गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

ठाण्याचे ‘धर्मवीर’ आनंद दिघे कोण होते? ...

 

विश्लेषण : ठाण्याचे ‘धर्मवीर’ आनंद दिघे कोण होते? 

संपूर्ण महाराष्ट्रात ‘ठाण्याचे बाळासाहेब’ अशी खणखणीत ओळख निर्माण करणारे आनंद चिंतामणी दिघे यांचा अकाली मृत्यु आणि त्यानंतर ठाण्यात उसळलेला जनक्षोभाचा चित्तथरारक घटनाक्रम

anand dighe dharmveer Movie
‘धर्मवीर’ अशी ओळख मिळालेला तो शिवसैनिक म्हणजे आनंद चिंतामणी दिघे

– जयेश सामंत

‘आपण पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणतो. पण ठाणे त्याहून वेगळे आहे का?’ ज्येष्ठ उद्योगपती विजयपथ सिंघानिया यांच्या या प्रश्नाने दोन दशकांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमची माफी मागावी’ ही त्यांची पुढील मागणी. सिंघानिया हे ठाण्यातील सुनीतादेवी सिंघानिया रुग्णालयाचे मालक. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका शिवसैनिकाच्या मृत्यूमुळे बिथरलेले  हजारो शिवसैनिक या रुग्णालयावर चालून गेले आणि त्यांनी रुग्णालय पेटवून दिले. कारण हा शिवसैनिक साधासुधा नव्हता. ‘धर्मवीर’ अशी ओळख मिळालेला तो शिवसैनिक म्हणजे आनंद चिंतामणी दिघे. ही घटना राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती.

शिवसैनिक ते धर्मवीर…

उण्यापुऱ्या ४९ वर्षाच्या आयुष्यात शिवसैनिक ते धर्मवीर असा झंझावाती प्रवास करत संपूर्ण महाराष्ट्रात ‘ठाण्याचे बाळासाहेब’ अशी खणखणीत ओळख निर्माण करणारे आनंद चिंतामणी दिघे यांचा अकाली मृत्यु आणि त्यानंतर ठाण्यात उसळलेला जनक्षोभाचा चित्तथरारक घटनाक्रम ‘दिघे साहेब’ या नावात असलेल्या ताकदीची साक्ष देणारा. दिघेंचा जन्म २७ जानेवारी १९५२ चा. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात त्यांचे घर आणि पुढे वर्षानुवर्षे वास्तव्य राहिले. असे म्हटले जाते, की शिवसेनेचे स्वरूप दोन प्रकारचे राहिले आहे. एक मुंबईची शिवसेना, जेथे या पक्षाचा जन्म झाला आणि दुसरी ठाण्याची शिवसेना जेथे हा पक्ष वाढला. ठाण्याच्या शिवसेनेचे ‘बाळासाहेब’ अर्थातच आनंद दिघे. मुंबईच्या शिवसेनेसाठी शिवसेना भवन, ‘मातोश्री’ हे नेहमीच आदरस्थान राहिले. ठाण्यात शिवसेनेचे ‘मातोश्री – शिवसेना भवन’ म्हणजे टेंभी नाका आणि त्यातही आनंदाश्रम. 

दिघे यांची कार्यपद्धती कशी होती?

याच परिसरात दिघे यांचा रात्रंदिवस राबता असायचा. आनंदाश्रमात संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक आपल्या तक्रारी घेऊन यायचे. तक्रार कोणतीही असो साहेबांच्या आश्रमात ‘करतो-बघतो’ अशा गोष्टींना थारा नसायचा. पीए फोन उचलेल मग साहेबांची वेळ मिळेल असाही प्रकार नसायचा. कोणतेही प्रश्न घेऊन टेंभी नाक्यावर ठराविक वेळेत पोहोचा नि काम झालेच म्हणून समजा, अशी पक्की खात्री त्यावेळी असायची. अनेकदा सांगून काम होत नाही म्हटल्यावर आश्रमातच अनेकांच्या डोळ्यादेखत बड्या-बड्या अधिकाऱ्यांना दिघेंचा ‘प्रसाद’ मिळाल्याचे किस्से आहेत. 

खोपकर प्रकरण काय होते?

महापौर निवडणुकीत एका नगरसेवकाचे मत फुटल्याने शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यानंतर ठाण्यात शिवसेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांचा दिवसाढवळ्या खून झाला. या खुनाला महापौर निवडणुकीतील दगाफटक्याची किनार होती असे त्यावेळी जाहीरपणे बोलले गेले. या प्रकरणी दिघे यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यांना ‘टाडा’ कायद्याअंतर्गत अटकही झाली. खोपकर यांच्या हत्येनंतर शिवसेनेतील अंतर्गत राजकारणात दिघे यांच्या नावाचा दरारा वेगळ्या अर्थाने वाढला. ‘फुटाल तर खोपकर होईल’ अशी धमकीही त्यावेळी जाहीरपणे दिली जायची. कामाचा झंझावात, रात्रभर टेंभीनाक्यावर चालणारा जनता दरबार, पायाला भिंगरी लावून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उभारलेले शिवसेनेचे जाळे आणि कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार हे दिघेंच्या राजकारणाचे वैशिष्टय ठरले. मुंब्रा परिसरातील मंदिरांच्या ‘संरक्षणासाठी’ रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन, दहिसर-मोरी भागात उभ्या राहात असलेल्या बड्या मशिदीचे बांधकाम थांबविण्यासाठी घेतलेली सक्रिय भूमिका, ठाण्यातील भव्य नवरात्र, दहीहंडी उत्सवांचे आयोजन यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख ते धर्मवीर हा दिघेंचा प्रवास नेहमीच चर्चेत राहिला. दिघेंच्या घरी आई, बहीण, भाऊ असा परिवार होता. परंतु जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आल्यावर आनंदाश्रम हे त्यांचे घर बनले. ते अविवाहित राहिले. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची ही बाजू त्यांना ‘धर्मवीर’ बनवण्यात महत्त्वाची ठरली.

गारूड आजही कायम…

दिघेंच्या मृत्यूला २० वर्षे लोटली तरी या नावाचे गारूड आजही कायम आहे. राज्याचे विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे दिघे यांच्या मुशीतून तयार झालेले शिवसैनिक. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमागे शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. जानेवारी महिन्यात दिघे यांचा जयंती सोहळाही शिवसेनेने मोठ्या दणक्यात साजरा केला. दिघे यांनी वापरलेल्या वाहनाचे आधुनिकीकरण करत ते टेंभी नाक्यावर आणण्यात आले तेव्हा अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. यातही एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. ‘धर्मवीर’च्या निमित्ताने पुढील काही दिवस हा आनंदसोहळा ठाण्यात असाच रंगलेला पहायला मिळेल यात शंका नाही.





https://www.loksatta.com/explained/who-was-anand-dighe-his-journey-on-backdrop-of-movie-dharmaveer-mukkam-post-thane-print-exp-scsg-91-2901890/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल