बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून औषधी वनस्पतींच्या लागवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे या औषधी वनस्पतींकडे काहीसे दुर्लक्ष झाले आणि त्यांचा वापर आयुर्वेदिक  औषधांपुरता मर्यादित राहिला. तेव्हा आज माहिती करुन घेऊया, अशाच काही घरगुती औषधी वनस्पतींची.

  गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची जशी आपण परंपरा पाळतो, तशीच कडुलिंबाची पाने खाण्याचीही. वर्षभर आरोग्य चांगले राहावे म्हणून ही पाने खाल्ली जाण्याची प्रथा आहे. आपल्या प्रत्येक सणवारात फळाफुलांबरोबर पानांनाही खूप महत्त्वाचे स्थान आहे. रोजची देवपूजा असोत की गणपतीची किंवा श्रावणातल्या मंगळागौरीची, पत्री या वाहिल्या जातातच. वर वर बघता ही सर्व अगदी साधारण, सर्वत्र आढळणार्‍या झाडांची पानं असतात. पण, जरा खोलात शिरलात की लक्षात येतं की, प्रत्येकाचे काही ना काही औषधी महत्त्व आहे. तुळस उपयोगी तर उष्णतेवर दुर्वा तर कृमी-विषमज्वरावर बेलाची पानं, म्हणूनच मंगळागौरीत वापरलेल्या पत्रीचा वापर दुसर्‍या दिवशी काढा करुन पिण्याची पद्धत होती.

  पूर्वी घरांना अंगण असायचं, लहानशी परसबाग असायची. स्त्रिया परसातून पत्री गोळा करत म्हणूनच अडीअडचणीला किरकोळ आजारांवर लागणारी औषधी पानं, गरज भासली की लगेच सापडायची. प्रत्यक्ष सेवन न करता काही वनस्पतींच्या सान्निध्यात राहिले तरी बरं वाटतं असे म्हणतात. तुळस दिवस-रात्र प्राणवायू देत असल्याने हवा शुद्ध राहते. ज्या गावात अडूळसा असेल, त्या गावात क्षयरोग होत नाही, असे म्हटले जायचे. आता मात्र आपण झाडांपासून लांब जात आहोत. लहान-सहान तक्रारींसाठी देखील घरगुती उपाय न करता सरळ आपण गोळ्या घेतो. कारण वरच्या मजल्यावर वास्तव्यास असल्यामुळे परसदार नाही, बाग नाही की झाडंही नाही. सुदैवाने आपण काही औषधी वनस्पती खिडकीतल्या बागेतही लावू शकतो. त्यांची सविस्तर माहिती करुन घेऊया…

 तुळस
घरोघरी तुळस असली तरी ती नीट वाढत नसल्याची बर्‍याच लोकांची तक्रार असते. टवटवीत पानांच्या, डेरेदार कृष्णतुळशीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. बेताचं पाणी आणि सतत मंजिर्‍या काढतं राहणंही तेवढच आवश्यक आहे. एक तुळस घरी असली की अनेक व्याधी घरा बाहेत जातात. सर्दी, पडसे, ताप यावर पानांचा रस गुणकारी ठरतो. तसेच  तुळशीच्या पानांबरोबरच इतर औषधी घालून चहा किंवा काढा केल्यास तो ही उपयोगी ठरतो. सारखी उचकी लागत असेल तर तुळशीच्या पानांचा रस मधात कालवून देतात. त्वचारोगांवर तुळशीची पाने चोळली तरी त्याचा फायदा होतो.


 गवती चहा
  गवती चहाच्या पातीमुळे चहाची लज्जत तर वाढतेच, शिवाय तरतरीही येते. घरच्या घरी केलेल्या सुप्सला गवती चहामुळे हॉटेलसारखी चवही प्राप्त होते. गवती चहा हा एक रामबाण उपाय आहे. तापावरही या काढ्याने भरपूर घाम येऊन उपाय होतो. गवती चहाचे रोप कुंडीत असले तर त्याच्या शेजारी तुळसही असावी. कधी दमून भागून आलात की त्यांचे मिश्रण करुन गरमा-गरम उत्साहवर्धक पेय तयार होते. गवती चहाचे रोप लावल्यानंतर ते पहिली दोन वर्ष चांगले वाढते. त्यानंतर मात्र त्याची मूळं घट्ट होतात आणि नवीन पाती येत नाहीत. अशावेळी संपूर्ण झाड उपटून त्याचे लहान-लहान भाग करुन दुसर्‍या कुंडीत नव्याने लावावेत.


  ब्राम्ही
अत्यंत देखणी, नाजूक गोल पानांची शोभेची वनस्पती. या वनस्पतीला ‘मंडूकपर्णी’ही म्हणतात. हँगिंग बास्केट्समध्ये ब्राम्हीची छान वाढ होते. पाणी साचलं तरीही ब्राम्हीच्या वाढीवर परिणाम होत नाही. पूरळ, फोड येत असल्यास ब्राम्हीचा रस गायीच्या तूपात मध घालून घेतात. केसांच्या वाढीसाठी, स्मरणशक्ती वाढवायला देखील ब्राम्हीचे सेवन करतात. ब्राम्हीचे तेल सगळ्यांच्या परिचयाचे असेलच.


 पुदिना
 अपचन, अजीर्णावर पुदिन्याची ताजी पान गुणकारी सिद्ध होतात. चांगल्या दर्जाच्या पुदिन्याच्या बाजारातून आणलेल्या जुडीतल्या पाच-सहा काड्या कुंडीत खोचल्या तरी त्यांना मूळं फुटतात. मात्र, भरपूर सूर्यप्रकाश असेल अशा जागेवर पुदिन्याची कुंडी ठेवावी. झाडाला भरपूर पाणी द्यावे. जेवढ्या फांद्या खुडाल, तेवढ्या त्याला शाखा फुटतात. अधून-मधून कुंडीत माती, खत घालत राहावे.


 कोरफड
बागकामाची आवड तर आहे, पण वेळ नाही, अशा हौशी लोकांसाठी हे सर्वगुण संपन्न झाड. एकदा कुंडीत लावलं, अधून-मधून पाणी घातलं की वर्षानुवर्ष काहीही काळजी न घेता कोरफड वाढते. कीड नाही की रोग नाही. कोरफडीचेही वेगवेगळे प्रकार असतात. तेव्हा जाणकार व्यक्तीला विचारुन कोरफडीची लागवड करावी. वापरायला सर्वात खालचं मांसलं पान घ्यावे. कोरफडीचे काटे धारदार चाकूने काढावेत. त्यानंतर सालं काढून गर वापरायला घ्यावा. जखम झाल्यास, हळदीत कोरफडीचा गर घालून त्याचा लेप लावावा. त्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते. तसेच त्वचेसाठीही कोरफडीचा लेप फायदेकारक आहे. फेसपॅक म्हणूनही तो चेहर्‍यावर लावता येतो.केसांच्या अनेक समस्यांवरही कोरफडीचा लेप उपायकारक ठरतो. कोंडा, केसांचे गळणे, केसांची वाढ यासाठी कोरफडीचा गर मिक्सरमध्ये वाटून पातळ करुन लावल्यास उत्तम. खोकल्यावरही हा गर अत्यंत गुणकारी आहे. गर+सूंठ पूड आणि हळद मधात घालून चाटण दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास आराम मिळतो. पोट साफ न होण्याची तक्रार असेल तरी कोरफडीचा गर कामी येतो.



  रुई
 मारुतीला रुईची पानं माळेच्या स्वरुपात वाहतात. शेतात काम करताना रुईच्या औषधी गुणधर्मांचा फायदा मी अनेकवेळा घेतला आहे. काटा रुतून मध्येच तुटला की तो काढणे अवघड जाते. अशा वेळी चिकाचा एक थेंब लावला की तिथं फोड येऊन काटा काढणे सोपं होते. लहान मुलांचं पोट दुखलं की पान गरम करुन शेकतात.


 पानफुटी
 आपण बर्‍याचदा शोभेसाठी पानफुटी कुंडीत लावतो. अगदी कमी पाण्यावर लागणारे, मांसल पानांच देखणं झाड. पण आहे खूपच औषधी. मूतखडा झाल्यावर बरीच लोकं याच्या पानाचा वापर करतात. याच्या पानांचा रस जंतांवरही गुणकारी असतो. लहान सहान जखमांवर पानफुटीचा रस लावल्यास जखमेतून रक्त वाहात असल्यास थांबते.  खोकल्यावरही पानफुटी गुणकारी आहे. पानफुटीचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे जाणकार व्यक्तींना औषधी प्रकार कोणता हे विचारुनच वापरावे.


  दुवार्
 बर्‍याच वेळा  निर्माल्य कुंडीत टाकले की आपोआप दुर्वा रुजतात. उष्णतेमुळे येणार्‍या तापावर दुर्वा अत्यंत गुणकारी मानल्या जातात. म्हणूनच गणपतीला त्या वाहिल्या जातात. उन्हाळ्यात घोणा फुटतो आणि नाकातून रक्त येते, अशा वेळी दुर्वांच्या रसाचे दोन थेंब नाकात घालावेत.


 आघाडा
गणपतीच्या पत्रीतली ही वनस्पती अगदी जंगली वाढताना आढळते. कुणीही ती कुंडीत लावण्याचा प्रयत्न करत नाही. पण ही वनस्पती इतकी गुणकारी आहे की ती अवश्य लावावी. मला प्रत्यक्ष त्याची प्रचिती अनेक वेळा आली आहे. कावीळ झाली की भूक लागत नाही, अशाने अशक्तपणा वाढतो. माझ्या लेकीला असे झाले असता आदिवासी सहकार्याने मूळ उगाळून तो कालवून घ्याचा सल्ला दिला. काही तासातच तिला भूक लागली. काटा गेला की यांच्या पानांना ठेचून बांधले की काटा बाहेर निघतो. दाढ दुखत असली की आघाड्याची पानं चावून खावीत.


 निर्गुंडी
 निर्गुंडी कुंपणाला लावले जाते, हीच वनस्पती कुंडीतही लावता येते. दमून-थकून आल्यावर गरम पाण्यात निर्गुंडीचा पाला घालून आंघोळ केल्यास दुखर्‍या अंगाला आराम मिळतो. गावी तर शेतावर कष्ट करुन आलेल्या बैलांना देखील अशीच शेकत-शेकत आंघोळ घालतात. कुठे सूज आली की पाला वाटून गरम करुन शेकतात.


  झेंडू
 नवरात्रीत झेंडूचे महत्त्व खूप असते. खरं तर प्रत्येक सणालाच झेंडूची फुले आवर्जून वापरली जातात. झेंडूचे गुणधर्म एवढे असतात की, FIRST AID  म्हणून एक तरी रोपटं कुंडीत असावं काही वेळा सुखंटला स्पर्श  झाल्यावर प्रचंड खाज सुटते. अशावेळी पाल्याचा रस लावावा. जखम झाल्यावरही पानंाचा रस लावता येतो.


  नागवेल
 जेवणानंतर कुरकुरीत ताजं पान खायचे असेल तर ते आपल्या बागेतलंच असावं. ज्या  ठिकाणी सूर्यप्रकाश तीव्र नसेल तिथे हा वेल फोफावतो. चकचकीत हिरव्या रंगाच्या पानांचा वेल मनीप्लांट सारखा  चढवता येतो. पण कुंडीत पाणी कधीच साचू नये, वरच्यावर शेणखत/गांडूळखत घालत राहावे म्हणजे पानांचा आकार लहान होत नाही.


  अडुळसा
 खोकल्यावर अत्यंत गुणकारी औषध म्हणून अडुळसा सुपरिचित आहे. याची नुसती फांदी रोवली तरी त्याला मूळं फुटून चांगली रोपं तयार करता येतात. पक्व पानांचा रस करता येतो. पानं जराशी तव्यावर गरम करून वाटून पिळली की रस काढता येतो. हा रस मध घालून घेतात किंवा खडीसाखरही वापरता येते. अंगावर सूज आली असल्यास पानं तव्यावर गरम करुन सुजेवर बांधल्यास आराम मिळतो. पूर्वी याच्या वाळलेल्या पानांच्या पुड्या कपड्यांमध्ये ठेवण्याची पद्धत होती. त्यामुळे वस्त्रांना कसर लागत नाही. अडुळसाच्या पानांची बीडी करुन ओढताना मी लोकांना बघितले आहे. त्याने दमा कमी होतो असे म्हणतात.


 गुलाब
 सर्वांच्या परिचयाचे आवडते फूल गावठी गुलाब. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ‘‘गुलाब पंखूडी‘‘ मिठाईवर घालतात. रोज जरी एक-दोन फुलं लागली तरी त्याचे गुलकंद करता येते. खडीसाखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांचे थर करुन बर्णी उन्हात ठेवली की छान गुलकंद तयार होतो. पित्त, उष्णता, शौचास साफ होणे, डोळ्यांची जळजळ अनेक व्याधींवर उपयुक्त ठरते.


 जास्वंद
 जास्वंद अर्थात गणपतीचे लाडके फुल. गावात लहान मुलं जास्वंदाच्या पाकळ्या खाताना दिसतात. जास्वंदाची फुलं खाल्ली की कृमींचा नाश होतो असे म्हणतात. मेंदूची तरतरी वाढवण्यासाठी देखील जास्वंदाची फुले खडीसाखरे बरोबर खाल्ली की  फायदा होतो. पानांचा-फुलांचा वापर करुन तेल बनवता येते. त्याने केस काळेभोर, लांब सडक राहतात.


  औषधी वनस्पती लावताना हे लक्षात घ्यावे  या वनस्पतींचा वापर वैद्यांना विचारूनच करावा.


  कुंडी व्यवस्थित भरावी, पाण्याचा निचरा होण्यासाठी खाली मोठं छिद्र असावं, माती आणि कुजलेलं शेणखत किंवा गांडूळखत २:१ प्रमाणात मिसळून भरावे औषधी वनस्पतींवर रोग किंवा कीड लागल्यास रासायनिक औषधांचा वापर करु नये.  उन्हात वाढलेल्या वनस्पतीमध्ये सावलीत वाढलेल्या वनस्पतींपेक्षा जास्त गुणधर्म असतात




सौजन्य : दै. मुंबई तरुण- भारत  
तुळस

ज्यांना जेनेटिक विकार आहेत म्हणजे ज्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक काही मुलभूत बदल होऊन विकार झाले आहेत त्यांना कपाळावर तुळशीच्या खोडाचे गंध लावल्याने फायदा होतो. तुळस अग्निदीपक आहे. भूक लागत नसल्यास चार चमचे तुळशीचा रस थोडी खडीसाखर घालून घेतल्यास भूक लागते. पोटात दुखत असल्यास तुळशीच्या रसात थोडा लिंबाचा रस घालून घेतल्यास पोटदुखी थांबते. [ दुसऱ्याच्या उत्कर्षाने पोटदुखी जाणवत असेल तर ती याने बरी होणार नाही.....हाहाहा] दमा, अस्थमा असल्यास तुळशीचा रस खडीसाखर घालून घेतल्यास उपयोग होतो. त्यात थोडी मिरी पावडर, लवंग पावडर आणि अडुळसा घातल्यास उत्तम. खडी साखरेऐवजी मधातून घेतल्यास कफ विकारात अतिशय चांगला उपयोग होतो. तुळशीची पाने वाळवून त्याची पावडर करून सर्दीने डोके दुखत असल्यास तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकेदुखी थांबते.

वेंकटेश्वरा विद्यापीठ आणि इतर काही संशोधकांच्या अभ्यासानुसार तुलस हीच एक वनस्पति अशी आहे की जी "ओझोन" [O३] बाहेर टाकते. सध्या म्हंटल्या जाणार्या ग्रीन हाउस इफेक्ट नुसार पृथ्वीवर आलेल्या सूर्य प्रकाशातील थर्मल इन्फ्रारेड किरण वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात येथील भयानक प्रदूषणामुळे धरून ठेवले गेल्याने पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि त्यामुळे बर्फ़ाच्छादित पर्वतावरील बर्फ वितळून हे पाणी समुद्रात मिसळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि फ्रीज सारख्या उपकरणांमुळे अर्थात त्यात वापरल्या गेलेल्या CFC सारख्या रसायनांमुळे वातावरणाच्या वरील ओझोनचा थरही विरळ होत चालला आहे. आणि या निर्माण झालेल्या मोठ्या जागेतून सूर्य प्रकाश अजून तीव्रतेने पृथ्वीवर येतो आहे. आपण अंगावर जे Body स्प्रे मारतो त्यामुळे शरीराभोवतीचा ओझोन कमी होतो. या सर्वांवर बिन खर्चिक आणि सोपा उपाय म्हणजे तुळस लावणे होय.

तुळशीला सकाळी माय भगिनी पाण्याचे अर्घ्य देऊन नमस्कार करून प्रदक्षिणा करतात. त्यामुळे पाण्यातून परावर्तीत झालेल्या सूर्यप्रकाशातील ७ रंग त्या स्त्रीच्या शरीरावर पडून तिला त्याचा फायदा होतो. तसेच तुळशीच्या वासाने मन प्रफुल्लीत होते. हवा तुळशीने शुद्ध तर झालेलीच असते. त्याचाही लाभ होतो. प्र+ दक्षिणेचा सुद्धा लाभ होतो. प्र म्हणजे पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या बाजूने. सारे सौर मंडळ, ग्रह, तारे, आकाशगंगा, अणु, रेणू सारे सारे फिरत आहेत. त्यामुळे जगाची निर्मिती, स्थिती आणि पोषण चालू आहे. तर मग आपणही जर आपल्याला पूज्य असलेल्या देव, गुरु किंवा वनस्पती आणि प्रतीकाभोवती जर फिरलो म्हणजेच प्रदक्षिणा केली तर आपलेही जीवन सुलभ, आनंदी आणि सुखमय होईल. ग्रहणकाळामध्ये अन्न आणि पाणी दुषित होऊ नये म्हणून त्यावर तुळशीची पाने ठेवतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजल आणि तुळस घालतात.....दोन्हीही जंतुघ्न असल्याने... तुळशीतून उडणारे यलो ओईल हे हवा शुद्धही करते आणि डासांना पळवून सुद्धा लावते.

इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की खूप पूर्वी माझ्या एक गोष्ट वाचनात आली होती ती म्हणजे पुण्याजवळील NCL Laboratory ला तुळशीच्या पानात "सोन्याचा" अंश आढळून आला होता. कदाचित त्यामुळेच रुक्मिणीने श्रीकृष्णाची सुवर्णतुला करताना तुळशीचे एक पान सोन्याच्या पारड्यात टाकले असावे.

तुळस ही कफ विकारावर अत्यंत उपयोगी आहे. शिवाय सौंदर्यवर्धक सुद्धा आहे....



(Article by Dr. Hemant Sahstrabuddhe alias Kaladas)
आले (Ginger)

    भूक वाढविते. जेवणास बसण्यापूर्वी आले खालल्यास तोंडाची रुची वाढून भूक वाढते
    आल्याच्या रसानी श्वास लागत असल्यास, छातीत दुखत असल्यास आराम मिळतो
    आले व लिंबाचा रस पोटात वायू झाला असल्यास किंवा ताण आल्यास गुणकारी आहे
    आले व मधाचे चाटण खोकल्या पासून आराम देते
    उलटी होत असल्यास आल्याचा रस व थोडी खाडी साखर घेतल्यावर उलटी थांबते
    थंडी पासून डोके जड झाले असेल तर आल्याचा रस डोक्यावर चोळावा, डोके दुखायचे राहते
    आल्याचा रस मीठ घालून चोळल्यास सांधे दुखी थांबते
    कानास ठणका लागला असता कोमात आल्याचा रस घलव. ठणका राहतो.
    रोजच्या भोजनात आले हे आवश्यक आहे


ओवा (Carom Seeds)

    पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे
    रोज रात्री झोपताना चिमुटभर ओवा खालल्यास पोट दुखी, पोट फुगणे, अजीर्ण होणे इत्यादी होणार नाही.
    'ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल', ही म्हण प्रचारात आहे.
    ओव्याने शौचास साफ होते
    ओव्याने पोटातील कृमी निघून जाते
    जेवण नंतर सम प्रमाणात ओवा, बदामाची बी व सुके खोबरे खालल्यास उरतील जळजळ होत नाही
    दुध पचत नसल्यास ओवा खावा. दुध पचते
    Bedwetting (झोपेत लाघवी) करणाऱ्या लहान मुलांना रोज रात्री अर्धा गरम ओवा खायला दिल्यास फरक पडतो
    अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो

खसखस (Poppy seeds)

    खसखस शक्ती साठी उत्तम आहे. खसखसच्या लापशी ने शक्ती येते
    खसखस सुका खोकल्यावर उपायकारक आहे


जायफळ आणि जायपत्री (जावंत्री) (Nutmeg and Mace)

    जायफळ आणि जायपत्री एकाच झाडाची फळे आणि पाने अहेत. जायपत्री उष्ण अस्ते.
    चोरट्या तापावर, कफ, खोकला असला तर जायपत्री विद्याच्या पानाबरोबर देतात
    जायपत्री पाण्यात उगाळून डोक्यास लावल्यास डोके दुखी थांबते
    भूक न लागणे, खाणे पचत नसणे, भूक मंद होणे, जायपत्री ह्यावर उत्तम उपाय आहे
    जायपत्री व खोबरेल तेल केसाला लावले तर केस गळणे थांबते व केस वाढतात
    सांधे दुखत असल्यास जायपत्रीचे तेल लावल्याने दुख ताबडतोब बरे होते


कांदा

    कांदा अजीर्णावर चांगले औषध आहे.
    भूक वाढवते व बळ देणारा आहे.
    परसाकडला साफ होते.
    कांदा व दह्याच्यी कोशिंबीर खालल्यास झोप छान लागते.
    कांदा भाजून गरम गरम बांधल्यास शरीरावर उठलेली गाठ फुटून जाते.
    कांदाच्या दर्पाने मृच्छा कमी होतो.
    मुळव्याधीवर कांदा उत्तम औषध आहे.



जिरे / शहाजिरे
    भूक लागत नसल्यास ओकारी येत असल्यास, जिरे द्यावे
    जिरे आणि वावडिंगाची पूड गुळाबरोबर दिल्यास लहान मुलांचे जंत मरतात
    पोट फुगले तर जिरे खावे
    सुन्ठीची व जीऱ्याची पूड मधातून घेतल्यास खोकला थांबतो
    जीऱ्याची पूड साखरे बरोबर दिल्यास जुलाब (आव) थांबतात. आंबट ढेकर व पित्त पडत असल्यास सुद्धा हे उपयोगी आहे



तीळ

    तीळामुळे भूक वाढते व शक्ती येते
    मुळव्याधीवर तीळ रोज खालल्यास परसाकड साफ होवून बरी होते
    तीळ वाटून गरम करून शेकल्यास सूज कमी होते
    तीळ आणि ओवा समप्रमाणात दोन वेळा घेतल्यास वारंवार लघवीस जाण्याचे प्रमाण कमी होते
    तिळाच्या पोतीसाने शेकल्यास वायुमुळे आलेली चमक निघून जाते
    तिळाचे तेल केसास लावल्याने केस चांगले राहतात व वाढतात



दालचिनी

    पोट फुगत असेल, वायू सरत नसेल, भूक बिलकुल लागत नसेल तर दालचिनी,
    सुंठ व वेलदोडे ह्यांचे (समभाग) चूर्ण जेवणापूर्वी मधा बरोबर घ्यावे.
    दालचिनीच्या गोळ्या सुका खोकला सुटण्यासाठी देतात.
    जीर्णज्वर, अग्निमांघ व साधारण कडकीवर सितोपलादी चूर्ण देतात त्यामध्ये दालचिनी असते.
    दालचिनी परसाकड थांबवणारी आहे.


धने

    धने लघवीस साफ करणारे आहेत.
    रुची वाढून भूक लागते.
    धने आणि साखर खाल्यास पित्त बसते.
    धने पाचक आहेत.
    धने कृमिनाशक आहेत. नुसते धने किंवा मधाबरोबर पूड घेतल्यास जंत कमी होतात.
    धने आणि जेष्ठमध यांचा काढा खोकल्यावर उत्तम औषध आहे.
    धने दृदयाला अत्यंत उपकारक आहेत. साखरेबरोबर धने घेतल्यास बेचैनी जाऊन आराम पडतो.


नागकेशर

    नागकेशर हे रक्तमूळव्याधीचे औषध आहे.
    नागकेशर लोण्यातून पायाला चोळले असता पायाचा दाह शांत होतो.


पुदिना

    पुदिन्याची चटणी तोंडास रुची देते व अन्न पचवते.



सुके खोबरे

    शौचास फार होत असल्यास सुके खोबरयाचा तुकडा खाल्यास शौचास जावेसे वाटणार नाही.
    सुके खोबरे वीर्यवर्धक आहे.
    लसूण खोबरयाची चटणीने वात जातो.



बडीशेप

    कोमट पाण्याबरोबर बडीशेप खाल्ल्यास वायुने फुगलेले पोट उतरते.
    बडीशेप बुद्धी वाढवणारी आहे. बडीशेपचे चूर्ण व मध सेवन केल्यास बुद्धी तरतरीत होते.
    अन्न पचविण्यास बडीशेप उपयुक्त आहे.
    पोटदुखी कमी करते.
    बडीशेपचा काढा साखर घालून दिल्यास ओकारी व अंगाचा दाह थांबतो.
    थोडया तुपात बडीशेप तळून, वाटून ते चूर्ण मस्तकावर बांधल्यास मस्तक दुखी थांबते.


मिरची

    ओली कोथिंबीर व हिरव्या मिरचीची चटणी तोंडास रुची आणते.
    लाल मिरच्यांची बारीक पूड व दुप्पट गुळ घालून केलेल्या गोळ्या खाल्ल्यास पोटदुखी थांबते.
    आमांश, हगवण, कोलरा, हयात मिरचीच्या गोळ्या
    कांद्याच्या रसात सम प्रमाणात मिरची व चुन्याच्या मिश्रणाची गोळी करतात)
    मिरचीचे तिखट दारू पिणारया माणसाना भूक लागत नसेल तेव्हा दारू सोडून खाल्यास भूक चांगली लागते.



मिरे

    भूक वाढविणारया सर्व औषधात मिरे उत्तम.
    मिरे पोटातील वात कमी करणारे आहे.
    मिरे कफ कमी करणारे आहे.
    चिमुटभर मिरयाचे चूर्ण पंचपात्रीभर कढत पाण्याबरोबर घ्यावे खोकला थांबतो.
    धाप लागली असल्यास चिमटीभर मिरयाचेचूर्ण,४ थेंब मध व चिंचोकाभर तुपाशी वरचेवर घेतले असता श्वास बसतो.
    मिरपूड आल्याच्या रसात घेतल्यास अन्न पचते.
    मिरे पोटशूळ थांबवते.
    ४ मिरयाचे दाणे सकाळ, संध्याकाळ चावून खालल्यास कृमी नाहीशी होते.
    कसल्याही हिवतापावर मिरयाचा काढा वस्ताद आहे.
    दात दुखत असल्यास मिरयाच्या पाण्याने वारंवार गुळण्या केल्यास दुखणे थांबते.



मीठ

    रुची आणणारया पदार्थात मीठ श्रेष्ठ आहे.
    मीठ कफघ्न आहे. मीठाच्या पाण्याने कफ पातळ होऊन भराभर सुटतो व त्रास कमी होतो.
    थोडे आले भाजून त्याला मीठ लावून खालल्यास पोट साफ होते.
    सुंठ भाजून मीठ लावून खाल्ली असता वायू सरून ढेकर बंद होतात व पोट साफ उतरते.
    मीठामुळे शौचास व लघवीस साफ होते.
    कफाने भरलेली छाती मीठाने शेकली असता हलकी होते.
    मीठ गुणकारी असले तरी जास्त खाण्याचा पदार्थ नव्हे हे लक्षात असू द्या. अपाय होण्याचा संभव असतो.
    ४ मिरयाचे दाणे सकाळ, संध्याकाळ चावून खालल्यास कृमी नाहीशी होते.
    गांधीलमाशी चावली असल्यास मीठ लावून हळूहळू चोळल्यास आग थांबते.
    मीठ कृमिहन आहे.



मेथ्या

    भूक वाढते, पोटात वायू होऊ देत नाही.
    मेथ्या कफघ्न आहे.
    सर्व अंग दुखत असल्यास, सांध्याला कळा लागल्या असल्यास,
    वातांना हैराण झाले असल्यास मेथ्यांचे लाडू करून खवे. कळा थांबतात . वात बरा होतो
    मेथ्यांचे लाडू वातावर व शक्तीसाठी उत्तम घरगुती औषध आहे



मोहरी

    कफाच्या तापावर मोहरीची पूड मधातून घेतल्यास ताप कमी होतो
    उचकी थांबविण्यास मोहरीची पूड, मध व तुपाचे चाटण द्यावे
    मोहरी पूड, साखर, तुपात चार दिवस घेतल्यास भूक वाढते
    पोटदुखी थांबवते
    मोहरी कफ़घ्न आहे. खोकल्यावर व कफावर मोहरी सारखे दुसरे उत्तम औषध नाही
    मोहरी कृमिघ्न आहे




लवंग

    कफ नाहीशी करणाऱ्या औषधांमध्ये लवंग अग्रस्थानी आहे
    खोकल्यावर, ढास लागली असेल तर लवंग चावून खालल्यास ठसका थांबतो, खोकला सुटतो
    भूक लागण्यास लवंगा उत्तम
    लवंगाचे पाणी पिल्याने तहान कमी होते
    ओकारीची भावना लवंगेने नाहीशी होते
    दात दुखत असल्यास दातात लवंग धरली असता दुखणे थांबते




लसुण

    लसुण पाचक व धातुवर्धक आहे
    अजीर्ण झाल्यास पोटफुगी असल्यास लसुण तुपात तळून खावा
    बुद्धी तरतरीत करते वध्विते. शाळकरी मुलांना तर ती अवश्य द्यावी
    लसाणामुळे आवाज खुलतो
    अंगात चमक निघत असल्यास लसुण खावा
    लसुण मोडलेले हाड सांधणारी आहे. लसुण खालले तर मोडलेले हाड लवकर बरे होते
    लसुण खालल्यास शौचास साफ होते
    छातीत दुखणे, छातीत जड वाटणे दमल्या सारखे वाटणे ह्यावर लसुण रामबाण उपाय आहे
    लहान मुलांची कृमी लसुण नाहीशी करते
    नित्य लसुण खालल्यास अंगावरील सूज जाते
    उचकी येत असल्यास लसुण खावा. उचकी थांबते
    लसुण खालल्याने श्वास कमी होतो



वेलदोडा

    वेलदोडा अत्यंत पाचक आहे
    अन्न पचविण्यास अपचनामुळे करपट ढेकारांवर वेलदोडा उत्तम उपाय आहे
    वेलदोडा कफघ्न आहे.
    वेलदोडयाचे व सुंठीचे वस्त्रगाळ चूर्ण मधातून चाटावयास दिल्यास कफ पडण्याचे थांबून खोकला कमी पडतो
    पोटफुगीवर वेलदोड्या सारखे जालीम औषध नाही
    वेलदोडा रुची उत्पन्न करणारा आहे


हळद

    हळदीचा उपयोग पोटातून व वरून रक्तशुद्धीसाठी करतात
    हळद, गुळाच्या लहान गोळ्या, वाव्दिन्गाच्या काढ्या बरोबर पिण्यास दिल्यावर जंत कमी होतात
    समप्रमाणात हळद आणि तीळ व दुप्पट गुल घालून दुवक़्त दोन घोट कोमट
    पाण्याबरोबर घेतल्यास कसल्याही प्रकारची जास्त झालेली लघवी थांबते
    सर्दी पडसे झाले असता हळद दुध घेतल्यास आराम पडतो
    हळकुंडाचा जाड लेप पडल्यावर, लागल्यावर लावण्याची प्रथा आहे
    हळद जंतुघ्न (disinfectant) आहे
    देवीचे व्रण कात व हळद लावल्यास लवकर भरून येतात
    डोळे आले असल्यास स्वच्छ कापडाचे फडके हळदीच्या काढ्यात भिजवून डोळ्यावर ठेवावे. आग खुपणे बंद होते



हिंग

    शुद्ध हिंगास अतिशय उग्र वास येतो. त्याची उग्रता कमी करण्यासाठी म्हणून प्रक्रियाकरून तो स्वयंपाकात वापरतात.
    त्याला बांधणी हिंग म्हणतात.
    गव्हाचे पीठ व डिंक शुद्ध हिंगाच्या पाण्यात मिसळून त्याची बांधणी हिंग तयार होते हिंग पाचक आहे.
    अर्धशिशीवर हिंगाचे पाणी नाकपुडयात थेंब थेंब सोडतात.
    हिंग अग्निदीपक, रुचीकर, पाचक व जंतुनाशक असल्याने दम, खोकला, कफ, इत्यादी विकारांवर उपयुक्त आहे.
    दाढदुखी, दंतकृमीसाठी भाजलेला हिंग दाढेखाली धरावा.
    सर्दीने कानात दडे बसल्यास उत्तम हिंग कापसात गुंडाळून कानात घालून ठेवावेत
    आहारामध्ये / मसाल्यांमध्ये प्रमाण पेक्षा जास्त हिंग असल्यास जळजळ जाणवू लागते.
    त्यामुळे चवीला जरी छान वाटत असले तरी योग्य प्रमाणातच हिंगाचा वापर करवा.

घरगुती वापरातील मसाल्यांच्या घटकांमध्ये बरेच औषधी गुण असतात.

प्रत्येक व्यक्तीचे वय, शारीरिक ठेवण, ठराविक अलर्जी इत्यादी गोष्टींसाठी नमूद केलेले उपाय अमलात आणायच्या अगोदर आपल्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या.



सौजन्य - http://www.pallavisspices.com

तुमचे केस गळत आहेत...तर हे कराच !

कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस. कांदा हा केस गळती रोखतो. कारण कांद्यामध्ये सल्फर मात्रा अधिक असते. कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्यास सल्फरमुळे रक्त संचार चांगला होतो. त्यामुळे कांद्याचा रस हा स्कल्प इंफेक्शन नष्ट करतो. आणि त्याचबरोबर केसांना मजबूत बनण्यास मदत करतो. कसा उपयोग करणार - कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घेऊन वाटावा. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस्त केसांना लावावा. तीन मिनिट हा रस ठेवू द्यावा. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवून टाकावेत. कांद्याचा रस आठवड्यातून तीनवेळा लावणे आवश्यक आहे. - कांद्याच्या रसाबरोबर मध लावलेली चांगली. एक चतुर्थ कप रसात थोडीशी मध मिसळायची. हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे. त्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल. - एक कांदा कापून रम भरलेल्या ग्लासात टाकावा. कांदा एक रात्र तसचा ठेवावा. दुसऱ्या दिवशी रम काढून घ्यावी. त्यानंतर कांद्याचे तुकडे वेगळे होतील. या रमने केसांचा मसाज करावा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग करावा. केस गळायचे थांबतील. - एक चमच्या मद आणि एक चमच्या दालचिन पावडरमध्ये थोडे ऑलिव तेल घेऊन त्याची पेस्ट करावी. आंघोळ करण्यापूर्वी केस धुण्याआधी ही पेस्ट केसांना लावायची. १५ मिनिटानंतर गरम पाण्याने केस धुवावे. असं केल्यानंतर काही दिवसांनी केस गळण्याची समस्या दूर होईल. - आकाशवेल (अमरवेल) पाण्यात उकळवा. या पाण्याने केस धुतल्याने केस गळण्याचे थांबतात. केस गळण्यासाठी हे टाळा - तुमचे जास्त केस गळत असतील तर तुम्ही चहा आणि कॉफी घेण्याचे टाळा. तसेच नशायुक्त पदार्थांचे सेवन करू नका. धुम्रपान करण्याचे टाळा. त्यामुळे केस गळण्याचे तात्काळ बंद होईल. जास्तीत जास्त पाणी प्या. - मोहरीचे तेल मेहंदीच्या पानावर टाकून पाने गरम करावीत. ती थंड करून दररोज केसांना लावावीत. त्यामुळे केस गळण्याचे थांबतील. - मेथीचे बी पाण्यात रात्री भिजत टाका. सकाळी उंबळलेले बी वाटा आणि त्याचा लेप एक तास तरी केसांना लावून त्यानंतर केस धुवा. हे केल्यानंतर काही दिवसांनी केस गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळेल. तसेच नवीन केस उगवण्यासाठी मदत होईल. - नारळाच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावणे अधिक चांगले. केस धुण्याआधी एक तास हे तेल केसांना लावणे आवश्यक आहे. त्यामुळे केस गळायचे थांबतात. • झी २४ तास यांच्या सौजन्याने

माझ्याबद्दल