गुरुवार, २८ मार्च, २०१९

पृथ्वीवर माणूस केव्हा आणि कसा आला?...

पृथ्वीवर माणूस केव्हा आणि कसा आला?

मानवाच्या विजयाची गाथा सांगणारी ही लेखमाला आहे.. पण यातील मानवाने कुणावर विजय मिळवला?



मानवाच्या विजयाची गाथा सांगणारी ही लेखमाला आहे.. पण यातील मानवाने कुणावर विजय मिळवला? किंवा, जयगाथा गाण्याइतका – म्हणजे प्रेरक ठरण्याइतका – मानवाने संपादन केलेला विजय कोणता? याsam06मालेतील लेख दर सोमवारी उलगडत जाण्याआधी हे स्पष्ट केले पाहिजे, की हा मानवाने कुणाच्या विरुद्ध मिळवलेला विजय नव्हे.. किंवा, मानवाने विजय संपादन केला म्हणजे कोणी तरी हरलेच असेही नव्हे.. हा विजय मानवाने, स्वतच्याच वृत्तींवर मिळवला आहे. आजघडीला ‘कृत्रिम प्रज्ञा’ निर्माण करू पाहणाऱ्या या भूतलावरील एका प्रजातीने, आधी स्वतच्या बुद्धीपुढील अशास्त्रीय आव्हाने पेलली, म्हणून मिळालेला हा विजय आहे.. मात्र, ही आव्हाने कधी संपणारी नाहीत, याची विनम्र जाणीवही ही लेखमाला सादर करताना नक्कीच आहे..
विज्ञान आपल्याला सांगते की, अगणित सूर्यानी बनलेल्या आपल्या विश्वाचे वय सुमारे तेराशे कोटी वर्षे असून, त्यात आपला सूर्य सुमारे फक्त ५०० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे. त्यानंतर म्हणजे सुमारे ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या जन्मदात्या हय़ा सूर्यापासून आपली पृथ्वी बनलेली आहे, पण तेव्हा ती एक अतिउष्ण जळता गोळा होती. ती थंड आणि जलमय व्हायला सुमारे शे-सव्वाशे कोटी वर्षे लागली. त्या सुमारास केव्हा तरी म्हणजे सुमारे तीन-साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कुठे तरी काही रासायनिक प्रक्रिया निसर्गत: होऊन आधी अल्गी शेवाळ व नंतर केव्हा तरी अगदी साधे अमिबा, बॅक्टेरियासारखे जिवाणू किंवा एकपेशी सजीव निर्माण झाले. नंतरची सुमारे दोनशे कोटी वर्षे पृथ्वीवर फक्त असलेच प्राथमिक अवस्थेतील सजीव होते. तेव्हा आजच्यासारखी जंगले किंवा पशू-पक्षीसुद्धा पृथ्वीवर नव्हते. नंतर सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वीपासून सुमारे वीस कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर बहुपेशीय पण कमी गुंतागुंतीची शरीरे असलेल्या सजीवांचे ‘प्राचीन जीवयुग’ होऊन गेले. पुढे वीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते पाच कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर सरपटणारे प्राणी व वेगवेगळे डायनॉसॉर आणि अनेक वनस्पती वगैरेंचे ‘मध्यजीवयुग’ होऊन गेले. त्यानंतर हय़ा शेवटच्या पाच कोटी वर्षांपूर्वी आज जगात दिसणाऱ्या सस्तन प्राण्यांचे ‘नवजीवयुग’ सुरू झाले. हय़ाच नवजीवयुगात सुमारे सव्वाकोटी वर्षांपूर्वी, मानवाचा पूर्वज असलेला बिनशेपटीचा, चतुष्पाद असलेला, पण दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करू लागलेला ‘मानव-पूर्वज-मर्कट’ पृथ्वीवर वावरत होता. हय़ाचे पुरावे शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात मिळालेले आहेत.
हीच वन्यप्राणी असलेली मर्कट जात शेवटची एक सव्वा कोटी वर्षे उत्क्रांत होत राहिलेली आहे. ती जात मागील दोन पायांवर, पण जरा पुढे वाकून चालू लागली व पुढील दोन पायांचा हातासारखा उपयोग करू लागली. उदाहरणार्थ, झाडावर चढताना फांद्या धरायला, जमीन खरवडून कंदमुळे खाण्यासाठी काढायला किंवा बीळ खणून लहानसहान प्राणी पकडून खायला किंवा झाडांच्या फांद्यांचा वा प्राण्यांच्या हाडांचा काठीसारखा हत्यार म्हणून उपयोग करायला वगैरे. हय़ा उत्क्रांतीत त्याला निसर्गनियमाने तीन महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त झाल्या. एक म्हणजे हाताचा आकार बदलला व एका बोटाचा अंगठा बनला, जो इतर बोटांना टेकवता येऊ लागला. दुसरे म्हणजे कंठ थोडा उत्क्रांत  होऊन तो वेगवेगळे आवाज काढू लागला. ज्यातून पुढे ‘काही शब्द’ आणि नंतर ‘भाषा’ निर्माण झाली व तिसरे म्हणजे हाताने अन्नाचे लहान तुकडे करून खाणे शक्य झाल्यावर, त्याला मोठय़ा जबडय़ाची गरज उरली नाही, त्यामुळे जबडा लहान होऊ लागल्याने डोक्यात मेंदूची वाढ व्हायला जागा निर्माण झाली व तशी मेंदूची वाढ क्रमश: होऊ लागली.
नंतर अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी हय़ा ऑस्ट्रेलोपिथेक्स किंवा ज्याला दाक्षिणात्य वानर असेही म्हणतात, त्याच्यापासून दोन पायांवर सरळ ताठ चालू शकणारा आदिमानव (होमो इरेक्टस) निर्माण झाला आणि त्यानंतर आजपासून अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी ‘होमो सॅपियन’ ऊर्फ ‘शहाणा मानव’ ही आजची मानवजात निर्माण झालेली आहे व त्याचीही उत्क्रांती होतच आहे. आदिमानव असतानाच तो हाताने दगडांपासून साधीसुधी हत्यारे बनवायला शिकला. जंगलात किंवा उघडय़ावर एकटय़ादुकटय़ाने स्वसंरक्षण करून राहण्यापेक्षा तो माणसांच्या टोळ्या व नंतर संघसमाज बनवू लागला, घरे बांधू लागला, समाजात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्याच्या आवाजाचे काही शब्द व हळूहळू त्याची भाषा बनू लागली. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्याचा मेंदू वाढू शकल्याने तो विचार करू लागला. भाषा आणि मेंदू एकमेका साहय़ करू लागले. स्मृती वाढली, विचार वाढले, आता काय झाले पाहा. मूलत: वन्य -प्राणी असलेला आदिमानव, उत्क्रांतीच्या त्याच्या पुढच्या पायरीवर तो आता स्वत:च्या हाताने स्वत:च आपली हत्यारे बनवू शकणारा, विचार करू शकणारा, एकमेकांशी गुंतागुतीचे संवाद भाषेद्वारे करू शकणारा, स्वत:ची घरे बांधू शकणारा, पशुपालन करणारा व नंतर मानवरूपात येऊन काही हजार वर्षे जीवन जगल्यावर शेवटच्या दहा-बारा हजार वर्षांत शेती करून धान्योत्पादन करून ते साठवूनही ठेवू शकणारा, हुशार मानव बनला. हय़ा इतक्या कुवती प्राप्त झाल्यामुळे ही द्विपाद मनुष्यजात पृथ्वीवरील इतर सर्व पशू-पक्ष्यांशिवाय वरचढ ठरली, समर्थ ठरली. बिनशेपटीच्या एका मर्कट जातीपासून अनेक टप्प्यांनी अखेर आजची बुद्धिमान, शहाणी, कुशल व सुसंस्कृत मानवजात बनायला त्याला एक-सव्वा कोटी वर्षांचा दीर्घ काळ मात्र घ्यावा लागला, हे खरे. ते असो.
याचा अर्थ असा होतो की ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाल्यापासून, सुमारे ४५९ कोटी वर्षेपर्यंत मानवच नव्हे तर मानवाचा कुणी पूर्वजही पृथ्वीवर नव्हता. म्हणजे मानव नवागत आहे, आदिमानवरूपात अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी व शहाण्या मानवरूपात तो पृथ्वीवर अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आलेला आहे.
गेल्या काही शतकांत वैज्ञानिकांनी अतिशय परिश्रमाने संशोधन व सिद्ध केलेली अशी ही माहिती आज आपणाला उपलब्ध आहे. परंतु अवघ्या आठ-दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागून शरीराची भूक सहजतेने भागून, सुरक्षित व स्थिर मानवी जीवन शक्य झालेल्या आपल्या शहाण्या मानव पूर्वजांना हय़ापैकी काहीच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांनी ईश्वर व धर्मविषयक काही कल्पना रचायला सुरुवात केली असावी. जगात आज अस्तित्वात असलेले सगळे मोठे धर्म, गेल्या अवघ्या चार-पाच हजार वर्षांत मनुष्याने आपल्या कल्पनेने स्थापन व विस्तार केलेले आहेत. त्यापूर्वी मनुष्य जातीला ‘भूक आणि भीती’ यांच्याबरोबर ‘भगवंत कल्पनेने’ गाठले असणे शक्य आहे, पण तत्कालीन ईश्वर कल्पनांचे संघटित धर्म बनले नाहीत व कुठे बनले असले तर ते टिकले नाहीत.
जगातल्या प्राचीनांसह बहुतेक धर्मानी अशी कल्पना केली की ‘आकाशात दिसणारे हे विश्व आणि पृथ्वीवरील जग-निसर्ग हे निर्माण करणारा कुणी ईश्वर आहे, दोन पायांवर चालणारा शहाणा माणूस हा इतर प्राणिसृष्टीहून वेगळा, अशी ईश्वराची खास निर्मिती आहे आणि त्याच्या इच्छेनेच सगळी जगरहाटी सुरू आहे. त्याने असेही मानले की हे सर्व जग ईश्वराने माणसासाठीच निर्माण केलेले आहे. खरे तर विश्व फार जुने आहे व त्यामानाने माणूस त्यात अगदी अलीकडे निर्माण झालेला आहे हे त्यांना माहीतच नसल्यामुळे, ‘आधीच अस्तित्वात असलेल्या पृथ्वीवरील जगाचा, उत्क्रांत मानव उपयोग करून घेत आहे’ हे त्यांना कळलेच नाही व त्यामुळे ‘ईश्वराने माणसासाठी जग निर्मिले’ असे त्यांनी मानले. आणि केवळ माणसासाठीच का? माणसाचे एवढे मोठे असे काय महत्त्व आहे, की ईश्वराला खास त्याच्यासाठी योजनापूर्वक जग निर्मिण्याची गरज वाटली? किंवा त्याचे विश्व आधीच अस्तित्वात असले तर नंतर कोटय़वधी वर्षांनी ईश्वराने त्यात हा माणूस कशासाठी (कोणत्या हेतूने) निर्मिला? भौतिकशास्त्राचे ज्ञान नसलेल्या तत्कालीन माणसाला असे प्रश्न पडलेच नाहीत. त्यामुळे तो ईश्वर कल्पना व धर्मकल्पना रचण्यात गुंग झाला. एकदा ईश्वर-अस्तित्व आपल्या मनात मान्य केल्यावर, तो असा आहे, तसा आहे, तो हे करतो, ते करतो’ असे तो म्हणू लागला. जगात वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठय़ा नद्यांच्या काठी वेगवेगळ्या मानवसमूहांनी आपापल्या संस्कृती आणि धर्म निर्माण केले. त्यातील काही टिकले व काही कालौघात नष्ट झाले. ‘ईश्वर अस्तित्वात नाही’ असा वेगळा विचार मांडणारेही काही विचारवंत विशेषत: भारतात होऊन गेले. आपण ह्य़ा प्रकरणात, मानव पृथ्वीवर केव्हा आणि कसा आला व त्याच्या प्रगतीचा आरंभ कसा झाला, त्यावर फक्त एक नजर टाकलेली आहे.
- शरद बेडेकर








by - Loksatta First Published on January 5, 2015 1:07 am

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल