर्जीबद्दल थोडेसे...
डॉ. साईनाथ पोवार
अॅलर्जी ही आजकालच्या जीवनातील महत्त्वाचा आजार आहे. अॅलर्जीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अॅलर्जीबद्दल अनेक समज व गैरसमज आहेत व ते दूर होणे आवश्यक आहे.
अॅलर्जी म्हणजे एखाद्या गोष्टीचा सगळ्यांच्या शरीराला त्रास होत नाही, पण एखाद्या शरीराला होतो त्याला अॅलर्जी असे म्हणतात. हा शरीराच्या इम्युनिटीचा अॅबनॉर्मल रिस्पॉन्स आहे. आपण येथे फूड अॅलर्जी म्हणजे खाद्यपदार्थांची अॅलर्जी याबद्दल माहिती घेऊ.
अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यापैकी अॅलर्जी हा महत्त्वाचा त्रास आहे. बदलती जीवनशैली व खाण्याच्या सवयी यामध्ये फूड अॅलर्जीचे प्रमाण वाढत आहे. विकसित देशामध्ये फूड अॅलर्जीचे प्रमाण जास्त आहे. आपल्या देशामध्येसुद्धा फूड अॅलर्जीचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.
फूड अॅलर्जीमुळे काहीवेळा अत्यंत सीरिअस रिअॅक्शन (अॅनाफायलेक्सीस) येऊ शकते. त्यामुळे फूड अॅलर्जीच्या पेशंटनी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. भारतामध्ये फूड अॅलर्जीचे प्रमाण 10-15 टक्के आहे. लहान मुलांमध्ये प्रमाण 6-8 टक्के आहे.
फूड अॅलर्जी व फूड इनटॉलरन्स या दोन गोष्टीत फरक करणे खूप महत्त्वाचे आहे. फूड अॅलर्जी ही आपल्या इम्युनिटीच्या चुकीच्या रिस्पॉन्समुळे असते व फूड इनटॉलरन्स हा फूडमधील काही घटकांच्या खाद्यपदार्थातील अॅडेटिव्ह व प्रिझरवेटिव्हमुळे होतो. फूड अॅलर्जी ही प्रामुख्याने त्या पदार्थांमधील प्रोटिनमुळे होते. फूड अॅलर्जी लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसते, पण ती कोणत्याही वयात उद्भवू शकते. अॅलर्जी सुरू होताना सुरुवातीला त्या पदार्थाचे सेन्सटायझेशन होते व नंतर अॅलर्जीची लक्षणे दिसतात.
प्रगत देशांमध्ये फूड अॅलर्जीचे प्रमाण जास्त आहे. लंडनमध्ये अॅलर्जीचे प्रशिक्षण घेताना बरेच पेशंट पाहण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अनुवंशिकता, खाण्याच्या सवयी व कमी प्रमाणात असलेले जंतुसंसर्ग ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत.
आपल्या देशात फूड अॅलर्जीचे प्रमाण त्यामानाने खूप कमी आहे; परंतु बदलत्या जीवनशैली व आधुनिकीकरण यामुळे हे प्रमाण वाढताना दिसत आहे.
फूड अॅलर्जी वाढण्याचे कारणे कोणती ते आपण पाहू.
1) आधुनिक जीवनशैली
2) बदलत्या खाण्याच्या सवयी
3) अनुवंशिकता
4) ज्या मुलांना जंत व सूक्ष्मजंतू संसर्गाचे प्रमाण कमी होते. त्यांच्यामध्ये अॅलर्जीचे प्रमाण जास्त असते. त्याला ‘हायजीन हायपोथेरपीस’ असे म्हणतात.
5) विटामीन ‘डी’ ची कमतरता.
यामुळे अॅलर्जीचे प्रमाण वाढले.
वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमुळे अॅलर्जी होऊ शकते, पण दूध, अंडी, मटण, चिकन, मासे व इतर सी फूड, शेंगदाणे, सोयाबीन, गहू, डाळी यापासून अॅलर्जीचे प्रमाण जास्त आहे, पण इतर कोणत्याही खाद्यपदार्थामुळे अॅलर्जी होऊ शकते.
फूड अॅलर्जीमुळे होणारा त्रास
फूड अॅलर्जीमुळे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. हा त्रास खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच होतो, तर काहींना नंतर होऊ शकतो.
* त्वचेवर गांधी उठणे, पित्त उठणे, अंगाला खाज उठणे.
अंगावर, चेहर्यावर सूज येणे.
पोटदुखी, उलटी होणे, जुलाब होणे.
डोकेदुखी, डोळे लाल होणे.
नाकतून पाणी, खाज येणे.
खोकला, धाप लागणे, अस्थमाची लक्षणे वाढणे.
फूड अॅलर्जीमुळे अॅनाफायलेक्सीस म्हणून एक सिरियस रिअॅक्शन होऊ शकते. यामध्ये चक्कर येणे, धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे, कमी होणे, रक्तदाब कमी होणे या गोष्टी होतात. यावर योग्य वेळेत उपचार झाल्यास जीवाचा धोका संभवू शकतो.
प्रगत देशामध्ये फूड अॅलर्जीमुळे होणार्या अॅनाफायलेसीसचे प्रमाण जास्त आहे व त्यासाठी तेथे विशेष यंत्रणा उपलब्ध आहेत.
फूड अॅलर्जीचे निदान ः-
अॅलर्जी स्किन प्रिक टेस्ट ः यामध्ये नक्की कोणत्या पदार्थाची अॅलर्जी आहे ते समजते. ही टेस्ट वेदनारहित (Painless) व रक्तस्त्रावविरहित (Bloodless) असते. एकदा आपल्याला कोणत्या खाद्यपदार्थाची अॅलर्जी आहे हे समजले तर तो टाळता येऊ शकतो किंवा त्याची ट्रिटमेंट केली जाते. ही अॅलर्जीच्या निदानासाठीची गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे.
पेशंटनी योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून कोणतीही अॅलर्जी टेस्ट करू नये. त्याचा ट्रिटमेंटमध्ये फायदा होत नाही. अॅलर्जीच्या निदानासाठी अॅलर्जी स्किन प्रिक हीच योग्य टेस्ट आहे. ती स्वतः तज्ज्ञ डॉक्टरांनी करणे आवश्यक आहे.
फूड चॅलेंज टेस्ट
एखाद्या खाद्यपदार्थाची अॅलर्जी असण्याचा दाट शंका असताना व स्किन प्रिक टेस्टमध्ये अपेक्षित निदान मिळत नसेल तर ही टेस्ट केली जाते. यामध्ये पेशंटला तो खाद्यपदार्थ थोड्या-थोड्या प्रमाणात खायला देऊन हळूहळू त्याचे प्रमाण वाढविले जाते. जर पेशंटला त्याचा त्रास होऊ लागला तर त्याचा लगेचच उपचार करता येतो. तसेच अॅलर्जीचे निदान होते. म्हणजे भविष्यात त्या पदार्थामुळे होणारा त्रास टाळता येतो. जर कोणताही त्रास झाला नाही तर त्या पदार्थाची अॅलर्जी नाही याची खात्री होते.
फूड अॅलर्जी कमी करण्यासाठी घ्यावयाची काळजी ः-
1) लहान बाळांना सहा महिने पूर्ण होईपर्यंत फक्त आईचे दूध देणे.
2) अॅलर्जीची असण्याची शक्यता असणार्यांना (अनुवंशिकता) ते पदार्थ उशिरा चालू करणे.
3) बाहेर विकत मिळणार्या खाण्याच्या वस्तूंवर त्यामधील घटक लिहिणे आवश्यक आहे.
4) फूड अॅलर्जी असणार्यांनी बाहेर खाणे टाळावे.
लहान मुलांना असणारी फूड अॅलर्जी ही वाढत्या वयानुसार कमी होऊ शकते.
उदा. दुधाची अॅलर्जी 5 वर्षांपर्यंत, त्याप्रमाणे अंडी किंवा शेंगदाण्याची अॅलर्जी 6-7 वर्षांनंतर कमी होऊ शकते. मोठेपणी झालेली फूड अॅलर्जी कमी होत नाही.
फूड अॅलर्जीचे उपचार ः-
यामध्ये ज्या खाद्यपदार्थांची अॅलर्जी आहे ते टाळणे सर्वात महत्त्वाचे, परंतु काही वेळा तो पदार्थ पूर्ण टाळणे शक्य होत नाही व त्यामुळे काही धोका संभवू शखतो. त्यामुळे फूड अॅलर्जी कमी करण्याची ट्रिटमेंट करणे आवश्यक आहे.
फूड अॅलर्जी बरी करण्यासाठी आधुनिक उपचारपद्धती आता उपलब्ध आहे. त्याला अॅलर्जेन स्पेसिफिक इम्युनोथेरपी असे म्हणतात. या उपचार पद्धतीमुळे फूड अॅलर्जी पूर्णपणे व मुळापासून बरी होऊ शकते.
ही आधुनिक, शास्त्रोक्त व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त झालेली उपचारपद्धती आहे.
या उपचाराने शरीरातील अॅलर्जी कमी होत जाते व अॅलर्जी पूर्णपणे बरी होऊ शकते व त्यामुळे अॅलर्जीमुळे होणारा त्रास खूप कमी होतो.
ही उपचार पद्धती अॅलर्जीची सर्दी, अस्थमा, अॅलर्जीमुळे उठणारे पित्त, स्किन अॅलर्जी, डोळ्यांची अॅलर्जी यासाठीसुद्धा केली जाते.
अॅलर्जीच्या इतर सर्व ट्रिटमेंटचा फायदा हा ट्रिटमेंट चालू असेपर्यंत होतो, पण इम्युनोथेरपीचा फायदा हा दीर्घकाळ राहतो. त्याचप्रमाणे इम्युनोथेरपीमुळे नवीन अॅलर्जी येण्याचे प्रमाण कमी होते.
Who Position Paper नुसार इम्युनोथेरपी ही अॅलर्जी मुळापासून बरी करण्याची एकमेव ट्रिटमेंट आहे व अॅलर्जीच्या प्रत्येक पेशंटला इम्युनोथेरपीचा पर्याय देणे आवश्यक आहे.
इम्युनोथेरपी ही अत्यंत सुलभ व सर्वसामान्यांना परवडणारी उपचारपद्धती आहे. फूड अॅलर्जीचे योग्य उपचार केल्याने त्याचे बरेच त्रास कमी होऊ शकतात. यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. फूड अॅलर्जीचे निदान होताच पेशंटनी घाबरून न जाता त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन उपचार करणे आवश्यक आहे.
by - http://www.pudhari.news/news/Aarogya/Food-Allergy/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा