बुधवार, २० डिसेंबर, २०१७

आजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”

पुण्यातील शनिवार वाडा खूप प्रसिद्ध आहे परंतू काय आपल्याला माहीत आहे की बाजीरावांच्या या महालात एका राजकुमारची आत्मा भटकतं असते. जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याची आणि रडण्याची आवाज ऐकू येते. शनिवारवाडा आपल्या या भुताटकी प्रकरणामुळे ही प्रसिद्ध आहे.
या महालाचा पाया 1730 साली शनिवारी ठेवण्यात आला असून त्या काळात 16, 110 रुपये लागत आली होती. या महालात एक हजाराहून अधिक लोक राहू शकत होते. 22 जानेवारी 1732 साली गृह प्रवेश करण्यात आले होते. नंतर यात एक काळे पान जुळले.


या महालात 30 ऑगस्ट 1773 ला रात्री 16 वर्षाचे नारायण राव, जे मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवा बनले होते, त्यांची कट रचून हत्या केली गेली. जेव्हा खाटीक किल्ल्यात शिरले तेव्हा नारायण रावांनी धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले. नारायण राव पूर्ण महालात “काका मला वाचवा”..... “काका मला वाचवा” असे ओरडत होते. परंतू त्यांना वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. नारायण रावांच्या काकांनी त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले होते असे लोकं म्हणायचे.


नारायण राव यांची आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असते आणि त्यांचे शेवटले शब्द काका मला वाचवा हेही लोकांना ऐकू येतात. अंधारात हे महाल अजूनच भीतिदायक वाटतं. महालाच्या भीतींवर रामायण आणि महाभारत काळातील दृश्य बनलेले आहेत.


या महालाच्या पहिल्या मजलावर 17-18 शताब्दीच्या दरम्यानच्या काही वस्तू आणि मुरत्या ठेवलेल्या आहेत. या महालाचा एक मोठा भाग 1824 मध्ये जळाला होता.


शनिवार वाड्यात पाच दारं आहेत. जे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा नावाने ओळखले जातात.













by - http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shaniwar-wada-pune-117041000022_1.html

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

ध्वजदिन 7.12.17




‘हिमालयाच्या शिखरावरूनी सांगू जगाला सा-या गर्जुनी। खबरदार जर इथे याल, तर सांडतील रक्ताचे सागर’, अशी गर्जना करीत तळहातावर शिर घेऊन झुंजणा-या सैनिकांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस. घरादाराला आणि आप्तस्वकीयांना दूर सारून देशासाठी, स्वबांधवांच्या रक्षणासाठी कोसळत्या पावसात आणि गोठविणा-या थंडीत लढणा-या सा-या लढवय्यांचाच आज स्मरणदिन. किती जणांची नावे सांगावीत? म्हणूनच आज या सा-यांनाच मानवंदना देण्याचा दिवस..ध्वजदिन ! ‘नव्या मनूतील नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे’, असे म्हणणा-या अनेक सैनिकांनी स्वदेशरक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती दिली. आजच्या ध्वजदिनाच्या निमित्ताने त्या सर्व वीरांचा स्मृतिदिन. राष्ट्राच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ रणांगणात देह ठेवणा-या वीरांच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सढळ हाताने मदत करणे, हे त्यांचे.. आपले, सर्वाचे कर्तव्यच आहे. आज जमा होणारा निधी म्हणजे त्या नरवीरांना आदरांजली वाहण्याचीच एक संधी आहे. म्हणूनच आज एका व्यक्तीचा नाही, तर देशरक्षणार्थ आपल्या प्राणांची कुरवंडी करणा-या सा-या वीरपुत्रांचाच स्मृतिदिन. त्या वीरमरण पत्करलेल्या वीरांचे स्मरण करून आजही आपले सैनिक म्हणताहेत, ‘शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे। सज्ज व्हा उठा चला, सैन्य चालले पुढे।।’











by-  Dainik Prahar dt.07.12.17

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

..म्हणून निर्माते म्हणायचे विद्या बालनचा पायगुण चांगला नाही !


'हम पांच' या टीव्ही मालिकेतून पुढे आलेली विद्या बालन आज यशाच्या शिखरावर आहे.

...म्हणून निर्माते म्हणायचे विद्या बालनचा पायगुण चांगला नाही !




मुंबई : 'हम पांच' या टीव्ही मालिकेतून पुढे आलेली विद्या बालन आज यशाच्या शिखरावर आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडच्या टॉप १० मध्ये आपले नाव समाविष्ट केले आहे. विद्याचे चित्रपट आणि तिचा अभिनय काहीसा वेगळ्या ढंगाचा असून तिचा खास असा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. मात्र एककाळ असा होता ज्यावेळी निर्माते तिला चित्रपटात घेण्यास नकार देत असतं. तिचा पायगुण वाईट असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे होते. 

विद्याने सुरुवातीला अनेक बंगाली चित्रपटात काम केले पण ते काही कारणास्तव प्रदर्शित झाले नाहीत. त्यानंतर विद्या ज्या चित्रपटात काम करेल त्याचे नुकसान होत असे. त्यामुळे विद्या असेल तिथे नुकसान, असा गैरसमज निर्माण झाला. काम मिळवण्यासाठी मला फार संघर्ष करावा लागला, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. त्याचबरोबर तिने अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या. पण तिला सगळीकडून नकारघंटाच ऐकू आली. परंतु, स्वभावाने जिद्दी असलेल्या विद्याने हार न मॅनटा आपले प्रयत्न सातत्याने चालूच ठेवले. 

परिणिता चित्रपटासाठी अनेक वेळा तिला स्क्रिन टेस्ट द्यावी लागली, असे विद्या सांगते. मात्र एकदा निर्मात्याने चक्क तिची जन्मपत्रिका मागितली तेव्हा तर हद्दच झाली. त्यानंतर विद्याला देखील आपला पायगुण चांगला नसल्याचे वाटू लागले. परंतु, वेळेसोबत नशीबही बदलले. 
मिळालेल्या संधीचे सोने करत तिने अनेकांची मने जिंकली. 

परिणिता, कहानी, कहानी 2 आणि द डर्टी पिक्चरसारख्या चित्रपटांनी विद्याचे आयुष्यच बदलून टाकले. तसेच विद्याला एक नवी ओळख मिळवून दिली. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'बेगम जान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही. मात्र त्यातील विद्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. सध्या विद्या आपला आगामी चित्रपट ‘तुम्हारी सुलू'मध्ये व्यस्त आहे. नुकतेच ‘तुम्हारी सुलू'चे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


























Zee News 

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

गुणवत्तापूर्ण बिस्किटे हीच ठरली ओळख...





हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री सचिन तेरदाळे यांनी डिसेंबर २०१४ मध्ये सुरवातीला छोट्या प्रमाण घरगुती स्तरावर बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. वर्षभरात या व्यवसायाने चांगली गती घेतली. आज त्यांनी स्वतःचे बिस्कीट विक्रीचे दुकान सुरू केले आहे. 

राजेंद्र घोरपडे 

घरातील दैनंदिन काम संपल्यानंतर उर्वरित वेळेत घरगुती स्तरावर लहानसा प्रक्रिया उद्योग सुरू करावा, असे महिलांना वाटते. हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री तेरदाळे यांचीही अशीच इच्छा होती. पद्मश्री यांच्या काकांचा एरंडोली(जि. सांगली) या गावी घरगुती बिस्किटे तयार करण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय पाहिल्यानंतर पद्मश्री यांनाही बिस्किटेनिर्मिती करण्याचे ठरवले. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी एक किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी करून गावामध्येच बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला गावातील लोकांकडून बिस्किटे तयार करण्याबाबतची मागणी असायची. एका किलोसाठी पन्नास रुपये या मजुरी दराने त्या बिस्किटे करून देतात. बिस्किटासाठी लागणारे सर्व साहित्य ग्राहकांकडून घेऊन त्यांना लागेल, त्या पद्धतीची बिस्किटे त्या तयार करून देतात. एक किलो बिस्किटे तयार करण्यासाठी डिझेल, वीज आणि बेकिंगचे साहित्य असा सरासरी २० रुपये इतका खर्च येतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना गावातील नागरिकांच्याकडून दररोज चार ते पाच किलो बिस्किटांची मागणी मिळू लागली. यातून खर्च वजा जाता त्यांना रोजचे १०० ते १५० रुपये मिळायचे. गावातील मागणीच्या व्यतिरिक्त पद्मश्री यांनी स्वतःही बिस्किटे तयार करून छोट्या प्रमाणात विक्री सुरू केली. गहू, नाचणी बिस्किटे, नारळ, गव्हाची नानकटाई, नमकिन बिस्किटे, कमी साखरेची बिस्किटे, नाचणी आणि गहू मिश्रीत बिस्किटे अशी विविध प्रकारची उत्पादने त्यांनी विकण्यास सुरवात केली.

‘स्वयंसिद्धा’ने दिली दिशा 


कोल्हापुरातील ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेतून पद्मश्री तेरदाळे यांना बिस्किटे निर्मिती व्यवसायाबाबत पूरक मार्गदर्शन मिळाले. या संस्थेतर्फे दर बुधवारी कोल्हापुरात महिला व बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूच्या विक्रीसाठी दुपारी बारा ते तीन या वेळेत बाजार भरविण्यात येतो. तेथे पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री सुरू केली. या बाजारानंतर महिलांना संस्थेतर्फे विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येते. वाणीमुक्ती कार्यशाळेतून कसे बोलायचे, व्यवसाय कसा करायचा, विक्रीसाठी कशाची आवश्‍यकता आहे, याची माहिती महिलांना देण्यात येते. यातून पद्मश्री यांना प्रेरणा मिळाली. स्वयंसिद्धा संस्था अनेक ठिकाणी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविते. या माध्यमातूनही पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री वाढविली.

महिलांना रोजगाराची संधी ः 



पद्मश्री सध्या दररोज ३० किलो गव्हापासून सुमारे ६० किलो बिस्किटांची निर्मिती करतात. त्या स्वतः दररोज बिस्किटे निर्मिती करतात, त्याच बरोबरीने त्यांनी गावातील सात महिलांना रोजगाराची संधी दिली आहे. कधी बिस्किटांच्या निर्मितीचे काम जास्त असते, कधी कमी असते. सहकारी महिलांना त्या तासाला १२ रुपये इतकी हजेरी देतात. दिवसाला पाच ते आठ तासांचे काम या महिलांना मिळते.

कार्यशाळेत मार्गदर्शन ः 
स्वयंसिद्धा संस्थेमार्फत सांगोला (जि. सोलापूर) येथे आयोजित कार्यशाळेत पद्मश्री तेरदाळे यांनी बिस्किटेनिर्मिती व्यवसायाबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. तेथे त्यांनी बिस्किटांची विक्रीही केली. त्यांच्या उच्च प्रतिच्या बिस्किटांचे कौतुक तर झालेच या व्यतिरिक्त त्यांना येथून दरमहा सहा किलो बिस्किटांची कायमची मागणी मिळाली.

कुटुंबाचे मिळाले सहकार्य ः 
पद्मश्री यांचे पती सचिन हे बिस्किटांच्या विक्री व्यवस्थेसाठी मदत करतात. बिस्किटे निर्मितीसाठी महिन्याला २०० किलो गहू, २५ किलो घरगुती साजूक तूप, ४० किलो लोणी आणि ७० लिटर डिझेल लागते. लोणी हे नृसिंहवाडी, कवठेपिरण आदी गावांतील शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. पद्मश्री यांच्या सासू चंपाबाई या दळण, कांडपापासून ते मालाच्या खरेदी-विक्रीसह कामगारांच्यावर देखरेख ठेवतात. छोट्या गावात हिमतीने घरगुती बिस्किटे निर्मितीचा उद्योग सुरू केल्याबद्दल स्वयंसिद्धा संस्थेने पद्मश्री यांना सौ. मंदा देवेंद्र आचार्य पुरस्कार देऊन गौरविले आहे.

गुणवत्तेमुळे व्यवसायवृद्धी ः 
तेरदाळे यांनी बिस्किटाचे उत्पादन करताना अधिक नफ्यापेक्षा गुणवत्ता हाच निकष ठेवला. बिस्किटे निर्मितीसाठी चांगल्या दर्जाचे घटक त्या वापरतात. विशेषतः लोणी, तूप, दूध हे घरगुतीच वापरले जाते. चांगल्या गुणवत्तेमुळे दरमहा बिस्किटांची मागणी वाढत आहे.

मोठ्या क्षमतेच्या यंत्रांची खरेदी ः 
तेरदाळे यांना वाढत्या बिस्किटांच्या मागणीमुळे एक किलो क्षमतेचा ओव्हन वापरावर मर्यादा आल्या. पीठ मळण्यासाठी मोठ्या यंत्राची गरज वाटू लागले. लहान यंत्रामुळे काम वेळेत होण्यास अडचणी येत होत्या. हे टाळण्यासाठी पद्मश्री यांनी पीठ मळण्यासाठी एक लाख रुपये किमतीचे मिक्‍सिंग मशिन आणि तीन लाख रुपये किमतीचे चार किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी केला.

बिस्किट विक्रीसाठी शॉपी ः 
तेरदाळे यांनी बिस्कीट विक्रीसाठी कोल्हापुरातील राजारामपूरीमध्ये शॉपी सुरू केली. येथे दररोज बिस्किटांच्या विक्रीतून सरासरी तीन हजार रुपये मिळतात. या व्यतिरिक्त बाहुबली, कुंथगिरी, सोलापूर, पुणे येथेही विक्रीसाठी बिस्किटे त्या पाठवितात.

परदेशातूनही मागणी 
ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथे जाणाऱ्या कोल्हापुरातील व्यक्तींकडून वर्षातून तीन ते चार वेळा बिस्किटांची मागणी होते. साजूक तुपातील एक किलो बिस्किटे विक्रीचा दर २५० रुपये आहे, तर परदेशात बिस्किटे पाठविण्याचा कुरिअरचा खर्च ८१० रुपये प्रति किलो इतका आहे. मात्र गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशातूनही मागणी असल्याचे पद्मश्री सांगतात.

संपर्क ः पद्मश्री तेरदाळे ः ८४२१४८२८४४













by - राजेंद्र जी घोरपडे 

स्वेटर उद्योगातून दिला महिलांना रोजगार





कोल्हापूर शहराच्या रमणमळा परिसरातील मालती माधवराव बेडेकर यांनी घरची शेती सांभाळत स्वेटर विणण्याचा उद्योग सुरू केला. गेल्या तीस वर्षांत त्यांनी या व्यवसायात चांगले यश मिळविले. स्वतःसह शेजारच्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन कायम स्वरूपी रोजगार मिळवून दिला. 



एखाद्या कामाची आवड असेल तर त्यात निश्‍चितच मोठे यश मिळते. कोल्हापूर शहरातील मालती माधवराव बेडेकर यांना स्वेटर विणण्याची आवड होती. मालतीताई लग्नानंतर कोल्हापूर शहरालगतच असणाऱ्या रमणमळा येथे राहाण्यास आल्या. त्यांचे पती कोल्हापूर शुगरमीलमध्ये नोकरीस होते. रमणमळा येथे घरालगतच बेडेकर कुटुंबीयांची सहा एकर शेती आणि गुऱ्हाळ होते. सहा गायी, दोन म्हशी यांचा सांभाळ करत त्यांनी शेतीत विविध पीकपद्धतीचे प्रयोगही केले. सहा वर्षे मत्स्यशेती केली. ज्वारी बीजोत्पादनही घेतले. पुढे कोल्हापूर शहराच्या वाढत्या विस्तारात मात्र त्याच्या शेतीला मर्यादा आली. 

स्वेटर व्यवसायाला झाली सुरवात ः 
घरची कामे झाल्यानंतर फावल्यावेळेत काय करायचे? हा प्रश्न प्रत्येक महिलेला असतो. मोकळ्या वेळेत स्वेटर विणणे ही मालतीताईंची आवड. या आवडीनेच त्या स्वेटर निर्मितीत गुंतल्या. यात पुढे विकास करायचा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मालतीताईंनी मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा "वूलन मशिन निटिंग' हा चार महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार योजनेखाली त्यांन स्वेटर निटिंग यंत्र खरेदी केले. तेव्हा या यंत्राची किंमत हजार रुपये होती. स्वेटर विणण्यास सुरवात केली, पण या आधुनिक यंत्राच्या वापराची फारशी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी त्यांनी यंत्र खरेदीदाराकडून पुणे येथे यंत्र वापराबाबत प्रशिक्षण घेतले. 

ओळखीतून वाढला व्यवसाय 
स्वेटरचा वापर हा हंगामी आहे. त्यामुळे हिवाळी हंगामातच स्वेटरला मागणी असते. तरीही जिद्दीने मालतीताईंनी मध्ये निटिंग यंत्राचा वापर करून स्वेटर विणण्यास सुरवात केली. एकमेकांच्या ओळखीनेच स्वेटरची मागणी वाढत गेली. ओळखीतून प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या साधकांकडून पांढरे स्वेटर व शाल तयार करण्याची ऑर्डर त्यांना मिळाली. पहिलीच ऑर्डर असल्याने उत्सुकता होती. या कामात त्यांना त्यांचे पती माधवराव यांनी लोकरीचे गुंडे तयार करण्यासाठी मदत केली. व्यवसायवाढीच्या दृष्टीने मध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. उत्पादनाच्या विक्रीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने महिला उद्योजक समितीतर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. 

तीन यंत्रांची खरेदी ः 
बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात करून व्यवसाय वाढविणे ही काळाची गरज असते. च्या काळात बाजारात स्वेटर शिलाईची आधुनिक यंत्रे येत होती. उत्पादनांचा वेग वाढला होता. अशा काळात उत्पादनास असणारी मागणी विचारात घेऊन आधुनिक यंत्रे विकत घेण्याचा विचार मालतीताईंनी केला. अडीच लाखांचे कर्ज घेऊन दोन कॉम्प्युटराईज्ड आणि एक कार्डोमेट्रिक यंत्राची त्यांनी खरेदी केली. या यंत्रावर काम करण्यासाठी कामगारांची गरज होती. अशावेळी त्यांनी अन्य कामगार न निवडता परिसरात राहणाऱ्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला. या यंत्रामुळे दिवसाला तीन ते चार स्वेटर विणले जायचे. 

महिलांना मिळवून दिला रोजगार ः 
स्वेटर व इतर लोकरीची कपडे तयार करताना विविध कामांसाठी वेगवेगळे कामगार लागतात. सध्या मालतीताईंकडे महिला यंत्रावर काम करतात, तर महिलांना हातावरचे काम आहे. लोकरीचे गुंडे, शिलाई या कामासाठी प्रत्येकी दोन महिला आहेत. सहा महिला या दररोजच्या रोजंदारीवर काम करतात. त्यांना कामानुसार महिना तीन ते पाच हजार रुपये इतका पगार दिला जातो. दहा ते पंधरा महिला घरचे काम सांभाळून शिलाई कामात मदत करतात. त्या महिलांना नगास सरासरी रुपये व शिलाईसाठी नगास रुपये दिले जातात. मालती यांच्याकडे स्वेटर शिलाई काम करणाऱ्या काही मुली होत्या. लग्नानंतर त्यांना स्वेटर काम करणे अवघड होते. अशा तीन मुलींना मालतीताईंनी स्वेटर विणण्याचे यंत्र घेऊन दिले. लोकरीच्या वजनावर त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. 
स्वेटर व इतर विविध प्रकारची उत्पादने करण्यासाठी रोज अंदाजे तीन ते चार किलोची लोकर लागते. वर्षाला अंदाजे किलो लोकर लागते. हा सर्व कच्चा माल दिल्ली व लुधियाना येथील मिलमधून मागविण्यात येते. दिवसाला साधारणपणे स्वेटर तयार होतात. महिन्याला अंदाजे हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या स्वेटरचे उत्पादन होते. हंगामानुसार कमी-जास्त उत्पादन होते. 

लोकरीची विविध उत्पादने ः 
लहानांपासून मोठ्यांसाठी लागणारे विविध प्रकारच्या स्वेटरचे उत्पादन मालतीताई करतात. बेबी सेट, पायमोजे, बंडी, फ्रॉक, लहान मुलांचे स्वेटर, लेडिज टॉप, कुर्तीज, लॉंग स्वेटर्स, कार्डीगन्स, जेन्टससाठी हाफ व फुल हाताचे स्वेटर्स, नेहरू स्वेटर्स, बाहुल्या अशी विविध उत्पादने तयार केली जातात. टोप्या, जर्किनमध्येही विविध प्रकार आहेत. याव्यतिरिक्त ग्राहकाच्या मागणीनुसारही विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील काही दुकानदार पूजेसाठी लागणारे आसन, रुमाल तसेच तोरण आदींची मागणी करतात. त्यांना त्यांच्या ऑर्डरनुसार मालाचा पुरवठा करण्यात येतो. 

प्रदर्शनातून विक्री ः 
सुरवातीच्या काळात हिवाळ्यामध्ये मालतीताई रमणमळा चौकात स्वतः मांडव उभारून स्वेटरची विक्री करीत होत्या. मालतीताईंनी थंडीच्या हंगामात इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे, महाबळेश्‍वर, बेळगाव येथे प्रदर्शने भरविली. आता स्वेटरच्या थेट ऑर्डर मिळत असल्याने गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी प्रदर्शने बंद केली. फक्त कोल्हापुरातच दिवाळीनंतर डिसेंबरअखेरपर्यंत प्रदर्शन भरवतात. याव्यतिरिक्त स्वयंसिद्धा, भगिनी महोत्सवातर्फे आयोजित प्रदर्शनामध्येही त्या स्वेटरची विक्री करतात. स्वेटर निर्मितीमधील धडपड पाहून त्यांना सकाळ (तनिष्का-मधुरांगण), रोटरी क्‍लब, स्वंयसिद्धा संस्थेने विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे.










by - राजेंद्र घोरपडे 

सेंद्रिय शेती आणि प्रक्रियेतून देसाईंनी शोधली बाजारपेठ



सेंद्रिय शेती आणि प्रक्रियेतून देसाईंनी शोधली बाजारपेठ
कृषी रसायने, रासायनिक खते यांच्या अति वापरामुळे शेती, पर्यावरण, मानवी तसेच जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हे लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प तेरणी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील अरुण देसाई यांनी घेतला. आज सेंद्रिय उत्पादकांचा गट तयार करून ते विविध सेंद्रिय माल पिकवतात. मालावर प्रक्रिया करून त्याला आश्‍वासक बाजारपेठही मिळविण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

तेरणी येथील अरुण देसाई यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीची कास धरली. रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर ते पूर्वी करायचे. द्राक्षाचेही काही काळ उत्पादन घेतले. द्राक्षात अनेक फवारण्या कराव्या लागायच्या. दरम्यानच्या काळात त्यांनी पुणे येथील निसर्गशेती विज्ञान शिबिरात भाग घेतला. शेती, पर्यावरण आणि मानव या सर्वांच्या आरोग्याचे हित याबाबत ते गंभीर झाले. त्यानुसार त्यांनी 1991 च्या सुमारास सेंद्रिय शेतीची कास धरली. प्रयोग परिवारचे संस्थापक श्री. अ. दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग सुरू केले. गांडूळ शेती सुरू केली. आजऱ्याचे मोहन देशपांडे यांचे मार्गदर्शन घेतले. एका चौरस फुटामध्ये पडणारा सर्व सूर्यप्रकाश पकडण्याचे दाभोळकरांचा सिद्धांतही त्यांनी उपयोगात आणायला सुरवात केली. सेंद्रिय पदार्थांचे जमिनीत पुनर्भरण करीत राहणे आणि जैविक घटकांचा वापर यावर त्यांचा भर आहे. शेतातीलच उपयोगी जैविक घटक वाढविण्यावरच त्यांचा अधिक भर आहे. या पद्धतीने हळद, ऊस, सोयाबीन, भाजीपाला, आंबा, तूर आदी विविध पिके ते घेतात. हळदीबाबत प्रातिनिधिक बोलायचे तर लागवडीपूर्वी शेतात एकरी 10 गाड्या शेणखत मिसळतात. हळदीच्या शेतात हिरवळीच्या खताचे, म्हणजे तागाचे बियाणेही पेरले जाते. पुढे ताग कापून तिथेच गाडला जातो. तेरणी परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. अशावेळी तागाचा अन्नद्रव्ये मिळविण्याबरोबर मल्चिंग म्हणूनही उपयोग होतो. मल्चिंगमुळे जमिनीत उबदारपणा राहातो. यंदा हळदीच्या सेलम जातीची लागवड आहे. काढणी फेब्रुवारीमध्ये होईल. देसाई यांनी आपल्या सेंद्रिय शेती प्रयोगात तेरणीतीलच आपल्या सुमारे दहा नातेवाईक सदस्यांनाही सामावून घेतले आहे. या सर्वांच्या मिळून एकूण 55 एकर शेतीवर विविध पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात. प्रत्येकाचे किमान एक ते कमाल तीन हेक्‍टर क्षेत्र आहे.

हळदीचे एकरी 12-15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उसाचे एकरी 40 टन, सोयाबीनचे 10 क्विंटलपर्यंत, भाताचे सुमारे 22 क्विंटल असे उत्पादन सरासरी होते.

सेंद्रिय शेती प्रशिक्षणात सहभाग
एकात्मिक ग्रामीण विकास संस्थेतर्फे (एनकॉन) 2001 मध्ये औरंगाबाद येथे सेंद्रिय शेती व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण झाले. यात भाग घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेने 18 हजार रुपयांची मदत त्यांना केली. सेंद्रिय शेतीची उत्पादने, प्रक्रिया आणि विपणन यावर त्या वेळी झालेल्या मार्गदर्शनाचा देसाई यांनी फायदा करून घेतला.

शेतीमालावर प्रक्रिया करून विक्री
उत्पादन खर्च आणि अपेक्षित नफा यावर आधारित दराने विक्री केल्यास फायदा निश्‍चितच मिळतो. हे लक्षात घेऊन शेतीमालाची मूल्यवृद्धी करण्यावर देसाई यांनी भर दिला आहे. त्यांचे सुधारित पद्धतीचे गुऱ्हाळघर आहे. सेंद्रिय उसापासून सेंद्रिय गूळ तयार करताना दाणेदार गूळ, त्याच्या ग्रेड्‌स, पावडर, पॅकबंद काकवी आदी उत्पादने देसाई तयार करतात. सेंद्रिय आजरा घनसाळ, काळी गझेली या सुवासिक भाताच्या जातींचे योग्य पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते.

कृषी विभागाचे सहकार्य
देसाई यांनी आपल्या एकूण शेतीचे सामूहिक पद्धतीचे सेंद्रिय प्रमाणीकरण करून घेतले आहे. त्यासाठी दरवर्षी सुमारे 27 हजार रुपये खर्च येतो. मात्र कृषी विभागाचे यासाठी अनुदान आहे. प्रमाणीकरणासाठी तत्कालीन कृषी उपसंचालक मधुकर घाग, तालुका कृषी अधिकारी बेंदगुडे यांनी सहकार्य केले. तालुका कृषी अधिकारी श्री. डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांचे सहकार्य देसाई यांना लाभले आहे.

सेंद्रिय उत्पादनांसाठी बाजारपेठ-
सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी गडहिंग्लज येथील तत्कालीन सहायक निबंधक विजयराव देसाई यांनी अरुण देसाई यांना सहकारी संस्था काढण्याची कल्पना सुचविली. त्याप्रमाणे संस्था स्थापन करून आपल्या गटातील सर्व शेतकरी सदस्यांचा शेतीमाल वा प्रक्रियायुक्त उत्पादनांची विक्री या संस्थेद्वारे होते. सेंद्रिय प्रमाणित उत्पादनांना बाजारपेठ शोधणे, त्यात सातत्य ठेवणे, दर चांगला मिळणे हे आव्हानात्मक काम आहे. देसाई आपल्यापरीने त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पुणे, मुंबई, बंगळूर, गोवा, वर्धा आदी ठिकाणाहून त्यांनी खरेदीदार शोधले आहेत. पुण्यातील मार्केटयार्ड, मंडई, कोथरूड, कॅम्प येथेही त्यांचे व्यावसायिक ग्राहक आहेत. मुंबईतील जसलोक रुग्णालयाशेजारील हेल्थ शॉप, एका महिला व्यावसायिकेचे संडे मार्केट, पॉंडिचेरी येथेही त्यांचा सेंद्रिय माल विकला जातो. आजरा घनसाळ भात किलोला 50 ते 60 रुपये दराने त्यांनी विकला आहे.
हळदीची औषधी कॅप्सुल्स हळद पावडरही तयार केली जाते. ती किलोला 200 ते 300 रुपये दराने विकली जाते. बाजारात औषधी कंपन्यांनी हळदीची कॅप्सुल्स उपलब्ध केली आहेत. या धर्तीवर औषध कंपन्यांच्या सहकार्याने अशी कॅप्सुल्स तयार करण्याचे देसाई यांचे प्रयत्न आहेत.

अवजारांत सुधारणा
देसाई अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असल्याने अवजारात सुधारणा करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. सुधारित पद्धतीचे कोळपे त्यांनी तयार केले आहे. एका बैलाच्या मदतीने सहज नांगर ओढता यावा यासाठी त्यात सुधारणा केली आहे. उसामध्ये भरणीवेळी निंबोळी पेंड, एरंड, करंजी पेंड देताना ते हा नांगर वापरतात. देसाई यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, कृषी विभाग, ग्रामपरिवर्तन, पुणे यांचे सन्मानपत्र, शाहू किसानशक्ती, आदर्श कृषी भूषण असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

संपर्क - अरुण देसाई, 9423987202

सेंद्रिय मालाला परदेशात मागणी आहे. काही खरेदीदार परदेशातही तो पाठवतात. सरकारने तशी संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवी. परदेशात प्रदर्शन, महोत्सवांचे आयोजन करून बाजारपेठा उपलब्ध होण्याची गरज आहे. त्यातून सेंद्रिय मालाला निश्‍चितच चांगला दर उपलब्ध होईल -अरुण देसाई








by - राजेंद्रजी  घोरपडे

नाशिकच्या माणिक कासार यांची सेंद्रिय तपश्चर्या, १८ वर्षांपासून करीत आहे १०० टक्के सेंद्रिय शेती




कीटकनाशके, खते, तणनाशके यांचा शेतीमध्ये होत असलेल्या अनिर्बंध वापरामुळे तयार होणाऱ्या शेतीमालातही त्यांचे अंश उतरतात. कीटकनाशकाचे अंश असलेला भाजीपाला व धान्य खाणे मानवी शरीराला धोकादायक असते. हा धोका कर्करोगासारख्या भयंकर विकारात परिवर्तीत होऊ शकतो. याबाबत थोड्या प्रमाणात का होईना जनजागृती होते आहे. केन रिसर्चच्या अहवालानुसार भारतातील कीटकनाशकांची उलाढाल २०२० पर्यंत ४८४ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज अलीकडच्या ताज्या अहवालात वर्तवला आहे. यावरून देशभरात कीटकनाशकाचा वापर किती मोठ्या प्रमाणात होतो याचा यांचा अंदाज निश्चितच आपल्याला येईल. सेंद्रिय शेती ही काळाची गरज ओळखून नाशिक जिल्ह्यातील शेवगे दारणा येथील माणिक महादू कासार सुमारे १८ वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे. त्यात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा त्यांनी निर्माण केला आहे. सेंद्रिय शेती करताना सुरवातीला त्यांना असंख्य अडचणी आल्या मात्र त्यांनी रासायनिक खतांचा वापर केला नाही. आज ते जो काही शेतमाल तयार करीत आहे तो माणसाचेच नाही तर जमिनीचेही आरोग्य राखत आहे. त्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी विकसित केलेली आदर्श शेतीपद्धत जाणून घेण्याचा युवर स्टोरीने केलेला एक प्रयत्न.






माणिक कासार यांची शेवगे दारणा या गावात ८ एकर जमीन आहे. कॉलेज सोडल्यानंतर १९८५ पासून त्यांनी शेतीकामाला सुरुवात केली. शेती हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यांचे वडील रासायनिक शेती करायचे, मात्र १९९८ पासून त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. १२वी पर्यंत त्यांनी काॅमर्संचा अभ्यास केला होता. अर्थकारण आणि आकडेवारीनुसार त्यांनी अभ्यासले की, रासायनिक शेती खूप महाग असून परवडण्यासारखी नाही. “१९९० पासून खूप अडचणी यायला लागल्या. त्यावेळी आमच्याकडे द्राक्षाची बाग आणि सर्व प्रकारची पिकं होती. एकत्रित कुटुंब पद्धती आणि पस्तीस ते चाळीस एकर शेती आमच्याकडे होती. सर्व अन्नधान्य पिकत असताना अपेक्षित बाजारभाव मात्र मिळत नव्हता. दुसरीकडे खते, औषधे यावर जास्त खर्च व्हायचा. त्या दरम्यान दरवर्षी काही ना काही मोठी अडचण समोर येऊन ठाकायची. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी मुंबई बॉम्बस्फोट, यांसारख्या घटनांमुळे बाहेर विक्रीसाठी माल पाठवायला खूप अडचणी यायच्या. तीन ते चार वर्ष सारख्या अडचणींना तोंड द्यावे लागले. एक वेळ तर अशी आली की तीन रुपये प्रमाणे द्राक्षं विकावी लागली. खूप नुकसान सोसावे लागले. अशा प्रकारे ९६-९७ पर्यंत सातत्याने आम्ही अडचणींचा सामना केला”. कासार सांगत होते.








उसाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटलं होतं. खर्च खूप वाढला होता. खताचा वापर किती केला जात होता याचा काही हिशोब नव्हता, मातीचं परीक्षण केलं नव्हतं. नियोजनाचा अभाव होता. सारं काही अज्ञान होतं. संपूर्ण जमीन खराब झाली होती. जमिनीकडे फारच दुर्लक्ष झालं होतं. काहीतरी पर्याय शोधला पाहिजे म्हणून कासार आणि कुटुंबीय प्रयत्नशील होते. यावर त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार सुरू केला. नाशिकमध्ये अनेकांना हीच समस्या भेडसावत होती. काही सेंद्रिय जाणकार व्यक्तींच्या संपर्कात ते आले. कश्यप ग्रुपच्या पाळे सरांशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन करणाऱ्या तीन दिवसाच्या शिबिराला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेती करायचा निर्णय घेतला. कुटुंबातून खूप विरोध झाला, पण त्यांनी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी सेंद्रिय शेतीच करायची. त्यावेळी सेंद्रिय शेती ही संकल्पना नवीनच होती. त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. या पद्धतीने उत्पादन कसे मिळणार अशी लोकांत चर्चा होती. कासार यांनी मात्र निष्ठेने कामाला सुरवात केली.





“जमिनीच्या सेंद्रिय कर्वाच प्रमाण वाढवणं खूप गरजेचं होतं. बुरशीनाशकासाठी काय करायचं, खतासाठी काय पर्याय वापरायचा. जीवामृताचा वापर कसा करायचा. या साऱ्या गोष्टीचं ज्ञानच नव्हतं. मग मी योगेश्वर ग्रुपच्या माझ्या मित्रांना विचारायचो आणि त्याप्रमाणे कृती करायचो. मजुरांचा वापर न करता कामं केली. त्यानंतर पिकामध्ये फेरफार करणे गरजेचे होते. द्राक्ष या पिकामध्ये फेरफार करणे शक्य नव्हते. आम्ही सर्वप्रथम जमीनच्या सेंद्रिय कर्वाचे प्रमाण वाढवण्यास भर दिला. त्यावेळी सेंद्रिय कर्वाचं प्रमाण ०.३५ इतकं कमी झालं होतं. म्हणजे जमीन जवळजवळ नापीकच झाली होती. त्यानंतर एकदल द्विदल धान्य पेरून, ते कापून पुन्हा जमीन टाकायचो. अशा पद्धतीने चार वर्षात आमच्या जमिनीच्या सेंद्रिय कर्वाचे प्रमाण २.५ इतके झाले. त्यावेळी आर्थिक गणित फारच विस्कळीत झालं होतं पूर्णतः तोटा सहन करावा लागला होता. मात्र जमिनीचा पोत सुधारला यातच आम्हाला आनंद होता, समाधान वाटत होते. सुरवातीला एक- दोन वर्षे उत्पादन जेमतेम होते. परंतु सततच्या प्रयत्नाने त्यात यश येत गेले. जमिनीची सुपीकता वाढत गेली. उत्पादनात वाढ होऊ लागली.

त्यावेळी सेंद्रिय शेतीतून येणाऱ्या द्राक्षाचा आकार हा केवळ १२ किवा १३ मि.मी. असायचा, तर रासायनिक शेतीतून येणाऱ्या द्राक्षाचा आकार हा १८ ते २१ मि.मी. असतो, ज्याची लोकांना सवय झाली आहे. त्यामुळे आम्ही उत्पादित केलेली द्राक्षं कोणी विकत घेईना, म्हणून मग आम्ही ती फुकट वाटली. काहीना भेट म्हणून दिली, जेणेकरून लोक चव चाखून पुढील वर्षी द्राक्षं आमच्याकडून घेतील. आर्थिक तोटा सहन केला मात्र आम्ही जिद्द सोडली नाही. नैसर्गिक खतांचा आणि बुरशीनाशकाचा वापर केला. गोमुत्र, शेणखत आणि गाईच्या दुधाचा देखील बुरशीनाशक म्हणून वापर केला. सेंद्रिय शेती करत असताना त्यांचा रासायनिक कीटकनाशकांवर करावयाचा खर्च पूर्णपणे वाचला होता.





दुसऱ्या वर्षी कासार यांच्या द्राक्षाला चांगली मागणी आली. त्यानंतर त्यांनी नैसर्गिक पद्धतीने सूर्यप्रकाशात मनुकादेखील तयार केला. तयार झालेले द्राक्ष निर्यात करण्याचे ठरवले. २००९मध्ये ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या द्राक्षांच्या पानांचे आणि देठांचे नमुने तपासणीसाठी केंब्रिजच्या लॅबमध्ये पाठवले होते. त्यावेळी सगळ्यांचे नमुने रिजेक्ट झाले फक्त कासार यांच्याच नमुन्यांना मान्यता मिळाली, ज्यामध्ये ४५७ प्रकारचे विश्लेषण करण्यात आले होते. भारतामध्ये फक्त ९७ प्रकारची विश्लेषण पद्धती आहे. ज्यानुसार सेंद्रिय शेतीचे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. कासार यांनी हॉलंडच्या एका ग्राहकाशी करार केला होता. तिथल्या एका सुपरमार्केटमध्ये त्यांची द्राक्षं विक्रीसाठी ठेवण्यात येणार होती. मात्र तिथे सर्वात मोठी अडचण आली ती म्हणजे मागणी तेवढा पुरवठा करणे त्यांना शक्य नव्हते. कारण इतर शेतकऱ्यांची द्राक्षं नाकरली गेली होती. त्यामुळे मग त्यांचीही निर्यात थांबली, त्यांना तोटा सहन करावा लागणार होता. मात्र समोरील ग्राहकाने वास्तव समजून घेऊन कासार यांच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले. आणि सांगितले की, “तुम्ही सेंद्रिय पद्धतीनेच शेती करा”.

“सेंद्रिय शेती करताना उत्पादन खर्च फारच कमी होता. मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या द्राक्षाला अपेक्षित किमत मिळायची नाही, निसर्ग आणि वातावरण पाहून फारच काळजी घ्यावी लागायची. डोक्यावर सारखी टांगती तलवार असायची त्यामुळे मग द्राक्ष घेणे बंद केले” कासार सांगतात. एवढे नुकसान सोसूनसुद्धा रासायनिक शेती करायची नाही यावर मात्र ते ठाम होते. कारण कीटकनाशकांचा वापर करताना आरोग्यावर काय परिणाम होतात याची त्यांना जाणीव होती. ते सांगतात, “खरं तर चांगलं खाण्याची लोकांची मानसिकताच राहिली नाही. कमीत कमी किमतीत लोकांना चांगले चकचकीत दिसणारे उत्पादन हवे असते. ते विकत घेत असलेला माल कुठे आणि कसा तयार झाला हे जाणून घ्यायची तसदी सुद्धा ते घेत नाही”.





सेंद्रिय शेतीमध्ये फायदा होतो का ? असे विचारले असता कासार सांगतात की,

“ फायदा होतोच ना ! उत्पादन घेताना फारसा खर्च करावा लागत नाही, महागड्या रासायनिक खतांवर आणि कीटकनाशकांवर खर्च करावा लागत नाही. रासायनिक शेतीच्या तुलनेत भरघोस उत्पन्न जरी नाही मिळाले तरी जे उत्पन्न येते ते खऱ्या अर्थाने आरोग्यास लाभदायक असते. ज्याची तुलना भरघोस होणाऱ्या नफ्यामध्ये केली जाऊ शकत नाही. आपण लोकांना विषारी नाही तर सकस धान्य पुरवठा करत आहोत याचे आत्मिक समाधान वाटते. प्रत्येक शेतकऱ्याने याविषयीचे सामाजिक भान कुठेतरी जपले पाहिजे अशी माझी सर्व शेतकरी बंधूना कळकळीची विनंती आहे.”

कासार यांच्या सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये -


-सन १९९८ पासून संपूर्ण सेंद्रिय शेती. तेव्हापासून रासायनिक घटकांचा अंशदेखील शेतात वापरलेला नाही.
-देशी गाईंचे शेण, दुध, तूप, गोमूत्र, दशपर्णी अर्क, जिवामृत, जिवाणूखते आदींचा वापर
-देशी गाईंचे संगोपन, त्यांच्या शेणखताचा वापर.
-सेंद्रिय कर्ब २.५ टक्का.
-पिकांचा पालापाचोळा जागेवरच कुजवला जातो.



सध्या कासार यांच्या शेतात डाळिंबे. पेरू, टमाटे तसेच भाजीपाला लावला आहे. गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या मालाला चांगली मागणी आहे. लोकांना अलीकडे सेंद्रिय शेतीचे महत्व समजू लागले आहे. सेंद्रिय मालाला दरही थोडा जास्त मिळत असल्याने तेथे फायदा होतो. सेंद्रिय पद्धतीत जमिनीची सुपीकता मात्र कायम वाढतच जाते. 




















by- //marathi.yourstory.com/

माझ्याबद्दल