बुधवार, १६ जून, २०२१

सूर्यवंशम ‘सोनी मॅक्स’वर वारंवार का दाखवला जातो?...

 

सूर्यवंशम ‘सोनी मॅक्स’वर वारंवार का दाखवला जातो?

तुमच्या आमच्या सारख्या प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होतो की, ‘सूर्यवंशम’ सारखा सारखा टिव्हीवर का दाखवला जातो? आज याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर उत्तर असं आहे की, या चित्रपटाचे १०० वर्षांचे राईट्स ‘सोनी मॅक्स’ने विकत घेतले आहेत. आतापर्यंत यामधील २१ वर्ष पूर्ण झाले असल्याने आणखी ७९ वर्ष आपल्याला हा चित्रपट टीव्हीवर पाहता येणार आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट २१ मे १९९९ रोजी प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी ‘सेट मॅक्स’ हे चॅनल लॉन्च झालं होतं. आता ‘सेट मॅक्स’ हे ‘सोनी मॅक्स’ झालं आहे. सूर्यवंशम आणि सेट मॅक्स चॅनल हे दोन्ही एकाच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आले. यानिमित्ताने चॅनलने चित्रपटाचे १०० वर्षांचे राईट्स विकत घेतले.

‘सूर्यवंशम’ चित्रपटाबाबत खास गोष्टी

सूर्यवंशम हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवमसम’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. ईव्हीव्ही सत्यनारायण यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून याचं चित्रीकरण गुजरात, हैद्राबाद, पोलोन्नारुवा आणि श्रीलंकामध्ये झालं होतं. बंगालमध्ये हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरला होता. तर कोलकाताच्या मेट्रो सिनेमामध्ये या चित्रपटाने १०० दिवस पूर्ण केले होते. तसेच चित्रपटात सौंदर्या आणि जयासुधा यांच्या आवाजासाठी अभिनेत्री रेखा यांनी डबिंग केलं होतं.

प्रमुख अभिनेत्रीचा पहिला आणि शेवटचा हिंदी चित्रपट

सूर्यवंशममध्ये अभिनेत्री सौंदर्या रघु हिने प्रमुख भूमिका साकारली होती. तिने १९९२ साली ‘गंधरवा’ या कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने कन्नड, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये एकूण १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सौंदर्याला ६ साउथ फिल्मफेयर अवॉर्ड मिळालेले आहेत. मात्र ‘सूर्यवंशम’ हा तिचा पहिला आणि शेवटचा हिंदी चित्रपट ठरला. कारण १७ एप्रिल २००४ साली सौंदर्या रघु हिचे बंगळुरुजवळ एका विमान दुर्घटनेत निधन झाले होते.








by-http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल