मंगळवार, २ मार्च, २०२१

इंडक्शन प्रोग्राम - अतुल राजोळी...

 

इंडक्शन प्रोग्राम - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! काही वर्षांपुर्वी जेव्हा मी गाडी घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मला गाडी चालवताच येत नव्हती. आता गाडी घेणार हे ठरल्यामुळे मला गाडी शिकणं भाग होतं. त्यासाठी मी एका मोटर ट्रेनिंग स्कुलमध्ये गाडी शिकण्यासाठी दाखल झालो. मला सुरुवातीला गाडी चालवणे म्हणजे प्रचंड अवघड वाटायचे. कारण ड्रायवरच्या सीट वर बसल्यावर बोनेटच दिसत नाही! अ‍ॅक्सलरेटर, ब्रेक आणि क्लचं यांमध्ये नेहमी माझा गोधंळ उडायचा. स्टेअरींग नेमक्या कोणत्या पोजिशन मध्ये असताना चाकं सरळ असतात हे कळायचच नाही. कोणता गेअर कधी टाकायचा? सिग्नलची बटने, आणि त्यात तीन-तीन आरसे! मला गाडी चालवणे म्हणजे फार मोठं दिव्य काम वाटायचं. मोटर ट्रेनिंग स्कुलवाल्यांनी २१ दिवसांचा एक कार्यक्रम तयार केला होता. रोज सकाळी अर्धा तास मी गाडी चालवायला शिकण्यासाठी जायचो. माझ्या शिक्षकाने मला अगदी पहिल्या दिवसापासुन व्यवस्थित मार्गदर्शन केलं. पहिल्या दिवशी गाडी बद्दल मुलभूत गोष्टी सांगितल्या. मग मला गाडी सुरु व बंद करायला शिकवलं. मग गाडी पहिल्या गेअर वर चालवायला सांगितलं. पहिल्या- आठवड्यात थोडी भीती कमी झाली. दुसर्‍या आठवड्यात अजुन चांगला हात बसला. तिसर्‍या आठवड्यात गाडी थेट हायवे वर चालवली. फक्त २१ दिवसात मी बिनधास्तपणे गाडी चालवू लागलो, ते सुध्दा कोणाच्याही मदती शिवाय! गाडी चालवणं मला अशक्य वाटायचं परंतु एका पध्दतशीर पणे तयार केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मी गाडी चालवू लागलो. मित्रांनो, हे उदाहरण मी आपल्याला का सांगितलं? याचा आपल्या व्यवसायाशी काय संबंध? मला असं वाटतं की एक उद्योजक म्हणुन आपण आपल्या व्यवसायाअंतर्गत संघटना निर्मीतीवर लक्ष केद्रीत केलं पाहिजे. आपण आपल्या व्यवसायाचे लिडर आहात व लिडरने आपली एक जबरदस्त टीम तयार  केली पाहिजे. अशी टिम जी आपल्या व्यवसाया अंतर्गत विविध कामे चोखपणे आणि मनापासुन करेल. जर आपल्या टीमने त्यांची कामे चोखपणे करावी अशी आपली अपेक्षा असेल तर त्यांना तसं करण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे त्या मोटर ट्रेनिंग स्कुलच्या २१ दिवसांच्या  प्रशिक्षण कार्यक्रमाव्दारे मी व्यवस्थितपणे गाडी चालवायला शिकलो. त्याच प्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये विविध डिपार्टमेंटची कामे उत्कृष्टपणे करण्यासाठी कर्मचार्‍याची नेमणूक झाल्यावर, तो कामावर रुजु झाल्यावरचा सुरुवातीचा कालावधी तो एका विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे तयार झाला पाहिजे. व्यवसायामध्ये तयार केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला 'इंडक्शन प्रोग्राम' असं म्हणतात.   
नवीन कर्मचार्‍याला आपल्या संस्थेमध्ये व्यवस्थितपणे कार्यरत करण्यासाठी 'इंडक्शन प्रोग्राम'ची अत्यंत गरज असते. आपल्या व्यवसायामध्ये कामे ज्या विशिष्ट पध्दतीने चालतात त्याबाबत ओळख, मार्गदर्शन व अनुभव होण्यास कर्मचार्‍याला मदत व प्रशिक्षणाची गरज असते. इंडक्शन प्रोग्रामव्दारे ही गरज पूर्ण होते. 'इंडक्शन प्रोग्राम' म्हणजेच व्यवसायातील कर्मचार्‍याचे ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती व सवयी विकसीत करणे. कर्मचार्‍यांची कार्यक्षमता अपेक्षेप्रमाणे होण्यासाठी त्याला आवश्यक गोष्टींचा समावेश 'इंडक्शन प्रोग्राम' मध्ये झाला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या संस्थेमध्ये जे काम त्याच्यावर सोपवले जाणार आहे, ते काम कश्या प्रकारे केले जाते यासाठी त्याला मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्यासाठी 'ऑपरेशन मॅन्युअल' ची प्रचंड मदत होते व कर्मचार्‍याला सर्व गोष्टी आकलन करण्यास सोपे जाते. सुरुवाती पासुनच 'ऑपरेशन मॅन्युअल'चा वापर करायची कर्मचार्‍याला सवय लागते. कर्मचार्‍याचा 'इंडक्शन प्रोग्राम' पुर्ण झाल्यावर त्याला स्वतंत्रपणे कार्यरत होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, व पाठपुरावा करावा. प्रत्येक डिपार्टमेंट व पदासाठी वेगवेगळा इंडक्शन प्रोग्राम तयार करावा.     

परिणामकारक 'इंडक्शन प्रोग्राम' तयार करणे : इंडक्शन प्रोग्राम तयार करण्यासाठी कर्मचार्‍याच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने पुढाकार घेतला पाहिजे. व्यवस्थापकाने 'इंडक्शन प्रोग्राम' तयार करताना स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की, 'कर्मचार्‍याला परिणामकारकपणे कार्यरत करण्यासाठी त्याला कोणते ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती व अनुभवाची गरज आहे?' आणि गरजेप्रमाणे या गोष्टींचा एक प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्थापकाने तयार केला पाहिजे. हाच प्रशिक्षण कार्यक्रम त्या कर्मचार्‍याचा 'इंडक्शन प्रोग्राम' असतो. इंडक्शन प्रोग्राम चा कालावधी पदानुसार बदलु शकतो. काही दिवस, आठवडे किंवा महिने इंडक्शन प्रोग्राम असु शकतो. कर्मचार्‍याचे ज्ञान कौशल्य, प्रवृत्ती व अनुभव यांचा विकास करण्यासाठी पुढील विकास मार्गांचा उपयोग 'इंडक्शन प्रोग्राम' तयार करण्यासाठी व्यवस्थापकांना होऊ शकतो.

१) अभ्यास : 'इंडक्शन प्रोग्राम' दरम्यान कर्मचार्‍यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी त्याला विशिष्ट बाबींचा अभ्यास करायला दिला जाऊ शकतो. त्यामध्ये पुस्तके, ऑपरेशन मॅन्युअल, आर्टिकल, रिपोर्ट, वेबसाईट, रिसर्च पेपर इ. चा अभ्यास करायला दिला जाऊ शकतो.

२) प्रशिक्षण : कर्मचार्‍याला काही विशिष्ट विषयांचे प्रशिक्षण देणे जेणेकरुन त्याच्या क्षमता विकसित होतील. वैयक्तिक भेटी द्वारे प्रशिक्षण देणे, एखाद्या सेमिनार किंवा कार्यशाळेमध्ये त्याला सामिल करणे, विडीयो प्रोग्राम दाखवणे, प्रशिक्षणक्रम इ. व्दारे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. 

३) अनुभव : काही महत्त्वपुर्ण अनुभवांव्दारे कर्मचारी बर्‍याच गोष्टी लवकरात लवकर आत्मसात करु शकतो. उदाहरणार्थ : वरिष्ठ कर्मचार्‍याचे काम करताना निरिक्षण करणे, वरिष्ठ कर्मचार्‍याला सहकार्य करणे, एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये छोटी जबाबदारी पार पाडणे इ.

४) विशिष्ट कार्य : विशिष्ट कार्यामुळे सुध्दा कर्मचार्‍याची बौधिक व मानसिक क्षमता विकसित होते. उदाहरणार्थ : आव्हानात्मक कार्य पुर्ण करण्याची संपुर्ण जबाबदारी देणे; त्यामुळे कर्मचार्‍याचा आत्मविश्वास वाढतो.







मित्रांनो, लघु व्यवसायांमध्ये या विषयाला फारसे महत्त्व दिले जात नाही. परंतु लघुउद्योजकांना जर आपल्या व्यवसायाचा विकास करायचा असेल तर कार्यक्षम मनुष्यबळ असणे अत्यावश्यक आहे. मनुष्यबळ कार्यक्षम करण्यासाठी 'इंडक्शन प्रोग्राम' प्रचंड महत्त्वाची भुमिका बजावतो. 'इंडक्शन प्रोग्राम' बनवण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. परंतु त्यांना आचरणात आणल्यामुळे कर्मचारी तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. खुप कमी वेळात ते कार्यक्षम बनतात व व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवतात. जर कधी एखादा कर्मचारी तडका-फडकी सोडून गेला तर 'ऑपरेशन मॅन्युअल' व 'इंडक्शन प्रोग्राम' यांच्या आधाराने खुप कमी वेळे मध्ये नवीन कर्मचारी आधीच्या कर्मचार्‍याची जागा घेऊ शकतो.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


सकारात्मक वातावरण निर्मिती - अतुल राजोळी...

 

सकारात्मक वातावरण निर्मिती - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आपण व आपल्या व्यवसायातील कर्मचारी आपल्या कार्यस्थळामध्ये किंवा व्यवसायातील कामांना अनुसरुन दिवसातील किती वेळ देतो? सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती आपण काम करत असलेल्या कार्यस्थळामध्ये किंवा कामासाठी दिवसातून सरासरी आठ तास ते दहा तास वेळ देतो. बर्‍याच व्यक्तींच्या बाबतीत घरापेक्षा जास्त वेळ ते आपल्या कार्यस्थळामध्ये असतात. प्रत्येक उद्योजकाची अशी अपेक्षा असते की आपल्या व्यवसायातील कर्मचार्‍यांनी रोज कामासाठी उपस्थित असले पाहिजे, त्यांनी मनापासुन काम केले पाहिजे. त्यांनी आपले काम करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं पाहिजे. त्यासाठी स्वतःकर्मचार्‍यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. उद्योजकांच्या कर्मचार्‍यांकडून असणार्‍या अपेक्षा स्वाभाविक आहेत. व्यवसायामध्ये आपआपलं काम करण्यासाठीचं कर्मचार्‍यांची नेमणूक झालेली असते. परंतु मला असं ठाम पणे वाटतं की फक्त कर्मचार्‍यांची नेमणुक करुन व त्यांना सुरुवातीला काम पुर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देऊन प्रत्येक दिवस सळसळत्या उत्साहात ते काम करतील अशी अपेक्षा ठेवणे पुरेसे नाही. जर उद्योजकांची अशी अपेक्षा असेल की प्रत्येक दिवस कर्मचार्‍याने मोटिव्हेट होऊन जोशात काम करावे तर उद्योजकांनी व्यवसायाअंतर्गत सकारात्मक वातावरण निर्मिती केली पाहिजे.

प्रत्येक दिवस, प्रत्येक कर्मचार्‍याला वैयक्तिकरित्या मोटिव्हेट करणे हे उद्योजक व व्यवस्थापकांसाठी अशक्य आहे, परंतु उद्योजक आपल्या व्यवसायाअंतर्गत किंवा आपल्या कार्यस्थळामध्ये  जाणीवपुर्वकरित्या असे वातावरण निर्माण करु शकतात ज्यामुळे आपोआपच दररोज कर्मचार्‍यांमध्ये प्रेरणा संचारेल व ते उत्साहाने काम करतील. व्यवसायाअंतर्गत कार्यस्थळामध्ये जर सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण असेल तर प्रत्येक कर्मचार्‍याला रोज काम करण्याची आपसुकच इच्छा निर्माण होते, ते मनापासुन काम करु लागतात व त्यांना काम करत असताना आनंद मिळतो.
मित्रांनो, जगातील बलाढ्य व यशस्वी कंपन्या आज या विषयाला फार महत्त्व देत आहेत. जगातील उत्कृष्ट कार्यक्षमता असलेले, प्रतिभावंत कर्मचारी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या कंपन्या आपल्या व्यवसायाअंतर्गत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. कर्मचार्‍यांनी त्यांच्या कंपनीला नोकरी करण्यासाठी अधिक पसंती द्यावी व त्यांच्याकडे सध्या कार्यरत असलेले कर्मचारी जास्तीत जास्त काळासाठी टिकुन रहावेत यासाठी या मोठ्या कंपन्या विशेष कॄती करत आहेत. कर्मचार्‍यांसाठी काम करण्यासाठी जगातील सर्वोत्कॄष्ट कंपन्यांच्या Fortune मॅगझिनच्या यादीत सातत्याने अग्रगण्य क्रमांकावर असलेली कंपनी म्हणजे 'गुगल'! 'गुगल' आपल्या कर्मचार्‍यांना खुष ठेवण्यासाठी एका पेक्षा एक आगळ्यावेगळ्या संकल्पना राबवते. गुगलचे जगातील कोणतेही ऑफीस, हे ऑफीस कमी आणि अॅम्युजमेंट पार्क जास्त वाटते. असं वाटतच नाही की आपण कोणत्या ऑफीसमध्ये आलोय. इतकच नव्हे तर गुगल आपल्या कार्यस्थळाअंतर्गत सकारात्कम वातावरण निर्मिती करुन कर्मचार्‍यांना उत्पादनक्षम ठेवण्यासाठी विशेष कॄती योजना आखते. गुगलचे 'एच.आर.' डिपार्टमेंट त्यासाठी जबाबदार असते. कर्मचार्‍यांसाठी मोफत नाश्ता, मोफत दुपारचे-रात्रीचे जेवण, मोफत आरोग्य सेवा, मोफत हेअर्-कट, मोफत इस्त्री व ड्रायक्लीनींग, जिम व स्विमिंगपूल (कार्यस्थळाअंतर्गत!), व्हीडीयोगेम व इतर मनोरंजनाची साधने, कार्यस्थळात गरज लागल्यास डॉक्टर सेवा. इ. सुविधा गुगल पुरवते. 'गुगल'ला हे सर्व करण्यासाठी नक्कीच भरपुर खर्च येतो. परंतु त्यांचे कर्मचारी टिकण्याचे प्रमाण देखिल तितकेच जास्त आहे व नवीन कर्मचारी नेमणुकीसाठी लागणारा वेळ, पैसा व परिश्रम बर्‍याच प्रमाणात कमी होतात. सकारात्मक वातावरण निर्मितीचा 'गुगल' ला प्रचंड फायदा होतो. 'गुगल' चे  ४५,००० आनंदी, उत्साही व सामाधानी कर्मचारी गुगलच्या यशासाठी कारणीभुत आहेत.
मी आपल्याला एक आवाहन करतो, जर आपण लघुउद्योजक आहात आणि आपल्या व्यवसायाची, कर्मचार्‍यांची उत्पादन क्षमता आपल्याला वाढवायची असेल तर आपल्या कार्यस्थळामध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती करा. त्यासाठी मी आपल्याला काही टिप्स् देतो त्यांचा वापर करा.
१) आपल्या कार्यस्थळामध्ये असे वातावरण निर्माण करा जेणे करुन कर्मचार्‍यांच्या कार्याला अर्थ प्राप्त होईल व प्रत्येकाला काम करण्याचे कारण मिळेल. कर्मचार्‍यांना या गोष्टीची सदैव जाणीव असली पाहिजे की आपल्या कार्यामुळे आपल्या ग्राहकाच्या आयुष्यात व समाजामध्ये काहीतरी योगदान होत आहे!
२) कर्मचार्‍यांच्या मुलभुत गरजा व सुरक्षितता यांचा प्रामुख्याने विचार करा. जर त्या पुर्ण होत असतील तरच त्यांचे कामामध्ये लक्ष लागेल.
३) कर्मचार्‍यांनी केलेल्या कार्याबद्दल सतत दाद दिली गेली पाहिजे व त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. छोट्या चांगल्या कामगिरीची देखिल दखल घेणं गरजेचं आहे.
४) कार्यस्थळ सकारात्मक, सुंदर व प्रोफेशनल बनविण्यासाठी वेळ व पैसा Invest करा. कोणत्याही व्यक्तीला, त्याला न आवडणार्‍या ठिकाणी काम करायला मजा येणार नाही.
५) कर्मचार्‍यांचे प्रामाणिक प्रश्नं व अभिप्राय यांचा आदर व सन्मान करा. आपल्या विचारांना व मतांना जिथे किंमत असते, तिथेच आपण आपल्या भावना व्यक्त करतो. स्पष्टवक्तेपणाचा सराव करण्यास कर्मचार्‍यांना नेहमी उद्युक्त करा.
६) कर्मचार्‍यांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर द्या. प्रत्येक व्यक्ति आपल्या आवडत्या माणसांबरोबर राहणे पसंत करतो. जर आपल्या संस्थेतील सर्व कर्मचार्‍यांमध्ये घनिष्ठ मैत्री असेल तर कार्यस्थळी नियमितपणे येण्यास व काम करण्यास आपसुकच प्रेरणा मिळते.
७) आपल्या कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक कलागुणांना वाव द्या. त्यांच्या आवडीनिवडींना व छंदांना जोपसण्यास प्रोत्साहन द्या.
८) प्रत्येक कर्मचार्‍याबरोबर दृढ विश्वास प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या बरोबर अधुनमधुन वैयक्तिक संभाषण करा. त्यांच्या कुटूंबाबद्दल, वैयक्तिक ध्येयांबद्दल, अडचणींबद्दल मनमोकळे पणाने संवाद साधा.
९) संस्थेच्या कर्मचार्र्‍यांची संस्थेच्या प्रति व आपल्या कामाच्या प्रति, प्रचंड निष्ठा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी काही विशेष गोष्टी करा.
१०) कर्मचार्‍याला त्याच्या क्षमता विस्तारीत करण्याची संधी द्या. आव्हानात्मक कामे केल्याने कर्मचार्‍याच्या क्षमता विकसित होतात व त्याबद्दल त्याला समाधान वाटते व काम करण्याची जबरदस्त प्रेरणा मिळते. त्यासाठी कर्मचार्‍यांला प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी करा. नवीन कैशल्य व ज्ञान आकलन केल्याने कर्मचार्‍याची बौधिक गरज पुर्ण होते व ते उत्साहाने काम करतात.
११) प्रत्येक कर्मचारी चांगल्या मनःस्थितीत रहावा यासाठी काही यंत्रणा अथवा योजना तयार करा. आपण दिवसभरात जे काम करतो, त्याचा दर्जा आपल्या ज्ञान, कैशल्य व अनुभवापेक्षा त्या दिवसाच्या आपल्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतो.
वरिल प्रत्येक टिपचा वापर करा आणि आपल्या कार्यस्थळाच्या वातावरणामध्ये सकारात्मक परिवर्तन आणा!
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy









THANKS : MR. ATUL RAJOLI SIR

THE SUCCESS BLUEPRINT - एक अद्वितीय कार्यशाळा...

 

THE SUCCESS BLUEPRINT - एक अद्वितीय कार्यशाळा

आयुष्यात जे हवे आहे ते मिळवा!
एक अद्वितीय कार्यशाळा
आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद प्राप्तीसाठी...

यशस्वी होण्यासाठी आवश्यक सूत्रे एक दिवसीय कार्यशाळेमध्ये जाणून घ्या व आपल्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणा!

एक दिवसीय प्रेरणादायी कार्यशाळा जी आपल्याला कमीतकमी परिश्रमांमध्ये व कालावधीमध्ये जास्तीतजास्त्त यश मिळविण्यास मदत करेल.

या कार्यशाळेमध्ये अतुल राजोळी त्यांच्या खास शैलीत आपल्या आयुष्यात अमुलाग्र असे बदल घडवून आणण्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी तंत्र व मंत्र शिकवतील. ज्यांच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यात सर्व उद्दिष्टे साध्य करुन, उत्तुंग यशप्राप्ती करु शकाल व परिणाम स्वरुपी आपल्या आयुष्याचा दर्जा निश्र्चितच उंचावेल.
अतुल राजोळी यांनी खास या कार्यशाळेसाठी अतिशय चोखंदळपणे काही शक्तिशाली तत्वे निवडलेली आहेत जी आपल्याला आपल्या भावी जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, परिणामकारक निर्णय क्षमता व प्रखर उर्जा निर्माण करेल. या तत्त्वांच्या मदतीने आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने वेगवान प्रगती कराल.
ही सर्व पायाभूत तत्त्वे असून कोणत्याही वयाच्या व्यक्तिला आपले वैयक्तिक, व्यावसायिक अथवा शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. तसेच, ही सर्व तत्त्वे नैसर्गिक आहेत व कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तिसाठी अतिमहत्त्वाची अशी आहेत.

वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, व्यावसायिक उद्दिष्टे किंवा शैक्षणिक प्रगती... तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी व तुम्हाला जे हवे ते साध्य करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच मदत करेल.
या कार्यशाळेमध्ये आपण काय शिकाल
* हमखास यशाचा फॉर्म्युला
* आपल्याला जे हवे आहे ते कसे मिळवावे?
* आपल्याकडील अगाध सामर्थ्य
* यश आकर्षित करण्याचे अदभुत रहस्य
* आपल्या कृतीवर ताबा ठेवणारी अविश्वसनिय ताकद
* यशाची गुरुकिल्ली

ही कार्यशाळा कोणासाठी?
* उद्योजक व प्रोफेशनल्स
* स्वयंरोजगारकर्ते व नोकरदार
* गृहीणी व विद्यार्थी
* लिडर व मॅनेजर

दिनांक: मंगळवार, ४ ऑगस्ट २०१५
वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळ: मैसुर असोसिएशन सभागृह, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)

गुंतवणुक: रु. ३०००/- (१ जुलै २०१५ पर्यंत नाव नोंदणी केल्यास रु. १८००/- फक्त तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रु. १२०० फक्त)
प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्क: ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९
ऑनलाइन बुकींगसाठी पुढील लींकवर क्लीक करा: https://goo.gl/aTR6nP




THANKS : MR. ATUL RAJOLI SIR

संघ बांधणी - अतुल राजोळी...

 

संघ बांधणी - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आपण 'चक दे इंडिया' चित्रपट पाहिला आहे का? ज्या व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाअंतर्गत एक उत्कृष्ट संघ बांधणी करायची आहे, त्या व्यक्तीने हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे. हा चित्रपट भारतीय महिला हॉकी टीमच्या एका काल्पनिक कथेवर आधारीत आहे. चित्रपटामध्ये महिला हॉकी टीमचा कोच कबीर खान, हा विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने संघ बांधणी करतो. संघ बांधणी करत असताना त्याला बर्‍याच अडचणी येतात, परंतु विश्वचषक जिंकण्याची त्याची इच्छा तीव्र असते. ज्या महिला खेळाडूंना घेऊन त्याला संघ बांधणी करायची असते, सुरुवातीला त्याचा त्याला प्रचंड विरोध करतात. विश्वचषक जिंकणं तर दुरची गोष्ट, महिला खेळाडूंना एकमेकांबरोबर एक टीम म्हणून खेळणं हेच फार कठीण काम असतं. खेळाडूंचा स्वतःवर आत्मविश्वास सुद्धा नसतो की आपण विश्वचषक जिंकू शकतो. त्यांची शारिरीक क्षमता व क्रिडा कौशल्य देखिल प्रतिस्पर्धींच्या तुलनेत फार कमी असतात. या सर्व अडचणींवर मात करत हा भारतीय महिला हॉकीचा संघ विश्वचषक जिंकतो!
मित्रांनो, माझ्या मते या चित्रपटातून लघुउद्योजकांनी संघ बांधणीला अनुसरुन महत्त्वाचा धडा शिकला पाहिजे. जर आपण उद्योजक आहात, आणि व्यवसायाला एक संघटनात्मक स्वरुप देण्याच्या प्रयत्नात आहात तर, व्यवसायाअंतर्गत आपल्याला एक उत्कृष्ट संघ बांधणी करता आली पाहिजे. एका जबरदस्त टीम शिवाय आपण व्यवसायाचं भव्य ध्येय साध्य करणं निव्वळ कठीण आहे. उद्योजक फक्त स्वतःच्या कार्यक्षमतेच्या जोरावर फक्त एका विशिष्ट पातळीपर्यंतच प्रगती करु शकतात. व्यवसायाची आपल्या भव्य ध्येयाच्या दिशेने होणार्‍या पुढील वाटचाली दरम्यान उद्योजकाने संघ बांधणीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. संघ बांधणीच्या प्रक्रीयेदरम्यान उद्योजकाची भुमिका व्यवस्थापक किंवा लिडरची असते. संघ बांधणी प्रक्रीया ही कोणत्याही व्यवस्थापकासाठी सोपी नसते. परंतु संघ बांधणी प्रक्रीयेबद्दल योग्य मार्गदर्शनाच्या मदतीने व्यवस्थापक हा निर्णायक प्रवास नक्कीच करु शकतो. या लेखाद्वारे मी आपल्याला संघ बांधणीच्या प्रक्रीयेतील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल थोडक्यात सांगणार आहे. या टप्प्यांना समजुन घेतल्यानंतर निश्चितच आपण एका उत्कृष्ट संघाची बांधणी करु शकाल.
संघ बांधणीचे महत्त्वाचे चार टप्पे पुढील प्रमाणे असतात.
१) प्राथमिक टप्पा
२) अस्वस्थ टप्पा
३) अनुकूल टप्पा
४) अंमलबजावणी टप्पा
संघ बांधणीतील प्रत्येक टप्पा आपण थोडक्यात समजुन घेऊया.

१) प्राथमिक टप्पा :
हा संघ बांधणीचा पहीला टप्पा असतो. या टप्प्या दरम्यान व्यवस्थापक आपल्या संघामध्ये कर्मचार्‍यांची नेमणूक करतो. त्यांना संघाचे ध्येय सांगतो. त्यांना प्रेरीत करतो. त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण करतो. या टप्प्या दरम्यान कर्मचारी उत्सुक असतात. कर्मचार्‍यांना पुर्णपणे त्यांच्या भुमिकेबद्दल व कामाबद्दल स्पष्ट कल्पना आली असतेच असे नाही. व्यवस्थापकाच्या सुचनांचं पालन करणे हेच त्यांना ठाऊक असतं. व्यवस्थापक या टप्प्यादरम्यान प्रत्येकाला त्याच्या जबाबदारी बद्दल सविस्तर कल्पना देतो. या टप्प्यादरम्यान संघाचं ध्येय साध्य करण्यासाठी प्लान तयार केला जातो. संघातील कर्मचारी त्याप्रमाणे काम करण्यासाठी तयार होतात व हळूहळू काम करु लागतात आणि संघबांधणी प्रक्रीयेतील दुसर्‍या व अत्यंत निर्णायक टप्प्याची सुरुवात होते.

२) अस्वस्थ टप्पा :
या टप्प्यादरम्यान कर्मचारी ठरवलेल्या प्लान प्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करु लागतात. या टप्प्यादरम्यान एकमेकांबरोबर संवाद साधुन टिमवर्कने काम करणं महत्त्वाचं असतं. परंतु याच टप्प्यादरम्यान बर्‍याच अडचणी उद्भवतात. संघाने ठरवल्याप्रमाणे कामं होतातच असं नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार येणार्‍या अडचणींना सोडवू लागतो. या टप्प्यादरम्यान कर्मचार्‍यांम
ध्ये तणाव निर्माण होतो. बर्‍याच वेळा या कालावधीदरर्‍यानं कर्मचार्‍यांकडून चुका होतात. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप होऊ लागतात. वाद-विवाद होऊ लागतात. कर्मचार्‍यांचा विश्वास कमी होऊ लागतो. आपण आपलं ध्येय खरंच साध्य करु शकतो का? असा प्रश्न निर्माण होतो. कर्मचारी निराश होण्याची शक्यता जास्त असते. अश्या परिस्थितीत व्यवस्थापकाची भुमिका महत्त्वाची असते.

३) अनुकूल टप्पा :
अस्वस्थ टप्प्यादरम्यान कर्मचार्‍यांमध्ये तणाव निर्माण झालेला असतो. अस्वस्थ टप्प्या दरम्यान व्यवस्थापकाच्या महत्त्वाच्या भुमिकेमुळे हळूहळू संघबांधणीच्या तिसर्‍या टप्प्याची सुरुवात होते. अनुकूल टप्प्यादरम्यान कर्मचारी आपापसातील वाद-विवाद मिटवतात. कर्मचार्‍यांना एकमेकांची बलस्थाने व कमतरता कळू लागतात. ते एकमेकांना समजुन घेऊ लागतात. व्यवस्थापकावर त्यांचा विश्वास वाढतो. कर्मचार्‍यांमध्ये मैत्रीचे संबंधं प्रस्थापित होतात. एकमेकांना ते सहकार्य करु लागतात. त्यांच्यातील संभाषण सुधारते व ते एकमेकांना सुधारणेबाबत अभिप्राय देतात. एक संघ म्हणुन सगळे एकजुट होतात व हळूहळू संघाची प्रगती होऊ लागते. बर्‍याच संघटनांमध्ये अस्वस्थ टप्प्याच्या दरम्यानच संघाला अपयश येते. अस्वस्थ टप्पा ते अनुकूल टप्पा हा प्रवास कोणत्याही संघासाठी निर्णायक असतो. बहुतांश प्रमाणात अस्वस्थ टप्पा ते अनुकूल टप्पा हा प्रवास मोठ्या कालावधीचा असतो.

४) अंमलबजावणी टप्पा :
चौथ्या टप्प्यात संपूर्ण टिम जबरदस्त कामगिरी करु लागते. कोणत्याही प्रकारचा तणाव न बाळगता संघ ठरवल्या प्रमाणे काम करतो. आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रत्येक कर्मचारी 
प्लान प्रमाणे परिश्रम घेतो. व्यवस्थापक या टप्प्याच्या दरम्यान आपली संपुर्ण जबाबदारी टिमवरच सोपवतो. संघाची कामगिरी उच्च दर्जाची असते. विशिष्ट यंत्रणा व संघटनात्मक रचनेमुळे अंमलबजावणी साध्य होते.
मित्रांनो, संघबांधणीच्या प्रक्रीयेदरम्यान व्यवस्थापकाची भुमिका फार महत्त्वाची असते. मला खात्री आहे की या संघ बांधणी प्रक्रीयेच्या टप्प्यांच्या ज्ञानामुळे आपण आपल्या व्यवसायाअंतर्गत संघ बांधणी करण्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकाल.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन


संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in


'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


Thanks : Mr. ATUL RAJOLI Sir 

भावी नेतृत्व - अतुल राजोळी...

 

भावी नेतृत्व - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! एक आदर्श व उत्कृष्ट व्यवसायाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला एक प्रभावी लिडर बनणे गरजेचे आहे. व्यवसायिक संघटनेला यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा दाखवणारा, व त्या दिशेने निर्भिडपणे वाटचाल करणार्‍या लिडरची अत्यंत गरज असते. कोणत्याही यशस्वी व्यवसायाचा जर आपण अभ्यास केलात तर असे लक्षात येईल की व्यवसाय यशस्वी करण्यामागे त्या व्यवसायाच्या संचालकाने लिडरची भूमिका प्रभावीपणे पार पाडली. इंन्फोसिस या कंपनीने आय.टी. क्षेत्रातील जगात आपले स्थान निर्माण करणार्‍या भारतीय कंपनीचे संस्थापक व संचालक श्री. नारायण मुर्ती यांनी उत्कृष्ट नेतृत्वाव्दारे कंपनीची प्रगती केली. जनरल इलेक्ट्रीक या कंपनीचे माजी सी.ई.ओ. जॅक वेल्च यांनी General Electric ला आपल्या जबरदस्त लिडरशिपने दिशा दाखवली. आपल्या व्यवसायाची दुरगामी ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याव्दारे व्यवसायाला एक उत्कृष्ट नेतृत्व प्राप्त होणे आवश्यक आहे.

मित्रांनो माझं असं ठाम मत आहे, की उद्योजक आपल्या व्यवसायाअंतर्गत सर्व कामे डेलिगेट करु शकतो परंतु नेतृत्वाचं कार्य उद्योजक डेलिगेट करु शकत नाही. आपण 'लगान' हा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेला चित्रपट पाहिला असेलच या चित्रपटामध्ये, स्वातंत्रपुर्वीच्या काळामध्ये एका लहान गावातील सर्वसाधारण गावकरी इंग्रज अधिकार्‍यांबरोबर क्रिकेटचा सामना जिंकतात व संपुर्ण प्रांताचा कर माफ करुन घेतात. माझ्यामते प्रत्येक उद्योजकाला या चित्रपटातून नेतृत्वाचे धडे गिरवले पाहिजेत. मला आवडलेली एक लिडरशिपची व्याख्या, 'लिडरशिप' म्हणजे साधारण माणसांकडून असाधारण कामगिरी करवून घेण्याची क्षमता असणे. 'लगान' चित्रपटात जी माणसं इंग्रजांविरुध्द क्रिकेट खेळतात ती आधी कधीच क्रिकेट खेळलेली नसतात परंतु चित्रपटाचा नायक व त्यांच्या संघाचा कर्णधार भुवन त्यांच्याकडून ही असाधारण कामगिरी करवून घेण्याचा प्रताप करतो. लघुउद्योजकांनी आपल्या व्यवसायाअंतर्गत कर्मचार्‍यांकडून असाधारण कामगिरी करवून घेण्यासाठी स्वतःमध्ये नेतृत्व गुण आत्मसात केले पाहिजेत.

या लेखाद्वारे मी आपल्याला स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. मी आपल्याला प्रभावी लिडरच्या ७ सवयींबद्दल सांगणार आहे. आपण जर या ७ सवयी स्वत:ला लावल्यात तर मी ठामपणे सांगु शकतो की आपण एक प्रभावी लिडर व्हाल व आपल्या टिमची कामगिरी उंचावेल.

प्रभावी लिडरच्या ७ सवयी :
१) कामाला कारणाची जोड देणे : प्रत्येक व्यक्तीला अर्थपुर्ण जीवन जगायची इच्छा असते. जेव्हा व्यक्तीला रोज सकाळी उठण्याचे कारण मिळते तो प्रेरीत होऊन काम करतो. जगण्याला उद्देश प्राप्त होणे गरजेचे आहे. प्रभावी लिडर आपल्या व्यवसायाचा 'पायाभूत उद्देश' आपल्या कर्मचार्‍यांच्या मनात बनवतो मग कर्मचारी कामाकडे  कष्टाच्या स्वरुपात पाहत नाहीत. त्यांना त्यामधून आनंद प्राप्त होतो. कोणत्याही व्यक्तीला आपण काहीतरी असाधारण कार्य करत आहोत याची जाणीव त्याच्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बाहेर काढण्यासाठी निश्चितच कारणीभुत ठरते. आपल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामगिरीमागील मोठे कारण दाखवा. जेवढा 'का'? मोठा, तेवढी काम करण्यासाठी जास्त प्रेरणा त्यांना मिळते. मोठी प्रेरणा आपण महत्त्वाचं योगदान करत आहोत या भावनेने मिळते.
२) उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासणे : प्रभावी लिडर आपल्या टिमबरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित करतो. आपल्या टिम बरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तो विशेष प्रयत्न करतो. आपल्या टिमबरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित केल्यामुळे तो आपल्या टिमचा विश्वास जिंकतो. त्यांच्या भावना, अपेक्षा व अडचणी समजून घेतो. प्रभावी लिडर आपल्या टिमला जेव्हा गरज पडेल तेव्हा आधार देतो. आपल्या टिमला दिलेला शब्द पाळण्यासाठी तो वचनबध्द असतो. आपल्या संघटनेअंतर्गत विश्वास निर्माण करण्यासाठी पारदर्शकता ठेवतो. संघटनेअंतर्गत कर्मचार्‍यांना खात्री असते की आपल्या लिडरला आपल्याबद्दल प्रचंड काळजी आहे. त्यामुळे ते त्याच्याशी व संघटनेशी एकनिष्ठ होतात. 
३) उत्कृष्ट संघबांधणी करणे : प्रभावी लिडर हा एक उत्कृष्ट प्रशिक्षक देखिल असतो. आपल्या कर्मचार्‍यांना तो उच्च कामगिरीसाठी मार्गदर्शन करतो. आपल्या कर्मचार्‍यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्याचं तो कौतुक करतो. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना विशेष पुरस्कार किंवा बक्षिस देतो. कर्मचार्‍यांच्या प्रत्येक छोट्या व चांगल्या कामगिरीसाठी तो शाबासकी देतो. कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी त्याने केलेल्या कामाची कदर होते अश्याच ठिकाणी काम करायला आवडते.
४) सतत सुधारणा करणे : आपल्या व्यवसायाअंतर्गत चांगले व नवीन बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी लिडर नेहमी पुढाकार घेतो. जगात होणार्‍या वेगवान बदलाला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी प्रभावी लिडर आपल्या संघटने अंतर्गत कर्मचार्‍यांची कार्यक्षमता विकसित करण्यावर भर देतो. काम करणाच्या पध्दतीमध्ये बदल घडवून आणतो.
५) वेळेचे नियोजन करणे : प्रभावी लिडर त्याच्या वेळेचे नियोजन काटेकोरपणे करतो. व्यवसायासाठी महत्त्वाच्या गोष्टींना तो प्राधान्य देतो. प्लानिंगवर भर देतो. विचार मंथन करतो. त्यामुळे तो संतुलित जीवन जगतो. व्यवसायाची प्रगती त्याच्या नियंत्रणात होते.
६) स्वतःचे नेतृत्व करणे : प्रभावी लिडर नेहमी स्वतःला योग्य दिशा देण्यासाठी अपडेटेड ठेवतो. स्वतःसाठी वेळ देतो. स्वतःला प्रफुल्लीत ठेवण्यासाठी जाणिवपुर्वकरित्या कृती करतो. स्वतःचे ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करतो. ज्यामुळे संघटनेला योग्य दिशा देण्यासाठी तो मानसिक, भावनिक व बौधिकी सक्षम राहतो. 
७) नवीन कल्पना व नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे :  प्रभावी लिडरला माहीती असतं की प्रगती करण्याचा राजमार्ग असतो की नवनवीन प्रयोग करत राहणे, चुकांमधुम शिकणे व नवनिर्मितीला चालना देणे. प्रभावी लिडर जोखिम घेण्यास घाबरत नाही. आपल्या कर्मचार्‍यांनासुद्धा नवीन काहीतरी करण्याचे स्वातंत्र देतो. कार्यस्थळामध्ये कल्पकतेला प्रोत्साहन देतो.





मित्रांनो प्रभावी लिडरच्या ७ सवयी मी आपल्याला फार थोडक्यात सांगितल्या आहेत. माझ्या उद्योजकीय नेतृत्व विकास कार्यशाळांमध्ये हाच विषय मी सखोलपणे शिकवतो.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in


'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

Thanks Mr. Atul Rajoli Sir

माझ्याबद्दल