मंगळवार, २४ जुलै, २०१८

मिरची

मिरची

प्रस्‍तावना

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्‍वाद यामुळे मिरची हेक्‍टरी महत्‍वाचे मसाल्‍याचे पिक आहे. मिरचीचा औषधी उपयोग सुध्‍दा होतो.

हवामान

उष्‍ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्‍पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्‍हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. पावसाळात जास्‍त पाऊस व ढगाळ वातावरण असल्‍यास फूलांची गळ जास्‍त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्‍या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते. आणि उत्‍पादनही भरपूर येते. तापमानातील तफावतीमुळे फळे फुले गळ मोठया प्रमाणात होते. व उत्‍पन्‍नात घट येते. बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते.

जमीन

पाण्‍याचा उत्‍महिन्‍यातम निचरा होणा-या ते मध्‍यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्‍य प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्‍यास मिरचीचे पिक चांगले येते पाण्‍याचा योग्‍य निचरा न होणा-या जमिनीत मिरचीचे पिक घेऊ नये. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

हंगाम

खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्‍यात करावी.

वाण

पुसा ज्‍वाला : ही जात हिरव्‍या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात. फळे साधारणपणे 10 ते 12 सेमी लांब असून फळांवर आडव्‍या सुरकुत्‍या असतात. फळ वजनदार व खुप तिखट असते. पिकलेली फळे लाल रंगाची असतात.
पंत सी - १ : हिरव्‍या व लाल (वाळलेल्‍या ) मिरचीच्‍या उत्‍पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे उलटी असतात. मिरची पिकल्‍यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 8 ते 10 सेमी लांब असून साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकडया रोगास प्रतिकारक आहे.
संकेश्‍वरी 32 : या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्‍या असतात. वाळलेल्‍या मरचीचा रंग गर्द लाल असतो.
जी - 2, जी - 3, जी - 4, जी - 5 या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या चांगल्‍या जाती आहेत. फळाची लांबी 5 ते 8 सेमी असून फळांना रंग गर्द तांबडा असतो.
मुसाळवाडी - या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकडया, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.
पुसा सदाबहार - या जातीची झाडे उंच असून पाने इतर जातीपेक्षा रूंद असतात. पिकलेली मिरची तेजस्‍वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्‍या मिरचीचे सरासरी उत्‍पादन साडेसात ते दहा टन व वाळलेल्‍या मिरचीचे दीड ते दोन टन उत्‍पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्‍य रोगांना प्रतिकारक आहे.
या शिवाय विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणा-या जाती लागवडीयोग्‍य आहेत.

बियाणाचे प्रमाण

हेक्‍टरी 1 ते दीड किलो बियाणे वापरावे.

पूर्वमशागत

एप्रिल मे महिन्‍यात जमिन पुरेशी नांगरून वखरून तयार करावी. हेक्‍टरी 9 ते 10 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

लागवड

जिरायती पिकासाठी सपाट वाफयावर रोपे तयार करतात. तर बागायती पिकासाठी गादी वाफयावर रोपे तयार केले जातात. गादी वाफे तयार करण्‍यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. जमिनीत दर हेक्‍टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर 25 फूट लांब 4 फूट रूंद 10 सेमी उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्‍येक गादी वाफयावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.
बी पेरण्‍यासाठी 8 ते 10 सेमी अंतरावर वाफयाच्‍या रूंदीला समांतर ओळी हतयार करून त्‍यामध्‍ये 10 टक्‍के फोरेट दाणेदार 15 ग्रॅम दर वाफयाला टाकून मातीने झाकून घ्‍यावे. त्‍यानंतर या ओळीमध्‍ये दोन सेमी ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे. बियाण्‍यांची उगवण होईपर्यंत वाफयांना दररोज झारीने पाणी द्यावे. बी पेरल्‍यानंतर 30 ते 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.
उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी. रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोफॉस 36 टक्‍के प्रवाही अधिक 25 ग्रॅम डायथेनम 45 अधिक 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक 80 टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन

ेळेवर वरखते दिल्‍यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते. मिरचीच्‍या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी 50 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि ओलिताच्‍या पिकासाठी दर हेक्‍टरी 100 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. यापैकी स्‍फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावीत. नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्‍दतीने द्यावी.
मिरची बागायती पिकाला जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्‍त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्‍याचा ताण देऊन रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात 1 दिवसाआड पाणी दयावे. त्‍यानंतर 5 दिवसांच्‍या किंवा एक आठवडयाच्‍या अंतराने पाणी दयावे. साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने तर उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांच्‍या अंतराने पिकाला पाणी दयावे.

आंतरमशागत

मिरचीच्‍या रोपांच्‍या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्‍यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपण्‍या करून शेत तणविरहीत ठेवावे. खरीप मिरचीला लागवडी नंतर 2 ते 3 आठवडयांनी रोपांना माीची भर दयावी. बागायती पिकांच्‍या बाबतीत रोपांच्‍या लागवडीनंतर 2 महिन्‍यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्‍या ओळीच्‍या दोन्‍ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

रोग आणि किड

रोग

मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्‍तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्‍यामुळे रोप कोलमडते.
उपाय : 10 लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड 50 टक्‍के मिसळून हेक्‍टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.
फळे कुजणे आणि फांद्या वाळणे : ( फ्रूट रॉट अॅड डायबॅक ) हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्‍या हिरव्‍या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्‍या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.
उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्‍यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्‍यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्‍या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.
भुरी ( पावडरी मिल्‍डयू ) : भूरी रोगामुळे मिरचीच्‍या पानाच्‍या वरच्‍या आणि खालच्‍या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडाची पाने गळतात.
उपाय : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक किंवा 10 मिलीलिटर कॅराथेन 10 लिटर पाण्‍यात मिसळून मिरचीच्‍या पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने दोन फवारण्‍या कराव्‍यात.

किड

फूलकिडे : हेक्‍टरी किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. हेक्‍टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.
मावा : हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

काढणी व उत्‍पादन

हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्‍यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्‍यसा फळांची तोडणी देठासह 10 दिवसांच्‍या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे 8 ते 10 तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.
जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे हेक्‍टरी 80 ते 100 क्विंटल उत्‍पादन मिळते. वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन 9 ते 10 क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्‍पादन 6 ते 7 क्विंटल येते.










http://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/CategoryContent.aspx?ID=3da92d86-c1f0-4691-8180-a6540476643d

सोमवार, १६ जुलै, २०१८

दादाजी खोब्रागडे : दादाजींना स्वत:ची तीन एकर शेती मुलाच्या आजारपणात विकावी लागली.

शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंत, शेतीही अवघी दीड एकर, घरात गरिबीच, तरीही त्यासमोर हात न टेकता तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसित करणारे दादाजी खोब्रागडे खऱ्या अर्थाने ग्रामीण संशोधक होते. चंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभीडजवळ थोडे आडवळणावर असलेले नांदेड हे त्यांचे गाव. आज तांदळाच्या वाणांच्या व्यवहारात या गावाचा प्रचंड दबदबा आहे. संशोधनासाठी लागणारे अनुकूल वातावरण हाताशी नसताना दादाजींनी १९८३ पासून नवे वाण विकसित करायला सुरुवात केली. तांदळाची एकेक ओंबी गोळा करत त्यांनी बीजगुणन सुरू केले व या नव्या वाणाचा प्रयोग झाला तो तब्बल सहा वर्षांनी. या वाणाला नाव काय द्यायचे हे दादाजींना कळेना. अखेर हाताला बांधलेल्या एचएमटी घडय़ाळाचे नाव या वाणाला दिले! तिथून या वाणाचा प्रवास जो सुरू झाला तो नऊ वाणांच्या निर्मितीनंतरच थांबला.
दादाजींना स्वत:ची तीन एकर शेती मुलाच्या आजारपणात विकावी लागली. आता संशोधन कसे करायचे, असा प्रश्न उभा ठाकला तेव्हा सुनेच्या वडिलांनी दीड एकराचा तुकडा त्यांना दिला. तोच त्यांच्या संशोधनाला शेवटपर्यंत साथ देत राहिला. नंतरच्या दशकात दादाजींचे नाव तांदूळ पीक उत्पादकांच्या वर्तुळात लोकप्रिय झाले. तेव्हा कृषी विद्यापीठाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. तेथील सुटाबुटातल्या शास्त्रज्ञांनी दादाजींचे वाण अक्षरश: चोरले व सोना एचएमटी नावाने बाजारात आणले. तक्रार करणे, पाठपुरावा करणे हे दादाजींच्या स्वभावात नसल्याने ते गप्प राहिले. पुढे या चोरीचा गवगवा होऊनही शासनाने लक्ष दिले नाही. २०१० मध्ये फोर्ब्सच्या यादीत त्यांचे नाव झळकले तेव्हा कुठे दादाजी संशोधक असल्याचा साक्षात्कार झाला. राज्य सरकारने त्यांचा गावात जाऊन गौरव केला. संशोधनासाठी दोन एकर शेती दिली. देशातल्या अनेक व्यासपीठांवर त्यांना निमंत्रित केले जाऊ लागले.
केवळ स्तुतीने पोट भरत नाही व संशोधनही होत नाही. त्यासाठी आर्थिक रसद पुरवावी लागते. ती मात्र कुणी पुरवली नाही व दादाजी शेवटपर्यंत आर्थिक अडचणींत राहिले. अशाच अवस्थेत त्यांनी शासनाने कृषिभूषण सन्मान देताना दिलेले सुवर्णपदक विकायला काढले तेव्हा ते नकली असल्याचे लक्षात आले. पुन्हा गदारोळ झाला. शासनाने दुसरे पदक त्यांच्या घरी पोहोचविले. केवळ सरकारी यंत्रणाच नाही तर तांदळाची वाणे विकणाऱ्या कंपन्यांनीसुद्धा दादाजींच्या वाणांना कधी वेगवेगळी नावे देऊन त्यांच्या विक्रीचा सपाटा सुरूच ठेवला. दादाजींना पक्षाघात झाल्यानंतर उपचारांसाठी शेतकऱ्यांनी सहा लाख रुपये गोळा केले. नंतर सरकारला जाग आली व दोन लाख दिले. शेवटी डॉ. अभय बंगांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्याच शोधग्राममध्ये दादाजींनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.
बाजारात असो वा शेतात, तांदळाचे वाण बघून ते पिकेल की नाही यावर भाष्य करणारा हजारो शेतकऱ्यांचा भविष्यवेत्ताच आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.




by - Loksatta

दादाजी खोब्रागडे : तिसरी शिकलेल्या शेतकरी संशोधकाचा शेवट हलाखीतच...

दादाजी खोब्रागडे : तिसरी शिकलेल्या शेतकरी संशोधकाचा शेवट हलाखीतच


दादाजी खोब्रागडेImage copyrightDEEPAK KHOBRAGADE/BBC
प्रतिमा मथळादादाजी खोब्रागडे

"बाबाजींनी 9 वाण शोधून काढले पण आजही आम्हाला त्यांची पेटंट किंवा रॉयल्टी मिळत नाही. नुसत्या पुरस्कारानं पोट भरत नाही. शेवटच्या आजारपणातही हाताशी पैसे नव्हते. कुणाकडूनही आम्हाला मदत मिळाली नाही. अखेर बाबाजी आम्हाला सोडून निघून गेले. आमचा आधार गेला."

तांदळाच्या नवनव्या वाणाचा शोध लावणारे विदर्भातील कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचं नुकतंच निधन झालं. या धानसंशोधकाची जगभरात दखल घेतली गेली, पण तरीही शेवटपर्यंत आर्थिक विवंचना कायम राहिली. वेळेवर मदत मिळाली असती तर ते अजून जगले असते, असं त्यांचे कुटुंबीय सांगतात. दादाजींचा मुलगा मित्रजित खोब्रागडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलेल्या त्यांच्या बाबाजींच्या काही आठवणी आणि अनुभव.

खरंतर 2015 साली बाबाजी पहिल्यांदा आजारी पडले तेव्हाच मदत मिळाली असती तर बाबाजींचा आजार इतका वाढला नसता.

आजारपणातून ते बरे झालेसुद्धा, पण त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. शेतीतील संशोधनासाठी त्यांना शंभराहून अधिक पुरस्कार मिळाले. पण फक्त पुरस्कारांनी पोट भरत नाही, हे वास्तव आम्ही आयुष्यभर जगलो.
बाबाजींनी शेतीमध्ये एवढं मोठं योगदान दिलं, पण त्यांना नेहमीच सापत्न वागणूक मिळाली.
बाबाजींनी 9 वाण शोधून काढले पण आजही आम्हाला वाणांची पेटंट मिळालेली नाहीत की त्याची रॉयल्टी मिळत नाही.
त्यामुळे त्यांच्या शेवटच्या आजारपणातही हाताशी पैसे नव्हते. कुणाकडूनही आम्हाला मदत मिळाली नाही. अखेर बाबाजी आम्हाला सोडून निघून गेले. आमचा आधार गेला.


पांढरा शर्ट आणि धोतर, डोळ्यावर जाळ भिंगाचा चष्मा अशी दादाजींची साधी राहणी होती.Image copyrightDEEPAK KHOBRAGADE/BBC
प्रतिमा मथळापांढरा शर्ट आणि धोतर, डोळ्यावर जाळ भिंगाचा चष्मा अशी दादाजींची साधी राहणी होती.

पांढरा शर्ट आणि धोतर, डोळ्यावर जाळ भिंगाचा चष्मा अशी दादाजींची साधी राहणी होती. बाहेरच्या जगासाठी ते दादाजी होते पण आम्ही घरात सर्वजण त्यांना बाबाजी म्हणूनच हाक मारायचो.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात आमचं घर आहे.
सकाळी पाच वाजता उठायचं. चहा रिचवायचा आणि खांद्यावर कापडी पिशवी अडकवून, हातात काठी घेऊन शेतावर जायचं. कित्येक वर्षं त्यांचा हा दिनक्रम होता.
कितीही थंडी, ऊन, पाऊस असो, बाबा शेतावर जात असत. लोकं म्हणायची, हा सतत शेताकडे का जात असतो?


नागभीड तालुक्यातील नांदेड या गावातील घरImage copyrightDEONATH GANDATE/BBC
प्रतिमा मथळानागभीड तालुक्यातील नांदेड या गावातील घर

पहाटे लवकर उठून बाबाजी शेतावर जायचे. दहा-अकरा वाजता परत येताना गावातील चहाच्या टपरीवर चहा घेत, लोकांशी गप्पा मारत, पेपर वाचत आणि मग घरी येत असत.
नेहमीचं काम कौशल्यानं, बुद्धीनं काम करणाऱ्या बाबाजींना तेव्हा गावातली माणसं 'डोकेवाले' म्हणायचे. नंतर 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाल्यानंतर लोकांनी त्यांना 'डोकेवाले' बोलणं बंद केलं. 'ग्रामीण संशोधक' म्हणून ते नावारूपाला आले.
ही गोष्ट 1983 सालची. तेव्हा बाबाजी शेतात 'पटेल 3' या धानाची लागवड करत. एका दिवशी बाबाजींना शेतात पिवळ्या रंगाची वेगळी लोंबी दिसली. त्याची पूर्ण भरणी व्हायची होती. बाबाजींनी बाकीचं धान काढलं आणि या लोंबीवर बारीक लक्ष ठेवलं.


एका दिवशी बाबाजींना शेतात पिवळ्या रंगाची वेगळी लोंबी दिसली.Image copyrightDEEPAK KHOBRAGADE/BBC
प्रतिमा मथळाएका दिवशी बाबाजींना शेतात पिवळ्या रंगाची वेगळी लोंबी दिसली.

पाखरं, गुरांनी खाऊ नये म्हणून बाजूने काठ्या वगैरे लावून धानाला संरक्षण दिलं. एक शेर धान त्यातून मिळालं. त्याची पुन्हा लागवड केली. मग एक पायली धान झालं. बाबाजी दरवर्षी हे नवीन धान लावत होते आणि उत्पादन वाढत होतं.

आपल्या वाणाला घड्याळाचं नाव कसं पडलं?

1989 साली त्यांनी माझ्या मामांना भीमराव शिंदेंना हे धान त्यांच्या शेतात लावण्यासाठी दिलं. तेव्हा 4 एकराला 90 पोते धान मिळालं. मामांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत हे नवीन धान विकायला नेलं. पण धानाला नावच नव्हतं.


आपल्या वाणाला 'एच.एम.टी.' हे नाव पडलंय याची बाबाजींना कल्पनाच नव्हती.Image copyrightDEEPAK KHOBRAGADE/BBC
प्रतिमा मथळाआपल्या वाणाला 'एच.एम.टी.' हे नाव पडलंय याची बाबाजींना कल्पनाच नव्हती.

ज्या व्यापाऱ्याने ते धान विकत घेतलं त्याने मनगटावरच्या 'एच.एम.टी.' (हिंदुस्तान मशिन टूल्स) घड्याळाचं नाव त्याला दिलं. आपल्या वाणाला 'एच.एम.टी.' हे नाव पडलंय याची बाबाजींना कल्पनाच नव्हती. नंतर सगळीकडे त्या धानाचा बोलबाला होऊ लागला, तेव्हा बाबाजींना कळलं.
त्यानंतर 1994 साली एके दिवशी या वाणाचं संशोधन कुणी केलंय याचा शोध घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. मोघे आणि चंद्रपूरच्या भात संशोधन केंद्राचे ना. न. देशमुख बाबांना शोधत गावात आले.
तेव्हा आम्ही एका साध्या झोपडीत राहत होतो. डॉ. मोघेंनी बाबाजींकडून सर्व माहिती घेतली. तुमच्या धानाला सर्वांपर्यंत पोहचवण्याचं काम मी करीन, असं बाबाजींना आश्वासनही दिलं.


बाबाजींनी अनेक वाण शोधून काढले.Image copyrightDEONATH GANDATE/BBC
प्रतिमा मथळाबाबाजींनी अनेक वाण शोधून काढले.

पण दुर्दैवाने त्याच वर्षी डॉ. मोघेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यामुळे त्याचं योग्य क्रेडिट आणि मोबदला बाबाजींना मिळालाच नाही.
पण बाबाजींना त्याबद्दल कसलंच दु:ख नव्हतं. त्यांचे प्रयोग सुरूच होते. 'नांदेड हीरा' (1994), 'विजय नांदेड' (1996), 'दीपक रत्न' (1997), 'डीआरके' (1998) म्हणजेच 'दादाजी रामजी खोब्रागडे' (हा 'जय श्रीराम' या नावानेही ओळखला जातो), 'काटे एच.एम.टी.' (2002), 'डीआरके सुगंधी' (2003), 'नांदेड चेन्नूर' आणि 'नांदेड 92' हे वाण बाबाजींनी शोधून काढले.
नवीन धान काढलं की बाबाजी ते गावातल्या लोकांना वाटून टाकायचे. सुरुवातीला वाणांना काय नावं द्यायची याचं ज्ञान नव्हतं. नंतर त्यांनी नवीन वाणांना 'विजय', 'दीपक' या आपल्या नातवांची आणि गावाची नावं दिली.


नवीन धान काढलं की बाबाजी ते गावातल्या लोकांना वाटून टाकायचे.Image copyrightDEONATH GANDATE/BBC
प्रतिमा मथळानवीन धान काढलं की बाबाजी ते गावातल्या लोकांना वाटून टाकायचे.

लहानपणापासून मी बाबाजींसोबत शेतात जायचो. शेतातली सर्व कामं करायचो. बाबाजी आणि मी खूप गप्पा मारायचो. ते मला वाण कसा ओळखायचा, त्याचे निकष काय हे समजून सांगायचे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे मी 'डीआरके 2' हे वाण शोधून काढलं.
1996-97च्या आसपास माझी प्रकृती अचानक बिघडली. मला चालताच येत नव्हतं. बाबाजींनी उपचारासाठी अनेक ठिकाणी नेलं पण गुण येईना. वर्षभराच्या उपचारानंतर शेवटी आयुर्वेदिक औषधानं बरा झालो.
पण या काळात भरपूर पैसा खर्च झाला. जमीन गहाण ठेवावी लागली आणि नंतर तीसुद्धा हातातून गेली. बाबाजींनी त्याचं कधीच दु:ख केलं नाही. मला मुलगा महत्त्वाचा आहे, असं बाबाजी म्हणायचे.


दादाजी खोब्रागडेImage copyrightDEEPAK KHOBRAGADE/BBC

त्यानंतर माझे सासरे श्रीरामजी वाघमारे यांनी बाबाजींना दीड एकर जमीन घेऊन दिली, त्यावर आम्ही पुन्हा शेती करू लागलो. शेती थोडी स्थिरस्थावर झाली पण 2004 साली आमची आई - राईबाई आम्हाला सोडून गेली.
अर्धांगिनी गेली त्याच्या दुसऱ्याच वर्षी बाबाजींना 2005 साली 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाला आणि बाबाजींचं नाव देशपातळीवर झालं. प्रत्येक सुख-दु:खात आपली साथ देणारी पत्नी यावेळेस आपल्यासोबत नाही याचं बाबाजींना प्रचंड दु:ख झालं.
बाबाजी तिसरीपर्यंत शिकले होते आणि मी सातवीपर्यंत. त्यामुळे सुरुवातीला पेटंट, रॉयल्टी याबाबत काहीच माहिती नव्हती. पण 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाल्यानंतर हळूहळू एकएक गोष्टी कळत गेल्या.


प्रशासनाकडून त्यावेळेस आलेलं पत्रImage copyrightDEEPAK KHOBRAGADE/BBC
प्रतिमा मथळाप्रशासनाकडून त्यावेळेस आलेलं पत्र

मग वाणाचं वर्णन, उत्पादन, कुणाला कोणतं धान दिलं, लोकांचे संपर्क क्रमांक अशा सर्व गोष्टींची मी डायरीत नोंद करून ठेवायला लागलो.
2010च्या डिसेंबर महिन्यात एक दिवस मी आणि बाबाजी शेतात काम करत होतो. तेव्हा मीडियावाले आम्हाला शोधत शेतावर आले. पाच राज्यात मिळून एकूण एक लाख एकरवर 'एच.एम.टी.'ची लागवड एव्हाना होत होती.
या वाणाचा लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होत होता. शिवाय इतर वाणांनाही हळूहळू प्रसिद्धी मिळत होती. याची दखल 'फोर्ब्स' या मासिकाने घेतली होती.
आम्ही तर कधी 'फोर्ब्स' हे नावसुद्धा ऐकलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं. पण "तुमचं काम आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलं गेलंय", असं सांगत मीडियावाले भरपूर मुलाखती घेऊन गेले. त्याची बातमी नंतर आम्हाला कुणीतरी इंटरनेटवर दाखवली, एवढंच.


दादाजी खोब्रागडेImage copyrightDEEPAK KHOBRAGADE/BBC

एव्हाना बाबाजींना विविध राज्यांमधून बोलावणं येत होतं. तेव्हा मीसुद्धा बाबाजींसोबत दिल्ली, मुंबई, केरळ असा प्रवास केला. 2006साली महाराष्ट्र शासनातर्फे बाबाजींना कृषिभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. 25 हजार रुपये रोख आणि सोन्याचे पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पण आर्थिक विवंचनेमुळे तेच सुवर्णपदक विकण्याची वेळ आमच्यावर आली. नागपूरला सराफाकडे हे पदक घेऊन गेल्यानंतर ते पितळ्याचं असल्याचं स्पष्ट झालं. त्यावरून सरकारवर बरीच टीका-टिपण्णी झाल्यानंतर राज्य सरकारने ते पदक बदलून दिलं.
आजवर शेकडो पुरस्कार बाबाजींना मिळाले पण देशातील कोणत्याही कृषी विद्यापीठानं बाबाजींच्या संशोधनाकडे गांभीर्याने पाहिलं नसल्याची खंत वाटते.


आजवर शेकडो पुरस्कार बाबाजींना मिळालेImage copyrightDEEPAK KHOBRAGADE/BBC
प्रतिमा मथळाआजवर शेकडो पुरस्कार बाबाजींना मिळाले

आपलं कार्य असंच अविरत सुरू राहिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून माझ्या मुलाला आणि नातवांना 20 एकर शेतजमीन, 20 लाख रूपये अनुदान आणि राहण्यासाठी घर मिळावं, असं पत्र त्यांनी 2015 साली लोकप्रतिनिधींना लिहिलं होतं. पण आम्हाला त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
मे महिन्यात बाबाजींची प्रकृती जेव्हा अधिक खालावली तेव्हा डॉक्टरांनी, "तुम्ही आता फार आशा ठेवू नका", असं सांगितलं. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली.


आपलं कार्य असंच अविरत सुरू राहिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.Image copyrightDEONATH GANDATE/BBC
प्रतिमा मथळाआपलं कार्य असंच अविरत सुरू राहिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.

बाबाजींना व्हेंटिलेटरवर ठेवावं असं वाटत होतं. पण त्याने फार उपयोग होणार नव्हता. अखेर बाबाजी गेलेच. 'कृषिप्रधान' म्हणवल्या जाणाऱ्या भारत देशात एका शेती संशोधकाची अज्ञातवासात अखेर झाली. यापेक्षा खेदजनक काय असू शकतं?
आता कुणी मदत करो अथवा न करो पण ज्या शेतात बाबाजींनी संशोधन केलं, तिथे आम्ही त्यांची समाधी बांधणार आहोत. शेती संशोधनाचं कार्य असंच पुढे सुरू ठेवणार आहोत. तीच बाबाजींना खरी श्रद्धांजली ठरेल.
(शब्दांकन - प्रशांत ननावरे)



by - https://www.bbc.com/marathi/india-44423452

सेंद्रिय शेतमालाकडे लोकांचा वाढता कल...


तळोधी येथील पोशेट्टीवार कुटुंबीय अनेक पिढय़ापासून शेती व्यवसायात आहे.


लाल तांदूळ, पार्वती सूत २७ तांदूळ आकर्षण
रासायनिक शेतमालचे दुष्परिणाम जसे मानवी शरीर, प्राण्यावर होऊ लागले तसेच शेतजमिनीवरही होऊ लागले असून यासंदर्भात जनमानसात मोठी जागृती होत असल्याचे पुन्हा एकदा निसर्ग महामेळाच्या निमित्ताने दिसून आले. धरमपेठेतील शुभ मंगल कार्यालयात आयोजित मेळ्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून तळोधी येथील लाल तांदुळ आकर्षण ठरत आहे.
त्रियनन माहेश्वरी महिला संघटनेच्यावतीने निसर्ग महामेळा २०१८ आयोजित करण्यात आला असून सेंद्रिय मिरची पाऊडर, फळ, डिंक, मद्य, कडधान्य पासून ते भारतीय जेवनातील प्रमुख घटक गहू आणि तांदुळ उपलब्ध आहेत. यातील प्रमुख आकर्षण ठरत आहे लाल तांदुळ.चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या नागभीड तालुक्यातील तळोधी येथील शेतकरी अण्णासाहेब पोशेट्टीवार यांनी हे वाण विकसित केले आहे. शिलाँग येथून बियाणे आणून तळोधी येथील त्यांनी प्रयोगातून ही वाण विकसित केले. या तांदळात झिंक, कॅलशियम, फायबर, व्हिटामिन-बी प्रमाण असल्याने औषधी गुण म्हणून देखील आता या तांदळाकडे बघितले जात आहे, असे असावरी पोशट्टीवार यांनी सांगितले.
तळोधी येथील पोशेट्टीवार कुटुंबीय अनेक पिढय़ापासून शेती व्यवसायात आहे. यासोबत त्यांचे राईस मिल देखील आहे. रासायनिक शेती करत असतानाच अचानक सेंद्रिय शेतीकडे कसे वळलो, यासंदर्भात अण्णासाहेब म्हणाले, साधारणत दहा-पंधरा वर्षांपूर्वी उत्पादन घटत असल्याचे लक्षात आले. यामुळे शेतीतील तज्ज्ञाचा सल्ला घेतला. त्यांनी रासायनिक खतांचा अतिवापर, औषधाचा वापर यामुळे जमिनीचा पोत घरसत चालल्याचे सांगितले. त्यातून मार्ग कसा काढता येईल, याच्या शोधातून सेंद्रिय शेतीचा पर्याय दिसला. रासायनिक खतांऐवजी शेनखत आणि गांडुळखत वापरू लागलो. सुरुवातीला काही काळ आम्ही सेंद्रिय आणि हायब्रीड आदी पिके घेतली. परंतु २००६ पासून  पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळलो. आज १८० एकर जमिनीत आम्ही केवळ सेंद्रिय पीक घेतो. रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळल्यावर प्रारंभी उत्पन्न कमी मिळाले, परंतु हळूहळू उत्पन्न वाढत गेले आणि आज प्रति एकर १८ ते २० क्विंटल उत्पन्न मिळते. रासायनिक शेती करत होतो. तेव्हा हेच उत्पन्न १२ ते १४  क्विंटर प्रतिएकर असे होते. सेंद्रिय शेती करण्यात मोठा प्रश्न होता. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर येथील डॉ. शरद पवार आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. आनंद मुकेवार यांनी मार्गदर्शनातून हा प्रश्न सुटला. पुढे काही एकर प्रयोग करत राहणे आणि नवीन वाण विकसित करणे हे सुरू झाले. आजमितीला सात वाण विकसित झाले असून  ‘पार्वती सूत २७’ या तांदळाची मोठी मागणी आहे, असे अण्णासाहेब म्हणाले.
एमएचटी वाण संपण्याच्या  मार्गावर
तळोधी जवळील नांदेड या  छोटसं गावातील दादाजी खोब्रागडे यांनी एचएमटी हे वाण विकसित केले. हे वाण आता लुप्त होऊ लागले आहे. याचे कारण या तांदळाची मागणी मंदावली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात त्याचे पीक घेणे बऱ्यापैकी बंद झाले आहे. अतिशय चांगले वाण असून देखील मागणी अभावी हे लुप्त होऊ लागले आहे, असे चंद्रपूर जिल्ह्य़ातील पळसगाव येथील शेतकरी गुलाबराव शेंडे म्हणाले.



by - Loksatta

माझ्याबद्दल