मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

एक गाव भुतांचे.. ; कुलधरा!

कुलधराच्या आजच्या अवस्थेला कारणीभूत असणारी घटना येथे आजही सांगितली जाते

 | Updated: May 24, 2017 4:31 AM

पुरातन मंदिरे, राजवाडे, प्रचंड भुईकोट, वाळवंट आणि अभयारण्यदेखील अशी राजस्थानची पर्यटनाच्या नकाशावर ओळख आहे. याच राजस्थानात जैसलमेरजवळ एक गाव चक्क भुतांचे गाव म्हणून ओळखले जाते. कधी काळी पूर्णपणे ओसाड झालेले गाव आता चक्क पर्यटकांनी गजबजलेले असते.
भुतांची भीती आपल्याला लहानपणापासूनच असते. काही तरी रहस्यमय, अगम्य आणि मनाचा थरकाप उडविणारी अशी भुते! परंतु, राजस्थानच्या भटकंतीत आपणास चक्क एका भुतांच्या गावालाच भेट देता येते. कुलधरा हे त्या गावाचे नाव. पण, ते आज ओळखले जाते ते भुतांचे गाव म्हणून.

ही भुतांची नेमकी भानगड काय आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. पण, याच्या इतिहासात डोकावले असता भुतांच्या गावाची कथा हळूहळू उलगडत जाते. आज हे गाव अत्यंत विराण आणि ओसाड आहे. रात्रीच्या किर्र अंधारातच काय, परंतु दिवसाउजेडीही चिटपाखरूदेखील या गावाकडे फिरकत नाही. काही वर्षांपर्यंत तर माणसांचा वावरदेखील नव्हता.
जैसलमेरपासून १८ किमी अंतरावर सम गावाजवळ कुलधरा आहे. जैसलमेर रियासतमधील या प्रदेशावर जोधपूरच्या राजांची सत्ता होती. ऐतिहासिक दस्तावेजानुसार १२५१ मध्ये हे गाव ककनी नदीच्या काठावर वसले होते.
पालिवाल ब्राह्मणातील कुलधर जातीचा एक समूह येथे वस्ती करू लागला. त्यावरून या गावाचे नाव कुलधरा झाले. येथील शीलालेखाच्या संदर्भानुसार १३ व्या शतकाच्या पूर्वी या गावी कधान नावाच्या पहिल्या पालिवाल ब्राह्मणाने वस्ती केली. नंतर हळूहळू लोक समूहाने वस्ती करून राहू लागले. कधान ब्राह्मणाने या ठिकाणी उधानसर नावाचा तलाव खोदला. शिवाय गावात विहिरी खोदून पाणीटंचाई दूर केली. पालीवाल समाज अत्यंत मेहनती व बुद्धिमान असल्याचा नावलौकिक होता. अवर्षणग्रस्त प्रदेशातील ककनी नदी लवकरच कोरडी पडायची. म्हणून पालीवाल नदीतच रेतीचे बंधारे बांधून पाणी अडवायचे आणि जिरवायचे. त्याच पाण्यावर ते शेती करायचे. शिवाय जोडधंदा म्हणून त्यांनी पशुपालनालाही महत्त्व दिले. त्याकाळी कुलधरा अत्यंत सुखी आणि संपन्न समजले जात होते.
ब्रिटिश अधिकारी जेम्स टॉड याने नमूद केल्यानुसार १७-१८ व्या शतकात येथील लोकसंख्या १५८८ एवढी होती. परंतु, सुमारे २५० वर्षांपूर्वी या गावावर मानवनिर्मित संकट कोसळले. पालिवाल ब्राह्मणांनी आपला बाणेदारपणा व समाज स्वाभिमान तेवत ठेवला.
कुलधराच्या आजच्या अवस्थेला कारणीभूत असणारी घटना येथे आजही सांगितली जाते. जैसलमेर रियासतचा दिवाण सालमसिंग हा अत्यंत विलासी व जुलमी समजला जात होता. कुलधरा येथील एका पालिवाल ब्राह्मणाला अतिशय रूपवान अशी मुलगी होती. तिच्या लावण्याची चर्चा आसपासच्या प्रदेशातही होती. ही सौंदर्यवती सालमसिंगच्या नजरेच्या टप्प्यात आली आणि सालमसिंग तिचा दिवानाच झाला. ही रूपगर्वतिा आपल्याला मिळावी म्हणून त्याने समस्त पालिवाल ब्राह्मणांवर दबाव टाकला. त्याने लग्नाची मागणीही घातली. त्यासाठी त्याने प्रसंगी मनमानी केली; परंतु तेथील परंपरेनुसार दुसऱ्या जातीत विवाह होत नसत. पालिवालांनी विवाहास सपशेल नकार दिला. दिवाण सालमसिंग जिद्दीला पेटला. त्याने सर्व प्रयत्न करून पाहिले. तरीही पालिवालांनी त्याला दाद दिली नाही. शेवटी दिवाणाने पालिवालांना निर्वाणीचा इशारा दिला, जर तुमची मुलगी देत नसाल तर सर्व पालिवालांनी गावे खाली करावीत आणि जैसलमेर रियासत सोडावे. पालिवालांची एकूण ८४ गावे होती. रात्रीतून निर्णय झाला की गावे रिकामी करू, पण दिवाणाला मुलगी देणार नाही.
शेवटी कुलधरा, खाभा अशा छोटय़ा-मोठय़ा ८४ गावांतील पालीवालांनी आपली गावे सोडली; परंतु या काळात दिवाणाच्या दहशतीने गावातील अनेक वयस्क पुरुष व महिला या धक्क्यानेच मरण पावले तर अनेकांना लहान बाळांसह स्थलांतर करतानाच मृत्यूला सामोरे जावे लागले.
असे म्हटले जाते की, ब्राह्मणांनीच गाव सोडताना शाप दिला की, या कुलधरा गावात यापुढे कोणीही वस्ती करू शकणार नाही आणि जे प्रयत्न करतील त्यांचा मृत्यू अटळ आहे. नंतर गेल्या २५० वर्षांपासून आजवर या गावात कोणीही वस्ती करण्यास धजावले नाही. ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर अनेक संकटे आली. काहींना मरण आले. अशी कथा यासंदर्भात सांगितली जाते. कुलधरामध्ये अशांत आत्मे भटकत असून तिथे भुतांचाच निवास आहे अशी परिसरात समजूत आहे. म्हणूनच या गावाला भुतांचे गाव म्हटले जाते. आजही सुमारे ४०० घरे भग्नावस्थेत आहेत. या उजाड गावात फक्त भुतांचाच संचार असतो अशी लोकभावना आहे.
राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाने कुलधरा या गावाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी, अंधश्रद्धेला जनतेने बळी पडू नये म्हणून कुलधरा पर्यटनासाठी खुले करण्यात आले आहे. भुतांच्या गावात थेट पर्यटनच सुरू झाले. चार-पाच जुन्या घरांचे नूतनीकरण केले आहे. त्यावरून आपल्याला कुलधरामधील पारंपरिक घरांचा अंदाज येतो. काही दुमजली घरे आहेत. ती वीट, माती आणि दगडातच बांधलेली आहे. कुलधरामध्ये भगवान विष्णू, महिषासुरमर्दनिी व गणेशाची मंदिरे आहेत. येथील लोक वैष्णव धर्माचे होते.
पण येथील मूलनिवासी पालीवाला गेले कुठे हा प्रश्न उरतोच. या बेघर, अन्यायग्रस्त पालिवालांना जोधपूर राजाने राजाश्रय देऊन त्यांचे स्वतंत्र गाव निर्माण केले. त्याचे नाव पाली! आज राजस्थानमध्ये पाली हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. कधी राजस्थानची भटकंती केली तर या कुलधराला अर्थात भुतांच्या गावाला जरूर भेट द्या.


:
:
प्रा. दत्ता वाघ dattajiwagh@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल