सोमवार, १८ एप्रिल, २०१६

सेंद्रिय मटण - चित्रपटसृष्टीला रामराम करत अरुण कचरे शेळीपालन व्यवसायात /


 




महाराष्ट्रातील प्रतिथयश निर्माता दिग्दर्शक अरुण कचरे यांनी आता चित्रपटसृष्टीला राम राम करीत आता आपल्या गावाकडे शेती करण्यास सुरुवात केली असून त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरु करून सेंद्रिय मटण ही महाराष्ट्रातील पहिली संकल्पना सुरु केली आहे. सध्या या व्यवसायातून ते दरमहा लाखो रुपये उत्पन्न घेत आहेत.

अरुण कचरे हे मूळ सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनी १५ वर्षांपासून कृणाल म्यूझिक कंपनीच्या माध्यमातून २५०० मराठी गाणी कंपोज केली. याच बरोबर ५ मराठी चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक करून काळूबाईच्या नावाने चांगभलं, बळी राजाचं राज्य येवू दे या सारखे चित्रपट दिग्दर्शित केले.

आता ते आपल्या शेतीची सेवा करण्यासाठी गावी कराड येथील वाघेरी येथे ८ एकर शेतीत सेंद्रिय पद्धतीने चारा उत्पादित करून त्यांनी बंदिस्त शेळीपालन सुरु केला आहे. राजस्थानी जातीची ४०० बोकडे व शेळ्या यामध्ये असून असून १० किलो पासून ९० किलोपर्यंत ही बोकडे आहेत. सध्या त्या शेळ्यांना व बोकडांना ते दररोज मटकी, हुलगा, उडीद, डाळी अशी पौष्टिक खाद्ये देतात. ही शेली सध्या ६०० ते ६५० रुपये किलोने विकले जात आहे.  या सेंद्रिय मटणाला सद्या महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात मोठी मागणी आहे.
 
 सौजन्य : आपली मराठी
Published 29-Mar-2015 18:14 IS
----------------------------------------------
 
 
चित्रपट निर्माता झाला पूर्णवेळ बंदिस्त शेळीपालन व्यावसायिक
काळाची पाऊले ओळखत झगमगत्या सिनेसृष्टीतून शेतीकडे वळलेल्या मराठी चित्रपट निर्मात्याने सातारा जिल्ह्यातील वाघेरी येथे बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. सुमारे पाच शेळ्यांपासून सुरू झालेला हा व्यवसाय दोनशे जनावरांपर्यंत पोचला आहे. जातीवंत नर व मादी शेळ्यांचा पुरवठा व सेंद्रिय मटण निर्मिती हे ध्येय ठेऊन त्यांनी व्यवसायाला आकार दिला आहे.
अमोल जाधव
सातारा जिल्ह्यात कराडपासून श्रीक्षेत्र गोंदवले (ता. माण) कडे जाताना अकरा किलोमीटरवर अरुण कचरे यांचा "काळूबाई कृषिकन्या' नावाने बंदिस्त गोट फार्म आहे. त्यांचे मूळगाव याच जिल्ह्यातील खळे (ता. पाटण) आहे. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे लहान वयातच मुंबईत भाजी मार्केटला भाजी विकण्याचा व्यवसाय त्यांनी केला. त्यानंतर "म्युझिक इंडस्ट्री' व नंतरच्या टप्प्यात सिनेसृष्टीकडे ते वळले. गाजलेल्या कृणाल म्युझिक कंपनीचे ते महत्त्वाचे भागीदार होते. सिनेसृष्टीत कार्यरत असताना त्यांनी तब्बल अडीचहजार गाणी लिहिली आहेत. बळिराजाचं राज्य येऊ दे, काळूबाईच्या नावानं चांगभलं, कुंडमाउली मळगंगा या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली आहे. त्यांच्या कथा- पटकथा लिहिल्या आहेत.

बदलत्या काळाची ओळखली पाऊले
सन 2000 नंतर आलेले संगणकीय युग व सध्या "सोशल नेटवर्क'च्या युगात व्यवसायाची अनिश्‍चितता लक्षात येऊ लागली. भविष्यात शेती हाच व्यवसाय आपल्याला स्थिरता देऊ शकेल, असे त्यांना वाटू लागले. त्यानुसार नियोजन सुरूही केले. सन 2011 पासून कचरे पूर्णवेळ शेतकरी झाले. वाघेरी (ता. कराड) येथे माळरान स्वरूपाची 8 एकर शेती विकत घेतली. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतीची बांधबंदिस्ती केली. पाण्याच्या उपलब्धतेसाठी विहीर, बोअर व जवळच्या आरफळ कालव्यातून पाइपलाइन केली. कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळेही घेतले. त्या आधारावर बागायती पिके घ्यायला सुरवात केली.

शेळीपालनाचा वाढवला आकार
पाच शेळ्या व एक नर व पुढे 25 शेळ्या असे दोन टप्प्यात नियोजन करीत, पैदास कार्यक्रम करीत आज लहान-मोठ्या व नर-मादी धरून सुमारे 200 जनावरे कचरे यांच्या "गोट फार्म'मध्ये आहेत. अजमेर (सिरोही), सौजत (जोधपूर) व उस्मानाबादी जातीच्या या शेळ्या आहेत. शेतकऱ्यांना जातीवंत नर व मादी जनावरे देण्याच्या उद्देशाने त्यांचे संपोगन केले जाते. कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांची पैदासही केली जाते.
राजस्थानी शेळीचे जन्मल्यापासून संगोपन चांगले केल्यास मांसवाढ चांगली मिळते. तसेच दूध व नरांची पैदास जास्त प्रमाणात मिळते. त्यामुळे नरांना मांसविक्रीसाठी मागणी चांगली आहे.

शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबी
100 बाय 50 फूट आकारातील दोन संगोपनगृहे आहेत. त्यातील एक रात्रीसाठी व एक दिवसासाठी आहे. शेळ्यांचे योग्य संगोपन व त्यांची मानसिकता जपण्याचा हेतू दोन संगोपनगृह उभारणीमागे असल्याचे कचरे म्हणाले. त्याचबरोबर आजारांचे प्रमाणही कमी राहते.
कचरे यांचे कुटुंब मुंबई येथे राहते. मात्र, ते स्वतः महिन्यातील 24 दिवस गावीच राहतात. शेती, शेळीपालन, गाईंचा गोठा, गांडूळखत व्यवसायासाठी कायमस्वरूपी सहा कामगार आहेत. प्रत्येक कामाचे योग्य वेळेत नियोजन, प्रत्येक शेळीची वैयक्तिक काळजी याबाबींवर अधिक लक्ष पुरवतात. रात्रीच्या गोठ्यामधून सकाळी साडेसहा ते सात वाजता शेळ्यांना दिवसाच्या गोठ्यात आणले जाते. वजन व वयानुसार मोड आलेली कडधान्ये त्यांना खाण्यास दिली जातात. फार्ममध्ये 24 तास शुद्ध पाण्याची सोय केली आहे.

व्यवस्थापनातील बाबी
- गोठ्याची रचना, निवारा या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्याने व्यवसाय फायद्यात राहण्यास मदत झाली.
- वर्षातून चारवेळेस लसीकरण व जंतूनाशके दिली जातात.
- कृषी विभागाच्या सहकार्याने गांडूळखत निर्मिती प्रकल्प उभारला. आजमितीला सहा बेड्‌सच्या माध्यमातून खतनिर्मिती. गोठ्यालगत 30 बाय 30 फूट आकारात बांधीव टाकीत गोठ्यातील मूत्र साठवले जाते. विद्युत मोटरच्या साह्याने गांडूळखताच्या बेडवर त्याची फवारणी.
- गेल्यावर्षी स्वतःच्या शेतीसाठी वापरून शिल्लक खताची प्रतिकिलो 15 रुपये दराने विक्री
- एका टाकीत "व्हर्मीवॉश'ची निर्मिती. त्याची प्रतिलिटर 250 रुपये दराने विक्री.
.
सेंद्रिय पद्धतीवर भर
शेळीपालनासोबत सेंद्रिय पद्धतीने मटणनिर्मिती ही अनोखी संकल्पनाही राबवण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. त्यासाठी सात एकरांत सेंद्रिय खतांच्या वापरातून चारानिर्मिती करतात. सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी त्या क्षेत्रावर मूग, मटकी, चवळी, उडीद, हरभरा, सोयाबीन, तूर आणि हुलगा ही पिकेही घेतली जातात. उत्पादीत कडधान्यांना मोड आणून ते शेळ्यांना खाण्यास देतात. ओल्या चाऱ्यासाठी मका, कडवळ, लसूणघास, गवत, शेवरी, तुती, कडूनिंब व काटेरी बाभळीची लागवड केली आहे. सुक्‍या चाऱ्यासाठी कडधान्यांचे भुसकट, शाळूचा कडबा, वाळलेले गवत यांचा वापर होतो. सुक्‍या चाऱ्यामुळे शेळ्यांची पचनक्रिया व्यवस्थित राहिल्याने त्यांच्यामध्ये आजारपणाची भीती राहत नाही.

व्यवसाय आणला फायद्यात
गोठ्यातील जीवंत नराची प्रतिकिलो 600 रुपयांप्रमाणे विक्री होते. ज्यांचा गोट फार्म आहे व शेळीपालनाचे सखोल ज्ञान आहे त्यांनाच अजमेर मादी प्रतिकिलो 700 रुपये व सौजत मादीची 800 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते. पिल्ले विकत नाहीत. नर व मादीचे वजन किमान 30 किलोच्या पुढे झाल्याशिवाय विक्री होत नाही. 

गेल्यावर्षी सुमारे 45 नरांची विक्री केली. विभागातील शेतकऱ्यांकडील शेळीपालन व्यवसायातील उत्पादकता वाढवण्यासाठी 16 जातीवंत नरांचा पुरवठाही केला आहे. त्यापासून सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गुंतवणुकीमधील पाच टक्‍क्‍याप्रमाणे घसारा रक्कम, चारा निर्मिती, लसीकरण, स्वतःसह बाहेरील कामगारांची मजूरी व अन्य असा एकूण उत्पन्नाच्या किमान निम्मा खर्च होतो.
यंदा 65 नर विक्रीसाठी तयार आहेत. 

कचरे यांनी दहिवडी (ता. माण) येथील अहल्याबाई होळकर शेळी-मेंढीपालन संस्थेकडून तीन दिवसांचे प्रशिक्षणही घेतले आहे. आता शेतकऱ्यांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळावा यासाठी ते सशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमही घेतात. संगोपनातील ज्ञानासह बॅंकिंग सुविधा, मार्केटिंगबाबत ज्ञान देण्यासाठी शासनाने आपली प्रशिक्षण कार्यशाळा मंजूर करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, सैदापूर मंडल कृषी अधिकारी निवासराव खबाले यांनी त्यांच्या फार्मला भेट देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.

-----------------------------
अरुण कचरे- 8600552249.
 
 ---------------------------------------------------------
 
 
 आणि दै. अग्रोवोन
Saturday, October 10, 2015 AT 06:00 AM (IST)
Tags: agro special 
 
 
 
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल