सोमवार, १६ जून, २०१४

हृदयविकार

हृदयविकार हा शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकला असेल. हृदयविकार हे नाव फार ढोबळ आहे. कारण 'विकार' म्हणजे 'आजार'. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होणे यामुळे संबंधित भागातल्या स्नायूंचे पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला 'झटका' असा शब्द पडला आहे. हृदयस्नायूचा जास्त भाग निकामी झाला तर हृदयक्रिया बंद पडून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या स्वत:च्या रक्तवाहिन्या (रोहिण्या) असतात. हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे 70 वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या इतर कोठल्याही स्नायूपेक्षा जास्त जोरकसपणे, सातत्याने आणि नियमितपणे करावे लागते. हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू पुरवण्याचे काम काही क्षण जरी बंद पडले तरी हृदय बंद पडू शकते. त्यामुळे हृदयक्रिया दोन-तीन मिनिटे जरी बंद झाली तरी मेंदूचे कामकाज थांबून मृत्यू ओढवू शकतो. भारतात हृदयाच्या आजारांमध्ये झडपांच्या दोषाखालोखाल याच आजाराचा क्रम लागतो. सुधारलेल्या देशांत तर हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. आपल्या देशातील श्रीमंत समाजातही असेच चित्र दिसते. सर्वसाधारणपणे हा आजार चाळिशी - पन्नाशी- साठी या वयोगटांत जास्त प्रमाणात येतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण कमी आहे. स्थूलता, बैठे काम, अतिरक्तदाब, मधुमेह, तंबाखू व धूम्रपानाचे व्यसन असल्यास हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. कारणे हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला, की थोडया श्रमाने देखील हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. जेव्हा हृदयाला जास्त कामाची गरज लागते त्या वेळी (उदा. व्यायाम, थंडीचे वातावरण, भीती भावना अनावर होणे, इ.) ही कमतरता जाणवू लागते. प्रत्यक्ष हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधी बरेच दिवस रक्तवाहिन्यांमधील दोष सुरू झालेले असतात. हृदयाचा रक्त पुरवठा खंडित होण्यामागे कारणे असू शकतात. (अ) कॉरोनरी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यात चरबीचे थर जमून त्या आतून गंजतात व अरुंद होतात. रक्तामध्ये चरबीचे प्रमाण वाढणे आणि धूम्रपान ही यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. (ब) अति रक्तदाबामुळे हृदयावर जादा लोड/दबाव येतो त्यासाठी लागणारा हृदयाचा रक्तप्रवाह कमी पडतो. (क) कधीकधी भावनिक ताण (राग, भीती) अचानक येऊन कमकुवत हृदय बंद पडते. (सिनेमात असे प्रसंग नेहमी असतात.) (ड) शक्यतेपेक्षा अधिक श्रम व जोर लावणे, काम/व्यायाम करणे. विशेष करून थंडीच्या वातावरणात असे केल्यामुळे रक्तपुरवठयाची वाढीव मागणी पूर्ण करता न आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. (इ) रक्ताच्या बारीक गाठी हृदय-रक्तवाहिन्यात अडकून प्रवाह बंद पडणे. हृदयवेदना रक्तपुरवठा काही सेकंद कमी पडला आणि परत चालू झाला तर हृदयाच्या जागी नुसती वेदना जाणवते. ही वेदना अगदी खोल घुसणारी, प्रचंड दाब असल्यासारखी जाणवते. या वेदनेला आपण हृदयवेदना असे म्हणू या. ही अगदी तीव्र कळ असते. या'हृदयवेदनेची' विशिष्ट जागा, स्वरूप यांवरून ती ओळखता येते. या अवस्थेत रुग्णाला योग्य उपचार व विश्रांती मिळाल्यास पुढचे नुकसान थोडे तरी टळू शकते. रक्तपुरवठा कमी किंवा बंद अशा अवस्थेत जास्त वेळ गेला तर हृदयाच्या संबंधित स्नायूच्या पेशी मरतात. मग ही वेदना दोन तीन दिवस तशीच राहते. त्याचबरोबर दम लागणे, घाबरे होणे, छातीत धडधडणे, (किंवा नाडीचे ठोके कमी पडणे), खूप घाम, इत्यादी लक्षणे दिसतात. जर हृदयाच्या स्नायूंचा मोठा भाग निकामी झाला असेल तर हृदयक्रिया बंद पडून मृत्यूही येऊ शकतो. काही वेळा झोपेत किंवा विश्रांतीतही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रक्तपुरवठा बंद पडून मृत झालेल्या स्नायूंचे पाच-सहा आठवडयांत एका वेगळया प्रकारच्या चिवट पेशीमध्ये रुपांतर होते. तो भाग जोडपेशींनी भरून येतो. म्हणजे जखम भरून आल्यावर जो पांढरट सांधणारा भाग दिसतो तसा प्रकार होतो. ह्या भागाची स्नायूंप्रमाणे हालचाल होत नाही, पण हृदयात इतर उरलेल्या स्नायूभागांची वाढ होऊन काम चालू राहते. एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर तो परत येण्याची शक्यता असते. रोगनिदान पहिल्यांदा हृदयविकाराचा हा त्रास होतो तेव्हा ओळखण्यासाठी हृदयवेदनेची जागा व स्वरूप महत्त्वाचे असते. - ही कळ छातीच्या मध्यभागापासून निघून डाव्या हाताच्या छातीलगतच्या बाजूला येते. याच्याबरोबर दम लागणे,घाम, इत्यादी त्रास असतो. - कधी कधी छातीत नुसतीच जळजळ किंवा खूप दम लागणे, पाठीकडे खूप दुखणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. - काही जणांना काहीही लक्षण न जाणवताही हृदयविकाराचा झटका येतो (पण ते जाणवत नाही). निदान होण्यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी आवश्यक आहे. - हृदयाचा आलेख (इसीजी) यांच्या मदतीने निदान होते. इसीजी म्हणजे हृदयाच्या सततच्या सूक्ष्म विद्युतप्रवाहांचा आलेख असतो. या आलेखातील बदलांवरून इतरही काही निष्कर्ष काढता येतात (उदा. हृदयाचा आकार, निरनिराळया कप्प्यांचे परस्पर संबंध, इ.). - रक्ततपासणीमध्ये काही विशिष्ट द्रव्ये वाढलेली दिसतात. तपासण्याहृदयविकारामध्ये केल्या जाणा-या तपासण्या 1. ECG कार्डिओग्राम: ह्या तपासणीमध्ये रुग्णाच्या दोन हात (मनगटे), दोन पाय (घोटे) व छातीवर इलेक्ट्रोडस् जोडतात. हृदयाच्या क्रिया या हृदयात सौम्य स्वरुपात निर्माण होणा-या विद्युतप्रवाहाने चालतात. या क्रियेचा आलेख म्हणजेECG. हृदयविकाराचा झटका,हृदयाच्या तालबध्दतेत निर्माण झालेले दोष,हृदयाच्या कप्प्यांमध्ये निर्माण झालेले दोष, इ. माहिती या तपासणीत मिळते. 2. स्ट्रेस टेस्ट : यात रुग्णास इलेक्ट्रोडस् लावून एका फिरणा-या पट्टयावर चालवतात व एकीकडे त्याचा ECG घेत असतात. व्यायामामुळे हृदयावर कामाचा बोजा वाढल्यावर स्थिर अवस्थेत न सापडलेले दोष स्ट्रेस टेस्ट मध्ये सापडतात. 3. स्ट्रेस थॅलियम/परफ्यूजन टेस्ट : यात रेडिओऍक्टिव्ह पदार्थ इंजेक्शनद्वारे रक्तात देतात व हृदयामध्ये त्याचे चलनवलन बघतात. 4. ऍंजियोग्राफी : हृदयविकारामध्ये ही तपासणी करतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या सक्षमतेने काम करतात की नाही हे यात समजते. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे एक किंवा अधिक रक्तवाहिन्या तुंबल्या असतील तर त्यानुसार ऍंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीची जरुरी लागते. हृदयविकाराच्या झटक्यावरचा उपचार रुग्णालयात, तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करावा लागतो. रुग्णालयातही असे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही बरेच असते. प्रथमोपचार हृदयविकाराचा झटका येण्याआधी अनेक रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसून येतात. यामध्ये जरा चालल्यावर छातीत मध्यभागी दुखणे, छातीवर दाब आल्यासारखे, घुसमट झाल्यासारखे वाटणे, इ. अशा त्रासावर एक अत्यंत प्राथमिक उपयुक्त साधन म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या सैल व रुंद करून रक्तप्रवाह सुधारणारे एक औषध-नायट्रेटची गोळी. हृदयवेदना आल्याआल्या ही गोळी लगेच जिभेखाली धरावी. काही सेकंदात औषध विरघळून जिभेखालच्या केशवाहिन्यांत शिरून रक्तात पसरते. रक्तावाटे हृदयाच्या रक्तवाहिन्यांत औषध पोचून तिथला रक्तपुरवठा सुधारतो. याबरोबर वेदना कमी होते. यावरून वेदना हृदयविकाराची आहे हे निश्चित कळते. त्याबरोबरच पुढील नुकसान टळते व हृदयपेशी तग धरू शकतात. त्याचबरोबर वेदना सुरु झाल्यापासून रुग्णास झोपवून ठेवावे. कमीत कमी हालचाल करु द्यावी. पुढील सल्ल्यासाठी तज्ज्ञाकडे पाठवावे. हृदयविकाराची शक्यता क्वचित असली तरी ही अत्यंत स्वस्त असलेली गोळी नेहमी जवळ ठेवावी. यामुळे वेळप्रसंगी कोणालाही अत्यंत मोठी मदत होऊ शकेल. हृदयविकाराच्या रुग्णांनीही ही गोळी सदैव जवळ बाळगण्याची गरज आहे. या गोळीने रुग्णास जीवदान मिळू शकेल. या गोळीबरोबरच ऍस्पिरिनची एक गोळी चूर्ण करून पाण्यात मिसळून लगेच द्यावी. यामुळे रक्त जास्त प्रवाही होते व नुकसान टळते. यासाठी ऍस्पिरिनच्या लहान गोळया मिळतात. उपचार एकदा हृदयविकार झाला, की त्याचे परिणाम व पुढचे सर्व उपचार अत्यंत अवघड असतात. कधी रक्तवाहिन्या इतक्या निकामी होतात, की रक्तवाहिन्यांवर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून रक्ताला नवीन वाट करून देणे किंवा आतली चरबी खरवडून काढणे हेच उपाय उरतात. याशिवाय परत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सतत गोळया घेत राहावे लागते. प्रतिबंध हृदयविकाराचे प्रमाण श्रीमंत-प्रगत समाजात वाढत आहे. अतिरक्तदाब हे हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण आहे. दुसरे म्हणजे मांसाहारी जेवणाचा अतिरेक, चरबीयुक्त पदार्थ खात राहणे, वनस्पती तूप, इत्यादींमुळे रक्तातले चरबीचे प्रमाण वाढत जाते. हे चरबीचे थर रक्तवाहिन्यांत जमत जातात. हे या आजाराचे मुख्य कारण आहे. आहारावर नियंत्रण, शारीरिक कष्ट-व्यायाम आणि मानसिक आरोग्य या मार्गांनीच हृदयविकार टाळता येतील. योग्य आहार-विहार, तंबाखू, धुम्रपान टाळावे. उचित व्यायाम आणि मानसिक संतुलन याद्वारे हृदयविकार टाळता येतात. तसेच असलेला आजार हळूहळू बरा करता येतो. याबद्दल अगदी थोडक्यात पाहू या. आहार आहारात चरबी/तेल कमीतकमी वापरणे, कमी खाणे हे महत्त्वाचे. प्राणिज चरबी (मांसाहार, अंडे, इ.) वनस्पती तूप, बरीच तेले ही हृदयास हानीकारक असतात. त्यांचा वापर मर्यादित करावा किंवा टाळावाच. सोबत चांगली, मध्यम, वाईट तेलांचा एक तक्ता दिला आहे. मांसाहार टाळावा हे चांगले. श्रमाच्या व कष्टाच्या मानाने खाणे योग्य असावे. सर्व जादा अन्न शरीरात चरबीच्या रुपात साठते. भाज्या, फळे यांत चोथा जास्त, ऊर्जा कमी असते. असा आहार जास्त चांगला ठरतो. व्यायाम व्यायामाची मूलतत्त्वे वेगळया प्रकरणात दिली आहेत. इथे एवढे सांगणे पुरेल की निदान रोज किमान अर्धा तास चालणे हे अशा रुग्णांना आरोग्यासाठी आवश्यक आहे. मानसिक आरोग्य आत्यंतिक राग, द्वेष, कुढणे, इ. भावना हृदयाला हानिकारक आहे. निरनिराळया मार्गांनी त्यावर मात करा. योग-आसनांचा आणि श्वसन, प्राणायाम, योगनिद्रा, इत्यादी उपायांचा फार चांगला उपयोग होतो. हृदयविकार होऊ नये म्हणून सर्वोत्तम तेलांचे मिश्रण किंवा प्रमाण असे : गोडेतेल/सूर्यफुल/करडई/शिरस हे पाच भाग आणि मोहरी किंवा सोयाबीन तेल यांचा एक भाग. ही तेले मिसळण्याची गरज नाही; आलटून पालटून वापरू शकतो. उदा. न्याहरीच्या वेळी मोहरी/करडई/ शिरस किंवा सोया; तर दुपारच्या व रात्रीच्या स्वयंपाकात गोडेतेल/सुर्यफुल/करडई, इत्यादी. ऍंजिओप्लास्टी हृदयाच्या रक्तवाहिन्यांची कॅथेटर (नळीतून) दुरुस्ती करण्याचे तंत्र विकसित झाल्यापासून या रुग्णांना मोठे वरदान मिळाले आहे. ही संपूर्ण शस्त्रक्रिया क्ष-किरण यंत्रावर सतत पाहिली जाते. या शस्त्रक्रियेसाठी मांडीच्या किंवा दंडाच्या शुध्द रक्तवाहिनीतून नळी घातली जाते. या नळीतून आणखी एक वायर/तार घातली जाते. नळीतून मधून मधून क्ष-किरण चित्रात दिसेल असा द्रवपदार्थ सोडला जातो. अडथळयांची जागा यामुळे स्पष्ट कळून येते. हा अडथळा काढण्याजोगा असेल तर तारेने खरडून साफ केला जातो. यानंतर त्या ठिकाणी स्टेंट म्हणजे धातूची स्प्रिंग ठेऊन रक्तवाहिनी खेळती ठेवली जाते. या स्प्रिंगमध्ये औषधयुक्त प्रकार उपलब्ध आहे. या औषधाने तिथे रक्ताची गाठ होणे टळते. ही शस्त्रक्रिया केल्यावर 2/3 दिवस रुग्णालयात राहावे लागते व रक्त पातळ ठेवण्याचे औषध घेत राहावे लागते. आजाराचे स्वरुप मर्यादित असेल तर ही ऍंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया चालते. हृदयाच्या तीनही रक्तवाहिन्या जागोजागी खराब झाल्या असतील तर या उपचारांचा उपयोग नसतो. (अशावेळी बायपास शस्त्रक्रिया करावी लागते.) या उपचारांचा एकूण खर्च स्टेंट धरून 60-70 हजारापर्यंत येतो. केवळ ऍंजिओग्राफी (म्हणजे अडथळा निदान) केल्यास आठ ते दहा हजार खर्च येतो. ऍंजिओग्राफीत अडथळा दिसून आल्यास त्याच वेळी दुरुस्तीची ही शस्त्रक्रिया पार पाडता येते. यामुळे त्रास, खर्च व वेळ वाचतो. मात्र यात काही प्रमाणात धोकाही असतो. बायपास शस्त्रक्रिया हृदयाची एखादी रक्तवाहिनी अनेक ठिकाणी खराब झाली असेल, किंवा तीनही रक्तवाहिन्या खराब झाल्या असतील तर बायपास शस्त्रक्रिया करावी लागते. गर्दीच्या कोंदट रस्त्याला जसा बायपास (वळणरस्ता) काढला तसा हा बायपास असतो. यात मूळ रक्तवाहिनीला शरीरातली पायाची नीला किंवा छातीतली एक 'जादा' रक्तवाहिनीचा तुकडा जोडला जातो. यानंतर रक्तप्रवाह या जोडवाहिनीतून जातो. या शस्त्रक्रियेसाठी कृत्रिम हृदयपंपाची मदत लागू शकते. शस्त्रक्रिया करण्यासाठी छातीच्या मधोमध छेद घेऊन हृदयापर्यंत जावे लागते. या शस्त्रक्रियेचे तंत्र आता चांगले विकसित झाले असून अनेक शहरांमध्ये सुसज्ज रुग्णालये सेवा देत आहेत. याचा खर्च अंदाजे दीड लाखाच्या आसपास जातो. यासाठी 10-12 बाटल्या रक्ताची गरज लागते. या शस्त्रक्रियेने रुग्णाचे आयुष्यमान वाढते आणि कार्यक्षमता टिकून राहते. मात्र ही रोगप्रक्रिया चालूच असल्याने जोडवाहिन्याही कालांतराने खराब होतात. अनेक रुग्णांना काही वर्षांनी दुसरी बायपास शस्त्रक्रिया लागू शकते. नवा लेख 7-12-2010 हृदयविकार आपण प्रत्येकाने हृदयविकाराच्या झटक्याबद्दल ऐकलेले असते. हृदयविकाराचे प्रमाण वाढतच आहे, आता तरुण वयातही हा आजार होऊ लागला आहे. हृदयविकाराचा झटका अचानक येतो. काही जण सुरुवातीसच दगावतात. आणि काही तर झोपेतच जातात. काही जणांना हॉस्पिटलमध्ये मृत्यू येऊ शकतो तर काही लोक जगतात पण बरेच खर्चिक उपाय करावे लागतात. खरं म्हणजे हृदयविकार टाळता येतो. झटका यायच्या आधी हृदयविकार ओळखतापण येतो. म्हणूनच ही माहिती लक्षात ठेवा आणि इतरांना सांगा. हृदयविकाराची कारणे हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होणे, अतिरक्तदाब ही हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य कारणे आहेत. कधीकधी हृदयाच्या रक्तवाहिन्यात गुठळ्या अडकून झटका येतो. •रक्तवाहिन्या चरबीच्या थरांनी खराब होतात. पाण्याचे नळ जसे गंजतात तसेच हे असते. यामुळे हृदयाला स्वत:लाच रक्तप्रवाह कमी पडतो. विश्रांतीत एकवेळ हे चालू शकते. पण अतिश्रम, अतिथंडी किंवा मानसिक ताणतणावात रक्तप्रवाहाची मागणी वाढते. अशा वेळी पुरवठा कमी पडून झटका येतो. •रक्तप्रवाह कमी पडल्याने हृदयाचा संबंधित स्नायूभाग मरतो. मरणारा स्नायूभाग जास्त असेल तर हृदय बंद पडते, अन्यथा चालू राहते. हृदयाला मुख्य तीन रक्तवाहिन्या असतात. यातील कोठली रक्तवाहिनी आणि किती अडलेली आहे यावर बरेच अवलंबून असते. •रक्तवाहिन्यांचा आजार आणि अतिरक्तदाब हे कायमचे आजार असतात.अतिखाणे, तेलतूप जास्त खाणे, मधुमेह, बैठे जीवन, धूम्रपान, ताणतणावाचे जीवन, लठ्ठपणा आणि काही प्रमाणात आनुवंशिकता ही त्याची कारणे आहेत.पूर्वी हा आजार चाळीशीत सुरू व्हायचा. तो आता विशी-तिशीतच सुरू होतो. लक्षणे •काही जणांना हृदयविकाराच्या झटक्याची वेदना जाणवते तर काही जणांना काहीच जाणवत नाही. कार्डिओग्राम काढताना काही जणांना जुना हार्ट ऍटॅक आलेला दिसून येतो. याउलट काही जण झोपेतच हृदयविकाराने मृत्यू पावतात.पहिल्या झटक्यातच काहीजण दगावू शकतात. •हृदयविकाराची वेदना छाती, खांदा, बेंबीच्या वरच्या भागात, पाठीत किंवा वर जबड्यापर्यंत कोठेही जाणवते. •रुग्णाला दम लागतो, घाम आणि धडधड जाणवते. नाडी वेगाने चालते किंवा कधीकधी संथ चालते. •रक्तदाब कमी झाल्याने कधीकधी घेरी येऊन माणूस पडतो. प्राथमिक उपचार आणि पाठवणी •रुग्णाला आडवे पडून राहायला सांगा, दोन्ही पायांखाली आधार देऊन पाय उंचवा. यामुळे रक्तप्रवाह हृदय व मेंदूकडे जास्त वळतो. •रुग्णाला शांत राहायला आणि संथ श्वसन करायला सांगा. •कपभर पाण्यात ऍस्पिरीनची गोळी विरघळून प्यायला द्या. •नायट्रोग्लिसरीनची गोळी जिभेखाली धरायला द्या. •प्राणवायूचे सिलींडर असेल तर मास्क लावून द्या. •नाडी आणि शुद्ध तपासा. नाडी लागत नसेल तर कृत्रिम हृदयक्रिया-श्वसन द्यावे लागेल. यासाठी कोणी मदतीला असल्यास बोलवा. •रुग्णवाहिकेतून रुग्णालयात न्या. काही शहरात हृदयविकारासाठी खास कार्डिऍक ऍम्ब्युलन्स असते. •संबंधित वैद्यकीय तज्ज्ञाला फोन करून कल्पना द्या. रुग्णाचे नाव पत्ता माहीत नसल्यास शोधा आणि नातेवाइक, मित्रांना कळवा. •वैद्यकीय विम्याबद्दलपण चौकशी करून घ्या. रुग्णालयातले तातडीक निदान •कार्डिओग्राममुळे अडलेली रक्तवाहिनी आणि बाधित स्नायूभागाचा अंदाज येतो. •रक्तातील काही एन्झाईम –म्हणजे किण्वे--यांची पातळी वाढलेली असते. •कॉरोनरी सिटीस्कॅन असेल तर अडलेली रक्तवाहीनी स्पष्ट समजू शकते. •एको कार्डिओग्रामने हृदयाच्या कप्प्यातील रक्तप्रवाह समजतो. तातडीक उपचार •उपचारांसाठी वय, रक्तप्रवाह किती अडला आहे, मधुमेह इ. घटकांचा विचार करावा लागतो. •रक्तवाहिनीतील गुठळी विरघळण्यासाठी औषध लागत असल्यास 2तासांत ते द्यावे लागते. हे औषध खर्चिक पण उपयुक्त आहे. •तातडीक एन्जिओग्राफीचा खर्च सुमारे 10 हजार पर्यंत येतो. •काही रुग्णांना एन्जिओप्लास्टीची गरज भासते. एन्जिओप्लास्टीचा खर्च स्टेंटवर अवलंबून असतो. •काही रुग्णांमध्ये बायपास शस्त्रक्रिया लागते. यात अडलेल्या रक्तवाहिनीला पर्यायी मार्ग म्हणून शरीरातील रक्तवाहिनीचा तुकडा लावला जातो. ही शस्त्रक्रिया अर्थातच खर्चिक आहे. शस्त्रक्रिया तातडीक की पूर्वनियोजित आहे यावर याचे कमीजास्त यश अवलंबून असते. प्रतिबंध •मधुमेह आणि अतिरक्तदाब या आजारांना दूर ठेवा. शरीरभार आणि कंबर-नितंब गुणोत्तर संतुलित राखा. •जीवनशैली निरोगी ठेवण्यासाठी आहार, ताणतणाव, शारीरिक श्रम, झोप हे महत्त्वाचे घटक आहेत. धूम्रपान अतिशय घातक आहे. •फळे, भाजीपाला, लिंबू, लसूण, हळद आणि योग्य तेलांचा वापर करा. •आठवड्यातून निदान चार दिवस दमसांस म्हणजे ऐरोबिक प्रकारचे व्यायाम करा. •योगासनेही चांगली असली तरी दमसास व्यायामांना पर्याय नाही. लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine) संदर्भ : आरोग्याविद्या

कीटकभक्षक वनस्पती ( Insectivorous plants)

वनस्पती स्वत:चे अन्न हरितद्रव्याच्या (क्लोरोफिल) साहाय्याने तयार करतात; परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि हे अन्न त्यांना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. अशी कीटकभक्षक वनस्पतींच्या सु. ६२५ जाती असून, त्यांपैकी ३०-३५ जातींच्या वनस्पती भारतात सापडतात. महाराष्ट्रात फक्त ५-६ जातींच्या वनस्पती आढळतात. या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती’ असेही म्हणतात. या वनस्पती जमिनीवर, पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळणार्‍या असतात; परंतु बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत आढळतात. अशा ठिकाणी थोडाच नायट्रोजन असतो. या वनस्पतींची वाढ विशिष्ट प्रकारे होते. (उदा., पानांचे सापळ्यात रूपांतर झालेले असते). यामुळे त्या वनस्पती कीटकांना मधुर रस वा भडक रंग यांद्वारे आकर्षून घेऊन पकडणे, मारणे आणि शेवटी त्यांचे पचन करणे अशा क्रिया करू शकतात. यातील पचनाची क्रिया ही प्राण्यांतील पचनक्रियेसारखी असते. पाचक रसाप्रमाणे त्यात प्रोटिएज आणि किटिनेज ही विकरे असतात. त्यांच्यामुळे कीटकाचे अपघटन होऊन त्यापासून अखेरीस नायट्रोजनाचे प्रमाण जास्त असलेली संयुगे किंवा क्षार बनतात. ती वनस्पतींकडून शोषली जातात. अशा तर्‍हेने वनस्पतीला प्राणिज प्रथिने मिळतात. ज्या वनस्पतीत असे पाचक रस स्रवत नाहीत, त्यांच्यात पकडलेले कीटक सहजीवी जीवाणूंच्या क्रियेने कुजतात व नंतर ते शोषले जातात. कठीण भाग टाकून दिले जातात किंवा कलशासारख्या सापळ्यात त्यांची रास साचते. नायट्रोजन विपुल असणार्‍या मृदेत वाढलेल्या वनस्पतींना मात्र कीटक पकडण्याची गरज पडत नाही. ड्रॉसेसा (सूर्यकण) महाराष्ट्रात सापडणार्‍या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रॉसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या दोन जाती उपलब्ध आहेत : ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बर्मानाय. तिसरी जात ड्रॉसेरा पेल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते. ड्रॉसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर इ. भागांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पहावयास मिळते. ड्रॉसेरा बर्मानाय ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते. या वनस्पतींच्या पानाच्या चमच्यासारख्या पात्यावर लाल व जाड टोकाचे केस असतात. या केसांवर चिकट द्रवाचे आवरण असते व केसाच्या टोकावर चिकट द्रवाचे बिंदू असतात. हे बिंदू उन्हात दवबिंदूप्रमाणे चकाकतात. म्हणून याला इंग्रजीत ‘सन ड्यू’ हे नाव पडले आहे. एखादा कीटक या वनस्पतीच्या पानावर बसला की, केस आतल्या बाजूस वळतात आणि कीटक पकडला जातो. वनस्पतीच्या ग्रंथीतील स्रावामुळे कीटकाचे अन्नद्रव्यात रूपांतर होऊन त्याचे वनस्पतींच्या पेशींकडून शोषण होते. दुसर्‍या सर्वत्र आढळणार्‍या कीटकभक्षक वनस्पतीचे नाव युट्रिक्युलॅरिया व्हलगॅरिस आहे. या वनस्पती पावसाळ्यात झाडाच्या बुंध्यावर, भिंतीवर तसेत पाणथळ भागात वाढतात. त्यांच्या छोट्याशा पानांवर सापळे तयार होतात. सापळ्याच्या टोकास झडप असते. तोंडावर असलेल्या केसांमुळे झडपेची उघडण्याची किंवा बंद होण्याची क्रिया होत असते. उघड्या दारातून कीटक आत आला की, झडप बंद होते आणि कीटक पकडला जातो. या कीटकांचे नंतर पचन होऊन आवश्यक पदार्थ ग्रंथींकडून वनस्पतीसाठी शोषले जातात. युट्रिक्युलॅरियाच्या सापळ्यामध्ये डासांच्या अळ्याही सापडतात. नेपेंथिस (कलशपर्णी) नेपेंथिस (कलशपर्णी) ही एक वनस्पतीची प्रजाती कीटकभक्षी आहे. तिच्या १२० जातींपैकी बहुतेक आग्नेय आशियातील बोर्निओ, सुमात्रा, फिलिपीन्स इ. प्रदेशांत आढळतात. तिची एक जात खासिअस ही ईशान्य भारतातील आसामच्या डोंगराळ प्रदेशातील जंगलात सापडते. ही वनस्पती लहान झुडूप किंवा वेलीच्या स्वरूपात असून तिच्या पानांचे रूपांतर घटासारख्या कलशात झालेले असते. छोट्याशा पानांचे पाते गोलाकार असून त्याच्या कडांवर दाते असतात. कीटकांच्या स्पर्शाने दाते मिटतात आणि कीटक पकडले जातात. पाचक रसाने या कीटकांचे पचन होते. डायोनिया मसायपुला (व्हीनस फ्लाय ट्रॅप) ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅरोलायना राज्याच्या काही भागांत सापडते. हिच्या पानाचे पाते टोकांस जाड मध्यशिरेने दोन भागांत दुभंगलेले असते. पानाच्या बाहेरच्या कडांस लांब दाते असतात. पानावर कीटक आला की, पात्याचे भाग शिंपल्याप्रमाणे मिटतात. कीटक पकडला गेला की, ग्रंथीमधून पाचक स्राव सुरू होतो. त्यामुळे कीटकाचे पचन होऊन उपयुक्त भाग पानांकडून वनस्पतीच्या वाढीसाठी शोषला जातो. कीटकांचे पचन झाल्यावर सापळा परत उघडतो; असे दोन-तीन वेळा झाल्यावर तो काळा पडून सुकून जातो. याशिवाय ड्रॉसोफायलम, बिब्लिस, सेफॅलोटस, पिंग्विक्युला, बायोव्ह्युलॅरिया, सारासेनिया, डार्लिंग्टोनिया, हेलिअँफोरा, पॉलिपोंफोलिक्स, जेनेलिसिया इ. प्रजातींतील कीटकभक्षक वनस्पती जगाच्या निरनिराळ्या भागांत आढळून येतात. या वनस्पती विशिष्ट अवयवांच्या मदतीने कीटकांना पकडून त्यांचे भक्षण करतात. काही कवकेही प्राणिभक्षक असतात. माती किंवा कुजट भागांत या कवकांचे प्रकार वाढतात. त्यांतील काही कवके आपल्या सूक्ष्म धाग्यांच्या विशिष्ट वाढीने किंवा ग्रंथीतील चिकट स्रावाने भक्ष्य (कीटक वा अन्य छोटे प्राणी) पकडतात. भक्ष्य मेल्यावर त्याच्यापासून मिळणार्‍या अन्नद्रव्याचे शोषण होते www.vishwakosh.org.इन यांच्या सौजन्याने ...

कावीळ ( Jaundice )

रक्तातील पित्तारुण (बिलिरूबीन) या पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा, डोळ्यांच्या बुबुळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो; या स्थितीला कावीळ म्हणतात. रक्तातील तांबड्या (लोहित) पेशींचे आयुष्य ( सु. १२० दिवस) संपल्यानंतर त्यांचा नाश होतो. या पेशींचे विघटन होते. तांबड्या पेशीतील हिमोग्लोबीनच्या विघटनापासून पित्तारुणाची निर्मिती होत असते. रक्तद्रव्यातील पित्तारुण रक्तापासून वेगळे करणे आणि पित्तात विसर्जित करणे ही कामे यकृताद्वारे होतात. यकृतापासून पित्तारुणाचे उत्सर्जन होऊन ते पित्तनलिकेतून पित्ताचा घटक म्हणून आतड्यात पोहोचते. आतड्यातील जीवाणूंद्वारे पित्तारुणावर प्रक्रिया होऊन त्यांपैकी काही पित्तारुण शरीराबाहेर विष्ठेतून टाकले जाते. काही पित्तारुण आतड्यात शोषले जाऊन ते रक्ताद्वारे मूत्रपिंडाकडे जाते आणि मूत्रातून मूत्रपित्तारुणाच्या (युरोबिलिनच्या) स्वरूपात शरीराबाहेर टाकले जाते. कावीळ अनेक कारणांनी होऊ शकते सामान्य निरोगी व्यक्तीच्या रक्तद्रव्यातील पित्तारुणाचे प्रमाण दर शेकडा ०-५ मिग्रॅ. असते. हे प्रमाण शेकडा १.५ मिग्रॅ. पेक्षा अधिक वाढल्यास पिवळेपणा दिसू लागतो. काविळीचे मुख्य प्रकार तांबड्या पेशीची विघटनात्मक कावीळ : तांबड्या पेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश झाल्यास रक्तातील पित्तारुणाचे प्रमाण वाढते. पांडुरोगाच्या काही प्रकारांत वा रक्तात संसर्ग झाल्यास वा रक्ताधान करतेवेळी रक्तगट न जुळल्यासही अशा स्वरूपाची कावीळ होते. यकृतजन्य कावीळ : यकृताला हानी पोहोचल्यास यकृतजन्य कावीळ होते. विशेषतः हिपॅटायटीस रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यास, विषारी पदार्थ शरीरात गेल्यास वा यकृत सूत्रण रोगामुळे यकृताद्वारे पुरेसे पित्त स्रवले जात नसल्यास पित्तारुण साचून राहिल्याने यकृतजन्य कावीळ होते. अवरोधी कावीळ : काही कारणांनी पित्ताचे खडे झाल्यास पित्तनलिकेचा मार्ग बंद होतो. आणि या प्रकारची कावीळ होते. काविळीमध्ये त्वचेचा रंग पिवळट दिसणे, अन्नाचा तिटकारा व क्वचित उलट्या होणे ही सर्वसाधारण लक्षणे आढळतात. संसर्गजन्य काविळीत सुरुवातीस ज्वर व मूत्र गडद पिवळे किंवा लाल होणे ही लक्षणे असतात. अवरोधी काविळीत मलाचा रंग मातीसारखा असणे व त्वचेस खाज सुटणे ही लक्षणे आढळतात. नुकत्याच जन्मलेल्या काही अर्भकांमध्ये सौम्य प्रकारची कावीळ आढळते. कारण अशा अर्भकांच्यात पित्तारुण बाहेर टाकण्याची क्रिया विलंबाने सुरू होते. अशी कावीळ एका आठवड्यात नाहीशी होते. अकाली जन्मलेल्या बालकांमध्ये या प्रकारच्या काविळीचे प्रमाण जास्त असते. काही नवजात अर्भकांच्यात एरिथ्रोब्लास्टोसीस फिटॅलीस हा काविळीचा एक गंभीर प्रकारही आढळतो. मातेचे रक्त व अर्भकाचे रक्त यांतील र्‍हीसस (Rh) घटक निरनिराळे असल्यास अर्भकाच्या रक्तात तांबड्या पेशी तयार करणार्‍या पेशींची बेसुमार वाढ होते. या रोगात प्रमाणापेक्षा जास्त होणार्‍या पित्तारुणाचे उत्सर्जन करण्यास अर्भकाचे यकृत असमर्थ असते. जन्मल्यानंतर चोवीस तासांच्या आत उद्भवणारी कावीळ हे या रोगाचे लक्षण समजून वैद्यकीय सल्ला ताबडतोब घेणे आवश्यक असते. पौगंडावस्थेत आणि तरुणांमध्ये यकृतावर विषाणुदाह झाल्यामुळे कावीळ होते. मध्यमवयीन प्रौढांमध्ये पित्ताच्या खड्यांमुळे होणारी अवरोधी कावीळ आढळते. वृद्धपणी होणारी काविळीची लक्षणे यकृताचा वा पित्तनलिकेचा कर्करोग दर्शवितात. तसेच मद्यपान करणार्‍या व्यक्तींमध्ये होणारी कावीळ यकृतात बिघाड झाल्याचे दर्शविते. काविळीवर इलाज करण्यासाठी तिच्या मूळाशी असलेले रोग शोधून काढतात. रुग्णाने संपूर्ण विश्रांती घेणे, तिखट व तेलकट आहार टाळणे आणि भरपूर फळे खाणे ही पथ्ये पाळावी लागतात. प्रतिजैविके आणि अ,ब,क तसेच के जीवनसत्त्वे इ. औषधांचा उपयोग केला जातो. www.vishwakosh.org.in यांच्या सौजन्याने...

माझ्याबद्दल