गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

डावखुरा दिन विशेष – डावखुऱ्यांचे प्रेरणादायी संग्रहालय, गोव्यात २१ दिग्गजांचे मेणाचे पुतळे...

‘इंडियन लेफ्ट हॅन्डर्स क्लबचे भरीव काम.


Aarteeshymal Joshi Aarteeshymal Joshi 3 weeks ago

समाजमनावर काही समज खोलवर रुजलेले असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कितीही गप्पा झडत असल्या तरी या गोष्टी मन आणि मेंदूच्या सांदीकोपऱ्यात जिवंत असतात. डावखुरे असणे अशुभ हा गैरसमज यापैकीच एक. लहान मुलं डाव्या हातानेच क्रिया करायला लागलं की त्याबद्दल कुटुंबांमध्ये चिंता व्यक्त व्हायला लागते. ती सवय बदलावी म्हणून प्रयन्तही होतात. पण, हे निसर्गदत्त मिळालं याचा विचार या सगळ्या प्रक्रियेत कुठेच होत नाही. आजही भारतीय कुटुंबांमध्ये कमी अधिक फरकाने ही स्थितीबघायला मिळते. हे जे चालत आलय ते सगळं चुकीचं आहे. डावखुरं असणं चुकीचंनाही, तर ती त्या स्वतंत्र ओळख आहे. हे सांगणारी आणि डावखुऱ्या माणसांना बळ देणारी एक संस्थाच उभी राहिली. ती म्हणजे ‘इंडियन लेफ्ट हॅन्डर्स क्लब’.
डावखुर असणं अपशकुनी आहे. वा उजव्या हाताने करावयाची कामे डाव्या हाताने करणे चुकीचे आहे असं अजिबात नाही. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणारे महात्मा गांधी, चार्ली चॅप्लिन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा, बिल क्लिंटन, बिल गेट्स, प्रिन्स विल्यम्स, रतन टाटा, मर्लिन मनरो, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सौरव गांगुली ते महानायक अमिताभ बच्चन. आपल्या कतृत्वाने जगाला भुरळ घालणारी ही माणसं कोण होती? ही सारी दिग्गजी मंडळी डावखुरी होती. त्यामुळे डावखुरा हात म्हणजे त्या माणसाच्या प्रतिभेला लाभलेली सोनेरी किनारच आहे, हे सांगत इंडियन लेफ्ट हॅन्डर्स क्लबने जनजागृतीचा वसा हाती घेतला. देशात १० कोटीहून अधिक संख्या असलेल्या डावखुऱ्या लोकांसाठी संदीप बिष्णोई यांच्या संकल्पनेतून हा क्लब उभा राहिला. ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ या मजरुह सुल्तानपुरी यांच्या शायरीची आठवण व्हावी अशीच वाटचाल या क्लबने सुरु केली. २००८ साली सुरु झालेल्या क्लबचे आजघडीला लाखो डावखुरे लोक लोक सदस्य आहेत.
डावखुऱ्या माणसांना जोडण्याबरोबरच अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, त्यांचा यशाबद्दल गौरव, त्यांना होणाऱ्या त्रास आणि आणि अडचणींवर मात करण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम घेत क्लबच जाळं देशभरात विस्तारत गेलं. हे कार्यच क्लबला प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम करत होत. याच काळात एक कल्पना जन्म घेत होती. ती म्हणजे जगाच्या पटलावर आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवनाऱ्या माणसांचे मेणाचे पुतळे असलेल्या संग्रहालयाची. नामांकित व्यक्तीच्या मेणाचे पुतळे असलेल्या जगप्रसिद्ध मादाम तुसा संग्रहालयाच नाव ऐकलंय ना? अगदी तसेच मेणाचे पुतळे या संग्रहालयात असणार आहेत. वेगळेपण म्हणजे हे सारे डावखुरे असतील. गोव्यातील लोटलीत हे संग्रहालय प्रत्यक्षात साकारलं गेलं आहे. गेल्यावर्षी १३ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय डावखुरा दिनाचे आचित्य साधून त्याचे उद्घाटन झाले.
याची खासियत सांगायची झाली, तर हे जगातील पहिलंच संग्रहालय आहे. या संग्रहालयात महात्मा गांधी, चार्ली चॅप्लिन, रतन टाटा, अल्बर्ट आईन्स्टाईन, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, मर्लिन मनरो, बराक ओबामा, बिल गेट्स, मेरी कोम, आशा भोसले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २१ प्रज्ञावंताचे पुतळे बसविण्यात आले आहेत. आणि येणाऱ्या काळात जगाने यशाची मोहोर उमटविलेल्या १०० मान्यवरांचे पुतळे उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे प्रिन्स चार्ल्स, बिल गेट्स, लक्ष्मी मित्तल, अँजेलिना जोली, ज्युलिया रॉबर्ट्स यांच्यासह इतर मान्यवरांपर्यंत या संग्रहालयाची माहिती पोहोचली आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हे आगळंवेगळं दालन आकर्षणच ठरणार आहे. बघता बघता हे सगळं उभं राहिलं ते इंडियन लेफ्ट हॅन्डर्स क्लब या संस्थेच्या बळावरच. ही वाट अधिक रुंद करीत क्लबने नवीन उपक्रमही हाती घेतले आहेत.
डावखुऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती, डावखुऱ्या महिला उद्योजकांना आर्थिक साहाय्य देण्याबरोबरच विविध योजनाही सुरु केल्या आहेत. काळाची पाऊले ओळखत अधिक तंत्रस्न्हेही होत, क्लबच नवीन अ‍ॅप येतंय. एका अर्थाने डावखुऱ्या माणसाच्या संगतीत त्यांचा हा डावखुरा क्लबही डोळे दिपवून टाकणारे कार्य पेलवत पुढे निघाला आहे. उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तीचा डाव्या बाजूचा मेंदू काम करतो, तर डाव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तीचा उजव्या बाजूचा मेंदू काम करतो. जगाने दाखल घ्यावी अशा कल्पना उजव्या मेंदूतूनच येतात. म्हणूनच डावी माणसं कामात अधिक उजवी असतात. विज्ञान आणि शास्त्रीय प्रयोगांतूनही हे सिद्ध झालं आहे. डावखुºया माणसांनी ते सिद्ध केले असे असले तरी, डावखुरेपणा अजूनही अशुभच मानला जातो. हा भ्रम दूर करण्याचे काम भेदाभेद अमंगळ या तत्वाने इंडियन लेफ्ट हॅन्डर्स क्लब करीत आहे. या वाटचालीत डावखुऱ्या प्रातिभावंताच्या पुतळ्यांचे लोटलीतील संग्रहालय हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.
डावखुरे असण्याचे फायदे…
डावखुरे असण्याचा सर्वात मोठा लाभ खेळांमध्ये होतो. डावे लोक एथलेटिक्समध्ये इतरांपेक्षा जास्त निपुण असतात. कारण बहुतांश सर्वजणांना उजव्या खेळाडुंबरोबर खेळण्याचा सराव असतो. डावखुऱ्या खेळांडुसोबत खेळताना ते थोडेसे गोंधळून जातात. आता बेसबॉलचेच उदाहरण घ्या ना, बॅटिंग करताना डावखुरे खेळाडू फर्स्ट बेसकडे तोंड करुनच खेळत असतात, बॉल पिच करतानासुद्धा फर्स्ट बेस त्यांच्या नजरेत असतो आणि क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या उजव्या हातात ग्लोव्ह असल्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंड ते कव्हर करु शकतात. फेन्सिंग, हॉकी आणि टेनिससारख्या खेळांतही डाव्यांना ‘उजवे’ स्थान मिळते. डावे लोक उजव्यांपेक्षा जास्त हुशार असतात आणि त्यांचा ‘आयक्यू’ देखील इतरांपेक्षा जास्त असतो. जगाच्या एकूण लोकसंख्येत डावखुऱ्या व्यक्तींचे प्रमाण १० टक्क्यांहुनही कमी आहे आणि तरीदेखील मेन्सासारख्या अति उच्च आयक्यू असणाऱ्या लोकांच्या ग्रुपमध्ये २० टक्के लोक हे डावखुरे आहेत.
डावखुरे लोक उजव्यांपेक्षा जास्त पैसे कमवितात. एका अध्ययनातून असे दिसून आले आहे की महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या डाव्या लोकांचे त्यांच्यासोबतच्या उजव्या मित्रांच्या तुलनेत १३ टक्के जास्त उत्पन्न असते. डावखुरे लोक पाण्याखाली इतरांपेक्षा जास्त चांगले पाहू शकतात. त्यांचे डोळे अशा परिस्थितीशी लवकर जुळवून घेतात. डावे लोकांच्या मेंदूची विचारक्षमता इतरांपेक्षा अधिक वेगवाग असल्यामुळे एकापेक्षा जास्त कामामध्ये ते तरबेज असतात. दैनंदिन जीवनात याचा त्यांना खूप फायदा होतो. आपल्या मेंदूचे डावा आणि उजवा असे दोन भाग असतात. संशोधकांच्या मते डावखुऱ्या लोकांमध्ये मेंदूच्या दोन्ही भागांचा समन्वय अधिक जलद आणि चांगल्याप्रकारे होतो. त्यामुळे वेगवेगळे काम करताना त्यांची गफलत होत नाही.
काही डावखुऱ्या लोकांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. एका अभ्यासानुसार ज्यांचे पूर्वज डावखुरे असतात ते त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना इतरांपेक्षा जास्त चांगल्याप्रकारे स्मरणात ठेवू शकतात. म्हणजेच त्यांची ‘एपिसोडिक मेमरी’ खूप चांगली असते. तुमच्या डावखुऱ्या मित्राला कधीच व्हिडियो गेममध्ये हरविण्याचे आव्हान देऊ नका. डॉ. निक चेरब्युईन यांनी केलेल्या संशोधनानुसार डावे लोक व्हिडियो गेम खेळण्यात उजव्यांपेक्षा खूप चांगले असतात. मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्याने मेंदूच्या कार्यप्रणालीत बिघाड होतो. अशा परिस्थितीतून डावे लोक इतरांपेक्षा लवकर बरे होतात. या मागचे कारण स्पष्ट नसले तरी काही तज्ज्ञांच्या मते डावखुऱ्यांच्या मेंदूचे दोन्ही भाग अधिक कार्यशील असल्याचा फायदा त्यांना होतो. डावे लोक दोन्ही हातांचा वापर अगदी सहजतेने करु शकत असल्यामुळे मेंदूचे दोन्ही भाग अधिक कार्यकरत असतात. म्हणून रक्ताअभावी एक भाग जरी बंद पडला तरी तो लवकर बरा होतो.
डाव्या लोकांना कलात्मकतेचे वरदान लाभलेले असते. एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, विद्यापीठातील डावे विद्यार्थी दृश्यस्वरुपाच्या विषयांत भाषात्मक विषयांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करतात आणि त्यामुळे त्या विषयांत पदवी ग्रहण करण्याची त्यांची शक्यता जास्त असते. लिओनार्दा दा विंची, मायकलेंजेलो, राफायल आणि रेम्ब्रँट सारखे महान कलाकार डावखुरेच होते.
डावे लोक लवकर गाडी चालविणे शिकतात. एका ड्रायविंग स्कूलच्या सर्वेक्षणानुसार ५७ टक्के डाव्या हाताच्या चालकांनी पहिल्याच प्रयत्नात ड्रायविंग टेस्ट पास केली आणि केवळ ४७ टक्के उजवे लोक असे करण्यात यशस्वी झाले.
हॅपी वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे
१३ ऑगस्ट ‘वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. डावखुऱ्या माणसांचे महत्त्व आणि वेगळेपण जगाने ओळखले आहे आणि स्वीकारलेदेखील आहे. मग आम्हा भारतीयांनाच त्याचे सोवळे कशासाठी? डाव्या हातात घेतलेला प्रसाद आम्हाला चालत नाही. डाव्या हाताने कुंकू लावणे तर अपशकूनच ठरवून टाकला आहे आम्ही. उद्या आपल्या घरी बिल गेटस् आला आणि डाव्या हातात प्रसाद घेतला तर! नाही म्हणण्याची हिंमत आहे आपल्यात? मुळात हात डावा वापरला काय किंवा उजवा. त्याला फारसे महत्त्व देण्याची गरजच नाही. नैसर्गिक क्रिया आहे ती. माणसाच्या जन्मासोबतच तिचाही जन्म होतो. मग नाकारणारे आम्ही कोण?
इंडियन लेफ्ट हॅन्डर्स क्लब देशात १० कोटी संख्या असलेल्या डावखुऱ्या लोकांसाठी २००८ साली संदीप विष्णोई यांनी ‘इंडियन लेफ्ट हॅन्डर्स क्लब’ सुरू केला. ऑस्ट्रेलिया सारख्या देशाची लोकसंख्यादेखील यापेक्षा कमी आहे. सध्या या क्लबचे दोन लाखांवर सदस्य आहेत. विविध कारणांमुळे डावखुऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी अपमानालाही सामोरे जावे लागते. यासंदर्भात जनजागृती करण्यासोबत डाव्या हाताच्या वापराबाबत असलेले अंधश्रद्धा दूर करणे, डावखुऱ्या लोकांना प्रोत्साहित करणे, या लोकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करणे यासाठी हा क्लब जन्माला आला. देशभरातील व्यक्तींना एका धाग्यात जोडण्यासाठीच या क्लबचा जन्म झाला असल्याचे विष्णोई सांगतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल