शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

निसर्गच माझा गुरू!...



निसर्गात सारे काही ज्ञान आहे, पण गरज आहे निसर्गाची भाषा अवगत करण्याची. निसर्गाचे संकेत जाणण्याची. एकदा का ही भाषा, हे संकेत समजले, की निसर्गाशी संवाद साधताना एक वेगळाच आनंद मिळतो. निसर्ग मग भरभरून देतो. हे खरे म्हणजे शब्दांत सांगणे अवघड आहे. निसर्गाचे ज्ञान अनुभवणे काही वेगळेच आहे. निसर्गातील या ज्ञानसंपत्तीचा अभ्यास करत स्वत: सेंद्रिय शेतीचे प्रयोग यशस्वी करून आता महाराष्ट्रासह इतरही राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणारे सुभाष शर्मा यांचा हा निसर्गप्रवास...

विदर्भात सेंद्रिय शेतीत सोनं पिकविण्याचा मान मिळतो तो यवतमाळच्या सुभाष शर्मा यांना. केवळ स्वतःचीच शेती विकसित न करता हजारो शेतकऱ्यांना त्यांनी सेंद्रिय शेतीच्या विकासाचे धडे दिले आहेत. आज त्यांच्या पुढाकाराने उत्तरांचलमधील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतो आहे. स्वतःच्या शेतीत रमून शर्मा आता उत्तरांचलकडे लक्ष ठेवतात. त्यांना खंत एकच आहे, विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या शेतीकडे का वळत नाही? हे चित्र बदलण्याचा ध्यास त्यांनी बाळगला आहे.

आपल्या या प्रवासाबाबत ते सांगतात, मी शेतीत रमायला सुरवात केली ती 1975पासून. तेव्हापासून आजतागायत शेतीत दोन प्रकारचे विज्ञान पाहायला मिळाले. दोन्ही प्रकारच्या विज्ञानाची माहिती निसर्गाकडून मिळाली. 1994नंतर "निसर्ग' हाच माझा गुरू झाला. या गुरूने शेतीत एक विज्ञान विनाशाचे चित्र दाखविले अन्‌ दुसरे विज्ञान निर्माणीचे.

विनाशाचे विज्ञानाचे आलेले अनुभव स्पष्ट करताना ते म्हणतात, मी सन 1975पासून रासायनिक शेतीची सुरवात केली. या शेती पद्धतीचा एकच विचार होता की उत्पादन वाढलं की प्रगती होते आणि या दिशेने माझा शेतीचा प्रवास सुरू होता. प्रारंभी उत्पादनाचे उच्चांक वाढले. पण हळूहळू 1986नंतर उत्पादन कमी मिळत गेले. हे उत्पादन वाढविण्यासाठी अधिक खर्च करणे सुरू केले. उत्पादकता वाढत गेली. पण खर्चही वाढत गेला. नफा दुर्मिळ होत गेला. 1988 ते 1994पर्यंत रोग-किडी, नैसर्गिक आपत्तीचे खर्च वाढले. उत्पादन मिळत नाही म्हणून कर्ज उभे झाले, मानसिक विकृती निर्माण झाली. चांगले, वाईट काहीच कळेना. 1990 ते 1994 हा काळ माझ्यासाठी त्रासदायक होता. पण चिंतनही चालू होते. मी श्रमाची पराकाष्ठा करतो आहे. श्रमामागे प्रगती होते, ही म्हण कायम चुकीची आहे. याचे विश्‍लेषण करत असताना मग शेतीची दुसरी पद्धत असू शकते का? शाश्‍वत शेती करता येईल का? कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्‍य आहे का? अशा प्रश्‍नांचं जंजाळ मनात तयार झालं होतं.

या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरं दोन व्यक्तींच्या कार्यानं मिळाल्याचं श्री. शर्मा स्पष्ट करतात. निसर्गशेतीचा विचार प्रत्यक्षात उतरवणारे मासानोबू फुकुओका आणि भास्कर सावे. त्यांच्या शेतीत खर्च कमी आहे, पण शेतीची उत्पादकता चांगली आहे. त्यांची शेती कधी बघितली नव्हती. पण अनेकांच्या तोंडून त्यांची स्तुती ऐकली होती. नंतर मनाशी ठरवून टाकले. जर जगातील एक व्यक्तीही नैसर्गिक शेतीत यशस्वी होत असेल तर ती शक्ती माझ्यातही आहे. माझ्या शक्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्ती इतर शेतकऱ्यांमध्ये आहे. नंतर आपण स्वतःच्या दिशेत परिवर्तन केले पाहिजे. हे ठर,वून श्री. शर्मा यांनी 1994पासून नैसर्गिक शेतीची सुरवात केली. तेव्हा निसर्ग माझा गुरू झाल्याचे श्री. शर्मा नमूद करतात.

या निसर्गगुरूने शेतीतली आव्हानं लक्षात आणून दिली. रासायनिक शेती, माती, पाणी, तापमान, मानवी (संपूर्ण सजीवांचा आरोग्याला धोका), वाढते खर्च, कमी होणारे उत्पादन. पाचही आव्हानांपैकी चौथे आव्हान औद्योगिक प्रगती आणि रासायनिक शेती. या सगळ्यांना रासायनिक शेती कारणीभूत ठरत होती. रासायनिक शेतीचे एकमेव लक्ष म्हणजे उत्पादन वाढ. पण माती, पाणी, सजीवांच्या आरोग्याचा विचार कुणीच करीत नाही. कारण जमिनीत छिद्र होत नाही, पावसाचे पाणी वरून वाहून जाते, सोबत मातीही वाहून जाते. माती निर्जीव होते. पाण्यातही विषाचे प्रमाण वाढत जाते, प्रत्येक पिकांवर विषारी फवारण्या होतात आणि ते लगेच बाजारात विक्रीला येते. कोणतेच मापदंड नसतात. थोडक्‍यात रासायनिक शेतीचे धोके सगळ्यांना माहीत आहेत, म्हणून शेतीत परिवर्तन घडवून आणण्याशिवाय आता मार्ग नाही. कारण या शेती पद्धतीत कुणासोबतही प्रेमाचे नाते राहत नाही. फक्त पैसा कसा जास्त येईल, याचा विचार असतो आणि तो येत नाही. उरावर फक्त कर्ज उभे राहते. या शेती पद्धतीत जिवाणू, गांडूळ, मुंग्या, वाळवी, शत्रू कीड, पाखरे, झाड माती, पाणी, बियाणे, मानवी आरोग्य आदी सगळ्यांनाच नष्ट करण्याचाच विचार असतो. कोणावरही प्रेम राहत नाही. हे मला निसर्गाने शिकवले. म्हणून याला मी विनाशक विज्ञान म्हणतो आणि या विज्ञानाला वाढविण्याचे काम व्यापारातून होत आहे. त्यांच्यासाठी शेतकरी जगला की मेला, याचे काही देणेघेणे नसते.

निर्माणीचे विज्ञान
1994पासून श्री. शर्मा यांनी निर्माणीच्या विज्ञानाला प्रारंभ केला. हयाबाबत सांगताना ते म्हणाले, की ळूहळू निसर्गाने मला अनेक महत्त्वाचे प्रयोग लक्षात आणून दिले आणि या प्रयोगातून तीन तत्त्व दिली. 1) ज्ञान 2) योजकता 3) श्रम. ही शक्ती शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिली. 1) माती (आई) 2) पाणी, 3) बियाणे 4) पीक नियोजन 5) श्रमशास्त्र या पाच शक्ती एकदा शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या की नैसर्गिक शेतीचे विज्ञान सोपे होईल. शिवाय आव्हाने संपुष्टात येतील.

1) माती (आई)- आई शक्तिशाली होते ती चार बाबींतून 1) गाय, 2) वृक्ष, 3) पाखरं, 4) अवशेष.

गाय - गाईच्या संगोपनातून गो संजीवन आणि शेणखत मोठ्या प्रमाणावर मिळते. 1994ला गोसंजीवक तयार केलं. त्याला वेगवेगळ्या मोजमापातून उपयोग करून पाहिले. शेवटी काही वर्षांनंतर एक योग्य माप तयार झाले. शंभर लिटर पाण्यामध्ये 30 किलो गाईचे ताजे शेण, तीन लिटर गोमूत्र, अर्धा किलो गूळ सिमेंटच्या टाकीत किंवा आपल्या सोयीनुसार कोणत्याही उपकरणात दहा दिवस कुजवून उपयोगात आणलं. संजीवकांचा वापर पहिल्या वर्षी हजार लिटर, दुसऱ्या वर्षी आठशे लिटर, तिसऱ्या वर्षी सहाशे लिटर असे दिले. चौथ्या वर्षी संजीवकांतून गोमूत्र बंद केले आणि फक्त शेण आणि गूळ वापरले चारशे लिटर. पाचव्या वर्षी दोनशे लिटर एकरी वापरले. नंतर संजीवकाच्या उपयोगाची आवश्‍यकता भासली नाही. मात्र जेवढं शेणखत तयार होते, त्याचा वापर होत राहतो.

वृक्ष - 1994ला वाचलं होतं, तापमानामुळे वातावरणात भविष्यात प्रचंड बदल होईल. याचा परिणाम शेती उत्पादनावर होईल. हे वाचून लक्ष वृक्षांवर गेलं. शेतीत मोठ्या प्रमाणावर झाडं लावली. झाडं मोठी झाल्यावर लक्षात आलं की झाडांमुळं शेताचं उत्पादन वाढतंय. शेतातलं तापमान नियंत्रणात आलं. जीवजिवाणूंची, मित्रकिडींची संख्या वाढली. वृक्षांपासून पानांच्या स्वरूपात खतही मिळतं. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांची लागवड कशी करावी, हे लक्षात आलं.

पाखरं - वृक्षाची संख्या जसजशी वाढत जाते, वृक्ष मोठे होत गेले की पाखरांची संख्या वाढत जाते. नंतर हीच पाखरं किडींचे नियंत्रण करून पोट भरतात. पोट भरलं की विष्ठेच्या स्वरूपात वर्षभर खत टाकत राहतात. या सहकार्याने उत्पादकता वाढत राहते.

अवशेष - वर्षातून एकदा एक पीक आईसाठी म्हणजे अवशेष निर्माण करण्यासाठी घ्यावं. आईबरोबर प्रेमाचं नातं तयार होतं. पिकात निघालेलं तण अवशेषांच्या स्वरूपात वापरावं. त्यामुळं मातीची (आई) सुपीकता वाढत जाते. आईला शक्तिशाली करण्यासाठी या बाबींची उपयोगिता लक्षात आल्यावर खरा देव कुठं आहे, हे लक्षात आलं आणि देवाची पूजा का करावी, ही पूजा होते कशी, हे लक्षात आलं. आपण तीर्थयात्रेला जाऊ शकलो नाही तर तीर्थ शेतातच निर्माण करावं. हे तीर्थ एक वृक्ष लावले तर एक धाम. चारही धामासाठी चार वृक्ष आणि 12 ज्योतिर्लिंगासाठी 12 वृक्ष. एका एकरात किमान चार वृक्ष असणं नैसर्गिक शेतीत आवश्‍यक आहे. मग पूजा म्हटली तर सगळ्या जीवजिवाणू, गांडूळ, मुंग्या, वाळवी, पाखरांच्या बरोबर प्रेमाचं नात ठेवूून त्यांना जगण्याचा अधिकार म्हणजेच पूजा.

पाणी - आईला शक्तिशाली करण्याची शक्ती म्हणजे पाणी. पावसाचे पडणारे पाणी शंभर टक्के शेतात अडविणे म्हणजेच पूजा होय. हे पाणी आम्ही
मायक्रोट्रेंच, ग्रीड लिंकिंग, नैसर्गिक शेती, शोष खड्डे, 80 फूट ट्रेंच पद्धतीने शंभर टक्के शेतात थांबवून मातीची धूप थांबवली.

बियाणे - बियाणं हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे. एकदा जातिवंत सरळ वाणाचं बियाणं तयार झालं की हेच बियाणं उभारी मिळवून देते. शेतीत जेव्हापासून व्यापाराचा शिरकाव झाला तेव्हापासून शेतकऱ्यांचा हा मूलभूत अधिकार हिरावून घेतला गेला आहे. म्हणून विज्ञानानेही अशा प्रकारचं बियाणे जास्तीत जास्त निर्माण केलं पाहिजे, जे की शेतकऱ्यांना त्याचा वापर स्वतःचंच बियाणं म्हणवून अनेक वर्षं वापरता येईल. या दिशेने काम झाले तरच ते खरे वैज्ञानिक ठरतील आणि शेतकऱ्यांची खरी शक्ती निर्माण होईल.

पीक नियोजन - शेतीत पिकांचे नियोजन करताना एक पीक आईसाठी घेतलंच पाहिजे. जसे सिंचनाची शेती असेल तर खरिपामध्ये मूग किंवा चवळी हे पीक झालं आईसाठी. दुसरं रब्बीमध्ये. मग या पिकांचे अवशेष शेतात दाबून नंतर पानकोबी, फुलकोबी, गहू, कांदा अशा प्रकारची अनेक पिकं आपण घेऊ शकतो. त्यामुळे पिकांचं भरीव उत्पादन आपल्याला मिळू शकतं. नैसर्गिक शेतीत दुसरं महत्त्वाचे आहे निसर्गाने ज्या पिकाला नैसर्गिक वेळ दिली आहे, त्या वेळी त्या पिकांचं उत्पादन घेतलं पाहिजे. उदा. फुलकोबीला निसर्गाने हिवाळ्याची वेळ दिली आहे, तर फुलकोबी हिवाळ्यातच घेतली पाहिजे. म्हणजे या पिकावर रोग-किडीही येत नाहीत. शिवाय उत्पादनही भरपूर मिळतं. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हे पीक घेऊ नये यासाठी आम्ही नैसर्गिक वेळापत्रक पिकांसाठी केले आहे. त्यात दोनशेच्या वर पिकांच्या साखळ्या तयार करता येतात. कोरडवाहू शेतीचेही अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत.

श्रमशास्त्र - श्रमशास्त्रात नांगरणी, निंदणी यांसारख्या प्रकारांत ज्ञानाने खर्च खूप कमी केला आहे. शेतीला चार प्रकारात वाटून दिले आहे आणि त्या प्रकारचे अनेक प्रयोग आम्ही करीत आहोत.
1) तीन एकराखालील कोरडवाहू शेती
2) तीन एकरापेक्षा जास्त शेती कोरडवाहू
3) तीन एकराखालील सिंचनाची शेती
4) तीन एकरापेक्षा जास्त सिंचनाची शेती
या सगळ्या प्रकारच्या शेतीत माती, पाणी, बियाणे पीक नियोजन साध्य केल्यामुळे उत्पादन वाढले म्हणून शेतात कष्ट करणाऱ्या सहकाऱ्यांना वर्षभर काम दिले, नफा झाला. त्यातून 25 टक्के बोनस, पर्यटन आदी सुविधा दिल्या. त्यामुळे शेतीचे अर्थशास्त्र तयार झालं. हे सगळं यश मिळाल्यावर शेतकऱ्यांना गटाने तीन तासाचे दररोज प्रबोधन करता आले. अनेकांना शेती दाखविली जाते, त्यामध्ये आम्ही शेतीचे पीक नियोजन पाण्याचे नियोजन, वृक्षाची शास्त्रीय लागवड पद्धत दाखवितो. आता यापुढे देशभर शेती पद्धतीसाठी शेतकऱ्यांना प्रबोधन आणि इतर राज्यात सेंद्रिय शेतीचे "मॉडेल' बनविण्याचे काम सुरू आहे.







: सुभाष शर्मा : 9422869620

By- agrowon 

माझ्याबद्दल