पैशावर बोलू काही..
पैसा मिळवण्यासाठी आपण अपार मेहनत घेत असतो.
|| वीरेंद्र तळेगावकर
आर्थिक नियोजन तर करायचे आहे; पण दिशा माहीत नाही, व्यवस्थापनाचं अंग नाही, बहुविध पर्यायांच्या जाळ्यात गुंतणं होतं.. अशा साऱ्यांना ‘गोष्टी सांगे युक्तीच्या चार’ अशा पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल..
पैसा मिळवण्यासाठी आपण अपार मेहनत घेत असतो. परंतु प्रत्यक्षात आपण किती मिळवतो आणि मिळवलेला पैसा वाया जाऊ नये म्हणून आपण किती सजग असतो? वीज-भ्रमणध्वनीसारखी विविध देयके, भाडे, मासिक कर्जहप्ता, वैद्यकीय खर्च, पर्यटन, सण-समारंभ, मुलांचे शिक्षण आणि पुढे निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठीची आपली तयारी असते काय? आपण कष्टाने पैसा कमावतो, तो खऱ्या अर्थाने आपल्या उपयोगी पडण्यासारखा दुसरा निर्मळ आनंद नाही; परंतु त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? आजच्या पैशाची भविष्यातली किंमत वाढवण्यासाठी आपण काही आराखडा आखतो का? आणि अर्थातच त्या माध्यमातून आपण अधिक सुखकारक जीवन जगू शकू काय?
या साऱ्या शंकांचं निरसन मोनिका हलन यांच्या ‘लेट्स टॉक मनी : यू हॅव वक्र्ड हार्ड फॉर इट, नाऊ मेक इट वर्क फॉर यू’ या पुस्तकातून होतं. पत्रकार आणि आर्थिक नियोजनातील तज्ज्ञ असलेल्या मोनिका हलन यांचं हे पुस्तक म्हणजे व्यक्तिगत गुंतवणुकीबाबतची मार्गदर्शिकाच आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. आर्थिक साक्षरतेबरोबरच वित्तीय सुरक्षिततेवर भर देणाऱ्या या पुस्तकात श्रीमंतीचा मार्ग नाही, पण पैसा राखण्याच्या योग्य वाटा सांगितल्या आहेत.
इंग्रजी वित्तविषयक नियतकालिकांत स्तंभलेखन करणाऱ्या मोनिका हलन या वित्तीय नियोजनातील गुरू मानल्या जातात. व्यक्तिगत गुंतवणुकीचे मर्म सुलभतेने उलगडवून दाखवण्यात त्यांचा हातखंडा. लिखाण असो वा दृक्-श्राव्य माध्यममंचावरील कार्यक्रम असोत, आर्थिक नियोजनाचे किचकट गणित त्या सहज सोडवतात. वित्तीय नियोजनातील शास्त्रोक्त शिक्षण (‘सेबी’च्या नव्या दंडकानुसार पैशाविषयी सल्ला देणाऱ्या प्रत्येकाला ते आवश्यक आहे.) घेतलेल्या मोनिका हलन सेबीच्या म्युच्युअल फंड सल्लागार समितीच्याही सदस्य आहेत. अनेक इंग्रजी वित्तविषयक दैनिकांत त्यांनी पत्रकारिता केली आहे. यावरून त्यांचा या विषयातील अधिकार ध्यानात यावा.
पैशाविषयी भविष्यातील चिंता, परताव्याबाबतची जोखीम, मुदलाबाबतचा अतिआत्मविश्वास.. गुंतवणूकदारांच्या मानसिकतेतील अशा मुद्दय़ांचा अंदाज घेत त्यासंबंधी पुस्तकातील १४ प्रकरणांतून मांडणी केली आहे. ही मांडणी गुंतवणूकदाराला एक विश्वासार्ह पाऊल उचलण्यासाठी प्रेरित करते. प्रत्येक प्रकरणाला उपशीर्षकाची जोड देत विविध गुंतवणूक पर्याय, त्यांची ओळख, त्यांची रचना यांची माहिती दिली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सावधगिरीच्या चौकटीत बसवण्यात आलेला टिप्सवजा दिलासाही दिला आहे. त्यातून वित्त विषयातील जाणकार म्हणून लेखिकेचे वेगळेपण अधोरेखित होते. मात्र, असे असले तरी- गोंधळात टाकणारे गुंतवणुकीचे बहुविध पर्याय, योजनांचा परतावा, त्यावरील करमात्रा अशा डोळे फिरवणाऱ्या कोणत्याही आकडेवारीत, आलेखात न अडकता अगदी लहानग्याला एखादी गोष्ट सांगावी तसा हा काहीसा क्लिष्ट विषय समजावून देण्याचा प्रयत्न लेखिका करते.
‘गुंतवणुकीवरील आकर्षक परतावा’ या एकाच उद्दिष्टाप्रति केंद्रस्थानी असलेली चिंता फलदायी गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करत असते. तसे होऊ न देण्यासाठी गुंतवणुकीतील एक साचेबद्धता, त्याबाबतचे आखीवरेखीव धोरण महत्त्वाचे ठरत असते. हे सारे या पुस्तकात बिंबवण्यात आले आहे. पुस्तकातील गुंतवणुकीबाबतची काही उदाहरणं ही लेखिका आणि तिच्या सहकाऱ्यांनी अनुभवलेली आहेत. ही उदाहरणं वाचकांना काही निर्णय समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील. त्यामुळे कोणत्याही कमावत्या वयोगटातील व्यक्तीकरिता वित्तीय नियोजनाचा पाठ या पुस्तकाद्वारे सहजरीत्या गिरविता येऊ शकतो.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, पुस्तकात गुंतवणुकीच्या विविध पर्यायांवर स्वतंत्र प्रकरणे आहेत. पैकी काही दोन-चार पानांतच सामावली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढलेल्या भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंडांवरील प्रकरण मात्र विस्तृत आहे. त्याचबरोबर कमी कालावधीत अधिक परतावा मिळवण्यासाठी अग्रक्रमावर असणाऱ्या स्थावर मालमत्ता, सोने या गुंतवणूक प्रकारांवरही स्वतंत्र प्रकरणात प्रकाश टाकण्यात आला आहे. स्थिर उत्पन्न देणाऱ्या पारंपरिक गुंतवणूक पर्यायांबरोबरच विमा, निवृत्ती निधी, आपत्कालीन तजवीज यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला गुंतवणुकीविषयी दिलेला सुविचार ते प्रकरण वाचण्याकरिता तसेच गुंतवणुकीसाठी त्या दिशेने पावले टाकण्यास प्रेरित करतो. आर्थिक नियोजनावरील लेखिकेचे साप्ताहिक स्तंभलेखन वाचण्याची सवय असणाऱ्यांचीही वित्तीय गुंतवणुकीच्या मार्गदर्शनाबाबतची उत्सुकता अधिक ताणली जाईल एवढे सामथ्र्य या पुस्तकात नक्कीच आहे.
पैसा झटपट मिळत नसतो आणि त्यावरील परतावा तर कदाचितच. तेव्हा मिळणाऱ्या पैशाचं योग्य सुनियोजन आवश्यक ठरतं. नेहमीच मुदलावरील अधिक परताव्यापेक्षा तो आपली जीवनशैली जपून महागाईवर मात करणारा ठरतो का, हे पाहणारी दृष्टी हे पुस्तक देते. बचतीचा रामबाण उपाय म्हणून न बघता अनेकदा गुंतवणुकीकडे ती गुंतवणूक, संबंधित योजना तुमची समस्या सोडवण्यास सक्षम आहे का, हे पाहणे हितावह ठरते. नेमका हाच मंत्र हे पुस्तक देते. झटपट आणि सहज मार्गाने मिळवलेला पैसा दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करतो का, हा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची संधी हे पुस्तक देते.
गुंतवणूकदारांचा एक वर्ग छोटय़ा छोटय़ा चुका करत असतो. त्याची पुनरावृत्तीही अनेकदा होते. ते सर्व कसे टाळता येईल, हे पुस्तकात सोदाहरण दिले गेले आहे. जेवढे ते कमावत्या वयात उपयुक्त ठरते, तेवढेच निवृत्तीनंतरच्या कालावधीतही! पुस्तकातील भाषा सोपी आहे. त्यामुळे त्यातील मांडणी आव्हानात्मक अशा गुंतवणूक नियोजनात वेळोवेळी निर्णय घेण्यासाठी सहज लक्षात राहते. आर्थिक नियोजन तर करायचे आहे; पण दिशा नाही, व्यवस्थापनाचं अंग नाही, बहुविध पर्यायांच्या जाळ्यात गुंतणं होतं.. अशा साऱ्यांना ‘गोष्टी सांगे युक्तीच्या चार’ अशा पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
असंख्य आकडे, पानभर आलेख यांचा मोह पुस्तकाच्या वाचनीयतेच्या दृष्टीने लेखिकेने टाळला असला, तरी काही उदाहरणं ही संबंधित व्यक्ती, कुटुंब, कमावते, करदाते यांच्या तक्त्यासह देणे सहज शक्य होतं. ते एक सामाईक उदाहरण म्हणून अनेकांना आपल्या विद्यमान निर्णय व भविष्यातील तरतुदींबरोबर पडताळून पाहायला उपयुक्त ठरलं असतं.
पोस्टाच्या अथवा बँकांच्या मुदत ठेवी, रोखे या स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांबरोबरच भांडवली बाजारातील ‘न्यू फंड ऑफर’ (एनएफओ), ‘एक्स्चेंज-ट्रेडेड फंड’ (ईटीएफ), ‘नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स’ (एनसीडी), कंपनी समभाग आदी नवपर्यायांबाबतही आणि आकर्षक परताव्याच्या आमिषसागरात गटांगळ्या खाणाऱ्या गुंतवणूकदारांना पॉन्झी स्कीमबद्दल थोडेसे जागरूक करून आधार देण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नव्हती. त्याविषयी पुस्तकात फारसे काही हाती लागत नाही. समभाग आणि फंड यातील गुंतवणुकीबाबत सविस्तर केलेलं भाष्य विमा आणि निवृत्तिवेतनाबाबतही पूरक ठरतं.
लेखिका स्वत: तरुण असूनही वाध्र्यक्यातील अर्थचिंता तिच्या पुरेशी लक्षात आली आहे, ते या क्षेत्रातील तिच्या वावरामुळे आणि अस्थिर अशा उत्पन्नदेयी वातावरणामुळे! तेव्हा वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, तसेच मध्यात अनेकांसाठी उत्तम आर्थिक नियोजनासाठी हे पुस्तक गुरुकिल्ली ठरावे. तीन बँक खाती, पाच विमा (आरोग्य, आयुर्विमा, आजार, अपघात, घर) आणि केवळ तीन गुंतवणूक माध्यमं ही त्रिसूत्री हे पुस्तक देते. गुंतवणुकीच्या जगतातील मुशाफिरी या पुस्तकातील शिदोरीसह केली, तर ती उर्वरित आयुष्यासाठी आणि पर्यायाने कौटुंबिक सुखी जीवनासाठी अधिक आनंददायी होईल, यात शंका नाही.
उत्पन्न, खर्च आणि महागाई हे डोळ्यांसमोर ठेवून उत्तरार्धातील आयुष्य आणि निवृत्तीशी संबंधित योजना यांचा मेळ राखण्यावर पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात भर देण्यात आला आहे. याच प्रकरणात गुंतवणुकीविषयीची गृहीतकं टाळण्याचा बहुमोल सल्ला देण्यासही लेखिका विसरत नाही. त्यापुढील प्रकरणात लेखिकेच्या अर्थसल्ल्याचे लाभधारक, त्यांची भेट, त्यांची उपकारी वर्तणूक हे सारं अतिशयोक्ती अथवा आत्मस्तुतीचा भाग वाटला, तरी पुस्तकाचं सार त्यात आलं आहे.
जुलै, २०१८ मध्ये प्रकाशित या पुस्तकाला ‘आधार’चे शिल्पकार नंदन निलेकणी यांची प्रस्तावना आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तक आणि लेखिका यांच्याबद्दलचे कौतुकोद्गार आहेत. यामध्ये भांडवली बाजार, वित्त नियामक नेतृत्वाचा, तसेच वित्त विषयाला वाहून घेतलेल्या पत्रकार सहयोगींचा समावेश आहे. शेवटच्या चार पानांवर पुस्तकात आलेल्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित काही संज्ञा, वापरात येणाऱ्या लघुरूपांचे विस्तृतीकरण त्यांच्या नोंदपृष्ठ क्रमांकासह देण्यात आले आहे. त्यामुळे या संज्ञांशी फारसे परिचित नसलेल्यांना त्या समजून घेण्यास मदत होईल. एकुणात, भारतीय मानसिकता ध्यानात घेऊन लिहिलेले हे पुस्तक आर्थिक सुरक्षिततेचा वाटाडय़ा ठरणार आहे हे निश्चित!
- ‘लेट्स टॉक मनी’
- लेखिका : मोनिका हलन
- प्रकाशक : हार्पर बिझनेस
- पृष्ठे : २१२, किंमत : ३९९ रुपये
by- Loksatta
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा