जतच्या रणरणत्या पट्ट्यात तयार होतोय कोरफड ज्यूस
-
Tuesday, February 04, 2014 AT 05:15 AM (IST)
Tags: agro special
सांगली जिल्ह्यात जतसारख्या दुष्काळी तालुक्यात तब्बल दहा एकर क्षेत्रावर सातत्याने औषधी कोरफडी वनस्पतीचे पीक गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने घेतले. उत्पादनावर न थांबता प्रकिया करून कोरफडीच्या रसाचे उत्पादन घेतले. त्याची राज्याबरोबर परराज्यांतही विक्री होते. आवळा, कारली, जांभळाच्या रसाचेही उत्पादन सुरू केले. तालुक्यातील शेगाव येथील संभाजीराव धोंडिराम बोराडे (वय 55) यांची शेतकरी ते उद्योजक वाटचाल प्रेरणा आहे. केवळ दहावी शिक्षण झालेल्या संभाजीरावांनी आपल्या उत्पादनांप्रति विश्वास कमाविला आहे. राजकुमार चौगुले
जत तालुक्यातील शेगाव येथील संभाजीराव बोराडे यांची बारा एकर शेती आहे. त्यापैकी तब्बल दहा एकरांवर कोरफडीची शेती आहे. लागवडीनंतर पहिली दोन वर्षे कोरफड परिपक्व होईपर्यंत तोडणी करता येत नाही. दोन वर्षांनंतरच ती वापरता येते. एका कोंबाला पाच ते सहा वर्षे सातत्याने पाने येतात. पाच एकरांमध्ये बागायत तर उर्वरित क्षेत्रात जिराईत क्षेत्रात कोरफड आहे. बागायती क्षेत्रात दोन एकरांवर स्प्रिंकलर, एक एकरांवर ठिबक, तर दोन एकर पाटपाण्यावर आहे. या क्षेत्राला दर पंधरा दिवसांनी पाणी दिलं जातं. दोन बाय दोन फुटांवर लागवड असून, एकरी सुमारे अकरा हजार रोपे लावण्यात आली आहेत. कोरफडीवर रोग फारसे येत नाहीत, मात्र जनावरांपासून जपावे लागते.
प्रतिकूल परिस्थितीतून यश सन 1998 मध्ये संभाजीरावांनी लागवड केली खरी. पीक तर आले. पण त्याच्या विक्रीबाबत अजूनही म्हणावा तसा विचार झालेला नव्हता. उत्पादित माल कुठे द्यायचा याबाबत फारसे ज्ञान नव्हते. एकाने खरेदीचा शब्द दिला होता; परंतु खरेदी झालीच नाही. गावातील एका अधिकाऱ्याने मदत करताना पुण्याच्या एका कंपनीचा पत्ता दिला. संभाजीरावांनी तेथे जाऊन कंपनीच्या मालकांना आपल्याकडे कोरफड असल्याचे सांगितले. तीन रुपये किलो दराने खरेदी केली. कोरफड चांगल्या दर्जाची असल्याने अन्य प्रक्रिया उद्योग कारखान्यांनाही ते कोरफड देऊ लागले. पाच ते सहा वर्षे असे प्रयत्न झाले. पाच रुपये किलो प्रमाणे सरासरी दर मिळाला. वर्षाला जिरायती शेतीत एक लाख रुपये तर बागायती शेतीत दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळत होते.
सन 2007 मध्ये स्वतःच उत्पादनांना सुरवात आपणच उत्पादित केलेली कोरफड कंपन्यांना देण्यापेक्षा आपणच प्रकिया उद्योगात उतरावे असा विचार संभाजीरावांच्या डोक्यात आला. कच्च्या मालाची चिंता नव्हती. सन 2007 ला छोटेखानी उद्योग सुरू केला. प्रथम दोनशे लिटर प्रति दिन रस (ज्यूस) तयार होईल इतक्या क्षमतेचे युनिट सुरू केले. आवश्यक यंत्रांसाठी चोवीस लाख रुपयांचे कर्ज काढले. यातील शासकीय योजनेतून दहा लाख रुपये अनुदान मिळाले. आजतागायत रसनिर्मिती सुरू आहे.
कोरफड रसनिर्मितीविषयी थोडक्यात... पीक हाती आल्यानंतर पहिल्यांदा अर्धा किलो ते एक किलो वजनाची पाने चाकूने कापली जातात. ती एकत्र करून पाण्यात स्वच्छ धुतली जातात. त्यातील पांढरा अनावश्यक भाग काढला जातो. गर व हिरवा भाग वेगळा होतो. यंत्राच्या साह्याने ज्यूस तयार केला जातो. तो ठराविक तापमानापर्यंत गरम केला जातो. त्यानंतर नैसर्गिकरीत्या थंड होऊ दिला जातो. त्यानंतर त्यावर "प्रिझर्व्हेशन' प्रक्रिया (रस टिकण्याची प्रकिया) केली जाते. वजनानुसार बाटल्यांमध्ये ज्यूस पॅक केला जातो. बाटल्यांवर पॅकिंग, अंतिम मुदत (एक्स्पायरी डेट) आदींसह त्यातील घटकांची सर्व माहिती असलेले "लेबल' लावले जाते. लॉटनुसार नमुने पृथक्करणासाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचा अहवाल आल्यानंतर विक्री केली जाते.
आपल्या उत्पादनांना मिळवली बाजारपेठ कोरफड रसाची विक्री करण्यासाठी संभाजीरावांना राज्यातील विविध कृषी प्रदर्शने हे माध्यम उपयुक्त ठरले. त्यातून हक्काचा ग्राहक मिळविला. आज त्यांची उत्पादने मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, विशाखापट्टणम, गोवा आदी ठिकाणी जातात. संबंधित खरेदीदार पार्टीने पैसे बॅंकेत भरल्यानंतर तातडीने कुरिअर, एस.टी. पार्सलने माल पाठविला जातो. आयुर्वेदिक दुकाने, मेडिकल स्टोअर, विविध बझार या ठिकाणी रस विक्रीसाठी ठेवला जातो. ऑनलाइन विक्रीही केली जाते. खात्यावर पैसे भरल्यास तातडीने उत्पादने पाठविली जातात.
कोरफड ज्यूस दर-
एक लिटर- 500 रु.
अर्धा लि.- 275 रु.
250 मि.लि. -150 रु.
- थेट ग्राहकांना हवा असल्यास वीस टक्के डिस्काउंट दिला जातो.
- कोरफडीबरोबरच आवळा, कारले, जांभूळ आदी रसही तयार केला जातो.
- (यातील कच्चा माल गरजेनुसार वाशी मार्केटमधून खरेदी केला जातो.)
- कारले घरचेच असते. त्याचा ज्यूस दर- अर्धा लिटर- 125 ते 140 रु.
- सर्व खर्च वजा जाता वीस टक्क्यांपर्यंत नफा मिळतो.
- घरातील सुमारे सहा व्यक्ती उद्योगात असल्याने मजुरी खर्च कमी केला जातो.
कुटुंब रमलेय प्रकिया उद्योगात बोराडे कुटुंबीयांची सुशांत ऍग्रो इंडस्ट्रीज नावाची फर्म आहे. संजीवनी ऍग्रो प्रॉडक्ट ब्रॅंडने उत्पादनांची विक्री केली जाते. संभाजीरावांना सुशांत, संकुल ही मुले व पत्नी सौ. आशा यांची या कामात मदत करतात. मोठी ऑर्डर असेल तर सातत्याने काम केले जाते. मागणीनुसार मजुरांनाही बोलविले जाते.
बोराडे यांच्या उद्योगाची ठळक वैशिष्ट्ये... * जतसारख्या दुष्काळी भागात कोरफडीसारखे पीक घेऊन त्यावरच स्वतःच प्रक्रिया केली. शेतीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न
-अपयशाने खचून न जाता व्यवसाय टिकविला, वाढवला
-नियमित पिकांपेक्षा वेगळेपण जपले, उद्योगात ठेवले सातत्य.
* शेतकरी, व्यावसायिक व थेट ग्राहक अशी थेट साखळी तयार केली
* औषधी गुणधर्म असणारा कोरफड रसाच्या गुणात्मक दर्जाकडे लक्ष
कोरफडीला पाणी अत्यंत कमी लागते. अवर्षणातही पीक तगून राहते. पुन्हा पाणी मिळाल्यावर वाढते. असे पीक आम्ही जतसारख्या दुष्काळी भागात पिकवून त्यावर स्वतःच प्रक्रिया केली. जतमध्ये थेट विक्री केंद्रही सुरू केले आहे, तेथून दररोज पाच ते दहा ग्राहक तरी उत्पादने खरेदी करतात. हा उद्योग आम्हाला फायदेशीर ठरला आहे.
-संभाजीराव बोराडे, 8275031800
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा