शेतीत राम राहिला नाही म्हणून निराशेने मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बीड जिल्ह्यात कमी नाही. तरीही हार न मानता जिद्दीनं शेती कसणाऱ्या आणि ती फायद्यात आणून दाखवणाऱ्या विद्याताई रुद्राक्ष. समस्त शेतकरी वर्गासमोर कष्ट आणि मेहनतीचा आदर्श घालून देणाऱ्या ठराव्यात...

‘शेती करताना घरातल्या बायका म्हणजे इतरांसोबत राबणारं घरचं हक्काचं मजूर, शेतीच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचं स्थान नगण्यच! पण गुंतवणुकीच्या तुलनेत मिळणारा फायद्याचा विचार आणि काटकसर या उपजत बायकी स्वभावगुणांचा पुरुषप्रधान शेतीत कधी उपयोगच करून घेतला गेला नाही आणि मी नेमकं हेच केलं. आज २५ वर्षं काळ्या मातीत राबताना कष्टाचं सार्थक झाल्याची भावना आहे,’ सेंद्रिय शेतीसाठी राज्य सरकारच्या राजमाता जिजाऊ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या विद्या रुद्राक्ष सांगत होत्या. विद्याताई मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातल्या. अंबाजोगाई तालुक्यातलं डिघोळअंबा त्यांच गाव. बीएस्सी मायक्रोबायोलॉजीपर्यंत शिकलेल्या विद्याताई सांगतात, १९९३ साल होतं जेव्हा मी १५ एकर शेतीची धुरा खांद्यावर घेतली. नोकरीच्या निमित्ताने पती कोकणात होते पण वातावरण न मानवल्याने दोन मुलांसह मी गावी परतले. शेतीत लक्ष घातलं. बेभरवशी पाऊस आणि तितकीच बेभरवशी भावाची हमी, त्यामुळे गुंतवणूक अधिकची होऊन फार तोटा पदरी पडू नये हा माझा दृष्टिकोन. यासाठी सेंद्रीय शेतीचा पर्याय निवडला. सुरुवातीला गायी घेतल्या, दूध उत्पादन आणि खतांसाठी शेण असा दुहेरी उद्देश! मग कंपोस्ट सुरू केलं, तेच खत शेतीसाठी वापरलं, शेणाचा आणखी उपयोग करून घेत बायोगॅस केला तो अजून सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या माऱ्याने शेतीचं बिघडलेलं आरोग्य सुधारलं अन् खतांचा अवाढव्य खर्च कमी झाला. दुधाचे पैसे झाले अन् घरच्या गॅसचाही खर्च कमी!

२०१४ मध्ये बचत गटांसाठी भरवण्यात आलेलं महालक्ष्मी सरस प्रदर्शन हा विद्याताईसाठी टर्निंग पॉइंट ठरला. त्यांच्या एका स्नेह्याने त्यांना या प्रदर्शनात त्यांची जैविक शेतीतली उत्पादनं मांडण्याबद्दल सुचवलं. पण हे सगळं नवीनच असल्यामुळे आपल्याला मार्केटिंग जमेल का असा प्रश्न त्यांना पडला. पण त्यांनी प्रयत्न केले. मुंबईच्या या प्रदर्शनाने त्यांना सभाधीटपणा, आपल्या उत्पादनांची बाजू कशी पटवून सांगायची याची कला शिकवली.
‘शेती प्रयोगाच्या आणि त्यात यशस्वी होण्याच्या सगळ्या काळातलं आणखी एक समाधान म्हणजे, आमची उत्पादनांची प्रतवारी, पॅकिंग, विक्री या कामाच्या माध्यमातून मी चार शेतकरी कुटुंबांना बारा महिने रोजगार उपलब्ध करून देऊ शकले याचं आहे. यापैकी अाशा जगदेव यांच्याकडे अवघी एक एकर शेती होती. त्यात कुटुंबाची गुजराण अवघड असल्यानं आशा यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतानाच त्यांचा मुलगा तेजसच्याही शिक्षणासाठी हातभार लावला. १५ वर्षांपासून आशाताईंसारखीच आणखी चार कुटुंबं आपल्याकडे कामाला असल्याने त्यांच्याशीही एक नातं तयार झालं आहे, असं विद्याताईंनी सांगितलं.
२५ वर्षांपासून शेती करत असल्या तरी अजून थकले नसल्याचं विद्याताई सांगतात. आजही पहाटे चार वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. या शेतीमुळे त्यांचा मोठा मुलगा अविनाश कानपूर आयआयटीमध्ये शिकतोय तर धाकटा मुलगा बीटेक पूर्ण करून नागपूरला नोकरी करतोय. त्यांच्या पतीने १० वर्षांपूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने सध्या ते दोघे मिळून शेती करतात. शिवाय इतरांना मार्गदर्शनही करतात. विद्याताईंना रणरागिणी, सावित्री सन्मान, वीरशैव समाज भूषण सन्मान अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
नुकतंच राज्य शासनाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना २०१७ सालच्या जिजामाता कृ़षिरत्न पुरस्कारानं सन्मानित केलंय.
By - Amol Mule, Divya Marathi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा