गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

छत्रपती शिवराय आणि आर्थिक नियोजन...



हिंदुस्थानचा इतिहास नजरेखालून घातल्यास स्पष्टपणे जाणवते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक सुबत्तेसाठी उद्योगावर जितका भर दिला, तितका इतर शासनकर्त्यांनी दिला नाही. राज्याचे कोषागार नेहमी श्रीमंत असावे म्हणून प्रजेचा आर्थिक छळ न करता योग्य व माफक साराभरती व करवसुली झाली पाहिजे, अशी सक्त ताकीद महाराजांनी चिटणीसांना दिली होती. व्यापारउदीम, संपत्ती संरक्षण व अर्थनियोजन याबाबत शिवाजी महाराजांचे विचार व योजना काळाच्याही फार पुढे होत्या आणि म्हणून समृद्ध व प्रगल्भ होत्या.

राज्याचा कोषागार जर संपन्न व भरलेला असेल तर त्या राज्याची प्रगती निश्चितच होते. राज्याची व रयतेची आर्थिक स्थिती सुधारते. लढाईमध्ये गनिमाचे हस्तगत केलेला सर्व मुद्देमाल कोषागारात जमा करणे हा मराठी फौजांचा शिरस्ता होता आणि म्हणूनच शिवकालीन मरगठ्ठा हा प्रगतीवर होता. आर्थिक सुबत्तेकरिता कास्तकार व शिलेदार यांना मध्यबिंदू मानून छत्रपती शिवरायांनी अर्थकारण केले.
हिंदुस्थानचा इतिहास नजरेखालून घातल्यास स्पष्टपणे जाणवते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक सुबत्तेसाठी उद्योगावर जितका भर दिला तितका इतर शासनकर्त्यांनी दिला नाही. राज्याचे कोषागार नेहमी श्रीमंत असावे म्हणून प्रजेचा आर्थिक छळ न करता योग्य व माफक साराभरती व करवसुली झाली पाहिजे, अशी सक्त ताकीद महाराजांनी चिटणीसांना दिली होती. शेती हा हिंदवी स्वराज्याचा मुख्य उद्योग. म्हणून शेतकी तंत्रज्ञान विकसित व्हावे या हेतूने महाराजांनी दादोजी कोंडदेवांना पाहणी करण्यास सांगितले होते. महसूल विभागाला पिकाचे रास्त मोजमाप करून न्यायोचित करवसुली करावी असा दंडक घालून दिला होता. मुलुखगिरीवर वचक बसवून उभ्या पिकांचा नाश करणाऱया सैनिकांना जेरबंद करून शिवाजी महाराजांनी सजा फर्मावली. शिलंगणाचे सोने लुटून आल्यावर त्याच शेतकऱयाला शिलेदार (मावळा) बनवून मुलुखगिरीवर जाण्यास प्रवृत्त करणारे शिवराय माणसाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल याबाबत प्रयोगशील होते. या योजनेमुळे रयतेस दरसाल उत्पन्न मिळे व पावसाळय़ात सैन्य माफक व अत्यल्प बाळगल्याने कोषागाराचा आर्थिक ताण कमी होई. यालाच आज उद्योगव्यवहारात कुशल मनुष्यबळाचा पुरेपूर वापर असे एचआरडीवाले म्हणतात.
राज्याभिषेकप्रसंगी ईस्ट इंडिया कंपनीचा दूत हेन्री ऑझ्किडन याचा नजराणा स्वीकारताना शिवप्रभूंनी इंग्रजांना सक्त आदेश दिला होता की, इंग्रजी गलबते मराठय़ांच्या सागरी हद्दीच्या चाळीस मैलाबाहेर मुशाफिरी करतील. एतद्देशीय मच्छीमारास नुकसान करणार नाहीत याची खबरदारी घ्या. हा प्रसंग १६७४ सालातला. त्यानंतर बरोबर तीनशे वर्षांनी हिंदुस्थान सरकारने १९७४ मध्ये जो सागरी कायदा केला त्याचे मूळ या शिकवणीत होते. तो आधुनिक सागरी कायदा म्हणजे ‘एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन सी लॉ’ होय. त्याचाच अर्थ राष्ट्राचा व्यापारउदीम, संपत्ती संरक्षण व अर्थनियोजन याबाबत शिवाजी महाराजांचे विचार व योजना काळाच्याही फार पुढे होत्या आणि म्हणून समृद्ध व प्रगल्भ होत्या.
एका पोर्तुगीज अंमलदाराने आपल्या राजाला लिहिलेल्या गुप्त पत्रावरून प्रकाशात आले आहे की, १६५९ मध्ये छत्रपतींच्या मराठा आरमारात केवळ २८ जहाजे होती, पण जंगी बेडय़ात (नेव्हल फ्लीट) राज्याभिषेकप्रसंगी १६७४ मध्ये ७४ युद्धनौका खडी तालीम देत सागरात गस्त घालत होत्या. हिंदुस्थानच्या इतिहासात जे प्रमुख शास्ते झाले त्यात सागरी आरमारी बळाचे महत्त्व शिवरायांनी ओळखून नौसेनेची जी उभारणी केली ती फारच मोलाची होती. शिवरायांपूर्वी केरळात डच, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध कुंजाली राजे आरमार उभारून १०० वर्षे लढले खरे, पण ते प्रयत्न दिशाहीन व असंघटित होते. शिवरायांनी मात्र जाणीवपूर्वक व योजनाबद्ध आरमार उभे केले. जहाजबांधणी उद्योगात वारली, कातकरी या मागास जातींना गुंतवून महाराजांनी आदेश काढला की, गोऱया टोपीकरांकडून जहाजबांधणी कला आत्मसात करून त्यात देशी बांधणीचा अपूर्व मिलाफ करा. म्हणजे सेवायोजना आपोआप होऊन आरमाराला बळ प्राप्त होईल. कुलाबा येथे शिवकालीन आंग्रे कुलोत्पन्न तुकोजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली जहाजबांधणी कारखाना कार्यरत होता. ‘कुलाबा’ या शब्दाचा अर्थच गोदी होय. या गोदीत शिरब, पाल, गलबत ही अर्वाचीन काळातील जहाजे बांधली जात. हिंदुस्थानातील जहाजबांधणी उद्योगाची ती पहिली पायरी होती.
रत्नदुर्गच्या (रत्नागिरी) दक्षिण अंगाला उत्खननात एक भुयार सापडले. निरीक्षण केले असता समजले की, तो एक तरता तराफा होता. त्याद्वारे जहाजांना युद्ध सुरू असतानासुद्धा किरकोळ डागडुजी करून जायबंदी जहाज पुन्हा मोहिमेवर रवाना केले जात असे. यालाच ‘फ्लोटिंग डॉक्स फॉर बेस रिपेअरिंग युनिट्स’ असे आधुनिक काळात संबोधतात. अशा या दुर्गम जलदुर्गावर दोन-तीन टनांच्या प्रचंड तोफा मावळय़ांनी कशा चढविल्या, हे एक कोडेच आहे. याचाच अर्थ शिवरायांचे दळणवळण खाते तंत्रयुद्ध व अद्ययावत होते हे दिसून येते.
स्वयंभू भौगोलिक महत्त्वामुळे शिवरायांनी दख्खनचे जिब्राल्टर म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. या गडावरून देश व कोकण या दोन्ही प्रांतांवर करडी नजर ठेवता येते. या राजधानीची मांडणी करताना प्रथम शिवप्रभूंनी बाजाराची जागा मुक्रर करून गडावर ऐन वख्ताला दाणापाणी कमी पडू नये याची खात्री व सोय करून ठेवली.
या बाजारात सैन्याला रास्त दराने वस्तू मिळून शिबंदीत कमतरता न भासता व्यापारात वृद्धी होऊन स्पर्धात्मक तत्त्वावर उत्तमोत्तम चीजवस्तू प्रजाजनांना मिळतील अशी व्यवस्था व योजना होती. बारा बलुतेदारांना स्वराज्याच्या सेवेत आणून भूमिपुत्रांना उद्योगधंद्यात उत्तेजन दिले. शस्त्रास्त्र निर्मिती सुरू केली.
महाराजांनी किल्लेदार व गडकरी यांना काही सुरक्षा सूचना आपल्या आज्ञापत्रातून दिल्या आहेत. ‘गडकरीहो, सावध चित्ताने वर्तणूक ठेवून दुर्गाची निगा राखणे, अंधाऱया रात्री गडाचे आगळ, कडीकोयंडे कोठारात वातीच्या दिव्याचा वापर न करणे, अन्यथा उंदीर तेलाच्या लोभाने वात पळवताना कोठारास आग लागून स्वराज्याच्या संपत्तीचे नुकसान होईल. याबाबत कसुरात टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही. झाल्यास मुलाहिजा न ठेवता देहदंड.’
अर्वाचीन काळात औद्योगिक सुरक्षिततेवर जो भर दिला जातो त्याची जाणीव तीनशे वर्षांपूर्वी शिवरायांना होती व स्वराज्यात त्याबाबत जागृती व्हावी या विचाराने शिवाजी महाराज पावले टाकत. सांप्रत काळी शिलेदार व कास्तकार हे दोघेही दुर्लक्षित आहेत. सैन्यकपात व शेतकीला आलेले गौणत्व हे काही भूषणावह नाही. सैन्याचे अर्थकारण उणे करून सरकार सैन्यावर अन्याय करीत आहे. आज हिंदुस्थानला चीन, पाकिस्तान व दहशतवाद या तीन संकटांविरोधात लढा द्यायचा आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.







विनायक श्रीधर अभ्यंकर
(लेखक माजी नौसेना अधिकारी आहेत.)
15.03.2017 
http://www.saamana.com/about-chatrapti-shivaji-maharaj-and-his-financial-planning/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल