आर. डी. बर्मन
आरडी बर्मन अर्थात आपले पंचमदा.. पंचमदांची गाणी म्हणजे वैविध्य, एखाद्या लाटेप्रमाणे उचंबळणारे त्यांचे सूर कधी एखाद्या व्यक्तीला उदास करतील, तर कधी त्या लाटेवर स्वार व्हायला लावतील. त्यांच्या संगीताची व्याप्तीच इतकी अफाट होती की त्या सुरांनी तुमचं मन कधी काबीज केलं हे सांगता येणार नाही.
पंचमदा यांच्या संगीताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गाण्यांची रेंज...'चिंगारी कोई भडके' किंवा 'ओ मांझी रे अपना किनारा' ही गाणी काळजात खोलवर रुततील, तर दुसरीकडे 'मेहबूबा ओ मेहबूबा' किंवा 'तुम क्या जानो मोहब्बत क्या है' ही गाणी ऐकून तुमचे पाय आपोआपच थिरकतील.
आणि हेच 'आजकल पाँव जमीन पर नहीं पडते मेरे' आणि 'हमसे तुमसे प्यार कितना' यांसारखी असंख्य गाणी तुम्हाला रोमँटिसिझमचा अनुभव देतील.
पंचमदांच्या याच सुरांना अनुभवायचं असेल तर गुलजार यांचा 1977 साली आलेला 'किताब' चित्रपट पाहावाच लागेल. या चित्रपटात एक गाणं आहे.. 'धन्नो की आँखों में है रात का सूरमा और चांद का चुम्मा.'
गुलजारांनी चित्रपटात दोन ओळी गाण्याची संधी दिली आणि केकेंचे आयुष्यच बदलले
डोंबिवलीचा मराठी माणूस जो चक्क इंग्रजीत गातो हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
जस्टिन बीबरला नेमका कोणता आजार झालाय?
रात्रीच्या संधिप्रकाशात स्टेशनवर येणाऱ्या ट्रेनची वाट बघणारी, कंदील घेऊन ट्रेनला हिरवा सिग्नल देणारी नायिका आणि तिच्या खळाळत्या हास्याने उजळून निघणारा अंधार आणि त्याच्या सोबतीला गिटारवर सुरू होणारा फ्लॅंजर इफेक्ट. हे सर्व बघताना आणि ऐकताना एक वेगळीच मदहोशी जाणवते.
रमेश अय्यर यांची गिटार आणि मारुतीराव कीर यांचा तबला, एम संपत यांचा कॅमेरा आणि गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली केलेला हा अकल्पनीय प्रयोग. या सर्वच गोष्टी चित्रपट पाहणाऱ्यांना थक्क करून सोडतात.
बर्मन कुटुंबाचा इतिहास
पंचमदा यांचं मूळ सापडत ते त्रिपुराच्या राजघराण्यात. 1862 मध्ये त्रिपुराचे राजे इशानचंद्र देव बर्मन यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा ब्रजेंद्रचंद्र गादीवर आला. पण काहीच दिवसांत कॉलराच्या साथीत ब्रजेंद्रचंद्र यांचा मृत्यू झाला. आता परंपरेनुसार इशानचंद्र यांचा धाकटा मुलगा नवद्वीपचंद्र गादीवर बसायला हवा होता. पण न्यायालयाच्या आदेशानुसार इशानचंद्रचा भाऊ बिरचंद्रला गादी मिळाली.
वडील एस. डी. बर्मन यांच्यासोबत आर. डी. बर्मन
या सगळ्या घटनाक्रमात नवद्वीपचंद्र यांनी त्रिपुरा सोडलं आणि आपल्या कुटुंबासह कोमिल्ला गाठलं. (कोमिल्ला आजच्या बांगलादेशचा भाग आहे.) नवद्वीपचंद्र देव बर्मन यांना एकूण नऊ मुलं. त्यांच्या या नऊ मुलांपैकी सर्वात लहान होते, सचिन देव बर्मन. एसडी बर्मन.. आरडी बर्मन यांचे वडील.
नवद्वीपचंद्र यांना जर वंशपरंपरेने राजगादी मिळाली असती तर भारतीय सिनेसृष्टी एसडी बर्मन आणि आरडी बर्मन या जोडगळीच्या संगीतापासून वंचित राहिली असती. या पिता-पुत्राच्या भन्नाट जोडीने भारतीय संगीतविश्वाला जे योगदान दिलंय, त्याला शब्दबद्ध करणं फार अवघड आहे.
एसडी बर्मन म्हणजेच सचिनदा यांना लहानपणापासूनचं संगीताची आवड. त्यांनी बंगालच्या समृद्ध लोक-संगीत परंपरेपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. साहेब अलींसारख्या फकीरांकडून कधी सूफी गाण्याचं तर नजरुल इस्लामसारख्या महान कवींच्या तालमीत कवितांच प्रशिक्षण घेतलं.
एसडी बर्मन यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला रेडिओवर गायचे. पुढे त्यांनी संगीताचे धडे द्यायला ही सुरुवात केली. दरम्यान 1937 साली त्यांनी त्यांच्याच एका विद्यार्थिनीशी लग्न केलं. राजघराण्याने मात्र त्यांच्या नव्या सुनेला योग्य तो सन्मान दिला नाही. यामुळे संतापलेल्या एसडी बर्मन यांनी त्रिपुरातील आपल्या रियासतीपासून दूर राहायला सुरुवात केली. ते त्रिपुराला पुन्हा कधी गेलेच नाहीत.
तुबलू पंचम आणि नंतर आरडी बर्मन
दुसरं महायुद्ध नुकतंच सुरू होणार होत. त्या धामधुमीत 27 जून 1939 रोजी एसडी बर्मन यांच्या घरात मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं राहुल. टोपण नाव धारा तुबलू. तुबलू नंतर पंचम कसा बनला याचे ही बरेच किस्से आहेत.
यातला एक किस्सा असा होता की, आरडी बर्मन पाच सुरांमध्ये रडायचे. यातला दुसरा किस्सा असा की, जेव्हा जेव्हा एसडी बर्मन रियाझ करताना 'सा' म्हणायचे, तेव्हा तेव्हा आरडी बर्मन सप्तसुरातला पाचवा सुर म्हणजे 'पा' म्हणायचे. आरडी बर्मन यांनी आपल्या नावाबद्दल एक खुलासा केला होता त्याप्रमाणे, त्यांना हे नाव अभिनेते अशोक कुमार यांनी दिलं होतं.
एक जिद्दी आणि हुशार व्यक्तीचा मुलगा असणं पंचमदांसाठी तितकसं सोपं नव्हतं. आरडी बर्मन ऐन तारुण्यात होते, अगदी तेव्हाच त्यांचे वडील मुंबईत बसून भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताच्या सुवर्णकाळाचा पाया घालत होते. हिंदी चित्रपटांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन मधुर अशी गाणी रचली जात होती. ज्यात राग आणि स्वर यांव्यतिरिक्त भाषेची शुद्धता देखील महत्वाची होती.
वयाच्या अकरा, बाराव्या वर्षापासून पंचमने वडिलांसोबत स्टुडिओत जायला सुरुवात केली. वडिलांबरोबर चित्रपट म्युजिक रेकॉर्डिंगचे बारकावे जवळून पाहिले आणि शिकूनही घेतले. मुलाला लाभलेली नैसर्गिक संगीत प्रतिभा ओळखून एसडी बर्मन यांनी त्याला पटकन आपला सहाय्यक बनवलं.
पंचम तोपर्यंत कोणतही प्रशिक्षण न घेता विविध वाद्य वाजवायला शिकला होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीच्या म्हणण्यानुसार आरडी बर्मन यांच्यासारखा माउथ ऑर्गन वाजवणारा संबंध देशात कोणीच नव्हता. फार कमी लोकांना माहित असेल की 'है अपना दिल तो आवारा' मध्ये पंचमदा यांनी स्वतः माऊथ ऑर्गन वाजवलाय.
राजश्री प्रॉडक्शनच्या सुपरहिट 'दोस्ती' मधील गाण्यातला माऊथ ऑर्गन सुद्धा त्यांनीच वाजवलाय. नंतरच्या काळात पंचमदा यांनी उस्ताद अली अकबर खान, पंडित समता प्रसाद आणि सलील चौधरी यांच्याकडून माऊथ ऑर्गनच प्रशिक्षण घेतलं.
वडिलांचा सहाय्यक म्हणून काम करत असताना, पंचम कोणत्या तरी गोष्टींवर अडून राहायचे आणि मग एसडी रागावून स्टुडिओतून निघून जायचे. बऱ्याचदा असं घडायचं. एसडी यांचं म्हणणं असायचं की, एका व्हायोलिनवर ही आपलं काम भागू शकतं. तर पंचम म्हणायचे आपल्याला तीन व्हायोलिन आणि एक सॅक्सोफोन गरजेचा आहे. पण वडिलांच्या आग्रहापुढे मुलाला बऱ्याचदा पडती बाजू घ्यावी लागायची.
1961 साली आलेल्या मेहमूदच्या 'छोटे नवाब' या चित्रपटातून आरडी बर्मन यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटातील "मतवाली आँखोंवाले, ओ अलबले दिलवाले" हे गाणं फारच गाजलं.
मेहमूद आणि हेलनच्या या सहा मिनिटांच्या गाण्यात, आरडी बर्मन यांनी आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. या प्रयोगामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचं संगीत पुढच्या वीस तीस वर्षांसाठी कायमचं बदलून जाणार होत.
गाण्याची सुरुवात हाय-स्पीड कॅस्टनेट्सने होते. त्यानंतर लॅटिन अमेरिकन फ्लेमेन्को-शैलीतील अकॉस्टिक गिटार वाजत. यानंतर महमूद आणि हेलन डान्स फ्लोअरवर उतरतात. गिटार संपायला येत असतानाच मोहम्मद रफी चाळीस सेकंदांसाठी अरबी शैलीत हमिंग करतात आणि पुढच्या दीड मिनिटांत मूळ गाणं सुरू होत. या गाण्यात कॅस्टनेट, गिटार आणि व्हायोलिन तर होतंच, पण पारंपारिक जिप्सी संगीताची सुद्धा साथ जोडण्यात आली होती.
त्याकाळी चित्रपटाची गाणी साधारणपणे तीन ते चार मिनिटांची असायची. एक राग, एक मुखडा आणि दोन-तीन अंतरे. फालतू समजल्या जाणाऱ्या वाद्यांपासून अंतर राखलं जायचं. या एका गाण्यात आरडी बर्मन यांनी सर्व नियम तोडले. ज्यासाठी लोक कदाचित तयार नसते झाले त्याचवेळी नवा प्रयोग करण्याचं धाडस बर्मन साहेबांनी केलं होत.
'तिसरी मंझिल'ने नवी ओळख मिळाली
आरडी बर्मन यांना लोकांपर्यंत पोहोचायला तशी तर पाच वर्षे लागली. पण 1966 मध्ये आलेल्या 'तिसरी मंझिल'ने संगीत रसिकांना आरडी बर्मन यांची दखल घ्यायला लावली. 'आजा आजा मैं हूं प्यार तेरा' आणि 'ओ हसीना जुल्फों वाली' सारखी भन्नाट गाणी यापूर्वी कधी तयारच झाली नव्हती. नासिर हुसेन यांच्या या चित्रपटात पंचमदांनी जो प्रयोग केला होता, तो प्रयोग प्रत्येक संगीतकाराला करावासा वाटत होता. पण सुरुवात पंचमदांनीच केली.
यात त्यांनी इतकी इतकी वाद्य वापरली की संगीत तज्ज्ञही चकित झाले होते. व्हायब्राफोन, व्हायोलिन, चालो, चाइम, ट्रम्पेट, ड्रम्स, सॅक्सोफोन, काँगो, त्रिकोण, कॅस्टनेट्स आणि काय काय वापरलं नाही? चित्रपट संगीतातील हा एक अभिनव प्रयोग होता जो अनेक दशकांपासून व्हायोलिन, सितार, गिटार आणि तबल्यावरच अवलंबून होता. या प्रयोगाला मनोहरी सिंग आणि कर्सी लॉर्ड सारख्या दिग्गज अरेंजर्सच्या मदतीने परफेक्शन मिळालं.
1960 च्या दशकात पाश्चात्य राष्ट्रांमध्ये हिप्पी कल्चरची सुरुवात झाली होती. हा काळ लेड झेपेलिन, जॉन लेनन, लेनार्ड कोहेन आणि बीटल्सचा होता. कवितांसंबंधी वर्षानुवर्षे जे परसेप्शन तयार झालं होतं ते मोडून काढण्यासाठी बीटनिक कवींनी पुढाकार घेतला होता.
हिप्पी कल्चर शिगेला पोहोचल होतं आणि हे कल्चर भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं होत. नवं साहित्य असो, नवे सिनेमे असो, भारतातल्या तरुणाईचा प्रवास हिप्पी कल्चरच्या दिशेने सुरू झाला होता.
हा बदल नेमका हेरला तो आरडी बर्मन यांनी. त्यांनी या लाटेवर स्वार होऊन भारतीय सिनेसृष्टीला लॅटिन अमेरिकन साल्सा, फ्लेमेन्को आणि सांबा तसेच आफ्रिकन लोकसंगीताची ओळख करून दिली.
पंचमदांच्या संगीतात पाश्चात्य शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत तर होतंच पण त्याचबरोबर अरबी संगीतही होतं. प्रसिद्ध जॅझ गायक लुई आर्मस्ट्राँगला आपला आदर्श मानणाऱ्या आरडी बर्मन यांनी जॅझ व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक रॉक, फंक, ब्राझीलचे प्रसिद्ध बोसा नोव्हा संगीत आपल्या गाण्यात आणलं. 1987 मध्ये, प्रसिद्ध लॅटिन अमेरिकन संगीतकार जोस फ्लोरेस यांच्यासोबत त्यांनी 'पँटेरा' नावाचा एक अल्बम देखील रिलीज केला.
बर्मन यांनी बंगाली लोकसंगीत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सर्व आयामांबरोबरच आपल्या देशातील सांस्कृतिक विविधतेचा पूर्ण आदर केला. नवनवे प्रयोग केले. 1981 मध्ये आलेल्या 'कुदरत' या चित्रपटात त्यांनी किशोर कुमार आणि परवीन सुलताना यांना 'हमे तुमसे प्यार कितना' हे पारंपारिक ठुमरी शैलीतील गाणं गायला लावलं.
पंचमदा यांनी जे काही नवं ऐकलं, ते ते संगीतबद्ध केलं. सँडपेपर, बांबू, कप, ताट, शंख, कंगवा, काचेच्या बाटल्या आणि पुठ्ठा-लाकडी पेटी या गोष्टींचाही त्यांनी वाद्य म्हणून वापर केला.
'शोले'मध्ये तर पंचम दा यांनी गायलेल 'मेहबूबा, मेहबूबा' हे गाणं एका ग्रीक गाण्यापासून प्रेरित होतं. या गाण्यात पाण्याने भरलेल्या बिअरच्या बाटल्यांमधून निघणाऱ्या आवाजाचा वापर करण्यात आला होता.
1960 आणि 1970 च्या दशकातल्या शम्मी कपूरपासून राजेश खन्नापर्यंतच्या कल्टला पंचम दांच्या संगीताशिवाय पर्याय नव्हता.1980 चं दशक मात्र पंचमदांसाठी चढ-उतारांच राहिलं. हिंदी चित्रपटांतला रोमान्स उतरणीकडे झुकला होता. भारतीय सिनेसृष्टीत अँग्री यंग मॅनसारख्या, डिस्कोसारख्या थीमची चलती होती.
एककाळ असा होता की, नसीर हुसेन आणि देव आनंद सारखे निर्माते त्यांच्या चित्रपटातल्या गाण्यांसाठी आरडी बर्मन यांना पहिली पसंती द्यायचे. पण नंतर हेच निर्माते इतर संगीत दिग्दर्शकांसोबत काम करण्याच्या प्रयत्नात लागले. आरडी बर्मन यांच्यासाठी तो काळ खडतर होता. पण त्यांच्यासारख्या तेजस्वी संगीताकराचा करिष्मा लोकांनी वेळोवेळी अनुभवला.
पंचमदा यांचं वयाच्या 54 व्या वर्षी, 4 जानेवारी 1994 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यावेळी ते विधू विनोद चोप्रा यांच्या '1942 अ लव्ह स्टोरी'ला संगीत देत होते.
आर. डी. बर्मन यांची गुलजार यांच्याशी चांगली मैत्री होती.
दहा-बारा वर्षांपूर्वी ज्या पंचमदांना डावललं जात होतं, त्यांना त्याच संगीतासाठी मरणोत्तर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता.
आरडी बर्मन यांच्यात एकीकडे परंपरेबद्दल नितांत आदर दिसतो तर दुसरीकडे ती परंपरा ओलांडण्याचे धैर्यही दिसतं. हा टोकाचा विरोधाभास त्यांच्या कामात पण अनेकदा दिसायचा. उदाहरणार्थ, 1972 मध्ये आलेल्या 'परिचय' चित्रपटातलं 'बीती ना बिताई रैना' सारखं शास्त्रीय संगीत एका बाजूला, तर 'सा रे के सा रे गा मा को लेके गाते चले' सारखी अतिशय आधुनिक आणि जिवंत रचना एका बाजूला.
हिंदी चित्रपट संगीतात जेव्हा त्यांनी नवे प्रयोग करण्याचा घाट घातला तेव्हा लोकांनी त्यांना बंडखोर ठरवलं. मात्र आज चाळीस वर्षांनंतरही त्यांच्या संगीतामध्ये कमालीची ताकद आहे. त्यांचे सुरांनी नव्या पिढीचे सुद्धा पाय थिरकतील. गायकाचे स्वर, वाद्यांचा वापर आणि ध्वनिमुद्रणाचे तंत्र यासह नावीन्यपूर्णतेला वाव असलेल कोणतही क्षेत्र त्यांनी सोडलं नाही.
पाश्चात्य संगीताचा खोलवर प्रभाव असूनही आरडी बर्मन यांच्या गाण्यात हिंदुस्थानी आत्मा होता. आजच्या पिढीतले ए आर रहमान असो वा विशाल भारद्वाज किंवा मग त्यांच्यासारखे इतर तरुण संगीतकार. या संगीतकरांच्या प्रयोगासाठी जी कसलेली जमीन करायची होती ती पंचमदा यांनी आधीच करून ठेवली होती.
भारतीय सिनेसृष्टीत पंचमदा यांनी दिलेलं योगदान नेहमीच एव्हरग्रीन राहील.
by - Internet
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा