बुधवार, १५ जून, २०१६

सकारात्मक विचारसरणी...

एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले. ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. . . . जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते .. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!









- by - what's app

पैसा ... पैसा ....

श्रीमंतीची गुरूकिल्ली पैसा हे एक साधन आहे. एखादे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असेल तर , विविध साधने उपयोगी पडतात. त्यात पैसा या साधनाला आज अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. पैसा असेल तरच अनेक गरजा पूर्ण होतात. पैसा नसेल तर आपल्या अत्यावश्यक गरजा देखील पूर्ण होऊ शकत नाही. पैसा हा देव तर नाही , पण देवा इतकेचं महत्व पैश्याला प्राप्त झाले आहे. म्हणूनच म्हणतात कि, देव गरीबाचा नाही. म्हणजे जो श्रीमंत असेल तो अनेक तीर्थक्षेत्राला जावू शकतो.असो. श्रीमंत व्हावे ही तसी साधू संत सोडले तर सर्वांची इच्छा असते. तसे काही संतांजवळ कोटीने रुपये आढळतात हा अपवाद वेगळा. पण सामान्य माणसाला पैश्याची नितांत गरज असते. पैसा प्रचंड प्रमाणात मिळावा ही सर्वांची इच्छा असते. परंतु कृती इच्छेला धरून केली जात नाही. आज जास्त प्रमाणात पैसे मिळू शकतील असे व्यवसाय म्हणजे , जमिनीचे व्यवहार होय., सोने खरेदी , दामदुप्पट ठेव योजना , बचत , शेअरबाजार गुंतवणूक . वैगरे पर्याय सांगितले जातात. यात जमीन खरेदीसाठी एकाचं वेळेला खूप मोठी रक्कम लागते. तेव्हाच जमीन खरेदी होऊ शकते. म्हणजेच पैसा जास्त असेल तरच पैसा मिळतो. आणि एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि, कमी पैश्याने जास्त पैसे मिळवता येत नाही. सोने खरेदीतही बऱ्यापैकी परतावा मिळू शकतो. परंतु ही खरेदी बँके कडून असावी कि, ज्या मुळे मोड, घटीचा प्रश्न येत नाही. किवा पेपर गोल्ड चा पर्याय स्वीकारावा. आणि यानंतर विषय येतो तो दामदुप्पट योजनेचा. जो कोणी आठ , नऊ वर्षाने पैसे दुप्पट देतो तो त्याचं पैशाचे चारपट केल्याशिवाय राहत नाही.आणि बँक दरवर्ष १०% ,११% प्रमाणे व्याज देते.पण इकडे महागाई वाढीचा दर ११.६०% आहे. मग बँकेत पैसे ९ वर्षानंतर दुप्पट होवून महागाई वाढल्याने फायदा होत नाही.आज एक लाखाला एक गुंठा मिळतो.पण ९ वर्षाने बँकेत २ लाख झाले पण त्यावेळी एका गुंठ्याला ५ लाख लागतील.याचाही विचार आवश्यक ज्याला आपला पैसा कामाला लावता येत नाही असे लोक दुपटीच्या योजनेत पैसे गुंतवतात. “ कामाला ” हा शब्द यासाठी वापरला कि ,मनुष्य अगोदर पैसे मिळवण्यासाठी स्वता काम करतो. काही लोक आयुष्यभर कामच करतात. काही थोडे लोक मिळवलेल्या पैश्यालाच कामाला लावतात. पैशानेच मोठे व्यापार करतात. नंतरचा विषय येतो तो सामन्यांची बचत . असी बचत दरमहा थोडी थोडी केली जाते. या अशा बचतीतून त्यांच्या भविष्यातील गरजा अल्पप्रमाणात पूर्ण होतीलही पण अशा बचतीतून खूप पैसा निर्माण झाला असे होत नाही. आणि शेअर मार्केटचा पर्याय पैसा वाढविण्यासाठी सांगितला जातो. याही पर्यायाचा आपण विचार करू. शेअर मार्केट विषयी सामान्य लोकांमध्ये काही गैर समाजही असतात. भारतात तर बहुसंख्य लोक यापासून अलिप्त आहे . “ हा विषय आपला नाहीच ” इथपर्यंत त्यांची मानसीकता तयार झाली आहे. शेअर मार्केटमध्ये अनेक लोक संपले, डूबले ,काहींनी आत्महत्या केल्या. असे बोलले जाते. असे होतेही . पण त्याची कारणे अभ्यासली का ? मार्केट मध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतात. आपल्या पैशाच्या चारपट मार्जीन् देतात. फिव्हचर ऑप्शन वापरतात. याच ठिकाणी लोक लालची पडतात. व संपतात. काही लोक असा पैसा मार्केट मध्ये टाकतात कि, ज्या पैशाची दोन चार महिन्यांनी लग्नासाठी , शिक्षणासाठी गरज आहे आणि मार्केट खाली आलेच तर त्यांना लॉस घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. ज्या पैशाची आपल्याला पाच ,दहा वर्ष गरजच नाही . असा पैसा गुंतवला तर नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कधीकधी मार्केट खाली आल्यावर लोक घाबरतात. अशा वेळी गुंतवणुकीची संधी प्राप्त होते हे लक्ष्यात घेतले पाहिजे. पैसा गुंतवताना कंपन्यांची पूर्ण माहिती घेवूनच त्यात पैसा अडकवला पाहिजे. या ठिकाणी नशीब उपयोगाचे नाही. त्याला अभ्यासाची गरज असते. बाजाराला जुगार समजू नये. तो एक बिजनेस आहे. हे समजूनच गुंतवणूक करावी. आणि आपली गुंतवणूक किती ? एका वर्षात किती परतावा हवा ? हे अगोदर ठरवून घ्यावे. विनाकारण लालचेत पडू नये. आणि लोक नेहमी LIC, सारख्यांनच्या खरेदीकडे लक्ष्य ठेवून आपली खरेदी करतात. परंतु हे प्रत्येकाला शक्य नाही. त्यांच्या जवळ पंचवीस वर्ष पैसा अडकवण्याची तयारी असते. इतके भांडवल त्यांच्या जवळ असते. आपल्याजवळ भांडवल किती ? किती दिवस आपण पोजिशन सांभाळू शकतो ? याचा विचार हवा. मार्केट मध्ये दरमहा थोडीफार गुंतवणूक करत गेल्यास दहा पाच वर्षात नक्कीच फायदा मिळेल. जसे आपण पॉलिसीत पंधरा वीस वर्ष पैसे काढू शकत नाही तसे यात सतत शेअर्स खरेदी करत गेले तर वीस वर्षात नक्कीच पैसे पंचवीस पट झालेले असतील. घोडा का अडला ?, पाने का सडली ? ,भाकरी का करपली ?, या तीन प्रश्नांचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे न फिरवल्यामुळे . तसे शेअर्स देखील एकदा घेऊन त्याकडे लक्ष्याच दिले नाही तर जास्त फायदा मिळू शकत नाही. त्यासाठी नफ्यात असलेले शेअर्स विकावे व कमी किमतीचे शेअर्स घ्यावे . असा सतत बदल केल्यास नक्कीच फायद्याचे प्रमाण वाढेल. या पद्धतीने थोड्याच कालावधीत आपल्याजवळ चांगला पैसा उभा राहू शकतो. मार्केट मध्ये कमोडिटी व एग्रो कमोडिटी हा ही एक नफा कमविण्याचा चांगला पर्याय आहे. परंतु यात जोखीम आहे. पण गुजराथीत म्हण आहे. “ हिम्मतणी किम्मत ” आता थोडी हिंमत असल्याशिवाय फायदा मिळू शकत नाही. योग्य अभ्यास , सराव, यातून ह्या गोष्ठी सहज शक्य होतात. NCDEX मध्ये गव्हू ,सोयाबीन सारखा शेतीमाल विकत घेवू शकतो. आपण ग्रामीण भागात राहत असल्याने व शेती करत असल्याने शेतीमालाच्या भावाचे चढ उतरीचे ज्ञान आपल्याला असते. त्या ज्ञानाचा फायदा आपण घेवू शकतो.
 
 
 
 
 
by-fb

जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय...

(हा लेख सोशल मेडीया वरून घेतलेला आहे पण, त्यात थोडी आवश्यक भर घालून आणि एडीट करून मी हा तयार केलेला हा लेख आहे. हा लेख सोशल मेडीया वर ज्याने कुणी सर्वप्रथम किहून टाकला त्याला मनापासून धन्यवाद!) 
 

 जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय. मला सर्वांचंच म्हणणं पटतं. आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय. तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत. जगाचं असंच असतं!! आता हेच बघा ना! * मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही. * श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबरचा धंदा करत असणार! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब राब राबतोय, पण झालो का श्रीमंत? तो श्रीमंत झाला कारण निश्चीत बेईमानी केली असणार त्याने! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही. * पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे. याला माणूसकी उरली नाही आहे. * पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही. संसार आणि पोराबाळांची शिक्षणं कशी करणार देव जाणे? याला स्वतःचा संसार समजत नाही का? * नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात. दानशूर कर्णाची उदाहरणे दिली जातात. * जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या म्हणतात. भविष्यासाठी पैसा साठवून ठेवा म्हणतात. * समजा वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं का कधी आयुष्यात? * आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात की, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं? * जास्त भाविक असला तर लोक म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव! अंगी माणूसकी पाहिजे, नुसती देवपूजा करून काय उपयोग? * मंदीरात नाही गेला, देवपूजा नाही केली तर नास्तिक म्हणतात. देवधर्माचं थोडंतरी केलं पाहिजे असे म्हणतात. * तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, म्हणतात: अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. * दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक? कुठल्या चक्कीचा आटा खातोय कुणास ठाऊक? * मनुष्य तब्येतीने बारीक असला तर काडी पहेलवान आणि एकपाचर्या म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात की तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं. बारिक माणसांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते असे टोकले जाते. याची तब्येत काही सुधरत नाही, असे म्हणतात. * मनुष्य तब्येतीने जाड असला की हत्ती म्हणतात. एवढी जाड तब्येत असली तर विविध रोग होतात असे म्हणतात. जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो असे टोकतात. त्याचे खाणे काढतात. * परफेक्ट फीगर आणि सिक्स पॅक अॅब्ज असले तरीही काही ना काही टिका होतेच. आपल्याला थोडेच माॅडेलिंग करायचे आहे अशी टिका होते. जिम मध्ये जाऊन काय करणार, एवढी बाॅडी बनवून काय करणार, शेवटी मरायचेच आहे असे म्हणतात. * पोट सुटले असेल तरीही नावे ठेवणार! * पोट प्रमाणबद्ध असेल तरी म्हणणार की "अरे थोडे पोट सुटले की ती सुखी संसाराची निशाणी असते" सपाट पोट ठेऊन आपल्याला कुठे माॅडेलिंग करायचं आहे? * सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार! * नाही मदत केली तर म्हणणार, यांचेकडे साधी माणूसकी नाही! * सरळ स्वभावाचा असेल, दानशुर असेल, सत्य बोलत असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता. भोळा सांब आहे, असे म्हणतात. "आलाय मोठा राजा हरिश्चंद्राचा अवतार!"अशी दूषणे दिली जातात. * स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा. दानशूर लोकांची उदाहरणे दिली जातात. म्हणतात की स्वार्थाचा पैसा काय कामाचा? "माणसाने दानशुर कर्ण असले पाहिजे" अशी उदाहरणे दिली जातात. भले असे म्हणणारे लोक स्वतः मात्र गरिब भिकार्याला एक पैसासुद्धा देतात की नाही हा संशोधनाचा विषय ठरेल. * खेळकर आणि गमतीदार स्वभाव असला तर म्हणतात हा आचरट आहे. याला परिस्थितीचं गांभीर्य नाही. दोन पोरांचा बाप झाला याला शोभतं का असं? * गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे. जीवन मस्त मजेत जगलं पाहिजे. हा फारच गंभीर असतो बुवा! * तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला, नाहीतर झाला नसता! *अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही ना! मग भोगा आता आपल्या कर्माची फळं! *अभ्यासात हुशार नसेल तर म्हणतात की याचे पुढे कसे होईल कुणास ठाऊक? याला आई वडील त्याच्यासाठी घेत असलेल्या कष्टांची जराही पर्वा नाही. *चांगले मार्क पडले तर म्हणतात की या मार्कांचा शिक्षणाचा व्यवहारात काही उपयोग नाही. याचे कडे माणुसकी नाही. याने घोकमपट्टी केली असेल. * सौंदर्य आणि देखणे व्यक्तिमत्व असले तर म्हणणार, नुसते देखणेपण काय कामाचे? बुद्धी तर हवी ना! सुंदर व्यक्तींना उगाचच शहानिशा न करता केवळ "सुंदर व्यक्ती आहे म्हणून निर्बुद्धच असेल" असे म्हणून हिणवले जाते. * बुद्धी असली तर म्हणणार, नुसती बुद्धी असून काय उपयोग? थोडे सौंदर्य आणि देखणे व्यक्तिमत्व असायला हवे होते? त्याशिवाय काय उपयोग? पर्सनॅलिटी असायला हवी, नुसती हुशारी असून काय उपयोग? अहो, लोकांचं काय घेऊन बसलात? अहो, काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं? लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं? मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय... फिदीफिदी हसतील ते हसू देत की ! बोटं मोडीत बसतील ते बसू देत की ! आपण का शरमून जायचं ? कशासाठी वरमून जायचं ? कशासाठी भयाने ग्रासून जायचं ? फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं ? आपलं जीवन आपण ठरवायचं! कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? आपलं आपणच ठरवायचं.....

नक्की विचार करा आणि कामाचा दर्जेदार वेळ वाचवा.

एका बेकार माणसाने मायक्रोसॉफ्ट कडे सफाई कामगार या पदासाठी अर्ज केला होता. एच आर मॅनेजर ने इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याची ट्रायल घेतली आणि त्याला पास केले. मॅनेजर म्हणाले "तू स्विपर म्हणून सिलेक्त झालास. तुझा इमेल आयडी दे मी त्यावर तुझे नियुक्ती पत्र पाठवतो" हे ऐकून उमेदवार म्हणाला, "साहेब मी एक सफाई कामगार आहे माझ्याकडे इमेल आयडी नाही आणि कॉम्पुटर पण नाही" "अरेरे... तुझा इमेल ऍड्रेस नाही याचा आमच्याकडे अर्थ असा होतो की तू अस्तित्वातच नाहीस. त्यामुळे मग तुला ही नोकरी मिळणार नाही" त्यानंतर तो बेकार माणूस निराश होऊन निघून गेला. खिशात फक्त १० डॉलर शिल्लक होते. त्याला काय करायचे सुचेना. मग त्याला एक युक्ती सुचली. त्याने शेतकऱ्याकडे जाऊन एक क्रेट टोमॅटो विकत घेतले. नंतर दारोदार जाऊन त्याने ते सर्व टोमॅटो विकले. त्याच्यातून त्याला भरपूर नफा झाला. फक्त दोन तासांत त्याचे पैसे दुप्पट झाले. आता त्याला पैसे कमावण्याचा मार्ग मिळाला होता. टोमॅटो सोबत तो आता इतर भाज्या आणि फळेही विकू लागला. असे करून थोड्याच दिवसांत त्याच्याकडे खूप पैसे जमा झाले. त्याला काम रोज सकाळी लवकर सुरु करून रात्री उशिरा संपवायची सवय लागली. त्याने थोड्याच दिवसांत एक टेम्पो घेतला. नंतर ट्रक आणि नंतर खास बनवलेल्या डिलिव्हरी व्हॅन आल्या. पुढील ५ वर्षांनी तो यु एस मधला सर्वात मोठा फूड रिटेलर म्हणून नावारूपाला आला. आता तो त्याच्या कुटुंबाचे भविष्य निर्वाह प्लॅनिंगचा विचार करू लागला. त्याने इन्शुरन्स ब्रोकरला बोलावले आणि प्लान चेक केले. ब्रोकरने माहिती विचारून घेतली आणि "तुमचा इमेल आयडी दया मी तुम्हाला वर्किंग पाठवतो" म्हणाला. हा म्हणाला "माझ्याकडे इमेल आयडी नाही" इन्शुरन्स ब्रोकर म्हणाला "साहेब तुमच्याकडे इमेल आयडी नाही आणि तरीही तुम्ही एव्हडे मोठे साम्राज्य निर्माण केलेय, नुसती कल्पना करा, जर तुमच्याकडे इमेल आयडी असता तर तुम्ही कोण असतात?" माणसाने थोडा विचार केला आणि म्हणाला "माझ्याकडे जर इमेल आयडी असता तर मी कोण असतो माहीत आहे का? मी मायक्रोसॉफ्ट मध्ये स्विपर म्हणून कामाला असतो" मित्रांनो, इंटरनेट, इमेल, बी बी एम, व्हाट्स ऍप या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशावरचाही उपाय नाहीत फेसबुक, इंटरनेट, इमेल, बी बी एम यापैकी तुम्ही कशावरही नसाल तरीही तुम्ही खूप मेहनत करून, सचोटीने काम करून, थोडे जास्त कष्ट करून यशस्वी होऊ शकता. फेसबुक, व्हाट्स ऍप यांच्यावर जास्त वेळ वाया घालवू नका. Good morning, Good afternoon, Good night , happy birthday... म्हणून सकाळ, दुपार आणि रात्र चांगली जात नसते. ती आपली संस्कृतीही नाही. आपण काम केले तरच हे सर्व चांगले जाईल. आपले काम सोडून व्हाट्स ऍप वर अनेक तरुण तरुणी वेळ वाया घालवतांना दिसतात. आपला कामाचा दर्जेदार वेळ या गोष्टीत वाया जात असेल तर नक्की विचार करा आणि त्यासाठी जाणारा वेळ वाचवा. या गोष्टींसाठी ठराविक वेळ ठरवा.






-By social media

माझ्याबद्दल