बुधवार, १ मार्च, २०१७

सोने - आयुर्वेदातील!...


आयुर्वेदाच्या उपचारांमध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे. अर्थात आयुर्वेदाच्या दृष्टीने अलंकार रूपातलं सोनं नव्हे तर पेटलेल्या भट्टीमध्ये मोठय़ा पळीमध्ये वितळवलं जाणारं शुद्ध सोनं महत्त्वाचं असतं.


अतिप्राचीन काळापासून समस्त मानवजातीला सुवर्ण (सु-वर्ण) याबद्दल विलक्षण आकर्षण आहे. आपल्या भारतातच नव्हे तर जगभर विविध देशांत, विविध चलनांचे-करन्सीचे मूल्यमापन प्रथम सुवर्णाच्या हिशेबात व नंतर डॉलरच्या हिशेबात होते. आपल्या समाजात बहुसंख्य प्रजा, जास्त करून स्त्रिया अंगावरील दागिन्यांकरिता सोन्याचा कमी-अधिक प्रमाणात वापर करत असतातच. ‘चकाकते ते सर्वच सोने नव्हे’ अशी म्हण आहे. आयुर्वेदातील सुवर्णाची व्याख्या वाचकांनी खासकरून लक्षात घ्यावी. तुम्ही-आम्ही अंगावर सुवर्णालंकार घालतो, त्याला शास्त्रकार सुवर्ण म्हणत नाहीत. एखाद्या मोठय़ा पेटलेल्या भट्टीत; मोठय़ा पळीमध्ये जेव्हा शुद्ध सोने वितळविले जाते, तेव्हा त्याची विलक्षण प्रभा-तेज आसपास पसरते. ते त्या पळीतील लालबुंद सोने-सुवर्ण या नावाने संबोधले जाते. आयुर्वेदीय शास्त्रकारांनी उत्तम सुवर्णाची परीक्षा पुढील प्रकारे सांगितली आहे. सुवर्ण वितळल्याबरोबर लालबुंद दिसते. तुकडे केल्यावर पांढरे शुभ्र, घासल्यावर बाणासारखे, स्पर्शाने स्निग्ध व कोमल तसेच वजनाने भरपूर जड असेच असावयास हवे. प्राचीन आयुर्वेदीय शास्त्रकारांनी सुवर्णाचे पाच प्रकार सांगितले आहेत. (१) प्राकृत सुवर्ण (२) सहज सुवर्ण (३) अग्निसम्भव सुवर्ण (४) खनिज सुवर्ण (५) पारद वेधविधि सुवर्ण.
आयुर्वेदीय औषधी प्रयोगांकरिता आपण सर्वाच्या व्यवहारात वापरात असणाऱ्या खनिज सुवर्णाचाच विचार करत आहोत.
‘आयुर्लक्ष्मीप्रभाधीस्मृतिकरं अखिलव्याधिविध्वंसिपुण्यं
भूतावेशप्रशान्तिस्मरभरसुखदं सौख्यपुष्टि प्रकाशि।।
गाङ्गेयं चाथ रूप्यं गदहरमजराकारि मेहापहारि
क्षीणानां पुष्टिकारि स्फुटमतिकरणं वीर्यवृद्धिप्रकारि।।’..

विजयादशमीचे सोने- आपटा
कांचनाचा वापर औषधांकरिता व आपटय़ाच्या पानांचा वापर दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून एकमेकांना भेट देण्याकरिता केला जातो. कांचन ही वनस्पती शिम्बी
(Leguminoseae) वर्गातील वनौषधी आहे. आपल्या देशात कांचनार या वृक्षाच्या अनेक जाती आढळतात. मालजनजरूर, कठमदुली, कुराल, करमई, कञ्चनारी, कांचनी, नागपूत, गुंडागिल्ला, आपटा व कोविदार अशा जाती विविध प्रदेशांत कांचनाच्या म्हणून ओळखल्या जातात. विजयादशमीच्या दिवशी आपण एकमेकांना सोने म्हणून जी आपटय़ाची पाने वाटतो ती जात पूर्णपणे रूक्ष व अनाकर्षक पानांची असते. याउलट महाराष्ट्रात कांचनाची जी जात तुम्ही-आम्ही पाहतो, ओळखतो, त्याची पाने आकर्षक हिरवीगार व मऊ असतात.
कांचनार (Bauhunia variegata) या वृक्षाच्या तीन जाती आढळतात. तांबडा, पांढरा व पिवळा. कांचनाचे फूल लालच असले पाहिजे, अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे. कांचनाच्या तीन प्रकारांच्या वृक्षांचे गुण समान धर्माचे आहेत, त्यामुळे पर्याय म्हणून कांचनाचा कोणताही उपलब्ध प्रकार वापरला तरी हरकत काही नाही. आपटा (Bauhinia Recemosa) चा औषधी वापर नगण्य आहे. आपटय़ाची फुले मादक असतात. त्यांचा उपयोग काही भागात देशी दारू तयार करण्याकरिता केला जातो. आपटय़ाच्या शेंगांतील बियांत मोठय़ा प्रमाणावर टॅनिन हे द्रव्य आहे. त्यांचा उपयोग जुलाब, कृमी या रोगांकरिता, तसेच वाजीकरणाकरिता करावा, असे शास्त्रात वर्णन आहे. आपटय़ाच्या सालींचा काढा यकृताची सूज कमी करणे व बारीक कृमींचा नाश करण्याकरिता उपयोग होतो. आपटय़ाच्या बियांचा शिरका- व्हिनेगार, पशुजन्य जुनाट जखमांकरिता किंवा बियांच्या चटणीचा वापर जखम भरून येण्याकरिता उपयुक्त आहे, असे वर्णन डॉ. नाडकर्णीच्या ग्रंथात आहे. आपटय़ाच्या सालींचा घन, म्हणजे खूप आटवून तयार केलेल्या काढय़ानंतरचा क्वाथ हा दुर्धर जुलाब विकारावर उत्तम गुण देतो. कष्टाने मूत्रप्रवृत्ती होत असल्यास आपटय़ाची पाने रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी ती वाटून त्याचा रस रुग्णाला दिल्यास लघवी खळखळून साफ होते. या पानांचा रस सहजपणे निघत नाही म्हणून ती पाने काही काळ भिजवून ठेवणे अत्यावश्यक आहे. वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे यांच्या ‘घरगुती औषधे’ या प्रसिद्ध पुस्तकात, कष्टप्रसूती किंवा सहजपणे प्रसूती होत नसल्यास, अशा गर्भवती स्त्रीस आपटय़ाच्या पानांवर झोपवून व पोटावर पाने बांधून सत्वर प्रसूती होऊ शकते असे म्हटले आहे.
थोर आयुर्वेद ऋषी चरकाचार्य यांनी काञ्चनाचा समावेश वमनोपग गणात केला आहे. तर सुश्रुताचार्यानी शरीराच्या ऊध्र्व भागातील रक्तपित्तहर गणात काञ्चन उपयोगी आहे, असे सांगितले आहे. आयुर्वेदीय मतानुसार कांचन तुरट रस, शीतवीर्य व त्याचा शरीरावर होणारा परिणाम कटू विपाक म्हणजे शरीर घटविण्याचा असतो. कांचनाच्या ग्राही गुणामुळे विविध कफ, पित्त, कृमी, विविध प्रकारचे त्वचारोग, गुदभ्रंश, गंडमाळा, जखमा, विविध वात विकार, रक्तविकार, फिरंगोपदंश व आमवात अशा विकारांत कांचनाची साल उत्तम गुण देते. गंडमाळा व अपची या विकारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत्या संख्येने आहेत. या विकारात कांचन सालीचे योगदान खूप मोठे आहे.
ज्यांना नव्याने मानेच्या एका बाजूस किंवा दोन्ही बाजूस गंडमाळा झालेले आहेत किंवा गळ्यामध्ये नव्याने गाठी उद्भवल्या आहेत, अशा रुग्णांकरिता त्यांनी तात्काळ १५ ग्रॅम कांचनसाल, २ कप पाणी असा काढा करावा. अर्धा कप उरवावा व त्या काढय़ात अर्धा चमचा सुंठ मिसळून नियमितपणे घ्यावा. शक्यतो घरगुती जेवण जेवावे. बाहेरचे खाद्यपदार्थ, शंकास्पद पाणी, हॉटेलिंग, मांस-मटण, बेकरी पदार्थ कटाक्षाने टाळावे. नव्याने आलेल्या गाठींकरिता बाह्य़ोपचार म्हणून कांचनाची साल वाटून त्याचा दाट व गरम लेप लावल्यास चटकन उतार पडतो. असाच लेप नारू या विकारातही करण्याचा एक काळ प्रघात होता. ज्यांच्या गंडमाळांचा इतिहास खूप जुना आहे, तसेच दीर्घकाळ टी. बी.ची आधुनिक वैद्यकाची औषधे घेऊनही गंडमाळा कमी होत नाही, त्यांच्याकरिता आयुर्वेदीय ग्रंथात कांचनार गुग्गुळाचा उपयोग सांगितला आहे. एक काळ केवळ कांचनार गुग्गुळ देऊन रुग्णांचा थोडाफार फायदा होत असे, पण अलीकडे बहुसंख्य कामकरीवर्गाची; विशेषत: स्त्रियांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आढळते. भारतीय स्त्रियांचे रक्ताचे प्रमाण कमी असते, आहारात पोषक द्रव्ये तुलनेने कमी असतात. त्यामुळे कांचनार गुग्गुळाबरोबर आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, लाभादी गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ असे गुग्गुळ कल्प, याशिवाय सुधाजल- चुण्याची निवळी- लाइम वॉटर व अमरकंद वनस्पतीचा काढा घ्यावा लागतो. तरच गंडमाळा नि:शेष बऱ्या होतात.
अलीकडे भारतीय जनतेत विशेषत: स्त्रियांमध्ये थॉयरॉइड ग्रंथींचे विकार खूपच वाढत्या संख्येने आहेत. थॉयरॉइडचा त्रास असणाऱ्या विकारात वर सांगितलेल्या गंडमाळा किंवा टी. बी. ग्लॅण्डसारखा कांचनसालीचा उत्तम उपयोग होतो. कांचनसालीचा काढा व त्या काढय़ाबरोबर सुंठ चूर्ण व सोबत रक्तवर्धक बल्य औषधे इतर लक्षणारूप दिल्यास थॉयरॉइडच्या गोळ्यांची गरज पडत नाही. थॉयरॉइडच्या ग्रंथींमध्ये जखमा झाल्या असल्यास कांचनसालीचा काढा तांदळाचे धुवन व सुंठ चूर्ण अशा मिश्रणाने त्या जखमा धुवाव्या. कांचन सालीच्या काढय़ाबरोबर डाळिंबाचा रस द्यावा. अशा उपचारामुळे थॉयरॉइडच्या जखमा, रक्ती मूळव्याध, रक्तप्रदर अशा विकारांत उपयोग होतो. कांचन फुलांच्या कळ्यांचा उपयोग लहान वयातील मुलींच्या अत्यार्तव विकारात तसेच जुलाब, कृमी, संडासचा ताबा नसणे, रक्ती मूळव्याध या विकारांत होतो.
आधुनिक मतानुसार कांचनसालीमध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त आहे. तसेच त्यात ग्लुकोज व एक करडय़ा रंगाचा डिंक असतो. आधुनिक मतानुसार कांचनाचे मूळ कार्मिनेटिव्ह Carminative म्हणजे पोटातील वायू कमी करून भूक उत्पन्न करणारे आहे. फूल अनुलोमिक गुणाचे असून, कोष्टमृदुकर Laxative आहे. काही विदेशी औषधांमध्ये कांचनाच्या सालीचा उपयोग इमलशन बाह्य़ोपचारार्थ पेस्ट व गुळण्या करण्याकरिता (Gargale) म्हणून केला जातो.
युनानी मतानुसार, कांचन शीत, रूक्ष तसेच समशीतोष्ण मानला जातो. युनानी चिकित्सक स्त्रियांच्या अत्यार्तव व अतिसार विकारातील, तसेच पोटातील कृमी, खूनखराबी अशा अवस्थेत वापरतात. युनानी वैद्यकात कांचनाची साल बडीशोप चूर्णाबरोबर व तांदळाच्या धवनाबरोबर घेतल्यास काही काळात गंडमाळा कमी होतात. कांचनाच्या सालीच्या चूर्णाचे पोटीस भगंदर किंवा अन्य प्रकारच्या वळ फोडामध्ये उत्तम गुण देते.
आयुर्वेदशास्त्रात सुवर्णाचे गुण सांगताना त्यांनी खासकरून आयुष्यवर्धन याला महत्त्व दिले आहे. त्याचबरोबर सुवर्णाच्या सुयोग्य वापराने समस्त मनुष्यमात्राची कान्ती, बुद्धी, स्मरणशक्ती सुधारते. शारीरिक व मानसिक व्याधी सुवर्णाच्या वापराने बऱ्या होतात. सुवर्णभस्मयुक्त औषधांच्या योजनेमुळे उन्माद, अपस्मार, भूतबाधा अशा मानसिक विकारांत निश्चयाने आराम मिळतो. समस्त प्राणिमात्राला कमी-जास्त कामेच्छा असतेच. अशा कामेच्छांपासून मिळणारा आनंद वाढविणे, शरीराला सुख देणे व त्याचबरोबर शरीर पुष्ट करण्याचे काम सुवर्ण अग्रक्रमाने करत असते. मानवी शरीरात वेगवेगळ्या कारणांनी विविध प्रकारची विषबाधा होत असते. अशा विषबाधा समस्या दूर करण्याकरिता सुवर्णभस्मयुक्त औषधांचा निश्चयाने उपयोग होतो. योग्य तऱ्हेने सुवर्णभस्म बनविले गेले व ते ग्रंथोक्त पद्धतीने वापरले गेले तर संबंधित रुग्णामध्ये उत्तम रुची उत्पन्न करते, पाचक अग्नीचे बल वाढविते.
सुवर्णाच्या सुयोग्य वापराने कान्ती, बुद्धी, स्मरणशक्ती सुधारते. शारीरिक व मानसिक व्याधी बऱ्या होतात. सुवर्णभस्मयुक्त औषधांच्या योजनेमुळे उन्माद, अपस्मार, भूतबाधा अशा मानसिक विकारांत निश्चयाने आराम मिळतो.
उत्तम प्रतीचे सुवर्णभस्म करण्याकरिता ते प्रथम पूर्णपणे शुद्ध-प्युअर आहे, हे बघितले जाते. सामान्यपणे शुद्ध सुवर्णाचे अतिशय पातळ पत्रे किंवा अति बारीक तार घेऊन ती अग्नीवर तापवून तेल, ताक, कांजी, गोमूत्र व कुळथाचा काढा अशांमध्ये शुद्धी केली जाते. अशा शुद्ध केलेल्या सुवर्णाकरिता त्यानंतर विशेष शुद्धीकरिता कांचनवृक्षाच्या पानांच्या रसाची मदत घेतली जाते. आधुनिक धातूशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मताप्रमाणे पारद, सुवर्ण, रौप्य, प्लॅटिनम यांचे भस्म एक तर बनत नाही वा बनले तर उष्णता मिळताच मूलद्रव्यात परिवर्तित होते. आज किमान काहीशे वर्षे भारतात व अनेक अतिपूर्व देशांमध्ये सुवर्णभस्माची निर्मिती व सुयोग्य वापर होत आहे. मूल्यवान धातूंचे कण जितक्या लहान आकारात राहतात तेवढी त्यांची कॅटॅलिटिक अ‍ॅक्टिव्हिटी (catalytic activity) वाढते व स्वाभाविकच अशा धातूंच्या भस्मांच्या व त्यांच्या संयुगांच्या वापराने शरीराला किटाणू/ विषाणूनाशक प्रचंड शक्ती मिळते. उत्तम दर्जाचे सुवर्णभस्म बनविण्याकरिता, सुवर्णाच्या वजनाइतके शुद्ध हिंगुळ, शुद्ध गंध, शुद्ध मनशीळ व सुवर्णमाक्षिक भस्म घेतले जाते. त्यानंतर कोरफडीच्या रसामध्ये खल करून अनेक अग्निपूट देऊन अपुनर्भव वारितर, सूक्ष्म, निर्धूम भस्म बनविले जाते. ते निश्चंद्रच म्हणजे चंद्रिकाविरहित असावयास हवे. सुयोग्य पद्धतीने केलेले सुवर्णभस्म सामान्यपणे लालसर रंगाचे असते. सुवर्ण हा मूळ धातू निरिंद्रिय असतो. भस्म प्रक्रियेत त्याला कोरफडीच्या रसामुळे सेंद्रियत्व प्राप्त होते.
आयुर्वेदाच्या दृष्टीतून दागिने...
सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते.
अंगठी
हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदेशीर ठरते. कफ, दमा किंवा शरीराला कंप येणे याबाबतीत तांब्याची अंगठी बोटात घालणे उपयुक्त ठरते, असे आयुर्वेद सांगते.
रत्नहार, मोत्यांचा कंठा, नेकलेस
हे परिधान केल्याने गळ्याच्या विशिष्ट भागांवर दाब पडतो आणि त्यामुळे डोळ्यांतील तेज पुष्कळ वेळ टिकून राहते. गलगंड व मानेखालची हाडे यांच्यावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांचा प्रभाव कमी होतो. गळ्याच्या सर्व संभाव्य रोगांवर ही आभूषणे घालणे फायदेशीर मानले जाते.
कमरपट्टा
कमरेला कमरपट्टा घालणाऱ्या महिलांची पचनशक्ती वाढते व मासिक पाळी योग्यप्रकारे होते. त्यांना कंबर दुखणे, पाठदुखी वगैरे तक्रारींना तोंड द्यावे लागत नाही, असे मानले जाते. 
पायातील व बोटातील कडय़ा
या घातल्यामुळे टाचा दुखणे, घोटे व पाठीच्या खालच्या भागात वेदना होत नाहीत. रक्तप्रवाह उत्तम प्रकारे चालू राहतो. तसेच महिलांना हिस्टेरिया, श्वास यांचा त्रास जाणवत नाही, असे मानले जाते.
बाजूबंद
हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा यादरम्यान घालतात. हा फक्त हृदयाचीच कार्यक्षमता वाढवत नाही तर खांदा व हात यांना जो वेदनांचा त्रास होतो, त्यापासून सुटका करतो. बाजूबंद घालणारी स्त्री संयमी बनते, असे मानतात.
नथ
नथ घालण्याची प्रथा आजकाल कमी होत चालली आहे. पण नथ घालण्याने कफाच्या व नाकाच्या रोगांपासून बचाव होतो, असे मानले जाते.
कर्णफुले किंवा भिकबाळी
कानात एकूण शरीराशी संबंधित असे जवळपास ८० केंद्रबिंदू आहेत. कानात कर्णफुले किंवा भिकबाळी घातली तर हे सर्व बिंदू प्रभावित होतात आणि विविध रोगांवर नियंत्रण ठेवले जाते. यामुळे फेपरे येणे, टॉन्सिल, हार्निया या व्याधींपासून सुटका मिळते, असे मानले जाते.
माथ्यावरील टिक्का
कपाळावरील टिक्क्यामुळे संवेदनशक्ती स्नायूंच्या एकूण तंत्रावर नियंत्रण ठेवते, असे मानले जाते.
बांगडय़ा
स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडय़ांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यांवर या बांगडय़ांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असे मानले जाते.
बिंदी
बिंदी मेंदूला थंडावा देते. महिलांच्या भांगात भरला जाणारा सिंदूर हा लाल अ‍ॅक्साइडयुक्त असतो. दोन्ही भुवयांत लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असे मानतात.
जोडवी
पायांत जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत, असे मानले जाते.
- गजानन भुर्के

(देवज्ञश्री- दिवाळी २००४ मधून साभार)

सामान्यपणे जुनेजाणते वैद्य लोक सुवर्णभस्माचा एकेरी वापर करत नाहीत. सुवर्णभस्म हे एक घटकद्रव्य असलेले अनेक औषधी प्रयोगयोग्य अनुपानाबरोबर व पथ्यपाणी पाळल्यास निश्चयाने ग्रंथोक्त गुण देतात. बृहत्वातचिंतामणीरस, सुवर्णसूतशेखर, सुवर्णमालिनीवसंत, वसंतकुसुमाकर, सुवर्णपर्पटी असे सुवर्णभस्मयुक्त औषधांचे अनेक प्रकार विविध वैद्यांच्या वापरात आहेत.
आयुर्वेद शास्त्रकारांनी सुवर्णाच्या विविध पर्यायी नावांवरून बोध घेऊन सुवर्णभस्म वापराचे मोठे अमोल भांडारच आपल्याकरिता खुले केले आहे. सुवर्ण, कनक, हिरण्य, हेम, हाटक, तपनीय, शातखुम्भ, गाङ्गेय, महारजत, लोहोत्तम, लोहोवर, स्पर्शमणिप्रभव इत्यादी पर्यायी नावे असणाऱ्या सुवर्णाला सहस्र प्रणाम!





















वैद्य प. य. खडीवाले
response.lokprabha@expressindia.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल