सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

श्री गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ, फलश्रुती आणि महत्त्व !!! - Shri ganapati atharvshirsh meaning and importance





भगवान श्रीगणेशांना नमस्कार असो.
ॐ हे देवांनो, आम्ही कानांनी शुभ ऎकावे. यजन करणार्‍या आम्हांस डोळ्यांनी कल्याणच दिसावे. सुदृढ अवयवांनी व शरीरांनी युक्त असलेल्या आम्ही स्तवन करीत करीत देवांनी दिलेलें जे आयुष्य असेल तें घालवावे. ॥१॥
ॐ ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऎकिवांत आहे तो इंद्र आमचें कल्याण करो. सर्वद्न्य व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. ज्याची गती अकुंठित आहे असा तार्क्ष्य (गरूड) आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो. ॥२॥
ॐ तें (श्रीगजाननरूपी तेज) माझें रक्षण करो. पठण करणाराचे रक्षण करो. (पुनश्च सांगतों) तें माझें रक्षण करो व पठण करणाराचे रक्षण करो. ॥३॥
ॐ त्रिवार शांति असो.
श्रीगणेश अथर्वशीर्षाचा अर्थ:
ॐ गणांचा नायक असलेल्या तुला नमस्कार असो. तूंच प्रत्यक्ष आदितत्व आहेस. तूंच केवळ (सर्व जगाचा) निर्माता आहेस. तूंच केवळ (विश्वाचे) धारण करणारा आहेस. तूंच केवळ संहार करणारा आहेस. तूंच खरोखर हें सर्व ब्रम्ह आहेस. तूं प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस. ॥१॥
मी ऋत आणि सत्य (या परमत्म्याच्या दोन्ही अंगांना अनुलक्षून वरील सर्व) म्हणत आहें. ॥२॥
तूं माझें रक्षण कर. वक्त्याचे (तुझें गुणवर्णन करणार्यारचें) रक्षण कर. श्रोत्याचें रक्षण कर. (शिष्यास उपासना) देणार्यासचे (गुरूचें) रक्षण कर. (ती उपासना) धारण करणार्यायचे (शिष्याचे) रक्षण कर. ज्ञानदात्या (गुरूंचें) रक्षण कर. शिष्याचें रक्षण कर. मागच्या बाजूनें रक्षण कर. समोरून रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. आणि ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर. अधर दिशेकडून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझें रक्षण कर. रक्षण कर. ॥३॥
तूं ब्रम्ह आहेस. तूं चैतन्यमय आहेस. तूं आनन्दरूप आहेस. ज्याहून दुसरें कांहींच तत्व नाहीं असें सत्, चित् व आनंद (या रूपांनी प्रतीत होणारें एकच) तत्व तूं आहेंस. तूं प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस. तूं (नाना प्रकारें नटलेल्या विश्वाचें ज्ञान आहेस. तू (सर्वसाक्षीभूत एकत्वाचें) विशिष्ट असें ज्ञान आहेस. ॥४॥ हें सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होतें. हें सर्व जग तुझ्यामुळें स्थिर राहतें. हें सर्व जग तुझ्या ठिकाणींच परत येऊन मिळतें. तूं पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश आहेस. तूं (परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी ही) वाणीची चार रूपें आहेस. ॥५॥
तूं (सत्व, रजस् व तमस्) या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. तूं (स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारणदेह) या देहत्रयांच्या पलीकडचा (महाकारण) आहेस. तूं (जाग्रद्वस्था, स्वप्नावस्था व सुषुप्तावस्था) या तीन अवस्थांच्या पलीकडचा (तुर्यावस्थारूप) आहेस. तूं (भूत, वर्तमान व भविष्यत्) या तिन्ही कालांच्या पलीकडचा आहेस. (मनुष्यशरीरांतील) मूलाधारचक्रांत तूं नेहमी स्थित आहेस. तूं (इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति या) तिन्ही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझें नित्य ध्यान करितात. तूं ब्रम्हदेव, तूंच विष्णु, तूंच रूद्र, तूंच इंद्र, तूंच अग्नि, तूंच वायु, तूंच सुर्य, तूंच चंद्र, तूंच ब्रह्म, तूंच भू:, तूंच भुव:, तूंच स्व: व तूंच ॐकार आहेस. ॥६॥
'गण' शब्दाचा आदिवर्ण 'ग्' याचा प्रथम उच्चार करून वर्णांतील प्रथमवर्ण 'अ' याचा उच्चार केला. त्याचे समोर अनुस्वार अर्ध्चंद्राकार शोभणार्याा ॐकारानें युक्त (असा उच्चार केला कीं) हें तुझ्या बीजमन्त्राचे (ग्ँ) रूप होय. गकार हें पुर्वरूप, अकार मध्यरूप, अनुस्वार अन्त्यरूप व (प्रणवरूप) बिंदु (हें पुर्वीच्या तिन्हींना व्यापणारें) उत्तररूप होय. या (सर्वां) चे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचें एकत्रोच्चारण म्हणजेच सन्धि. (अशा रीतीनें बीजमन्त्र सिद्ध होणें) हीच ती गणेशविद्या. (या मंत्राचा) गणक ऋषी आहे. (या मंत्राचा) निच्ऋद्गायत्री हा छन्द (म्हणण्याचा प्रकार) आहे. गणपति देवता आहे. 'ॐ गं गणपतये नम:।' (हा तो अष्टाक्षरी मन्त्र होय.) ॥७॥
आम्ही एकदन्ताला जाणतों. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतों. त्यासाठी एकदन्त आम्हांस प्रेरणा करो. ॥8॥ (या भागास गणेशगायत्री असे म्हणतात.) ॥८॥
एक दांत असलेला, चार हात असलेला, (उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून प्रदक्षिणाक्रमानें त्याच बाजूच्या खालच्या हातापर्यंत) अनुक्रमें पाश, अंकुश, दांत व वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचें चिन्ह असणारा, तांबड्या रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, तांबड्या (रक्तचंदनाच्या) गन्धानें ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचें उत्तम पूजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचें कारण असणारा, अविनाशी, सृष्टीच्या आधींच प्रगट झालेला, प्रकृतिपुरूषापलीकडचा देव, असें जो नित्य ध्यान करतो तो योगी, (किंबहुना) योग्यांत श्रेष्ठ होय. ॥९॥
व्रतांचा समूह म्हणजेच तपश्चर्या. तिच्या अधिपतीस नमस्कार असो. गणांच्या नायकार नमस्कार असो. सर्व अधिपतींतील प्रथम अधिपतीस नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत अशा श्रीवरदमुर्तीला नमस्कार असो. ॥१०॥
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अज़ाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळीं पठण करणारा रात्रीं (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहित होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी अशा अनधिकार्याीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल. ॥११॥
या अथर्वशीर्षानें जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्त्म वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें वाक्य आहे. (याचा जप करणार्याीला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं. ॥१२॥ जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होतें. ॥१३॥
आठ ब्राम्हणांना योग्य प्रकारें (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपति प्रतिमेसंनिध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हें असें जाणतो. असें हें उपनिषद् आहे. ॥१४॥

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

|| संकटनाशन गणेश स्तोत्र || - || Sankatnashan ganesh stotra ||


श्री गणेश: अवतार व कार्य - Shri Ganesh Avatar and info..

श्री गणेशाचे अवतार दोन प्रकारचे आहेत. 
एक आविर्भाव म्हणजे स्वेच्छेने प्रकट होऊन विघ्ननाशनादी आवश्य कार्य साधून लगेच अंतर्धान पावणारा, अर्थात अगदी थोडा वेळ असणारा, वक्रतुंडासारखा अवतार आणि दुसरा अवतार म्हणजे अधिक काळ राहणारा अर्थात विशिष्ट कार्यासाठीच प्रकट व्हावयाचे, पण त्या अवताराबरोबर अनेक प्रकारच्या भक्तानुग्रही लीलाही करायच्या असा मयूरेश, विनायक इत्यादी अवतार होत. अर्थात दोन्ही प्रकारच्या अवतारांमध्ये भक्तजनांचे तपश्चर्यण व कामना, संकल्प सिध्यर्थ व अभक्तजन व असुरांना शासन वगैरे कारणाकरताच श्री गणेशांनी अवतार घेतले. येथे विशेषत्वाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे श्री गणेशाने कोठल्याही असुराचा वध केला नाही, तर त्याच्या मदाचा नाश करून त्याला आपल्या अंकित ठेवले. त्या त्या असुरामुळे समाजात बळावत चाललेल्या मदप्रवृत्तीचा नाश केला, हे खालील अवतारकार्यावरून दिसून येईल. त्या त्या असुराच्या नावावरून आपल्या उन्नतीच्या आड येणाऱ्या आपल्यातील त्या त्या मदप्रवृत्तीचा नाश करावा, अशी अप्रत्यक्ष रीतीने श्री गणेशांनी आपणास शिकवण दिली, हे आपण लक्षात ठेवावयास हवे.
अवतार :
१. वक्रतुंड, 
२. एकदंत, 
३. गजानन,
४. लंबोदर, 
५. विकट, 
६. विघ्नराज,
७. महोदर, 
८. धूम्रवर्ण

कार्य :
 
 मत्सरासुराचा नाश ’ 
 मदासुराचा नाश
 लोभासुराचा नाश 
 क्रोधासुराचा नाश
 कामासुराचा नाश 
 दंभासुराचा नाश
 मोहासुराचा नाश 
 अहं असुराचा नाश.

शिकवण :
 
 आपल्यातील मत्सराचा नाश करणे.
 आपल्यातील मदाचा नाश करणे.
 आपल्यातील लोभाचा नाश करणे.
 आपल्यातील क्रोधाचा नाश करणे.
 आपल्यातील कामवृत्तीचा नाश करणे.
 आपल्यातील दंभाचा नाश करणे.
 आपल्यातील मोहाचा नाश करणे.
 आपल्यातील अहंपणाचा नाश करणे.

वरील अवताराखेरीज श्री गणेशांनी अनेक अवतार घेतले. ज्ञानारी आणि शुभ्रसेन राजा यांचे अनुक्रमे सुबोध आणि नरकेसरी हे दोन गणेशभक्त पुत्र होते, पण ज्ञानारी आणि शुभ्रसेन हे दोघे गणेशद्वेष्टे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही गणेशभक्त मुलांचा अत्यंत छळ केला. श्री गणेशांनी अवतार घेऊन आपल्या बालभक्ताचे तसेच दुसरा एक बालभक्त बल्लाळ या सर्व बालभक्तांचे संरक्षण करून त्यांच्या पित्यांना शासन केल्याचा पुराणात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता व असुरांचा नाश करण्यासाठी कारणपरत्वे श्री गणेशांनी इतरही अनेक अवतार धारण केल्याचे पुराण दाखले आहेत.

दुसऱ्या प्रकारच्या अवतारामध्ये श्री गणेशांनी -
 
१. विनायकनामक अवतार घेऊन नरान्तक व देवान्तक यांचा नाश केला.
२. मयूरेशनामक अवतार घेऊन सिंधुसुराचा नाश केला.
३. श्री गणेशनामक अवतार घेऊन सिंदुरासुराचा नाश केला.
४. कपिलनामक अवतार घेऊन कमलासुराचा नाश केला.
५. वरदमूर्तीनामक अवतार घेऊन तामिस्रासुराचा नाश केला.
६. धूम्रकेतूनामक अवतार घेऊन धुमासुराचा नाश केला.

अशा प्रकारे अनेक अवतार घेऊन असुरांपासून लोकांचे रक्षण केले. सूर आणि असुर हे पौराणिक अलंकारिक शब्द असून सूर याचा अर्थ संवादी म्हणजे आत्मतत्त्वाशी निगडित असलेले व स्वानंदानुभव भोगणारे. असुर म्हणजे, अ म्हणजे नाही, सूर म्हणजे योग्य जे आत्मानुभवाच्या आनंदाच्या आड येणारे ते, म्हणजे कामासुर, मोहासुर इत्यादी. आपले षड्विकार हे आपल्या आनंदाच्या आड का येतात याचा विचार करता ज्या वेळेला या गुणांमध्ये मद उत्पन्न होतो तोच मद आत्मानंद नाश करणारा आहे. म्हणजे मदरहित हे गुण मानवजातीला अनुकूल आहेत. म्हणून त्यांचा नाश न करता त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या मदाचा नाश करणे हाच असुर विनाश होय. त्याच्याकरिता जी स्थिर बुद्धी ती बुद्धिदाता गणेश अथवा गणपती होय.




साभार : लोकप्रभा 

दोन गुरु - नाना पाटेकर - Story of Nana Patekar


वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. 'त्यांनी काही खाल्लं असेल का?' असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. 
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, "मी भिकारी नाही." तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी "कसं आहे?" अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.
खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने. त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.
भुकेचा एक मित्र होता. 'अपमान' त्याचं नाव.
हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा.
त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही.
खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं.
रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम.
मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम.
या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क.
माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला.
(भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)
अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ-संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले.
'अपमान आणि भूक' विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्यालासुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली.
प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला.
अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला.
उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं.
उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान.
आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय.
ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर.
आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय.
अजून पुढचा तीर असेल कदाचित.
आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.







- साप्ताहिक विवेकच्या गुरुपौर्णिमा अंकात प्रकाशित, नाना पाटेकर यांचा लेख 'दोन गुरू'...

बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

खाऊखुशाल : वेड लावणारी ‘येडय़ाची मिसळ'

ठाणे परिसरात चमचमीत मिसळ मिळण्याचे अनेक लोकप्रिय कॉर्नर आहेत.

श्रावण महिन्यात अनेकांना मांसाहार व्यज्र्य असतो. काही जण गणपती तर काही पुढे नवरात्रीपर्यंत मटण-मासे खात नाहीत. मात्र चमचमीत खाण्याची जिभेची सवय खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी अनेक जण र्तीदार मिसळ खाऊन दुधाची तहान ताकावर भागवितात. लालभडक गरमागरम रस्सा, त्यात आवडीनुसार फरसाण आणि त्यावर कांदा-कोथिंबीर पेरलेले मिसळीचे वाडगे समोर आले की खवय्यांची जणू ब्रह्मानंदी टाळीच लागते. त्यावर लिंबाची फोड पिळून पावासोबत हे स्वर्गीय चवीचे मिसळनामक मिश्रण म्हणजे शाकाहारातला मोठा बेतच.
ठाणे परिसरात चमचमीत मिसळ मिळण्याचे अनेक लोकप्रिय कॉर्नर आहेत. डोंबिवलीतील ‘येडय़ाची मिसळ’ त्यापैकी एक. सात सुरांच्या व्याकरणात बांधलेले संगीत इथून-तिथून सारखे असले तरी घराण्यांनुसार जसा सादरीकरणात फरक पडतो, असेच मिसळीचेही असते. ‘र्ती’ हा मिसळीची स्थायीभाव. बाकी इतर जिनसांमध्ये प्रदेशानुसार फरक पडतो. कोल्हापुरी, पुणेरी अशी मिसळीची घराणी प्रसिद्ध आहेत. आता काहींनी फ्यूजन करून वेगळी चव साधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘येडय़ाची मिसळ’ मात्र अस्सल पुणेरी. पारंपरिक पद्धतीच्या घरगुती मसाल्यांचा वापर करून ही मिसळ बनवली जाते. लवंग, दालचिनी, दगडफुल, बडीशेप, मिरे आदी मसाल्यांचे पदार्थ दररोज सकाळी येथे दळले जातात. दीड ते दोन किलो सुके खोबरे इथे दररोज भाजले जाते. त्यानंतर मिसळीसाठी लागणारा तळका मसाला येथे बनविला जातो. दररोज जवळपास दहा किलो वाटाणे इथल्या मिसळीसाठी लागतात. र्तीचा रंग बघूनच तोंडाला पाणी सुटते. पोटात कावळे ओरडायला लागतात. या मसाल्याचा गंध या परिसरात दरवळत असल्याने खवय्यांचा इथे गराडा पडतो. मिसळीची चविष्ट र्ती त्यावर टाकलेले शेव -फरसाण ,बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि पाव.. पाहूनच मन तृप्त होते. विशेष म्हणजे मिसळीची किंमतही तुलनेने कमी आहे. त्यामुळे पोट भरण्याचा हा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे.
घरगुती दर्जेदार मसाल्यांचा वापर करून बनविलेली ही मिसळ तू इतक्या कमी किमतीला कशी देतोस, वेडाबिडा झाला नाहीस ना, असा आपुलकीचा प्रश्न माझ्या मित्रमंडळींनी विचारायला सुरुवात केली. त्यांनी प्रेमाने काढलेल्या त्या खरडपट्टीकडे मी दुर्लक्ष केले. उलट मिसळीचे बारसेच येडय़ाची मिसळ असे केले,’ मालक रवींद्र जोशी आणि हेमंत भालेकर यांनी कॉर्नरच्या काहीशा विचित्र नावामागची कहाणी सांगितली. दररोज इथे सरासरी शंभरेक प्लेट मिसळ संपत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय इथे दररोज सकाळी तीन किलो पोहे, तीन किलो उपमा आणि तीन किलो शिरा केला जातो. शिरा करताना त्यामध्ये केशर आणि केळ्याचा हमखास वापर करतात. तीन किलो शिऱ्यात किमान दोन किलो केळी टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त कधी अळूची वडी, कधी कोंथिबीर वडी तर कधी चक्क तांदूळ, मुगडाळ, रताळ्याची खीर असे पदार्थही इथे मिळतात. तांदळाची खीर करताना ते तांदूळ स्वच्छ धुतले जातात. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटले जातात. त्यात साखर, ओले खोबरे आणि दुधाचा समावेश केला जातो. येथील तांदळाच्या खिरीची चव लाजवाबच. त्यामुळे आणखी एक वाटी घेण्याचा मोह खवय्यांना आवरत नाही. मात्र श्रावणी सोमवारी किंवा उपवासाच्या दिवशीच या खिरीची चव चाखता येते. गरमागरम वाफाळलेले पोहे खाण्यासाठी येथे सकाळी खवय्ये गर्दी करतात. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ हे कॉर्नर असल्याने सकाळी पोहे, उपमा किंवा शिरा खाऊनच नोकरदार गाडी पकडतात. तीन वर्षांपूर्वी हे कॉर्नर सुरू झाले. ते आता शहरभर प्रसिद्ध आहे. ‘येडय़ाची मिसळ’ कुठे मिळते, असा प्रश्न विचारत विचारत खवय्ये येथे येतात, अशी माहिती ऋचा जोशी यांनी दिली. मिसळपाव अवघ्या तीस रुपयांना तर पोहे, उपमा आणि शिऱ्याची डिश प्रत्येकी वीस रुपयांना मिळते. रविवारची संध्याकाळ सोडून आठवडाभर हे कॉर्नर सुरू असते.
Ads by ZINC
येडय़ाची मिसळ
  • कुठे?- १, गारवा सोसायटी, एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर, एव्हरेस्ट हॉलसमोर, डोंबिवली (प.)
  • कधी ?- सकाळी ८ ते रात्री १० आणि रविवार सकाळी ८ ते दुपारी २









भाग्यश्री प्रधान |
by - Loksatta

खाऊखुशाल : चविष्ट आमरस पुरी



आगदी घरगुती पद्धतीने तयार केलेले हे पदार्थ चविष्ट तर आहेतच पण मुख्य म्हणजे खिशालाही



चविष्ट आमरस पुरी


एप्रिल-मे महिना सुरू झाला की अनेकांना आमरस पुरीचे वेध लागतात. अनेक घरात आठवडय़ातून एकदा तरी आमरसाचा बेत आखला जातो. गिरगावातील सुजाता उपाहारगृह तर चविष्ट आमरस पुरीसाठी प्रसिद्ध आहे. या मराठमोळ्या हॉटेलमध्ये सीझनल स्पेशल चार पदार्थ आहेत. आमरस पुरी, फ्रेश मँगो विथ आइस्क्रीम, आंबा डाळ, आंबा पन्ह. आगदी घरगुती पद्धतीने तयार केलेले हे पदार्थ चविष्ट तर आहेतच पण मुख्य म्हणजे खिशालाही परवडणारे आहेत.

बी. तांबे या गिरगावातील शंभरहून अधिक वष्रे जुन्या उपाहारगृहाची मालकी सुनील कर्नाळे यांच्याकडे आली आणि सहा वर्षांपूर्वी त्याचे सुजाता उपाहारगृह असे नामकरण झाले. पूर्वीपासूनच अस्सल मराठी पदार्थ मिळणाऱ्या या ठिकाणी आजही मेन्यूमध्ये मराठी पदार्थाचीच रेलचेल दिसते. खरं तर सुजाताचा मेन्यूही इतर उपाहारगृहांच्या तुलनेत पदार्थाच्या आणि प्रकारांच्या संख्येत वेगळा आहे. पण तत्पूर्वी मुख्य खाद्यपदार्थ आंबा. इथे घरगुती पद्धतीने म्हणजेच मिक्सरचा वापर न करता हाताने तयार केलेला आमरस मिळतो. त्यासाठी देवगड, रत्नागिरी हापूस आंबा वापरला जातो. कुठलाही रंग किंवा गोडसरपणा येण्यासाठी कुठल्याही पदार्थाचा वापर न केल्याने आंब्याची मूळ चव टिकून राहते. केशरी, घट्ट असा हा आमरस नुसताच किंवा पुरीसोबत मागवता येऊ शकतो. तळहाताच्या आकाराच्या काचेच्या भांडय़ात फक्त आमरस केवळ ६५ रुपये आणि सहा गरमागरम पुऱ्यांसोबत ९५ रुपये इतकी माफक त्याची किंमत आहे. आंबा डाळ आणि आंबा पन्ह हेदेखील पदार्थ आवर्जून खाण्यासारखे आहेत. कारण मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिनेच तुम्हाला ते इथे चाखायला मिळतील. या तीन पदार्थाशिवाय आवर्जून खावा असा पदार्थ म्हणजे फ्रेश मँगो विथ आइस्क्रीम. एका बाऊलमध्ये तळाला आमरस, त्यावर व्हॅनिला आइस्क्रीमचा स्कूप आणि मग बाजूने हापूस आंब्याचे चौकोनी तुकडे. हे ऐकायला आणि दिसायला आकर्षक असलं तरी ते कसं खावं हेदेखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चमच्याने घास घेताना तळाला आमरस त्यावर व्हॅनिला आइस्क्रीम आणि सर्वात वर आंब्याचा तुकडा हे एकत्रितपणे खाता येणं हे कौशल्याचं काम आहे. तरच या प्रकाराच्या चवीची अनुभूती तुम्हाला येईल.

आंब्याचा आस्वाद घेऊन झाल्यावर तुम्हाला इतर पदार्थाकडे वळायला हरकत नाही. भाजणी थालीपीठ, कोिथबीर वडी, अळू वडी, वाटाणा, काजू आणि मका पॅटिस या मराठमोळ्या पदार्थाचा थाट तर येथे आहेच. पण त्याचसोबत चटपटीत वडा, रसरशीत मिसळ, उपवासाचे पदार्थ, भाकरी स्पेशल, थंड पेय, गोड पदार्थ या प्रत्येक हेिडगखाली आठ ते दहा वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. उदाहरणार्थ मिसळ. पुणेरी, नवरंग (नऊ कडधान्यांची उसळ), दही, चीज, पनीर, फराळी, दही फराळी मिसळ असे प्रकार आहेत. मिसळ तुम्ही नुसतीच किंवा पाव आणि पुरीसोबतही मागवू शकता. भाकरी स्पेशलमध्ये बाजरी, नाचणी आणि तांदुळाच्या भाकरीसोबत झुणका, कुळीथ आणि डांगरासोबत मागवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. गोड पदार्थामध्येही अननस, दुधी, गाजर हलवा, खरवस, पुरणपोळी, तेलपोळी, गुळपोळी, गुळपोळी दूध हे पदार्थ मेन्यूमध्ये दिसतात आणि टेबलवर खायला मिळतात. ८५ रुपयांमध्ये महाराष्ट्रीय थाळी आणि १३५ रुपयांमध्ये मिळणारी स्पेशल थाळीही आवर्जून खाण्यासारखी आहे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाला वेगवेगळी भाजी, दररोज वेगळा गोड पदार्थ ही त्याची वैशिष्टय़े. सुजाता उपाहारगृहाच्या या आढाव्यानंतर चांगले आणि बजेटमध्ये मराठी पदार्थ कुठे खायला मिळतात, असा प्रश्न यापुढे तुम्हाला पडणार नाही, अशी आशा आहे.


सुजाता उपहारगृह व मिठाई
कुठे? : २७७, मापला हाऊस, जे. एस. एस. रोड, ठाकूरद्वार, गिरगाव, मुबंई.
कधी? : सकाळी ८.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत.







- प्रशांत ननावरे 
by loksatta 

खाऊखुशाल : वाटेवरची चविष्ट पोटपूजा

अगदी स्थानकालगत असल्याने सकाळ-संध्याकाळ येथे खवय्यांची रीघ लागलेली असते



‘कशासाठी पोटासाठी’ हे साऱ्या शहरी धावपळीचे सार असले तरी त्या उदरभरणाची नीट व्यवस्था करता येईल, इतकाही वेळ अनेकांकडे नसतो. त्यामुळे मग सहज जाता-येता वाटेतले एखादे फूड कॉर्नर गाठून भूक शमवली जाते. अशा कॉर्नरवर उभे राहून उभ्या उभ्याच आपापल्या आवडी-निवडीनुसार इडली, डोसा, मेदुवडा खाल्ला जातो. त्यामुळे अशा कॉर्नर्सभोवती सकाळ-संध्याकाळी खवय्यांची गर्दी दिसते. उत्तम चवीची जाहिरात करावी लागत नाही. खवय्ये एकमेकांना अशा ठिकाणांची शिफारस करीत असतात. ठाणे पश्चिम विभागात रेल्वे स्थानकालगत असणारे गणेश डोसा सेंटर अशा कॉर्नरपैकी एक आहे. 

अगदी स्थानकालगत असल्याने सकाळ-संध्याकाळ येथे खवय्यांची रीघ लागलेली असते. गरमागरम डोसा, इडली सांबर, मेदुवडा सांबर आदी पदार्थ येथे मिळतात. बारीक रवा, तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून डोशाचे पीठ घरच्याघरी तयार केले जाते. या कॉर्नरवर दिवसाला ८०-९० किलो पीठ अगदी सहज संपते. लुसलुशीत इडली आणि उत्तप्पा आणि कुरकुरीत डोसा येथे खायला मिळतो. त्यामध्ये मसाला उत्तपा, बटर मसाला उत्तपा, म्हैसूर मसाला उत्तपा, चीज म्हैसूर उत्तप्पा, बटर म्हैसूर मसाला उत्तप्पा, चीज म्हैसूर मसाला उत्तपा, शेझवान उत्तप्पा असे उत्तप्पाचे अनेक प्रकार येथे उपलब्ध आहेत. येथील टॉमेटो उत्तप्पाला विशेष मागणी आहे. खवय्ये आवडीने हा उत्तप्पा खातात. उत्तप्प्यावर टॉमेटो बारीक चिरून टाकला जातो. चवीपुरता थोडासा टोमॅटो सॉसही टाकला जातो. त्यामुळे या पदार्थाला एक लाजवाब चव येते. खास दाक्षिणात्य मसाले वापरून तयार करण्यात येणारा येथील म्हैसूर मसाला उत्तपाही भन्नाट चवीचा आहे. बीट, बटाटे, गाजर आदी पदार्थ एकजीव करून त्याचे सारण यात वापरले जाते. दरदिवशी साधारण दहा किलो बटाटे वापरले जातात. रवा साधा डोसा, रवा मसाला, रवा ओनियन, रवा ओनियन मसाला, रवा म्हैसूर मसाला या डोशांनाही मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. येथे दर दिवशी ४०० ते ५०० मसाला डोसा अगदी सहज संपतात, असे दुकनाचे मालक गणेश नाडार आणि रामन यांनी सांगितले. चीज ओनियन मसाला डोसा, म्हैसूर साधा डोसा, बटर म्हैसूर सादा डोसा, चीज म्हैसूर साधा डोसा, शेझवान सादा डोसा आदी डोश्यांना अधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच येथे गरमागरम मेदुवडा सांबर खाण्यासाठी खवय्ये गर्दी करतात. १००-२०० मेदुवडा प्लेट येथे सहज संपतात. दुकान अतिशय छोटे असल्याने येथे उभ्यानेच खावे लागते. डीश ठेवायला कडाप्प्याची लादी टाकण्यात आली आहे. मात्र गर्दीच्या वेळी ती अपुरी पडते. मग हातात ताट घेऊन लोक चक्क बाहेर उभे राहून खातात. आता थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे गरमागरम पदार्थावर खवय्ये अधिक ताव मरताना दिसून येत आहेत. सांबार बनवताना कांदा, टोमॅटो, राई, लसूण, तुरडाळ आदी पदार्थाचा वापर केला जातो. इथे बनविले जाणारे सांबार खूप चविष्ट असते. त्यामुळे एक प्लेट डोसा किंवा उत्तपा घेतला तर दोन मोठय़ा वाटय़ा सांबार खवय्ये मागून घेतात. सांबार नसेल तर आमच्या पदार्थाची खासियतच काय असा सवाल रामन करतात.


सांबार आणि त्यासोबत दिली जाणारी ओल्या नारळाची चटणी याशिवाय दाक्षिणात्य पदार्थ पूर्ण होऊच शकत नाही. चटणी आणि सांबाराच्या वाटीने सजलेले ताट पोटपूजा करण्याआधी मस्त पाहत राहावेसे वाटते. येथील डोसे हे पातळ आणि कुरकरीत असतात. दाक्षिणात्य पदार्थाची हीच खासियत असल्याचे गणेश नाडर यांनी सांगितले. ठाणे स्थानक परिसरात भुकेल्या पोटी असाल तर गणेश डोसा सेंटरची पायरी चढायला हरकत नाही.

कुठे-गणेश डोसा, ठाणे रेल्वे स्थानक, ठाणे (प.)

कधी- सकाळी ८.३० ते रात्री १०









भाग्यश्री प्रधान |
by - Loksatta

माझ्याबद्दल