मंगळवार, १७ मार्च, २०२०

तुम्हाला माहित आहे का, आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणजे काय ?..






टीम महाराष्ट्र देशा : चीनमध्ये उगमस्थान असणाऱ्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर, तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. भारतातही आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ३१ वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत.

या पार्श्वभूमीवर कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा कायदा लागू केला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांची; तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणजे काय, तो केव्हा आणि का लागू केला जातो.

– आपत्ती म्हणजे काय ? किंवा आपत्ती कशास संबोधता येईल?
आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित , आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात. देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू आहे. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.


– आपत्ती व्यावस्थापन कायदा म्हणजे काय ?
भारतात १९९३ साली ओडिशाच्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून धोक्यांचा आणि त्यापासून उद्भवणाऱ्या आपत्तींचा सर्वंकष अभ्यास केला. तसेच भारताने आपत्ति दरम्यान मदतकार्यासाठी व्यवस्थापनातील सगळे विभाग, शास्त्रीय संशोधनातील संस्था, शिक्षण संस्था आणि सामान्य जनसमुदाय तसेच बचावकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड कळून चुकली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) हा संसदेत २५ डिसेंबर २००५ साली पारीत झाला. आपत्ती व्यवस्थापनाचे धोरण आणि आराखडा तयार करण्याची तरुतूद कायद्यात आहे.

-आपत्तीचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते ? आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे कोणते आहेत?
1) आपत्ती पूर्व व्यवस्थापन – यामध्ये प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे.
2) आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन- प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी मदत कार्याचे नियोजन करणे व मदत यंत्रणा मध्ये समन्वय राखणे.
3) आपत्ती नंतरचे व्यवस्थापन- आपत्ती नंतर करावे लागणारे मदत कार्य नियंत्रित करणे, मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करणे.


– आपत्ती व्यवस्थापन कायदा कोण लागू करु शकतो?
कोणत्याही प्रकारची आपत्ती लागू करताना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरीय समितीचे प्रमुख आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतात. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान, राज्यपातळीवर मुख्यमंत्री, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी हा निर्णय घेतात.

भारतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये खालील 4 समिती/संस्था महत्वाची भूमिका पार पडतात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(NDMA), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती तयार केली जाते ज्याचे कायमस्वरुपी अध्यक्ष पंतप्रधान असतात. पंतप्रधान 9 तज्ज्ञांची नेमणूक करतात, येणाऱ्या आपत्तींबाबत माहीत देतात. राज्यस्तरावर या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात.

















By - https://maharashtradesha.com/do-you-know-what-the-disaster-management-act-is/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल