मंगळवार, २ मार्च, २०२१

उद्योगक्रमणा सहा दशकांची...

 

उद्योगक्रमणा सहा दशकांची

जगप्रसिध्द "विको" चे सर्वेसर्वा,कुशल उद्योजक,मँनेजमेंट गुरू, विचारवंत श्री.गजानन पेंढारकर ह्यांचे दुखद निधन.

मराठी माणसाला उद्योग करता येत नाही, हा समज साफ चुकीचा ठरवणारे, आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता मिळवून देणारे आणि संपूर्ण स्वदेशी औषधी उत्पादनं तयार करून 'विको'चा झेंडा सातासमुद्रापार फडकवणारे प्रसिद्ध उद्योगपती, 'विको' उद्योग समूहाचे अध्यक्ष गजानन पेंढारकर यांचं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. परळ इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गजानन पेंढारकर यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३४ चा. बुद्धिमत्ता आणि प्रयोगशीलता वारशानंच मिळालेली. त्याला त्यांच्या जिद्दीची जोड लाभल्यानं 'विको' नावाच्या रोपाचा बघता-बघता वटवृक्ष झाला. अहमदाबादमध्ये फार्मसीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, १९५७ मध्ये पेंढारकर वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले. संकुचित वृत्ती न ठेवता धाडस करायचं हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. त्याच दृष्टीनं ते कामालाही लागले. 


आयुर्वेदाची किमया पेंढारकरांना चांगलीच ठाऊक होती. ऋषिमुनींनी सांगितलेल्या या शास्त्राचाच आधार घेऊन त्यांनी विविध प्रयोग सुरू केले. सुरुवातीला, निरनिराळ्या प्रकारच्या २० दुर्मिळ जडीबुटी, वनस्पती आणि इतर औषधं वापरून संपूर्ण स्वदेशी आयुर्वेदिक टूथपेस्ट तयार करण्यात त्यांना यश आलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. अर्थात, आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता मिळवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. त्यासाठीही त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि अखेर यशही मिळवलं. 

सुरुवातीला, परळ येथे १२०० चौरस फुटाच्या जागेत 'विको'ची उत्पादने तयार होत असत. पण कामाचा व्याप हळूहळू वाढत गेला आणि पेंढारकांनी डोंबिवलीत ८० हजार चौरस फुट जागा घेऊन तेथे अत्याधुनिक कारखाना उभारला. आज नागपूर आणि गोव्यातही विकोची युनिट आहेत. आयुर्वेदाचं महत्त्व साऱ्यांनाच कळून चुकल्यानं 'विको'च्या सर्वच उत्पादनांना देश-विदेशातून मागणी आहे. आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेसह ४० देशांत 'विको' लोकप्रिय आहे. १९८० साली 'विको' ची वार्षिक उलाढाल फक्त ३ कोटींची होती. आज ती एक हजार कोटींच्या आसपास आहे. या उत्तुंग भरारीत गजानन पेंढारकर यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. 

उद्योगविश्वातील या अतुलनीय योगदानासाठी गजानन पेंढारकरांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. सगळी नीती-मूल्य जपत, ध्येयाने झपाटून काम केल्यास अशक्य काहीच नसतं, याचा आदर्श पेंढारकरांनी घालून दिला आहे. त्यांच्या निधनानं एक प्रयोगशील, अनुभवी आणि दूरदर्शी उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गजानन पेंढारकर यांनी लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाच्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये जबरदस्त प्रेरणादायी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या त्या व्याख्यानाचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

भाग 


भाग २



भाग ३



भाग 


Thanks : Mr. Atul Rajoli Sir

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल