बुधवार, १ मार्च, २०१७

शंभर नंबरी सोनं ...


जोहान्सबर्गच्या गोल्डरिफ सिटीमध्ये खाणीतून सोनं कसं काढलं जातं याचं प्रात्यक्षिक बघून झाल्यावर तो गाईड म्हणाला, ‘ही वीट एका हाताने उचलता येत असेल तर उचलून घेऊन जा.’ ती वीट सरकवणंही कठीण होतं.



ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे?
फ्रान्सचा राजा तिसऱ्या नेपोलियनची ही गोष्ट आहे. त्याने शाही जेवण दिलं की तो त्याच्या खास पाहुण्यांना अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ात जेवण द्यायचा आणि जी सामान्य माणसं असत, ती सोन्याच्या ताटात जेवत.
त्याचं कारण?
तो वेडा होता? मुळीच नाही. लहरी? नाही हो नाही. मग खास पाहुण्यांना अ‍ॅल्युमिनियम आणि सामान्यांना सोनं? कारण त्या काळात अ‍ॅल्युमिनियम सोन्यापेक्षा महाग होतं. अ‍ॅल्युमिनियम खाणीतून काढणे त्यावेळी प्रचंड महाग होतं. सोन्याने धातूंमधलं शहेनशहापद सोडल्याचा तो एकुलता एक काळ असेल. एरवी सोनं हा नेहमीच धातूंचा राजा ठरलाय.
सोनं हे नेहमीच इतिहासपूर्व काळापासून आहे आणि देवाचं अस्तित्व जसं जगातल्या प्रत्येक देशात आणि धर्मात आहे तसंच सोन्याचं आहे. जगातल्या सर्व जुन्या संस्कृतीत सोनं सापडतं. लहानपणी पाठय़पुस्तकातलं, ‘भारतातून सोन्याचा धूर निघायचा’ हे वाक्य मला तोंडपाठ होतं. पण ती परिस्थिती आता दहा ग्रॅम सोनं घेताना, आता पैशाचा धूर निघतो, इतपत बदलली आहे. त्याकाळी जी भारतात परिस्थिती होती तीच इजिप्तमध्ये असावी. कारण इ.स.पूर्व २६०० साली इजिप्तमध्ये एक राजा होता. त्याचं नाव होतं तुश्रत. तो म्हणायचा, ‘‘माझ्या राज्यात सोनं घाणीपेक्षा जास्त आहे.’’ जवळपास बत्तीस हजार रुपये मोजून जेमतेम दहा ग्रॅम सोनं घेणाऱ्या माझ्या मित्रांनो हा किस्साही ऐकाच. आफ्रिकेत माली साम्राज्य होतं. त्यांचा राजा होता मानसामुसा. त्याचा काळ इ.स. १३१२ ते १३३७ वगैरे! तो सोनं फक्त जेवत नसावा, एरवी सोन्यात लोळायचा. तो १३२४ साली हज यात्रेसाठी मक्केला जायला निघाला. त्याच्या काफिल्यात शेकडो उंट आणि हजारो माणसं होती. १३२४ च्या जुलैमध्ये त्याचा काफिला कैरोला पोहचला. कैरोत त्याने इतकं सोनं वाटलं की इजिप्तमध्ये पुढच्या दहा वर्षांसाठी सोन्याचे भाव कमी झाले. एका अरब इतिहासकाराने लिहून ठेवलंय. ‘‘तो राजा कैरोत येईपर्यंत इजिप्तमध्ये सोन्याचे भाव जास्त होते. 
२५ दिरहॅमच्याखाली ते कधी आलेच नाहीत. तो राजा आला. त्याने सोनं वाटलं आणि तिथपासून आजपर्यंत सोन्याचे भाव २२ दिरहॅमच्या वर कधी गेलेच नाहीत. आज बारा वर्षे झाली त्या गोष्टीला! म्हणजे किती सोनं वाटलं असेल याचा विचार करा.’’
विद्यार्थिदशेत असताना माझा आणि सोन्याचा संबंध रसायनशास्त्रात आला. आता मी रसायनशास्त्र जवळजवळ विसरलोय. त्यातल्या तीन-चार गोष्टी लक्षात आहेत, त्यात आहे, एक म्हणजे ‘मिथाईल अल्कोहोल’ ही गोष्ट. सर्वात सुंदर मुलीच्या प्रेमात पडलेला माणूस तिला आयुष्यात विसरत नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात राहिली, ती म्हणजे सोनं हे अ‍ॅक्वाहेजियामध्ये विरघळतं. कदाचित आपण आयुष्यभर सोनं विसरत नाही. त्यामुळे असेल, ही गोष्ट मी अजिबात विसरलो नाही. अ‍ॅक्वाहेजिया म्हणजे नायट्रो-हाड्रॉक्लोरिक अ‍ॅसिड! नाही.. उगाच माझ्या स्मरणशक्तीला दाद देऊ नका. हे माझ्या लक्षात नव्हतं. ते केमिस्ट्रीत करिअर करणाऱ्या माझ्या चिरंजीवाने मला सांगितलं. खरं तर आठवण करून दिली आणि त्याचबरोबर एक गोष्ट मला कळली की ‘अ‍ॅसिड टेस्ट’ (Acid Test) हा शब्द कुठून आला? मी किती वेळा तरी त्या शब्दांचा उपयोग केलाय. सोनं कुठल्याही वैयक्तिक अ‍ॅसिडमध्ये विरघळत नाही. उदा. चांदी नायट्रिक अ‍ॅसिडमध्ये विरघळते किंवा इतर मूलभूत धातू विरघळतात. त्याप्रमाणे सोनं विरघळत नाही. त्यामुळे सोन्याची कसोटी अ‍ॅसिडने घेता येते. म्हणून ‘अ‍ॅसिड टेस्ट’ हा शब्द आला.
फक्त अ‍ॅसिड टेस्टच नाही, सोन्याने आपल्या भाषेच्या शब्दभांडारात खूप भर टाकलीय. राज्य, पराक्रम, ताकद, श्रीमंती, प्रेम, आशा, आनंद, बुद्धिमत्ता, न्याय, समतोल, अचूकता वगैरे सर्व गोष्टींसाठी सोन्याचा उपयोग केला जातो. त्याची सुरुवात लहानपणापासून होते. आई आपल्याला ‘सोन्या’ अशी हाक मारते. गुणवत्तेप्रमाणे आईने मला, ए तांब्या किंवा ए पितळ्या म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण आईचं हृदय वेगळं असतं आणि पुढे मी लेखक झाल्यावर शब्दातून सोनं मी प्रचंड
उधळलं. लेखक, त्यात पुन्हा मराठी लेखक त्यापेक्षा जास्त काय करू शकतो? हिरा कदाचित सोन्यापेक्षा जास्त महागडा असेल, पण कुठल्याही भावनेतला सर्वोच्च आविष्कार व्यक्त करायला सोनं हाच शब्द वापरला जातो. उदा. १९५० ते १९६० हे हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णयुग होतं असं आपण म्हणतो. हीरकयुग वगैरे नाही. हिऱ्याची उपमा द्यायची असेल तर थेट कोहिनूर हिऱ्याची देतो. कारण कोहिनूर हिरा आपल्याकडे होता, म्हणून कोहिनूर आपल्याला सर्वश्रेष्ठ वाटतो (आणि तसं काही नाहीय) अजून एक गोष्ट म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे, असं किती वेळा आपण म्हणत असतो? (मी बायकोबद्दल आणि बायकोने माझ्याबद्दल असं म्हणावं अशी दोघांची अपेक्षा असते. पण दोघांनाही खोटं बोलायची सवय नसल्यामुळे आम्ही बोलत नाही.) सोनेरी क्षण, सोनियाचा दिवस, सुवर्णमध्य वगैरे शब्दप्रयोग आपल्या नेहमीच्या बोलण्यात आपण वारंवार करतो. कारण पिढय़ान्पिढय़ा हे शब्दप्रयोग आपल्या जिभेवर ठाण मांडून आहेत. सोन्याचा आपला सोस हा असा आहे. आणि प्रत्यक्ष सोन्यापेक्षा सोनेरी शब्द नेहमीच परवडतात.
सोनं वाढलं तरी आपली दागिन्यांची हौस कमी होत नाही. भारताची लोकसंख्या जास्त म्हणून वापर जास्त! हे अर्थसत्य आहे. चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त. तरीही २०१० साली त्यांनी फक्त ४२८ टन सोनं वापरलं.
मी लहानपणापासून फारसं सोनं कधी अंगावर घातलेलं नाही. परवडलं नाही, हे एक कारण आणि अतिदागिन्यांचा सोस मला नाही. लहानपणी इतर मुलं सोन्याची अंगठी घालत तेव्हा मीसुद्धा सतत अंगठी घालावी असं मला वाटे. माझ्या आईने माझ्यासाठी केलेली छोटी अंगठी होती. लग्नकार्यात ती अंगठी आई माझ्या बोटात घालायची. मग काढून ठेवायची. माझा एक मित्र सतत सोन्याची अंगठी घालायचा. मी आईकडे हट्ट धरला की ती कठोरपणे नाही म्हणायची. मी एकदा आईला म्हटलं, ‘‘सोन्याची अंगठी खूप महाग असते. मी ती हरवेन म्हणून तू मला घालायला देत नाहीस ना?’’ आई म्हणाली, ‘‘नाही रे सोन्या, मला अंगठीची किंमत नाहीए. ती अंगठी चोरण्यासाठी कुणी तुझं बोट कापू नये एवढीच माझी चिंता आहे.’’ सानेगुरुजींचं ‘श्यामची आई’ वाचण्याचे ते दिवस होते. आपली आईही ‘‘बाळ तुला लागलं तर नाही ना?’’ म्हणणाऱ्या साने गुरुजींच्या आईएवढीच हळवी आहे असं मला वाटलं. माझ्या नावाची अक्षरं कोरलेली एक गळ्यातली माळ आणि मनात असलेलं एक ब्रेसलेट सोडलं, तर आणखीन कुठलाही सोन्याचा दागिना मला शरीरावर नकोसा असतो. अगदी अंगठीसुद्धा. पण आपल्या देशात सोन्याचा दागिन्यासाठी उपयोग जेवढा होतो तेवढा कुठेच होत नाही. सर्वसाधारणपणे जे नवीन सोनं तयार होतं त्यातलं ५० टक्के सोनं दागिन्यांसाठी वापरलं जातं. ४० टक्के विविध बचतीसाठी आणि १० टक्के इंडस्ट्रीमध्ये! आणि त्या दागिन्यांपैकी सर्वाधिक भारतात वापरले जातात. २००९ साली दागिन्यांसाठी ४४२.३७ टन सोनं वापरलं गेलं. तर २०१० साली दागिन्यांसाठी वापरलेलं सोनं ७४५.७० टन झालं. म्हणजे थेट ६९ टक्क्यांची वाढ आणि त्याच वेळी सोन्याचे भाव किती वाढले विचार करा. थोडक्यात सोनं वाढलं तरी आपली दागिन्यांची हौस कमी होत नाही. तुम्ही म्हणाल, भारताची लोकसंख्या जास्त म्हणून वापर जास्त! हे अर्थसत्य आहे. चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त. त्यांची संस्कृतीसुद्धा पौर्वात्य! तरीही २०१० साली त्यांनी फक्त ४२८ टन सोनं वापरलं. चीनला आपण कशात तरी मागे टाकलंय, याचा मला आनंद झाला. आजपर्यंत जगात (२००९ पर्यंत) १,६५,००० टन सोनं खाणीतून बाहेर काढण्यात आलं. ते घनमीटरमध्ये साधारण ८५०० घनमीटर बसतं. थोडक्यात या सोन्याचा २०.४ मीटर लांबी-रुंदी-उंचीचा एक क्युब तयार करता आला असता. गंमत अशी आहे की पूर्वी सोन्याचा धूर निघत होता किंवा इजिप्तमध्ये सोनं घाणीपेक्षा मुबलक होतं वगैरे म्हटलं जायचं तरी आजपर्यंत ७५ टक्के सोनं हे १९१० नंतर खाणीतून बाहेर काढण्यात आलं. म्हणजे साधारण ८००० घनमीटरचं सोनं. त्याचं कारण असं आहे की आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोनं काढणं जास्त सोपं झालं. मी दगडातलं सोनं पाहिलंय. होय, मी सोन्याची खाण पाहून आलोय. जोहान्सबर्गच्या गोल्डरिफ सिटीमध्ये! जोहान्सबर्ग हे अख्खं शहर ही सोन्याची खाण होती. जगाला जितकं सोनं आजपर्यंत मिळालं, त्यातलं पन्नास टक्के सोनं दक्षिण आफ्रिकेतून मिळालं. १९७० साली, जेवढं सोनं जगात काढण्यात आलं, त्यातलं ७९ टक्के दक्षिण आफ्रिकेतून आलं. म्हणजे याला सिंहाचा वाटा किंवा ‘सोन्याचा’ वाटा म्हणायला हरकत नाही. २००७ साली फक्त दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त सोनं चीनमधून निघालं. २७६ टन सोनं! सोनं काढण्याच्या बाबतीत कुणीतरी दक्षिण आफ्रिकेला मागे टाकण्याचा प्रसंग १९०५ नंतर पहिल्यांदा आला. पुन्हा २००८ साली दक्षिण आफ्रिकेतून २२६० टन सोनं काढण्यात आलं. तर अशा दक्षिण आफ्रिकेतली एक खाण मी पाहिली. देवाने अरबस्तानातल्या अरबांना ‘तेल’ नावाचं काळं सोनं दिलं आणि दक्षिण आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांना पिवळं सोनं, पण या दोघांनाही, त्यांना देवाने दिलेल्या नैवेद्याची माहिती नव्हती. देवाने गोऱ्यांना फक्त बर्फ दिला. पण त्याचबरोबर दूरदृष्टी दिली. त्यांनी तेल शोधलं. त्यांनी सोनं उपसलं. अरब श्रीमंत तरी झाले. कृष्णवर्णीयांनी फक्त कष्ट उपसले. सोन्यासाठी गोरे दक्षिण आफ्रिकेत एकमेकाशी भांडले. ब्रिटिश आणि बोअर्समध्ये युद्ध झालं. सोन्याची खाण पाहण्यासाठी मी दोनशे फूट जमिनीच्या पोटात गेलो. तिथे तो सोनं सापडणारा दगड पाहिला. एक टन दगडातून फक्त एक पौंड किमतीचं (त्यावेळचा एक पौंड) सोनं निघायचं. पण तिथे जाऊन आल्यावर मला अजि म्या ब्रह्म पाहिले असं वाटलं नाही. मी शंभर र्वष मागे जाऊन विचार केला. त्यावेळी आजचं आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं. किती काळे मजूर आत तडफडले असतील. प्राणवायू कमी आणि प्रचंड दगड तोडून वाहायचे. माणूस दमला की चाबकाचे फटके खायचे. खाणकामगारांना मायनर्स रोग व्हायचा. त्यातून वाचणं ही दैवीकृपा असायची. दगडातलं सोनं त्या कृष्णवर्णीय मजुरांसारखं असतं. हेच पुढे चमकतं यावर विश्वास बसत नाही. तेव्हा कळलं की जे चमकत नाही, ते सोनं नसतंच असं नाही. सामान्य डोळ्यांना कुठला साधा दगड आणि कुठला पोटी सोनं असलेला गर्भार दगड ते कळत नाही. त्या खाणीतून बाहेर आल्यावर आम्हाला त्या दगडातून सोनं कसं मिळवतात ते प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. कित्येक टन दगडांतून एक वीट तयार होते. प्रात्यक्षिकानंतर तिथला गाईड म्हणाला, ‘ही वीट एका हाताने उचलता येत असेल, तर उचलून घेऊन जा.’ ती वीट सरकवणंही कठीण होतं. मी प्रयत्न सोडला.
माझ्या लक्षात आलं की आपल्यासाठी सोन्यासारखे शब्दभांडार हेच खरं सोनं आहे. पैशाच्या बाजारात नसेल त्याची किंमत. पण शाब्दिक अलंकार जर वाचकांना चार क्षण आनंद देत असतील तर माझ्यासारख्या लेखकांसाठी तेच खरं सोनं आहे. अगदी शंभर नंबरी सोनं!

























द्वारकानाथ संझगिरी
response.lokprabha@expressindia.com

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

निसर्गच माझा गुरू!...



निसर्गात सारे काही ज्ञान आहे, पण गरज आहे निसर्गाची भाषा अवगत करण्याची. निसर्गाचे संकेत जाणण्याची. एकदा का ही भाषा, हे संकेत समजले, की निसर्गाशी संवाद साधताना एक वेगळाच आनंद मिळतो. निसर्ग मग भरभरून देतो. हे खरे म्हणजे शब्दांत सांगणे अवघड आहे. निसर्गाचे ज्ञान अनुभवणे काही वेगळेच आहे. निसर्गातील या ज्ञानसंपत्तीचा अभ्यास करत स्वत: सेंद्रिय शेतीचे प्रयोग यशस्वी करून आता महाराष्ट्रासह इतरही राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणारे सुभाष शर्मा यांचा हा निसर्गप्रवास...

विदर्भात सेंद्रिय शेतीत सोनं पिकविण्याचा मान मिळतो तो यवतमाळच्या सुभाष शर्मा यांना. केवळ स्वतःचीच शेती विकसित न करता हजारो शेतकऱ्यांना त्यांनी सेंद्रिय शेतीच्या विकासाचे धडे दिले आहेत. आज त्यांच्या पुढाकाराने उत्तरांचलमधील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतो आहे. स्वतःच्या शेतीत रमून शर्मा आता उत्तरांचलकडे लक्ष ठेवतात. त्यांना खंत एकच आहे, विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या शेतीकडे का वळत नाही? हे चित्र बदलण्याचा ध्यास त्यांनी बाळगला आहे.

आपल्या या प्रवासाबाबत ते सांगतात, मी शेतीत रमायला सुरवात केली ती 1975पासून. तेव्हापासून आजतागायत शेतीत दोन प्रकारचे विज्ञान पाहायला मिळाले. दोन्ही प्रकारच्या विज्ञानाची माहिती निसर्गाकडून मिळाली. 1994नंतर "निसर्ग' हाच माझा गुरू झाला. या गुरूने शेतीत एक विज्ञान विनाशाचे चित्र दाखविले अन्‌ दुसरे विज्ञान निर्माणीचे.

विनाशाचे विज्ञानाचे आलेले अनुभव स्पष्ट करताना ते म्हणतात, मी सन 1975पासून रासायनिक शेतीची सुरवात केली. या शेती पद्धतीचा एकच विचार होता की उत्पादन वाढलं की प्रगती होते आणि या दिशेने माझा शेतीचा प्रवास सुरू होता. प्रारंभी उत्पादनाचे उच्चांक वाढले. पण हळूहळू 1986नंतर उत्पादन कमी मिळत गेले. हे उत्पादन वाढविण्यासाठी अधिक खर्च करणे सुरू केले. उत्पादकता वाढत गेली. पण खर्चही वाढत गेला. नफा दुर्मिळ होत गेला. 1988 ते 1994पर्यंत रोग-किडी, नैसर्गिक आपत्तीचे खर्च वाढले. उत्पादन मिळत नाही म्हणून कर्ज उभे झाले, मानसिक विकृती निर्माण झाली. चांगले, वाईट काहीच कळेना. 1990 ते 1994 हा काळ माझ्यासाठी त्रासदायक होता. पण चिंतनही चालू होते. मी श्रमाची पराकाष्ठा करतो आहे. श्रमामागे प्रगती होते, ही म्हण कायम चुकीची आहे. याचे विश्‍लेषण करत असताना मग शेतीची दुसरी पद्धत असू शकते का? शाश्‍वत शेती करता येईल का? कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्‍य आहे का? अशा प्रश्‍नांचं जंजाळ मनात तयार झालं होतं.

या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरं दोन व्यक्तींच्या कार्यानं मिळाल्याचं श्री. शर्मा स्पष्ट करतात. निसर्गशेतीचा विचार प्रत्यक्षात उतरवणारे मासानोबू फुकुओका आणि भास्कर सावे. त्यांच्या शेतीत खर्च कमी आहे, पण शेतीची उत्पादकता चांगली आहे. त्यांची शेती कधी बघितली नव्हती. पण अनेकांच्या तोंडून त्यांची स्तुती ऐकली होती. नंतर मनाशी ठरवून टाकले. जर जगातील एक व्यक्तीही नैसर्गिक शेतीत यशस्वी होत असेल तर ती शक्ती माझ्यातही आहे. माझ्या शक्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्ती इतर शेतकऱ्यांमध्ये आहे. नंतर आपण स्वतःच्या दिशेत परिवर्तन केले पाहिजे. हे ठर,वून श्री. शर्मा यांनी 1994पासून नैसर्गिक शेतीची सुरवात केली. तेव्हा निसर्ग माझा गुरू झाल्याचे श्री. शर्मा नमूद करतात.

या निसर्गगुरूने शेतीतली आव्हानं लक्षात आणून दिली. रासायनिक शेती, माती, पाणी, तापमान, मानवी (संपूर्ण सजीवांचा आरोग्याला धोका), वाढते खर्च, कमी होणारे उत्पादन. पाचही आव्हानांपैकी चौथे आव्हान औद्योगिक प्रगती आणि रासायनिक शेती. या सगळ्यांना रासायनिक शेती कारणीभूत ठरत होती. रासायनिक शेतीचे एकमेव लक्ष म्हणजे उत्पादन वाढ. पण माती, पाणी, सजीवांच्या आरोग्याचा विचार कुणीच करीत नाही. कारण जमिनीत छिद्र होत नाही, पावसाचे पाणी वरून वाहून जाते, सोबत मातीही वाहून जाते. माती निर्जीव होते. पाण्यातही विषाचे प्रमाण वाढत जाते, प्रत्येक पिकांवर विषारी फवारण्या होतात आणि ते लगेच बाजारात विक्रीला येते. कोणतेच मापदंड नसतात. थोडक्‍यात रासायनिक शेतीचे धोके सगळ्यांना माहीत आहेत, म्हणून शेतीत परिवर्तन घडवून आणण्याशिवाय आता मार्ग नाही. कारण या शेती पद्धतीत कुणासोबतही प्रेमाचे नाते राहत नाही. फक्त पैसा कसा जास्त येईल, याचा विचार असतो आणि तो येत नाही. उरावर फक्त कर्ज उभे राहते. या शेती पद्धतीत जिवाणू, गांडूळ, मुंग्या, वाळवी, शत्रू कीड, पाखरे, झाड माती, पाणी, बियाणे, मानवी आरोग्य आदी सगळ्यांनाच नष्ट करण्याचाच विचार असतो. कोणावरही प्रेम राहत नाही. हे मला निसर्गाने शिकवले. म्हणून याला मी विनाशक विज्ञान म्हणतो आणि या विज्ञानाला वाढविण्याचे काम व्यापारातून होत आहे. त्यांच्यासाठी शेतकरी जगला की मेला, याचे काही देणेघेणे नसते.

निर्माणीचे विज्ञान
1994पासून श्री. शर्मा यांनी निर्माणीच्या विज्ञानाला प्रारंभ केला. हयाबाबत सांगताना ते म्हणाले, की ळूहळू निसर्गाने मला अनेक महत्त्वाचे प्रयोग लक्षात आणून दिले आणि या प्रयोगातून तीन तत्त्व दिली. 1) ज्ञान 2) योजकता 3) श्रम. ही शक्ती शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिली. 1) माती (आई) 2) पाणी, 3) बियाणे 4) पीक नियोजन 5) श्रमशास्त्र या पाच शक्ती एकदा शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या की नैसर्गिक शेतीचे विज्ञान सोपे होईल. शिवाय आव्हाने संपुष्टात येतील.

1) माती (आई)- आई शक्तिशाली होते ती चार बाबींतून 1) गाय, 2) वृक्ष, 3) पाखरं, 4) अवशेष.

गाय - गाईच्या संगोपनातून गो संजीवन आणि शेणखत मोठ्या प्रमाणावर मिळते. 1994ला गोसंजीवक तयार केलं. त्याला वेगवेगळ्या मोजमापातून उपयोग करून पाहिले. शेवटी काही वर्षांनंतर एक योग्य माप तयार झाले. शंभर लिटर पाण्यामध्ये 30 किलो गाईचे ताजे शेण, तीन लिटर गोमूत्र, अर्धा किलो गूळ सिमेंटच्या टाकीत किंवा आपल्या सोयीनुसार कोणत्याही उपकरणात दहा दिवस कुजवून उपयोगात आणलं. संजीवकांचा वापर पहिल्या वर्षी हजार लिटर, दुसऱ्या वर्षी आठशे लिटर, तिसऱ्या वर्षी सहाशे लिटर असे दिले. चौथ्या वर्षी संजीवकांतून गोमूत्र बंद केले आणि फक्त शेण आणि गूळ वापरले चारशे लिटर. पाचव्या वर्षी दोनशे लिटर एकरी वापरले. नंतर संजीवकाच्या उपयोगाची आवश्‍यकता भासली नाही. मात्र जेवढं शेणखत तयार होते, त्याचा वापर होत राहतो.

वृक्ष - 1994ला वाचलं होतं, तापमानामुळे वातावरणात भविष्यात प्रचंड बदल होईल. याचा परिणाम शेती उत्पादनावर होईल. हे वाचून लक्ष वृक्षांवर गेलं. शेतीत मोठ्या प्रमाणावर झाडं लावली. झाडं मोठी झाल्यावर लक्षात आलं की झाडांमुळं शेताचं उत्पादन वाढतंय. शेतातलं तापमान नियंत्रणात आलं. जीवजिवाणूंची, मित्रकिडींची संख्या वाढली. वृक्षांपासून पानांच्या स्वरूपात खतही मिळतं. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांची लागवड कशी करावी, हे लक्षात आलं.

पाखरं - वृक्षाची संख्या जसजशी वाढत जाते, वृक्ष मोठे होत गेले की पाखरांची संख्या वाढत जाते. नंतर हीच पाखरं किडींचे नियंत्रण करून पोट भरतात. पोट भरलं की विष्ठेच्या स्वरूपात वर्षभर खत टाकत राहतात. या सहकार्याने उत्पादकता वाढत राहते.

अवशेष - वर्षातून एकदा एक पीक आईसाठी म्हणजे अवशेष निर्माण करण्यासाठी घ्यावं. आईबरोबर प्रेमाचं नातं तयार होतं. पिकात निघालेलं तण अवशेषांच्या स्वरूपात वापरावं. त्यामुळं मातीची (आई) सुपीकता वाढत जाते. आईला शक्तिशाली करण्यासाठी या बाबींची उपयोगिता लक्षात आल्यावर खरा देव कुठं आहे, हे लक्षात आलं आणि देवाची पूजा का करावी, ही पूजा होते कशी, हे लक्षात आलं. आपण तीर्थयात्रेला जाऊ शकलो नाही तर तीर्थ शेतातच निर्माण करावं. हे तीर्थ एक वृक्ष लावले तर एक धाम. चारही धामासाठी चार वृक्ष आणि 12 ज्योतिर्लिंगासाठी 12 वृक्ष. एका एकरात किमान चार वृक्ष असणं नैसर्गिक शेतीत आवश्‍यक आहे. मग पूजा म्हटली तर सगळ्या जीवजिवाणू, गांडूळ, मुंग्या, वाळवी, पाखरांच्या बरोबर प्रेमाचं नात ठेवूून त्यांना जगण्याचा अधिकार म्हणजेच पूजा.

पाणी - आईला शक्तिशाली करण्याची शक्ती म्हणजे पाणी. पावसाचे पडणारे पाणी शंभर टक्के शेतात अडविणे म्हणजेच पूजा होय. हे पाणी आम्ही
मायक्रोट्रेंच, ग्रीड लिंकिंग, नैसर्गिक शेती, शोष खड्डे, 80 फूट ट्रेंच पद्धतीने शंभर टक्के शेतात थांबवून मातीची धूप थांबवली.

बियाणे - बियाणं हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे. एकदा जातिवंत सरळ वाणाचं बियाणं तयार झालं की हेच बियाणं उभारी मिळवून देते. शेतीत जेव्हापासून व्यापाराचा शिरकाव झाला तेव्हापासून शेतकऱ्यांचा हा मूलभूत अधिकार हिरावून घेतला गेला आहे. म्हणून विज्ञानानेही अशा प्रकारचं बियाणे जास्तीत जास्त निर्माण केलं पाहिजे, जे की शेतकऱ्यांना त्याचा वापर स्वतःचंच बियाणं म्हणवून अनेक वर्षं वापरता येईल. या दिशेने काम झाले तरच ते खरे वैज्ञानिक ठरतील आणि शेतकऱ्यांची खरी शक्ती निर्माण होईल.

पीक नियोजन - शेतीत पिकांचे नियोजन करताना एक पीक आईसाठी घेतलंच पाहिजे. जसे सिंचनाची शेती असेल तर खरिपामध्ये मूग किंवा चवळी हे पीक झालं आईसाठी. दुसरं रब्बीमध्ये. मग या पिकांचे अवशेष शेतात दाबून नंतर पानकोबी, फुलकोबी, गहू, कांदा अशा प्रकारची अनेक पिकं आपण घेऊ शकतो. त्यामुळे पिकांचं भरीव उत्पादन आपल्याला मिळू शकतं. नैसर्गिक शेतीत दुसरं महत्त्वाचे आहे निसर्गाने ज्या पिकाला नैसर्गिक वेळ दिली आहे, त्या वेळी त्या पिकांचं उत्पादन घेतलं पाहिजे. उदा. फुलकोबीला निसर्गाने हिवाळ्याची वेळ दिली आहे, तर फुलकोबी हिवाळ्यातच घेतली पाहिजे. म्हणजे या पिकावर रोग-किडीही येत नाहीत. शिवाय उत्पादनही भरपूर मिळतं. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हे पीक घेऊ नये यासाठी आम्ही नैसर्गिक वेळापत्रक पिकांसाठी केले आहे. त्यात दोनशेच्या वर पिकांच्या साखळ्या तयार करता येतात. कोरडवाहू शेतीचेही अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत.

श्रमशास्त्र - श्रमशास्त्रात नांगरणी, निंदणी यांसारख्या प्रकारांत ज्ञानाने खर्च खूप कमी केला आहे. शेतीला चार प्रकारात वाटून दिले आहे आणि त्या प्रकारचे अनेक प्रयोग आम्ही करीत आहोत.
1) तीन एकराखालील कोरडवाहू शेती
2) तीन एकरापेक्षा जास्त शेती कोरडवाहू
3) तीन एकराखालील सिंचनाची शेती
4) तीन एकरापेक्षा जास्त सिंचनाची शेती
या सगळ्या प्रकारच्या शेतीत माती, पाणी, बियाणे पीक नियोजन साध्य केल्यामुळे उत्पादन वाढले म्हणून शेतात कष्ट करणाऱ्या सहकाऱ्यांना वर्षभर काम दिले, नफा झाला. त्यातून 25 टक्के बोनस, पर्यटन आदी सुविधा दिल्या. त्यामुळे शेतीचे अर्थशास्त्र तयार झालं. हे सगळं यश मिळाल्यावर शेतकऱ्यांना गटाने तीन तासाचे दररोज प्रबोधन करता आले. अनेकांना शेती दाखविली जाते, त्यामध्ये आम्ही शेतीचे पीक नियोजन पाण्याचे नियोजन, वृक्षाची शास्त्रीय लागवड पद्धत दाखवितो. आता यापुढे देशभर शेती पद्धतीसाठी शेतकऱ्यांना प्रबोधन आणि इतर राज्यात सेंद्रिय शेतीचे "मॉडेल' बनविण्याचे काम सुरू आहे.







: सुभाष शर्मा : 9422869620

By- agrowon 

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

मैत्र जीवांचे!

मैत्र जीवांचे!
राजकारणाच्या पलीकडच्या क्षेत्रातल्या कलावंतांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांना असलेला जिव्हाळा हा एक वेगळाच विषय आहे. सोबतच्या छायाचित्रांमधून त्यांच्या या मैत्रीचे प्रत्यंतर येते.










 
 

‘आडवं’ करणाऱ्यांनी सत्कारही केला


गिर्यारोहकांचा विरोध डावलून रायगडावर रोप वे बांधणारे बाळासाहेब.. आणि तेच गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करून आल्यावर त्यांचा मोठा सत्कार करणारे बाळासाहेब..
व्यंगचित्रकार, राजकारणी, वक्ते, मित्र.. वेगवेगळ्या लोकांच्या बोलण्यामधून, लिहिण्यामधून बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेकविध पैलूंचे, आठवणींचे दर्शन सध्या होते आहे. त्यातून दिसणारे या एकाच माणसाचे इतके पैलू, त्याच्या स्वभावाचे इतके बारकावे थक्क करायला लावणारे आहेत. आम्हाला गिर्यारोहणाच्या क्षेत्रात असणाऱ्यांनाही त्यांचे असे टोकाचे दोन पैलू पाहायला मिळाले की हाच का तो माणूस असावा का याचे आश्चर्य वाटावे. बाळासाहेब ठाकरे त्यांना न पटलेल्या एखाद्या मुद्दय़ावरून विरोध करायचे तेव्हा तो विरोध टोकाचा असायचा. पण हा विरोध तात्कालिक मुद्दय़ासाठी असायचा व्यक्तीसाठी नाही. त्यानंतर ते विरोध केलेल्या व्यक्तीचंदेखील कौतुक करायचे. प्रसंग होता ‘रायगड रोप वे’च्या बांधणीच्या वेळचा. बाळासाहेबांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पुढे आला होता. आम्हा गिर्यारोहकांचा त्याला विरोध होता. शिवप्रतिष्ठानचादेखील विरोध होता. आमचे म्हणणे असे होते की रोप वे झाला तर कोणीही गडावर जाईल, िधगाणा होईल, पिकनिक स्पॉट बनेल. गड पाहायचा तर तो डोंगर चढूनच जायला हवे, तेव्हा खरा किल्ला कळेल. किल्ले हे चढायला कष्टप्रदच असावेत, तरच इतिहास नीट समजू शकतो. पिकनिक स्पॉट होण्याइतका कोणताही किल्ला वर जायला सोपा होऊ नये, अशी आमची भूमिका होती. साबीरभाई शेख तेव्हा महासंघाचे अध्यक्ष होते. ते कट्टर शिवसनिक व सेनेतले पदाधिकारीदेखील होते. त्यांची खरे तर दोन्ही बाजूंनी अडचण होत होती. त्यांची बाळासाहेबांनी कदाचित कानउघाडणीदेखील केली असावी. गिर्यारोहकांच्या या सर्व हालचाली बाळासाहेबांना कळत होत्या. बाळासाहेब याबाबत आम्हाला थेट कधीच बोलले नाहीत पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. अपंग, वृद्धांना गड पाहता यावा, शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेता यावे या उद्देशाने रोप वे झालाच पाहिजे असे त्यांचे मत होते. उद्या माझ्यासारख्या कोणाला जर गडावर जायचे असेल तर त्याने काय कोणाच्या खांद्यावर बसून जायचे का, असे ते म्हणत. शेवटी त्यांनी रोप वे बांधलाच. पुढे गिर्यारोहकांचा विरोधदेखील कमी झाला. प्रसंग तसा विस्मृतीत गेलेला. १९९८ साली आम्ही महासंघाच्या माध्यमातून एव्हरेस्ट मोहिमेची तयारी सुरू होती. मी तेव्हा मोहिमेच्या मदतीसाठी त्यांना भेटायला गेलो. त्यांची हृदय शस्त्रक्रिया नुकतीच झाली होती. मला पाहून बाळासाहेब सोबतच्या लोकांना म्हणाले, ‘‘आम्ही अपंग, वृद्धांची सोय म्हणून रोप वे बांधत होतो. हे लोक विरोध करत होते. यांना आडवा करून मी रोप वे बांधलाच.’’ इतरही बोलणं झालं आणि एव्हरेस्टविषयी बघतो असे त्यांनी आम्हाला सांगितले आणि ती भेट संपली. पण बाळासाहेब असे भेटणाऱ्यांना विसरत नसत.
मे १९९८ मध्ये आम्ही एव्हरेस्ट सर केला. भारतातून यशस्वी झालेली ती पहिलीच नागरी मोहीम होती. तेव्हा युतीचे सरकार होते. बाळासाहेबांनी नवलकरांना आदेश दिला, या पोरांचा उभ्या भारतात कोणी केला नाही असा सत्कार झाला पाहिजे. मग संपूर्ण शासन हलले. रंगभवनमध्ये प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी भव्य सेट उभा केला. स्टेजला लागूनच त्यांनी चक्क एव्हरेस्टची प्रतिकृतीच उभी केली. त्यावर छोटे स्टेज बनवले. तेथे आम्ही बसलो होतो. त्या एव्हरेस्टवर बाळासाहेब आम्हा सर्वाचा सत्कार करणार होते. राज्याचे सारे मंत्रिमंडळ पहिल्या रांगेत होते, आयत्या वेळी बाळासाहेब येऊ शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. हा केवळ हारतुऱ्यांचा सत्कार नव्हता. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी आधी आश्वासन दिलेली पंचवीस लाखांची मदतदेखील त्याच कार्यक्रमात देण्यात आली. हे सारे बाळासाहेबांच्या आदेशामुळे झाले होते. आम्हाला आडवे करायला निघाले होते तेच बाळासाहेब आमचा सत्कार करायलादेखील तितकेच उत्साही कसे, हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही.
ते सोडवण्यापेक्षा त्यांचा विरोध आणि त्यांचं प्रेम या दोन्हीच्या ऋणातच राहावं हे उत्तम.














ऋषिकेश यादवresponse.lokprabha@expressindia.com

माझी पहिली मुलाखत..


बाळासाहेब ठाकरेंना भेटणं हा पत्रकारांसाठी वेगळा अनुभव असायचा. ‘सांज लोकसत्ता’ या लोकसत्ता परिवारातील सायं दैनिकाच्या तत्कालीन बातमीदाराचा हा अनुभव
तेव्हा मी ‘सांज लोकसत्ता’मध्ये होतो. १९९५ च्या निवडणुकीचा काळ होता तो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात सर्वत्र जोशात होता. मी राजकीय बातमीदारी करीत नसतानाही माझ्यावर बाळासाहेबांची मुलाखत घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली. सकाळची पाळी असताना मातोश्रीवर संपर्क साधून चार ते पाच वेळा बाळासाहेबांशी बोललो होतो. नुसता फोन केला तरी तेव्हा बाळासाहेबांना तो दिला जात होता. ‘सांज लोकसत्ता’तून फोन आहे म्हटल्यावर बाळासाहेब तो घ्यायचे आणि आम्हाला हमखास मथळा द्यायचे. त्याचप्रमाणे मी मुलाखतीसाठी वेळ मिळावा म्हणून बाळासाहेबांना फोन केला. ते लगेचच म्हणाले, ये रात्री आठ वाजता. मला तो सुखद धक्का होता. जानेवारीचा शेवटचा आठवडा होता. जुन्या मातोश्रीच्या तळमजल्यावरील खोलीत मी गेलो. बरोबर आठ वाजता मला बाळासाहेबांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. मनात धाकधूक होती. बस.. असे बाळासाहेबांनीच म्हटले. समोर ‘आफ्टरनून’चे संपादक व दिग्गज पत्रकार बेहराम कॉन्ट्रक्टर होते. त्यांच्याकडे पाहून बाळासाहेब म्हणाले, ‘तुला चालेल ना, हा असला तर..’
मी क्षणभर गोंधळलो आणि म्हणालो.. हो.. नक्कीच! (मी कोण नाही म्हणणारा.. पण बाळासाहेबांचा हा एक वेगळाच मूड मी अनुभवला.)
मुलाखतीची तयारी म्हणून मी माझ्याकडील टेपरेकॉर्डर बाहेर काढला. बेहरामजी एक नोटपॅड घेऊन सरसावले होते.. आणि मी नव्या पिढीतला पत्रकार मात्र इलेक्ट्रॉनिक साधनांवर अवलंबून होतो..
बेहरामजींनी मला विचारले की, तू रेकॉर्ड करून घेणार आहेस का? मी ‘हो’ म्हटले .. पर्सनल युझसाठी.. असे शब्द उच्चारताच बाळासाहेब ताडकन् म्हणाले, पर्सनल-बिर्सनल काही नसतं. पर्सनल असेल तर तो टेप बंद कर..
मी म्हणालो, नाही साहेब.. तुमची पहिल्यांदाच मुलाखत घेत आहे ना.. त्यामुळे कुठलीही चूक होऊ नये यासाठी काळजी घेतोय.. असे जरा घाबरतच म्हणालो.
‘ठीक आहे..’ असे म्हणत बाळासाहेबांच्या मुलाखतीला सुरुवात झाली. मी प्रश्नावलीच घेऊन बसलो होतो.. बेहरामजींनी मला इशारा केला की, मुलाखत सुरू कर..
तब्बल दोन तास बाळासाहेब विविध विषयांवर बोलत होते. रात्री आठ वाजता सुरूझालेली मुलाखत रंगत चालली होती. बेहरामजी मध्येच हळुवारपणे प्रश्न विचारीत होते.. मी विचारलेल्या प्रश्नांना जोडप्रश्नही विचारत होते.. एका दिग्गज पत्रकाराच्या उपस्थितीमुळे मला टेन्शनच आले होते.. माझा कुठला संदर्भ चुकला तर तो दुरुस्त करण्याचे काम बेहरामजी आवर्जून करीत होते.. मुलाखत संपली.. मला सहज खोकला आला.. बाळासाहेबांनी लगेचच त्यांच्याकडे असलेली ‘खो-गो’ची डबी मला दिली.. ही ठेव.. असे सांगितले. बाळासाहेबांनी दिलेली ती भेट कोण नाकारणार..
‘विधानभवनावर भगवा फडकणारच,’ अशी गर्जना करणारी घोषणा तेव्हा बाळासाहेबांनी केली होती. मला मथळा मिळाला होता. ४ फेब्रुवारी १९९५ च्या ‘सांज लोकसत्ता’मध्ये ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. ‘राज्य आमचेच येणार’, या मथळ्याने.. आणि काय आश्चर्य त्याच वेळी शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली.. बाळासाहेबांचा दुर्दम्य आत्मविश्वास मी स्वत: अनुभवला होता..
विशेष म्हणजे या मुलाखतीमुळे मी बेहरामजींच्या ‘बीझीबी’मध्येही झळकलो होतो.. त्यांनी माझी खूप स्तुती केली. नाव टाकले नसले तरी माझ्यासाठी तो सुखद धक्का होता.. परंतु मी त्यांना नीटपणे ओळखलेले असतानाही त्यांनी खोचकपणे मी त्यांना ओळखले नाही म्हणून ते दु:खी झाल्याचे का लिहिले, हे मात्र मला शेवटपर्यंत कळू शकले नाही













निशांत सरवणकर
nishant.sarvankar@expressindia.com.

खूप शिकायचे राहून गेले..


श्रद्धांजली

‘मार्मिक’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या साप्ताहिकाचे मुखपृष्ठ करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या, त्यानिमित्त त्यांना नियमित भेटणाऱ्या एका व्यंगचित्रकाराने रेखाटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे भावचित्र
बाळासाहेबांनी मराठी माणसाला व्यंगचित्र पाहायला, वाचायला शिकवले. चित्रकला पाहणे, अनुभवणे हेच जिथे आपले दिवास्वप्न होते, तिथे बाळासाहेबांनी व्यंगचित्राचे साप्ताहिक सुरू करून एक क्रांतिकारी पाऊलच टाकले होते.
बाळासाहेब नक्की कोण? राजकारणी की व्यंगचित्रकार? मला वाटते, व्यंगचित्रकला ही बाळासाहेबांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होती. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे या कलेची प्रेरणा होती.
बाळासाहेबांना एक व्यंगचित्रकार म्हणून जवळून पाहण्याचा योग गेल्या काही वर्षांत आला. नेमकं सांगायचं तर, ‘मनसे’ची स्थापना व माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन नंतर पाठीवर थाप मारून स्वागत करण्याच्या बाळासाहेबांच्या रिवाजाची सुरुवात एकाच वर्षांत झाली. राज ठाकरे (शिवसेना सोडण्यापूर्वी) ‘मार्मिक’ दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ करीत होते. त्यांनी शिवसेना सोडल्यावर ती जबाबदारी बाळासाहेबांनी माझ्यावर सोपवली. गेली सहा वर्षे मुखपृष्ठ करण्याच्या निमित्ताने एका पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला. अचूक मार्गदर्शक आणि व्यंगचित्रकला ज्याच्या हाडामांसात भिनलेली आहे, असं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्त्व मलाही दिसू लागलं.
अगदी या ऑक्टोबरातच त्यांच्याशी तीनदा चर्चा करण्याचा योग आला. मार्मिक दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासंदर्भातच ही चर्चा होती. थरथरत्या हाताने जमेल तसे ड्रॉइंग काढून दाखवत, स्वत:ची कल्पना सांगत, एवढेच नाही तर त्या व्यंगचित्राखालची कॅप्शनही अचूक सांगत.
तिसऱ्यांदा गेलो ते रंगीत, फायनल व्यंगचित्र त्यांच्यासमोर पसंतीला ठेवण्यासाठी. हा एका मुखपृष्ठासाठी तीन भेटींचा शिरस्ताही नेहमीचा. प्रत्येक वेळी ते चित्र निरखून पाहणार, त्यात जराही चूक त्यांना चालत नसे. कधी कधी वाटायचे की इतक्या वेळा जायचे एका कव्हरसाठी, मग मला कशाला नेमले. पण नंतर लक्षात येऊ लागले, मी जितक्या वेळा जात राहिलो तितका माझा जास्त फायदाच होत होता. एक तर मला बाळासाहेबांचा सहवास लाभतोय, त्याचबरोबर व्यंगचित्रातले खूप काही शिकायलादेखील मिळायचे. मागून देखील मिळाले नसते ते या सहा वर्षांत मार्मिकच्या या कामामुळे मिळाले होते. गेल्या महिन्यात, बाळासाहेबांनी स्वत: चितारलेल्या व्यंगचित्रांचे भांडार माझ्यापुढे ठेवले. त्यांनी मला दाखवली असतील अवघी २० ते २५ चित्रे. तरीही ते भांडारच, कारण एवढय़ा वर्षांत मी कधीही त्यांची ‘ओरिजिनल’ चित्रे पाहिली नव्हती. एकेक चित्र दाखवताना प्रत्येकाचे मर्म ते सांगत होते. बारीक व जाड फटकाऱ्यांतून त्यांनी साधलेला पर्स्पेक्टिव्ह, कलर बॅलन्स हे सारे त्यांच्या तोंडून ऐकणे हा अनुभव म्हणजे, उत्खनन करता करता सुंदर ऐतिहासिक शिल्प सापडावे, तसा होता!
हे सारे सांगतानाही त्यांच्या खुर्चीच्या बाजूला त्यांची पाठराखण करणारे मोठय़ा आकारातील (साधारण १५ बाय १२ इंच) व्यंगचित्रकलेत बाळासाहेबांनी गुरू मानलेल्या डेव्हिड लो यांचे भारताच्या संरक्षणाची दुर्दशा दाखवणारे ‘ओरिजिनल’ व्यंगचित्र होते. व्यंगचित्रे मोठय़ाच आकारात काढणे बरे वाटते, असे बाळासाहेब म्हणत पण मी पाहत होतो ती व्यंगचित्रे साधारण तीन वा चार कॉलमचीच होती. म्हणजे आकाराने लहानच, तरीही त्यामध्ये पाच-सहा मनुष्याकृती.. प्रत्येक व्यक्तीचे चित्रण अगदी पक्के. फटकारे अगदी तोलून-मापून मारलेले. कंट्रोल्ड. एखादा फटकारा आपल्याला हवा तसा जमला नाही म्हणून तेवढय़ापुरता पांढरा रंग सर्वच व्यंगचित्रकार लावत असतील, पण बाळासाहेबांच्या तेवढय़ा चित्रांमध्ये फक्त एकदाच मला तसा पांढरा केलेला एकच चुकार फटकारा दिसला. माझ्या दृष्टीने हा चमत्कारच- बाळासाहेबांचा रियाज, चित्रकलेची जबरदस्त ओढ आणि हातामध्ये असलेले कौशल्य यांच्या संगमातून घडलेला. बाळासाहेबांनी ही कला स्वत:च्याच निरीक्षणाने, चित्रकलेच्या ध्यासाने, रियाजाने अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवली. दादा नेहमी बाळासाहेबांना इंग्लिश नियतकालिके आणून देत आणि त्यातील व्यंगचित्रांचे निरीक्षण आणि आवडलेल्या व्यंगचित्रांची कॉपी या प्रकारे बाळासाहेबांची ‘प्रॅक्टिस’ सुरू झाली. या शिकण्यादरम्यान त्यांना प्रख्यात ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रकारांनी वेड लावले. लो यांच्या व्यंगचित्रांतील मार्मिकता, त्यांची रचना, बॅलन्स, अ‍ॅनाटॉमी (हो, व्यंगचित्रांतल्या शरीरांच्या रचनेचेही शास्त्र- अ‍ॅनाटॉमी- असते. फक्त हे शास्त्र पुस्तकी नसते, तर प्रत्येक व्यंगचित्रकार ती अ‍ॅनाटॉमी आपापल्या स्टाइलप्रमाणे ठरवतो-) तसेच लो यांनी वापरलेल्या कॅप्शन्स वा कॉमेंट्स या सर्व गुणांनी बाळासाहेब राजकीय व्यंगचित्रांकडे अधिक डोळसपणे पाहू लागले. इतर व्यंगचित्रकारांनीही बाळासाहेबांवर दुरूनच प्रभाव पाडला, त्यात ब्रिटिश व्यंगचित्रकार बेन बेनरी व स्ट्रॅव्ब यांची नावे वरची. परंतु बाळासाहेबांचा देव एकच, डेव्हिड लो!
ते नेहमीच इतर कलाकारांचा सन्मान करत. आपल्यापेक्षा लहान आहे, मग त्याने केलेल्या कामाला दाद का द्यावी असा विचार (जो काही महान चित्रकारही करतात) बाळासाहेबांच्या मनाला शिवत नसे. बाळासाहेब भेटलेल्या माणसाची कायम आठवण ठेवायचे. त्यातही तो कलाकार असेल तर तो त्याच्या गुणदोषांसकट लक्षात राहायचा. त्यांच्या संपर्कात येण्यापूर्वी त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त मी एक शुभेच्छापत्र पाठवले होते. ८० या आकडय़ात त्यांचा चेहरा चितारला होता. जानेवारीत पाठवलेल्या या शुभेच्छापत्राची आठवण त्यांनी मी ऑगस्टमध्ये भेटल्यावर आवर्जून करून दिली होती. खरे तर त्यांनी लक्षात ठेवावे असे काय होते माझ्यात.. पण हे बाळासाहेबांचे कलाकृतीच्या आणि ओघानेच कलाकाराच्या प्रती असणाऱ्या स्नेहभावाचे प्रतीक होते. मी तर तसा त्यांच्या सहवासात नवखाच, पण मार्मिकच्या निमित्ताने मी खूप वेळ त्यांच्या सहवासात राहू शकलो. अनेक जुन्या सैनिकांनादेखील असा लाभ झाला नसेल, पण मला झाला. कारण बाळासाहेबांचे कलाप्रेम.
एकदा मार्मिकच्या दिवाळी अंकाचे कव्हर करताना त्यांनी मला त्यांची कल्पना चितारून दाखवली. परंतु ते समाधानी दिसत नव्हते. थोडय़ा वेळाने मी जरा धैर्य एकवटून त्यांना विचारले, ‘साहेब, मीही दोन-तीन कल्पना चितारल्या होत्या, दाखवू का?’ तर माझी ती स्क्रिबल्स बाळासाहेबांनी पाहिली व म्हणाले, ‘ही तुझी कल्पना आपण कव्हरसाठी वापरू या आणि मी केलेली आतल्या पेजवर वापरू या.’ मी अवाक् झालो. 
व्यंगचित्रकलेत बाळासाहेबांचा आवडता विषय आहे ‘कॅरिकेचर’. या अर्कचित्रांमध्ये ‘लाइकनेस’ महत्त्वाचा, त्यात जराही तडजोड त्यांना खपत नसे. हा आग्रह त्यांची कॅरिकेचर पाहतानाही जाणवतो. त्यांची अनेक कॅरिकेचर ‘मास्टरपीस’ ठरतील, त्यापैकी मला आवडते ते नेहरूंचे- तोंडात रबरी निपल असलेले दुडदुडणाऱ्या बालकाचे रूप त्या नेहरूंना बाळासाहेबांनी दिले आहे. विषयावर अगदी अचूक बोट ठेवणारे हे परिणामकारक कॅरिकेचर आहे. कॅरिकेचरिस्ट म्हणून त्यांचे अनेक आवडते व्यंगचित्रकार होते, पण त्यामध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख अगदी नेहमीचा.‘राजा कॅरिकेचर छान काढतो,’ असे ते नेहमी म्हणत.
बाळासाहेब हे शिक्षकच! व्यंगचित्रासंदर्भात चर्चा करताना ते व्यंगचित्र कसे असावे, कसे असू नये, त्याची रचना आणि त्याचे मर्मस्थळ, यासंबंधी सारे काही समजून सांगावेसे त्यांना वाटे. चित्रात डिटेल्स भरपूर हव्यात. कोणत्या व्यक्तीचे व्यंगचित्र आहे ते नुसते पाहूनच समोरच्याला ओळखता आले पाहिजे. तुम्हाला त्याखाली नाव लिहायची गरज भासली नाही पाहिजे. बाळासाहेब सांगत, ‘तुमचे व्हिजुअल, थॉट एकदम स्ट्राँग हवे आणि त्याला चांगल्या ड्रॉइंगची जोड हवी. अशा वेळी त्यांच्या ‘खजिन्या’तील अनेक परदेशी व्यंगचित्रकारांची पुस्तकेही ते आवर्जून समोर ठेवत. त्यातली नेमकी चित्रे दाखवत.
बाळासाहेबांच्या प्रत्येक चित्राला एक वेगळीच खोली असायची. त्याची पाश्र्वभूमी सुस्पष्ट असायची. सुपर फिनिश असायचे. चित्राइतकीच त्याची कॅप्शनदेखील टोकदार, बोचरी अशी असायची. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रात तुम्हाला अगदी सूक्ष्म असे पॉज दिसतील. असे पॉज घेण्यासाठी त्या कलेवर तुमची हुकुमत असावी लागते. ती बाळासाहेबांच्यात होती. अलीकडेच संगणकाचा जमाना आला. एकदा उद्धवनी त्यांना आयपॅडवर स्केचसंबधी काही गोष्टी करून दाखविल्या, बाळासाहेब अतिशय उत्सुकतेने पाहत होते. बाळासाहेबांचा हात थरथरायच्या आधी जर त्यांना संगणक मिळाला असता तर कदाचित आपणास आणखीन काही नवीन पाहता आले असते.
बाळासाहेबांना लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे खूप आवडे. त्यांनी एकदा त्यांचे फोटो-बायोग्राफी पुस्तक मला भेट दिले, वर सांगितले यावर मला आठ दिवसांत तुझी प्रतिक्रिया हवी आहे. बाळासाहेबांनी राजकीय व्यंगचित्र ही संकल्पना मराठीत चांगलीच रुजवली. बाळासाहेब अनेक राजकारण्यांना आपल्या कुंचल्याचे फटकारे द्यायचे. मला तर असे वाटते की, आपले व्यंगचित्र बाळासाहेबांनी एकदा तरी काढावे अशीच प्रत्येक राजकारण्याची इच्छा असावी.
या ‘मार्मिक’च्या सफरीत त्यांची अनेक रूपे पाहिली- बाप, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, खटय़ाळ मित्र, घरगुती साधा माणूस, विनोदकार, नकलाकार, अजातशत्रू..
ही रूपे आता कोरली गेली आहेत. कधी कधी वाटते की मला बाळासाहेबांकडे जायला उशीरच झाला. त्यांच्याकडून खूप काही शिकायचे राहूनच गेले.












प्रभाकर वाईरकर
response.lokprabha@expressindia.com
 

आता आवाज कुणाचा?


शिवसेनेत निर्विवादपणे बाळासाहेब ठाकरे यांचाच रिमोट कंट्रोल असतानाही जी काही पडझड व्हायची ती झालीच. त्यांच्या मृत्यूनंतर आता शिवसेनेत काय होणार?
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पाश्र्वभूमीवर १९६६ साली शिवसेनेची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र मिळाला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. या चळवळीत मराठी माणसाच्या तरारलेल्या अपेक्षांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने मात्र फारशी पावले पडत नव्हती. महाराष्ट्रात मराठी माणसाला त्याचे अपेक्षित स्थान मिळत नव्हते. राज्याच्या आíथक नाडय़ा अजूनही अमराठी भांडवलदारांच्या हाती होत्या आणि त्यांच्या तालावर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी कोणताही भावनिक संबंध नसलेले राज्यकत्रे नाचत होते. या परिस्थितीत ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ हा अमराठी तोराही मराठी माणसाला विद्ध करीत होता. मुंबई-ठाणे परिसरातील कारखान्यातून मराठी माणसाला नोकरी व्यवसायात वंचित ठेवण्याचे काम तसेच सुरू होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या या दुखऱ्या जखमेवर नेमके बोट ठेवून आणि ‘मार्मिक’मधून मराठी माणसाच्या हृदयाला साद घालून शिवसेनेचे संघटन निर्माण केले. महाराष्ट्रातल्या बेकारीने गांजलेल्या तरुणांना त्यांनी संघटनेच्या निमित्ताने आशेचा किरण दाखविला. कारखाने कचेऱ्यातून असलेल्या कामगारांच्या संघटना मराठी बेकार तरुणांच्या समस्येला न्याय देऊ शकत नाहीत, असा हाकारा देत प्रस्थापित कामगार संघटनांच्या विरोधात या तरुणाला उभे करण्याचे काम केले. महाराष्ट्रातल्या राजकारणावर असलेला पुरोगामी पगडा दूर करण्याच्या दृष्टीने ‘राजकारण म्हणजे गजकरण’ असली अताíकक आणि असंबद्ध घोषणा करून बाळासाहेबांनी महाराष्ट्राचं राजकारण शिस्तबद्ध रीतीने अराजकीय करण्याचे काम केले. एवढेच नव्हे, तर शिवसेनेला मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी इतिहास याबद्दल प्रेम आहे असे भासविण्याकरिता अनेक प्रथा परंपरांचे पुनरुज्जीवन विविध उत्सवांच्या निमित्ताने करण्यात आले. ही सर्व पुराणमतवादी पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू असतानाच ठाणे महापालिकेची निवडणूक आली. शिवसेना राजकारणात उतरणार नाही अशी गर्जना संघटना स्थापनेच्या वेळेला करणाऱ्या बाळासाहेबांनी निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय सत्ता मिळू शकते असा अंदाज आल्यावर १९६७ साली ठाणे महापालिकेत बहुमत मिळवून सत्ता काबीज केली. हे करीत असताना शिवसेना ‘२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण’ या आपल्या ब्रीदापासून ढळणार नाही असेही वचन दिले. ठाणे महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर शिवसेनेची आगेकूच हळूहळू समृद्धीकडेही सुरू झाली. १९६८ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. शिवसेनेने आपल्या कार्यक्रमाशी सहानुभूती असलेल्या त्या वेळच्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती करून या निवडणुका लढविल्या आणि पहिल्याच फेरीत मुंबई महापालिकेत ४० नगरसेवक निवडून आणून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थानही मिळविले. त्यात स्व. दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी, डॉ. हेमचंद्र गुप्ते आदींचा समावेश होता. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती, सुधार समिती, बीईएसटी समिती या माध्यमांतून समृद्ध मुंबई शहराच्या विविध योजना, त्यांचे अर्थसंकल्प यांच्याशी शिवसेनेचा संबंध आला. त्यामधून मुंबईतील धनिक, कंत्राटदार, बिल्डर या वर्गाशी जवळीक निर्माण झाली.
अमराठी काँग्रेसजनांच्या संपर्कात आल्यामुळे मराठीचा आग्रह हळूहळू पातळ होऊ लागला. गंमत म्हणजे, ज्या मराठीच्या नावाने शिवसेनेने मराठी जनांना साद घातली होती, त्या मराठी भाषेतून महापालिकेचा कारभार झाला पाहिजे याकरिता आग्रही, प्रसंगी दुराग्रही कोणी राहिले असतील, तर ते म्हणजे मंगलोरी जॉर्ज फर्नाडिस, यूपीवाले शोभनाथ सिंह आणि गोरेगावच्या पाणीवाल्या बाई मृणाल गोरे. या सर्वानी त्या वेळची महापौरांची निवडणूक आपल्या आग्रही मागणीमुळे पुढे ढकलण्यास प्रशासनाला भाग पाडले. शिवसेनेने महापालिकेच्या प्रांगणात पाऊल ठेवल्यानंतर अशा प्रकारचे आग्रह नंतर धरले गेले नाहीत. मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकांत त्या काळात काँग्रेस उमेदवाराविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या सुधीर जोशी, मनोहर जोशी व डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना पाठिंबा देऊन महापौर बनविले. परंतु ज्या वेळी सरदार सोहनसिंह कोहली यांना महापौर बनविण्याची वेळ आली, तेव्हा मात्र शिवसेनेने काँग्रेसच्या मुरली देवरा यांना पाठिंबा देऊन महापौर बनविले आणि वर सोहनसिंह कोहली यांच्या गरिबीची थट्टा करत ‘ज्यांच्या झोपडीची लांबी महापौराच्या मोटारीइतकी नाही, ते कसले महापौर होतात?’ असे कुत्सितपणे हिणविले. हेही बाळासाहेबांच्या एकूणच गरीब माणसाबद्दलच्या सहानुभूतीचे द्योतक आहे.
शिवसेना जसजशी मुंबई-ठाणे आणि मुंबईच्या परिसरात वाढू लागली, तसतसे एकूणच तात्त्विकता आणि शिवसेना यांच्यातलं अंतर अधिकच स्पष्ट होऊ लागलं, किंबहुना राजकारणाचा तात्त्विकतेशी काय संबंध असाही सवाल ठाकरी अभिनिवेशाने विचारला जाऊ लागला. संघटित कामगार वर्गाचे लढे मोडण्यासाठी शिवसेना आपल्या मराठी तरुणांना मोठय़ा प्रमाणावर उद्युक्त करू लागली आणि त्याचे समर्थन स्व. बाळासाहेब ठाकरे अभिनिवेशाने व ठाकरी बाण्याने करीत असत. त्यामुळेच १९६७ सालच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून महाराष्ट्रद्वेषी स. का. पाटील यांना पाठिंबा व कामगारांच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांना कडवा विरोध, त्याचप्रमाणे १९७१ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील धनिक वर्गाचे उमेदवार नवल टाटा यांना पाठिंबा आणि त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांना मनगटशाहीने कडाडून विरोध अशा अनेक परस्परविरोधी भूमिका स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी खुबीने निभावून नेल्या. परत या परस्परविरोधी भूमिका घेत असताना सदसद्विवेकबुद्धीला कुठेही स्थान नाही आणि आपल्या अनुयायांनाही याबद्दल अपराधीपणाची जाण नाही. स्व. इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर देशातील सर्व राजकीय पक्षांवर बंधने आणली, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या आणि तरीही शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील आणीबाणी हा काळिमा लावणारा प्रकार ठरला तरी शिवसेनेला मात्र त्याबद्दल कधीही वैषम्य वाटले नाही. शिवसेनेने घेतलेल्या कोणत्याही राजकीय, सामाजिक भूमिकेबद्दल कोणतीही विसंगती हीच कशी सुसंगती आहे याबाबत मात्र स्व. बाळासाहेब ठाकरे आवर्जून बोलत राहिले. ‘ठरवीन ते धोरण आणि बांधीन ते तोरण’ अशा आविर्भावात या सर्व विसंगत भूमिकांचे ते समर्थन करीत राहिले.
राजकारणात सामाजिक धोरणांचा आधार घेताना समाजातील दीनदुबळे, मागासलेले वर्ग यांच्याबद्दल नेहमीच शिवसेनेची भूमिका उपेक्षेची राहिली आहे. महापौरपदी असताना छगन भुजबळ यांनी भारताचे त्या वेळचे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या मंडल आयोगाच्या धोरणाला कडाडून विरोध केला होता. एवढेच नव्हे महापालिका सभागृहात निवडून गेलेल्या शिवसेना नगरसेवकात ८० टक्क्यांहून अधिक ओबीसींचा भरणा असूनही व्ही. पी. सिंह यांचा याबद्दल अभिनंदन करणारा प्रस्ताव त्यांनी संमत होऊ दिला नाही. अर्थात आता भुजबळ तात्त्विकतेचा आव आणून ‘मी ओबीसींच्या प्रश्नावर शिवसेना सोडली’ असे कितीही वेळा म्हणत असले, तरी हा इतिहास विसरून चालणार नाही, आणि त्यासाठी शिवसेनेची याबाबतची जातीनीती जबाबदार आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. दलित जनतेचा मोर्चा रिडल्सच्या प्रश्नावर निघाल्यावर हुतात्मा चौक गोमूत्र िशपडून शुद्ध करण्याचे काम करणाऱ्या भुजबळांचा निषेध करण्याऐवजी व दलित जनतेची दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन करण्याऐवजी प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनाप्रमुखांनी भुजबळांच्या त्या कृतीचेही समर्थन केले होते हा इतिहास कसा विसरता येईल ?
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबद्दल झालेल्या चळवळीची ‘ज्यांच्या घरी नाही पीठ, ते आता मागतायत विद्यापीठ’ अशी शेलक्या शब्दांत टिंगलटवाळी करणारे बाळासाहेब, आम्ही महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या परंपरेचे द्योतक असलेली भगवी पताका खांद्यावर टाकून त्यांचा वारसा चालवीत आहोत, असे महाराष्ट्राला ठासून सांगत असत. शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत असताना त्यांच्या सर्वधर्मसमभाव या तत्त्वाला िहदुत्वाच्या कपडय़ात गुंडाळत आपण शिवाजी महाराजांच्या भूमिकेशी द्रोह करीत आहोत याचेही भान दुर्दैवाने शिवसेनेला आणि त्यांना कंट्रोल करणाऱ्या स्व. बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोललाही उरले नव्हते.
१९८५ पासून मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेवर आहे. या सत्तास्थानाचा उत्तम रीतीने वापर करत शिवसेनेने मुंबई परिसरातील महापालिकांत जम बसविला. याबाबत महाराष्ट्रात सरकार असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांना शक्य तितकी मदत केली. मुंबई महापालिकेचे अधिकारक्षेत्र विविध प्रकारचे कायदे करून संकुचित करण्याचे काम मंत्रालयातून होत असताना शिवसेनेने त्याविरोधात आणि मुंबई आणि महापालिकेच्या अस्मितेसाठी कधीही संघर्ष केल्याचे ऐकिवात नाही. आज ७४व्या घटनादुरुस्तीने मुंबई महापालिकेला स्थानिक प्राधिकरणाचा दर्जा देऊन अनेक प्रकारचे अधिकार प्रदान केले आहेत. परंतु राज्य सरकारने जवळजवळ २९ प्राधिकरणांची निर्मिती करून मुंबई महापालिकेच्या अधिकारकक्षेचा खुळखुळा करून ठेवला आहे. राज्य सरकारचे हस्तक्षेप महापालिकेच्या कारभारात आता दैनंदिन स्वरूपात होत आहेत, तरीही सत्तेवर असलेल्या शिवसेनेने त्याबाबत कधीची मुंबई महापालिकेच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई लढण्याची भूमिका घेतलेली नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा प्रकारच्या होणाऱ्या कुचंबणेची कधीच पर्वा केली नाही. महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराबद्दल प्रसिद्धी माध्यमातून टीकाटिप्पणी झाल्यावर बाळासाहेबांची प्रतिक्रिया नेहमीच ‘निवडणुका लढण्यासाठी पसे लागतात आणि पशाला रंग नसतो. दरिद्री माणसांनी निवडणुका लढू नयेत,’ अशा उद्दाम स्वरूपाची राहिली आहे. याच कृतीचे प्रसिद्धी माध्यमातील काही पत्रकार ‘बिनधास्त आणि बेधडक बाळासाहेब’ असे वर्णन करतात.
सत्तेची मक्तेदारी मोडत असताना ती तळागाळातील गुंडापुंडांकडे सोपविणे आणि त्यांना शिवसेनेत आणून पावन करणे बाळासाहेबांना कधीही वावगे वाटले नाही. भाजपबरोबर युती करण्यापूर्वी शिवसेना िहदुत्वाचा पुरस्कार करू लागली होती. ‘गर्वसे कहो, हम िहदू है’ ही घोषणा बाळासाहेबांनी विलेपाल्र्याच्या पोटनिवडणुकीत डॉ. रमेश प्रभूंच्या प्रचाराच्या वेळी दिली होती. त्या वेळी भाजप पुरेसा िहदुत्ववादी नव्हता, तर जनता दलाच्या आघाडीत डॉ. रमेश प्रभू यांना विरोध करीत होता. याच निवडणुकीनंतर बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी निवडणूक आयोगाने तहकूब केला होता. या ठिकाणी शिवसेनेने मराठी बाण्याचा आग्रह सोडून िहदुत्वाची कास धरली आणि चलाख स्व. प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांना आणि शिवसेनेला िहदुत्वाच्या घोडय़ावर आरूढ केले. तोपर्यंत देशात लालकृष्ण अडवाणींची राम-जन्मभूमी आंदोलनाची रथयात्रा दौडत होती. शिवसेनेने महाराष्ट्रात विशेषत: या आंदोलनाला पायदळ पुरविण्याचे काम केले.
१९९२ साली बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर संघ परिवारातील बजरंग दलासकट सर्व आक्रमक मंडळी पतली गली पकडून, हे आम्ही केले नाही तर शिवसनिकांच्या अतिउत्साहातून ते झाले आहे, असा पवित्रा घेऊ लागली. त्या वेळी बाळासाहेबांनी बेडरपणे ‘बाबरी मशीद पाडण्याचे काम जर शिवसनिकांनी केले असेल, तर मला त्याचा अभिमान वाटतो’ अशी भूमिका घेतली. शिवसेना-भाजपच्या हनिमूनची सुरुवात प्रमोद महाजनांच्या पुढाकाराने झाली. गेल्या २ दशकांच्या मतभेदांच्या खाच-खळग्यांच्या वाटेतूनसुद्धा ती शाबूत राहिली. याला कारण मुख्यत्वेकरून बाळासाहेब ठाकरे यांना दिल्लीची सत्ता आटोक्यात येत असल्याचे जाणवले असावे हे होते. महाराष्ट्रात १९९५ सालानंतर सत्ता परिवर्तन झाले आणि महाराष्ट्रात सेना-भाजपची सत्ता आली. त्यानंतर स्वत:वर कोणतीही पदाची जबाबदारी न घेता, ‘मी रिमोट कंट्रोल आहे आणि त्यामुळे कायद्याच्या चौकटी पाळण्याचे बंधन माझ्यावर नाही. आमच्या मंत्र्यांवर माझ्या इच्छेचाच कंट्रोल चालणार,’ असे बाळासाहेब जाहीरपणे बिनदिक्कतपणे सांगू लागले. मोफत घरांचे आश्वासन गरिबांना देऊन सत्ता तर मिळविली, पण घरांचा हिशेब न जुळल्यामुळे मुंबईतील गरिबांच्या नशिबी बाळासाहेबांनी दिलेले फक्त आश्वासनच आले. त्याचे परिवर्तन वस्तुस्थितीत मात्र झाले नाही. महाराष्ट्रातील काही शिवसनिक त्यानंतर दिल्लीच्या वाटेवर केंद्रीय मंत्री झाले, सभापती झाले. परंतु सर्वाना धाक मात्र रिमोट कंट्रोलचा. ‘एन्रॉन कंपनीचा दाभोळचा वीजप्रकल्प होऊ देणार नाही, तो समुद्रात बुडवू. परंतु हर्णे दाभोळच्या शेतकऱ्यांच्या हिरव्यागार बागा आम्ही सुरक्षित ठेवू’ म्हणून जाहीरपणे आश्वासन देणाऱ्या सेना-भाजप युतीने एन्रॉनच्या प्रमुख रिबेका मार्क यांची मातोश्रीवर भेट झाल्यावर आश्चर्यकारक मतपरिवर्तन होऊन या प्रकल्पाला हळूच हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
जीवनात, राजकारणात आणि कलासाहित्यक्षेत्रात अशा अनेक प्रकारच्या उलटसुलट भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांची मानसिकता ‘आधी केले, मग सांगितले’ अशा थाटाची अविचाराच्या काठावरची होती. ज्या त्वरेने महाराष्ट्रात आणि दिल्लीत सेना-भाजपच्या हाती सत्ता आली, त्याचे पोकळपण जाणवल्यामुळे जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसच्याच दावणीला बांधून घेतले, हा बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलचा देशाच्या पातळीवरचा पराभव होता. सुरेश प्रभूंसारख्या बुद्धिमान ऊर्जामंत्र्याला कोणतेही सयुक्तिक कारण न देता पदच्युत करणे आणि त्यांना राजकीय अडगळीत टाकणे ही गोष्ट अत्यंत निर्वकिारपणे बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोल तत्त्वाने केली. त्यात कुठेही मानवी संवेदनशीलतेचा लवलेशही नव्हता. एखादी गोष्ट आपल्या मनाजोगी घडली नाही, तर ती कठोरपणाने चिरडून टाकणे यात कोणतीही खंत त्यांना नसे. सत्तेच्या पदाची आसक्ती नव्हती असे जाहीरपणे सांगत असतानाच रिमोट कंट्रोल मात्र तो माझ्याच हाती असेल याची आग्रही भूमिकाही ते घेत असत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख हे एकच पद आणि त्यानंतर बाकी कितीही पदे असली, तरी त्या पदांची त्यांनी कधी तमा बाळगली नाही. 
इतक्या निर्वविादपणे रिमोट कंट्रोल हाती असूनही या एकछत्री साम्राज्याला बाळासाहेबांच्या वयोमानानुसार तसेच त्यांच्या शिष्यगणांत अचानक लाभलेल्या समृद्धीने तडे जाऊ लागले. शिलेदार सरदार झाल्यावर मग रिमोट कंट्रोलची पावरही कमी होऊ लागली. प्रथम छगन भुजबळांनी तात्त्विकतेचा बुरखा वापरून परंतु प्रत्यक्षात सेनेतील नंबर २ च्या पदाचा लाभ न झाल्यामुळे शिवसेनेला पहिला धक्का दिला. सुमारे पाऊण महिना नागपुरात भूमिगत राहून त्यांनी आपल्या निष्ठा शरद पवारांच्या चरणी वाहिल्या आणि नंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रवेश घेऊन शिवसेनेवर कारवाईला सुरुवात केली. त्यापाठोपाठ नव्या मुंबईचे गणेश नाईक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आताशा दुरावलेले राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असतानाच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता हा इतिहास ताजा आहे. याचाच अर्थ रिमोट कंट्रोलमधला सेल आता क्षीण झाला होता आणि केवळ बाळासाहेबांचे अस्तित्व आता शिवसनिकांना आपल्या मनाप्रमाणे वागण्यापासून परावृत्त करू शकत नव्हते.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पटलावर गेलं जवळजवळ र्अध शतक निरंकुशपणे राज्य केलेला हा योद्धा आता पडद्याआड गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल संभवण्याची अपेक्षा आहे. विकलांग शिवसेना आता भाजपलाही सत्तास्थानी पोहोचविण्यासाठी उपयोगी पडणारी नाही. बाळासाहेबांसारखा नेता आता न उरल्यामुळे शिवसेनेचे वारू चौखूर उधळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या निमित्ताने विरोधी पक्षाची असलेली सक्षम जागा आता रिकामी झाल्यामुळे काँग्रेस व एनसीपी यांनाच आलटून-पालटून सत्ताधारी व विरोधी अशा भूमिका वठवाव्या लागणार आहेत. राज ठाकरेंची मनसे अजून महाराष्ट्रात बाळसं धरायची आहे. परंतु तीदेखील शिवसेनेची महाराष्ट्रातल्या राजकारणातली नंबर दोनची भूमिका बजावू शकेल याबद्दल अद्याप साशंकता आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना बाळासाहेब ठाकरे या मिथकाने अध्रे शतक जे वेडे केले होते, त्यातला फोलपणा, पोकळपणा आणि वास्तव आता जनतेपुढे या २-३ वर्षांत यायला हरकत नाही. पण तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण जातीपातीत आणि पशाअडक्यात गुंडाळलं जाणार नाही याबाबतही दक्ष राहण्याची गरज आहे.









रमेश जोशी
response.lokprabha@expressindia.com


 

माझ्याबद्दल