सोमवार, १५ जानेवारी, २०१८

डिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल...


मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील एक महिला आपली मेहनत, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर कृषि क्षेत्रातील जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळवते ही अभिमानाची बाब आहे. शेतीतील कष्ट आणि जोडीला उच्च शिक्षणाच्या जोरावर एक नवी सुरुवात केली आहे. बीड जिल्हयातील डिगोळ अंबा ता. अंबाजोगाई येथील एक नवउदयोजक महिला श्रीमती विद्या रुद्राक्ष या महिला शेतकरी . यांना नुकतेच मुंबईत मा.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ कृषि भूषण पुरस्कार 2013-14 या पुरस्काराने गौरविण्यात आले.





या विषयी बोलताना श्रीमती रुद्राक्ष म्हणाल्या, प्रथम मला शासनाचं आभार मानायचं आहे. माझ्या नव नव्या उपक्रमाची आणि शेतातील कामाची दखल घेऊन राजमाता जिजाऊ यांच्या नावाने दिलेला कृषि भूषण पुरस्कार मिळाला.या बाबत मला अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे या यशात माझ्या कुटुंबाचे विशेष सहकार्य लाभले यात माझी दोन मुलं आणि पती यांनी वेळोवेळी माझ्या शेतातील कार्याला कृतीतून सहकार्य केलं आहे. यामुळे माझ्या कुटुंबाला देखील हा पुरस्कार मिळाला याचा आनंद वाटतो.

माझ्या शेतात उत्पादित झालेल्या हळदीचे मी ITT (मुंबई) कडून तपासणी करुन विक्रीयोग्य आणि घटकाच्या गुणवत्ता विषयी त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठातील डॉ.सौगात घोष भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी संशोधनानंतर असे सिध्द केले की, आमच्या उत्पादित हळदीमध्ये कॅन्सर (कर्करोगावर) रुग्णावर क्रुकुमिन हा घटक उपचारात्मक जो घटक आवश्यक आहे तो यात सर्वात जास्त आढळल्याने ही हळद कॅन्सर रुग्णावर औषध म्हणून वापरली जात आहे. तसेच या सर्व कामामध्ये मला माझे वडील डॉ.महादेव पाचेगावकर यांचं मार्गदर्शन लाभलं असून सुभाष पाळेकर यांनीही मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र दिनदयाळ शोध संस्थान डिगोळ अंबा यांनीही मदत केली .

माझं शिक्षण बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) झालं असून मी 1993 पासून स्वत: शेती करायला सुरुवात केली. माझे पती कृषि खात्यात कृषि निरीक्षक या पदावर नोकरी करीत होते. पण त्यांची सेवा कोकण विभागात असल्याने व आम्हाला ते हवामान न मानवल्यामुळे आम्ही आमच्या स्वत:च्या गावी डिगोळ अंबा येथे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनी माझ्या कामाची तळमळ बघून पतीने देखील शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृती घेतली. मिळालेल्या पैशातून ट्रॅक्टर घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे शेती करण्याची आवड मला अधिक होती.

सुरुवातीला उत्पादन वाढीसाठी आम्ही रासायनीक खते किटकनाशके याचा वापर केला. पण यातून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो म्हणून शेती पद्धतीत बदल करुन शेणखताचा वापर केला. यासाठी पशुधन वाढविले. बैल, गाय आणि म्हैस आम्ही विकत घेतली. यातून दूधही मिळू लागले आणि स्वंयपाकासाठी लागणारा गॅस हा गोबरगॅसच्या माध्यमातून मिळू लागला. तसेच शेतजमीनही सकस झाली. गांडूळ खत निर्मितीही करण्याबरोबरच गोमूत्राचा आणि कडुनिंबाच्या पाल्याचा एकत्र वापर पिकावर किटकनाशक म्हणून केला. शेतातील पाला पाचोळा न जाळता यापासून अच्छादन केले. पावसाचं पाणी जिरवण्यासाठी बांधबंदिस्ती केली. यामुळे विहिरीचं पाणी वाढलं. माझ्या चार एकर जमिनीवर केसर अंब्याची लागवड केलेली आहे. त्यात आम्ही हळद आणि अद्रक, सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा इ. आंतर पीक घेतो.

माझं घर शेतात आहे. जनावरासाठी गोठा, पाण्याचा हौद, गोबरगॅस, ट्रॅक्टर व शेतीसाठी लागणारी औजारं तिफण, तण काढणारं, कोळपणी आम्ही घेतली. तसेच घरासाठी लागणारा भाजीपाला, लिंबू, कडीपत्ता या झाडाची लागवड मी घराभोवती केली आहे. तसेच नारळ, आंबा, चिक्कू, डाळिंब, अंजीराची झाडं लावली आहेत. पेरु, सिताफळ, बदाम, केळी इ. फळझाडाच्या लागवडीबरोबरच हिरडा, बेहडा, कोरफड, आळू, तुळस अशा उपयोगी झाडांचे संगोपन केले आहे.

मी बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या शेतातील हळदीवर प्रक्रिया करुन ती वेगवगळ्या प्रदर्शनात विक्रीसाठी नेली जाते. यातून मी चार महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे मी स्वत: लक्ष देते. तसेच आरोग्याविषयी, स्वच्छतेच्या सवयीविषयी मार्गदर्शन करते. याचबरोबर आम्ही खो-खो स्पर्धेत तालुका, जिल्हास्तरावर भाग घेतो. यामधून आम्हाला जगण्याची नवी प्रेरणा आणि उत्साह मिळतो.

शेतीची समृद्धता, सर्वांगीण प्रगती यासाठी मी प्रयत्न करीत राहणार आहे. तसेच महिलांना माझे सांगणे आहे की, महिलांनी आधी स्वत:वर विश्वास ठेवावा. नंतर आपण कोणतेही काम तडीस नेऊ शकतो. तसेच शेती हा व्यवसाय प्रामुख्याने महिलाच करतात. शेतात महिलाच जास्त काम करतात. यात महिलांनी नवा प्रयोग थोड्या प्रमाणावर यशस्वी केला तर त्याचा तोटा जास्त होत नाही. यासाठी सहनशीलता हवी. झटपट परिणाम सेंद्रीय शेतीमध्ये मिळत नाही. जर आपणाला आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर या नैसर्गिक शेतीचा उपचार म्हणूनही पर्याय निवडता येतोच. संतोष नानेकर या शेतकरी बांधवांने आपल्या शेतातील गाईला झालेल्या गाठीवर ह्या हळदीचा उपचार दिल्यानंतर त्या गाठी पूर्णपणे कमी झाल्या आहेत. यावरुन मला माझ्या कामाचं समाधान वाटते. आरोग्य जपण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि याचे मूळ शेतीत आहे. शेती निरोगी तर उत्पन्न आणि आपलं जीवन निरोगी बनेल.













by - http://www.newstale.in/success-story-of-vidhya-rudrakshy/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल