मंगळवार, २ मार्च, २०२१

मार्केटींग - अतुल राजोळी

 

मार्केटींग - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आजकाल मार्केटींगचा जमाना आहे. जो दिखता है, वह बिकता है! जो व्यवसाय आपल्या प्रोडक्टचे जबरदस्त मार्केटींग सातत्याने करत असतो, तो व्यवसाय बाजारपेठेत राज्य करतो. आपण पेप्सी किंवा कोकाकोला नाही जरी प्यायलो तर काही मरणार नाही आहोत तरीही या शितपेयांच्या कंपन्या आज अब्जावधी रुपयांमध्ये उलाढाल करत आहेत. का? कारण आक्रमक व सातत्याने केलेलं मार्केटींग! जगात कोणताही व्यवसाय यशस्वी तेव्हा बनतो जेव्हा त्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक असतात. मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळवण्यासाठी कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक असते परिणामकारक मार्केटींग कृतीयोजना. आपलं प्रोडक्ट कितीही उत्कृष्ट दर्जाचं जरी असलं तरी जोपर्यंत आपल्या ग्राहक वर्गाला त्याबद्दल सातत्याने व परिणामकारक पध्दतीने आपण सांगत नाही तो पर्यंत त्याना कसं कळणार? आणि ग्राहक प्रोडक्ट विकत घेण्यासाठी पुढे तरी कसा सरसावेल?

मित्रांनो, बर्‍याच लघुउद्योजकांशी माझा संपर्क येतो. बहुतांश पहिल्या पिढीच्या उद्योजकांच्या अनुभवादरम्यान मार्केटींगशी कधीच संबंध आलेला नसतो. त्यांना त्यांच्या व्यवसायातील तांत्रिक काम, प्रोडक्ट व सर्विस यांच्याबद्दल सखोल ज्ञान व अनुभव असतो. त्याच्याच जोरावर ते व्यवसायात येतात. व्यवसाय सुरु केल्यानंतर मात्र त्यांना कळून चुकतं की व्यवसाय यशस्वी करण्यासाठी फक्त प्रोडक्ट व सर्विस उत्कृष्ट असणे पुरेसे नाही! बरेच मराठी लघुउद्योजक व्यवसायातील इतर विभागांबाबत, विशेषतः सेल्स आणि मार्केटींगबाबत गोंधळलेले किंवा उदासिन आढळतात. जर आपण उद्योजक आहात आणि आपल्याला आपला उद्योग वाढवायचा असेल. तर आपल्याला 'सेल्स आणि मार्केटींग' वर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे.
सेलिंग आणि मार्केटींग मध्ये फरक काय?
सेलिंग म्हणजे ग्राहकाकडून अमुकएक रक्कम घेऊन, त्या मोबदल्यात आपले प्रोडक्ट अथवा सर्विस देणे.
मार्केटींग म्हणजे मार्केटचा अभ्यास करुन, आपल्या प्रोडक्ट व सर्विसचा प्रचार करणे व ते ग्राहकापर्यंत पोहोचवणे.
(सेलिंग हा विषय आपण पुढील लेखात पाहू)

या लेखामध्ये आपण मार्केटींग प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल जाणुन घेऊया.
मित्रांनो मला नेहमी प्रश्न पडायचा की मराठी लघुउदद्योजक मार्केटींगमध्ये कमी का पडतो. माझ्या अनुभवातून मला असे लक्षात आले की, बर्‍याच लघुउद्योजकांना सेल्स आणि मार्केटींग बद्दल ज्ञान व कौशल्य नसते. त्यांना जाहीरातीसाठी अवास्तव खर्च होइल असं वाटत असते.  बर्‍याच लघुउद्योजकांना सेलिंग हा विषय मूळात आवडतच नाही. त्यांच्याकडे मार्केटींगसाठी सातत्यपुर्ण यंत्रणा नसते. मनुष्यबळाची कमतरता भासते. बर्‍याच लघुउद्योजकांना अपयशाची भिती वाटत असते.

मित्रांनो, रिसर्च दरम्यान असं आढळून आलं आहे की सर्व सामान्य माणूस दर दिवशी ४,००० पेक्षा जास्त मार्केटींग संदेश पाहतो, वाचतो, ऐकतो किंवा अनुभवतो! या सर्व संभाषणामध्ये आपल्या व्यवसायाबद्दलचा संदेश पुढे आहे? आपल्या व्यवसायाबद्दल एकदाच माहिती मिळाल्यानंतर आपले भावी ग्राहक आपल्या प्रोडक्टबद्दल माहिती लक्षात कसे ठेवतील? आपल्या संभाव्य ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट किंवा सर्विसबद्दल माहिती देणे व आपण त्यांच्या आठवणीत रहाणे, हे कोणत्याही लघुउद्योजकासाठी एक आव्हान असते.
मार्केटींग हा विषय प्रचंड मोठा आहे. मार्केटींग विषयाअंतर्गत बरेच वेगवेगळे विषय येतात. मार्केटींग विषय शिकवण्यासाठी दोन वर्षांचा एम.बी.ए. अभ्यासक्रम आहे. मी या लेखाद्वारे आपल्याला मार्केटींग प्रक्रीयेतील ७ महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल थोडक्यात सांगणार आहे. माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळांमध्ये हा विषय मी सखोलपणे शिकवतो.

मार्केटींग प्रक्रीयेतील ७ टप्पे :
१) माहिती: मार्केटींग प्रक्रीयेचा हा प्राथमिक टप्पा असतो ज्याव्दारे ग्राहकापर्यंत व्यवसायातील उत्पादन व सेवेबद्दल माहिती पोहोचते. नवीन व्यवसायाला आपल्या सुरुवातीच्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती पोहोचवणे गरजेचे असते. आपल्या ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी विशेष कृती योजना तयार करणे आवश्यक असते.
२) आवड: आपल्या संभाव्य ग्राहकाला आपल्या व्यवसायाबद्दल, प्रोडक्ट किंवा सर्विसबद्दल फक्त माहिती असणे पुरेसे नाही. त्याच्या मनात आपल्या प्रोडक्ट व सर्विसबद्दल उत्सुकता व आवड निर्माण होणे गरजेचे असते. मार्केटींग प्रक्रीये दरम्यान या टप्प्यामध्ये त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
३) विश्वास: संभाव्य ग्राहकाच्या मनात आपल्या प्रोडक्ट व सर्विसबद्दल उच्च विश्वसनियता निर्माण होणे गरजेचे आहे व त्याच प्रमाणे त्याला खात्री असली पाहिजे की त्याची गरज पुर्ण होऊ शकते. आपल्या व्यवसायाची, प्रोडक्ट व सर्विसची विश्वसनिय प्रतिमा निर्माण करण्याबाबत या टप्प्या दरम्यान आयाखडा आखला गेला पाहिजे.
४) चाचणी: ग्राहकाला सर्व प्रथम आपल्या प्रोडक्टला आजमवायचे असते, त्यामुळे असा काहीतरी मार्ग तयार करणे गरजेचे असते. ज्याव्दारे ग्राहकाला आपल्या प्रोडक्ट व सर्विसचा अनुभव घेता येईल व जास्त पैसा खर्च करावा लागणार नाही.
५) खरेदी: बर्‍याच वेळा वरील चार टप्प्यांवर काम झालेलं असतं. तरी सुध्दा ग्राहक प्रोडक्ट विकत घेत नाही. कारण संपुर्ण खरेदीची प्रक्रीया ग्राहकाच्या दॄष्टीकोनातून सोयिस्करपणे व ग्राहकाच्या अपेक्षेप्रमाणे होणं गरजेचं आहे.
६) पुनरावृत्ती: ग्राहकाला आपल्या प्रोडक्ट व सेवेद्वारे अपेक्षेपेक्षा जास्त मुल्य योगदान होणं गरजेचं आहे. व्यवसायाचा समाधानी ग्राहक आपल्याकडून पुन्हा प्रोडक्ट विकत घेण्यासाठी उत्सुक असतो.
७) शिफारस: आपल्या व्यवसायाचा समाधानी ग्राहक जो नेहमी आपले उत्पादन व सेवा विकत घेतो तो आपल्या प्रोडक्ट व सर्विसचा प्रचारक बनतो.

मित्रांनो, माझ्या अनुभवानुसार मी ठामपणे सांगू शकतो की ज्या व्यवसायाला आपला मार्केटींग आराखडा तयार करायचा आहे, त्या व्यवसायाला वरील सात पैकी काही विशिष्ट टप्प्यांवरच लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असते. सध्या ज्या टप्प्यांवर व्यवसाय कळत-नकळत कमी पडत आहे त्याला अनुसरुन प्लान तयार करणे महत्त्वाचे आहे. परिणामकारक मार्केटींग आराखडा तोच असतो जो व्यवसायाच्या गरजेला लक्षात घेऊन बनवला गेला असतो. सातत्याने आणि महत्त्वाच्या मार्केटिंग टप्प्याला अनुसरुन केलेले मार्केटिंग व्यवसाला सतत ग्राहक उपलब्ध करुन देते.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्क: 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

Thanks : Mr. , Sir  

बिझनेस नेटवर्कींग - अतुल राजोळी...

बिझनेस नेटवर्कींग - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! कोणताही यशस्वी उद्योग, यशस्वी असल्यामागचे प्रमुख कारण असते, त्या उद्योगाचा मोठा ग्राहक वर्ग. यशस्वी उद्योजकाला ग्राहकांची कमतरता कधीच भासत नाही. आपल्या व्यवसायाचे जेवढे जास्त ग्राहक, तेवढा व्यवसाय यशस्वी! परंतु प्रश्न असा पडतो की 'यशस्वी व्यवसायिकाकडे भरपुर प्रमाणात ग्राहक येतात कुठून?' हा प्रश्न आपण कोणत्याही यशस्वी लघुउद्योजकाला जर विचारला, तर आपल्याला पुढील उत्तरेचं मिळतील, 'शिफारशीव्दारे', 'नेटवर्कींग', 'मार्केटींग संपर्क', 'फॉलो-अप' किंवा 'वर्ड ऑफ माऊथ' कोणत्याही व्यवसायाला प्राप्त होणारे २०% ग्राहक हे वरील माध्यमांव्दारेच प्राप्त होतात. कारण लोकं अशाच लोकांशी व्यवहार करतात ज्यांना ते ओळखतात, पसंत करतात आणि विश्वास ठेवतात. जर भरपुर माणसे आपल्याला ओळखत असतील, पसंत करत असतील आणि आपल्यावर विश्वास ठेऊ शकत असतील तर नक्कीच आपण बरेच ग्राहक आपल्याकडे आकर्षित करु शकतो. परंतु आपल्याबद्दल ओळख, आवड किंवा विश्वास नसेल तर ग्राहक मिळणे अशक्य!
आपल्या बद्दल व आपल्या व्यवसायाबद्दल ओळख, आवड व विश्वास निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वकपणे कृती करत नाहीत. लघुउद्योजकांना ते ग्राहक प्राप्त होतात ते कळत नकळत त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींव्दारेच परंतु, माझ्यामते आजच्या या बदलत्या युगात लघुउद्योजकांनी आपली ओळख वाढवण्यासाठी जाणिवपूर्वकपणे कृती केली पाहीजे. जास्तीत जास्त लोकांबरोबर ओळख करुन चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित केले पाहीजेत व आपली विश्वसनियता निर्माण केली पाहीजे. त्यासाठी लघुउद्योजकांनी 'बिझनेस नेटवर्कींग' केले पाहीजे.
'बिझनेस नेटवर्कींग' म्हणजे काय' ?
इतर उद्योजकांबरोबर, संभाव्य ग्राहक किंवा पुरवठादारांबरोबर जाणिवपूर्वकपणे उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित करणे व सतत संपर्कात राहून, एकमेकांना सहाय्य करण्याची प्रक्रीया म्हणजेच 'बिझनेस नेटवर्कींग' होय. 
आजकाल नेटवर्कींग मिटिंगचा सुळसुळाट झाला आहे. बर्‍याच लोकांना असं वाटतं की नेटवर्कींग म्हणजे फक्त जास्तीत-जास्त लोकांना भेटुन आपले बिझनेस कार्ड देणे. परंतु 'बिझनेस नेटवर्कींग' चा खरा अर्थ म्हणजे, आपला जनसंपर्क वाढवून, इतरांच्या व्यवसायवृध्दी साठी मदत करणे, आपली उच्च विश्वसनियता निर्माण करणे, नवीन ज्ञान, कौशल्य व कल्पना आत्मसात करणे व आपल्या व्यवसायाचा विकास करणे.
मित्रांनो, बिझनेस नेटवर्कींग अश्या कोणत्याही ठिकाणी होऊ शकते जीकडे नेटवर्कींग साठी योग्य माणसे भरपुर प्रमाणात  जमलेली असतात. उदा. सोशल क्लब व संस्था, व्यवसायिक संघटना, विदयापीठ, माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, ट्रेड शो, व्यवासायिक प्रदर्शन , सोशल कार्यक्रम इ. त्याच प्रमाणे बिझनेस नेटवर्कींग सोशल मिडियावर सुध्दा होऊ शकते. उदा. Facebook, Linkedin, Twitter इ.
मित्रांनो या लेखाद्वारे मी आपल्याला बिझनेस नेटवर्कींगच्या सात टिप्स् देणार आहे. या टिप्स् चा वापर आपण कोणत्याही बिझनेस नेटवर्कींग मिटींगला जेव्हा जाल तेव्हा नक्कीच करु शकता.

१) नेटवर्कींग साठी आवश्यक टूल्स सदैव आपल्याबरोबर ठेवा : मित्रांनो आपल्याला कुठे, कोण , कधी भेटेल, काही सांगता येत नाही. कोणत्याही व्यक्तिला आपल्या व्यवसायाची माहीती देण्यासाठी आवश्यक टूल्स (म्हणजेच साधने) आपल्याकडे असणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ : बिझनेस कार्डस्, कार्ड होल्डर, आपल्या उत्पादनांचे ब्रोशर, शक्य झाल्यास किंवा टॅब मध्ये फोटो अथवा व्हीडीओ जे दाखवल्याने आपली विश्वसनियता वाढेल. नेटवर्कींग साठी लागणारी साधनसामग्री प्रोफेशनल असली पाहीजे तरच आपली चांगली छाप पाहु शकेल. 
२) प्रत्येक नेटवर्कींग मिटींगमध्ये ठराविक व नवीन माणसांना भेटण्याचे लक्ष्य ठेवा : नेटवर्कींग मिटींग मध्ये गेल्यानंतर आपण नेमके किती व्यक्तींना भेटणार आहात ते आधीच ठरवा. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेत जास्तीत - जास्त व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करा. एकाच व्यक्तीबरोबर संपूर्ण मिटींग घालवू नका. महत्त्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा जास्त यशस्वी आणि अनुभवी व्यक्तींना जाणिवपूर्वकपणे भेटण्याच्या प्रयत्नात रहा. कुठल्याही प्रकारचा संकोच मनात बाळगू नका. बिनधास्तपणे लोकांना भेटा. आपल्या आजुबाजुचे शांत जरी असले तरी तुम्ही शांत नका राहू, पुढाकार घ्या, लोकांशी संवाद साधा. 

३) नेटवर्कींग मिटींगमध्ये यजमान बना, अतिथी नव्हे : यजमान नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. अतिथी निवांतपणे बसलेला असतो. नेटवर्कींग मिटींग मध्ये आपली भुमिका जर यजमानाची असेल तर पुढाकार घेऊन लोकांचे स्वागत करणे व त्यांना भेटणे ही आपली जबाबदारीच असते. त्यामुळे नेटवर्कींग करण्याची नामी संधीच आपल्याला मिळते. व्यवसायिक संघटनांच्या कार्यकारी सदस्यत्व घेतल्याने आपल्याला अशी संधी आपसुकच मिळते.

४) प्रश्न विचारा आणि प्रामाणिकपणे ऐकण्यावर भर द्या : मिटींग दरम्यान त्यांना भेटाल त्यांच्या बद्दल मनापासुन जाणुन घ्यायचा प्रयत्न करा. कोणत्याही व्यक्तीला स्वतः बद्द्ल बोलायला आवडते. त्यांना बोलते करण्यासाठी त्यांना प्रश्न विचारा, जेणेकरुन ते स्वतःबद्द्ल बोलतील व आपण त्यांचे म्हणणे ऐका, लक्षात ठेवा, ऐकण्याने स्नेहसंबंध प्रस्थापित होण्यास मदत होते. 


५) विकायचा किंवा सौदा करायचा प्रयत्न करु नका : नेटवर्कींग मिटींग सौदा करण्यासाठी मुळीच नसतात. त्यामुळे मिटींगमध्ये आपले उत्पादन कोणाच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न करु नका. अश्या मिटींगमध्ये लोकांना विक्रेते आवडत नाहीत. आपले इतरांबरोबर स्नेहसंबंध अधीक सुदृढ करण्यासाठी ह्या मिटींग असतात त्यामुळे व्यावसायिक वाटाघाटींची सुरुवात नेटवर्कींग व्दारे होते, अंत नव्हे. प्रामाणिकपणे स्नेहसंबंध प्रस्थापित करण्यावर भर द्या, व्यावसायिक संधी आपोआपच निर्माण होतील. 

६) नेटवर्कींग संपर्कांचे योग्य तर्‍हेने व्यवस्थापन करा : जेवढ्या जास्त लोकांना आपण भेटाल तेवढ्या जास्त पध्दतशिरपणे आपल्याला संपर्कांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जेणेकरुन गरज लागेल तेव्हा आपण त्या व्यक्तींना संपर्क करु शकतो. भेटलेल्या व्यक्तींची माहीती स्मार्टफोन मध्ये तपशिलवार सेव करा किंवा Contact Management Software मध्ये माहीती स्टोअर करा. 

७) फॉलो-अप : आपण पहिल्या ४ टिप्सचं पालन केलत परंतु सातव्या टिपचं पालन नाही केलतं तर आपण नेटवर्कींगसाठी घालवलेला वेळ व्यर्थ आहे. लोकांशी भेट झाल्यानंतर दोन दिवसाच्या आत मेजेसव्दारे, ई-मेल व्दारे, फोनव्दारे परत एकदा संपर्क करा. जर भेटी दरम्यान आपण काही आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करा. नवीन व्यक्तींच्या सातत्याने संपर्कात राहण्यासाठी जाणिवपुर्वकपणे प्रयत्न करा. कळत नकळत त्यामुळेच भविष्यात व्यावसायिक संधी निर्माण होतात. 

मित्रांनो मी दिलेल्या 'बिझानेस नेटवर्कींग' च्या ७ टिप्सचं पालन करा आणि आपले नेटवर्क वाढवा. आपले नेटवर्क वाढवण्यासाठी जाणिवपूर्वकरित्या काम करणे गरजेचे असते. कारण Network या शब्दातच Work हा शब्द लपलेला आहे! 
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्क: 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


Thanks : Mr. Atul Rajoli Sir

 

'ब्रँड' / ब्रँडींग - अतुल राजोळी

 

'ब्रँड'  - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! 'ब्रँड' हा शद्ब जेव्हा एखादा लघुउद्योजक ऐकतो, तेव्हा ही संकल्पना त्याच्या व्यवसायाला लागु पडत नाही असंच त्याला वाटतं. 'ब्रँड' हा राष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या व्यवसायांनाच महत्त्वपुर्ण ठरतो, अशी बर्‍याच लघुउद्योजकांची धारणा असते. बहुतांशपणे लघुउद्योजकांना ब्रँडींग बद्दल जास्त आकर्षण वाटत नाही. 'आम्हाला 'ब्रँड' वगैरे बनवण्याची गरज नाही!' अशी त्यांची समजुत असते. लघुउद्योजकांना असं वाटत असतं की 'ब्रँड' ची निर्मिती करणे हा फार खर्चिक प्रकार आहे आणि आपण ज्या पातळीवर सध्या कार्यरत आहोत, ती लक्षात घेता आपल्या 'बजेट' मध्ये हा प्रकार अजिबात बसणार नाही, त्यामुळे आपण ब्रँडच्या भानगडीत न पडलेलं बरं! 'ब्रँड' निर्माण करण्यासाठी महागड्या एजन्सीची सेवा घ्यावी लागेल अशी त्यांची समजूत असते किंवा अपयशाच्या भितीपोटी, सर्वसामान्य लघुउद्योजक 'ब्रँडींग' च्या वाटेला जात नाही.
मित्रांनो, व्यवसाय कोणताही असो आणि तो कितीही लहान किंवा मोठा असो, व्यवसायाचं दुरगामी यश बाजारपेठेत असलेल्या व्यवसायाच्या प्रतिमेवर ठरते. वर्षानुवर्षे काही उत्पादने बाजारपेठेत राज्य करत आहेत, कितीही स्पर्धा असली तरी या उत्पादनांचे स्थान आजही भक्कम आहे. दुपारच्या वेळी आपल्याला तहान लागली असताना, दुकानात किंवा रेस्टॉरंटमध्ये आपण 'एक बिस्लेरी द्या' असं म्हणतो! 'एक बाटली पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर द्या' असं म्हणत नाही. आपल्याला काहीतरी चिकटवण्यासाठी गम हवा असतो परंतु आपण दुकानदाराला 'फेविकॉल द्या' असं सांगतो. टुथपेस्टला आजही बरेच जण 'कोलगेट' म्हणतात. एखाद्या कागदाची फोटोकॉपी काढण्यासाठी आपण 'झेरॉक्स' हाच शब्द वापरतो. बिस्लेरी, फेविकॉल, कोलगेट, झेरॉक्स ही नावे काय आहेत? हे सगळे 'ब्रँड' आहेत! 
 
या उत्पादनांनी बाजारपेठेत त्यांच्या ग्राहकवर्गामध्ये अशी प्रतिमा निर्माण केली आहे की ग्राहकांचा या उत्पादनांवर प्रचंड भरोसा आहे. बाजारपेठेत कितीही प्रतिस्पर्धि असले तरी आपल्या ब्रँडच्या जोरावर आजही ही उत्पादने यशस्वीपणे टिकून आहेत. काय वाटतं आपल्याला, या कंपन्या आपल्या उत्पादनांचा ब्रँड निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वकपणे प्रयत्न करत असतात की आपोआपच त्यांचा ब्रँड बनतो? साहजिकच या कंपन्या आपल्या उत्पादनाचा ब्रँड निर्माण करण्याला प्रचंड महत्त्व घेतात. परंतु प्रश्नं असा पडतो की तेवेढेच महत्त्व लघुउद्योजकांनी सुध्दा आपल्या उत्पादनांचा ब्रँड बनवण्यासाठी दिले पाहीजे का? मित्रांनो, आधी म्हंटल्याप्रमाणे व्यवसायाचा व्याप कितीही मोठा किंवा लहान असो, दुरगामी प्रगतीसाठी व्यवसायाची बाजारपेठेत असलेली  प्रतिमा कारणीभुत ठरते. बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची उत्पादन अथवा सेवेची 'विश्वसनिय प्रतिमा' निर्माण करण्याच्या प्रक्रीयेला 'ब्रँडींग' असं म्हणतात. बाजारपेठेत व्यवसायाची, उत्पादन किंवा सेवेची 'वेगळी व विश्वसनिय ओळख' म्हणजेच त्या व्यवसायाचा 'ब्रँड' होय! या ब्रँड मुळे व्यवसायाला किंवा उत्पादन सेवेला अद्वितीय स्थान प्रात्प होतं. ब्रँड मुळे व्यवसायाला बरेच फायदे प्राप्त होतात. ब्रँड मुळे उत्पादन व सेवा सदैव ग्राहकाच्या लक्षात राहते. प्रतिस्पर्धींपेक्षा उत्पादन व सेवेच वेगळं असं स्थान निर्माण होतं. ब्रँडमुळे ग्राहकांचा उत्पादन व सेवेवर विश्वास बसतो. ग्राहक वर्ग पुन्हा पुन्हा उत्पादन व सेवा विकत घेण्यासाठी प्रेरीत होतो. ब्रँडमुळे उत्पादन व सेवा थेट ग्राहकाच्या भावनांशी जोडले जाते. व्यवसायात दुरगामी यश प्राप्त करण्यासाठी 'ब्रँड' निर्णायक भुमिका बजावतो.
मित्रांनो, ब्रँडचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'कोका-कोला'. आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोला पेय पिणं आरोग्यासाठी पोषक वगैरे नाही किंवा आपल्या रोजच्या जीवनाची गरज सुध्दा नाही. तरी सुध्दा आपण 'कोका-कोला' पितो! 'कोका-कोला' चा संपुर्ण व्यवसाय हा त्यांच्या ब्रँडींग आणि मार्केटींग कृतीयोजनांवर अवलंबुन आहे. ब्रँड शिवाय आज 'कोका-कोला' जगभरात यशस्वी उत्पादन होऊच शकले नसते. 'कोका-कोला' ने घरोघरी कुटुंबामध्ये आपले अप्रत्यक्षपणे स्थान निर्माण केले आहे. ही ब्रँडचीच जादु आहे. 
मित्रांनो या लेखा द्वारे मी आपल्या लघुउद्योगाचा ब्रँड तयार करण्यासाठी सात पायर्‍या सांगणार आहे. कोणत्याही लघुउद्योगासाठी ठरवलेल्या बाजारपेठेमध्ये वेगळा व विश्वसनिय ब्रँड तयार करण्यासाठी या पायर्‍या जबरदस्त फायदेशीर ठरु शकतात.

लघुउद्योगाचा ब्रँड निर्माण करणार्‍याच्या ७ पायर्‍या:
१) USP तयार करा : बाजारात आपल्या उत्पादनाची वेगळी व विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी सर्व प्रथम मुळतः उत्पादनाचा वेगळा गुणधर्म असणे गरजेचे आहे. उत्पादन किंवा सेवेतच जर काही वेगळेपण नसेल तर ब्रँड निर्माण करणे अशक्य. बाजारपेठेचा आढावा घेऊन, ग्राहकवर्गाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या उत्पादन व सेवेमध्ये जाणिवपूर्वकपणे तयार केलेला गुणधर्म म्हणजे USP. USP तयार करण्याच्या टिप्स् मी या सदरातील मागिल लेखात दिल्या होत्या. कृपया त्याचा अभ्यास करा.
२) आपल्या व्यवसायाची किंवा उत्पादन सेवेची बाजारपेठेत कशी प्रतिमा असावी? ते ठरवा :व्यवसायाच्या USP ला अनुसरुन तशी प्रतिमा ग्राहकाच्या मनात निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणुनच त्याबद्द्ल विचार मंथन करा की, आपल्या उत्पादनाबद्दल जेव्हा ग्राहक विचार करतो तेव्हा नेमक्या कोणत्या भावना त्याच्या मनात आल्या पाहीजेत. उदाहरणार्थ : 'सफोला' कुकींग ऑइल बद्दल जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपल्या मनात त्वरीत ह्रदयाची काळजी, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त अशी प्रतिमा तयार होते. 'सफोला' ला स्वतःची वेगळी व विश्वसनिय प्रतिमा निर्माण करण्यात नक्कीच यश आले आहे. 
३) कोणत्या माध्यमांद्वारे आपल्याला व्यवसायाची अपेक्षित प्रतिमा निर्माण करता येईल? ते ठरवा : व्यवसायाची प्रतिमा निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या प्रसार माध्यमांचा, जाहीरात माध्यमांचा, मार्केटींग साधनांचा किंवा संभाषण माध्यमांचा वापर आपण केला पाहीजे. जेणे करुन आपल्या उत्पादनाची अद्वितीयता ग्राहक वर्गा समोर व्यक्त करु शकतो. आपल्या 'ब्रँडींग बजेट' मध्ये शक्य असेल त्या माध्यमांना निवडा. उदाहरणार्थ. लोगो, टॅग लाइन, बिझनेस कार्ड, स्टेशनरी, ब्रोशर, वेबसाइट, सोशल मिडीया, भेटवस्तु, गणवेश, कार्यस्थळातील वातावरण, पॅकेजिंग, जाहीरात इ. अनेक साधनांचा उपयोग होऊ शकतो. 
४) ब्रँडींग साधनांची निर्मिती करा : ठरवलेल्या ब्रँडींग साधनांची योग्य प्रकारे निर्मिती करा. प्रोफेशनल व्यक्तींची मदत घ्या. चांगल्या अ‍ॅड एजन्सी ज्या लघुउद्योगांसाठी काम करतात, त्यांची योग्य प्रकारे निवड करा. शक्यतो एकाच एजन्सी बरोबर काम करा जेणे करुन ब्रँडींग मध्ये सातत्य राहील.
५) कायदेविषयक सुरक्षितता मिळवा : ब्रँडींग साधनांमुळे व्यवसाय किंवा उत्पादन-सेवेला एक अस्तित्व प्राप्त होते. त्या अस्तित्वाला आपण सुरक्षित ठेवले पाहीजे. ही एक प्रकारे व्यवसायाची महत्त्वपुर्ण संपत्ती असते. याला IP (Intellectual Property) असं म्हणतात. कॉपी राइट किंवा ट्रेडमार्कं करुन आपण आपल्या ब्रँड ची ओळख सुरक्षित करु शकतो.
६) ब्रँड कृतीयोजना तयार करा : आता येत्या काळात टप्प्या टप्प्याने आपण आपल्या ब्रँडचा बाजारपेठेत कश्या प्रकारे प्रचार कराल त्यासाठी लिखित स्वरुपात कृती योजना तयार करा. या कृतीयोजनेव्दारे आपण ठरवल्याप्रमाणे ग्राहकाच्या मनात विश्वसनीय प्रतिमा निर्माण होणे गरजेचे आहे.
७) ब्रँड कृती योजनेला अनुसरुन सातत्याने अंमलबजावणी करा : ठरवलेल्या कृती योजनेनुसार अंमलबजावणी झाली तरच ब्रँड निर्माण होइल. ब्रँड माध्यमांमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. अर्धवट अंमलबजावणी मुळे ब्रँडवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मित्रांनो, या लेखाव्दारे मी लघुउद्योगांसाठी ब्रँडींग बद्दल थोडक्यात माहीती दिली आहे. ब्रँड निर्माण करण्याच्या सुरुवातीच्या काळात ही माहीती नक्कीच लाभदायक ठरेल. मी आशा करतो की आपण आपल्या व्यवसायाचे बाजारपेठेत वेगळे व विश्वसनीय स्थान निर्माण करण्यासाठी पाऊलं उचलालं.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्क: 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

Thanks : Mr. Atul Rajoli Sir

उत्कृष्ट ग्राहक सेवा - अतुल राजोळी...

 

उत्कृष्ट ग्राहक सेवा - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! सध्या जग झपाट्याने बदलत आहे. व्यवसाय जगामध्ये सुध्दा आज, प्रचंड वेगात सगळं काही बदलतयं, रोज नवनवे प्रॉडक्टस् व सर्विसेस बाजारात येत आहेत. ग्राहकसुध्दा नवीन प्रॉडक्टस्  विकत घेत आहेत. ग्राहकाला आज प्रत्येक प्रॉडक्ट कडून भरपूर अपेक्षा आहेत. अश्या या गतिशिल बाजारात तग धरुन जर रहायचं असेल तर आपल्या व्यवसायाचा प्रॉडक्ट हा उत्कृष्ट दर्जाचा असलाच पाहिजे. प्रॉडक्ट उत्कृष्ट दर्जाचं असणे हे कोणत्याही व्यवसायासाठी अनिवार्य झालं आहे. ग्राहक जेवढे पैसे देतो त्याच्या मोबदल्यात चांगल्या प्रतिच्या उत्पादनाची तो अपेक्षा ठेवतो. परंतु बाजारातील जवळपास सर्वच प्रॉडक्ट उत्कृष्ट असण्याची दाट शक्यता आहे. अश्या परिस्थितीमध्ये ग्राहक अश्याच व्यवसायाचे प्रॉडक्ट विकत घेतो जिथे त्याला दिलेल्या किंमतीच्या मोबदल्यामध्ये जास्तीत जास्त मुल्य मिळते. ग्राहकांना आज व्यवसायांकडून सेवासुध्दा गरजेची वाटू लागली आहे. उत्कृष्ट ग्राहक सेवेमुळे ग्राहकांच्या इच्छा व अपेक्षा पूर्ण होतात. तो व्यवसायाच्या प्रति एकनिष्ठ बनतो. एवढेच नव्हे तो इतरांना सुध्दा, आपल्या प्रॉडक्टची शिफारस करतो. बदलत्या व्यावसायिक परिस्थितीमुळे उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रचंड महत्त्वाची भुमिका बजावतो, माझं असं ठाम मत आहे या लेखामध्ये उत्कृष्ट ग्राहक सेवेची ७ महत्त्वाची तत्वे मी आपल्यासमोर मांडत आहे.

१) ग्राहकाच्या वाढत्या अपेक्षा समजुन घ्या : ग्राहकाच्या अपेक्षा कधी नव्हे इतक्या वाढत चालल्या आहेत व दिवसें दिवस त्या बदलत चालल्या आहेत. जे आपण त्यांना गेल्यावर्षी देत होतो ते बहुतेक गेल्या वर्षी पर्यंत चांगलं होतं. परंतु या वर्षी तेच ग्राहकांना साधारण दर्जाचं वाटतं. ग्राहकांची मते जाणुन घेण्यासाठी त्यांचे अभिप्राय घ्या, त्यांच्या मुलाखती घ्या, त्यांना समजुन घ्या, कोणत्या गोष्टी त्यांना जास्त महत्त्वाच्या वाटतात. आपल्या व्यवसायाकडून मिळणार्‍या कोणत्या गोष्टी त्यांना दर्जेदार वाटतात किंवा नाही वाटत हे समजुन घेतल्यानंतर आपण काही महत्त्वपुर्ण निर्णय घेऊ शकतो. ग्राहकांच्या अपेक्षा उत्कृष्ट सेवा देऊन पुर्ण केल्याने बाजारात आपल्या प्रतिस्पर्धांच्या तुलनेने आपल्या व्यवसायाचे वेगळे स्थान निर्माण व्हायला मदत होईल.
२) ग्राहक सेवेचा उच्च दर्जा साध्यं करण्याचं लक्ष्य ठेवा : ग्राहक सेवेच्या मुलभुत किंवा अपेक्षित दर्जा पलीकडे जा. ग्राहकाला इच्छीत सेवा द्यायच्या सतत प्रयत्नात रहा. अधून मधून ग्राहकाला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन त्यांना खुष करा. आपल्या इंडस्ट्रीला अनुसरुन ग्राहक सेवेचा दर्जा निश्चित करा, आणि मग त्याच्या पलीकडे जाण्याचे मार्ग शोधा. ग्राहकांना जास्त पर्याय द्या, जास्त लवचिक व्हा. जास्त वेगात सेवा पुरवा असं सगळं करुन निश्चितच ग्राहक आपल्याकडे आकर्षित होतील व टिकून राहतील. परंतु कालांतराने आपले प्रतिस्पर्धी सुध्दा तसं करु लागतील. त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा नेहमी एक पाऊल पुढे रहा.  

३) ग्राहकांच्या अवास्तव मागण्यांना परिणामकारकपणे हाताळा : प्रत्येक वेळी आपण ग्राहकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करु शकतो असं नाही. काहीवेळा आपल्याला त्यांच्या अपेक्षांना वास्तवाची जाणीव करुन द्यावी लागते. परंतु त्यासाठी बाजारातील आपली प्रतिमा उत्कृष्ट असणे गरजेचे आहे. आपण दिलेला शब्द पाळतो, अशी जर आपली प्रतीमा असेल तर ग्राहक आपल्याला साथ देतो. ग्राहकाचा विश्वास जिंकण्यासाठी आपण दिलेला शब्द सदैव पाळला पाहीजे. ग्राहकाच्या अपेक्षा हाताळण्याचा आणखी एक परिणामकारक मार्ग म्हणजे 'आश्वासने कमी पुर्तता जास्त' उदाहरणार्थ - आपल्या ग्राहकाची अपेक्षा आहे की त्याचे काम अत्यंत जलद व्हावे, आणि आपल्याला माहीत आहे की ते होण्यासाठी एक तास तरी जाईल. ग्राहकाला असे नका सांगु की ते काम एक तासात होईल. त्यांना भरोसा द्या की आपण त्यांच्यासाठी लवकरात लवकर काम पूर्ण कराल, परंतु ते पुर्ण होण्यासाठी दिड तास तरी लागेल! जेव्हा ग्राहकाचे काम एका तासात पुर्ण होईल तेव्हा तो खुप खुश होईल. त्याला मी म्हणतो 'आश्वासने कमी पुर्तता जास्त' !
४) अनवधानाने झालेल्या चूकीमुळे, ग्राहकाचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवा : कधी कधी काही अनपेक्षित घटना घडतात व ग्राहक दुखवला जातो. असं जेव्हा होतं, तेव्हा गोष्टी सुरळीत करण्यासाठी जे जे करता येईल ते करा. जो प्रॉबलेम झाला होता तो  दुर करा व ग्राहकाच्या प्रति प्रामाणिकपणे काळजी दर्शवा. त्यानंतर काही तरी विशेष करा जेणे करुन आपल्या ग्राहकाला त्यातुन काहीतरी चांगल मिळेल. : उदाहरणार्थ -छोटीशी भेटवस्तु, डिस्काऊंट पुढील ऑर्डर साठी, इत्यादी.

५) ग्राहकांच्या तक्रारींचा आदर व सन्मान करा : 'निंदकाचे घर असावे शेजारी' ही म्हण आपल्याला माहीतच असेल. तक्रारी करणारा ग्राहक आपला चांगला मित्र बनू शकतो. त्याच्या सदैव संपर्कात राहा. व्यवसायात ज्या महत्त्वाच्या सुधारणा होणं गरजेच आहे. त्या बद्दल जबरदस्त टीप्स या ग्राहकांकडून आपल्याला मिळू शकतात. आपल्या यंत्रणे मध्ये काही चुका असतील तर हा ग्राहक बिनधास्तपणे आपल्याला त्या बद्दल सांगतो. प्रॉडक्टच्या दर्जा बद्दल, आपले प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा कोणत्या बाबतीत चांगले आहेत ते सुध्दा आपल्याला कळू शकते.

६) वैयक्तिक जबाबदारी घ्या : बर्‍याच व्यवसायांमध्ये ग्राहकाला झालेल्या असुविधेबद्दल आरोप-प्रत्यारोप केले जातात. एका डीपार्टमेंटची माणसे दुसर्‍या डीपार्टमेंटवर आरोप करतात. असं करुन काही साध्य होत नाही. ग्राहक मात्र व्यवसायापासुन तुटतो. आपल्या व्यवसायामध्ये ग्राहकाला उत्कॄष्ट सेवा देण्यासाठी सगळेच वचनबध्द असले पाहीजेत. तसे वातावरण व्यवसायामध्ये तयार करा. जेणे करुन कर्मचारी ग्राहकांना खुष ठेवण्यासाठी पुढाकार घेतील, नवीन संकल्पना राबवतील, नवीन व चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी सल्ला देतील.
७) जगाकडे पहा आपल्या ग्राहकाच्या दॄष्टीकोनातून : बर्‍याच वेळा उद्योजक आपल्या दुनियेत व्यस्त असतो. त्याला याचं भान राहत नाही की आपला ग्राहक नेमकं काय व कसा अनुभव घेत असेल.  वेळ काढून ग्राहकच्या बाजुने अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. आपल्याच ऑफिस मध्ये ग्राहक बनुन फोन करा. आपल्याच व्यवसायाचे ग्राहक होऊन कसे वाटते ते पहा. किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे प्रॉडक्ट व सर्विसेचा  उपभोग घेऊन बघा. आपल्याला नक्कीच बरचं काही शिकायला मिळेल.
मित्रांनो, जगातील सर्व व्यवसाय, व संस्था लोकांची सेवा करायलाचं अस्तित्वात आल्या आहेत. जेव्हा व्यवसाय आपल्या ग्राहकांची योग्य पध्द्तीने व मनापासुन सेवा करतो तेव्हा ग्राहक तर खुष होतोच व व्यवसायाची सुद्धा प्रगती होते.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्क: 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

Thanks : Mr. Atul Rajoli Sir

माझ्याबद्दल