शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

गुगल आणी १० अफलातुन करामती..



कोणत्याही विशेष मुहूर्ताला गुगल आपला नेहेमीचा लोगो बदलून त्याजागी दिनविशेष दाखवणारा लोगो दाखवते (उदा – एखाद्याचा वाढदिवस, एखाद्याचा स्मृतीदिन इत्यादी) इतकेच नव्हे तर गुगल तुमच्या वाढदिवसाला देखील अशा प्रकारचे डूडल दाखवते, पण फरक इतकाच कि ते फक्त तुम्हालाच दिसते (पर्सनलाईज सेवेच्या माध्यमातुन) जगभरातील काही डेव्हलपर्सनी गुगलचा वापर करून काही अफलातुन करामती सादर केल्या आहेत याच गुगलच्या काही भन्नाट आणी अफलातुन १० करामती येथे दिल्या आहेत.
गुगल आणी १० अफलातुन करामती

नुकतेच गुगल या इंटरनेटवरील सर्वात मोठ्या संकेतस्थळाने आपला १५ वा वर्धापन दिवस साजरा केला. गुगलने त्या दिवशी डूडलच्या माध्यमातून जगभरातील वापरकर्त्यांवर शेकडो चॉकलेटसचा अक्षरशः पाऊस पाडला सर्वात जास्त चॉकलेटस मिळवण्याची स्पर्धाच जणू नेटिझन्स मध्ये लागली होती. कोणत्याही विशेष मुहूर्ताला गुगल आपला नेहेमीचा लोगो बदलून त्याजागी दिनविशेष दाखवणारा लोगो दाखवते (उदा – एखाद्याचा वाढदिवस, एखाद्याचा स्मृतीदिन इत्यादी) इतकेच नव्हे तर गुगल तुमच्या वाढदिवसाला देखील अशा प्रकारचे डूडल दाखवते, पण फरक इतकाच कि ते (पर्सनलाईज सेवेच्या माध्यमातुन) फक्त तुम्हालाच दिसते.  जगभरातील काही डेव्हलपर्सनी गुगलचा वापर करून काही अफलातुन करामती सादर केल्या आहेत याच गुगलच्या काही भन्नाट आणी अफलातुन १० करामती येथे दिल्या आहेत.


१) गुगल ग्रॅव्हीटी (Google Gravity) –  
     गुगल ग्रॅव्हीटी म्हणजे न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला गुगलने दिलेली मानवंदना असे गमतीने म्हटले जाते. गुगल अतिशय वेगवान आणी सुरक्षित असलेले संकेतस्थळ आहे हे सर्वश्रुत आहे पण गुगलवर आपण जेव्हा शोध घेतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला हवी असलेली माहिती सापडतेच असे नाही मग अशा वेळी गुगलच्या होमपेजवरील सगळ्या गोष्टींची मोडतोड करून त्या अस्ताव्यस्त करायला तुम्हाला आवडु शकेल. जेव्हा अस्ताव्यस्त केलेल्या गोष्टी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे खाली पडतील तेव्हा तुम्ही पुन्हा उचलून त्या हवेत उडवू शकता. तुम्हाला आलेल्या रागाचे मनोरंजनात किंवा असुरी आनंदात  रूपांतर करण्यासाठी पहायलाच हवी अशी गुगल ग्रॅव्हीटी. 

२) गुगल स्पहीयर (Google Sphere) –  
     नेहेमी शांत आणी गुणी बाळाप्रमाणे वागणाऱ्या गुगलने अचानक तुम्हाला चकवा द्यायला सुरुवात केली तर ?? गुगल स्पहीयर म्हणजे याचेच एक द्वाड उदाहरण आहे. तुम्ही इमेज सर्च करायला गेला कि हवे असलेले कीवर्ड्स टाइप करून सर्च इमेजेस या बटणावर टिचकी द्यायला गेला आणी तेवढ्यात जर ते बटन तुमच्या हातावर तुरी देऊन धुम पळत सुटले तर तुम्हाला इमेजेस सर्च करण्यासाठी नक्कीच थोडा पकडापकडीचा खेळ खेळावा लागेल आणी यामध्ये जीमेल, मॅप्स, न्युज असे इतर उत्सुक दुवेदेखील सामील होतील हे निश्चित. 

