अभिनयाच्या क्षेत्रात दिलीपसाहेब माझ्यापेक्षा दोन हजार वर्षं पुढे आहेत असं मी मानतो. ते माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेतच शिवाय चित्रपटाच्या सेटवर कॅमेर्‍याला सामोरं जाण्याची इच्छा मनाशी बाळगणार्‍या अनेक युवकांचं, तरुणांचं तेे प्रेरणास्थान आहेत, यात शंका नाही. अभिनयाच्या क्षेत्रात कारकिर्द घडवण्याची स्वप्नं घेऊन मुंबापुरीत येणार्‍या अनेकांना दिलीपसाहेब आपलेसे वाटतात. त्यांच्याकडे बघून अभिनयाची वाट धरणारे अनेकजण असतील. दिलीपसाहेबांचं अस्तित्व, त्यांच्याभोवती असणारं वलय आणि अभिनयाप्रतीची समर्पित वृत्ती या सगळ्याचं वर्णन शब्दात करता येणं शक्य नाही. दिलीपसाहेबांनी अभिनयाच्या क्षेत्रात नवे प्रवाह आणले. अचूकता हे त्यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. दिलीपसाहेबांचा अभिनय इतक्या उच्च दर्जाचा होता की त्यात कोणतीही चूक काढणं शक्य नसायचं. सहकलाकारांसोबत त्यांची नाळ अगदी सहज जुळायची. आपल्यासोबत काम करणार्‍या कलाकारासोबत जुळवून घ्यायला त्यांना फार वेळ लागायचा नाही आणि हेच त्यांचं शक्तीस्थान म्हटलं पाहिजे. कोणतीही व्यक्तिरेखा ते अत्यंत ताकदीने सादर करायचे. कोणत्याही भूमिकेत, व्यक्तिरेखेत अगदी सहज शिरायचे. हा सुद्धा दिलीपसाहेबांचा एक आगळेपणाच. त्यांच्या या गुणांच्या, वैशिष्ट्याच्या जवळही जाता येणार नाही.

८९ व्या वाढदिवसानिमित्ताने मी अनेक वर्षांनी दिलीपसाहेबांच्या आलिशान घरी गेलो. मी त्यांच्या घरी खूप कमी वेळा गेलो असलो तरी प्रत्येक वेळी एक निराळा अनुभव गाठीशी बांधला जायचा. त्यांच्या घरातली प्रत्येक भेट मला आठवते. चित्रपटसृष्टीतले कलाकार तसंच अन्य मान्यवरांच्या बैठकीच्या निमित्ताने मी त्यांच्या घरी गेलो होतो. दिलीपसाहेब बॅटमिंटन उत्तम खेळत असत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी म्हणून अगदी सहजच मी त्यांच्या घरी डोकवायचो. मध्यरात्री अनौपचारिक फोनही व्हायचे. ‘जमीर’च्या चित्रिकरणादरम्यान त्यांच्या घरातल्या प्रशस्त लॉनवरची माझी उपस्थिती (त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि माझ्या सहकलाकार सायरा बानूही सोबत होत्या.) हे सगळं माझ्या स्मरणात आहे आणि ते का नसावं? आधी म्हटल्याप्रमाणे ते माझ्या तरुणपणातले नायक होते. एके काळी रुपेरी पडद्यावर बघितलेल्या या अभिनेत्यासमोर उभं राहून अभिनय करण्याची संधी मला मिळाली.

जुहू चौपाटीच्या वाळूवर ‘शक्ती’चा मुहुर्त झाला. मुहुर्ताच्या या शॉटसाठी दिलीपसाहेब आणि मी कॅमेर्‍यासमोर आमनेसामने होतो. ‘शक्ती’ हा आम्ही एकत्र केलेला एकमेव चित्रपट. चित्रपटातल्या आमच्यातल्या पहिल्या प्रसंगाचं चित्रिकरण तुरुंगाच्या पार्श्वभूमीवर झालं. या चित्रपटात मी त्यांच्या मुलाची व्यक्तिरेखा करत होतो. चित्रपटात ते माझ्या वडीलांची व्यक्तिरेखा निभावत तर होतेच शिवाय एक पोलीस अधिकारीही साकारत होते. आपला मुलगा चुकीच्या मार्गाने जात असल्याची जाणीव करून द्यायला ते आलेले असतात, असं दृष्य होतं. वडिलांचे हे अनुभवाचे बोल मी साकारत असलेल्या त्यांच्या मुलाला मान्य नव्हते. त्यामुळे मी त्यांचं म्हणणं नाकारत होतो, असा हा सीन होता. आयुष्यभर ज्या व्यक्तीला आदर्श मानलं त्या व्यक्तीच्या समोर उभं राहून, त्याचं म्हणणं नाकारणं माझ्यासाठी खरंच खूप कठीण होतं. मात्र ते झालं. हा चित्रपटाच्या कथानकाचा भाग होता. ते बाप आणि मुलामधलं द्वंद्व होतं. त्यामुळे चित्रपट पूर्ण होईपर्यंत मी त्यांना विरोध करत त्यांचं म्हणणं नाकारत राहिलो!

सलीम-जावेद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हा चित्रपट साकारला होता. चित्रपटाच्या कथानकात असणारी आमच्यातली दृश्यं अद्भूत म्हणावी अशीच होती. ‘शक्ती’च्या चित्रिकरणादरम्यानचा प्रत्येक क्षण भारावून टाकणारा होता. ‘कुली’च्या चित्रिकरणादरम्यान मी जखमी झालो होते. ते जीवावरचं दुखणं होतं आणि त्याच काळात ‘शक्ती’चं चित्रिकरणही पूर्ण झालं होतं. मी या दुखण्यातून बरा होत असतानाच्या काळात ह चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्याआधी खास माझ्यासाठी प्रतीक्षा बंगल्यावर ‘शक्ती’चा खेळ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मला घरातून बाहेर पडणं शक्य नव्हतं. त्यामुळेे घरीच हा चित्रपट बघितला. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. मला आठवत होतं, 1954 मध्ये काठमांडूमधल्या एका साध्याशा चित्रपटगृहात बसून चार आण्याचं तिकिट काढून मी दिलीपसाहेबांचा चित्रपट बघितला होता आणि त्याच माणसासोबत मी या चित्रपटात काम केलं होतं… काठमांडूतल्या चित्रपटगृहातल्या त्या लाकडी फळकुटावर बसून चित्रपट बघणार्‍या मला त्यावेळी याची पुसटशीही कल्पना नव्हती. पण नियती अनेक गोष्टी घडवून आणत असते. तिच्या मनात काही तरी वेगळंच असतं आणि मला दिलीपसाहेबांसोबत चित्रपट करण्याची संधी मिळाली होती.

दिलीपसाहेबांची स्वाक्षरी घ्यायला मला अनेक दशकं वाट पहावी लागली होती. दिलीपसाहेबांना पहिल्यांदा बघितलं तो क्षण मला अगदी लख्ख आठवतो. ते 1960 साल होतं. त्यावेळी मी माझ्या आई-वडिलांसोबत मुंबई फिरायला आलो होते. त्यावेळी एका रेस्टॉरंटमध्ये मी त्यांना पहिल्यांदा बघितलं. ते दक्षिण मुंबईतलं एक नावाजलेलं रेस्टॉरंट होतं. त्या रेस्टॉरंटमध्ये चक्क दिलीपकुमार पाऊल टाकत होते. समोर माझा नायक उभा असलेला बघून नेमकं काय करावं हेच मला कळलं नाही. मी पटकन जवळच्या स्टेशनरीच्या दुकानात वही आणण्यासाठी धावलो. दिलीपसाहेबांभोवती मोठा घोळका जमला होता. प्रत्येकालाच त्यांची स्वाक्षरी हवी होती. मी ही त्या घोळक्यात शिरून त्यांची स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न करत होतो. वही असलेला हात पुढे करून स्वाक्षरी मागत होतो. मी अगदी स्तब्ध उभा होतो. दिलीपसाहेब जागेवरून हलले नव्हते. काही कळायच्या आत ते रेस्टॉरंटमधून निघूनही गेले. मी त्यांच्या मागे धावलो; पण दिलीपसाहेबांची पाठमोरी आकृती कधी दिसेनाशी झाली हे कळलंदेखील नाही. त्यांची स्वाक्षरी घेण्याचं स्वप्नं अपूर्णच राहिलं. मी ओशाळलो, हताश झालो. स्वाक्षरी न मिळाल्याची खंत माझ्या चेहर्‍यावर दिसत होती. मी रेस्टॉरंटमधल्या टेबलावर येऊन बसलो. आई-वडिलांनी मला धीर दिला.

काळ् पुढे गेला. मी ही अभिनेता बनलो. मधल्या काळात मी त्यांच्यासोबत चित्रपटही केला, मात्र त्यांची स्वाक्षरी घेण्याची संधी मला ‘ब्लॅक’ या चित्रपटाच्या प्रिमियरदरम्यान मिळाली. राणी मुखर्जीने दिलीपसाहेबांना या चित्रपटाच्या प्रिमियरचं आमंत्रण दिलं होतं. त्यांनी चित्रपट बघितला. चित्रपट संपल्यानंतर ते माझी वाट बघत बाहेर थांबले होते. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले आणि माझ्या डोळ्यात बघत शांत उभे राहिले. त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. मात्र बोलक्या डोळ्यांमधून त्यांच्या भावना प्रतीत होत होत्या. आम्ही दोघंही निःशब्द होतो. दोन दिवसांनी माझ्या अभिनयाचं कौतुक करणारं पत्र त्यांनी पाठवलं. त्यावर दिलीपकुमार ही स्वाक्षरी होती. ही मला मिळालेली त्यांची पहिली स्वाक्षरी! तब्बल 46 वर्षांनंतर मला त्यांची स्वाक्षरी मिळाली होती. त्या दिवशी मी खर्‍या अर्थाने कृतकृत्य झालो होतो…







http://www.dailykesari.com/2021/07/08/an-institution-has-gone-whenever-the-history-of-indian-cinema-will-be-written-says-amitabh-bacchan/