आग्रा भेटीचे एकूण सहा टप्पे आहेत -
1. आग्रा भेटीचे प्रयोजन,
2. आग्य्राचा प्रवास,
3. बादशहाची भेट व कैद,
4. नजरकैदेतून सुटका,
5. परतीचा प्रवास व
6. या घटनेचा हिंदुस्थानच्या इतिहासावर झालेला परिणाम यातील 1, 4 व 5 क्रमांकांच्या टप्प्यांत अधिक गूढता आहे.आग्रा भेटीचे मूळ मिर्झा राजा जयसिंग यांच्या स्वारीत व पुरंदरच्या तहात आहे. या तहाने महाराजांच्या राजकीय व लष्करी प्रतिष्ठेचे खच्चीकरण झाले. त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण कालखंड होता. त्यांना मिर्झा राजाने काढलेल्या विजापूरच्या स्वारीत सामील व्हावे लागले होते. या मोहिमेतच दिलेरखान त्यांच्या जीवावर उठला होता, पण मिर्झा राजाच्या गुप्त मसलतीने ते मोगली छावणीतून निसटून स्वराज्यात आले.
विजापूरच्या स्वारीतच मिर्झा राजाशी महाराजांची जवळीक निर्माण झाली. त्यातूनच आग्रा भेटीचे परिणाम स्वरूप फलित निर्माण झाले असावे. तुम्हास दक्षिणेची सरसुभेदारी बादशहाकडून मिळवून देतो, असे आश्वासन मिर्झा राजाने त्यांना दिले असले पाहिजे. खरोखरच तसे झाले असते तर तमाम दक्षिण आपल्या ताब्यात आणण्याची किल्लीच त्यांच्या हाती येणार होती. मिर्झा राजाच्या शब्दावर महाराजांचा विश्वास बसला होता. त्यांच्या शब्दाला मोगल दरबारात किती प्रतिष्ठा आहे, हे महाराजांनी प्रत्यक्ष पाहिले होते. असा मोगलांचा सर्वश्रेष्ठ सरदार आपल्याला बादशहाभेटीचा आग्रह करत असेल, तर ती एक सुवर्णसंधीच आहे, असे त्यांना वाटले असण्याची शक्यता आहे.
अर्थात हा सुद्धा एक तर्क आहे, पण तो ऐतिहासिक सत्याच्या अधिक जवळ जाणारा आहे. हा तर्क जर आपण स्वीकारला तरी महाराजांनी आपला एकुलता एक पुत्र स्वराज्याचा वारसदार युवराज संभाजीराजे यांना आग्रा भेटीत आपल्याबरोबर का न्यावे? एवढा दूरदर्शी व अखंड सावधान असणार्या राजाने औरंगजेबसारख्या दगाबाज शत्रूच्या शब्दांवर कसा काय विश्वास ठेवला असावा? संभाजीराजास समवेत नेण्यात आपण केवढा मोठा धोका पत्करत आहोत, याचा त्यांनी काहीच विचार केला नसेल का? मग एवढा मोठा धोका त्यांनी का पत्करला? इतिहासकारांकडे याचे उत्तर नाही. हे गूढ फक्त महाराजांनाच माहीत होते!
राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन महाराज राजगडाहून निघाले. शृंगारलेले हत्ती, घोडे, सोन्याच्या पालख्या पुढे हत्तीवर डौलाने फडकणारा भगवा झेंडा अशा राजाला शोभेल असा वैभवी लवाजम्यासह ते प्रवास करत होते. मार्गातील प्रवासात त्यांची बडदास्त शहाजाद्याप्रमाणे ठेवावी, असे मिर्झा राजाचे हुकूम होते. त्यामुळे आग्य्रापर्यंतचा प्रवास सुखनैव झाला. मार्गातच खुद्द औरंगजेबाचे दिलासा देणारे फर्मान आले. त्यामुळे योजिलेल्या कार्यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास महाराजांना आला.
पण असे घडणार नव्हते. आग्य्राजवळच्या मुलूकचंद सराईत महाराजांचा शेवटचा मुक्काम असताना त्यांचे स्वागत एखाद्या बादशाही उमरावांकडून व्हावे असा राजनैतिक संकेत असतानाही रामसिंगाच्या एका सामान्य मुन्शीकडून ते झाले; इथेच त्यांच्या मनात धोक्याची पाल चुकचुकली. पुढचा वृत्तांत इतिहासप्रेमी वाचकांना ज्ञात आहेच. तो समग्र देण्यास इथे अवकाश नाही, पण एवढे मात्र नमूद करावयास हवे की, औरंगजेब बादशहाच्या भर दरबारात या मराठा राजाने आपल्या अस्मितेचे जे तेजस्वी दर्शन घडविले, त्यामुळे मोगल दरबारच नव्हे सर्व हिंदुस्थान थरारून गेला. स्वतःला स्वाभिमानी व शूर समजणार्या रजपूतांचेही डोळे या अभूतपूर्व प्रसंगाने दिपून गेले!
शेवटी आग्रा भेटीची परिणती महाराजांच्या नजरकैदेत झाली. मराठ्यांच्या या राजाचे काय करावे, या विचारात बादशहा काही दिवस होता आणि शेवटी महाराजांचा निकाल लावण्याचा त्याने निर्णय घेतला. तेव्हा मिर्झा राजाचा पुत्र रामसिंग मध्ये पडला. आपल्या पित्याच्या शब्दावर विसंबून शिवाजी महाराज इथं आले असून त्यांच्या जिवाची हमी मी दिली आहे, असे त्याने बादशहाला सांगितले. मारणारच असाल तर प्रथम मला ठार करा, असे त्याने निक्षून सांगितल्यावर बादशहाने त्याच्याकडून जामीन घेऊन आपला निर्णय दक्षिणेतून मिर्झा राजाचा निरोप येईपर्यंत तहकूब ठेवला.पण ‘शिवाजी’ हे प्रकरण बादशहास स्वस्थ बसू देत नव्हते. लवकरच त्याने महाराजांना सोबत घेऊन काबूलच्या मोहिमेवर जाण्याचा रामसिंगास हुकूम केला. आग्य्राचा क्रूरकर्मा किल्लेदार रणअंदाजखान यास आघाडीवर तैनात केले. मार्गात महाराजांचा निकाल लावण्याची कामगिरी त्याच्यावर सोपविली गेली. तथापि, महाराजांनी वजीर जाफरखानाला अत्यंत किमती भेट देऊन बादशहाचा हा हुकूम रद्द करवून घेतला. असे झाले तरी बादशहाच्या डोक्यातील महाराजांना ठार मारण्याचे विचार रद्द झाले नव्हते. दरम्यान, महाराजांच्या अर्जी बादशहाकडे जात होत्या. त्यास बादशहा उत्तर देत होता, पण सुटकेविषयी काहीच बोलत नव्हता. शेवटी महाराजांनी ही कोंडी फोडण्याचे ठरविले. प्रथम त्यांनी रामसिंगाने दिलेला जामीन रद्द करवून घेतला. आपल्याबरोबर आलेल्या नोकर- चाकर, सैनिक यांना बादशाही दस्तके देऊन महाराष्ट्राकडे रवाना केले आणि मग ते आजारी पडले. या आजारातून लवकर बरे व्हावे म्हणून साधुसंतांकडे, दर्ग्याकडे मिठाई-फळांचे पेटारे रवाना करू लागले.
बादशहाने महाराजांच्या निवासस्थानावरचे पहारे कडक केले होते. बाहेर पडण्यास मज्जाव केला गेला. फौलादखान नावाचा अधिकारी या बंदोबस्ताचा प्रमुख होता. डोळ्यात तेल घालून तो सुरक्षा यंत्रणेवर नजर ठेवून होता. रामसिंगाची माणसेही महाराजांच्या जिवास अपाय होऊ नये म्हणून आतील बाजूस पहारा देत होती. महाराजांवरही नजर ठेवून होती.
18 ऑगस्ट 1666 चा दिवस. बादशहा दरबारात बसला असतानाच फौलादखान धावत आला आणि कुर्निसात करून बोलला, ‘राजा कोठडीत होता. वरचेवर जाऊन पहात असता एकाएकी गइब (गायब) जाहाला, पळाला किंवा जमिनीमध्ये घुसला की अस्मानमध्ये गेला न कळे! आम्ही जवळच आहो. देखत देखत नाहीसा जाला. काय हुन्नर जाहाला न कळे!’ बादशहाची मनःस्थिती काय झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. चौतर्फा अष्टदिशेला त्याने सैन्य रवाना केले. रामसिंगावर खप्पा मर्जी झाली. त्याला दरबारला यायला मना केले गेले!
महाराज आदल्या दिवशीच म्हणजे 17 ऑगस्ट रोजी कैदेतून निसटले होते! इतक्या कडक पहार्यातून महाराज कसे बाहेर पडले, हेच कोणाला उमजत नव्हते. बराच विचार केल्यावर काही अधिकार्यांनी शोध लावला. महाराज नेहमी किल्ल्याच्या आत-बाहेर जाणार्या पेटार्यांतून पळाले! राजस्थानी पत्रात हे नमूद केले गेले आहे. सभासद बखर, जेधे शकावली, खाफीखान, सुरतकर इंग्रज यांनी या कथेस दुजोरा दिला आहे. पण सुप्रसिद्ध इतिहासकार पं. सेतुमाधवराव पगडी यांना हे मान्य नाही. महाराजांनी सुटकेसाठी पेटार्यांची जरूर उपाययोजना केली असेल; पण त्यांच्यासारखा मानी पुरुष असहाय्य बनून पेटार्यात बसला असेल असे वाटत नाही; पेटारे वाहणार्या नोकराचा वेश घेऊन ते बाहेर पडले असावेत, असे त्यांनी म्हटले आहे. हे मतही विचारात घेण्यासारखे आहे. महाराजांचा परतीचा प्रवास हे एक तिसरे गूढ आहे. समकालीन राजस्थानी पत्रात महाराज 25 दिवसांनी राजगडास पोहोचले असे नमूद केले आहे. अनेक इतिहासकारांनी महाराजांचा हा प्रवास आग्रा- मथुरा- अलाहाबाद- वाराणसी- गया- गोवळकोंडा- बिदर- गुलबर्गा- पंढरपूर- फलटण- राजगड असा दिला आहे. या मार्गानी हे अंतर 1500 -1700 मैलांचे पडते आणि त्या काळातील रस्त्यांची अवस्था लक्षात घेतली तर हे अंतर अवघ्या 25 दिवसांत पार करणे केवळ अवघड होते. या पार्श्वभूमीवर महाराज मथुरेहून सरळ दक्षिणेकडे 1 हजार मैलांचे अंतर 25 दिवसांत कापून राजगडास पोहोचले असावेत, असा तर्क शिवचरित्रकार मेहेंदळे यांनी केला आहे, त्याचाही विचार करायला हवा. आजमितीस परतीच्या प्रवासाचा मार्ग निश्चितपणे सांगणारा कोणताही पुरावा आपल्या हाती नाही आहे. तेव्हा तर्कावरच अवलंबून रहावे लागते.
आग्य्राच्या मुक्कामात आपल्या बरोबरचा नोकर-चाकरांचा लवाजमा महाराजांनी संमतीने दक्षिणेत पाठविला होता. त्यावेळी त्यांना लागणारे दस्तके (प्रवास परवाने) मिळाली होती, त्यातील काही दस्तकांचा उपयोग महाराजांना आपल्या प्रवासात झाला होता. शेवटी आग्रा भेट व आग्य्राहून सुटका या घटनांचे फलित काय? औरंगजेब बादशहाच्या बाजूने त्याच्या बलाढ्य सार्वभौम साम्राज्य सत्तेच्या प्रतिष्ठेला तडा गेला, पण सर्वात मोठी अप्रतिष्ठा व मानहानी झाली ती मिर्झा राजा जयसिंगाची. बादशहाचा वहीम रामसिंगावर होताच. त्याच्याच मदतीने शिवाजी महाराज निसटले, असे त्याला वाटत होते. मिर्झा राजाही त्याच्या मर्जीतून पूर्ण उतरला. केवढ्या उमेदीने व आत्मविश्वासाने तो दक्षिणेत उतरला होता! आता तो पूर्णपणे खचून गेला. आयुष्यभर बादशहाची केलेली सेवा व मिळविलेली प्रतिष्ठा धुळीला मिळाली, ही नैराश्याची भावना उरात बाळगून तो उत्तरेची वाट चालू लागला. मार्गात बुर्हाणपूर येथे मोगलांचा हा महान सेनापती अपयशाच्या गर्तेत मरण पावला. त्याला बादशहाच्या हुकमानेच विषप्रयोग केला गेला, असा प्रवाद त्या काळी उत्पन्न झाला होता.
मराठ्यांच्या दृष्टीने या घटनांचे फलित म्हणजे त्यांचा राजा मृत्यूच्या कराल दाढेतून सुखरूप बाहेर पडला, हीच सर्वात मोठी जमेची बाजू होती. यामुळे स्वराज्याला जीवदान मिळाले. लवकरच महाराजांनी पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले व मुलूख ताब्यात आणला. एवढेच नव्हे तर स्वतःला राज्याभिषेक करून दक्षिणेत मराठ्यांची स्वतंत्र व सार्वभौम सत्ता स्थापन झाल्याचे त्यांनी जगाला जाहीर केले. याच सत्तेने महाराजांनंतरच्या अवघ्या 50 वर्षांत दिल्लीच नव्हे तर पंजाबपावेतो आपली सत्ता नेली.
शिवाजी महाराजांना आपण वेळीच ठार केले नाही ही आपली फार मोठी चूक झाली, याचे शल्य बादशहाला आयुष्याच्या अखेरपर्यंत टोचत राहिले. शेवटच्या दिवसांत आपल्या पुत्रांस लिहिलेल्या पत्रात तो पश्चात्ताप दग्धतेने लिहितो ‘माझ्या हलगर्जीपणामुळे तो दुष्ट शिवा कैदेतून निसटला आणि त्याचा परिणाम म्हणून मला आयुष्याच्या अखेरीपर्यंत मराठ्यांशी संघर्ष करण्यासाठी जिवाचे रान करावे लागले!’ आणि म्हणूनच अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून बहादूरगडी बादशहा पुढे कैदी संभाजी राजांस पेश केले गेले, त्याच दिवशी ते पळून जाऊ नयेत म्हणून त्यांचे डोळे त्याने काढले व पुढे त्यांना हालहाल करून निर्घृणपणे ठार केले. शिवाजी महाराजांना ठार केले नाही, ही बादशहाची मोठी चूक झाली; पण संभाजी महाराजांना ठार करून त्याने दुसरी घोडचूक केली, अशीच इतिहासाची साक्ष आहे!
- जयसिंगराव पवार
By pudhari
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा