शिक्षकाला माणूस म्हणून बघण्याची गरज : सिनेमात पण आणि प्रत्यक्षात पण
भारतीय सिनेमामधलं शिक्षकांचं चित्रीकरण हे प्रत्येक दशकात वेगळं झालेलं दिसत . त्या त्या दशकांच्या आर्थिक -सामाजिक आणि राजकीय प्रवाहांचा प्रभाव या चित्रणावर झालेला दिसतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ भाबड्या आदर्शवादाचा होता. ‘अनुपमा’ चित्रपटातली शिक्षिका एका मुलीला तिच्या आयुष्यातला आनंद शोधण्यास मदत करते. राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी पण शिक्षकांची आहे अशी समजूत त्यावेळेस जोरात होती. ‘आओ बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिंदुस्थान की ‘ असे सूर आळवत विद्यार्थ्यांना नवीन भारताची ओळख करून देणारा शिक्षकच होता. ‘लीडर ‘ मधला दिलीपकुमारने बजावलेला शिक्षक हा विद्यार्थ्यांची बाजू घेऊन त्यांच्या पालकांच्या विरोधात उभा राहणारा होता. पण स्वातंत्र्यानंतरचा आशावाद हळूहळू विरायला लागला . शांताराम बापूंचा ‘पिंजरा ‘ हे त्याचं एक उत्तम उदाहरण.
‘पिंजरा’ ही खरं तर एका आदर्शवादाच्या मृत्यूची गोष्ट. आदर्श माणूस आणि गाव घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माणसाची गोष्ट . पण श्रीराम लागूंच्या पात्राला पडद्यावर ध्येयवादी दाखवण्यासाठी शांतारामबापूना त्यांना पटकथेत शिक्षक म्हणून दाखवावे वाटले यातच त्याकाळात शिक्षकांना समाजात जो रुतबा होता तो दिसून येतो . नायक पूर्वार्धात शिक्षक असल्यानेच उत्तरार्धातील त्याचा अधःपात हा अजूनच डाचतो . पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांच्यातला हा विरोधाभास शांतारामबापूंच दिग्दर्शनिय कौशल्य दाखवतो . पण ‘पिंजरा’ हा शिक्षकांकडे आपल्यासारखाच गुण -अवगुण असणारा माणूस म्हणून बघतो . त्यादृष्टीने हा चित्रपट मैलाचा दगड आहे . ज्यावर्षी ‘पिंजरा ‘ आला त्याचवर्षी गुलजार यांचा ‘परिचय ‘ पण आला . त्यात पण प्रामाणिक गुरु आणि त्याचे बंडखोर शिष्य यांच्यातलं नातं फार सुंदर दाखवलं हो. ‘मेरा नाम जोकर ‘ ने दाखवून दिलं की शिक्षक हा पडद्यावर ‘सेक्स ऑब्जेक्ट ‘ म्हणून पण दाखवला जाऊ शकतो. याचीच पुनरावृत्ती ‘मै हू ना’ या शाहरुख खानच्या चित्रपटात झाली.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकातले चित्र बदलले. त्या काळातल्या सिनेमात चाळिशीतला नायक हातात एक वही घेऊन कॉलेजला जाताना दिसे. बी ए पास झाल्याचा आनंद आईच्या हातचा गाजर का हलवा खाऊन सेलिब्रेट करत असे .नायकाच्या कॉलेजमधले शिक्षक हे बहुतेक विनोदाचा विषय बनले. या चित्रपटातला शिक्षक हा वेंधळा , सहकारी स्त्री शिक्षकांवर तिरपी नजर ठेवून असणारा असे. काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक चित्रपटांनी शिक्षकांच्या प्रतिमेची अवनती करण्यातच धन्यता मानली. ही दशक भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातली सृजनशीलतेच्या दृष्टीने सगळ्यात सुमार मानली जाते. त्याचच प्रतिबिंब शिक्षकांच्या चित्रीकरणात पडलेलं दिसत.
भारतीय पुराणातल्या कथांचं समाजमनावर अजूनही भारूड आहे. पुराणांमध्ये रसाळ शैलीत वर्णन केलेल्या गुरु शिष्य परंपरेचा प्रभाव भारतीय चित्रपटांच्या कथानकावर पण पडलेला दिसतो. गुरु आपलं सर्वस्व देऊन शिष्याला सगळं शिकवतो आणि शिष्य आपलं सर्वस्व देऊन त्याच्याकडून विद्या ग्रहण करतो हे अनेक पुराणकथांचं सार आहे. द्रोणाचार्य हे महान गुरु होतेच. पण दुर्दैवाने त्यांची महानता एकलव्याच्या वाट्याला आली नाही. अर्जुनाला सर्वस्व देऊन शिकवणारे द्रोणाचार्य आपल्या आवडत्या शिष्याला स्पर्धा निर्माण होऊ नये म्हणून एकलव्याचा अंगठा मागतात हा विरोधाभास त्यांच्या चरित्रात उठून दिसतो.
‘इकबाल’ हा नागेश कुकनूरचा चित्रपट शिक्षकांच्या सिनेमातील चित्रीकरणात महत्वाचा मानला जातो. गिरीश कर्नाडांनी त्यात वठवलेला गुरु हा एकाच माणसांमध्ये असणाऱ्या विरोधाभासावर भाष्य करतो. गिरीश कर्नाडांचा गुरु मूकबधिर इकबालला त्याच्यातली गुणवत्ता बघून मोफत प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतो . पण नंतर अकादमीमधला प्रभावशाली घराण्यातून आलेला विद्यार्थी आणि इकबाल यांच्यात एकाला निवडायची वेळ येते तेंव्हा तो पहिल्याला निवडतो आणि इकबालला वाऱ्यावर सोडून देतो. अगदी महाभारतातले द्रोणाचार्य एकलव्याला सोडतात तस.
खूपदा गुरु आपल्या अर्धवट राहिलेल्या इच्छा आपल्या शिष्यांमार्फत पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो . जे आपल्याला जमलं नाही ते आपल्या हुशार शिष्यानी करून दाखवावं अशी त्यांची तळमळ असते . त्यातूनच महाराष्ट्रातले हजारो अनाम शिक्षक अनेक गरीब विद्यार्थ्यांची फीस भरतात , त्यांच्या वह्या पुस्तकांच्या खर्चाचा भार उचलतात आणि शक्य तितकी मदत आपल्या विद्यार्थ्यांना करतात . अशा तळमळीने काम करणाऱ्या शेकडो अनाम शिक्षकांची नाव इतिहासाला कधीच कळणार नाहीत किंवा कुठलीही माध्यम पण त्यांची नोंद घेणार नाहीत . सिनेमात पण शिष्यांच्या मार्फत आपल्या आकांक्षा पूर्ण करणारे शिक्षक दिसून येतात . ‘चक दे इंडिया ‘ मधला शाहरुख खानचा कबीर खान हा असाच एक शिक्षक . आपल्या एका चुकीमुळे आपल्या देशाला मेडलपासून वंचित राहावे लागले हा सल त्याला आयुष्यभर डाचत असतो . संधी मिळताच भारतीय महिला हॉकी संघाचं प्रशिक्षक पद स्वीकारून तो आपल्या टीमला शून्यातून वर आणतो . जेंव्हा त्याची टीम मेडल जिंकते तेंव्हा आपल्या देशाला मेडल मिळाल्याचा आनंद त्याला होतोच . पण आपलं अधुरं स्वप्न आपल्या शिष्यानी पूर्ण केलं हा आनंद पण असतोच .
देशाच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारे काही अतिशय महत्वाचे चित्रपट आमिर खानने केले आहेत . ‘थ्री इडियट्स ‘ मध्ये विद्यार्थ्यांना रोबोट बनवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेवर अतिशय सुंदर भाष्य केलं आहे . प्रोफेसर सहस्त्रबुद्धे सारख्या कर्तव्यकठोर , प्रामाणिक पण जुनाट ,कालबाह्य संकल्पनांना कवटाळून बसलेल्या शिक्षकांना आमिरचा रँचो योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा नेमका गुरु कोण आणि शिष्य कोण यांच्यातली सीमारेषा पुसट होते . ‘तारे जमीन पर ‘ मधला आमिरचा निकुंभ सर हा एक आदर्श शिक्षक आहे . हुशार विद्यार्थी सगळ्याच शिक्षकांचे आवडते असतात . पण वर्गातल्या सगळ्यात ढ समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना योग्य मार्गावर असणारा निकुंभ हा जगावेगळा शिक्षक .
मराठी सिनेमात पण शिक्षकांचं चित्रण अतिशय वास्तववादीपणाने होत आहे . नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ मधला शिक्षक हा ग्रामीण भागातला शिक्षक आहे. कसा आहे तो ? संस्थाचालकांच्या अरेरावीखाली दबलेला, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारा आणि तरीही जातीचा अभिमान बाळगणारा. ‘झोपलायस ना तिच्यासोबत ? मग दे की सोडून.’ असा धक्कादायक सल्ला देणारा शिक्षक इथं पाहता येतो. ‘यलो ‘ मधला उपेंद्र लिमयेचा आपल्या स्किझोफ्रेनिया ग्रस्त विद्यार्थिनीला अव्वल जलतरणपटू बनवणारा शिक्षक पण बघण्यासारखा आहे. दहावी फ या अतिशय वेगळ्या विषयावरच्या सिनेमातले सगळे शिक्षक पण भन्नाट . इथं वेळ आणि जागेअभावी भारतीय सिनेमातल्या प्रत्येक शिक्षक पात्राचा आढावा घेता येत नाही ही मर्यादा आहे.
आपण भारतीय एक समूह म्हणून खूप भावनिक असतो . आपण टोकांच्या भावनांच्या हिंदकोळ्यांमध्ये झुलत असतो . ज्याप्रमाणे सिनेमात आपल्या समाजाचं प्रतिबिंब पडत असं आपण मानतो त्याच्याच व्यत्यास म्हणजे समाज म्हणून आपलं प्रतिबिंब पण सिनेमात पडतच. आपल्या सिनेमामधलं शिक्षकांचं चित्रण पण दोन टोकांमध्ये वावरत . एक टोक म्हणजे शिक्षक म्हणजे सद्गुणांचा पुतळा , मर्यादापुरुषोत्तम असा शिक्षक आपल्या सिनेमांमधून दिसतो. तर दुसरं टोक म्हणजे कणाहीन , घाबरट असा शिक्षक.
शिक्षक हा शेवटी तुमच्या आमच्यासारखाच हाडामांसाचा माणूस आहे. त्याच्यात पण तुमच्या आमच्यासारखे गुण असतात हे समजून घेण्याची आपली एक समाज म्हणून तयारी नाहीच पण सिनेमा माध्यमात काम करणाऱ्या लोकांची पण तशी तयारी दिसत नाही. एक तर शिक्षकांचं दैवतीकरण करायचं नाहीतर त्यांना टीकेच्या पायदळी तुडवायचं असा आपला सामाजिक खाक्या आहे. शिक्षकच का ? राजकारणी , खेळाडू , सरकारी अधिकारी यांच्याबाबत पण आपल्या समाजात हीच परिस्थिती आहे .पण सुदैवाने परिस्थिती बदलत आहे. नागराज मंजुळे किंवा आमिर खानसारखे सिनेमा क्षेत्राची जाण असणारे लोक स्वतःच्या सिनेमातून शिक्षकाला हाडामांसाचा माणूस दाखवत आहेत ही समाधानकारक गोष्ट आहे.
Courtesy
Amol Udgirkar
https://amoludgirkar09.blogspot.in
https://khaasre.com/article-about-teachers/
कॉपीराइट विषयी तक्रार -
उत्तर द्याहटवाhttp://dsachin1983.blogspot.com/2019/10/blog-post.html
वरील लींकमध्ये तुम्ही दिलेली माहिती ही आमच्या साईटवरील कॉपी केली आहे. ही माहिती सुरवातीला am news यांनी कॉपी केली होती. त्यांनी आमच्या तक्रारीनंतर ती माहिती काढून टाकली आहे. मात्र तुम्ही ती अजूनही तुमच्या ब्लॉगवर घातलेली आहे. तुम्ही तुमचे पूर्ण नाव का लपवता? तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर काय आहे?
वर दिलेल्या लिंकमधील माहिती तात्काळ हटवण्यात यावी अन्यथा आम्ही सायबर पोलिसात तक्रार दाखल करू.