३) गुगल झेर्ग रश (Google Zerg Rush) –  
     आपणच निर्माण केलेल्या गोष्टीची आपणच सहसा विल्हेवाट लावत नाही पण गुगल झेर्ग रश मात्र याला अपवाद आहे. तांदूळ, गहू अशा धान्यांमधले किडे तोडणीनंतर प्रक्रिया करून काढले जातात नाहीतर असे किडे धान्य खराब करू शकतात पण गुगलच्या शोधांमध्ये मात्र असे किडे येतील आणी चक्क सर्च रिझल्ट्सच खाऊन संपवतील अशी कल्पना खुद्द गुगलचे निर्माते सर्जी आणी लॅरी यांनीही केली नसेल.  गुगल झेर्ग रश मधील किडे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गुगल मधीलच ‘ओ’ हि इंग्रजी अक्षरे आहेत पण तुमचे सर्च रिझल्ट्स वाचवण्यासाठी तुम्हाला कीटकनाशक फवारणी एवजी एक + च्या आकाराची बंदूक दिली जाते. 

४) गुगल पॅक मॅन (Google Pac Man) -  
     जर तुम्ही ९० च्या दशकात जन्मलेले असाल तर तुम्ही पॅक मॅन हा खेळ नक्कीच खेळलेला असाल. गुगलने हा खेळ पॅक मॅनच्या ३० व्या वाढदिवसाला (२१ मे २०१२) सन्मान म्हणुन डूडलच्या रुपात पुन्हा जगापुढे आणला. अगदी जुन्या रुपात म्हणजे कॉईन टाकल्याशिवाय सुरु न होणे इत्यादी बारकावे देखील आपल्याला पहायला मिळाले. तुम्हाला जर हा खेळ परत डूडल वर खेळायचा असेल तर मात्र तुम्हाला पॅक मॅनच्या ५० व्या किंवा ६० व्या वाढदिवसापर्यंत वाट पहायची आवश्यकता नाही. गुगलच्या डूडल अर्काईव्हज मध्ये तुम्ही हा खेळू शकता. 

५) गुगल टर्मिनल (Google Terminal) –  
     तुम्हाला माहिती आहे का बिल गेट्स यांनी फक्त कोडिंगच्या ज्ञानावर जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला होता? ज्यावेळी पर्सनल कॉम्प्युटर अस्तित्वात आले तेव्हा ते कसे दिसत असतील हे जाणून घेण्यासाठी गुगल टर्मिनल तुम्हाला उपयोगी पडू शकेल याचे होमपेज पाहिल्यावरच आपल्याला जुन्या पद्धतीच्या कोडिंग संदर्भात कल्पना येते. त्या पद्धतीचे कोडिंग आजही बायोस मेन्यूमध्ये तुम्हाला बघायला मिळते पण एकदा संगणकावर ‘वेलकम’ असा संदेश झळकला कि आजची रंगीबेरंगी साधी आणी सोपी संगणक प्रणाली पहायला मिळते. गुगल टर्मिनल मध्ये शोध घेताना फक्त किबोर्डचाच वापर आवश्यक आहे. 

६) गुगल अंडरवॉटर (Google Underwater) –  
     आपण केलेली मेहेनत पाण्यात जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याचप्रमाणे कोणाला पाण्यात पाहणे असभ्यपणाचे लक्षण मानले जाते पण गुगल अंडरवॉटर वापरून घेतलेले शोध मात्र पहायचे असेतील तर मात्र गुगलला पाण्यात पाहण्यावाचून काही उपाय उरत नाही. सुरुवातीला पाण्यावर तरंगणारा सर्च बॉक्स शोध घेतल्यानंतर मात्र सापडलेल्या शोधांच्या वजनाने जड होतो आणी सगळ्या शोधांसह पाण्याखाली बुडतो म्हणूनच गुगल अंडरवॉटर वापरून घेतलेले शोध पहाताना ते पाण्यात पहावे लागतात. 

७) लेट मी गुगल दॅट फॉर यु (Let Me Google That for You) –  
     गुगल वर शोध घेण खरच खूप अवघड असते का?? नक्कीच नाही पण गुगल पहिल्यांदा वापरताना कदाचित एखाद्याला अडचण येऊ शकते, यावेळी तुम्ही ‘लेट मी गुगल दॅट फॉर यु’ चा वापर करू शकता. येथे होमपेजवर आपला नेहेमीचा गुगल सर्च बॉक्स दिसतो तेथे जाऊन कीवर्ड टाइप करायचे आणी सर्च बटणावर टिचकी द्यायची आता नेहमीप्रमाणे सर्च न होता एक लिंक तयार होईल जी तुम्ही नंतर कधीही वापरू शकता. ह्या लिंकवर टिचकी दिल्यावर दर वेळेस कीवर्ड टाइप होण्यापासून ते सर्च रिझल्ट्स दिसेपर्यंत सर्व प्रोसेस तुम्ही पाहू शकाल आणी सरतेशेवटी तुमच्याकडे असतील सर्च रिझल्ट्स. एक उदाहरण तुम्ही या दुव्यावर पाहू शकता. 



आपण गुगलच्या इतक्या अफलातुन आणी मनोरंजक करामती पहिल्या, आता उपयोगी पडणाऱ्या काही सुविधांची माहिती घेऊयात.


८) स्ट्रीट व्ह्यू (Google Street View) –  
     नकाशा पहाताना तुम्ही बहुतेक वेळेला गुगल मॅप्सचा वापर करत असाल तर स्ट्रीट व्ह्यू हि सुविधा तुम्ही वापरायलाच हवी. सध्या भारतातील नकाशा स्ट्रीट व्ह्यू मार्फत पाहता येत नसला तरीही इतर देशातील नकाशे पाहू शकाल. स्ट्रीट व्ह्यू म्हणजे चक्क एखाद्या रस्त्याचा फोटो होय, पण थांबा स्ट्रीट व्ह्यू सुविधा तुम्हाला नुसताच फोटो दाखवत नाही तर तुम्ही तुमचा किबोर्ड वापरून पुढे-मागे चालू शकता डाव्या-उजव्या बाजूला वळू शकता म्हणजेच थोडक्यात एखादा व्हिडियो-गेम खेळल्याप्रमाणे तुम्ही त्या देशाची मुक्त भटकंती करू शकता याशिवाय व्हाईट हाउस सारख्या स्थळांचाही समावेश गॅलेरी मध्ये करण्यात आलेला आहे. 

९) अकाऊंट अॅ‌‍क्टीव्हीटी (Google Account Activity) -  
     अकाऊंट अॅ‌‍क्टीव्हीटी म्हणजे एक अशाच प्रकारची उपयुक्त सुविधा आहे जी तुम्हाला तुमच्या गुगल अकाऊंटची सर्व माहिती पुरवते. तुम्ही पाठवलेले सर्व ई-मेल्सची संख्या, गुगल वर केलेले सर्च इत्यादी याशिवाय तुम्ही पाहिलीली संकेतस्थळे, सबस्क्राइब केलेल्या फिड सुविधा याबाबतही माहिती  गुगलच्या अकाऊंट अॅ‌‍क्टीव्हीटी मध्ये उपलब्ध आहे. 

१०) टेक-आउट (Google Takeout) – 
     कदाचित तुम्हाला माहिती नसेल कि तुम्ही जेव्हापासून गुगल प्रोडक्ट्स वापरत आहात (उदा- गुगल अर्थ, गुगल क्रोम) तेव्हापासून गुगलकडे तुमच्याबद्दलची इत्यंभूत माहिती जमा केली जात आहे, रिसर्चच्या नावाखाली जमा केली जात असलेली सर्व माहिती गुगल पर्सनलाईझ सेवा देण्यासाठी वापरते आणी याच माहितीचा वापर करून तुमच्यासाठी सर्वाधिक योग्य अशा जाहिराती देखील दाखवल्या जातात ज्या तुम्हाला आवडु शकतात. तुम्हाला देखील तुमच्याबद्दलची गुगलकडे असणारी माहिती हवी असेल तर तुम्ही ती डाऊनलोड करू शकता, पण सर्व माहिती तुम्हाला दाखवण्यात येत नाही त्यामुळे जितकी आवश्यक तितकीच माहिती तुम्हाला पुरवण्यात येते आणी गुगलकडे तुमच्याबद्दल असलेली माहिती तुम्ही गुगलच्या पॉलिसीनुसार डिलीट करू शकत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल