कापूर वृक्ष
फुलो-यासह कापराची फांदी
हा सदापर्णी वृक्ष लॉरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम कॅम्फोरा असे आहे. हा वृक्ष मूळचा तैवान, चीन व जपान येथील असून भारतात डेहराडून, सहारनपूर, कोलकाता, निलगिरी व म्हैसूर या ठिकाणी त्याची यशस्वीपणे लागवड केलेली आहे. कापूर वृक्ष भक्कम फांद्यांनी डवरलेला असतो व त्याची उंची २०-३० मी. असते. साल फिकट रंगाची खडबडीत आणि उभ्या खाचा असलेली असते. पाने साधी, एकाआड एक, मध्यम आकाराची, अंडाकृती वा लांबट, साधारण जाड, गर्द हिरवी व चकचकीत असून खालची बाजू निळसर रूपेरी दिसते. पानांच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस एक मोठी शीर असते. पानांच्या बगलेत पिवळसर पांढर्या, सुंगधी व लहान फुलांच्या मंजिर्या येतात. फळ मोठ्या वाटाण्याएवढे व गर्द हिरवे असून पिकल्यावर काळे पडते. झाडाच्या सर्व भागांत बाष्पनशील तेल असते. या तेलापासून कापूर मिळवितात. कापूर हा एक सुवासिक ज्वालाग्राही पदार्थ आहे.
कापूर हे सुंगधी, वेदनाहारक, पूतिरोधक आणि कामोत्तेजक आहे. अनेक औषधांमध्ये आणि नायट्रोसेल्युलोज संयुगे तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात. मेंथॉलाप्रमाणे ते त्वचेच्या संपर्कात आल्यास थंडगारपणा जाणवतो. त्वचेची मलमे, चोळण्याची औषधे तसेच सर्दी वा दम्यावर नाकाने हुंगून घेणार्या औषधांत मेंथॉलाबरोबर कापराचा वापर करतात. आशियातील अनेक देशांत त्याचा उपयोग मिठाईमध्ये स्वादासाठी केला जातो. तमिळनाडूत अन्न शिजविताना त्याचा उपयोग हिंगाप्रमाणे करतात. विविध धर्माचे लोक पूजा तसेच धार्मिक कार्यक्रमात आरती करताना कापूर पेटवितात. पूजेसाठी वापरला जाणारा कापूर खाण्यास अयोग्य असतो.
कापूर वृक्षाचा वापर
कापूर वृक्षाच्या सर्व भागांत असलेल्या तेलपेशींमध्ये कापूर तयार होतो. मात्र खोड आणि पानांतून अधिक प्रमाणात कापूर मिळवितात. या वनस्पतीच्या खोडातील वा पानांतील कापूर तेल ऊर्ध्वपातनाने वेगळे करून त्यापासून कापराचे स्फटिक तयार करतात. याखेरीज ड्रायोबॅलेनॉप्स कॅम्फोरा , ओईओटिआ ऊसम्बॅरेन्सिस तसेच लॉरेसी कुलातील इतर वनस्पतींपासून कापूर तेल मिळवितात. सु. ४५ किग्रॅ. अशुध्द कापूर तेलापासून सु. २२ किग्रॅ. कापूर, सु. ९ किग्रॅ. लाल कापूर तेल, सु. ७.५ किग्रॅ. शुभ्र कापूर तेल व सु. १ किग्रॅ. डांबर इ.पदार्थ मिळतात. आज जगभरात ८०% कापूर कृत्रिम रीत्या तयार करून वापरला जात आहे. गुस्ताफ कोम्पा या शास्त्रज्ञाने १९०३ साली कापराचे स्फटिक कृत्रिम रीत्या तयार केले. कापराचे रेणुसूत्र C10H16O असे आहे
by - http://mr.vikaspedia.in