गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

मनात न्यूनगंड असल्यास कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. अनेकदा निर्णय घेताना भीती वाटते. खरे व्यक्तिमत्त्व बाहेर येत नाही. तेव्हा मनातील न्यूनगंड सोडून स्वत:ची क्षमता ओळखा आणि यशोशिखर गाठा - बोमन इराणी ...

वयाच्या ४४व्या वर्षी पहिला सिनेमा साइन करणारा ऍक्टर...


वयाच्या ४४व्या वर्षी पहिला सिनेमा साइन करणारा ऍक्टर


सर्व्हिस वेटर ते बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता…बोमन इराणीचा थक्क करणारा प्रवास वाचण्याजोगा आहे

सिनेसृष्टीत प्रत्येकालाच कष्ट करणे अनिवार्य आहे आणि असेच कष्ट करून अनेक अभिनेते- अभिनेत्री आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. अशाच यशस्वी आणि कष्ट करून मोठा झालेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत ‘बोमन इराणी…’ बोमन इराणी यांना अभिनेता म्हणून वयाच्या ४४ वर्षी यश मिळाले. तोपर्यंत त्यांचे आयुष्य कष्ट करण्यामध्येच गेले. त्यांनी मुन्ना भाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स, डॉन, हॅपी न्यू इयर, पीके आणि दिलवाले यासारख्या एक से बढकर एक सिनेमांमध्ये काम केले आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेला लोकांनी दाद दिली.
बोमन इरानी यांचा जन्म २ डिसेंबर १९५९ रोजी मुंबई इथे झाला. बोमन यांनी त्यांचे शिक्षण सेंट मॅरी हायस्कूल पुणे येथून पूर्ण केले. तेव्हा त्यांना Dyslexic या नावाचा आजार होता. या आजारामुळे त्यांना काही शब्दांचा उच्चार करणे आणि शब्दांची ओळख करणे अवघड जात होते. काही काळानंतर वैद्यकीय उपचारानंतर त्यांचा हा आजार कमी झाला आणि नंतर पूर्णपणे नाहीसा झाला.
हॉटेलमध्ये वेटरची नोकरी

बोमन इराणी यांनी मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून वेटर बनण्याचा अभ्यास केला आणि तो पूर्ण करून त्यांनी ‘ताज महाल पॅलेस अँड टॉवर’ या हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस म्हणून काम केले. तसेच, त्यांनी फ्रान्सच्या एका हॉटेलमध्ये देखील काम केले आहे. साधारण २ वर्ष त्या हॉटेलमध्ये काम केल्यानंतर ते पुन्हा भारतात त्यांच्या घरी परतले आणि परत आल्यावर त्यांनी त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेली बेकरी सांभाळायला सुरुवात केली. हि बेकरी बोमन इराणी यांच्या अगोदर त्यांची आई सांभाळत होती. त्यांनी त्यांच्या वयाच्या ३२ वर्षापर्यंत बेकरी चालवली. बोमन इराणी यांची बेकरी मुंबईच्या ग्रांट रोडवर होती.



बोमन इराणी यांना आधीपासूनच सिनेमाची आवड होती पण त्या सोबतच ते फोटोग्राफी देखील करायचे. बोमन इराणी यांनी १९९१ मध्ये मंबईत होणाऱ्या बॉक्सिंग वर्ल्ड कप चॅम्पियनशिपचे अनेक फोटोज काढेल. तसेच त्यांनी शाळेतील कार्यक्रमांचे, शाळेतील स्पोर्ट्सचे आणि इतर इव्हेंट्सची देखील फोटोग्राफी करायचे.
अभिनयाचे वेड

इतर कामं करत असताना त्यांच्या डोक्यातील अभिनयाचे वेड मात्र जात नव्हते. त्यांनी अभिनेता बनण्यासाठी १९८१ ते १९८३ पर्यंत अभिनयाचे गुरु हंसराज सिद्दीकी यांच्याकडे अभिनयाचे शिक्षण घेतले. बोमन इराणी यांनी आपल्या अभिनयाची आवड पूर्ण करण्यासाठी अनेक थियेटर शोमध्ये काम करणे सुरु केले आणि या शोमधील सर्वात जास्त लोकप्रिय झालेला शो ‘आय एम नॉट अ बाजीराव’ हा होता. पुढे जाऊन बोमन इराणी यांची फंटा, क्रॅकजॅक बिस्कीट आणि सिएट टायर्स या ब्रॅण्ड सोबतच इतर जाहिरातींमध्ये काम केले.
असेच काम करत असताना ‘विनोद चोप्रा’ यांना बोमन मधील कलाकार दिसला आणि त्यांनी बोमन यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या हातात २ लाखाचा चेक देऊन त्यांच्या पुढच्या चित्रपटामध्ये घेतेले.

बोमन इराणी यांचा पहिला चित्रपट ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा होता जो राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला होता आणि या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्व प्रेक्षकांना खूप आवडली आणि या चित्रपटनानंतर बोमन इराणी यांनी यशाची एक एक पायरी चढायला सुरुवात केली

























by- https://marathi.infobuzz.co.in/boman-irani-biography-in-marathi/

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

तानाजी मालुसरे आणि घोरपडीची कहाणी साफ चुकिची आहे.. खरा इतिहास जाणून घ्या..

तानाजी मालुसरे आणि घोरपडीची कहाणी साफ चुकिची आहे.. खरा इतिहास जाणून घ्या


तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या अत्यंत विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत शिवाजीबरोबर होते. सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले, पुढे ते पुण्यात स्थायिक (स्वराज्यात रुजू ) झाले. (स्वराज्यासाठीचा त्यांचा पुढचा प्रवास आम्ही चित्रामार्फत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीत आहोत.)
स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धेवट सोडली आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे.”
गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला काबीज करणे गरजेचे होते.
(तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मुळात घोरप हा पाळीव प्राणी नाही आणि त्याच्याकडून पाळीव प्राण्याप्रमाणे काम करून घेणे अर्थात किल्ला चढणे वगैरे तर अशक्यच… हि घोरपड कथा का वापरण्यात आली आणि कोणी हा खोटा इतिहास पसरवला हे सांगणे कठीण.. ह्यामुळे मराठ्यांचे सामर्थ्य दडले गेले ) शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जायचं त्यात खडकावर चढणे, डोंगर दऱ्या तसेच उभ्या कडावर चढणे यांवर जास्त भर असायचा. मराठ्यांत इतके सामर्थ्य होते कि त्यांनी ह्या उभ्या कडा रात्रीत चढल्या आणि मग वर गेल्यावर खाली दोऱ्या सोडल्या मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले.
शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन ‘सूर्याजी मालुसरे’ आणि ‘शेलारमामा’ यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले “गड आला पण सिह गेला”. अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या ‘उमरठे’ (पोलादपूरजवळ) या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता ‘मढेघाट’ या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा ‘वीरगळ’ स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले आहे.
तानाजी मालुसरेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरबीर तानाजी वाडी असे करण्यात आले.
पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे. रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.


















by - http://bolkyaresha.in

बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी


बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी


वेगवेगळ्या भूमिकांनी रुपेरी पडदा गाजविणारे बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९४९ रोजी झाला.

बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार झाले आहेत ज्यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता बोमन इराणी.

हरहुन्नरीने अभिनय करणारे बोमन इराणी आज प्रत्येकाचे आवडते कलाकार असल्याचं पाहायला मिळतं. आजही ते त्याच जोमाने अभिनय करुन प्रेक्षकांना प्रेमात पाडत असतात. ते इंडस्ट्रीतील असे एक अभिनेते आहेत, ज्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या करिअरला सुरुवात केली. बालपणापासूनच अभिनयात रुची असलेल्या बोमन यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेटर आणि हॉटेल स्टाफची नोकरी केली होती. मुंबईतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करुन त्यांनी प्रसिद्ध ताज महल पॅलेस अँड टॉवरमध्ये वेटर आणि रुम सर्व्हिस म्हणून नोकरी सुरु केली होती. काही वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी आपल्या आईला बेकरी सांभाळण्यात मदत केली.

१९८१ ते १९८३ याकाळात त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. १९८७ मध्ये त्यांनी फोटोग्राफीला सुरुवात केली. याच काळात बोमन यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. २००० साली राहुल बोस दिग्दर्शित 'एव्हरीवन सेज आय एम फाइन' या सिनेमात त्यांनी पहिली संधी मिळाली. अभिनेता म्हणून २००३ मध्ये रिलीज झालेला 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा त्यांचा पहिला हिट सिनेमा होता.

बोमन इराणी हे बलराज सहानी, अमिताभ बच्चन यांचे फॅन आहेत. बोमन इराणी अमिताभ बच्चन यांच्या बद्दल म्हणतात. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट मी अनेकवेळा पाहिले आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणे ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. त्यांच्यासोबत मी केवळ कामच केले नाही तर भूतनाथ या चित्रपटाच्या पोस्टरवर त्यांच्यासोबत मी झळकलो होतो. आपण ज्या व्यक्तिचे चाहते आहोत, त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याचा, त्यांच्यासोबत पोस्टरवर झळकण्याचा आनंद मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. अनेकवेळा हे सगळे खरे आहे का? मी कोणत्या स्वप्नात तर नाही ना असा मी विचार करतो.

बोमन इराणी यांचे काही चित्रपट 
मैं हूं ना, लगे रहो मुन्नाभाई, दोस्ताना, खोसला का घोंसला, वक्त, नो एंट्री, थ्री इडियट्स वीर-जारा, मैंने गांधी को नहीं मारा, लक्ष्य, हनीमून ट्रैवल्स प्रा. लि. सॉरी भाई,पेज-3 ,माई वाइफ्ज मर्डर, फरारी की सवारी. मराठीतील 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात डॉक्टर श्रॉफ यांच्या भूमिकेत बोमन इराणी यांनी धमाल उडवली होती.




























संजीव वेलणकर पुणे. 
९४२२३०१७३३ 
संदर्भ.इंटरनेट

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

कापूर वृक्ष...

कापूर वृक्ष




फुलो-यासह कापराची फांदी

हा सदापर्णी वृक्ष लॉरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम कॅम्फोरा असे आहे. हा वृक्ष मूळचा तैवान, चीन व जपान येथील असून भारतात डेहराडून, सहारनपूर, कोलकाता, निलगिरी व म्हैसूर या ठिकाणी त्याची यशस्वीपणे लागवड केलेली आहे. कापूर वृक्ष भक्कम फांद्यांनी डवरलेला असतो व त्याची उंची २०-३० मी. असते. साल फिकट रंगाची खडबडीत आणि उभ्या खाचा असलेली असते. पाने साधी, एकाआड एक, मध्यम आकाराची, अंडाकृती वा लांबट, साधारण जाड, गर्द हिरवी व चकचकीत असून खालची बाजू निळसर रूपेरी दिसते. पानांच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस एक मोठी शीर असते. पानांच्या बगलेत पिवळसर पांढर्‍या, सुंगधी व लहान फुलांच्या मंजिर्‍या येतात. फळ मोठ्या वाटाण्याएवढे व गर्द हिरवे असून पिकल्यावर काळे पडते. झाडाच्या सर्व भागांत बाष्पनशील तेल असते. या तेलापासून कापूर मिळवितात. कापूर हा एक सुवासिक ज्वालाग्राही पदार्थ आहे.
कापूर हे सुंगधी, वेदनाहारक, पूतिरोधक आणि कामोत्तेजक आहे. अनेक औषधांमध्ये आणि नायट्रोसेल्युलोज संयुगे तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात. मेंथॉलाप्रमाणे ते त्वचेच्या संपर्कात आल्यास थंडगारपणा जाणवतो. त्वचेची मलमे, चोळण्याची औषधे तसेच सर्दी वा दम्यावर नाकाने हुंगून घेणार्‍या औषधांत मेंथॉलाबरोबर कापराचा वापर करतात. आशियातील अनेक देशांत त्याचा उपयोग मिठाईमध्ये स्वादासाठी केला जातो. तमिळनाडूत अन्न शिजविताना त्याचा उपयोग हिंगाप्रमाणे करतात. विविध धर्माचे लोक पूजा तसेच धार्मिक कार्यक्रमात आरती करताना कापूर पेटवितात. पूजेसाठी वापरला जाणारा कापूर खाण्यास अयोग्य असतो.

कापूर वृक्षाचा वापर

कापूर वृक्षाच्या सर्व भागांत असलेल्या तेलपेशींमध्ये कापूर तयार होतो. मात्र खोड आणि पानांतून अधिक प्रमाणात कापूर मिळवितात. या वनस्पतीच्या खोडातील वा पानांतील कापूर तेल ऊर्ध्वपातनाने वेगळे करून त्यापासून कापराचे स्फटिक तयार करतात. याखेरीज ड्रायोबॅलेनॉप्स कॅम्फोरा , ओईओटिआ ऊसम्बॅरेन्सिस तसेच लॉरेसी कुलातील इतर वनस्पतींपासून कापूर तेल मिळवितात. सु. ४५ किग्रॅ. अशुध्द कापूर तेलापासून सु. २२ किग्रॅ. कापूर, सु. ९ किग्रॅ. लाल कापूर तेल, सु. ७.५ किग्रॅ. शुभ्र कापूर तेल व सु. १ किग्रॅ. डांबर इ.पदार्थ मिळतात. आज जगभरात ८०%  कापूर कृत्रिम रीत्या तयार करून वापरला जात आहे. गुस्ताफ कोम्पा या शास्त्रज्ञाने १९०३ साली कापराचे स्फटिक कृत्रिम रीत्या तयार केले. कापराचे रेणुसूत्र C10H16O  असे आहे







by - http://mr.vikaspedia.in

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

आकाशकंदिलाची लाखांची गोष्ट



आकाशकंदिलाची लाखांची गोष्ट
आपल्यापैकी अनेकजण आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे असा विचार करत असतो.





X




बार्शी येथून लग्न होऊन पुण्यात आलेल्या गोदावरी सातपुते यांनी आकाशकंदील बनवण्यास सुरुवात केली आणि अखंड कुटुंब यात रंगलं. कल्पकता आणि मेहनतीमुळे वाढलेल्या या व्यवसायामुळे दर दिवाळीत त्यांचे आकाशकंदील अनेकांची घरे उजळवतात..

आपल्यापैकी अनेकजण आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे असा विचार करत असतो. आपल्या व्यवसायासाठी एखादी झकास आणि नवीन कल्पना आपल्याला हवी असते. अशी एखादी कल्पना सुचली की लग्गेच व्यवसाय सुरू करायचा असाही आपला बेत असतो. पण अजुनपर्यंत कुणालाच न सुचलेली अशी नवीन कल्पना आपल्याला सापडतच नाही आणि मग बहुतेक वेळा व्यवसाय सुरू करायच्या नुसत्या वायफळ गप्पाच राहातात. पण खरं सांगायचं तर एखादी साधी सोपी संकल्पनासुद्धा नीट लक्ष देऊन जोपासली तर किती छान व्यवसाय होऊ शकतो हे गोदावरी सातपुते यांच्याकडे पाहिल्यावर कळते!

मुळच्या बार्शी, सोलापूर इथल्या गोदावरीताई दहावी झाल्या, पण पुढच्या शिक्षणासाठी २५ कि.मी. लांब जावे लागत असल्याने शिक्षण बंदच झाले. मग घरच्या घरी लोकरीची तोरणं आणि इतर वस्तू करून विकायला त्यांनी सुरुवात केली. वडील शेतकरी, त्यामुळे पैशाची अडचण असायचीच. अशा वस्तू विकून घराला थोडाफार हातभार लागायचा इतकंच. मग दोन-एक वर्षांत लग्न होऊन त्या पुण्याला आल्या.

खेडेगावातून शहरात आल्याने पहिली वर्ष-दोन र्वष तर अशीच गेली. आपण नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी करायला हवं असं त्यांना नेहमी वाटायचं पण नक्की काय करायचं हे मात्र ठरत नव्हतं. होता होता दिवाळी आली आणि गोदावरीताई त्यांचे यजमान शंकर सातपुते यांच्याबरोबर दिवाळीच्या खरेदीला बाजारात गेल्या. त्या वेळी त्यांनी बघितलं की दिवाळीचे आकाशकंदील खरेदी करायला खूप गर्दी आहे आणि जवळपास सगळेच जण हे आकाशकंदील खरेदी करतात. त्याच वेळी त्यांना आकाशकंदील करून विकायची कल्पना सुचली. घरी येऊन त्यांनी घरात सगळ्यांनाच याबद्दल विचारलं. घरातही कोणी आक्षेप घेतला नाही, त्यामुळे थोडेफार सामान आणून त्यांनी पतंगी कागदाचे आकाशकंदील बनवायला घेतले. त्या दिवाळीच्या आधी तब्बल तीनशे आकाशकंदील तयार झाले होते. कंदील तयार तर झाले, पण कोणी विकत घेतले नाहीत तर? अशी धास्ती गोदावरीताईंना वाटायला लागली होती. घरातले आणि आजूबाजूचेही म्हणायला लागले की एवढे कंदील केलेत ते आता गळ्यात घालून फिरायला लागतील की काय! पण जवळच्याच एका दुकानदाराला आकाशकंदिलाबद्दल कळलं आणि त्याने सगळे आकाशकंदील एकदमच विकत घेऊन टाकले. हा पहिला व्यवहार झाला आणि मग मात्र गोदावरीताईंचा हुरूप वाढला.
पुढच्या वर्षी गोदावरीताई आणि त्यांच्या घरातले सगळेजण एकत्र कंदील करायला बसले आणि दिवाळीआधीच भरपूर आकाशकंदिलांची मागणी पुरवता आली. मग २००५ पासून त्यांना अगदी छोटय़ा कंदिलांचीही खूप मागणी आली आणि ती पुरी करायला त्यांनी सहा जणींना कंदील करायच्या कामावर घेतलं. व्यवसाय मोठा करायचा तर भांडवल पाहिजे होतं, त्यामुळे भारतीय युवा शक्तीकडून ५० हजारांचं कर्ज घेतलं आणि कंदील विक्री झाल्यावर ते फेडूनही टाकलं. गोदावारीताईंच्या यजमानांच्या ओळखी असल्याने नवनवीन ठिकाणी विक्री व्हायला लागली, मागणीही वाढली, शिवाय बाजारात पत वाढली आणि व्यवसायातला आत्मविश्वासही वाढला. पुढच्या वेळी त्यांनी अडीच लाखांचे कर्ज घेऊन कंदील केले.


आता तर जानेवारी महिन्यातच या आकाशकंदिलांचं काम सुरू केलं जातं. जिलेटीनचे छोटे कंदील, कागदाचे, फोमचे मोठे कंदील असे सुमारे २२-२३ डिझाइनचे कंदील त्यांच्याकडे तयार केले जातात. घरातले सासू-सासरे, दीर, जाऊ, मुलं, नवरा हे सगळेच कंदिलाच्या कामाला हातभार लावतात. कच्चा माल सगळा दिल्लीहून मागवला जातो. आलेले कागद गोदावरीताई डिझाइनप्रमाणे कापतात आणि मग तो त्यांच्याकडे काम करणाऱ्याना महिलांना दिला जातो. आता सुमारे ७५ महिलांना यातून रोजगार मिळतो. काही महिला कापलेले कागद घरी घेऊन जातात, तर काही तिथे कारखान्यात येऊन कंदील तयार करतात. छोटे कंदील असतील तर एक बाई दिवसाला दीडशे रुपये कमवू शकते. या कंदिलांचा डझनावर हिशेब असल्याने एक डझनावर पाच रुपये मिळतात. महिलांनी तयार केलेले कंदील बरोबर आहेत की नाही हे तपासून त्याचे नीट पॅकेजिंग करावे लागते. हे सगळे काम नीट होण्यासाठी गोदावरीताईंनी साखळी पद्धत ठरवली आहे. चारचार जणींचे ग्रुप करून प्रत्येकीचं काम ठरवून दिलं आहे. त्यामुळे कंदील बनण्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो तपासला जातो. शिवाय पाचवी स्त्री हे तयार कंदील नीट पॅक करते. त्यामुळे सगळी कामे व्यवस्थित होऊन कामाची प्रतही चांगली राहते.

गेल्या वर्षी सुमारे ३० हजार छोटे कंदील तर सुमारे ५००० मोठे कंदील त्यांनी तयार करून विकले होते. या वर्षी आत्तापर्यंत सुमारे ६००० डझन माल तयार आहे. इतक्या प्रचंड संख्येने कंदील करायचे तर कागद कापायला वेळही खूप लागायचा. त्यामुळे त्यांनी आता कटिंग मशीन तयार करून घेतलं आहे. त्यामुळे कागद कापायचं काम सुकर झालंय. हे हजारो कंदील ठेवायला जागाही लागतेच, त्यामुळे तीन गुंठे जागा भाडय़ाने घेऊन त्यावर शेड करून गोदाम तयार केलं आहे. शिवाय सातपुते यांची एक तीन मजली इमारतही साठवणुकीसाठी वापरली जाते. तीन वर्षांपूर्वी एम.बी.ए. केलेल्या त्यांच्या दिराने, रत्नाकर सातपुते यांनी व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली असून ते अकाउंटिंग बघतात, मात्र महिलांकडून काम करून घेणे, त्यांच्या कंदिलांची मोजणी करून तो हिशेब ठेवणे, कागद कापून देणे, माल आणणे, पोचवणे ही कामं गोदावरीताई करतात. मुंबई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, बीड, सोलापूर, लातूर, बार्शी ते अगदी हैदराबादलाही त्यांचे कंदील जातात. ओळखीतून, कर्णोपकर्णी मिळणाऱ्या प्रसिद्धीतून त्यांना दूरध्वनीवरून ऑर्डर मिळतात. मोबाइलवरूनच फोटो पाठवून मागणी नक्की केली जाते आणि मग ट्रान्स्पोर्टकरवी कंदील पोचते केले जातात.

व्यवसायात सतत कल्पकता दाखवली नाही तर बाजारात टिकाव लागत नाही हे ओळखून गोदावरीताई दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. नवे डिझाइन, प्रकार तयार करतात. गेल्या वर्षी खास ऑर्डर आल्यामुळे केवळ दहा दिवसांत त्यांनी कामटय़ाचे दीडशे कंदील बनवून दिले होते. तसेच फिरत्या कंदिलांचीही मोठी मागणी त्यांनी पूर्ण केली होती. मशीनमुळे कागद कापायचा वेळ वाचतो त्यामुळे त्यांना इतर प्रयोग करायला वेळ मिळायला लागला आहे. या वर्षी छोटय़ा कंदिलात त्या नेहमीपेक्षा वेगळे आकार देणार आहेत, तर बाजारातली मागणी बघून मोठय़ा आकाराच्या कंदिलातही कपडा, जाळी, जूट, कामटय़ा अशा विविध प्रकारांतले इकोफ्रेंडली कंदील आणणार आहेत.
त्यांची ही छोटय़ा कल्पनेतून साकार झालेली उद्योजकता बघून २०१४ मध्ये ‘वाय.बी.आय.’ने (युथ बिझनेस इंटरनॅशनल) लंडनला बोलावून त्यांना पुरस्काराने सन्मानित केले. लंडनवारीत त्या सुमारे ४० देशांतल्या इतर उद्योजकांना भेटल्या आणि तिथे त्यांना नवीन कल्पना सुचली. वाढदिवस किंवा काही खास प्रसंगांच्या वेळेस पार्टी बॉक्स उडवले जातात. त्यातून जिलेटीनची चकमक जोरात उडते. जिलेटीन कंदिलाच्या कागद कटाईतून उरलेला कागद त्यात वापरायचा असे ठरवून गोदावरीताईंनी आता ते पार्टी बॉक्स बनवण्याचे मशीनही घेतले आहे. उरलेला जिलेटिन कागद वाया न घालवता तो नळकांडय़ात भरून हवाबंद करून त्याचे पार्टी बॉक्स बनवले जातात.
या वर्षी आकाशकंदील विकत घेताना एका इवल्याशा आकाशकंदिलाची ही लाखांची कहाणी नक्की आठवणार आणि नुसत्या कल्पनेपेक्षाही तिची अंमलबजावणी आणि व्यावसायिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगणार आहे.

गोदावरी सातपुते
गोदावरी आकाशकंदील,
आंबेगाव पठार
धनकवडी, स्वामीनगर, पुणे – ४३
संपर्क : (९१)८३८०९९३६३४

– स्वप्नाली मठकर
by - loksatta 

प्रतिकूल परिस्थितीवर मात


प्रतिकूल परिस्थितीवर मात
स्वकष्टाने परकर शिवून दारोदारी जाऊन विकण्याचा वरकरणी 
क्षुल्लक वाटणारा व्यवसाय सुरू केला

= स्वप्नाली मठकर | 










अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अक्षरश: रस्त्यावर राहायला लागलेल्या माधुरी यांनी स्वकष्टाने परकर शिवून दारोदारी जाऊन विकण्याचा वरकरणी क्षुल्लक वाटणारा व्यवसाय सुरू केला.. प्रचंड कष्ट केले आणि आज त्यांच्याकडे दीडशे स्त्रिया कामाला असण्याइतपत तो वाढवला. शून्यातून व्यवसाय उभा करणाऱ्या माधुरींचा हा प्रवास..

घरात बसून साडय़ांना पिकोफॉल लावून देणं, परकर शिवून देणं अशी कामं करताना माधुरी खांडवे यांना एकदा बचतगटांच्या स्टॉलमध्ये तीन दिवसांसाठी एक स्टॉल मिळाला. आलेली संधी वाया जाऊ द्यायची नव्हती. दोन वर्षांची मुलगी आणि अकरा महिन्यांचा मुलगा यांना आईकडे ठेवून त्यांनी ज्यांच्यासाठी त्या परकर शिवून देत तिथून परवानगी घेऊन कापड मिळवले, परकर शिवले आणि स्टॉल सुरू केला. तीन दिवसांत तब्बल तीस ते पस्तीस हजारांची विक्री झाली; कपडय़ाचे पैसे परत द्यावेच लागले; पण शिलाईचे एका परकरामागे तीन रुपये या दराने बाराशे रुपये माधुरींच्या हातात आले. व्यवसायातून मिळालेला हा पैसा घरात खर्च न करता त्यांनी त्यातून मशीनला मोटर बसवून घेतली ज्यामुळे जास्त वेगाने शिलाई करता येणार होती. तीन-चार दिवसांनी आईकडून मुलांना आणायचे तर जायचा-यायचा शंभर रुपये खर्च होता. माधुरींनी परकर दुकानाच्या मालकीणबाईंकडे शंभर रुपये मागितले, पण त्यांनी चक्क नकार दिला. याचा माधुरींना फारच धक्का बसला. लहान मुलं इतके दिवस दूर ठेवून त्यांना राहावेना. शेवटी शेजारून उधारी घेऊन रात्री त्या आईकडे पोहोचल्या. एरवी कधी माहेरपणाला जास्त दिवस न थांबणाऱ्या त्या या वेळी मात्र दोन-तीन दिवस तिथेच होत्या. त्या वेळी आईला शंका आली आणि तिनं विचारणा केली. माधुरींनी घडलेला किस्सा सांगितला आणि पैसा असता तर स्वत:चा व्यवसाय सुरू केला असता, अशी खंतही बोलून दाखवली. आईने त्या क्षणी स्वत: साठवलेले दीड हजार रुपये हातावर ठेवले आणि त्यांना स्वत:चा व्यवसाय करायचं बळ दिलं. त्यानंतर मात्र गेल्या सोळा वर्षांत माधुरींनी कधी मागे वळून पाहिलं नाही.

जेजुरीजवळच्या धोण्डज इथल्या माधुरींचे वयाच्या सोळाव्या वर्षीच लग्न झाले. सासरी आल्यावर वडिलांनी सोनं न दिल्यामुळे कुरबुरी सुरू झाल्या. शिक्षणाच्या बाबतीतही नवऱ्याने खोटंच सांगितल्याचं लक्षात आलं. कंटाळून त्या माहेरी परतल्या. तीन-चार महिने माहेरी राहिल्यावर गावातल्या लोकांच्या बोलण्याचा त्रास होऊ लागल्याने त्या पुन्हा एकदा सासरी गेल्या. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच त्यांना आणि त्यांच्या पतीला घरातून बाहेर काढलं गेलं. राहायची काही सोय नाही, कुठं जायचं, काय खायचं याचा काही पत्ता नाही असे ते दोघे निगडीला एका देवळासमोर चक्क रस्त्यावर राहायला लागले. चार-आठ दिवसांनी सोन्याचे कानातले मोडून एका झोपडपट्टीमध्ये एक खोली घेतली. आता निदान डोक्यावर छत होतं.

त्या काळात त्यांच्या पतीने दिराबरोबर भाजी मंडईतले काम सुरू ठेवले होते, पण दिवसाचे फक्त वीस-तीस रुपये मिळायचे, त्यात काय भागणार? म्हणून माधुरींनी तिथे मिळतील ती कामं करायला सुरुवात केली. रंगीत काचा निवडायच्या कामात एक किलो काचा निवडल्या की दहा पैसे इतक्या कमी दरानं पैसे मिळायचे; पण जे काही मिळतील ते घराला उपयोगी म्हणून त्यांनी काम सुरूच ठेवलं. नंतर त्यांना एका कंपनीत काम मिळालं, तिथून हजार-बाराशे रुपये मिळायचे, त्यामुळे घरची परिस्थिती जरा सुधारली. मग माधुरींनी शिवणकामाचा कोर्स केला, घरी मशीन घेतलं आणि घरच्या घरी पिकोफॉल, कपडे शिवून देणं अशी कामं त्या करायला लागल्या. हळूहळू काम वाढलं. परकर शिवायचंही काम मिळालं आणि त्यातूनच स्वत:च्या व्यवसायाचं विश्व उभं केलं.

आईने दिलेल्या दीड हजार रुपयांत त्यांनी तीस परकरांचं कापड आणलं आणि एका दिवसात परकर शिवून दारोदारी विकायला गेल्या. सगळे परकर विकले गेले आणि अडीचशे रुपये नफाही झाला. हा नफा पुन्हा भांडवल म्हणून घालून या वेळी जास्तीचं कापड आणलं आणि परकर विकले. असं करत भांडवल वाढत गेलं आणि थोडाफार नफाही व्हायला लागला. दारोदारी जाऊन परकर विकतानाच ओळखीतल्या एका व्यापाऱ्याकडून अंतर्वस्त्रेही आणून विकायला सुरुवात केली. त्या विक्रीचाही थोडा पैसा मिळायला लागला. सुमारे साडेतीन र्वष त्या दारोदारी जाऊन कपडे विकत होत्या. कर्ज काढून दोन खोल्यांचं घर घेतलं पहिल्या वेळी घराचं कर्ज असल्यानं बँकेने व्यवसायासाठी कर्ज नामंजूर केलं. त्या वेळी त्यांनी पतपेढीतून पैसे उचलून व्यवसाय वाढवला आणि घराचं कर्जही फेडलं. पुन्हा एकदा दीड-दोन वर्षांनी भारतीय युवा शक्ती ट्रस्टकडून अर्ज केल्यावर बँकेने व्यवसाय कर्ज दिलं. या वेळी माधुरींनी दोन खोल्यांच्या घराच्या जागी तीनमजली बिल्डिंग उभी केली आणि खालचा मजला कारखान्यासाठी ठेवून ‘गायत्री परकर’ सुरू केलं.

२००७ मध्ये पुन्हा एकदा सासरी कुरबुरी होऊन त्यांच्या पतीचं भावाबरोबर भाजी मंडईत काम करणं बंद झालं. त्या वेळी लोक काय म्हणतील म्हणून ते माधुरींबरोबर काम करायला कचरत होते. बायकांच्या कपडय़ाचा व्यवसाय आपण करावा हे त्यांना पटत नव्हतं; पण मग माधुरींनी त्यांना समजावलं आणि सुनील खांडवे हेही त्यांच्याबरोबर या व्यवसायात उतरले. सायकलवरून कपडे विकण्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि आता अनेक गोष्टींत त्यांचा सहभाग असतो.

आज ‘गायत्री परकर’ या व्यवसायातून सुमारे दीडशे महिलांना रोजगार मिळतो. रोज सकाळी ठरावीक वेळेपर्यंत कापड कापून त्या महिलांना वाटतात. आदल्या दिवशीचे शिवलेले परकर घेऊन हिशेब करतात आणि मग कपडे पोहोचवायला, ऑर्डर घ्यायला माधुरी स्वत: जातात. काही जणी काम घरी घेऊन जातात आणि परकर शिवून दुसऱ्या दिवशी आणून कारखान्यात देतात. आता त्यांचे एक होलसेल दुकान आहे. आठवडय़ातले चार दिवस माधुरीताई फिरतीवर असतात तेव्हा त्यांची आता दहावीत असलेली मुलं हे दुकान सहज सांभाळतात.

पुणे आणि आसपासच्या साधारणत: शंभर किमीच्या परिसरात ‘गायत्री परकर’च्या उत्पादनाची विक्री होतेच, शिवाय महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांतही विक्री होते. विविध स्टाइलचे, डिझायनर, सॅटिन इत्यादींचे परकर शिवण्याबरोबरच लेगिग्ज, स्कार्फ, ब्लाऊजपीस, इतर कपडे यांची घाऊक विक्रीही त्या करतात. महिन्याला वीस हजारांहून अधिक परकर शिवून त्यांची विक्री होते.

१९९५ मध्ये रस्त्यावर आपलं आयुष्य काढलेल्या माधुरींना आता सिटी ग्रुपतर्फे, भारतीय युवा शक्ती ट्रस्टतर्फे, डी.एस. कुलकर्णी यांच्यातर्फे आणि अन्य मानसन्मान मिळाले आहेत. शिवाय ‘युथ बिझनेस इंटरनॅशनल’तर्फे लंडनमध्येही त्यांना एक पुरस्कार मिळाला आहे. पूर्वी दारोदार फिरून कपडे विकते म्हणून हेटाळणी करणारे नातेवाईक आज त्यांचं कौतुक करतात तेव्हा त्यांना स्वत:चा सार्थ अभिमान वाटतो. अधिक न शिकता आपली मुलगी इतकी प्रगती करू शकते हे पाहून तिला अजून शिकवली असती तर, अशी चुटपुट मात्र माधुरींच्या आई-बाबांच्या मनाला लागून राहिली आहे आणि म्हणूनच आपल्या मुलगा आणि मुलीला भरपूर शिकवायचं, असं माधुरींनी ठरवून ठेवलं आहे. परकरसारख्या एखाद्या वरकरणी क्षुल्लक वस्तूची बाजारपेठ ओळखून तो व्यवसाय इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढवता येणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे.


उद्दिष्ट

स्वत:ची मोठी जागा घेऊन, स्त्रिया तिथे येऊन काम करू शकतील अशी कंपनी सुरू करायची आहे. सप्लाय चेन वाढवायची आहे आणि व्यवसाय अजून मोठा करायचा आहे.


सल्ला


कुठलंच काम हलकं समजू नका. व्यवसाय म्हटला की नफा-तोटा होतच असतो, पण त्यातही चिकाटीने काम करणं जरुरी आहे. आजकाल सगळ्यांना ‘इझी मनी’ हवा असतो, पण व्यवसायात असे काही शॉर्टकट नसतात. जिद्दीने काम करत राहिलं तरच यश मिळतं




माधुरी खांडवे, 
गायत्री परकर, गोंधळेनगर, हडपसर
८४२१०५०१८९

swapnalim@gmail.com










by- loksatta

माझ्याबद्दल