सोमवार, १६ जुलै, २०१८

सेंद्रिय शेतमालाकडे लोकांचा वाढता कल...


तळोधी येथील पोशेट्टीवार कुटुंबीय अनेक पिढय़ापासून शेती व्यवसायात आहे.


लाल तांदूळ, पार्वती सूत २७ तांदूळ आकर्षण
रासायनिक शेतमालचे दुष्परिणाम जसे मानवी शरीर, प्राण्यावर होऊ लागले तसेच शेतजमिनीवरही होऊ लागले असून यासंदर्भात जनमानसात मोठी जागृती होत असल्याचे पुन्हा एकदा निसर्ग महामेळाच्या निमित्ताने दिसून आले. धरमपेठेतील शुभ मंगल कार्यालयात आयोजित मेळ्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून तळोधी येथील लाल तांदुळ आकर्षण ठरत आहे.
त्रियनन माहेश्वरी महिला संघटनेच्यावतीने निसर्ग महामेळा २०१८ आयोजित करण्यात आला असून सेंद्रिय मिरची पाऊडर, फळ, डिंक, मद्य, कडधान्य पासून ते भारतीय जेवनातील प्रमुख घटक गहू आणि तांदुळ उपलब्ध आहेत. यातील प्रमुख आकर्षण ठरत आहे लाल तांदुळ.चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या नागभीड तालुक्यातील तळोधी येथील शेतकरी अण्णासाहेब पोशेट्टीवार यांनी हे वाण विकसित केले आहे. शिलाँग येथून बियाणे आणून तळोधी येथील त्यांनी प्रयोगातून ही वाण विकसित केले. या तांदळात झिंक, कॅलशियम, फायबर, व्हिटामिन-बी प्रमाण असल्याने औषधी गुण म्हणून देखील आता या तांदळाकडे बघितले जात आहे, असे असावरी पोशट्टीवार यांनी सांगितले.
तळोधी येथील पोशेट्टीवार कुटुंबीय अनेक पिढय़ापासून शेती व्यवसायात आहे. यासोबत त्यांचे राईस मिल देखील आहे. रासायनिक शेती करत असतानाच अचानक सेंद्रिय शेतीकडे कसे वळलो, यासंदर्भात अण्णासाहेब म्हणाले, साधारणत दहा-पंधरा वर्षांपूर्वी उत्पादन घटत असल्याचे लक्षात आले. यामुळे शेतीतील तज्ज्ञाचा सल्ला घेतला. त्यांनी रासायनिक खतांचा अतिवापर, औषधाचा वापर यामुळे जमिनीचा पोत घरसत चालल्याचे सांगितले. त्यातून मार्ग कसा काढता येईल, याच्या शोधातून सेंद्रिय शेतीचा पर्याय दिसला. रासायनिक खतांऐवजी शेनखत आणि गांडुळखत वापरू लागलो. सुरुवातीला काही काळ आम्ही सेंद्रिय आणि हायब्रीड आदी पिके घेतली. परंतु २००६ पासून  पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळलो. आज १८० एकर जमिनीत आम्ही केवळ सेंद्रिय पीक घेतो. रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळल्यावर प्रारंभी उत्पन्न कमी मिळाले, परंतु हळूहळू उत्पन्न वाढत गेले आणि आज प्रति एकर १८ ते २० क्विंटल उत्पन्न मिळते. रासायनिक शेती करत होतो. तेव्हा हेच उत्पन्न १२ ते १४  क्विंटर प्रतिएकर असे होते. सेंद्रिय शेती करण्यात मोठा प्रश्न होता. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर येथील डॉ. शरद पवार आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. आनंद मुकेवार यांनी मार्गदर्शनातून हा प्रश्न सुटला. पुढे काही एकर प्रयोग करत राहणे आणि नवीन वाण विकसित करणे हे सुरू झाले. आजमितीला सात वाण विकसित झाले असून  ‘पार्वती सूत २७’ या तांदळाची मोठी मागणी आहे, असे अण्णासाहेब म्हणाले.
एमएचटी वाण संपण्याच्या  मार्गावर
तळोधी जवळील नांदेड या  छोटसं गावातील दादाजी खोब्रागडे यांनी एचएमटी हे वाण विकसित केले. हे वाण आता लुप्त होऊ लागले आहे. याचे कारण या तांदळाची मागणी मंदावली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात त्याचे पीक घेणे बऱ्यापैकी बंद झाले आहे. अतिशय चांगले वाण असून देखील मागणी अभावी हे लुप्त होऊ लागले आहे, असे चंद्रपूर जिल्ह्य़ातील पळसगाव येथील शेतकरी गुलाबराव शेंडे म्हणाले.



by - Loksatta

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल