मंगळवार, ३१ मे, २०२२

बोधकथा : कुणाला कमी समजू नये...

 प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो. 

त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोडय़ात वीस सोन्याचे लाडू होते.


 तात्पर्य-कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही.

*"आपल्यात काही टॅलेंट आहे किंवा टॅलेंट होते", त्याने जरूर वाचावे...*

 ज्याला वाटते की,*.....

*"आपल्यात काही टॅलेंट आहे किंवा टॅलेंट होते", त्याने जरूर वाचावे...*

*'दोन चोरांची गोष्ट'!*

*चोर १ –*

अमेरिकेमध्ये *‘आर्थर बेरी’* नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, *इतका तो सफाईदार चोर होता.*

एकोणीसशे वीसच्या दशकात *लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता.* तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवून बसलं.

चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.

त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला! 

वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साध जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण *‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’* बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.

लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले, आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली.
मुलाखत खुप रंगली,

मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, *“तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”*

“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.

“हो, हो!” एकच गलका झाला.

*“मी सर्वात मोठी चोरी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’, हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.”*

सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.

“मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवू शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”

*चोर २ –*

१८८७ चा एक पावसाळा, एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला. 

कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली, तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता, दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!

नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली, तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला,

शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले. 

ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले.

पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवून बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले. 

कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले.

तो जेलमध्ये असतानाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला, त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले. 

*विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा.* 

*'तात्पर्य'!*

*- आपली अंगभुत कला न*
*ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे.*

*- ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे,* जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.

*- ती व्यक्ती चोरच आहे,* ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.

*- तो प्रत्येक रिकामटेकडा चोर आहे,* जो समाजाला काहीही देत नाही. आणि केवळ राजकारणावर फुकट चर्चा करण्यात आपला वेळ वाया घालवतो.

फेंगशुई

 


*एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करून लंडनमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यावर आलिशान घर बांधले.*

*त्या जमिनीवर आधीच एक सुंदर जलतरण तलाव होता आणि मागे 100 वर्ष जुने लिचीचे झाड होते.*

 *त्या लिचीच्या झाडामुळेच त्यांनी ती जमीन विकत घेतली होती, कारण त्यांच्या पत्नीला लिची खूप आवडत होती.*

*काही काळानंतर घराचे नुतनीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना नूतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा.*

*त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी, मित्रांचे मन राखण्याचे त्याने मान्य केले आणि ३० वर्षांपासून हाँगकाँग येथील वास्तुशास्त्राचे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.*

*काओंना विमानतळावरून नेले, दोघांनी शहरात जेवण केले आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत जेव्हा एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तो त्याला रस्ता देत असे.*
*मास्टर काओ हसले आणि म्हणाले की तुम्ही खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करता. ते देखील हसले आणि प्रतिसादात म्हणाले की लोक सहसा काही आवश्यक काम असतानाच ओव्हरटेक करतात, म्हणून आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे.*
*घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी केला. तेवढ्यात अचानक एक मुल रस्त्यापलिकडून हसत हसत आणि वेगाने धावत त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता ओलांडून गेले. त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्त्याकडे पाहतच राहिला, जणू कोणाची तरी वाट पाहत होता. तेवढ्यात त्याच रस्त्यावरून अचानक आणखी एक मूल पुढे आलं. त्यांच्या कारच्या पुढून पळत गेले, बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असावे. मास्टर काओने आश्चर्याने विचारले - दुसरे मूलही धावत बाहेर येईल हे तुला कसे कळते?*

*ते मोठ्या सहजतेने म्हणाले, मुले अनेकदा एकमेकांच्या आगे मागे धावत असतात आणि कोणतेही मूल जोडीदाराशिवाय असे धावत असते यावर विश्वास बसत नाही..*

*मास्टर काओ हे ऐकून मोठ्याने हसले आणि म्हणाले की तुम्ही निःसंशयपणे खूप स्थिर चित्त व्यक्ती आहात.*

*घराजवळ आल्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने ७-८ पक्षी वेगाने उडताना दिसले. हे पाहून तो मालक मास्टर काओला म्हणाला की, "जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ राहू शकतो का?"*

*मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की, "कदाचित काही मुले झाडावरून लिची चोरत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, तर झाडावरून पडून मुलाला दुखापतही होऊ शकते.*

*मास्टर काओ काही वेळ गप्प बसले, मग ते संयत आवाजात म्हणाले, "या घराला वास्तुशास्त्राच्या तपासाची आणि उपायांची गरज नाही."*

*त्या गृहस्थाने मोठ्या आश्चर्याने विचारले - का?*

*मास्टर काओ - "जिथे तुमच्यासारखे विवेकी आणि आजूबाजूच्या लोकांचा चांगला विचार करणारे लोक उपस्थित/रहात असतील - ते ठिकाण , ती मालमत्ता वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय पवित्र-आनंददायी-फलदायी असेल".*

*"मित्रांनो, आपले तन आणि मन जेव्हा इतरांच्या सुख-शांतीला प्राधान्य देऊ लागते तेव्हा, इतरांनाच नव्हे तर आपल्यालाही मानसिक शांती व आनंद मिळतो.*

*जेव्हा माणूस नेहमी स्वतःच्या आधी इतरांच्या भल्याचा विचार करू लागतो, तेव्हा नकळत त्याला संतत्व प्राप्त होते, ज्यामुळे इतरांचे भले होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होते.*

 *आपणही असे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्या घराला फेंगशुई किंवा "वास्तू"सारख्या तंत्राची किंवा नवस बोलण्याची गरज भासणार नाही.*

🙏🏻🌹🌹🌹🙏🏻

● UNIQUE VILLAGES IN INDIA......*●

 ● UNIQUE VILLAGES IN INDIA......*● 


*१)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)*
    संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.
   

*२)• शेटफळ (महाराष्ट्र*)
    प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य 
    असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.

*३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र*)
    भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे. 
    ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.
    सर्वाधिक GDP असणारं खेडं.

*४)• पनसरी (गुजरात)*
    भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.
    गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,
    Wi-Fi सुविधाही आहेत.
    गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात.

*५)• जंबुर (गुजरात)*
    भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक
    "आफ्रिकन" वाटतात.
    [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]

*६)• कुलधारा (राजस्थान)*
    "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.
     घरे बेवारस सोडलेली आहेत.

*७)• कोडिन्ही (केरळ*)
     जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.

*८)• मत्तूर (कर्नाटक*)
    दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी
    "संस्कृत" भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.

*९)• बरवानकाला (बिहार)*
    ब्रम्हचा-यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून 
    गांवात लग्न-सोहळाच नाही.

*१०)• मॉवलिनॉन्ग (मेघालया)*
      'आशिया'खंडातील सर्वात "स्वच्छ" गांव.
      पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील
      महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.

*११)• रोंगडोई (आसाम)*
      बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,
      अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव.
       असं लग्न हा 'ग्रामसण'च असतो.

*१२)• कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)*
        Korlai village
       स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही "पोर्तुगिझ:'" भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.
*१३)मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश)*
 एका गावातून ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे...
*१४) झुंझनु (राजस्थान)*
फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती...
६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू...
••••••••••••••••••••••••••••
*असाच वेगळेपणा जपणारी* 
*आणखीही गांवे असतील,*
*माहिती मिळवा, आणि*
*इतरानांही माहित करून द्या*.

‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’..

 आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक शोधाची गोष्ट सांगतो.


‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता.

अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं.

पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले.
दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या.
सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती.

समस्या फार मोठी होती असं नव्हे पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती.
जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली तिला जखम झालीच समजा.

टोमॅटो कापला लागला चाकू-दार बंद करायला गेली लागला खिळा-दुध गरम करायला गेली बसला चटका.
जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती.

नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा धुणं-कापसानं पुसणं-कापडी पट्टी बांधून ड्रेसिंग करणं हे बिनपगारी काम रोजचंच लागलं होतं.

प्रेमापोटी सगळं निभावलं जात असलं तरी ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ आपण घरी असलो तर ठिके पण नसलो तर?काय करावं बुवा?
डिक्सन मोठ्या बुचकळ्यात पडला.

“वेंधळेपणा कमी होईल न होईल पण किमान जोसेफिनला तिला झालेल्या जखमेची काळजी घेणं यायला हवं”
डिक्सनला प्रकर्षानं जाणवलं.

‘एवढं काय त्यात?छोट्यामोठ्या जखमा तर असतात एवढं काय सिरियस त्यात?’ असे विचार आपल्या किंचित निगरगट्ट भारतीय मानसिकतेमुळं येऊ शकतात पण इथं दोन मुद्दे येतात.

पहिला मु्द्दा म्हणजे पाश्चात्य देशात ढोबळ प्रेम-हक्क या पलिकडे वैयक्तिक पातळीवर एकमेकांची ‘परस्पर जबाबदारी’ म्हणून काळजी घेतात.
नाहीच जमलं तर एकवेळ नात्याला तिलांजली देतात पण नुसतीच चौकट पाळण्याच्या अट्टाहासात मेलेली नाती ओढत नाहीत.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा औषधांची उपलब्धता मर्यादित होती-प्रतिजैविकांचा फारसा विकास झालेला नव्हता त्यामुळं जखमा लांबायच्या-सेप्टिक व्हायच्या-अनेकदा मृत्यूही व्हायचे.

शेवटी डिक्सननं चौकोनी कापडाचे तुकडे, त्यांच्यावर एक चिकटपट्टी अन् वरनं क्रिनोलिन लावत जोसेफिनसाठी थोडी रेडिमेड तयारी करून दिली.
जुगाड यशस्वी झाला.
आता डिक्सन घरी नसला तरी जोसेफिन एकटी लिलया जखमेची देखभाल करू लागली. 

डिक्सन काम करत असलेल्या कंपनीत त्याच्या या घरगुती उद्योगाची चर्चा झाली.
अश्या प्रकारचं काॅम्बिनेशन असलेली कापडी पट्टी जखम विक्रमी वेळेत बरी करते हे ऐकून खुद्द कंपनीचा मालक नुसता चकित झाला नाही तर येडा व्हायचा बाकी राहिला.

या भन्नाट जुगाडची कल्पना सगळ्यांनाच जाम आवडली..
कंपनीनं याच पट्टीच्या धर्तीवर ‘बॅंड एड’ या नावानं बल्क प्राॅडक्शन करण्याचा निर्णय घेतला.
कल्पना नवी असल्यानं पहिली बॅच थोडी सावकाश पण विकली गेली.

हातानं बनवण्यात वाया जाणारा वेळ आणि घरोघरी असणारी मागणी यांचं व्यस्त समीकरण बघता कंपनीनं यासाठी मास प्राॅडक्शन व्हावं म्हणून यथोचित यंत्रसामग्री बसवली आणि बस्सऽऽ

‘बॅंड एड’ म्हणून तयार झालेल्या डिक्सनच्या या ब्रॅंडनं नंतर बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला.
कंपनीनं डिक्सनला थेट व्हाॅईस प्रेसिंडेटपदी नेऊन बसवलं.

जोसेफिनच्या स्वयंपाकघरात सुरू झालेला हा ‘बॅंड एड’ चा प्रवास आज आख्ख्या जगभर पसरलाय.
क्वचित अशी व्यक्ती असेल ज्यानं कधी आयुष्यात बॅंड एड बघितलं किंवा वापरलेलं नाही.
दोनेक रुपयाला मिळणाऱ्या बॅंड एडची आज मिलियन डाॅलर्संची उलाढाल होते.

अनेक ब्रॅंड्स आले-गेले पण आजही लोकं दुसऱ्या ब्रॅंडचं बॅंडेज मागतांनाही ‘अमुकतमुक बॅंड एड’ द्या असं म्हणतात हेच या प्राॅडक्टचं यश.

वेंधळ्या बायकोच्या काळजीपोटी का होईना संपुर्ण मानव 
समुहासाठी छोट्या मोठ्या जखमांमुळं होणाऱ्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या ‘अर्ल डिक्सन’ चा आज जन्मदिवस.

हॅट्स ऑफ डिक्सन, बायकोवरच्या प्रेमासाठी आणि कल्पक संशोधनासाठीही❤️💐
#ByPradnyawant
©️डॉ. प्रज्ञावंत देवळेकर🌹👏

माझ्याबद्दल