बुधवार, १० जुलै, २०१९

महासागरांच्या पोटात...

महासागरांच्या पोटात
डॉ. विनय देशमुख
Friday, June 07 | 12:15 PM
Share this story    

पृथ्वीतलावरील सुमारे एक्काहत्तर टक्के भाग सागरांनी व्यापलेला आहे, तरीदेखील आजच्या घडीला जेवढे ज्ञान माणसाला आकाशातील ग्रह आणि ताऱ्यांविषयी आहे, त्याच्या तीळमात्रसुद्धा ज्ञान सागरात काय दडले आहे, याबद्दल नाही, असे म्हटले जाते. पृथ्वीवर विस्तीर्ण असे ५ महासागर व आकाराने लहान ६४ समुद्र (सागर), सामुद्रधुनी व उपसागर आहेत. पॅसिफिक (प्रशांत), अटलांटिक, इंडियन (हिंदी), आर्क्टिक व अंटार्क्टिक किंवा दक्षिणी महासागर पृथ्वीवरच्या खंडांना विभागतात आणि इतर सर्व महासागरांच्या कानाकोपऱ्यात व भूभागांनी वेढलेले आहेत. महासागरांची विशालता, भयानक वादळे व प्रचंड खोली यांमुळे मनुष्याच्या मनी नेहमीच भीती आणि त्यापोटी असलेली उत्सुकता होती. परंतु व्यापार आणि नवे जग किंवा देश शोधण्याची धाडसी मानवी वृत्ती आणि तिला मिळालेली खगोलशास्त्रीय अभ्यासाची जोड यांतून सागरी प्रवासाची दिशा व अंतर यांचे ज्ञान प्राप्त झाले, आणि महासागरांची उपयुक्तता व महत्त्व वाढले.             

महासागरांचा अभ्यास मात्र तितकासा लवकर म्हणजे व्यापारी-समुद्रमार्ग सोडल्यास सोळाव्या शतकापर्यंत झाला नाही. याला मुख्य कारण म्हणजे सागरांची खोली आणि तिथे असलेला पाण्याचा प्रचंड दाब! पृथ्वीवरील सागरांची सरासरी खोलीच ३,७०० मीटर इतकी प्रचंड आहे. प्रशांत महासागरात असलेली मारियाना घळ ही ११,००० मीटर खोल आहे... म्हणजे इतकी खोल, की तिथे हिमालय पर्वत हा आपल्या एव्हरेस्ट शिखरासकट बुडून त्याच्यावर पुन्हा दोन किलोमीटर पाणी राहू शकेल! अशा प्रचंड खोलीमुळे १९५० सालापर्यंत सागरतळाशी जाण्याचे माणसाचे अनेक प्रयत्न तंत्रज्ञानाअभावी निष्फळ ठरले. या प्रकाशहीन वातावरणात प्राणिसृष्टी नसावी, असाही समज होता. परंतु या खोल सागरातही वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी दडली आहे. या जीवसृष्टीची ओळख करून घेण्यापूर्वी सागराखालची भूरचनाही आपल्याला माहीत हवी.

किनारपट्टीलगतचे सागराचे क्षेत्र हे भरती-ओहोटीचे क्षेत्र (आंतरभरती) असून दररोज साधारण बारा तासांनी समुद्राला येणाऱ्या भरतीला ते तुडुंब भरते तर ओहोटीला ते उघडे पडते. हा आंतरभरती भाग समुद्रकाठी फिरणाऱ्या सर्वसामान्यांच्या ओळखीचा असतो. त्यापुढील समुद्राच्या दोनशे मीटर खोलीपर्यंतचा भाग हा उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जगभरातील मासेमारी मुख्यतः याच भागात केली जाते, तसेच बऱ्याचशा तेल व वायू विहिरी याच भागात उत्खनन केल्या आहेत. किनाऱ्यावरील वाळूतून आपण सरळ समुद्रात चालत गेलो तर सुरुवातीचा उतार संथ असतो. हा समुद्रात शिरलेला जमिनीचा भू-भाग असून या ‘भूखंडीय मंचाची’ उतरण किंवा रुंदी भरतीच्या रेषेपासून वेगवेगळी असू शकते. यानंतर मात्र खोल समुद्र सुरू होतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, मुंबईला लागून असलेला भूखंडीय मंच खूप रुंद असून तो दोनशे किलोमीटरपर्यंत समुद्रात शिरला आहे, तर कन्याकुमारीला तो केवळ २५ ते ४० किलोमीटर इतकाच आहे. म्हणजे, खरा खोल समुद्र मुंबईपासून दूर अंतरावर आहे, पण केरळ व कन्याकुमारीला तो जवळ आहे.

समुद्राच्या पाण्याखाली साधारणपणे शंभर-दीडशे मीटर खोलीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो. त्यामुळे या प्रकाशित भागात हरितद्रव्ये असलेली एकपेशीय वनस्पतीप्लवके, शैवाल, तसेच वनस्पतींच्या विविध प्रजाती आढळतात. त्यांची वाढ प्रकाशसंश्लेषणाद्वारे होत असते. या वनस्पतींना खाऊन प्राणिप्लवके जगतात. या प्लवकांवर छोटे प्राणी व माशांची गुजराण होऊन समुद्रातील अन्नसाखळी निर्माण होते. या प्रकाशमान भागातील पाण्याचे तापमान व परिस्थिती जीवसृष्टीच्या वाढीस पोषक असते. म्हणून समुद्रातील हा भाग सर्वात जास्त उत्पादक असतो. जगभरातील जवळपास नव्वद टक्के मत्स्योत्पादन याच क्षेत्रात होते. या भागातील सागरतळ हा शंख-शिंपले, संधिपाद प्राणी, खेकडे, प्रवाळ, तारामासे, समुद्रकाकडी, समुद्रपंखे अशा बहुविध आणि बहुरंगी जीवसृष्टीने समृद्ध असतो. इतकेच नव्हे तर सागरी कासवे, डॉल्फिन व अनेक प्राण्यांच्या वैविध्यपूर्ण प्रजातीही येथे दिसून येतात. तसेच, भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणाऱ्या किनाऱ्यावरील जागेत कृमी, किडे, वाळूत लपून राहणाऱ्या तिसऱ्या, कालवे, खुबे व शंख-शिंपल्यांची विविधता बहरते. किनाऱ्यापासून फारशी खोलवर आणि दूर नसलेली उथळ समुद्रातील ही जीवसृष्टी आपल्याला बहुतांश ज्ञात आहे. या २०० मीटरपर्यंत भू-खंडीय भागात अनेक लक्ष वर्षांपूर्वी डायअॅटम वर्गातील एकपेशीय वनस्पतींचे पाण्याच्या प्रचंड दाबाने व भूस्तरीय हालचालीने क्रूड तेल व वायूत रूपांतर झाले व तेच आपण मोटारी व कारखान्यांत वापरत आहोत. हा भूगर्भीय साठा मर्यादित असून काही काळातच संपुष्टात येईल.      

सुमारे दोनशे मीटर खोलीनंतर समुद्रतळाचा उतार तीव्र होतो व पाण्याची खोली चार हजार मीटरपर्यंत वाढत जाते. त्यानंतरचा तळ सर्वसाधारणपणे सपाट असला तरी याचा काही भाग हा उंच पर्वतरांगा व अतिखोल घळींनी व्यापलेला असतो. दोनशे मीटरपेक्षा अधिक खोल असलेल्या समुद्राच्या पाण्यात सूर्यप्रकाश कमी प्रमाणात पोचतो. येथे सुमारे आठशे मीटर खोलीपर्यंत निळसर-हिरवट रंगाचा मंद प्रकाश जाणवतो. या क्षीण प्रकाशात वनस्पती व हरितप्लवके वाढू शकत नाहीत. या भागातील प्राणिप्लवकांचे प्रमाण वरच्या प्रकाशित भागातील प्राणिप्लवकांच्या प्रमाणाच्या तुलनेत एकदशांशसुद्धा नसल्याने येथे अन्नाची उपलब्धता कमी असते. त्यामुळे येथे जैविक पदार्थांचे प्रमाण एकूणच तुटपुंजे असते. इथले प्राणी पाण्याच्या वरच्या थरांतून तरंगत खाली येणाऱ्या अन्नावर अवलंबून असतात. पाण्याच्या वरच्या थरातील प्लवके, प्राण्यांची विष्ठा, मृत प्राणी येथे पोचतात. या भागात पोचणाऱ्या मृत जीवांच्या शरीराच्या कुजण्याच्या प्रक्रियेतील जिवाणूवाढीमुळे जिवाणूयुक्त आकारहीन कण सेंद्रिय गाळाच्या स्वरूपात तयार होतात. हा गाळ पावसाच्या थेंबांसारखा सतत खाली पडत असतो. त्यांना झेलून खाण्यासाठी अतिशय छोटे मिक्टोफिड माशांचे थवे, मोठ्ठा ‘आ’ केल्यासारखे आपले जबडे उघडून वावरत असतात. पृथ्वीवरच्या या मिक्टोफिड माशांचे वस्तुमान सुमारे पावणेसहा अब्ज टन इतके प्रचंड म्हणजे दरवर्षी जगभरात होणाऱ्या मासेमारीच्या पाचपट आहे! सुदैवाने यांची मासेमारी होत नाही. सेंद्रिय गाळ जरी इथल्या प्राणिमात्रांचे प्रमुख अन्न असले तरीही मिक्टोफिड माशांना खाणारे वैविध्यपूर्ण भक्षक मासे व प्राणीही येथे आढळतात. पाण्याच्या या थरातील कुजण्याच्या क्रियेमुळे येथे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. या संकटाला इथले प्राणी तोंड कसे देतात हे गूढ आहे. येथे एकूणच प्राणीवस्ती विरळ असते; तसेच येथे जे प्राणी आढळतात त्यांच्या हालचालीही संथ असतात, जेणेकरून ऑक्सिजनची गरज कमीत कमी राहील. भूमध्य समुद्रतळातील १९८३ साली सापडलेला लोरीसिफर नावाचा सूक्ष्म प्राणी प्राणी कायम ऑक्सिजनविरहित अवस्थेत कसा राहतो हे गूढ अजून सुटलेले नाही.

पाण्यात दोनशे मीटरच्या खोलीपर्यंत राहणारे आणि त्याखाली राहणारे मासे व प्राणी सहसा वर-खाली स्थानांतर करत नाहीत. कारण समुद्राच्या वरच्या भागातील पाणी काहीसे कोमट असते, तर खालच्या भागातील पाणी थंड असते. मात्र इथले मिक्टोफिड मासे रात्री, प्राणिप्लवकांचे सेवन करण्यासाठी पाण्याच्या वरच्या थरात स्थानांतर करतात व दिवसा भक्षकांपासून दूर राहण्यासाठी खालच्या कमी प्रकाश असलेल्या पाण्यात लपून राहतात. हे मासे वैशिष्टपूर्ण असतात. त्यांच्या उदरात हवेची पिशवी असून त्यातील हवेचा दाब कमीअधिक करून ते पाणबुडीप्रमाणे पाण्यात वरखाली ये-जा करू शकतात. त्यांचे मोठे डोळे, रुंद जबडा आणि शरीराच्या दोन्ही अंगांना अंधारात चमकणारे आठ-दहा स्वयंप्रकाशी जैवअनुदीप्ती (बायोफ्लुरेसन्ट) ठिपके, प्राणिप्लवके पकडण्यास मदत करतात. चमकण्याच्या या गुणधर्मामुळे यांना इंग्रजीत लॅन्टर्न फिश म्हटले जाते.

समुद्राच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी ध्वनिपरावर्तन यंत्रातून सोडलेल्या लहरी या माशांच्या उदरातील पिशवीमुळे परावर्तित होऊन जहाजाच्या कप्तानाला सागराच्या खोलीचा चुकीचा अंदाज देऊन दिशाभूल करतात. याच चकवेगिरीचा फायदा घेऊन दुसऱ्या महायुद्धात पाणबुड्या या माशांच्या थव्याखाली लपवल्या जात असत. मात्र प्रचंड दाब असलेल्या खोल समुद्रातून हवेची पिशवी असलेले हे मासे पकडून वर आणले की पिशवी फुटून मासे विदीर्ण होऊन त्यांच्या मांसाचा चिखलासारखा गोळा होतो. अरबी समुद्रात पावसाळा संपताना दोनशे मीटर ते एक हजार मीटर खोलीवरून जेव्हा मिक्टोफिड मासे जाळ्यात येतात, तेव्हा त्यांचा असाच चिकट गोळा होतो म्हणून आपले मच्छीमार त्यांना ‘चिकटा’ किंवा ‘गिम’ म्हणतात.       

साधारणपणे एक हजार मीटरपेक्षा अधिक खोल पाण्यात प्रकाश अत्यंत अंधूक असतो. या पाण्यात माशांच्या रंगी-बेरंगी दुनियेची वानवा असते. तरीदेखील इथले अनेक प्राणी लाल रंगाचे असतात, कारण लाल रंगाच्या प्रकाशलहरी सागराच्या पाण्यात शोषल्या जातात व त्यामुळे इथल्या पाण्यात प्रकाश निळसर-हिरवा दिसतो. लाल रंग पाण्यात शोषला जात असल्याने, अंधुक प्रकाशात लाल रंगाची प्रतिमा काळी दिसते व या लालरंगी भक्ष्यांचा भक्षकांपासून बचाव होतो. परंतु इथले स्वयंप्रकाशी जैवअनुदीप्ती असणारे मासे मात्र प्रकाशाची उघडझाप करत भक्ष्यावर नजर ठेवतात. इथल्या प्राण्यांची दृष्टीदेखील बहुतांशी रंग न ओळखता येणारी अशी पांढरी-काळी असते. ऑक्टोपससारखे महाकाय नळ (स्क्वीड) व माकलीदेखील (कटलफिश) तांबड्या रंगाचे असतात. इथले शक्तिशाली ताडमासे (स्वोर्डफिश) व देवमासे (स्पर्मव्हेल) हे पाण्याच्या वरच्या थरात सहज फेरफटका मारून येतात. सुळ्यासारखे दात असलेले, भयंकर दिसणारे छोटे मासे येथे आढळतात, तर काही रिबिनीसारखे लांब पण चपटे सुमारे बारा मीटर लांबीचे ओअर मासे येथे आढळतात. अॅरगायरोपेलेकस या माशाच्या शरीराच्या दोन्ही बाजू आरशासारखा, प्रकाश परावर्तित करतात त्यामुळे स्वयंप्रकाशी जैवअनुदीप्ती मासे गोंधळून जाऊन याचे भक्ष्य बनतात. इथले काही मासे मात्र काळे अथवा तपकिरी रंगाचे असतात, ते सहसा भक्षकाला सहजासहजी दिसत नाहीत.

जसजसे खोल जाऊ तसतसे पाणी थंड होऊन लागते व त्याचे तापमान चार अंश सेल्सिअसपर्यंत पोचते. त्याचबरोबर येथे पाण्याचा दाबही वाढलेला असतो. दर दहा मीटर खोल पाण्यात हा दाब समुद्रसपाटीवरच्या दाबाच्या दुप्पट  वाढतो. चार हजार मीटर खोलीवरचा दाब हा समुद्रसपाटीवरील दाबाच्या तुलनेत चारशे पट इतका प्रचंड असतो. या प्रचंड दाबाने मासेच नव्हे तर त्यांचे शरीर सर्वसाधारणपणे ज्या जैविक रेणूंचे बनलेले असते तेदेखील चिरडून त्यांची रचना बदलू शकते. यामुळे इथल्या काही माशांचे शरीर जेलीसारखे असते. जेलीतील मांसउतींचे जैविक रेणू अशा प्रचंड दाबाला प्रतिकार करू शकतात. या माशांच्या शरीरातील सेंद्रिय रेणूंपैकी एक रेणू म्हणजे ट्रायमिथिल-अमायीन-ऑक्साइड हा असून मासे खाणाऱ्यांना तो परिचित असतो. माशांना असणारी मंद हिंवसाण ही याच रेणूंमुळे येते. खोलीनुसार वाढत्या दाबाचा प्रतिकार करण्यासाठी माशांच्या शरीरातील ट्रायमिथिल-अमायीन-ऑक्साइडचे प्रमाण खोलीनुसार वाढत जाते.

क्षीण अंधुक प्रकाश आणि मोजकी संख्या यामुळे नर माशांना मादीस हुडकणे कठीण असते, त्यामुळे त्यांच्या  जननक्रियेत व पुनरुत्पादनात अडचणी येतात. अँग्लर नर मासे त्याच्या नाकासमोर असलेल्या गळदोरीतील जैवअनुदीप्ती प्रकाशाची विशिष्ट प्रकारे उघडझाप करून मादीस निमंत्रित करतात. वस्तुतः गळदोरी व तिच्या टोकावरील अनुदीप्ती भक्ष्याला तोंडाजवळ आकर्षून पकडण्यासाठी असते. या काळोखात वसती करणाऱ्या काही प्रजातीत नर इतका लहान असतो की तो मादीच्या शरीराला चिकटून परजीवी बनतो त्यामुळे प्रजनन सोपे होते.

सुमारे चार हजार मीटर या खोलीवरच्या सागरतळावर उंच-सखल भाग, पर्वतरांगा व शेकडो-हजारो किलोमीटर खोल घळींना सुरुवात होते. येथे पाणी शून्याखाली एक अंश सेल्सिअस इतके अतिथंड असते, पाण्याचा दाब प्रचंड असतो व संपूर्ण अंधार असतो. तापमान इतके कमी असले तरी, समुद्राच्या पाण्यात क्षार असल्याने पाणी गोठून त्याचा बर्फ होत नाही. समुद्राखालील या भागात ऑक्सिजनची कमतरता मात्र नसते. याचे मुख्य कारण ध्रुवीय प्रदेशातून विषुयवृत्तीय भागाकडे सतत वाहणारे सागरतळावरचे जलप्रवाह. विषुववृत्तावर सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी गरम होते व ते पृष्ठभागावरील ऑक्सिजनयुक्त प्रवाहांद्वारे ध्रुवीय प्रदेशांत येते. परंतु ध्रुवप्रदेशातील शीत वातावरणामुळे तेथे थंड झालेले ऑक्सिजनयुक्त पाणी सागरतळाला जाते व खोल प्रवाहांद्वारे पुन्हा विषुयवृत्तीय भागाकडे वाहते. त्यामुळे समुद्राखालील या खोल भागातील प्राणिमात्रांना ऑक्सिजनची कमतरता भासत नाही.      

समुद्राच्या खालच्या या खोल भागात डोंगरकडे आहेत. त्यातील काहींच्या माथ्यावर ज्वालामुखी आहेत. काही ठिकाणी समुद्रतळाला पडलेल्या भेगांतून (औष्णिक छिद्रे) पृथ्वीच्या भूगर्भातला शिलारस, अतिउष्ण वायू, गंधक व अन्य क्षारयुक्त विषारी पाणी बाहेर पडत असते. या क्षारयुक्त अतिउष्ण पाण्याचे तापमान १३० अंश सेल्सिअस इतके असू शकते. मात्र येथे अगदी ८० अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यातदेखील जीवसृष्टी आढळते. येथे विनॉक्सि-श्वसनी जिवाणू व महाकाय ट्यूबवर्म, तसेच काही सहजीवी प्राणीही आढळतात. ट्युबवर्मच्या नळ्या सुमारे दोन मीटर लांबीच्या असून, त्यांना पचनसंस्था नसते. तोंडाच्या जागी त्यांना शेंदरी-लाल रंगाच्या तंतूंचा झुबका असतो. झुबक्यांत आश्रयास असलेले विनॉक्सी-श्वसनी जिवाणू औष्णिक छिद्रांतून बाहेर येणाऱ्या गंधकयुक्त रासायनिक पदार्थांचे विघटन करून संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात. मजेची बाब म्हणजे इतक्या भयानक दाबाखाली काळोखात आणि तरीही उष्णोदकात राहणाऱ्या या मोठ्ठ्या किड्यांच्या झुबक्यांचा लाल रंग चक्क त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनमुळे असतो.

थंड वातावरणामुळे येथील प्राण्यांचे चयापचय मंद असते, म्हणून या खोल पाण्यात अन्नाचे दुर्भिक्ष असले तरी इथले प्राणी तग धरून जीवन जगू शकतात. सर्वसाधारण माशांच्या शरीरात सोळा टक्के ते वीस टक्के प्रथिने असतात, परंतु जेलीसारखे शरीर असणाऱ्या इथल्या माशांत या प्रथिनांचे प्रमाण केवळ पाच टक्के ते आठ टक्के इतकेच असते. या खोलीवरील भागात वरून येणारा अन्नाचा प्रत्येक कण हा उपयोगात आणण्याच्या दृष्टीने, त्यांच्या तोंडाची व दातांची रचना अनुकूल झालेली असते. तसेच, त्यांच्या भक्ष्य पकडण्याच्या युक्त्याही यासाठी पूरक असल्याचे दिसून येते. इथल्या माशांच्या बहुसंख्य प्रजाती लहान आकाराच्या व अंध आहेत. या प्रकाशहीन भागात दृष्टीचा फारसा उपयोग नसल्याने बहुतेक प्रजातींचे डोळे लहान तरी असतात किंवा नसतातही. माशांचा रंग काळा अथवा मातकट तपकिरी असतो. इथले सर्वच प्राणी एकमेकांचे भक्षक असून एका जागी बसून भक्ष्याची वाट पाहत असतात, त्यामुळे ते विचित्र आकारांचे, मोठ्या तोंडाचे व दातांचे मोठे सुळे असणारे आहेत. काळपट चंदेरी रंगाच्या व्हायपर माशाचे सुळ्यासारखे दात एवढे मोठे असतात की तो तोंड मिटू शकत नाही. त्याच्या डोक्यावर शेंडीसारखी अनुदीप्ती गळदोरी असून त्यावरील प्रकाशाच्या साहाय्याने तो भक्ष्य पकडतो. अतिशय पातळ, चपटे अंग असलेल्या हॅचेट फिशला चंदेरी खवले असून आपल्याच अनुदीप्ती प्रकाशाला परावर्तित करून तो भक्षकाला गंडवतो.

येथे आढळणाऱ्या गल्पर ईल माशाच्या शरीराचा आकार लहान, पण तोंड व जबडे एवढे मोठे असतात की भक्ष्य आकाराने मोठे असले तरी हा मासा त्याला गिळतो. असाच एक स्नॅपर ईल मासा, जो पातळ रीबिनीप्रमाणे दीड मीटर लांब व दीड सेंटिमीटर रुंद असतो आणि त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे दिसते. वरच्या पाण्यात आढळणारे देवमासे व अजस्र आकाराचे इतर मासे मरून या थरात येतात, तेव्हा इथल्या प्राण्यांची चंगळ होते. हॅगफिश नावाचा इथला मासा सरळ मृत देवमाशाच्या कलेवरात गोलाकार दात गिरमिटासारखा एका बाजूने घुसवतो, आत शिरतो व खात खात दुसऱ्या बाजूने बाहेर पडतो.

येथे आढळणारे अपृष्ठवंशीय प्राणी महाकाय शरीराचे असतात. त्यातलाच एक बॅथिनोमस आयसोपोड, जो या कुळातला आकाराने सर्वात मोठा प्राणी आहे. पुराणातला आणि साहसी सागरकथांमधला जहाजे उलटवून टाकणारा भयंकर प्राणी म्हणजे राक्षसी ऑक्टोपस! या खोल पाण्यात असा ऑक्टोपस दिसून आलेला नाही, पण त्याच कुळातील राक्षसी माकूळ (जायंट स्क्वीड) २००४ साली जपानी शास्त्रज्ञांना दिसला. जवळपास तेरा मीटर लांबीचा हा मृदुकाय संघातील प्राणी असून त्याचे शरीर दोन मीटर लांब असते. त्याला आठ पाय व दहा मीटर लांबीचे दोन शुंडक (टेंटकल्स) असतात. पाय व शुंडकांवर अनेक मोठ्या वाडग्यांच्या आकाराचे शोषक असतात ज्यामुळे भक्ष्याला तो घट्ट पकडून खातो. स्पर्मव्हेल या देवमाशाचे माकूळ हे आवडते खाद्य असल्याने दोघांच्यात तुंबळ लढाई झाल्याच्या गोलाकार खुणा देवमाशाच्या कातडीवर दिसून आल्या आहेत. म्हणजे हा देवमासा या माकुळाच्या शिकारीसाठी पाच हजार मीटर खोल पाण्यात जात असला पाहिजे.

सागरातल्या चार हजार मीटरहून अधिक खोल असणाऱ्या, पूर्ण अंधार असणाऱ्या आणि अतिप्रचंड दाब असणाऱ्या अतिखोल प्रदेशातील परिस्थिती जगण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असते, तेथे अन्नपदार्थांचीही वानवा असते. त्यामुळे येथे सजीवांची संख्या कमी होत जाते. असे असले तरी येथेही जीवसृष्टी अस्तित्वात आहेच. उदाहरणार्थ, सुमारे सात हजार मीटर खोलीवर रॅट-टेल, लीपारीड व ग्रेनेडीयर मासे, तसेच संधिपाद प्राण्यांपैकी खेकडे, शेवंडी व कोलंबीच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. मरियाना ट्रेंच या पृथ्वीवरील सर्वांत खोल सागरी घळीत, सुमारे ८,१०० मीटर खोलीवर ग्रेनाडीयर मासे आढळले आहेत. हे आतापर्यंत सर्वांत खोलवर सापडलेले मासे आहेत. इतकेच काय, मरियाना घळीच्या तळावरही म्हणजे ११ हजार मीटर खोलीवरही सजीव सापडले आहेत. मात्र हे सजीव आदिकालातील सजीवांसारख्या एकपेशीय आर्किया आहेत.

जमिनीवरील कानाकोपरा ज्ञात असला तरी एकूण खोल सागरतळाची एक टक्कासुद्धा माहिती मनुष्यास नाही. या खोल समुद्राच्या तळाला काय आहे, हे जाणून घेण्याचे प्रयत्न गेली कित्येक वर्षे चालू आहेत. याला आता आधुनिक तंत्रज्ञानाचीही साथ मिळत आहे. यासाठी वेगवेगळी साधने विकसित केली जात आहेत. या नवनवीन साधनांद्वारे सागराच्या अंतरंगाचा शोध यापुढे चालूच राहील व त्यातून आज अपुऱ्या असणाऱ्या आपल्या सागरविषयक ज्ञानात मोलाची भर पडत राहील.  













by - http://www.zeemarathidisha.news/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल