रविवार, १० जानेवारी, २०२१

कुंडलीवरून करिअर ओळखता येते?...

 

कुंडलीवरून करिअर ओळखता येते?

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष विशारद आणि वास्तू विशारद)

पाटीवर "श्री" काढून,सरस्वती आणि गणेशाचे स्मरण करून आपल्या शिक्षणाची सुरवात होते.आणि त्यानंतर "ग म भ न" ची सुरवात होते बालवाडीत. आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षण म्हणजे नुसतेच पुस्तकी ज्ञान नसून तर तुमच्यावर झालेले संस्कार, तुमचे व्यवहारज्ञान, तुमची बोलण्याची पद्धत. ह्या सर्व गोष्टींवरून माणूस किती सुसंस्कृत आहे हे समजून येते. आपल्या भारतीय परंपरेनुसार मनुष्य आयुष्यभर विद्यार्थीदशेतच असतो. कारण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडून आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून आयुष्यभर त्याला काही ना काही शिकायला मिळत असते.

संस्कार आणि पुस्तकी शिक्षण ह्यांत खूप अंतर आहे आणि मधल्या काळात पुस्तकी शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जात होते. परंतु आमिरच्या "तारे जमींन परं" आणि "थ्री इडीयट्स" ह्या फिल्मसमुळे पालकांच्या मानसिकतेमध्ये फरक आलेला दिसून येत आहे. पालकांच्या आपल्या मुलांकडून आधीच्या काळात असलेल्या अपेक्षा आणि विशिष्ट शिक्षणासाठी असलेल्या आग्रहात फरक पडत आहे. आधी मुलाने डॉक्टर किंवा इंजिनीअरच व्हावे ह्या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या दिसून येतात. दुसऱ्याही क्षेत्रातही प्रगती साधता येते हे पालकांना समजून येत आहे. आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलाचा कल कुठले शिक्षण घेण्याकडे आहे ह्याबाबत पालक सजग होत आहेत. हल्ली दहावीच्या परीक्षेनंतर किंवा किंबहुना आधीच "Aptitude Test" घेतली जाते. मग मुलाचा कल, त्या टेस्टचा रिझल्ट आणि दहावीचा रिझल्ट ह्या गोष्टींचा एकत्रित विचार करून पुढच्या शिक्षणासाठी निर्णय घेतला जातो. हल्ली अजून एक पद्धत आली आहे - मुलाच्या अंगठ्यावर असलेल्या रेषेंवरून शास्त्रीय पद्धतीने मुलाचा कल आणि त्याची कुठल्या प्रकारच्या करिअरमध्ये प्रगती साधू शकले ह्या बाबतीत मार्गदर्शन केले जाते. आणि मग सुरू होते एका जीवाची ह्या जगात स्वतःचे अस्तित्त्व सिद्ध करण्याची घौडदौड.

ह्या सगळ्यामध्ये सजग झालेले पालक मुलांच्या पत्रिका घेऊन "करिअर मार्गदर्शनासाठी" ज्योतिषाकडे येतात. पत्रिकेवरून काय कळणार मुलांच्या करिअरच्या बाबतीत?? असा जर प्रश्न तुमच्या मनात उद्भवत असेल तर त्यांच्यासाठी:-

१) तुमची जन्मकुंडली म्हणजे तुमचा आरसा. तुमच्याबद्दलची सर्व माहिती सांगण्याची क्षमता कुंडलीमध्ये आहे.

२) जन्मकुंडलीत एकूण १२ स्थाने असतात. प्रत्येक स्थान तुमच्याबद्दल काही ना काही माहिती देत असते. लग्न स्थान किंवा प्रथम स्थानावरून तुमच्या स्वभावाची,तुमच्या "Physical Structure"ची कल्पना येते. द्वितिय स्थानावरून तुमच्या कुटुंबीयांची,सांपत्तिक स्थितीची कल्पना येते. चतुर्थ स्थान म्हणजे जन्मभूमी आणि जन्मदात्री आई. तुमच्या माते बद्दलची माहिती तर कळतेच परंतु तुमच्या स्थावर इस्टेट,रहाते घर कुठल्या प्रकारचे असू शकते,घराच्या आसपास काय असू शकेल ह्याबद्दलची माहिती देते. सप्तम स्थान जोडीदार,व्यवसायिक भागीदाराबद्दल माहिती देते.

३) ह्या सगळ्या स्थानांबरोबर कुंडलीमध्ये काही स्थाने असतात ज्यावरून तुम्ही कुठल्या प्रकारचे उत्पन्न घेणार हे लक्षात येते. ही स्थाने म्हणजे -द्वितीय,षष्ठ आणि दशम स्थान. दशम स्थान म्हणजेच "कर्म स्थान" तुमच्या करिअरची माहिती देते. ह्याला जोड असते षष्ठ स्थान,द्वितिय स्थान,लाभ म्हणजेच एकादश स्थानाची. तुम्ही कुठल्या स्वरूपाचे कर्म करणार आहात हे कर्म स्थानावरून समजून येते. षष्ठ स्थान तुम्ही नोकरीच करणार की व्यवसाय ह्याची हमी देते.

म्हणजे समजा तुमच्या कुंडलीत मंगळ हा अष्टम स्थानाशी संबंधित असेल तर व्यक्ती "Technical Education " घेणार हे नक्की असते. षष्ठ स्थानाचा सप्तम किंवा दशमाशी संबंध आल्यास व्यक्ती व्यवसाय करणार त्यामुळे शैक्षणिक गोष्टींबरोबरच त्याला व्यवसायात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टींबद्दलची माहिती आणि प्रशिक्षण घेणे जरुरी आहे हे लक्षात येते. त्यामुळे अशा कुंडलीला कुठल्या शाखेचे शिक्षण घ्यावे हे सांगता येते.

रवि ह्या ग्रहाचा व्यय आणि अष्टमाशी संबंधित असेल आणि दशा -अंतर्दशा पोषक असल्यास तर व्यक्तीचा कल "Medical"चे शिक्षण घेण्याकडे असतो. कारण व्यय स्थान म्हणजे हॉस्पिटल. अष्टम स्थान हे ऑपरेशनचे स्थान आहे. रविचा संबंध दशमाशी असला म्हणजे सरकारी नोकरी, राजकारणांत असलेला व्यक्तीचा कल आणि करिअर दर्शवते. रवि -मंगळाचा योग्य पोलीस क्षेत्रातील करिअर दर्शवते.

चंद्र हा मनाचा आणि जलतत्त्वाचा कारक आहे. त्यामुळे चंद्र प्रधान व्यक्ती मुळातच दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची क्षमता ठेवते. होमिओपॅथ डॉक्टर,मानशास्र्ज्ञ, नेव्ही इ. क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंच्या पत्रिकेत चंद्राची स्थिती आणि येणाऱ्या दशा पूरक असतील तर व्यक्ती ह्या क्षेत्रांमध्ये प्रगती साधतील.

बुधाचा दशम,द्वितीय स्थानाशी संबंध म्हणजे व्यक्ती "Jack of all but Master of none" ह्या उक्तीप्रमाणे असते. ह्या व्यक्तीकडे सगळ्या प्रकारची माहिती असते आणि ती माहिती कधी,कुठे,कशी वापरून आपला फायदा साधता येईल ह्याचा 'Common Sense'असतो. अशी व्यक्ती कमिशन बेस्ड व्यवसायाकडे आकृष्ट होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे असणारी वस्तू,इस्टेट विकून,एखादी अनमोल वस्तू दुसऱ्या गरजू व्यक्तीला विकून त्यातून मिळणारे कमिशन हेच त्यांचे उत्पन्न असते.

शुक्र म्हणजे साक्षात सौंदर्य. निसर्गातील सर्व सुंदर गोष्टी ओळखण्याचे कौशल्य हे शुक्रप्रधान व्यक्तींमध्ये असते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने,परफ्यूम्स, ब्युटी -पालर्स, रेस्टोरंट, हॉटेल मॅनेजमेंट,मोठाले रिसॉर्ट्स,सगळ्या प्रकारचे आर्टिस्ट जसे -गायक, नृत्य करणारे,फोटोग्राफर्स,शिल्पकार,पेंटर,चित्र रेखाटणारे,भल्या मोठ्या रांगोळ्या काढणारे शुक्राच्या अधिपत्याखाली येतात.त्यामुळे तुमच्या मुलांचा जर शुक्र कुंडलीत अत्यंत चांगल्या स्वरूपात असेल तर ह्या सर्व क्षेत्राचा विचार व्हावा.

गुरु म्हणजे ज्ञान. त्यामुळे गुरुचे पाठबळ करिअरच्या संदर्भात मिळते तिथे व्यक्ती जात्यातच दुसऱ्यांना "Counselling" देण्यात व्यस्त असतो. अशा व्यक्ती शिक्षण क्षेत्रात किंवा लोकांना प्रशिक्षण देण्यात मग्न असतात. अध्ययन आणि अध्यापन हा त्यांच्या जीवनाचा मंत्र असतो. त्यामुळे गुरु बलवान आणि दशा अंतर्दशांचा ह्यांची जोड असल्यास मुलाला तशाच गोष्टींच्या शिक्षणात रस असतो कारण ही व्यक्ती पुढे " Counsellor" होणार असते. गुरुचा संबंध फायनान्सशी (वित्त संस्था ) आहे. त्यामुळे गुरु आणि बुध ह्यांचा पत्रिकेतील होणारा योग आणि अर्थात दशेची जोड म्हणजे व्यक्ती "बँक" किंवा तत्सम वित्त संस्थेत कार्य करणार.

राहुचा संबंध दशमाशी,षष्ठाशी,द्वितीय स्थानाशी असणे म्हणजे व्यक्तीचा कल सिक्रेट्स ठेवण्याकडे असतो त्यामुळे शिक्षणही तशाच प्रकारचे देणे महत्त्वपूर्ण ठरते. राहू म्हणजे जे नाही ते दर्शविण्याचा प्रयत्न. आपल्याकडे टी.व्ही. वर प्रसारित होणाऱ्या सर्व मालिका आपण पहातो परंतु आपल्याला हे माहित असतं कि हे सर्व खोटे आहे फक्त आपल्या "Entertainment" साठी ह्या सर्व गोष्टी प्रसारित होत असतात. राहुशी संबंधित दुसरे क्षेत्र म्हणजे सगळ्या सिक्रेट यंत्रणा. डिटेक्टिव्ह असणाऱ्या व्यक्तींच्या कुंडलीत राहुचा संबंध दिसून येतो. अर्थात त्याला दशा-अंतर्दशेची जोड असावी. व्यक्तीला "Occult Science" मध्ये रस असू शकतो.

शनि हा मुळातच मंद गतीचा ग्रह. परंतु शनि सातत्य दाखवतो. शनिचा संबंध षष्ठ स्थानाशी असेल आणि बाकी गोष्टी पूरक असतील तर व्यक्ती "म्युनिसिपल" ऑफिसमध्ये काम करण्याची क्षमता ठेवते. शनि,सातत्य दर्शवत असल्याने व्यक्ती "Research" मध्ये जास्त रमते. शनिचा संबंध जमिनीतून मिळणारी खनिजे,सोने, तेल -पेट्रोल ह्याच्याशी आहे. त्यामुळे तुमच्या मुलांच्या कुंडलीत शनि संबंध करीअरशी येत असेल तर तुमचे मुलं ह्या क्षेत्रात करिअर करू शकते.

वरील सर्व ग्रह आणि मुलांचे शिक्षण/करिअरबद्दल मी थोडक्यात माहिती दिली आहे. त्याबरोबरीनेच दशा-अंतर्दशा यांचाही अभ्यास करून मुलाबद्दल अचूक भविष्य सांगता येऊ शकते. प्रत्येक मुलं हे वेगळे आहे. त्यामुळे प्रत्येक कुंडलीही वेगळी आहे. त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करून करिअरबद्दल मार्गदर्शन करता येते.

बऱ्याचदा असे दिसून आले आहे की मुलाची/मुलीची क्षमता नसतांना,त्यांचा त्या क्षेत्रात रस नसून सुद्धा पालक स्वतःच्या हट्टासाठी मुलांना डॉक्टर, इंजिनिअर, सी. ए., करण्यास भाग पडतात आणि त्याचा परिणाम म्हणजे मुले ते शिक्षण आत्मसात करू शकत नाहीतच परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते त्यांचा आत्मविश्वासही गमावून बसतात. ह्यामुळे मुळात उपजत असलेले गुणही ते गमावतात.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे म्हण आहे. मुलाचा पिंड काय आहे ? मुलाचा कल कुठे आहे हे मुलांच्या लहानपणीच लक्षात येते. परंतु हा कल पुढच्या आयुष्यासाठी फक्त आवड (Passion) म्हणून राहणार आहे ? की त्याची परिणीती करिअर मध्ये होणार आहे हे वेळीच समजून घ्या. त्यासाठी आजच्या करिअरच्या मागे धावणाऱ्या पालकांना गरज आहे तुमच्या मुलांना ओळखण्यासाठी वेळ देण्याची. तुमच्या मुलाचे उपजत गुण नुसते ओळखून फायदा नाही त्यांना तसे पूरक शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ह्यावरून "थ्री इडियट्स" मधील आमिरचा सवांद आठवतो - "काबील बनो. Success झक मारके पीछे आएगी " हा सवांद फक्त लक्षात न ठेवता तुमच्या मुलांच्याबाबतीत अंमलात आणा. कदाचित त्यामुळे तुमच्या मुलातल्या एक उत्तम व्यावसायिकाला,एक उत्तम कलाकाराला,एक उत्तम खेळाडूला त्याचे आयुष्य संपूर्णपणे जगण्याचा वाव देऊ शकाल. मगअशा व्यक्तीला त्याच्या क्षेत्रात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.




by - dailyhunt

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल