शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

नाशिकच्या माणिक कासार यांची सेंद्रिय तपश्चर्या, १८ वर्षांपासून करीत आहे १०० टक्के सेंद्रिय शेती




कीटकनाशके, खते, तणनाशके यांचा शेतीमध्ये होत असलेल्या अनिर्बंध वापरामुळे तयार होणाऱ्या शेतीमालातही त्यांचे अंश उतरतात. कीटकनाशकाचे अंश असलेला भाजीपाला व धान्य खाणे मानवी शरीराला धोकादायक असते. हा धोका कर्करोगासारख्या भयंकर विकारात परिवर्तीत होऊ शकतो. याबाबत थोड्या प्रमाणात का होईना जनजागृती होते आहे. केन रिसर्चच्या अहवालानुसार भारतातील कीटकनाशकांची उलाढाल २०२० पर्यंत ४८४ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज अलीकडच्या ताज्या अहवालात वर्तवला आहे. यावरून देशभरात कीटकनाशकाचा वापर किती मोठ्या प्रमाणात होतो याचा यांचा अंदाज निश्चितच आपल्याला येईल. सेंद्रिय शेती ही काळाची गरज ओळखून नाशिक जिल्ह्यातील शेवगे दारणा येथील माणिक महादू कासार सुमारे १८ वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे. त्यात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा त्यांनी निर्माण केला आहे. सेंद्रिय शेती करताना सुरवातीला त्यांना असंख्य अडचणी आल्या मात्र त्यांनी रासायनिक खतांचा वापर केला नाही. आज ते जो काही शेतमाल तयार करीत आहे तो माणसाचेच नाही तर जमिनीचेही आरोग्य राखत आहे. त्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी विकसित केलेली आदर्श शेतीपद्धत जाणून घेण्याचा युवर स्टोरीने केलेला एक प्रयत्न.






माणिक कासार यांची शेवगे दारणा या गावात ८ एकर जमीन आहे. कॉलेज सोडल्यानंतर १९८५ पासून त्यांनी शेतीकामाला सुरुवात केली. शेती हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यांचे वडील रासायनिक शेती करायचे, मात्र १९९८ पासून त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. १२वी पर्यंत त्यांनी काॅमर्संचा अभ्यास केला होता. अर्थकारण आणि आकडेवारीनुसार त्यांनी अभ्यासले की, रासायनिक शेती खूप महाग असून परवडण्यासारखी नाही. “१९९० पासून खूप अडचणी यायला लागल्या. त्यावेळी आमच्याकडे द्राक्षाची बाग आणि सर्व प्रकारची पिकं होती. एकत्रित कुटुंब पद्धती आणि पस्तीस ते चाळीस एकर शेती आमच्याकडे होती. सर्व अन्नधान्य पिकत असताना अपेक्षित बाजारभाव मात्र मिळत नव्हता. दुसरीकडे खते, औषधे यावर जास्त खर्च व्हायचा. त्या दरम्यान दरवर्षी काही ना काही मोठी अडचण समोर येऊन ठाकायची. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी मुंबई बॉम्बस्फोट, यांसारख्या घटनांमुळे बाहेर विक्रीसाठी माल पाठवायला खूप अडचणी यायच्या. तीन ते चार वर्ष सारख्या अडचणींना तोंड द्यावे लागले. एक वेळ तर अशी आली की तीन रुपये प्रमाणे द्राक्षं विकावी लागली. खूप नुकसान सोसावे लागले. अशा प्रकारे ९६-९७ पर्यंत सातत्याने आम्ही अडचणींचा सामना केला”. कासार सांगत होते.








उसाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटलं होतं. खर्च खूप वाढला होता. खताचा वापर किती केला जात होता याचा काही हिशोब नव्हता, मातीचं परीक्षण केलं नव्हतं. नियोजनाचा अभाव होता. सारं काही अज्ञान होतं. संपूर्ण जमीन खराब झाली होती. जमिनीकडे फारच दुर्लक्ष झालं होतं. काहीतरी पर्याय शोधला पाहिजे म्हणून कासार आणि कुटुंबीय प्रयत्नशील होते. यावर त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार सुरू केला. नाशिकमध्ये अनेकांना हीच समस्या भेडसावत होती. काही सेंद्रिय जाणकार व्यक्तींच्या संपर्कात ते आले. कश्यप ग्रुपच्या पाळे सरांशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन करणाऱ्या तीन दिवसाच्या शिबिराला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेती करायचा निर्णय घेतला. कुटुंबातून खूप विरोध झाला, पण त्यांनी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी सेंद्रिय शेतीच करायची. त्यावेळी सेंद्रिय शेती ही संकल्पना नवीनच होती. त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. या पद्धतीने उत्पादन कसे मिळणार अशी लोकांत चर्चा होती. कासार यांनी मात्र निष्ठेने कामाला सुरवात केली.





“जमिनीच्या सेंद्रिय कर्वाच प्रमाण वाढवणं खूप गरजेचं होतं. बुरशीनाशकासाठी काय करायचं, खतासाठी काय पर्याय वापरायचा. जीवामृताचा वापर कसा करायचा. या साऱ्या गोष्टीचं ज्ञानच नव्हतं. मग मी योगेश्वर ग्रुपच्या माझ्या मित्रांना विचारायचो आणि त्याप्रमाणे कृती करायचो. मजुरांचा वापर न करता कामं केली. त्यानंतर पिकामध्ये फेरफार करणे गरजेचे होते. द्राक्ष या पिकामध्ये फेरफार करणे शक्य नव्हते. आम्ही सर्वप्रथम जमीनच्या सेंद्रिय कर्वाचे प्रमाण वाढवण्यास भर दिला. त्यावेळी सेंद्रिय कर्वाचं प्रमाण ०.३५ इतकं कमी झालं होतं. म्हणजे जमीन जवळजवळ नापीकच झाली होती. त्यानंतर एकदल द्विदल धान्य पेरून, ते कापून पुन्हा जमीन टाकायचो. अशा पद्धतीने चार वर्षात आमच्या जमिनीच्या सेंद्रिय कर्वाचे प्रमाण २.५ इतके झाले. त्यावेळी आर्थिक गणित फारच विस्कळीत झालं होतं पूर्णतः तोटा सहन करावा लागला होता. मात्र जमिनीचा पोत सुधारला यातच आम्हाला आनंद होता, समाधान वाटत होते. सुरवातीला एक- दोन वर्षे उत्पादन जेमतेम होते. परंतु सततच्या प्रयत्नाने त्यात यश येत गेले. जमिनीची सुपीकता वाढत गेली. उत्पादनात वाढ होऊ लागली.

त्यावेळी सेंद्रिय शेतीतून येणाऱ्या द्राक्षाचा आकार हा केवळ १२ किवा १३ मि.मी. असायचा, तर रासायनिक शेतीतून येणाऱ्या द्राक्षाचा आकार हा १८ ते २१ मि.मी. असतो, ज्याची लोकांना सवय झाली आहे. त्यामुळे आम्ही उत्पादित केलेली द्राक्षं कोणी विकत घेईना, म्हणून मग आम्ही ती फुकट वाटली. काहीना भेट म्हणून दिली, जेणेकरून लोक चव चाखून पुढील वर्षी द्राक्षं आमच्याकडून घेतील. आर्थिक तोटा सहन केला मात्र आम्ही जिद्द सोडली नाही. नैसर्गिक खतांचा आणि बुरशीनाशकाचा वापर केला. गोमुत्र, शेणखत आणि गाईच्या दुधाचा देखील बुरशीनाशक म्हणून वापर केला. सेंद्रिय शेती करत असताना त्यांचा रासायनिक कीटकनाशकांवर करावयाचा खर्च पूर्णपणे वाचला होता.





दुसऱ्या वर्षी कासार यांच्या द्राक्षाला चांगली मागणी आली. त्यानंतर त्यांनी नैसर्गिक पद्धतीने सूर्यप्रकाशात मनुकादेखील तयार केला. तयार झालेले द्राक्ष निर्यात करण्याचे ठरवले. २००९मध्ये ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या द्राक्षांच्या पानांचे आणि देठांचे नमुने तपासणीसाठी केंब्रिजच्या लॅबमध्ये पाठवले होते. त्यावेळी सगळ्यांचे नमुने रिजेक्ट झाले फक्त कासार यांच्याच नमुन्यांना मान्यता मिळाली, ज्यामध्ये ४५७ प्रकारचे विश्लेषण करण्यात आले होते. भारतामध्ये फक्त ९७ प्रकारची विश्लेषण पद्धती आहे. ज्यानुसार सेंद्रिय शेतीचे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. कासार यांनी हॉलंडच्या एका ग्राहकाशी करार केला होता. तिथल्या एका सुपरमार्केटमध्ये त्यांची द्राक्षं विक्रीसाठी ठेवण्यात येणार होती. मात्र तिथे सर्वात मोठी अडचण आली ती म्हणजे मागणी तेवढा पुरवठा करणे त्यांना शक्य नव्हते. कारण इतर शेतकऱ्यांची द्राक्षं नाकरली गेली होती. त्यामुळे मग त्यांचीही निर्यात थांबली, त्यांना तोटा सहन करावा लागणार होता. मात्र समोरील ग्राहकाने वास्तव समजून घेऊन कासार यांच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले. आणि सांगितले की, “तुम्ही सेंद्रिय पद्धतीनेच शेती करा”.

“सेंद्रिय शेती करताना उत्पादन खर्च फारच कमी होता. मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या द्राक्षाला अपेक्षित किमत मिळायची नाही, निसर्ग आणि वातावरण पाहून फारच काळजी घ्यावी लागायची. डोक्यावर सारखी टांगती तलवार असायची त्यामुळे मग द्राक्ष घेणे बंद केले” कासार सांगतात. एवढे नुकसान सोसूनसुद्धा रासायनिक शेती करायची नाही यावर मात्र ते ठाम होते. कारण कीटकनाशकांचा वापर करताना आरोग्यावर काय परिणाम होतात याची त्यांना जाणीव होती. ते सांगतात, “खरं तर चांगलं खाण्याची लोकांची मानसिकताच राहिली नाही. कमीत कमी किमतीत लोकांना चांगले चकचकीत दिसणारे उत्पादन हवे असते. ते विकत घेत असलेला माल कुठे आणि कसा तयार झाला हे जाणून घ्यायची तसदी सुद्धा ते घेत नाही”.





सेंद्रिय शेतीमध्ये फायदा होतो का ? असे विचारले असता कासार सांगतात की,

“ फायदा होतोच ना ! उत्पादन घेताना फारसा खर्च करावा लागत नाही, महागड्या रासायनिक खतांवर आणि कीटकनाशकांवर खर्च करावा लागत नाही. रासायनिक शेतीच्या तुलनेत भरघोस उत्पन्न जरी नाही मिळाले तरी जे उत्पन्न येते ते खऱ्या अर्थाने आरोग्यास लाभदायक असते. ज्याची तुलना भरघोस होणाऱ्या नफ्यामध्ये केली जाऊ शकत नाही. आपण लोकांना विषारी नाही तर सकस धान्य पुरवठा करत आहोत याचे आत्मिक समाधान वाटते. प्रत्येक शेतकऱ्याने याविषयीचे सामाजिक भान कुठेतरी जपले पाहिजे अशी माझी सर्व शेतकरी बंधूना कळकळीची विनंती आहे.”

कासार यांच्या सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये -


-सन १९९८ पासून संपूर्ण सेंद्रिय शेती. तेव्हापासून रासायनिक घटकांचा अंशदेखील शेतात वापरलेला नाही.
-देशी गाईंचे शेण, दुध, तूप, गोमूत्र, दशपर्णी अर्क, जिवामृत, जिवाणूखते आदींचा वापर
-देशी गाईंचे संगोपन, त्यांच्या शेणखताचा वापर.
-सेंद्रिय कर्ब २.५ टक्का.
-पिकांचा पालापाचोळा जागेवरच कुजवला जातो.



सध्या कासार यांच्या शेतात डाळिंबे. पेरू, टमाटे तसेच भाजीपाला लावला आहे. गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या मालाला चांगली मागणी आहे. लोकांना अलीकडे सेंद्रिय शेतीचे महत्व समजू लागले आहे. सेंद्रिय मालाला दरही थोडा जास्त मिळत असल्याने तेथे फायदा होतो. सेंद्रिय पद्धतीत जमिनीची सुपीकता मात्र कायम वाढतच जाते. 




















by- //marathi.yourstory.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल