दादाजी खोब्रागडे : तिसरी शिकलेल्या शेतकरी संशोधकाचा शेवट हलाखीतच
"बाबाजींनी 9 वाण शोधून काढले पण आजही आम्हाला त्यांची पेटंट किंवा रॉयल्टी मिळत नाही. नुसत्या पुरस्कारानं पोट भरत नाही. शेवटच्या आजारपणातही हाताशी पैसे नव्हते. कुणाकडूनही आम्हाला मदत मिळाली नाही. अखेर बाबाजी आम्हाला सोडून निघून गेले. आमचा आधार गेला."
तांदळाच्या नवनव्या वाणाचा शोध लावणारे विदर्भातील कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचं नुकतंच निधन झालं. या धानसंशोधकाची जगभरात दखल घेतली गेली, पण तरीही शेवटपर्यंत आर्थिक विवंचना कायम राहिली. वेळेवर मदत मिळाली असती तर ते अजून जगले असते, असं त्यांचे कुटुंबीय सांगतात. दादाजींचा मुलगा मित्रजित खोब्रागडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलेल्या त्यांच्या बाबाजींच्या काही आठवणी आणि अनुभव.
खरंतर 2015 साली बाबाजी पहिल्यांदा आजारी पडले तेव्हाच मदत मिळाली असती तर बाबाजींचा आजार इतका वाढला नसता.
आजारपणातून ते बरे झालेसुद्धा, पण त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. शेतीतील संशोधनासाठी त्यांना शंभराहून अधिक पुरस्कार मिळाले. पण फक्त पुरस्कारांनी पोट भरत नाही, हे वास्तव आम्ही आयुष्यभर जगलो.
बाबाजींनी शेतीमध्ये एवढं मोठं योगदान दिलं, पण त्यांना नेहमीच सापत्न वागणूक मिळाली.
बाबाजींनी 9 वाण शोधून काढले पण आजही आम्हाला वाणांची पेटंट मिळालेली नाहीत की त्याची रॉयल्टी मिळत नाही.
त्यामुळे त्यांच्या शेवटच्या आजारपणातही हाताशी पैसे नव्हते. कुणाकडूनही आम्हाला मदत मिळाली नाही. अखेर बाबाजी आम्हाला सोडून निघून गेले. आमचा आधार गेला.
पांढरा शर्ट आणि धोतर, डोळ्यावर जाळ भिंगाचा चष्मा अशी दादाजींची साधी राहणी होती. बाहेरच्या जगासाठी ते दादाजी होते पण आम्ही घरात सर्वजण त्यांना बाबाजी म्हणूनच हाक मारायचो.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात आमचं घर आहे.
सकाळी पाच वाजता उठायचं. चहा रिचवायचा आणि खांद्यावर कापडी पिशवी अडकवून, हातात काठी घेऊन शेतावर जायचं. कित्येक वर्षं त्यांचा हा दिनक्रम होता.
कितीही थंडी, ऊन, पाऊस असो, बाबा शेतावर जात असत. लोकं म्हणायची, हा सतत शेताकडे का जात असतो?
पहाटे लवकर उठून बाबाजी शेतावर जायचे. दहा-अकरा वाजता परत येताना गावातील चहाच्या टपरीवर चहा घेत, लोकांशी गप्पा मारत, पेपर वाचत आणि मग घरी येत असत.
नेहमीचं काम कौशल्यानं, बुद्धीनं काम करणाऱ्या बाबाजींना तेव्हा गावातली माणसं 'डोकेवाले' म्हणायचे. नंतर 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाल्यानंतर लोकांनी त्यांना 'डोकेवाले' बोलणं बंद केलं. 'ग्रामीण संशोधक' म्हणून ते नावारूपाला आले.
ही गोष्ट 1983 सालची. तेव्हा बाबाजी शेतात 'पटेल 3' या धानाची लागवड करत. एका दिवशी बाबाजींना शेतात पिवळ्या रंगाची वेगळी लोंबी दिसली. त्याची पूर्ण भरणी व्हायची होती. बाबाजींनी बाकीचं धान काढलं आणि या लोंबीवर बारीक लक्ष ठेवलं.
पाखरं, गुरांनी खाऊ नये म्हणून बाजूने काठ्या वगैरे लावून धानाला संरक्षण दिलं. एक शेर धान त्यातून मिळालं. त्याची पुन्हा लागवड केली. मग एक पायली धान झालं. बाबाजी दरवर्षी हे नवीन धान लावत होते आणि उत्पादन वाढत होतं.
आपल्या वाणाला घड्याळाचं नाव कसं पडलं?
1989 साली त्यांनी माझ्या मामांना भीमराव शिंदेंना हे धान त्यांच्या शेतात लावण्यासाठी दिलं. तेव्हा 4 एकराला 90 पोते धान मिळालं. मामांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत हे नवीन धान विकायला नेलं. पण धानाला नावच नव्हतं.
ज्या व्यापाऱ्याने ते धान विकत घेतलं त्याने मनगटावरच्या 'एच.एम.टी.' (हिंदुस्तान मशिन टूल्स) घड्याळाचं नाव त्याला दिलं. आपल्या वाणाला 'एच.एम.टी.' हे नाव पडलंय याची बाबाजींना कल्पनाच नव्हती. नंतर सगळीकडे त्या धानाचा बोलबाला होऊ लागला, तेव्हा बाबाजींना कळलं.
त्यानंतर 1994 साली एके दिवशी या वाणाचं संशोधन कुणी केलंय याचा शोध घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. मोघे आणि चंद्रपूरच्या भात संशोधन केंद्राचे ना. न. देशमुख बाबांना शोधत गावात आले.
तेव्हा आम्ही एका साध्या झोपडीत राहत होतो. डॉ. मोघेंनी बाबाजींकडून सर्व माहिती घेतली. तुमच्या धानाला सर्वांपर्यंत पोहचवण्याचं काम मी करीन, असं बाबाजींना आश्वासनही दिलं.
पण दुर्दैवाने त्याच वर्षी डॉ. मोघेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यामुळे त्याचं योग्य क्रेडिट आणि मोबदला बाबाजींना मिळालाच नाही.
पण बाबाजींना त्याबद्दल कसलंच दु:ख नव्हतं. त्यांचे प्रयोग सुरूच होते. 'नांदेड हीरा' (1994), 'विजय नांदेड' (1996), 'दीपक रत्न' (1997), 'डीआरके' (1998) म्हणजेच 'दादाजी रामजी खोब्रागडे' (हा 'जय श्रीराम' या नावानेही ओळखला जातो), 'काटे एच.एम.टी.' (2002), 'डीआरके सुगंधी' (2003), 'नांदेड चेन्नूर' आणि 'नांदेड 92' हे वाण बाबाजींनी शोधून काढले.
नवीन धान काढलं की बाबाजी ते गावातल्या लोकांना वाटून टाकायचे. सुरुवातीला वाणांना काय नावं द्यायची याचं ज्ञान नव्हतं. नंतर त्यांनी नवीन वाणांना 'विजय', 'दीपक' या आपल्या नातवांची आणि गावाची नावं दिली.
लहानपणापासून मी बाबाजींसोबत शेतात जायचो. शेतातली सर्व कामं करायचो. बाबाजी आणि मी खूप गप्पा मारायचो. ते मला वाण कसा ओळखायचा, त्याचे निकष काय हे समजून सांगायचे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे मी 'डीआरके 2' हे वाण शोधून काढलं.
1996-97च्या आसपास माझी प्रकृती अचानक बिघडली. मला चालताच येत नव्हतं. बाबाजींनी उपचारासाठी अनेक ठिकाणी नेलं पण गुण येईना. वर्षभराच्या उपचारानंतर शेवटी आयुर्वेदिक औषधानं बरा झालो.
पण या काळात भरपूर पैसा खर्च झाला. जमीन गहाण ठेवावी लागली आणि नंतर तीसुद्धा हातातून गेली. बाबाजींनी त्याचं कधीच दु:ख केलं नाही. मला मुलगा महत्त्वाचा आहे, असं बाबाजी म्हणायचे.
त्यानंतर माझे सासरे श्रीरामजी वाघमारे यांनी बाबाजींना दीड एकर जमीन घेऊन दिली, त्यावर आम्ही पुन्हा शेती करू लागलो. शेती थोडी स्थिरस्थावर झाली पण 2004 साली आमची आई - राईबाई आम्हाला सोडून गेली.
अर्धांगिनी गेली त्याच्या दुसऱ्याच वर्षी बाबाजींना 2005 साली 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाला आणि बाबाजींचं नाव देशपातळीवर झालं. प्रत्येक सुख-दु:खात आपली साथ देणारी पत्नी यावेळेस आपल्यासोबत नाही याचं बाबाजींना प्रचंड दु:ख झालं.
बाबाजी तिसरीपर्यंत शिकले होते आणि मी सातवीपर्यंत. त्यामुळे सुरुवातीला पेटंट, रॉयल्टी याबाबत काहीच माहिती नव्हती. पण 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाल्यानंतर हळूहळू एकएक गोष्टी कळत गेल्या.
मग वाणाचं वर्णन, उत्पादन, कुणाला कोणतं धान दिलं, लोकांचे संपर्क क्रमांक अशा सर्व गोष्टींची मी डायरीत नोंद करून ठेवायला लागलो.
2010च्या डिसेंबर महिन्यात एक दिवस मी आणि बाबाजी शेतात काम करत होतो. तेव्हा मीडियावाले आम्हाला शोधत शेतावर आले. पाच राज्यात मिळून एकूण एक लाख एकरवर 'एच.एम.टी.'ची लागवड एव्हाना होत होती.
या वाणाचा लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होत होता. शिवाय इतर वाणांनाही हळूहळू प्रसिद्धी मिळत होती. याची दखल 'फोर्ब्स' या मासिकाने घेतली होती.
आम्ही तर कधी 'फोर्ब्स' हे नावसुद्धा ऐकलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं. पण "तुमचं काम आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलं गेलंय", असं सांगत मीडियावाले भरपूर मुलाखती घेऊन गेले. त्याची बातमी नंतर आम्हाला कुणीतरी इंटरनेटवर दाखवली, एवढंच.
एव्हाना बाबाजींना विविध राज्यांमधून बोलावणं येत होतं. तेव्हा मीसुद्धा बाबाजींसोबत दिल्ली, मुंबई, केरळ असा प्रवास केला. 2006साली महाराष्ट्र शासनातर्फे बाबाजींना कृषिभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. 25 हजार रुपये रोख आणि सोन्याचे पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पण आर्थिक विवंचनेमुळे तेच सुवर्णपदक विकण्याची वेळ आमच्यावर आली. नागपूरला सराफाकडे हे पदक घेऊन गेल्यानंतर ते पितळ्याचं असल्याचं स्पष्ट झालं. त्यावरून सरकारवर बरीच टीका-टिपण्णी झाल्यानंतर राज्य सरकारने ते पदक बदलून दिलं.
आजवर शेकडो पुरस्कार बाबाजींना मिळाले पण देशातील कोणत्याही कृषी विद्यापीठानं बाबाजींच्या संशोधनाकडे गांभीर्याने पाहिलं नसल्याची खंत वाटते.
आपलं कार्य असंच अविरत सुरू राहिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून माझ्या मुलाला आणि नातवांना 20 एकर शेतजमीन, 20 लाख रूपये अनुदान आणि राहण्यासाठी घर मिळावं, असं पत्र त्यांनी 2015 साली लोकप्रतिनिधींना लिहिलं होतं. पण आम्हाला त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
मे महिन्यात बाबाजींची प्रकृती जेव्हा अधिक खालावली तेव्हा डॉक्टरांनी, "तुम्ही आता फार आशा ठेवू नका", असं सांगितलं. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली.
बाबाजींना व्हेंटिलेटरवर ठेवावं असं वाटत होतं. पण त्याने फार उपयोग होणार नव्हता. अखेर बाबाजी गेलेच. 'कृषिप्रधान' म्हणवल्या जाणाऱ्या भारत देशात एका शेती संशोधकाची अज्ञातवासात अखेर झाली. यापेक्षा खेदजनक काय असू शकतं?
आता कुणी मदत करो अथवा न करो पण ज्या शेतात बाबाजींनी संशोधन केलं, तिथे आम्ही त्यांची समाधी बांधणार आहोत. शेती संशोधनाचं कार्य असंच पुढे सुरू ठेवणार आहोत. तीच बाबाजींना खरी श्रद्धांजली ठरेल.
(शब्दांकन - प्रशांत ननावरे)
by - https://www.bbc.com/marathi/india-44423452
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा