शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

गणपती बाप्पाकडून शिका हे बिझनेस स्किल्स...

गणपती बाप्पाकडून शिका हे बिझनेस स्किल्स

सगळ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले आहे.. जिकडे तिकडे बाप्पाच्या छोट्या व उंचच उंच मूर्ती, पूजा, आरत्या, डेकोरेशन, प्रसाद, लायटिंग या सर्वांची धूम आहे. बाप्पा येणार म्हणून सगळीकडे आपसूकच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झालेले असते. बाप्पाची आरती म्हणताना आपण त्यांच्या अनेक नावांचे स्मरण करतो.. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची अनेक नावे आहेत, पण सर्वात जास्त त्यांना 'विघ्नहर्ता' म्हणून ओळखले जाते. आयुष्यात येणाऱ्या विघ्नांचे हरण करतात म्हणून त्यांचे हे नाव पडले. कौटुंबिक जीवनात व व्यवसायात उत्तम कामगिरी करण्यासाठी लागणाऱ्या गुणांचे बाप्पा हे प्रतीक आहेत. कोणत्याही गोष्टीची नवी सुरुवात करताना गणपती बाप्पाची पूजा केली जाते. त्यांच्या चतुराईच्या व हुशारीच्या अनेक कथा लोकप्रिय आहेत. असे हे आपले आवडते बाप्पा आपल्याला बिझनेस सुरु करण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे प्रोत्साहन देतात तसेच विविध प्रकारे कौशल्ये शिकवून जातात.. 

१. मोठे मस्तक: व्यापक विचार, विवेकबुद्धी व शहाणपण - 
गणपतीचे मोठे मस्तक हे मोठे विचार, विवेकबुद्धी, ज्ञान व सकारात्मक विचारांनी भरलेल्या मनाचे प्रतीक आहे. त्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात की एखाद्या लीडरने ब्रॉडमाईंडेड असायला हवे, त्याचे सकारात्मक विचार करणारे मन असायला हवे. बिझनेससाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याने व्यापक विचार करायला हवा. कोणत्याही मोठी स्वप्ने मिळविण्याकरिता त्याने जजमेंटल असू नये.

२. लहान डोळे: केंद्रित दृष्टी 
गणपती बाप्पाचे लहान डोळे आपल्याला आपल्या हातातील काम पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करावयास सांगतात. त्याचप्रमाणे बाप्पा सूक्ष्मदर्शी दृष्टीचे प्रतिनिधित्व करतात ज्यामुळे तुमची निरीक्षण करण्याची क्षमता वाढते. लक्ष केंद्रित करण्याची सवय आणि दृढनिश्चयी दृष्टिकोन हे यशाचे महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. 

३. मोठे कान: उत्तम श्रोता -
मोठे कान एक उत्तम श्रोत्यांचे गुण निर्धारित करतात. एका मॅनेजर किंवा लीडरने उत्तम वक्त्यासोबतच एक उत्तम श्रोता असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याने त्याच्या टीममेट्स आणि कलिग्सचे सर्व म्हणणे ऐकून घ्यावे. एका उत्तम बिझनेसमन साठी प्रभावी आणि अत्यावश्यक नेतृत्वगुण म्हणजे त्याचे उत्तम श्रोता होणे. 

४. सोंड: सावधानता व सतर्कता -
लांब नाक किंवा सोंड हे नेहमी सभोवताली नेहमी लक्ष देणे व सावधानता बाळगणे हे सूचित करते. आपल्या बिझनेस मध्ये काम कसे चालू आहे किंवा आपल्या सभोवताली स्पर्धक बिझनेस कसे काम करत आहेत यावर बारकाईने लक्ष द्यावे हे आपल्याला बाप्पाची सोंड शिकवते. त्याचप्रमाणे एक चांगला बिझनेसमन फार पूर्वीच भविष्यात येणाऱ्या धोक्याचा अंदाज लावतो आणि त्यासाठी आधीपासूनच तयारी करतो. 

५. मोठे पोट: सर्व गोष्टी पचवून त्यांना समायोजित करणे  
मोठे पोट हे कोणतीही गोष्ट पचवण्याची व पुढे जाताना कोणतीही गोष्ट लगेच शिकण्याची क्षमता दर्शविते. यामध्ये चांगल्या व वाईट दोन्हीही गोष्टी येतात. म्हणजेच एक उत्तम बिझनेसमन किंवा लीडर हा अपयशाने खचून जात नाही तर या अपयशातून वर येऊन अधिक मेहनत करून यशस्वी होतो. तो कृती करतो व प्रतिक्रिया देत नाही. हेच बाप्पाचे मोठे पोट आपल्याला सांगते. 

६. तुटलेला दात: त्याग - 
बाप्पाचा तुटलेला दात हा त्यागाच्या शक्तीचे प्रतीक आहे. अनेकदा मॅनेजर किंवा बिझनेसमनला त्याच्या भावनांमधून बाहेर निघून आपल्या बिझनेस, कामगारांसाठी पुन्हा आपले काम सुरु करावे लागते. याशिवाय त्यांना कोणत्याही स्वार्थी हेतू किंवा आवडीशिवाय इतरांसाठी कार्य करावे लागते. यामध्येच बिझनेसचे यश समाविष्ट आहे. 

अशा प्रकारे गणपती बाप्पा आपल्यासाठी अनेक गोष्टींचे प्रतीक आहे. या सर्व महत्वाच्या बिझनेस स्किल्स आपल्याला गणपती बाप्पाकडून शिकता येतात. बिझनेस वाढवण्यासाठी या सर्व स्किल्स तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तेव्हा यावर नक्की विचार करा. 
गणेशोत्सवाच्या आपण सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल