शनिवार, ३० एप्रिल, २०१६

फुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे


फुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे 
(Nagraj Manjule about his work, childhood and his journey! Fandry and Sairat)
नागराज, पिस्तुल्या या तुझ्या शॉर्टफिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि आता फॅन्ड्री या सिनेमाला राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. सगळीकडे फॅन्ड्रीची चर्चा आहे. श्याम बेनेगल,बुध्द्देव दासगुप्ता, जब्बार पटेल, दीपा मेहता,अंजुम राजबली आणि अनेकांनी तुझ्या फिल्मचं कौतुक केलं आहे. थोडक्यात आज-कल तेरे फॅन्ड्री की चर्चा हर जबान पर.
मला सांग पिस्तुल्या असो वा आताची फॅन्ड्री दोन्हीमध्ये लहान मुलाची कथा आहे. हा तुझ्या बालपणातील आठवणींचा प्रभाव आहे का ?
हो. पिस्तुल्या आणि फॅन्ड्री या दोन्ही कथांचं बीज माझ्या बालपणातच आहे. माझं लहानपण ही फारच मजेशीर गोष्ट आहे. मी खूपच वाह्यात मुलगा होतो. चौथीत असताना मी दारु प्यायला लागलो. वडलांना दारु आणून देताना मी मध्येच बाटलीतून कोरी दारु प्यायचो. आणि नंतर हापशाच्या पाण्यानं भरुन वडलांसमोर मी आताच दारुची बाटली उघडतो आहे, असं नाटक करायचो. नंतर सातवीत दारु सोडली. गांजा ओढायचो. सिगारेट ओढायचं व्यसन लागलं होतं. सिगारेट घ्यायला पैसे नसायचे. सिगारेट ओढणा-या माणसानं कमी सिगारेट ओढावी आणि पायाखाली चिरडू नये असं वाटायचं. उरलेलं थोटुक मी ओढायचो. पिक्चरचा नाद मला पहिल्यापासूनच होता. करमाळ्याच्या( जि.सोलापूर) सागर थिएटरला पिक्चर पहायचो. कधी पैसे नसले तर चोरुन बघायचो. अगदी चौथी-पाचवीत असताना मी ब्लू-फिल्म्स पाहिल्या. असं दिशाहीन आयुष्य होतं. या सगळ्यात एक कॉमन होतं ते म्हणजे माझा पिक्चर बघण्याचा नाद.

त्यावेळी कोणत्या फिल्म्स पाहिलेल्या तुला आठवतात?
सागरला(थिएटर) जो कोणता सिनेमा लागेल तो मी पहायला जायचो. अमिताभ बच्चन,गोविंदा यांच्या फिल्म्स मला फार आवडायच्या. माझं गाव जेऊर;पण मला आठवतं तसं मी करमाळ्यातच रहायला होतो.मला माझ्या चुलत्यांकडं दत्तक म्हणून दिलेलं. ना घर का न घाट का अशी काहीतरी विचित्र अवस्था होती माझी. सातवीपर्यंत करमाळ्यालाच होतो. त्यावेळी रामायण महाभारत लागायचं. ब्लॅक ऍन्ड व्हाइट टीव्ही. कुणाच्या तरी घरी टीव्ही असायचा. खिडकीतून तरी पाहता यावं म्हणून आम्ही गर्दी करायचो. नंतर रामायणाचं नाटक केलेलं आठवतं. शिवसेनेच्या बालशाखेत मी होतो. राष्टीय स्वयंसेवक संघा्चे खेळ सुरु असायचे. आमच्या खेळांपेक्षा फारच सुसंस्कृत खेळ सुरु असायचे तिथे. तिथल्या शाखेतही मी गेलो.  

….पण हे सारं सुरु असताना तुझा शाळेतला ऍकेडिमिक परफॉर्मन्स कसा होता?
अजिबातच चांगला नव्हता. मला शाळेतच जाऊ वाटत नव्हतं. दोन गोष्टींची मला भीती वाटायची एक म्हणजे दवाखाना आणि दुसरं म्हणजे शाळा. दवाखान्याची भीती स्वाभाविक होती कारण मी आजही इंजेक्शनला घाबरतो;पण शाळेची भीती वाटणं मला आज चुकीच वाटतं. असं नव्हतं व्हायला पाहिजे. शाळा हा चाप्टर कधी एकदा संपतोय आणि पुढं काही तरी नवं घडतंय अशी मी वाट पहायचो.
म्हणजे अगदी मार्क व्टेन म्हणतो तसं मी आणि माझं शिक्षण यात शाळा आडवी आली.
(हसत) अगदी खरंय. कारण शाळेमुळं मी घडलो असं मला अजिबातच वाटत नाही.शाळेतला अभ्यास करायचो नाही. आई-वडिल अडाणी. अभ्यासाला बस म्हटलं की मी नागराज मंजुळे हे माझं नाव दोन दोन पान लिहून काढायचो. ज्या ज्या म्हणून चुका करता येतील त्या मी केल्या आणि त्यातून शिकलो. मी नक्की काय करतोय हे आई-वडिलांनाही माहीत नसायचं. हे चुका करण्याचं स्वातंत्र्य मला नकळतपणे मिळालं होतं.
तुझे पालक सुशिक्षित असते तर तुला या चुका करण्याची मुभा कदाचित मिळाली नसती. आज मागं वळून पाहताना सजग पालकत्व हा पाल्याच्या विकासातील अडथळा आहे असं तुला वाटतं का ?
पालक सुशिक्षित असते तर कदाचित थोडा फार फरक पडला असता. पण आजच्या पुण्या मुंबईच्या सुशिक्षित पालकांकडे पाहून वाटतं की झालं ते बरं झालं. मला चुकांमधून शिकता आलं. सजग पालक हा एका अर्थाने पाल्याच्या विकासातील अडथळाच आहे म्हणजे मुलांना चुका करण्याची मुभाच नाही. मुलांनी १०० % बरोबर असावं ही अपेक्षाच किती गैरलागू आहे !पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यानं ही मुलं दबली आहेत.

हे अगदीच खरं आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत शाळा आडवी यावी अशी एकूण अवस्था  असतानाही शिकलं पाहिजे ही प्रेरणा कशी निर्माण झाली? कारण तू एकटाच पोस्ट ग्रॅज्युएट आहेस. इतरांचं शिक्षण सुटलं… तू सुध्दा दहावीला तीनदा नापास झालास तरीही शिकलंच पाहिजे असं का वाटलं?
मला दहावीत कळालं मी शिकलंच पाहिजे. मी दहावीला फेल झालो. माझे बाकीचे मित्र पुढच्या वर्गात गेले. त्याच वेळी ज्यांनी मला दत्तक घेतलं होतं ते माझे वडील बाबुराव मंजुळे वारले. एक रिकामेपण आलं. त्या काळी घरी पैसेही नव्हते. आतापर्यंत मी कधी मला एकटेपण वाटू दिलं नव्हतं. फिल्म बघायचो. दारु प्यायचो. काही ना काही करुन एकटेपण येऊ द्यायचो नाही. आता फिल्म बघायला किंवा कोणत्याही प्रकारची करमणूक करायला पैसेच नव्हते माझ्याकडे. त्यामुळं स्वतःजवळ थांबण्याची वेळ आली. स्वतःला लपवताच येईना. झाकता येईना. स्वस्तातली करमणूक म्हणून मी पुस्तकांकडं वळलो. वाचायची आवड लागली. माझ्या आत्याचा मुलगा आंबादास चौगुले तो पोलीस टाइम्स आणायचा. मी आख्खा पोलीस टाइम्स वाचून काढायचो. मग बुक स्टॉलवर कमी किमतीत काय मिळतंय का ते बघायचो. चांदोबा, गृहशोभिका असं काय वाट्टेल ते वाचायचो. नंतर मला कळालं की गावात एक लायब्ररीपण आहे. मग त्या सहा-सात महिन्यात जी पुस्तकं मिळतील ती मी वाचून काढली आणि मग वाटायला लागलं की शिकायलाच पाहिजे. गणित आणि इंग्रजी मला अवघड जात होतं. गणिताची मला भीती वाटायची;पण एकदा एवढा गणिताचा टप्पा पार केला की मग काय गणित नाही म्हणून मला हायसं वाटायचं. दहावीत आसिफ शेख या माझ्या वर्गमित्रानं बेरीज वजाबाकी गुणाकार इतकं बेसिक शिकवलं. गणिताला ५२ ला पास होतं आमच्यावेळी. मला बरोबर ५२ मिळाले होते. आणि इंग्रजीत ३५ ला पास तर मला ३९ मार्क्स होते. आणि हे मार्क मला आत्यंतिक कष्ट करुन मिळाले होते. साइन कॉस टॅन च्या कचाट्यातून आपण बाहेर पडलो याचं मला खूप बरं वाटलं. सुटका झाली.
घरच्यांचा असा काही फोर्स नव्हता की शिकलंच पाहिजे
फोर्स असं नाही.आई-वडील म्हणायचेच ना -शिका. आम्ही शिकलो नाही, दगड फोडतोय. तुम्ही तरी शिका.माझा धाकटा भाऊ शेषराज त्यानं आधीच शाळा सोडली होती. तो गवंडीकाम करत होता. वडलांना (पोपटराव मंजुळे) विश्वास होता की मी शिकेन म्हणून.  दुसरं म्हणजे शिकायची इच्छा होती याचं दुसरं कारण म्हणजे कॉलेजचं आकर्षण. कॉलेजचं मुक्त वातावरण. रंगीबिरंगी कपडे घालायला मिळतील. सुंदर मुलींशी बोलता येईल असं वाटायचं. त्या काळी मुलींशी बोलणं म्हणजे काहीतरी पराक्रम केल्यासारखं वाटायचं.
शाळेत किंवा नंतर कॉलेजात असताना तुला कोण असं मार्गदर्शक शिक्षक असं भेटलं का ?
करमाळ्याला सातवी झाली की मी जेऊरला गेलो. तिथंच दहावी पास झालो आणि भारत कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मी बारावीला असताना संजय चौधरी म्हणून एक सर बीएला शिकवत होते. तो असा पहिला माणूस मला भेटला की जो शिक्षकी चौकटीपासून बाहेर पडलेला खरा शिक्षक होता. कविता हा आमच्यातला समान धागा होता.
तुझा “उन्हाच्या कटाविरुध्द”  हा कवितासंग्रह प्रसिध्द झाला आहे. तुझ्या आयुष्यात कवितेनं कशी एन्ट्री केली?

दहावीत असतानाच आणखी एक गोष्ट अशी घडली की मी वाचू लागलो.त्यातल्याच कुठल्या तरी पुस्तकात मी वाचलं की रोजनिशी लिहायला पाहिजे. मग  मला रोजनिशी लिहण्याची सवय लागली. मग मी दररोज सकाळी उठलो. इकडं भटकलो अन रोज रोज तेच ते लिहू लागलो. मला कंटाळा यायला लागला की रोज आपण तेच ते लिहतोय मग ठरवलं की जेव्हा आपल्याला काही वेगळं लिहावं वाटेल तेव्हाच रोजनिशी लिहायला लागलो. आठवड्यातून मी रोजनिशी लिहायला लागलो आणि मग गद्यात लिहिता लिहिता त्याचं पद्यात रुपांतर व्हायला लागलं. म्हणजे अनुभव काही तरी वेगळेच असायचे आणि मी लिहायचो वेगळंच काहीसं.
थोडक्यात रोजनिशीची साप्ताहिकनिशी झाली ! पण मला सांग नागराज एका मुलाखतीत तू म्हणाला होतास की आडवं लिहिण्याच्या ऐवजी उभं लिहिलं की कविता होते असं तुला वाटायचं. कवितेच्या इतक्या ढोबळ आकलनापासून तुझी आताची कवितेबाबतची परिपक्वता हा प्रवास कसा झाला ? तुझी पहिली कविता आठवते का ?
अगदी ओळी आठवत नाहीत पण झालं असं की  'पाहुणेर' ही पुरुषोत्तम पाटलांची कविता मी वाचली. खूप साधी आणि छान. मला ती आवडली. आपण असं लिहायला पाहिजे असं मला वाटायला लागलं.  पुरुषोत्तम पाटलांच्या कवितेचं अनुकरण करुन मी ‘त्या काठी’ नावाची एक कविता लिहिली;पण ते पूर्ण अनुकरण होतं. मग वाटलं असं आपण नाही लिहायला पाहिजे. आपल्याला जे वाटतं ते लिहायला पाहिजे. मग एक कविता मी सोलापूरच्या संचारला पाठवली. ती छापूनही आली. त्या आधी मला वाटायचं हे लोक आडवं लिहायचं सोडून उभं का लिहतात. दहावीला असतानाच मी पाचवीपासूनची मराठी-हिंदीची पुस्तकं मिळवून वाचली आणि कविता मला आवडायला लागली. कवितेचं कसं आहे कविता तुम्हाला तंबाखूसारखी किक देते. दोन ओळी तुम्ही वाचता आणि किकच बसते. नशा येते. कविता वाचून मला मजा यायला लागली. सुरुवातीच्या काळात कुसुमाग्रजांच्या खूप कविता मी वाचल्या. मला त्या फार आवडल्या. कविता म्हणजे काहीतरी सांगायचंय, नीट सांगता येत नाही. काहीतरी निसरडं आहे. हुलकावणी देतंय आणि पकडता येत नाही आणि सगळ्यांनाच ते सांगता येत नाही ते मला कवितेतून सांगता येतंय  ते मला कवितेत सापडतंय असं मला वाटल. प्रेशर कुकरसारख्या तुमच्या सगळ्या वाटा बंद झाल्या की कुठूनतरी कविता बाहेर येते असं मला वाटतं.
कवितेचा समांतर प्रवास सुरु होताच ;पण बीए करत असतानाच एमए पुण्यात करायचं असं तू ठरवलं होतंस का ?
झालं असं की बास्केटबॉलच्या निमित्तानं  राम पवार नावाचा माझा एक मित्र झाला होता. शाळेत असल्यापासून मी बास्केटबॉल खेळायचो. रामचा भाऊ शाम पवार. तो पुण्यात कमवा शिका करुन शिकत होता. नंतर तो पुणं सोडून आला. तो जेऊरला आला की पुण्याचं वर्णन करायचा. पुणं कसं भारी आहे अन काय काय. माझ्या आत्याचा मुलगा राजू देवकर म्हणून तो आधीपासून पुण्यात होता आणि दहावीत असताना मिलिट्रीच्या भरतीसाठी मी एकदा पुण्यात आलो होतो तेव्हापासून पुण्यात यावं अशी माझी फार इच्छा होती. एम ए मराठी करायला माझ्या चार मित्रांसोबत मी पुण्याला आलो.
एम ए शिकत असताना तुला आपण पैसे कमवण्यासाठी काहीच करत नाही याचा ताण तुला वाटायचा का, कारण घरात तू सगळ्यात थोरला.
हो बाकी मी कितीही काही करत असलो तरी कमवण्याच्या बाबतीत नालायक ठरलो होतो. पण चोथा झालेलं जगणं मला नको होतं. माझा सगळ्यात धाकटा भाऊ भूषण तेव्हा पोलिसात नोकरीला लागला होता. त्याहून मोठा भाऊ भारत तोही पोलिसात होता. दोघंही मला मदत करत होते. कधी भेटलो की हळूच माझ्या खिशात पैसे ठेवून जायचे दोघं. घरातल्या सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला म्हणून मी शिकू शकलो.
पुणे विद्यापीठात तू एम ए केलंस. आणि नंतर नगरच्या कॉलेजमध्ये  मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंस. हे कसं काय झालं? एकदम मोर्चा मासकॉमकडे कसा काय वळला?
एम ए कसाबसा फर्स्ट क्लास मिळवून पास झालो. पुढं काय कराव्ं ते कळेना. बी एड करुन प्राध्यापक व्हावं वाटायचं पण मग त्यासाठीचा पैसा नव्हता. भारत म्हणायचा की आपण पैसे भरु;पण एकूणात ते काही परवडणारं नव्हतं. मला वाटायचं की ड्रायविंग लायसन्स काढून  ड्रायवर व्हावं. अशात एक वर्ष वाया गेलं. पुण्यात रहायचं तर मग कुठे रहायचं. विद्यापीठ् ही त्यासाठीची खूप सेफ प्लेस होती. मला एम फिलला ऍडमिशन मिळालं. त्याच काळात माझे वडील (पोपटराव मंजुळे) वारले. पुन्हा आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. इस्त्रीच्या दुकानात काही काळ काम केलं तर कधी वॉचमन म्हणून.  त्याच वेळी मिथुनचंद्र चौधरी या माझ्या मित्राची भेट झाली. हनुमंत लोखंडे हा आमचा कॉमन मित्र. त्या वेळी मिथुनच्या कम्पलसरी हेल्मेट या शॉर्ट्फिल्मला चेन्नईच्या फेस्टीवलमध्ये प्राइझ मिळालं होतं. त्याचं अभिनंदन करण्यासाठी मला त्याला भेटायचं होतं. आणि मिथुनला त्याच्या कविता मला ऐकवायच्या होत्या म्हणून भेटायचं होतं अशा प्रकारे पुणे विद्यापीठात आमची भेट झाली. माझं थोडं काही काम झालं की मी परत जेऊरला जाऊन रहायचो. मिथुन मला म्हणायचा- तू गावात जाऊन काय करतोस? तुझ्यात एवढं टॅलेन्ट आहे. तू इथंच थांब. मग मी मिथुनसोबत पाषाणला राहू लागलो. सेट-नेटची तयारी करावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. मिथुन पहिल्याच प्रयत्नात सेट-नेट पास झाला. मी अनेकवेळा प्रयत्न करुनही सेट नेट पास झालो नाही. सेट-नेट झाल्यामुळं मिथुनला नगरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. त्या कॉलेजसाठी मी ज्युनियर विद्यार्थ्यांना सांगत होतो की तुम्ही मासकॉमला ऍडमिशन घ्या म्हणून. गणेश जसवंत या माझ्या मित्राला मी नगरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे म्हणून सांगितलं तेव्हा तो म्हणाला की तूच चांगल्या पध्दतीनं मासकॉम करु शकतोस. पण मासकॉमची फी होती पंचवीस हजार. माझ्याकडं एवढे पैसे नव्हते. मिथुननं मला हफ्त्या-हफ्त्यानं फी भरायची सवलत दिली. शॉर्ट्फिल्म करायला मिळेल असं मला वाटत होतं शेवटी घाबरत घाबरत मी मासकॉमला ऍडमिशन घेतलं.
पण याच काळात तुझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. तुझ्या कवितही तू लिहिलं आहेस “माझ्या जगण्यामरण्याला नसतो कवितेविना अन्य पर्याय”. या काळात तुला जगण्याची तगण्याची इच्छा कशी बलवत्तर राहिली?
मी टकमक टोकावरुन परत आलोय ते केवळ माझ्या मित्रांमुळे. त्या काळात मित्रांनीच मला समजावलं. त्यांनीच मला माणसात आणलं. त्यांनी पैसे जमा करुन मला एका मानसोपचारतज्ञाकडं नेलं तेव्हा मला माझा मूर्खपणा समजला. 
कविता हाच मला नेहमी माझ्या दुःखावरचा रामबाण उपाय वाटला आहे. तिच्यामुळेच एक आउटलेट मिळतो आणि म्हणून जगण्या मरण्याला कवितेशिवाय अन्य पर्याय नसतो, असं मला वाटतं.
नगरच्या कॉलेजात असताना तुला पिस्तुल्या या लघुपटासाठीची कथा सुचली. कशी सुचली तुला ही कथा? तू अनेकदा सांगतोस की पिस्तुल्या किंवा फॅन्ड्री या दोन्हीचं कथाबीज तुझ्या आयुष्यात दडलेलं होतं..
अगदी एका वाक्यात सांगायचं तर पिस्तुल्याची कथा  ही एका भटक्या विमुक्त जमातीतील मुलाच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाची कथा आहे आणि मी आयुष्यात शिक्षणासाठी खूप संघर्ष केलेला आहे. शाळेत फी भरायला पैसे नसायचे. शिक्षक शाळेतून हाकलून द्यायचे. वडिलांशी काय बोलणार. कळायचं की त्यांच्याकडं पैसे नाहीत. त्या काळात आम्हा चार भावांकडं दोनच स्लीपर पॅरागॉनच्या. ते आमचं चिल्ड्रेन ऑफ हेवन होतं म्हणजे बाहेर दोघं गेले की आम्ही दोघं घरात थांबायचो कारण दोनच चपला. आणि मी आजूबाजूला पहात होतो की कुणी शिकलेलंच नाही. त्यामुळं शिक्षण हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा होता पहिल्यापासून. एका नातेवाईकानं तर मुलगा डाव्या हातानं लिहितो म्हणून इतकं मारलं की पोरानं शाळाच सोडून दिली. उजवं म्हणजे शुभ आणि डावं म्हणजे अशुभ असल्या आपल्या धारणा. शिक्षण नसल्यामुळं खूप नुकसान झालं आपल्या समाजाचं म्हणून मला वाटायचं की शिक्षणासाठीचा हा संघर्ष मांडला पाहिजे.
सूरज पवार या मुलाची निवड तू पिस्तुल्या या शॉर्ट्फिल्मसाठी केलीस. जेऊरजवळच्या पोफळज गावचा सूरज हा नॉन ऍक्टर तू निवडलास. त्याला देखील ऍक्टिंगसाठी नॅशनल अवार्ड मिळालं. अगदी आता फॅन्ड्रीमध्येही छाया कदम आणि किशोर कदम सोडले तर बाकीची सगळी मंडळी ही नवखी होती. नॉन ऍक्टर होती
कॅरॅक्टरला जे सूट होईल त्याला किंवा तिला घ्यायचं एवढाच माझा निकष होता. सूरज हाच पिस्तुल्या म्हणून योग्य ठरु शकतो असं मला वाटलं म्हणून मी त्याला घेतलं.एक भूमिका म्हणून माझं असं होतं की मला पुण्या-मुंबईचे सर्टिफाइड ऍक्टर लोक नको होते. टॅलेन्ट कुठंही असू शकतो मात्र आपण ते हेरायला हवं.
काय पार्श्वभूमी आहे सूरजची?
सूरज हा एक पारध्याचा मुलगा आहे. माझ्या एका मित्राच्या शाळेत तो मला भेटला. पिस्तुल्याच्या कॅरॅक्टरसाठी तो मला अत्यंत योग्य वाटला.  गम्मत बघ,पिस्तुल्याला दोन नॅशनल अवार्ड मिळाले -बेस्ट डिरेक्शनचं मला आणि बेस्ट ऍक्टरचं सूरजला. फॅन्ड्रीचं शूटिंग सुरु असताना माझ्या जेऊरच्या घरातून नॅशनल अवार्ड चोरीला गेलं. मला त्याचं वाईट अजिबात वाटलं नाही. शेवटी चोरांना नॅशनल अवार्ड कधी मिळणार ? पण चोरीचा आळ जेव्हा सूरजच्या कुटुंबावर घेतला गेला तेव्हा मात्र फार वाईट वाटलं. आजही पारधी म्हणजे चोरी करणारी जमात असं समजलं जातं.
पारधीवरुन आठवलं थोडा “उजेड ठेवा अंधार फार झाला” या आपल्या चळवळीच्या गीतातली एक ओळ आहे- “शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे”
बघ ना म्हणजे किती रुजलं आहे हे सारं. आपल्या धारणा पुन्हा तपासायला हव्यात. 
पिस्तुल्या, फॅन्ड्री किंवा उन्हाच्या कटाविरुध्द हा तुझा कवितासंग्रह या सा-यातून तू दलितांच्या वेदना समर्थपणे मांडल्या आहेस.हे सगळं कशातून आलं. जे भोगलं त्यातून?
जन्मानं मी दलितच आहे पण मी अशा जातीत जन्माला आलो की जी जात स्वतःला दलित मानत नाही. कैकाडी,वडार हे स्वतःला दलित मानत नाहीत. महार सोडले तर सगळे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात. आपण दलित आहोत अशी जाणीवही त्यांना नाही. दलित असण्याचे सारे चटके आम्ही सोसत होतो ;पण दलित आहोत हे कळत नव्हतं. जसं मी तुला म्हणालो संघाच्या शाखेत जायचो. आंबेडकरांना शिव्या घालायचो.
दलित असून आंबेडकरांना शिव्या घालायचास?
कळतच नव्हतं ना मी दलित आहे म्हणून. आणि संघाच्या शाखेत दुसरं मी काय बोलणार !आमच्या घरात अंधश्रध्दा होती. तुळजापूरला जाऊन घरचे काय काय विधी करायचे.आमच्या घरचे महारांना घरात येऊ द्यायचे नाहीत. आणि आमच्या घरच्यांना इतर लोक त्यांच्या घरात येऊ द्यायचे नाहीत.
रुढ अर्थाने आपण ज्याला दलित चळवळ म्हणतो अशा चळवळीत तू कधीच नव्हतास.
शक्यच नाही ना. दलित आहे हे कळायचंच नाही मला. बीएला असताना मला थोडं थोडं कळायला लागलं. बीएला असताना आंबेडकरांचं एक छोटं चरित्र वाचलं आणि लक्षात आलं की या माणसामुळं आपण आज इथं आहोत. फुले आंबेडकर हे आपले बाप आहेत. मग लक्षात आलं की कितीतरी दिवस आपण आपल्याच विरोधात उभे आहोत.
आजच्या दलित चळवळीची जी भूमिका आहे त्याविषयी काय म्हणशील?
मला अनेकदा ती आततायी भूमिका वाटते. म्हणजे तू माझा छळ केला म्हणून मी आता तुझा छळ करणं ही भावना बदल्याची आहे. याच्यापलिकडं येऊन आपण माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे. आपली गम्मत काय आहे आपल्याला दृष्य दुश्मन लागतो. अमूर्त शत्रूसोबत लढायची आपली तयारी नाही.

ही तुझी माणूसपणाची भूमिका तुझ्या कवितेतूनही दिसते. तू कुठला विशिष्ट आयडियॉलॉजीची भूमिका घेत नाहीस.
खरंतर मला मुळात ते कळतंच नाही. आंबेडकरांवर माझा फार अभ्यास आहे अशातला भाग नाही पण त्यांची प्रेरणा मात्र नक्कीच आहे. मी कविता लिहायचो तेव्हा मला कळायचंच नाही की ही कविता आहे. ब-याच वेळा मी कविता लपवून ठेवायचो. त्या चोरीला जातील असं वाटायचं. ही कविता आहे आणि चांगली कविता आहे असा आत्मविश्वास मला संजय चौधरी, डॉ.प्रदीप आवटे, नागनाथ कोतापल्ले, राजेंद्र दास यांच्यामुळं मिळाला. कवितारतीला मी कविता पाठवल्या. पुरुषोत्तम पाटलांनी सहाच्या सहा कविता छापल्या. माझ्या कविता छापून आल्या की वडील खूप अभिमानानं सांगायचे आणि आई मात्र विचारायची याचे तुला किती पैसे मिळतात. या सगळ्या जगण्यातून कविता आकाराला आली. त्यामुळेच तिच्यावर कोणताही शिक्का नाही.

तू दलितांच्या वेदना मांडल्यास पण तुझ्या कवितेची भाषा मात्र अभिजन आहे
मला माहीत नाही;कदाचित शुध्द बोलण्याच्या प्रयत्नातून ते आलं असावं किंवा माझा माझ्या भाषेबाबतच्या न्यूनगंडातून ते आलं असावं. न आणि ण हे मला अजून नीट म्हणता येत नाही. एकदा आठवण नावाच्या कवितेचं वाचन मला रेडिओवर करायचं होतं आणि मला ण बाणाचा ण म्हणताच येईना.
ती आठवण अजून ताजी आहे. फॅन्ड्री किंवा पिस्तुल्या या दोन्ही कथा तुझ्या बालपणीच्या आहेत;पण आता जात-वास्तव बदललं आहे असं तुला वाटतं का कारण अनेकजण जात संपली आहे असं बोलत असतात.
जात संपली आहे ! एकतर असं म्हणणारे लोक ठार अज्ञानी आहेत किंवा जातीचे फायदे उठवण्यात त्यांना अजून रस आहे. जात अजूनही भयावह स्वरुपात टिकून आहे.

तू कवितेकडून फिल्मकडं वळलास, तुला हे माध्यमांतर करताना अडचणी नाही आल्या ?
माध्यम म्हणून मला अडचणी आल्या नाहीत. ज्या अडचणी असतात त्या मग जगण्याच्याच अडचणी असतात.
चित्रपट या माध्यमाची मर्यादा नाही का तुला वाटत? म्हणजे “कोसला”तील पांडुरंग सांगवीकर तुझा वेगळा असतो माझा वेगळा असतो. व्हिज्युलायझेशनचं जे स्वातंत्र्य तुला कादंबरी देते ते चित्रपट देत नाही. पात्र लॉक होऊन जातात.
तू म्हणतोस ते बरोबर आहे. या अर्थाने कादंबरी किंवा अगदी कविता देखील प्रभावी माध्यम आहे. पण कादंबरी किंवा कवितेची एक मर्यादा म्हणजे तिची भाषा. मी मराठीतच कविता करु शकतो. चित्रपट या माध्यमातून मी भाषेच्या मर्यादा ओलांडू शकलो. म्हणजे पिफमध्ये शॅले नावाच्या ऑस्ट्रेलियाच्या मुलीनं दोन वेळा फॅन्ड्री पाहिला. बंगलोरमधे थिएटरमध्ये झाडू मारणा-या एका महिलेनं सिनेमा पाहिल्यानंतर मला मिठीच मारली. ती बराच वेळ कन्नडमध्ये काहीतरी बोलत होती. जेव्हा शेजारच्या एका इसमाने मला कन्नड कळत नाही असे तिला सांगितले तेव्हा ती फक्त ब्युटीफुल फिल्म ब्युटीफुल फिल्म असं म्हणत राहिली. सिनेमा हे वैश्विक माध्यम असल्यानं हे शक्य आहे.

फॅन्ड्री या सिनेमाच्या निर्मितीमध्ये तुला कोणा-कोणाची मदत झाली ?
या फिल्मची स्क्रिप्ट मी अवघ्या महीनाभरात लिहिली. त्यानंतर ज्योती सुभाष, प्रदीप आवटे, समर नखाते यांनी या पटकथेला ऍप्रिशीएट केलं. त्यानंतर गार्गी कुलकर्णी, प्रियंका दुबे, कुतुबुद्दीन इनामदार, मिथुन चौधरी,पूजा डोळस यांनी मला फिल्मच्या दरम्यान खूप मोलाची मदत केली.

मी चुकत नसेन तर केरळ फिल्म फेस्टीवलच्या दरम्यान तुला दाभोलकरांविषयी प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता तो ?

फॅन्ड्री या सिनेमात चंक्या नावाचं एक पात्र अंधश्रध्दाळू दाखवलेलं आहे. फिल्म पाहिल्यानंतर केरळमधील पत्रकारांना प्रश्न पडला की एवढी समाजसुधारकांची मोठी परंपरा असणा-या महाराष्ट्रात अजूनही अशा प्रकारच्या अंधश्रध्दा आहेत का. त्या संदर्भानं त्यांनी मला प्रश्न विचारला होता. महाराष्ट्र प्रतिगामी असल्याचं तिथं बोललं गेलं तेव्हा मला फार वाईट वाटलं.

एक ज्येष्ठ साहित्यिक असं म्हणाले की फॅन्ड्री ही देशीवादी साहित्यिकांना मारलेली चपराक आहे. देशीवाद्यांनी नेहमीच गावगाड्याचं उदात्तीकरण केलं आहे. तुला काय वाटतं?
चपराक मारलेली आहे असं मी म्हणणार नाही कारण ती चपराक मारायची म्हणून मी फिल्म केलेली नाही. चपराक बसली आहे असं मलाही वाटतं.
नेमाडे असो किंवा इतर देशीवादी या सा-यांनी बलुतेदारी असूनही लोक कसे आनंदी होते, गुण्यागोंविद्यानं रहात होते असं सांगितलं आहे . खरंतर असं कधीच नव्हतं.  जरं हे खरं असलं असतं तर पिफमध्ये फॅन्ड्री पाहिल्यानंतर एका दलित मुलानं मला मिठी मारुन कानात नसतं सांगितलं की तो दलित आहे ! फॅन्ड्रीत मी या गावगाड्याचं वास्तव चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे.


तुला असं वाटत नाही का की दिग्दर्शक नागराज मंजुळे कवी नागराज मंजुळेवर अन्याय करतोय? 
(यावर नुसतं हसतं नागराजनं प्रश्न डक केला) 

तुझे फ्युचर प्लॅन काय आहेत?
सैराट नावाची आणखी एक फिल्मवर सध्या मी काम करतोय पण खरं सांगू प्लॅनिंग करुन जगावं असं नाही मला वाटत. 
वाट मिळेल तसं जगायचं हाच माझा जगण्याचा प्लान आहे असं वाटतं











सौजन्य : "साहित्य संस्कृती"

शेतीकर्ज घेण्यापुर्वी…




शेतक-याचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे ध्येय सरकारने पुढच्या पाच वर्षासाठी ठेवले आहे या दृष्टीने शासकिय  योजनाही राबविण्यास सुरुवात झाली आहे, असे असले तरी आता आपण शेतक-यांनीही त्यादिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे.
शेतीच्या उत्पादन वाढावे या हेतुने पुढील घटक महत्वाची भुमिका बजावू शकतात त्यामधे,
  1. शेतीविषयक असणारे तांत्रिक ज्ञान
  2. चांगल्या दर्जाचा निविष्ठा (शेतीसाठी लागणा-या आवश्यक गोष्टी)
  3. उत्पादन पिकाला योग्य भाव व बाजारपेठ
  4. भांडवलाची उपलब्धता
यासर्वांमध्ये भांडवलाची उपलब्धता करणे हे अतिशय गरजेचे आहे. उत्पादन वाढावे या दृष्टीने अतिरिक्त पैशांची व्यवस्था करणे अनिवार्यच आहे. सरकारने तयार केलेल्या योजनांचा उपयोग करावयाचा असल्यास कर्जाच्या सुविधांचा उपभोग शेतक-याने घेतला पाहिजे.
सर्व व्यापारी तसेच राष्ट्रियकृत बॅंका यांना एकुण कर्जाच्या ४० % कर्ज हे पायाभुत क्षेत्र म्हणजेच कृषी, लघु, कुटिरोद्योग क्षेत्र, शिक्षण, गृह कर्ज व निर्यात उद्योग यांना देणे बंधनकारक असते त्यातही किमान १८% हे शेतीक्षेत्राला देणे अनिवार्य आहे.
असे असले तरीही हे ४०% कर्जाचे वाटप करताना बॅंकांची खरोखरच दमछाक होते. याचे कारण म्हणजे कृषी कर्जपुरवठ्याविषयी असलेली उदासीनता.
अनेक शेतकरी कर्ज घेण्याच्या फंदातच पडत नाहीत, तर काही शेतकरी कर्जासाठी लागणारी यादी बघुनाच गांगरुन जातात व नंतर त्याची पुर्तता करण्यामध्येच त्यांची दमछाक होते, कालांतराने कर्जाची वाटच ते सोडुन देतात. सद्यस्थितीत एकुण शेतक-यांच्या जवळपास २५% शेतकरीच कर्जाचा लाभ घेतात. यासाठीच शेती कर्जाचा अभ्यास करुन मगच कर्जाचा अर्ज करावा.
सोप्या शब्दात सांगायचं तर कर्जाच्या उपयोगावरुन कर्जाचे प्रकार पडतात, म्हणजेच
1.किसान क्रेडिट कार्ड /पिक कर्ज:
पिक उत्पादनाच्या दैनंदिन गरजांसाठी कर्ज घ्यायचे असल्यास त्याला पिक कर्ज किंवा किसान क्रेडिट कार्ड असे म्हणले जाते.या कर्जामध्ये बॅंकेकडुन आपल्याला मिळणा-या रकमेची मर्यादा ठरवली जाते. हे कर्ज एका वर्षाने एकदम फेडावे लागते.या कर्जासाठी उभे पिक तारण ठेवले जाते तसेच  काही बॅंकांमध्ये जमिनही तारण/बोजा ठेवला जातो.
अ) कर्जदार व जामीनदारांचा “सात-बारा” उतारा, ८ अ चा उतारा, फेरफार उतारा.
ब) पीक लागवडीसंदर्भात तलाठ्याचे प्रमाणपत्र. (ऊस पीक असल्यास कारखान्याचे लागण पत्र)
क) शेतीसंदर्भात सविस्तर अहवाल. (आजपर्यंतच्या उत्पन्नाचा तपशील. आगामी तीन वर्षांचे अंदाजपत्रक.)
ड) अन्य बॅंका, सहकारी बॅंका व पतसंस्थांचा बेबाकी दाखला.
ई) जमिनीचे अद्ययावत किमतीसंबंधी प्रमाणपत्र व जमिनीवर कोणताही बोजा नसल्याचा दाखला.

  1. प्रकल्पासाठी कर्ज / टर्म लोन:
त्याचबरोबर एका विशिष्ट प्रकल्पासाठीही कर्जपुरवठा घेऊ शकतो उदा. गुरे खरेदी करण्यासाठी डेअरी लोन, ट्रॅक्टर लोन, फार्म मशिनरी लोन, इरिगेशन लोन वगैरे यामध्ये शक्यतोवर एकुण प्रकल्प खर्चाच्या ७५ ते 90% पर्यंत वित्तपुरवठा मिळतो व जमिनीच्या तारणाबरोबरच प्रकल्प खर्चातील विकत घेतलेल्या वस्तु तारण म्हणुन ठेवण्यात येतात.
अ) कर्जदार व जामीनदारांचा “सात-बारा” उतारा, ८ अ चा उतारा, फेरफार उतारा.
ब) पीक लागवडीसंदर्भात तलाठ्याचे प्रमाणपत्र. (ऊस पीक असल्यास कारखान्याचे लागण पत्र)
क) शेतीसंदर्भात सविस्तर अहवाल. (आजपर्यंतच्या उत्पन्नाचा तपशील. आगामी तीन वर्षांचे अंदाजपत्रक.)
ड) अन्य बॅंका, सहकारी बॅंका व पतसंस्थांचा बेबाकी दाखला.
इ) जमिनीचे अद्ययावत किमतीसंबंधी प्रमाणपत्र व जमिनीवर कोणताही बोजा नसल्याचा दाखला.
ई) प्रकल्प अहवाल व अहवालासाठी लागणा-या वस्तुंचे कोटेशन
हे लक्षात ठेवा:
  • शक्यतो नामांकित बॅंकांकडुनच किंवा सहकारी सोसायटीकडुनच कर्ज घ्यावे.
  • बॅंकेच्या शिफारशी एवढेच कर्ज घ्यावे व शक्यतो एकाच बॅंकेकडुन कर्जव्यवहार करावे.
  • कर्ज घेताना सात-बा-यात नावे असणा-या सर्व व्यक्तींची संमती घ्यावी लागते.
  • कर्ज घेताना लागणारी सर्व कागदपत्रे अद्यावत(नविन ) असावित
  • कर्जदेण्यासाठी देण्यात येणा-या कागदपत्रांमध्ये आपले नाव बरोबर आहे कि नाही याची पडताळणी करावी.
  • कर्ज मंजुर झाल्यानंतर मंजुर पत्रातील (सॅंक्शन लेटर)सर्व अटी काटेकोरपणे वाचाव्या व मगच त्यावर सही करुन पुढील प्रक्रिया करावी.
  • व्याजदराची संपुर्ण माहीती घेऊन सर्व प्रथम बॅंकेकडुन रिपेमेंट शेड्यल्ड घ्यावे.
  • कर्ज रक्कम मर्यादा जास्त असली तरी गरजेपुरतेच रक्कम काढावी व शेतीकामासाठीच त्याचा वापर करावा.
  • कर्ज घेतलेल्या बॅंकेत नियमीत भेट देऊन स्टेटमेंट ऑफ अकाऊंट घ्यावे.
  • उत्पादन विक्रितुन मिळणा-या रकमेतुन नियमित परतफेड करावी शक्यतो परतफेडीच्या तारखेपुर्वीच काही दिवस अगोदर परतफेड करण्याचा प्रयत्न करावा.





 

शेतमाल प्रक्रिया उद्योग : काळाची गरज



“भारत हा कृषिप्रधान देश आहे, ७० टक्के जनता हि शेतीवर अवलंबुन आहेत” हे वाक्य आता बोलुन बोलुन गुळगुळीत झाले आहे. वास्तविक पाहता सद्यस्थितीत ५३% लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेती व्यवसायावर अवलंबुन आहे. वाढते औद्योगीकरण, शहरीकरण, माहीती तंत्रज्ञानातील क्रांती, सेवा विभागातील विकास या गोष्टी कृषी क्षेत्राचे स्थलांतर करण्यास कारणीभुत असतीलच पण हवानातील अनियमीतपणा, शेती बाजाराला योग्य भाव न मिळणे, अल्पभुधारकता एक नाही अशा अनेक प्रश्नांमुळे शेतीकडे पाठ फिरवली जाऊन लोक शहरीकरणाकडे वळत आहेत.
परंतु खरोखरच या देशातील शेती प्रगतीच्या वाटेवर चालली आहे का? शेती कडे व्यवसायाकडुन बघीतल्यास शेती फायदेशीर आहे का? या दृष्टीने विचार केल्यास “दिल्ली अभी बहुत दुर है” असेच म्हणावे लागेल. म्हणुनच  शेतीला आता एक फायदेशीर व भरवश्याचा जोडधंदा असणे गरजेचे आहे व यालाच शेतमाल प्रक्रिया उद्योग हा सर्वोत्तम पर्याय असु शकतो.
प्रक्रिया उद्योगासाठी वाव :
भारताची आजची स्थिती कृषी आधारित उद्योगांसाठी अनुकूल आहे. युरोपीय राष्ट्रांमध्ये एकच पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. भारतामध्ये राज्यनिहाय पीकविविधता असल्याने भारतात प्रक्रिया उद्योगासाठी कच्चा मालाची उपलब्धता सहज होऊ शकते त्यामुळे.
शेतकरी मोठ्या जिद्द आणि कष्टांनी अन्नधान्याचे उत्पादन घेतो.काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाअभावी दर वर्षी 25 टक्के शेतमालाची नासाडी होत असते म्हणुनच त्यास प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्यास ह्या प्रमाणात नक्किच घट होईल तसेच शेतक-यासाठी एक नवी बाजरपेठ उपलब्ध होईल. आज वनवासी तसेच खेडोपाडी पायाभुत सुविधांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही वीज, पाणी, रस्ते यांपासुन अनेक खेडी अजुन वंचीत आहेत त्यामुळेच तेथे औद्योगिक धंदे अजुन विकसीत झाले नाही. आणि म्हणुनच रोजगाराच्या संधी तेथे उपलब्ध नाहीत. शेतमाल हि ग्रामिण भागात सहज उपलब्ध होणारी गोष्ट असुन अल्प सुविधांमध्ये आपण प्रक्रिया उद्योग सुरु करु शकतो. या मार्फत आपण आपल्याबरोबर इतरांना देखिल रोजगार  उपलब्ध करुन देऊ शकतो. प्रक्रिया उद्योग क्षेत्रात 30 टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे.
सध्या भाजीपाल्याच्या निर्जलीकरणाचे विविध तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे.त्याचप्रमाणे फळांपासुन पल्प, रस,जॅम, स्क्वॅश बनविणे इ. तसेच वेफर्स, फरसाण बनविणे त्याचप्रमाणे लोणचे, मुरंबा बनविणे असे अनेक पर्याय शेतमाल प्रक्रियामध्ये उपलब्ध आहेत.त्याचप्रमाणे सोयाबीन दुध, पावडर, सोया पनिर , तांदुळापासुन पोहे, पापड, दुधापासुन विवीध प्रक्रिया पदार्थ हि बनवता येऊ शकतात.
भारतीय नागरिकांची जीवनशैली बदलत असून, “रेडी टू इट’ आणि “रेडी टू कुक’ उत्पादनांना ग्राहकांची मागणी आहे. शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे. या वर्षी भारतातून 240 निर्यातदारांनी अमेरिकेमध्ये 840 कोटी रुपयांचा सेंद्रिय शेतीमाल निर्यात केला आहे.
शेतीमाल प्रक्रिया उद्योगात येणाऱ्या उद्योजकांनी व्हॅक्‍यूम पॅकिंग, नायट्रोजन पॅकिंग, रिटॉर्चटेबल पाऊच, फ्लेक्‍झी पॅक, टेट्रा पॅक यांसारख्या पॅकिंग तंत्रांचा वापर केल्यास भारतीय उत्पादने जगभरात विकली जाऊ शकतात. तसेच, प्रक्रिया उद्योगांनी फूड सेफ्टी स्टॅंडर्स्ट आणि डब्ल्यूटीओच्या स्टॅंडर्स्टचा काटेकोर वापर करावा.
अत्यल्प जमीनधारणेमुळे एकटा शेतकरी उद्योजक होऊ शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रितपणे गटाच्या माध्यमातून कंपनी स्थापन करणे आवश्‍यक आहे. अनेकांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग उभारल्यास धोके कमी होतात. शेतकऱ्यांनी गट स्थापन करून प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास सहकारी पद्धतीने तो अधिक फायदेशिर ठरतो.
प्रक्रिया उद्योगासमोरील आव्हाने:
  • प्रक्रिया उद्योगासाठी वित्तपुरवठा मिळवण्यामध्ये अडचणी येतात. यासाठी शेतकऱ्यांनी पूर्ण अभ्यास करून अहवाल बॅंकेकडे सादर करावा; प्रकल्प अहवाल हा आकडेवारीचा खेळ नसून, यशापयश ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे.
  • कच्च्या मालाची सखोल माहिती, आकडेवारी, पुरवठ्यामध्ये सातत्य असणे आवश्‍यक आहे. तसेच, उद्योग उभारताना पुढील सात वर्षांचे उत्पादन, विक्री व्यवस्थापनाचे नियोजन असणे आवश्‍यक आहे.
  • प्रक्रिया उद्योगाला कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा व्हावा यासाठी गावाच्या आसपासच्या शेतकऱ्यांशी करार शेती करुन कच्चामाल चांगल्या दर्जाचा व रास्त उपलब्ध होऊ शकेल.
  • अन्नप्रक्रिया उद्योग थेट ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित आहे, त्यात यशस्वी होण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा आणि मानके यांचा अभ्यास असणे आवश्‍यक आहे. उद्योग उभारताना विविध संस्थांकडून सर्टिफिकेशन करून घेणे आवश्‍यक आहे. तसेच, विविध शासकीय पणन संस्थांच्या संपर्कात राहा, तरच उद्योग यशस्वी होईल.
  • पत वाढविण्यासाठी घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड करणे आवश्‍यक आहे.
सेंट्रल फूड टेक्‍नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमार्फत (सीएफटीआरआय) प्रक्रिया उद्योगांसाठीची यंत्रे व तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
भांडवलाची उपलब्धता:
  • प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या भरपूर योजना आहेत तसेच प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी विविध बॅंका, नाबार्डच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य, सवलती उपलब्ध आहेत.
  • शेतीचा विकास, सक्षमीकरणासाठी शेतावरच प्रक्रिया, प्रतवारी, पॅकिंग, शीतगृहांसाठी नाबार्ड वित्तपुरवठा करत आहे.अभ्यासदौरे, प्रशिक्षण, क्षमतावृद्धीसाठी नाबार्ड शेतकऱ्यांना, गटांना आर्थिक साह्य उपलब्ध करुन देत आहे.
  • शेतीबरोबरच शेतीव्यतिरिक्त ग्रामीण कारागिरांना त्यांच्या व्यवसाय, उत्पादन विपणनासाठी विविध योजनासरकार राबवत आहे.
  • गटशेतीसाठीही चांगल्या पतपुरवठ्याच्या योजना नाबार्ड मार्फत उपलब्ध आहेत.
  • आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास प्रकल्प खर्चाच्या 70 ते 80 टक्के कर्ज बॅंकांकडुन नक्कीच मिळते.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी
  • प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी भांडवल, कच्चा माल, बाजारपेठ, ग्राहक व विक्री व्यवस्था हे मुख्य घटक आहेत. विक्री व्यवस्थापनाचा परिपूर्ण अभ्यास करणे गरजेचे असून, स्पर्धकांचा अभ्यास असला पाहिजे.
  • प्रक्रिया केलेल्या शेतीमालाचे मार्केटिंग, जाहिरात आणि ब्रॅंडिंग महत्त्वाचे असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळाची गरज आहे.
  • व्यवसायातील अनुभवी व्यक्तींकडून जास्तीत जास्त अनुभव ऐकून घ्यावा.
  • उद्योगात जोखीम घेणे आवश्‍यक.
  • व्यवसायाचे बारकावे, यशापायश या गोष्टींचे सखोल ज्ञान पक्के असले पाहिजे.
  • सध्याचे युग माहीती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे, अशा युगात जर आपल्याला जगाबबरोबर चालायचे असेल तर या माहीती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग व्यवहारी जीवनात करावाच लागेल.






बुधवार, २० एप्रिल, २०१६

घरच्या घरी करता येण्यासारखे व्यवसाय



किंवा व्यापार हे एक विशेष क्षेत्र मानले जाते सर्वांनाच ते जमते असे नाही किंवा त्यात धोका आहे हे समजून मराठी माणूस व्यवसायापासून नेहमी दूर राहत आला आहे. अगदी किर्लोस्कर, बेडेकर इथपासून विठ्ठल कामत, नितीन पोतदार हे यशस्वी उद्योगपती होऊनही मराठी माणसाचे उद्योगाविषयीचे भय गेलेले नाही.
वास्तविक माणसाला आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता फक्त उद्योगामध्येच आहे. नोकरीपेक्षा व्यवसाय अधिक मानसिक शांती देतो, स्वतःसाठी करण्याचे सुख वेगळे असते
.
आज महाराष्ट्राला श्रीमंत व्हायचे असेल तर उद्योजकतेची कास धरणे आवश्यक आहे. मात्र उद्योगाचा विचार करताना मराठी तरुण फारसा दिसत नाही. याचे अजून एक कारण सांगितले जाते ते म्हणजे पैसे नसणे. व्यवसाय सुरु करायचा म्हणजे ऑफिस आणि मनुष्यबळ हवे हि समजूत असते. एवढा पैसा आणायचा कसा किंवा गुंतवायचा कसा हा प्रश्न अनेकांना पडतो आणि म्हणून ते उद्योगापासून दूर राहतात. त्यामुळे आज आपण पाहूया असे व्यवसाय घरच्या घरी किंवा कुठल्याही लहान जागेत कमीत कमी भांडवलावर सुरु करता येण्यासारखे आहेत.

. डबे पुरवणे
अनेक महिला आणि बचत गट हे व्यवसाय करीत आहेत. डबे पुरवणे हा एक उत्तम जोडव्यवसाय आहे. तुमच्या आजूबाजूच्या ऑफिसमध्ये मार्केटिंग करता येईल.
भांडवल : १०,०००/-
मनुष्यबळ: सुरुवातीला एकटीने किंवा बचत गटातील महिलांना काम सुरु करता येईल. डबे पुरवण्यासाठी एखाद्या मुलाला ठेवता येईल. जास्त डबे असतील तर डबेवाल्यांची मदत येईल.
स्थिर भांडवल: शेगडी, भांडी, शेफ चे कपडे, जेवणाची उपकरणे, स्वच्छतेची उपकरणे
खेळते भांडवल: कच्चे अन्न, डबे, इतर साधनसामग्री
साधारणत: गुंतवणुकीचा परतावा मिळण्याचा कालावधी: वर्ष

. केटरिंग व्यवसाय:
यापुढील स्टेप म्हणजे जेवण पुरवणे. यामध्ये रोजचे जेवण आणि रेस्तरो प्रमाणे जेवण पुरवणे यांचा समावेश होतो. मात्र यासाठी तुमच्याकडे फूड आणि ड्रग्स संचालनालयाचे लायसन्स असणे आवश्यक आहे.
या व्यवसायाला खूप मागणी आहे. लोकांकडे पैसा असल्याने पूर्वीपेक्षा हॉटेलिंग वर अधिक पैसा खर्च होऊ लागला आहे. दुसरीकडे थकाथकीच्या दिवसानंतर घरी येउन जेवण बनवणे नकोसे वाटते. अशा वेळी रोज किंवा काही ठराविक दिवशी तुमच्याकडे जेवणाची ताटे मागवली जाऊ शकतात. त्यातून तुम्ही घरगुती जेवण देत असल्याने ते अधिक रुचकर आणि पौष्टिक असेल. त्यामुळे तुम्च्याकासे येणारी पावले वाढतील.

. घरगुती सेवा- एकच छताखाली (होम युटीलिटी सर्विसेस)
प्रत्येक घराला इलेक्ट्रीशिअन, प्लंबर, पेंटर आणि कार्पेंटर यांची आवश्यकता असतेच. मात्र योग्य वेळी योग्य माणूस मिळेलच असें नाही. विशेषतः घर बदलून येणार्यांना आणि नवीन घर घेऊन भागात येणार्यांना अधिक सतावतो.
अशा वेळेस जर तुम्ही यातील कुठलीही एक किंवा सर्व सेवा एकत्र देऊ शकत असाल तर तुमचे फोन दिवसभर खणखणतील. तुम्ही अनेक सेवा देणार्यांना एकत्र करून एक ग्रुप किंवा असोसिएशन बनवू शकता.
भांडवल: साधारण १०,०००/-
स्थिर: वापरावयाचे सामान, तुमच्या सेवेच्या नावाचा लोगो असणारे विशिष्ट कपडे.
खेळते भांडवल: मार्केटिंग साठी आणि लहान सहन वस्तू मार्केट मधून आणण्यासाठी एक मुलगा.

. गिफ्ट वस्तू
भारत हा सणासुदीचा देश. आपण उत्सवप्रिय माणसे. अर्थात आपल्या आप्तजनांना विविध वस्तू गिफ्ट म्हणून देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. देणार्याच्या क्षमतेनुसार १०० रुपयापासून १०००० पर्यंत काहीही वस्तू गिफ्ट म्हणून देत येऊ शकते. त्याचबरोबर उद्योगपती आपले क्लायनट्स, उद्योगातील सहकारी, विक्रेते यांना चांगले संबंध म्हणून गिफ्ट्स देत असतात.
त्यामुळे गिफ्ट वस्तू पुरवणे यासारखा व्यवसाय भारतात नाही. यात विशिष्ट व्यवसायासाठी भेटवस्तू त्या कंपनीच्या ब्रान्डींगने करून देणे हा महत्वाचा भाग आहे. अनेक कंपन्या अशा भेटवस्तू मोठ्या प्रमाणात देत असतात. विशेषतः दिवाळीच्या सुमारास. त्याचप्रमाणे एखाद्या कंपनीच्या २५ वर्षे पूर्ण होणे, ५० वर्षे पूर्ण होणे अशा विशिष्ट समायासही भेटवस्तू दिल्या जाऊ शकतात.
या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे, एक प्रचंड सृजनशीलता- काय नवीन काय वेगळे आपण सुचवू शकतो, मार्केटचा अभ्यास आणि दुसरे म्हणजे मोठ्या प्रमाणात स्टोक देण्यासाठी भरवशाचा विक्रेता पाठीशी असणे.
गिफ्ट वस्तुंमध्ये चोक्लेत्स पासून ते लहान मोठी इलेक्ट्रोनिक उपकरणे आणि पाठीवरच्या बेगांपासून हातातील नक्षीदार पिशव्या यापर्यंत काहीही असू शकते.
भांडवल : साधारण : २०-२५,०००
खेळते भांडवल: मार्केटिंग, मार्केट फिरण्यासाठी मुलगा, जमल्यास एखादी रिक्षा आणि गाडी.

. ऑफिस स्टेशनरी
प्रत्येक ऑफिसला स्टेशनरीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यात बेगांपासून स्टेपलर पिनांपर्यंत आणि नोटपेड पासून ते हाउसकिपिंनग च्या सामानापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात यादी आहे. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई ठाण्यात लहान मोठी अनेक ऑफिसेस आहेत. त्यांना लागणाऱ्या स्तेशनरीचे प्रमाण किती असेल याचा अंदाज लावा.
भांडवल: साधारण: २०-२५,०००/-
स्थिर: तुमच्या ब्रांड च्या टोप्या, बिझनेस कार्ड, ब्रोशर.
खेळते: मार्केटिंग, मार्केट फिरण्यासाठी मुलगा, जमल्यास एखादी रिक्षा आणि गाडी. तसेच थोडाफार माल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

. इंडस्ट्रीला लागणारी उपकरणे
हा थोडासा विशेष प्रविण्याचा व्यवसाय आहे. प्रत्येक उत्पादकाला मशिनरी, विविध पार्टस इथपासून नट्स, स्क्रू ड्रायव्हर्स, हेल्मेट्स, हातमोजे अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी लागतात. कंपनी जेवढी मोठी गरज तेवढीच मोठी.
यसाठी विविध उत्पादकांशी तुमचे चांगले संबंध असणे आवश्यक आहे. ऑफिस स्टेशनरी पेक्षा या व्यवसायाची निकड खूप वेगळी असते . लागणारी वस्तू आज किंवा उद्या हवी असू शकते. त्यामुळे वेळेवर वस्तू पुरवणे अत्यंत आवश्यक आहे.
भांडवल: साधारण: २०-२५,०००/-
स्थिर: तुमच्या ब्रांड च्या टोप्या/कपडे , बिझनेस कार्ड, ब्रोशर.
खेळते: मार्केटिंग, मार्केट फिरण्यासाठी मुलगा, जमल्यास एखादी रिक्षा आणि गाडी

. टोटल सर्विसेस
वर उल्लेखलेल्या होम अप्लायन्सेस पेक्षा हि वेगळी सेवा आहे. अनेक लहानसहान घरगुती किंवा व्यवसायाची कामे करण्यासाठी वेळ नसतो- जसे बेन्केची कामे, पोस्टाची कामे. विशेषतः वृद्ध राहत असतील तर त्यांना याची निकड असतेच. त्यामुळे टोटल सर्विसेस हा एक वेगळा सेवा उद्योग होऊ शकतो बोक्या कसा समोरच्या आजी आजोबांची कामे करतो, तशाच सेवा तुम्ही देऊ शकता- फक्त पैसे घेऊन, आनंदाने द्यायला तयार असतात. अनेक आजी आजोबांना फक्त वेळ घालवण्यासाठी कोणाची गरज असते. अनेक लहान सहन उद्योगांना वरवरची कामे करून देऊ शकेल असा कोणी हवा असतो. या सर्व्ह गोष्टी टोटल सर्विसेस मध्ये येतात.
भांडवल: भांडवल: साधारण: १०-१५,०००/-
स्थिर: तुमच्या ब्रांड च्या टोप्या/कपडे,बिझनेस कार्ड,
खेळते: मार्केटिंग, दिमतीला एक-दोन मुले.

. रिअल इस्टेट सल्लागार
सध्या रिअल इस्टेट चे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र तरीही त्यांची मागणी कमी होत नाही. भाडेकरूंची संख्या वाढते आहे. तसेच अनेक उद्योगांना गाळे, ऑफिसेस हवी असतात. तुम्हाला तुमच्या परिसराची व्यवस्थित माहिती असेल आणि बोलण्याचे चातुर्य असेल तर रिअल इस्टेट एजंट हे मोट्ठे क्षेत्र तुमची वाट पहात आहे .
तुम्हाला स्वतःला फिरावे लागेल आणि तुमच्या परिसरात कुठे काय विकायला किंवा भाड्याने द्यायला उपलब्ध आहे याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.
सुरवातीला केवळ तुम्ही, तुमचा बोलघेवडेपणा आणि बिझनेस कार्ड या भांडवलावर हा व्यवसाय तुम्ही सुरू करा. लोकांकडे तुमचा नंबर असेल आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी तुम्ही हजर राहू शकत असाल तर तुम्हाला ऑफिस ची काहीच गरज नाही.
भांडवल- ते १०,०००/-
. क्लास
तुम्हाला शिकवायला आवडते का? तर क्लास हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमचा विद्यार्थी गट निवडावा लागेल. म्हणजे दहावी पर्यंत, कोलेज- आर्ट्स कॉमर्स सायन्स, त्यापुढे मग आयटी, मास मिडिया, इञ्जिनिअरिङ्ग वगैरे. त्याचप्रमाणे तुम्ही कोम्प्युतर, वेब डिझायनिंग, इलेक्त्रीषण, प्लंबर, फर्निचर असे विशिष्ट क्लासेसहि घेऊ शकाल.

परकीय भाषा क्लास
तुम्हाला एखादी परकीय भाषा येत असेल(असतील) तर दुधात साखर. सध्या परकीय भाषांची मागणी विशेषतः जापनीस, चायनीज, जर्मन आणि फ्रेंच वाढत जाणार आहे. त्याचे तुम्ही क्लासेस घेऊ शकता. यात प्रचंड पैसा आहे.
तुमच्या क्लास ची उत्तम जाहिरात तुमचे विद्यार्थीच करतात.
सध्या तुमच्या राहत्या घरी तुम्ही क्लास सुरु करा. किंवा एखाद्या क्लास शी टाय अप करून त्याला ठराविक हिस्सा देण्याच्या बोलीवर सुरु करा.
भांडवल: १०-१५,०००/- ते ४०-५०,०००/-
स्थिर: फळा, मार्कर, लेप्टोप, प्रोजेक्टर
खेळते: मटेरिअल.

. सोफ्ट स्किल
बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला पुस्तकी ज्ञानापेक्षासुद्धा अधिक काही वेगळे हवे असते . ते म्हणजे तुमच्यातील विविध किंवा विशिष्ट गुणांचा विकास. यात आंतर मानवी संबंध आले किंवा एखादा विशेष गुण आला. वेळेचे व्यवस्थापन, ऑफिस व्यवस्थापन, सेक्रेटरी सर्विसेस, उद्योगातील आंतर मानवी संबंध व्यवस्थापन, सेलिंग स्किल्स, मार्केटिंग स्किल्स, संवाद (कम्युनिकेशन) अशा अनेकविध गोष्टींचे प्रशिक्षण तुम्ही देऊ शकता.
तुम्ही सध्या उद्योग किंवा नोकरी मध्ये एका चांगल्या हुद्द्यावर असाल किंवा मार्केटिंग, मनुष्यबळ अशा विशेष क्षेत्रात असाल तर तुम्ही हे प्रशिक्षण देऊ शकता. पूर्णवेळ किंवा शनिवार रविवार अशा स्वरुपात हे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. पूर्णवेळ करणार असाल तर अनेक कंपन्या दोन तीन दिवसांचे कोर्सेस घेण्यासाठी तुम्हाला बोलावू शकतात.
भांडवल: साधारण ४० ते ५०,०००/-
स्थिर वेबसाईट, चांगले कपडे, बिझनेस कार्ड आणि लेप्टोप.
खेळते: स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी विविध सेमिनार्स, मेग्झींस, पेपर यांचे वाचन, पुस्तके यावरील खर्च, मटेरिअल.

१०. सल्लागार-
तुम्हाला विशिष्ट क्षेत्राचे ज्ञान आणि अनुभव असेल तर तुम्ही उद्योगांना खालील क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करू शकता-

. व्यवस्थापन सल्लागार
यासाठी तुमचा विशेष क्षेत्रांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तुम्हाला व्यवस्थापनातील खाचाखोचा आणि बारकावे, मार्केट, ग्राहक यांचे अद्ययावत ज्ञान असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या क्लायंट च्या गरजा समजून घेऊन त्यांना सल्ला देत आला पाहिजे.
भांडवल: ४०-५०००० ते - लक्ष
स्थिर: उत्तम कपडे, लेप्टोप, बिझनेस कार्ड, गाडी
तुमच्या शिक्षणाची आणि अनुभवाची जंत्री जेवढी चांगली आहे तेवध्ये तुम्ही या क्षेत्रात नावारूपाला लवकर याल.

. मनुष्यबळ सल्लागार
तुम्हाला जर मानुस्याबळ क्षेत्रातील अनुभव असेल तर हे एक फार विस्तीर्ण क्षेत्र आहे. मनुष्यबळाचे व्यवस्थापन, मनुष्यबळाचा विकास म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणे आणि विविध मनुष्यबळ पुरवणे म्हणजे एचआर सर्विशेस अशा तीन गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही एका वेळी एकच गोष्ट निवडणे योग्य आहे.
भांडवल: ४०-५०,०००/-
स्थिर: लेप्टोप, बिझनेस कार्ड, प्रोजेक्टर
खेळते: विविध कंपन्याशी ओळखी वाढवण्यासाठी सेमिनार्स, विविध चेम्बर्स मध्ये नोंदणी, मटेरिअल, गाडी (असल्यास उत्तम)

. मार्केटिंग सल्लागार
कुठलाही व्यवसाय मार्केटिंग शिवाय चालू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर ,मार्केटिंग तज्ज्ञ असाल तर नोकरी सोडून या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम सुरु करा. मार्केटिंग सल्लागार एखाद्या उत्पन्नाच्या ब्रान्दिंग पासून ते त्याच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे सल्ले देत असतो. या मध्ये जाहिरात कशी कुठे करावी , किती खर्च करावा, ग्राहकाची नस कशी ओळखावी, काय उत्पादन करावे ते कसे कुठे,विकावे लोगोचा रंग काय असावा, लोगो कसा असावा, तुमच्या उत्पादनाची एक लाइन काय असावी ह्या सर्व गोष्टींचा सल्ला मार्केटिंग सल्लागार देत असतो.
भांडवल: ४०-५०,०००/- ते - लक्ष
स्थिर: उत्तम कपडे, लेप्टोप, बिझनेस कार्ड, गाडी
तुमच्या शिक्षणाची आणि अनुभवाची जंत्री जेवढी चांगली आहे तेवध्ये तुम्ही या क्षेत्रात नावारूपाला लवकर याल.

. आर्थिक सल्लागार
एलआयसी एजंट किंवा एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीच्या एजंट पेक्षा हे वेगळे क्षेत्र आहे. यात क्लायंट ची आर्थिक कमाई, क्षेत्र, खर्च या सर्वांचा गोषवारा घेऊन दर महिना किती गुंतवणूक करावी, गुंतवणुकीचे , विशिष्ट ओकेजन साठी पैसे साठवणे अशा सर्व गोष्टींचा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतो. तो कुठल्याही विशिष्ट कंपनीशी बांधील नसतो.
गुंतवणूक सल्लागार होण्यासाठी फायनान्शिअल प्लानिंग बोर्ड ऑफ इंडिया या सास्न्ठेचा गुतंवणूक सल्लागाराचा कोर्स करणे सयुक्तिक आहे. त्यामुळे तुम्हाला पदवी आणि मान्यता मिळते.
तसेच विविध कर्जे मिळवून देणे, आर्थिक व्यवसाय सांभाळणे हि सुद्धा कामे आर्थिक सल्लागार करू शकतो.
भांडवल: - लक्ष
स्थिर: उत्तम कपडे, लेप्तोप, बिझनेस कार्ड, (सुसज्ज ऑफिस)
खेळते भांडवल: ऑफिस, किमान एक मुलगा.

. पब्लिक रिलेशन/ संवाद सल्लागार
पब्लिक रिलेशन म्हणजे एखाद्या संस्थेची मते, बातम्या आणि संवाद लोकांपर्यंत पोहोचवणे. तुम्ही जर्नलिझम किंवा पब्लिक रिलेशन मध्ये असाल तर तुम्हाला या क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण येईल. यासाठी तुमच्याकडे कल्पकता, सृजनशीलता आणि ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे त्याला संवादाच्या, माध्यमाचा सल्ला देता आला पाहिजे.
तुमचे पत्रकार, पत्रकार संघ यांच्याशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे.
भांडवल: - लक्ष
स्थिर: उत्तम कपडे, लेप्टोप, बिझनेस कार्ड,
खेळते भांडवल: किमान एक मुलगा.
महत्वाचे म्हणजे हे सर्व उद्योग सेवा उद्योग असल्याने तुम्ही आणि तुमचे ज्ञान/ कौशल्य हे त्याला लागणारे सर्वात मोठे भांडवल आहे.
त्यामुळे तुमच्यामधील कौशल्याचा उपयोग करा आणि स्वतःच स्वतःचे बॉस व्हा!







माझ्याबद्दल