सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

वाचा Pinterest या सोशल मीडियाची स्टार्टअप कथा..


वाचा Pinterest या सोशल मीडियाची स्टार्टअप कथा


आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनाच आपले फोटो काढून इतर मित्र-मैत्रिणी, नातेवाईक वगैरेंना दाखवायला आवडतात, तसेच आपले विचार, नवीन कल्पनासुद्धा सर्वांसोबत शेअर करायला आवडतं; परंतु या धकाधकीच्या जीवनात आपल्याला कुठे इतका वेळ मिळतो? आपण फार तर घरातल्यांशी थोड्या गप्पा मारत असू. हीच प्रत्येकाच्या मनातली भावना बेन सिलबरमन या अमेरिकन तरुणाने ओळखली. पॉलिटिकल सायन्स शिकलेला हा बेन सिलबरमन स्वभावाने शांत. कॉलेज संपल्यावर प्रथम त्याने गुगलमध्ये नोकरी सुरू केली.

कॉलेजमध्ये असतानाच बेनला स्वत:च्या आयफोनसाठी नवनवीन app बनवण्याची सवय तसेच आवड होती. यातूनच जन्म झाला 'पिंटरेस्ट'चा. 'पिंटरेस्ट' त्याच्या वापरकर्त्यांना विविध फोटोज, त्यांचे विचार असं बरंच काही एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी मदत करते. लोक 'पिंटरेस्ट'द्वारे आपल्या मित्रपरिवारासोबत फोटोज, विचार, गोष्टी इत्यादींची देवाणघेवाण करून संपर्कात राहू शकतात. प्रत्येक उद्योगाचे एक वैशिष्ट्य त्याचा मुख्य पाया असतो.

त्याचप्रमाणे लोकांची आवड हे 'पिंटरेस्ट'च्या प्रगतीचं वैशिष्ट्य आहे.

'पिंटरेस्ट'ची खरी सुरुवात झाली ती २००८ मध्ये. तेव्हा बेन सिलबरमन, पॉल सिआरा आणि इवान शार्प हे 'पिंटरेस्ट'चे सहसंस्थापक होते, तेव्हा 'पिंटरेस्ट' हे नावही ठरलं नव्हतं. आज 'पिंटरेस्ट'ची तुलना फेसबुकसारख्या जगप्रसिद्ध उद्योगाशी केली जाते.

२०१० मध्ये पिंटरेस्ट पहिल्यांदा सत्यात उतरलं तेव्हा फक्त काही मित्र आणि त्यांची कुटुंब इतकेच लोक 'पिंटरेस्ट' वापरकर्ते होते. तेव्हा 'पिंटरेस्ट' हे एक बंद बीटा होते. म्हणजेच जसे फेसबुकवरील close ग्रुप जे काही लोकांपुरतंच मर्यादित असतात. पुढे जाऊन 'पिंटरेस्ट' ओपन बीटा म्हणजेच सर्वांसाठी खुले झाले.

बेन सिलबरमन यांनी सुरुवातीला ५ हजार हस्तलिखित पत्रं पाठवली होती.

लोकांना पिंटरेस्टचे सदस्य होण्यासाठी वेबसाइट लाँच केल्यावर नऊ महिन्यांतच १० हजार लोक पिंटरेस्टचे वापरकर्ते झाले. त्यानंतर सिलबरमन आणि त्याच्या एक-दोन सोबत्यांनी 'पिंटरेस्ट'ला विविध रूपांनी सजवून आणखी आकर्षक बनवलं. 'पिंटरेस्ट'चा पहिला गुंतवणूकदार हा सिलबरमनच होता. २०१० च्या उत्तरार्धात त्याने अमेरिकेतील एका मासिक काढणार्‍या उद्योजकाला 'पिंटरेस्ट' विकायचा प्रयत्न केला, पण त्या उद्योजकाने या करारास मान्यता दिली नाही.

२०११ मध्ये आयफोनवर 'पिंटरेस्ट'ची app उपलब्ध झाली.

त्यामुळे 'पिंटरेस्ट'च्या ग्राहकसंख्येत आणखीनच वाढ झाली. १६ ऑगस्ट २०११ रोजी 'टाइम' मासिकाच्या सर्वोत्तम ५० वेबसाइट्सच्या यादीत पिंटरेस्टचं नाव आलं. २०११ मध्येच आयफोन सोडून इतर मोबाइलधारकांसाठी 'पिंटरेस्ट'ची app उपलब्ध झाली. २०१२ च्या उत्तरार्धात 'टेक क्रंच' याद्वारे सर्वोत्तम स्टार्टअपच्या यादीतही 'पिंटरेस्ट'चं नाव आलं.

प्रत्येक उद्योजकाला अशा एका मार्गाची गरज असते ज्याला तो आपली 'बिझनेस स्ट्रॅटेजी' म्हणजेच उद्योगाचा पाया/आधारस्तंभ म्हणू शकेल.

'पिंटरेस्ट'चे याबद्दलचे विचार खूप स्पष्ट आहेत. 'पिंटरेस्ट'चा संस्थापक बेन सिलबरमन म्हणतो, "साधारणत: उद्योजकांना त्यांच्या यशस्वी उद्योगाचे गुपित विचारले की, त्यांनी आजतागायत जे काही केले त्याचा सारांश सांगतात, परंतु हे साफ चुकीचे आहे." 'पिंटरेस्ट'चंच उदाहरण घेऊ. 'पिंटरेस्ट'च्या यशाचं गुपित हे २००८ मधील कल्पनेपासून २०१६ मधील यशापर्यंतचे सर्व निर्णय नक्कीच नाही, तर 'पिंटरेस्ट'ने लोकांची आवड ओळखली. त्या आवडीला मूर्तस्वरूप दिलं.

पुढे त्या स्वरूपाला विकसित केले आणि ग्राहकांच्या दृष्टिकोनातून विचार करत करत 'पिंटरेस्ट'ला घडवलं. हे 'पिंटरेस्ट'च्या यशाचे गुपित म्हणता येईल.

'पिंटरेस्ट' हा एक ऑनलाइन उद्योग असल्याने याची सुरुवात करण्यासाठी फार मोठ्या गुंतवणुकीची गरज नव्हती. सुरुवातीला सिलबरमनने स्वत:च पैसे उभे केले. त्यानंतर 'पिंटरेस्ट' उभे करण्यासाठी त्यांना संस्थात्मक कर्ज (इन्स्टिट्यूशनल लोन) मिळालं.

त्यापुढे विविध गुंतवणूकदारांमार्फत वेळोवेळी 'पिंटरेस्ट'ला गुंतवणूक मिळत गेली. यात 'फर्स्ट मार्क कॅपिटल', जॅक अब्राहम (मिलो), मायकेल बर्च (बेबी), स्कॉट बेल्स्की (बेहांस), शाना फिशर (हायलाइन व्हेंचर पार्टनर), रॉन कॉन्वे (एस.व्ही. एंजल), केविन हार्टझ (इव्हेंट ब्राइट), जेरेमी स्टॉपलमन (येल्प), हँक विगिल, क्रिट्झ लानमान आणि ब्रायन एस. कोहन यांचा समावेश होता.

२०११ : जेरेमी लेवाईन आणि सारा टॅवेल यांकडून १० दशलक्ष डॉलरची गुंतवणुकीची सीरिज मिळाली.

(पुढे सारा टॅवेल पिंटरेस्टमध्ये समाविष्ट झाले)

२०११ : ऑक्टोबर, अँड्रीसन हॉरोविट्स यांच्या २७ दशलक्ष डॉलरच्या गुंंतवणुकीमुळे पिंटरेस्टची किंमत २० कोटी डॉलर इतकी झाली.

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

आज, 'पिंटरेस्ट' ही जगातील सर्वोत्तम कल्पना एकाच ठिकाणी मिळणारी वेबसाइट झाली आहे. अनेक लोक इथे दर दिवशी त्यांचे विचार, नवीन कल्पना, चांगल्या सवयी, चांगले-वाईट अनुभव लोकांसोबत वाटत आहेत तसेच अनेक लोकांना या सर्वांचा घरबसल्या लाभ घेता येत आहे.

आपल्या मराठीत एक म्हण आहे. 'अति तेथे माती'.

त्याचप्रमाणे 'पिंटरेस्ट'चा संस्थापक बेन सिलबरमन आजच्या काळातील नवउद्योजकांना सांगतो, "कुणाकडूनही अति मार्गदर्शन घेत बसू नका. अनुभवातून शिका, परंतु त्यातच हरवून जाऊ नका. अशा फार कमी गोष्टी असतात ज्यावर तुमच्या उद्योगाचे यश अवलंबून असते. बाकी बर्‍याच गोष्टी असतात ज्याने तुमची अधोगती होऊ शकते."

'पिंटरेस्ट'चा एकूण प्रवास हा मवाळ होता.

त्याची सुरुवातही कोणत्या 'बँग'ने झाली नाही तसेच त्याचे संस्थापक कोणती मोठमोठाली भाषणे देत नाही. तरीसुद्धा 'पिंटरेस्ट' हे आज एका यशस्वी स्टार्टअपकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे जास्त प्रकाशझोतात न येता, शब्दांनी आवाज न करता यशाच्या तेजाने आज पिंटरेस्ट जवळजवळ जगभरात पसरले आहे आणि मजेशीर गोष्ट म्हणजे पिंटरेस्टचे ७९ टक्के वापरकर्ते या महिला आहेत.







by - https://m.dailyhunt.in/news/india/marathi/smart+udyojak-epaper-smtudy/vacha+pinterest+ya+soshal+midiyachi+startaap+katha-newsid-75929257

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल