ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे? फ्रान्सचा राजा तिसऱ्या नेपोलियनची ही गोष्ट आहे. त्याने शाही जेवण दिलं की तो त्याच्या खास पाहुण्यांना अॅल्युमिनियमच्या भांडय़ात जेवण द्यायचा आणि जी सामान्य माणसं असत, ती सोन्याच्या ताटात जेवत. त्याचं कारण? तो वेडा होता? मुळीच नाही. लहरी? नाही हो नाही. मग खास पाहुण्यांना अॅल्युमिनियम आणि सामान्यांना सोनं? कारण त्या काळात अॅल्युमिनियम सोन्यापेक्षा महाग होतं. अॅल्युमिनियम खाणीतून काढणे त्यावेळी प्रचंड महाग होतं. सोन्याने धातूंमधलं शहेनशहापद सोडल्याचा तो एकुलता एक काळ असेल. एरवी सोनं हा नेहमीच धातूंचा राजा ठरलाय. सोनं हे नेहमीच इतिहासपूर्व काळापासून आहे आणि देवाचं अस्तित्व जसं जगातल्या प्रत्येक देशात आणि धर्मात आहे तसंच सोन्याचं आहे. जगातल्या सर्व जुन्या संस्कृतीत सोनं सापडतं. लहानपणी पाठय़पुस्तकातलं, ‘भारतातून सोन्याचा धूर निघायचा’ हे वाक्य मला तोंडपाठ होतं. पण ती परिस्थिती आता दहा ग्रॅम सोनं घेताना, आता पैशाचा धूर निघतो, इतपत बदलली आहे. त्याकाळी जी भारतात परिस्थिती होती तीच इजिप्तमध्ये असावी. कारण इ.स.पूर्व २६०० साली इजिप्तमध्ये एक राजा होता. त्याचं नाव होतं तुश्रत. तो म्हणायचा, ‘‘माझ्या राज्यात सोनं घाणीपेक्षा जास्त आहे.’’ जवळपास बत्तीस हजार रुपये मोजून जेमतेम दहा ग्रॅम सोनं घेणाऱ्या माझ्या मित्रांनो हा किस्साही ऐकाच. आफ्रिकेत माली साम्राज्य होतं. त्यांचा राजा होता मानसामुसा. त्याचा काळ इ.स. १३१२ ते १३३७ वगैरे! तो सोनं फक्त जेवत नसावा, एरवी सोन्यात लोळायचा. तो १३२४ साली हज यात्रेसाठी मक्केला जायला निघाला. त्याच्या काफिल्यात शेकडो उंट आणि हजारो माणसं होती. १३२४ च्या जुलैमध्ये त्याचा काफिला कैरोला पोहचला. कैरोत त्याने इतकं सोनं वाटलं की इजिप्तमध्ये पुढच्या दहा वर्षांसाठी सोन्याचे भाव कमी झाले. एका अरब इतिहासकाराने लिहून ठेवलंय. ‘‘तो राजा कैरोत येईपर्यंत इजिप्तमध्ये सोन्याचे भाव जास्त होते. २५ दिरहॅमच्याखाली ते कधी आलेच नाहीत. तो राजा आला. त्याने सोनं वाटलं आणि तिथपासून आजपर्यंत सोन्याचे भाव २२ दिरहॅमच्या वर कधी गेलेच नाहीत. आज बारा वर्षे झाली त्या गोष्टीला! म्हणजे किती सोनं वाटलं असेल याचा विचार करा.’’ विद्यार्थिदशेत असताना माझा आणि सोन्याचा संबंध रसायनशास्त्रात आला. आता मी रसायनशास्त्र जवळजवळ विसरलोय. त्यातल्या तीन-चार गोष्टी लक्षात आहेत, त्यात आहे, एक म्हणजे ‘मिथाईल अल्कोहोल’ ही गोष्ट. सर्वात सुंदर मुलीच्या प्रेमात पडलेला माणूस तिला आयुष्यात विसरत नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात राहिली, ती म्हणजे सोनं हे अॅक्वाहेजियामध्ये विरघळतं. कदाचित आपण आयुष्यभर सोनं विसरत नाही. त्यामुळे असेल, ही गोष्ट मी अजिबात विसरलो नाही. अॅक्वाहेजिया म्हणजे नायट्रो-हाड्रॉक्लोरिक अॅसिड! नाही.. उगाच माझ्या स्मरणशक्तीला दाद देऊ नका. हे माझ्या लक्षात नव्हतं. ते केमिस्ट्रीत करिअर करणाऱ्या माझ्या चिरंजीवाने मला सांगितलं. खरं तर आठवण करून दिली आणि त्याचबरोबर एक गोष्ट मला कळली की ‘अॅसिड टेस्ट’ (Acid Test) हा शब्द कुठून आला? मी किती वेळा तरी त्या शब्दांचा उपयोग केलाय. सोनं कुठल्याही वैयक्तिक अॅसिडमध्ये विरघळत नाही. उदा. चांदी नायट्रिक अॅसिडमध्ये विरघळते किंवा इतर मूलभूत धातू विरघळतात. त्याप्रमाणे सोनं विरघळत नाही. त्यामुळे सोन्याची कसोटी अॅसिडने घेता येते. म्हणून ‘अॅसिड टेस्ट’ हा शब्द आला. फक्त अॅसिड टेस्टच नाही, सोन्याने आपल्या भाषेच्या शब्दभांडारात खूप भर टाकलीय. राज्य, पराक्रम, ताकद, श्रीमंती, प्रेम, आशा, आनंद, बुद्धिमत्ता, न्याय, समतोल, अचूकता वगैरे सर्व गोष्टींसाठी सोन्याचा उपयोग केला जातो. त्याची सुरुवात लहानपणापासून होते. आई आपल्याला ‘सोन्या’ अशी हाक मारते. गुणवत्तेप्रमाणे आईने मला, ए तांब्या किंवा ए पितळ्या म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण आईचं हृदय वेगळं असतं आणि पुढे मी लेखक झाल्यावर शब्दातून सोनं मी प्रचंडउधळलं. लेखक, त्यात पुन्हा मराठी लेखक त्यापेक्षा जास्त काय करू शकतो? हिरा कदाचित सोन्यापेक्षा जास्त महागडा असेल, पण कुठल्याही भावनेतला सर्वोच्च आविष्कार व्यक्त करायला सोनं हाच शब्द वापरला जातो. उदा. १९५० ते १९६० हे हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णयुग होतं असं आपण म्हणतो. हीरकयुग वगैरे नाही. हिऱ्याची उपमा द्यायची असेल तर थेट कोहिनूर हिऱ्याची देतो. कारण कोहिनूर हिरा आपल्याकडे होता, म्हणून कोहिनूर आपल्याला सर्वश्रेष्ठ वाटतो (आणि तसं काही नाहीय) अजून एक गोष्ट म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे, असं किती वेळा आपण म्हणत असतो? (मी बायकोबद्दल आणि बायकोने माझ्याबद्दल असं म्हणावं अशी दोघांची अपेक्षा असते. पण दोघांनाही खोटं बोलायची सवय नसल्यामुळे आम्ही बोलत नाही.) सोनेरी क्षण, सोनियाचा दिवस, सुवर्णमध्य वगैरे शब्दप्रयोग आपल्या नेहमीच्या बोलण्यात आपण वारंवार करतो. कारण पिढय़ान्पिढय़ा हे शब्दप्रयोग आपल्या जिभेवर ठाण मांडून आहेत. सोन्याचा आपला सोस हा असा आहे. आणि प्रत्यक्ष सोन्यापेक्षा सोनेरी शब्द नेहमीच परवडतात.
सोनं वाढलं तरी आपली दागिन्यांची हौस कमी होत नाही. भारताची लोकसंख्या जास्त म्हणून वापर जास्त! हे अर्थसत्य आहे. चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त. तरीही २०१० साली त्यांनी फक्त ४२८ टन सोनं वापरलं.
मी लहानपणापासून फारसं सोनं कधी अंगावर घातलेलं नाही. परवडलं नाही, हे एक कारण आणि अतिदागिन्यांचा सोस मला नाही. लहानपणी इतर मुलं सोन्याची अंगठी घालत तेव्हा मीसुद्धा सतत अंगठी घालावी असं मला वाटे. माझ्या आईने माझ्यासाठी केलेली छोटी अंगठी होती. लग्नकार्यात ती अंगठी आई माझ्या बोटात घालायची. मग काढून ठेवायची. माझा एक मित्र सतत सोन्याची अंगठी घालायचा. मी आईकडे हट्ट धरला की ती कठोरपणे नाही म्हणायची. मी एकदा आईला म्हटलं, ‘‘सोन्याची अंगठी खूप महाग असते. मी ती हरवेन म्हणून तू मला घालायला देत नाहीस ना?’’ आई म्हणाली, ‘‘नाही रे सोन्या, मला अंगठीची किंमत नाहीए. ती अंगठी चोरण्यासाठी कुणी तुझं बोट कापू नये एवढीच माझी चिंता आहे.’’ सानेगुरुजींचं ‘श्यामची आई’ वाचण्याचे ते दिवस होते. आपली आईही ‘‘बाळ तुला लागलं तर नाही ना?’’ म्हणणाऱ्या साने गुरुजींच्या आईएवढीच हळवी आहे असं मला वाटलं. माझ्या नावाची अक्षरं कोरलेली एक गळ्यातली माळ आणि मनात असलेलं एक ब्रेसलेट सोडलं, तर आणखीन कुठलाही सोन्याचा दागिना मला शरीरावर नकोसा असतो. अगदी अंगठीसुद्धा. पण आपल्या देशात सोन्याचा दागिन्यासाठी उपयोग जेवढा होतो तेवढा कुठेच होत नाही. सर्वसाधारणपणे जे नवीन सोनं तयार होतं त्यातलं ५० टक्के सोनं दागिन्यांसाठी वापरलं जातं. ४० टक्के विविध बचतीसाठी आणि १० टक्के इंडस्ट्रीमध्ये! आणि त्या दागिन्यांपैकी सर्वाधिक भारतात वापरले जातात. २००९ साली दागिन्यांसाठी ४४२.३७ टन सोनं वापरलं गेलं. तर २०१० साली दागिन्यांसाठी वापरलेलं सोनं ७४५.७० टन झालं. म्हणजे थेट ६९ टक्क्यांची वाढ आणि त्याच वेळी सोन्याचे भाव किती वाढले विचार करा. थोडक्यात सोनं वाढलं तरी आपली दागिन्यांची हौस कमी होत नाही. तुम्ही म्हणाल, भारताची लोकसंख्या जास्त म्हणून वापर जास्त! हे अर्थसत्य आहे. चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त. त्यांची संस्कृतीसुद्धा पौर्वात्य! तरीही २०१० साली त्यांनी फक्त ४२८ टन सोनं वापरलं. चीनला आपण कशात तरी मागे टाकलंय, याचा मला आनंद झाला. आजपर्यंत जगात (२००९ पर्यंत) १,६५,००० टन सोनं खाणीतून बाहेर काढण्यात आलं. ते घनमीटरमध्ये साधारण ८५०० घनमीटर बसतं. थोडक्यात या सोन्याचा २०.४ मीटर लांबी-रुंदी-उंचीचा एक क्युब तयार करता आला असता. गंमत अशी आहे की पूर्वी सोन्याचा धूर निघत होता किंवा इजिप्तमध्ये सोनं घाणीपेक्षा मुबलक होतं वगैरे म्हटलं जायचं तरी आजपर्यंत ७५ टक्के सोनं हे १९१० नंतर खाणीतून बाहेर काढण्यात आलं. म्हणजे साधारण ८००० घनमीटरचं सोनं. त्याचं कारण असं आहे की आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोनं काढणं जास्त सोपं झालं. मी दगडातलं सोनं पाहिलंय. होय, मी सोन्याची खाण पाहून आलोय. जोहान्सबर्गच्या गोल्डरिफ सिटीमध्ये! जोहान्सबर्ग हे अख्खं शहर ही सोन्याची खाण होती. जगाला जितकं सोनं आजपर्यंत मिळालं, त्यातलं पन्नास टक्के सोनं दक्षिण आफ्रिकेतून मिळालं. १९७० साली, जेवढं सोनं जगात काढण्यात आलं, त्यातलं ७९ टक्के दक्षिण आफ्रिकेतून आलं. म्हणजे याला सिंहाचा वाटा किंवा ‘सोन्याचा’ वाटा म्हणायला हरकत नाही. २००७ साली फक्त दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त सोनं चीनमधून निघालं. २७६ टन सोनं! सोनं काढण्याच्या बाबतीत कुणीतरी दक्षिण आफ्रिकेला मागे टाकण्याचा प्रसंग १९०५ नंतर पहिल्यांदा आला. पुन्हा २००८ साली दक्षिण आफ्रिकेतून २२६० टन सोनं काढण्यात आलं. तर अशा दक्षिण आफ्रिकेतली एक खाण मी पाहिली. देवाने अरबस्तानातल्या अरबांना ‘तेल’ नावाचं काळं सोनं दिलं आणि दक्षिण आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांना पिवळं सोनं, पण या दोघांनाही, त्यांना देवाने दिलेल्या नैवेद्याची माहिती नव्हती. देवाने गोऱ्यांना फक्त बर्फ दिला. पण त्याचबरोबर दूरदृष्टी दिली. त्यांनी तेल शोधलं. त्यांनी सोनं उपसलं. अरब श्रीमंत तरी झाले. कृष्णवर्णीयांनी फक्त कष्ट उपसले. सोन्यासाठी गोरे दक्षिण आफ्रिकेत एकमेकाशी भांडले. ब्रिटिश आणि बोअर्समध्ये युद्ध झालं. सोन्याची खाण पाहण्यासाठी मी दोनशे फूट जमिनीच्या पोटात गेलो. तिथे तो सोनं सापडणारा दगड पाहिला. एक टन दगडातून फक्त एक पौंड किमतीचं (त्यावेळचा एक पौंड) सोनं निघायचं. पण तिथे जाऊन आल्यावर मला अजि म्या ब्रह्म पाहिले असं वाटलं नाही. मी शंभर र्वष मागे जाऊन विचार केला. त्यावेळी आजचं आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं. किती काळे मजूर आत तडफडले असतील. प्राणवायू कमी आणि प्रचंड दगड तोडून वाहायचे. माणूस दमला की चाबकाचे फटके खायचे. खाणकामगारांना मायनर्स रोग व्हायचा. त्यातून वाचणं ही दैवीकृपा असायची. दगडातलं सोनं त्या कृष्णवर्णीय मजुरांसारखं असतं. हेच पुढे चमकतं यावर विश्वास बसत नाही. तेव्हा कळलं की जे चमकत नाही, ते सोनं नसतंच असं नाही. सामान्य डोळ्यांना कुठला साधा दगड आणि कुठला पोटी सोनं असलेला गर्भार दगड ते कळत नाही. त्या खाणीतून बाहेर आल्यावर आम्हाला त्या दगडातून सोनं कसं मिळवतात ते प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. कित्येक टन दगडांतून एक वीट तयार होते. प्रात्यक्षिकानंतर तिथला गाईड म्हणाला, ‘ही वीट एका हाताने उचलता येत असेल, तर उचलून घेऊन जा.’ ती वीट सरकवणंही कठीण होतं. मी प्रयत्न सोडला. माझ्या लक्षात आलं की आपल्यासाठी सोन्यासारखे शब्दभांडार हेच खरं सोनं आहे. पैशाच्या बाजारात नसेल त्याची किंमत. पण शाब्दिक अलंकार जर वाचकांना चार क्षण आनंद देत असतील तर माझ्यासारख्या लेखकांसाठी तेच खरं सोनं आहे. अगदी शंभर नंबरी सोनं!
द्वारकानाथ संझगिरी response.lokprabha@expressindia.com |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा