शैक्षणिक अभ्यास आणि वास्तुशास्त्र
मूल अभ्यास करत असेल तर अभ्यास कमी आणि खोडय़ा जास्त. लहान भावाची पेन्सिलच घेईल अन् त्याला रडायला लावेल.
झियाऊद्दीन सय्यद | December 25, 2015 02:23 am
आपल्या पाल्याला घराच्या चारही कोपऱ्यांत म्हणजेच १५ दिवस ईशान्येत, १५ दिवस आग्नेयेत, १५ दिवस नैर्ऋ त्येत आणि १५ दिवस वायव्येत अभ्यासाला बसवा आणि त्याच्या वागणुकीत, अभ्यासात, समज आणि स्मरणशक्तीत पडणारा फरक पाहा.
‘‘आम्ही आमचे घर बरेचसे वास्तुशास्त्राप्रमाणेच बनविले आहे सर. आम्ही ज्या आर्किटेक्टला इंटेरिअर करायला दिले होते त्यानेच तसे सांगितले. पण आमचे प्रश्न काही सुटत नाहीत.’’
मुंबईतला लोखंडवाला कॉम्प्लेक्समधला एक फ्लॅट. मी वास्तुपरीक्षणाला गेलेलो आणि हे महाशय सांगताहेत की घर वास्तुशास्त्राप्रमाणेच बनविले आहे. अशा वेळी ‘मग मला बोलाविण्याची वेळ का आली?’ असे प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये हा माझा माझ्यासाठीचा नियम म्हणून ते बचावले.
माझ्या परीक्षणातून सुटेल की काय या भीतीने ते प्रत्येक खोली, त्यातील मांडणी व केलेल्या सर्व सोयीसुविधा याबाबत विस्तृतपणे सांगत होते.
त्यांच्या बेडरूमपाशी आल्यावर –
‘‘ही आमची मास्टरबेड. शास्त्राप्रमणे नैर्ऋ त्येला..’’
बाकी त्या रूमबद्दल बरेच सांगून झाल्यावर शेवटी म्हणाले, ‘‘इथेच माझ्यासाठी त्याने एक स्टडी टेबल दिले आहे. तिथे दोन हाफ पॉइंटही लॅपटॉप, प्रिंटर यासाठी दिले आहेत..’’
मी त्यांना मध्येच थांबवत म्हणालो, ‘‘पण इथे अभ्यासच होत नसेल. सोय असून काय करायचे?’’
लगेचच त्यांनी दुजोरा दिला, ‘‘होय सर. इथे कधी माझा अभ्यास होतच नाही. कंटाळाच येतो.’’
केवळ ईशान्येस देवघर, आग्नेयेला स्वयंपाकघर आणि
नैर्ऋ त्येत मास्टर बेड- एवढे केले की झाले वास्तुशास्त्र! हा यांचा मोठ्ठा गैरसमज. वास्तुशास्त्रात ज्ञात असे सुमारे ४००-५०० ग्रंथ आहेत हे यांना माहीत नाही. त्यामुळे सांगणार तरी काय?
वास्तुऊर्जाचा नीट अभ्यास केला तर कोणत्याही प्रकारचा अभ्यास हा आपल्या वास्तूतील कोणत्या दिशेने बसून करावा याचे दिग्दर्शन मिळते. मी जाहीर व्याख्यानांतून सर्वाना एक आवाहन करीत असतो.
आपण आपल्या पाल्याला घराच्या चारही कोपऱ्यांत १५-१५ दिवस अभ्यासाला बसवा आणि त्याच्या वागणुकीत, अभ्यासात, समज आणि स्मरणशक्तीत काय काय फरक पडतो ते पाहा. १५ दिवस ईशान्येत, १५ दिवस अग्नेयेत, १५ दिवस नैर्ऋ त्येत आणि १५ दिवस वायव्येत असा प्रयोग करून पाहा. त्यातले त्यात सहावी-सातवीपर्यंतची मुले असतील तर फरक लक्षात घेण्यासारखा असेल. वय तेच, मूल तेच, शाळा तीच, टीचर तेच, घर, आई पुस्तके, वह्य…बाकीचे सगळे तसेच असताना घरातील केवळ कोपरा बदलल्याने पडणारा हा फरक आपण अनुभवू शकाल. परीक्षेच्या तोंडावर मात्र हे प्रयोग नको.
आग्नेयेत जर मूल अभ्यास करत असेल तर अभ्यास कमी आणि खोडय़ा जास्त. लहान भावाची पेन्सिलच घेईल अन् त्याला रडायला लावेल. बहिणीला वाकुल्या दाखवून मार खाईल. पण अभ्यास? बेताचाच.
नैर्ऋ त्येत अभ्यास करीत असेल तर आईला ते बाळ तासभरसुद्धा जागेवर बसलेले दिसेल. छानपैकी पुस्तकही डोळ्यासमोर धरलेले असेल. पण खूप वेळानंतर आईच्या लक्षात येईल की आपले बाळ अभ्यास करता करता ‘थकून’ झोपी गेले आहे. पण जसजशा काही सत्रपरीक्षा होतील तसे तसे तिला कळेल की ‘आपलं बाळ’ इतका वेळ अभ्यास करीत असूनसुद्धा मार्कस्च्या शर्यतीत मागे पडते आहे. त्याचे कारण तो जिथे अभ्यास करतो आहे ती खरी विश्रांतीची जागा. तिथे आळस येणे, पेंगणे हे सहजच घडत असते. त्यामुळे जास्त वेळ अभ्यास (केल्यासारखा) करूनही समजणे व लक्षात राहणे या गोष्टी तिथे होत नाहीत.
म्हणूनच जिथे जिथे नैर्ऋ त्येत शयनकक्ष असेल तर तिथेच अभ्यासाची सोय उपयुक्त ठरत नसते. त्याचा उपयोग होत नसतो. फर्निचर बनून जाते. पण अभ्यासाला बसण्यासाठी तिथे मन तयार होत नसते. आणि कालांतराने तिथला कॉम्प्युटर, पुस्तके, वह्य यावर भरपूर धूळ साठत असते.
ते मूल वायव्येत अभ्यास करीत असेल तर दर दोन मिनिटांनी ते महाशय दहा मिनिटांसाठी बाहेर खेळायला जात असेल. म्हणजे काय तर जरा दहा मिनिटेसुद्धा सलग अभ्यास करणार नाही. लहान मुल मुळात चंचल असतेच, इथे ते जास्त चंचल होते. परिणाम काय तर अभ्यास कमी.
या सगळ्यांपेक्षा ईशान्य दिशेत होणारा अभ्यास हा तो वेळ सत्कारणी लावणारा असतो. ईशान्य दिशा ही दोन शुभदशांचा संगम असलेली दिशा होय. तिथे देवघराची रचना याच कारणासाठी आहे. ही दिशा एरव्हीसुद्धा स्वच्छ, शुद्ध, पवित्र, मोकळी व आल्हाददायक वातावरण निर्माण करील अशी असावी. या ठिकाणी अभ्यास भले थोडा वेळ होईल, पण इथे मनाची एकाग्रता वाढते. बुद्धीची तल्लखता वाढते. अभ्यासातली समज वाढते. स्मरणशक्ती वाढते. लक्षात राहणारा अभ्यास हा हवा तेव्हा पुन्हा कागदावर उतरवता येतो.
संपूर्ण घराच्या ईशान्य भागात अभ्यासाला बसणे उत्तम असते. त्या भागात एखादी खिडकी असेल तर त्या खिडकीकडे तोंड करून बसावे. ईशान्येत अभ्यासाला बसल्यावर त्याने आपले तोंड कुणीकडे करावे हा प्रश्न त्या मानाने गौण ठरतो. या प्रभागात कोणत्याही दिशेकडे तोंड केले तरी चालते. त्यातल्या त्यात शक्य असेल तर, पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करणे जास्त हितावह असते.
हे जसे लहान मुलांबाबत सांगितले तसे माध्यमिक, महाविद्यालयीन किंवा मोठेपणीही आपण काही काही कोर्सेस करीत असतो तर त्यांच्याबाबत काय? असा प्रश्न आपणास पडेल. या सर्वानीसुद्धा वरील विवेचन लक्षात घ्यावे. लहान मुलांत पडणारा फरक लगेच लक्षात येतो म्हणून तसे लिहिले. बाकी अभ्यासखोलीसाठी सगळ्यांसाठी विवेचन तेच.
अजूनही यावर खूप सखोल विचार करता येईल. त्यासाठी वास्तुशास्त्रातले – मूळ ग्रंथातले- वास्तुपुरुष मंडल व त्यातील सर्व देवतांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. तो काहीसा तांत्रिक भाग व केवळ अभ्यासकांना समजणारा असल्याने येथे देणे योग्य ठरणार नाही.
मात्र भारतीय वास्तुशास्त्रातले मूळ व प्रमाण ग्रंथांचा अभ्यास असेल तर आयुष्यातील प्रत्येक वळणावर, अनेक बाबतीत त्याची मदत होते व आयुष्यात प्रगती, शांतता व समाधान मिळविता येते.
डॉ. धुंडिराज पाठक – response.lokprabha@expressindia.com
by - loksatta
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा