ओपन सीक्रेट...
‘बायबल’पासून प्रेरित होत राँडाने इच्छापूर्तीच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे, मागा. दुसरी पायरी म्हणजे, विश्वास ठेवा. तिसरी पायरी म्हणजे, प्राप्त करा. आपल्याला हवे ते मिळवणे याला लेखिका ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ म्हणते.
वि राँडा बर्न या ऑस्ट्रेलियन लेखिकेने ‘द सिक्रेट’ हे पुस्तक २००६ साली लिहिले आणि चित्रपटही काढला तेव्हा एकाही शिक्षकाने सहमती दर्शविली नव्हती. ऑपरा व्हीन्फ्रे शोमध्ये राँडाचे कौतुक झाल्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. पुस्तकाचा दोन कोटींवर खप, ५२ भाषांमध्ये अनुवाद आणि अधिक काळापर्यंत ‘बेस्ट सेलर’ राहण्याचा बहुमान हे या पुस्तकाच्या यशाचे आणि सिद्धांताचे प्रूफ मानायला हरकत नाही.
पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकाचा सार आपल्याला पूर्वीच माहीत असल्याचा अनुभव येतो. ‘Feel Good’ हे राँडा बर्नचे शब्द! ‘बायबल’पासून प्रेरित होत राँडाने इच्छापूर्तीच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे, मागा (Ask). मागणी करा म्हणजे मिळेल. दुसरी पायरी म्हणजे, विश्वास ठेवा (Believe). हवी असलेली वस्तू मिळाली आहे असे गृहीत धरा. तिसरी पायरी म्हणजे, प्राप्त करा (Receive). त्या आनंदी अनुभवाच्या फ्रिक्वेंसीवर पोहचणे. आपल्याला हवे ते मिळवणे याला लेखिका ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ म्हणते. आकर्षणाचा सिद्धांत सर्व बाबतीत सर्वांना लागू होतो, असा तिचा दावा आहे.
प्रत्यक्ष कर्मापेक्षा प्रेरित कर्म महत्त्वाचे. प्रेरित कर्म श्रमविरहीत असते. वैश्विक शक्तीच्या प्रवाहासोबत सहज प्राप्त होणारे असते. हवी असलेली प्रत्येक गोष्ट आकर्षित करू शकते. जसे पैसा, व्यक्ती, मित्र, आरोग्य. तुमचे मन चुंबकासारखे सर्व गोष्टी आकर्षित करू शकते. श्रद्धेने तुम्ही हवी ती गोष्ट साध्य करू शकता. यात श्रद्धेला जास्त महत्त्व दिले असून प्रत्यक्ष कृतीला दुय्यम समजले आहे, अशी टीकाही केली जाते.
मन ज्या गोष्टींची कल्पना करू शकते, ते मिळवूही शकते! त्यासाठी यशाचे ब्लू प्रिंट मनात असावे लागते. मानसप्रतिमा (व्हिज्युअलायझेशन) हे सफलतेचे रहस्य आहे. श्रद्धेने स्वप्न मजबूत होतात आणि शंकेने करपतात. मानसप्रतिमा रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर बघाव्यात. छोट्या गोष्टी प्राप्त झाल्या तर मोठ्या पण गोष्टी प्राप्त करण्याचे रहस्य अवगत होते. मनाची दिशा प्रत्येक दहाव्या पावलांवर बदलत असेल तर अंतिम टप्पा गाठणे कठीण आहे. एका दिशेने प्रवास करणे व फोकस करणे महत्त्वाचे.
बरेचदा एखादी गोष्ट हवी असते पण आपली भाषा विरोधाभासी असते. उदा. आपल्याला लवकर पोहचायचे असते, पण आपण ‘लेट होऊ, लेट होऊ’ असा जप करत असतो. मला घर बांधायचे आहे. ५० लाख लागतात. जवळ केवळ पाच लाख आहेत म्हणून ‘शक्य नाही, शक्य नाही’ असे म्हणत राहतो. इच्छा घराची आहे पण भाषा घर नको, अशी आहे. ‘मागा’ या बाबतीत सांगायचे झाले तर एक भक्त ‘परमेश्वराकडे मला घर पाहिजे’ अशी मागणी करतो. यात ‘घर होणार की नाही’ ही शंका नाही. फक्त मागणे स्पष्ट आहे. विचार जितका प्रबळ राहील, तितकी विचार खरा होण्याची शक्यता असते. ‘आय होप’ऐवजी ‘आय नो’, ‘आय नीड’ऐवजी ‘आय हॅव्ह’, ‘आय कान्ट’ऐवजी ‘आय कॅन’ असे बदल करावेत.
वजन उतरविण्यासाठी वजन कमी करणे या गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता, अपेक्षित आदर्श वजनावर केंद्रित करायला हवे. खाण्यामुळे माझे वजन वाढते ही भीती काढून टाकावी. अपेक्षित वजन प्राप्त करायला किती वेळ लागेल याचे लेखिकेचे उत्तर मात्र संभ्रमात टाकणारे आहे. ‘तुम्ही स्वतःला तुम्हाला हवे आहेत त्या फ्रीक्वेंसीवर नेऊन ठेवण्यात स्वतःला जो वेळ लागतो तो हा वेळ असतो’, असे ती म्हणते. लेखिकेच्या मते, चोरी, आजारपण किंवा अपघात आकर्षणाच्या नियमाप्रमाणेच घडतात. तरीही आकर्षणाचा नियम हा एक निसर्ग नियम आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे तो व्यक्तीनिरपेक्ष आहे.
by- No-Author | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा