मंगळवार, २९ मार्च, २०१६

शिसाळ बंधूंचे आदर्श बंदिस्त शेळीपालन

सध्याच्या महागाईच्या तसेच पाणीटंचाईच्या काळात शेळीपालनाचे व्यवस्थापन सांभाळणे आर्थिकदृष्ट्या सोपे नाही; मात्र सांगली जिल्ह्यातील पलूस येथील शिसाळ बंधूंनी सुयोग्य व्यवस्थापनाद्वारे आफ्रिकन बोअर जातीचे बंदिस्त शेळीपालन विकसित करून अन्य शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
श्‍यामराव गावडे
सांगली जिल्ह्यात पलूस येथील तुकाराम मारुती शिसाळ हे मेंढपाळ होते. दिवसभर पलूस व परिसरात मेंढ्या चारणे व शेतावर मेंढ्या बसवणे हे काम त्यांच्याकडे अहोरात्र सुरू होते. पुढे आनंदा, गोविंद व संदीप शिसाळ ही मुले त्यांना व्यवसायात मदत करू लागली. वयपरत्वे तुकाराम शिसाळ थकले, त्यातच बागायती क्षेत्रामुळे चराई क्षेत्रात झालेली घट या व्यवसायासाठी अडचणीची ठरत होती.

अशी घेतली प्रेरणा
शिसाळ बंधूंमधील सर्वांत धाकटे संदीप यांनी फलटण परिसरात बंदिस्त शेळीपालनाचा गोठा सर्वप्रथम पाहिला तो 2000 मध्ये. आपण पारंपरिक मेंढ्या सांभाळण्याऐवजी अशा पद्धतीने शेळ्यांचे व्यवस्थापन केले तर यशस्वी होऊ, अहोरात्र भटकण्याचा त्रास कमी होईल व आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास होईल, असा विचार त्यांनी केला. तेथील एका नामवंत संस्थेतून आफ्रिकन बोअर जातीच्या पाच शेळ्या आणल्या.

सुरवातीला या शेळ्यांसाठी साधा गोठा व छप्पर केले. पुढे या पाच शेळ्यांचे नर विकले. शेळ्यांची संख्या वाढू लागली, त्यावेळी पूर्वी असलेल्या पारंपरिक शेळ्या विकायचा निर्णय झाला. टप्प्याटप्प्याने बंदिस्त गोठ्यातील शेळ्यांची संख्या 100 वर गेली.

असे होते शेळीपालन
शिसाळ बंधूंच्या बंदिस्त गोठ्यात आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्या आहेत. शिसाळ यांची पलूसपासून दोन किलोमीटर अंतरावरील गोंदीलवाडी नजीक शेती आहे. तिथे तिघे भाऊ एकत्र राहतात. 70 फूट रुंद व 250 फूट लांबीचा गोठा आहे. मधे जाण्या-येण्यासाठी रस्ता, बाजूला सिमेंटच्या गव्हाणी आहेत. तशाच गव्हाणी वीस फुटांनंतर एक अशा आडव्याही आहेत. शेळ्यांना मान बाहेर करून चहूबाजूंनी चारा खाता यावा हा त्यामागील उद्देश आहे. आडव्या गव्हाणीत एका बाजूला सुरवातीला नळ जोडून पाणीसाठा केला आहे, त्यामुळे शेळ्यांना पाणी पिणे सोपे झाले आहे. गोठ्याच्या बाहेर दहा फूट अंतरावर मोकळ्या जागेत गोठ्यासभोवती जाळी आहे. उन्हात व खेळत्या हवेत शेळ्यांना मोकळे फिरता यावे यासाठी ही रचना आहे. गव्हाणीत मका, सरकी पेंड, तुरीचे भुसकट, हत्ती गवत, कडवळ यांची कुट्टी दिवसातून दोन वेळा दिली जाते. बंदिस्त गोठ्यात वीस बाय वीस आकाराचे छोटे कप्पे आहेत. एका कप्प्यात बारा ते पंधरा शेळ्या मुक्तपणे सोडल्या जातात. सकाळी एकवेळ गोठ्याची स्वच्छता केली जाते. शेळी व्यायल्यानंतर करडे शेळीजवळ ठेवले जाते. त्यानंतर ते बाजूला घेऊन दुसऱ्या कप्प्यात ठेवले जाते. सकाळ - संध्याकाळ दूध पाजण्यासाठी ती करडे आईजवळ आणली जातात. दोन मजूर यासाठी दिवसभर काम करतात. तांबूस पांढऱ्या रंगातील बोअर जातीच्या शेळ्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. शेळी गंभीर आजारी असेल तरच पशुवैद्यकाला बोलावले जाते.

विक्री व्यवस्थापन
शिसाळ यांच्या गोठ्यावर धष्टपुष्ट नर आहेत. त्यांची वर्षभर चांगली जोपासना केली जाते. बकरी ईदच्या सणाला कुर्बानीसाठी या मोठ्या नरांना जास्त मागणी असते. मुंबई, आंध्र, तमिळनाडू येथील व्यापारी येऊन त्यांची खरेदी करतात. स्थानिक पातळीवर पाच ते सहा महिन्यांच्या करडांचीही किरकोळ विक्री केली जाते. गोठ्यावरच करडांचे वजन करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा उभारला आहे.

शेळ्यांच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. सकाळी गोठा साफ करताना शेळीच्या माजाची लक्षणे ओळखली जातात. त्या आधारे नर पुढील पैदास होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सोडला जातो. एक शेळी वर्षात दोन वेळा व्याते.

साधली आर्थिक प्रगती शिसाळ बंधूंची पाच ते सहा एकर जमीन असून त्याठिकाणी द्राक्ष बाग आहे. पलूस शहरात कृषी सेवा केंद्र आहे. आनंदा मुख्यत्वे करून शेळ्यांची जबाबदारी सांभाळतात. गोविंद हे द्राक्ष बाग व अन्य शेतीकामांकडे लक्ष पुरवतात. संदीप हे एकूण कारभाराचे नियोजन करीत कृषी सेवा केंद्र सांभाळतात. कष्ट आणि कामावर श्रद्धा ठेवल्यास प्रगती अटळ असते हे शिसाळ बंधूंच्या वाटचालीतून दिसून येते.

आपल्या शेळीपालन व्यवसायाबाबत बोलताना संदीप म्हणाले, की सध्या आमच्याकडे 150 ते 175 शेळ्या आहेत. पैदास या हेतूने आम्ही मादी व नर यांची विक्री करतो. वर्षाला त्या पद्धतीने लहान वयाची 60 ते 100 पर्यंत जनावरे विकली जातात. आमचे ग्राहक गोठ्यावर येऊन खरेदी करतात. बकरी ईदसारख्या सणांसाठी नरांचे चांगले संगोपन करून त्यांचीही विक्री त्यावेळी केली जाते. वजनाप्रमाणे प्रति बोकडाला दहा हजारपासून ते 25, 50 हजारपर्यंतही दर मिळाला आहे. काही वजनदार बोकडांना यापूर्वी प्रति 85 ते 95 हजार रुपयांपर्यंतही दर मिळाला होता. शेळीपालनातील एकूण विक्रीतून वर्षाला सुमारे 20 लाख रुपये उत्पन्न तरी मिळते. शेळ्यांसाठी आरोग्य व्यवस्थापन, खाद्य व अन्य देखभाल असा किमान साडेपाच लाख रुपये खर्च तरी येतो.

शिसाळ बंधूंनी दिल्या शेळीपालनाच्या टिप्स
- आफ्रिकन बोअर शेळ्यांना सोन्यासारखी मागणी आहे.
- गाई- म्हशींमध्ये गाभण अवस्था, वेताचा काळ या गोष्टी विक्रीमध्ये महत्त्वाच्या असतात; मात्र शेळी वाढीच्या कोणत्याही अवस्थेत विकता येते.
- सध्या मटणाचे भावही वाढले आहेत, त्यामुळे शेळीपालनाला वाव आहे.
- आफ्रिकन बोअर जात रोगप्रतिकारक आहे. उष्ण तसेच थंडीच्या तापमानातही ती चांगली तग धरते.
- खाद्य विशिष्टच दिले पाहिजे असे नाही. या जातीचे वजन अन्य शेळ्यांच्या तुलनेत वेगाने वाढते.
- बंदिस्त गोठापालनामुळे लेंडीखत भरपूर व शुद्ध मिळते. आम्हाला वर्षाला किमान 20 ते 25 ट्रॉली खत त्यातून उपलब्ध होते. त्याचा वापर द्राक्षशेतीला होतो. हे खत विकता देखील येते.
- बंदिस्त पद्धतीमुळे शेळ्यांच्या मुक्त फिरण्यावर मर्यादा येऊन रोगांचा संसर्ग टाळणे शक्‍य होते.
- वर्षातून दोन महत्त्वाच्या रोगांसाठी लसीकरण केले जाते. जंतनाशकाचा वापरही केला जातो. गोठ्याची जागा निर्जंतुक केली जाते.
- जनावरांना त्यांच्या वयानुसार मका, सरकी पेंड, मिनरल मिक्‍श्चर दिले जाते.


संपर्क - संदीप शिसाळ - 9226395206






http://www.agrowon.com/Agrowon/20121003/5031737510136632787.htm

शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग


शेतीबरोबरच शेती पूरक उद्योग केल्यास नेहमीच फायदेशिर ठरतो, कमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार असा व्यवसाय म्हणजे शेळी पालन. असे असले तरीही ह्या व्यवसायाचे शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन केल्यास आपल्या मिळकतीत अधिक भर पडु शकते.

प्रस्तावना:
  • भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे.
  • शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर आहे.
  • देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते.
  • आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.
शेळयांच्या जाती 
  • भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी, सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात.
  • विदेषी जातीच्या शेळया उदा. सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात.
  • अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते.
  • आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.
शेळी
मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जातीच्या् शेळ्या खालीलप्रमाणे 
  1. उस्मानाबादी- अर्धबंदीस्त् शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी]
  2. संगमनेरी – अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी]
  3. सिरोही – अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी]
  4. बोएर – बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी]
  5. सानेन- बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[दूधासाठी]
  6. कोकण कन्याळ: अर्धबंदीस्तस शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी]
बंदीस्त शेळीपालन  –
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
Goat1
अर्धबंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता –
अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे चराऊ कुरणांचे उपलब्धतेनुसार शेळ्यांना पाच ते सात तास बाहेर चारून संध्याकाळी गोठ्यात आल्यावर थोडाफार चारा तसेच पूरक आहार देऊन शेळीपालन करणे. या पद्धतीमध्ये शेळ्यांचा आहारावरचा खर्च 60 ते 70 टक्के कमी होतो. बागायती भागात जेथे चराऊ कुरणांचा तुटवडा आहे तेथे हे शेळीपालन शक्‍य होते.
goat2
बंदीस्त / अर्धबंदीस्त शेळीचे व्यवस्थापन –
  • शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया प-हाटया यांच्या सहायाने करावे.
  • प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी.
  • कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
  • गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी घ्यावी.
  • करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी.
  • दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत.
  • शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
  • आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.
  • शेळ्यांचे ऊन – पावसापासून संरक्षण करता येईल, अशा पद्धतीने गोठा बांधावा.
  • शेळ्यांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत. मल-मूत्राची रोजच्या रोज विल्हेवाट लावावी. गोठ्यात स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. गोठ्यात हवा खेळती असावी.
  • बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यआक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी.
  • त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.
 Goat

शेळ्या आणि बोकडांची निवड :
  • शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी.
  • शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात.
  • एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते.
  • तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते.
  • दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.
  • दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी.
  • शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे.
  • केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.
  • शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत.
  • शक्यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी.
  • पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी.
  • तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी.
  • दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.
  • बोकडाची निवड कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते.
  • शुद्ध जातीचाच बोकड शक्यपतो विकत घ्यावा. ते न जमल्यास निदान सुधारित जातीचा बोकड घ्यावा.
  • विकायला आलेल्या बोकडांपैकी सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्या
  • ची छाती भरदार असावी व पायांत भरपूर अंतर असावे. शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असावा. पाय मजबूत व खूर उंच असावेत.
  • बोकड मारका नसावा. तो चपळ व माजावर आलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असावा.
  • डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा. या लक्षणांवरून पुढील पिढीत चांगले गुणधर्म संक्रमित होण्याची शक्य ता कळते.

शेळीपालनाचे अर्थशास्त्र:
१)      अनावर्ती खर्च
शेळ्याची घरे १५ मि × १५ मि = २२५ चौ. मिटर प्रति चौरस मिटर ७००/- रु १५,७५० /-
शेळ्याची खरेदी प्रतिशेळी (देशी) १००० रु. व बोकड १७०० रु.( सुधारीत जातींचे) २३,४०० /-
किरकोळ साहित्य टब ,बादल्या ,दोर १,००० /-
एकंदर अनावर्ती खर्च ४०,१५० /-

२) आवर्ती खर्च



अ) खाद्य : २२ शेळ्या १५० ग्रॅम प्रति शेळी × २२ = ३.३ किलो प्रतिदिन × ५४० ( १८ महिने) = १८ किंटल × ६५० /- रु . प्रति किंटल
पिलांकरिता खाद्य सरासरी २५ पिले प्रति वेत तर १८ महिन्यात २ वेळा म्हणून एकंदर पिले ५०× ५० ग्रॅम प्रति पिलु प्रति दिन , २५०० ग्रॅम  २.५ किलो × सहा महिने ४५० किलो × ६०० रु. प्रति क्विंटल
 

१७,००० /-



२,९०० /-
ब) हिरवा चाराः  २० शेळ्या + २ बोकड × १.५ किलो = ३३१ किलो × ५४० दिवस (१८ महीने) = १८ टन तर पिल्लांना १/२ किलो प्रमाणे ९० किलो × ५० पिले ४.५ ग्रॅम एकंदर २२.५ टन (१००० रु. टनाप्रमाणे)  

२२,५००/-
क) वाळलेले गवत प्रतिशेळी २५० ग्रॅम तर पिले १०० ग्रॅम एकंदर ३ टन ८०० रु.टनाप्रमाणे २,४००/-
ड) मजुरी – १ मजुर ४० रु. प्रतिदिनाप्रमाणे ५४० दिवस २१,६००/-
इ) विद्युत खर्च प्रतिमाह रु. प्रमाणे १८ महीने ३,६००/-
ई) शेळ्याचा विमा- २२ शेळ्या किंमतीनूसार (४० रु. प्रति हजार प्रमाणे) १,०००/-
उ) औषधी २,०००/-
ऊ) किरकोळ खर्च ,०००/-

एकदंर आवर्ती  खर्च ७५,०००/-


उत्त्पन्न
अ) एकंदर पिल्ले ५० यातून १० टक्के मृत्युचे प्रमाण ( ५० -५ ) = पिले यात २२ नर व २३ मादा २२ नर १२०० रु. प्रमाणे, २३ मादा ९७० रु. प्रमाणे ४७,१००/-
ब) दुध विक्री २० शेळ्याचे सरासरी प्रती वेतात ( ९० दिवसात ) १०० लिटर प्रमाणे २ वेतात २०० लिटर × २० शेळ्या ७ रु. लिटर प्रमाणे २८,०००/-
क) बारदाना ( रिकामी पोती ) ७५ × १८ १,३५०/-
ड) खत विक्री : २२ शेळ्या व ५० पिले अंदाजे ५५ गाड्या × २५० रु. प्रतिगाडी १३,७५०/-

एकदंर उत्त्पन्न ९०,२००/-



गाभण शेळीची जोपासना –
  • गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी.
  • तिला ओला व सुका चारा आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी.
  • शेवटच्या दोन – तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण आहार द्यावा.
  • शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्य क असते.
दुभत्या शेळीची जोपासना –
  • दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त ऊर्जेची आवश्ययकता भासते.
  • म्हणून त्यांना ओल्या व सुक्याे चाऱ्यासोबतच 100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा.
  • चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.
करडांची जोपासना –
  • करडाच्या जन्मानंतर शेळी त्या पिल्लाला चाटू लागते; मात्र असे न घडल्यास कपड्याने करडास स्वच्छ पुसून घ्यावे.
  • नाका-तोंडातील चिकट द्रव स्वच्छ करून घ्यावा.
  • नाळ स्वच्छ ब्लेडने कापून टिंक्च र आयोडीन लावावे.
  • करडास एक – दोन तासांतच शेळीचा चीक पाजावा.
  • करडाने नैसर्गिकरीत्या चीक न प्यायल्यास त्याला तो काढून पाजावा.
  • दोन – तीन आठवड्यांनंतर त्याला कोवळा पाला द्यावा. पहिले तीन – चार महिने दूध पाजावे.
  • त्यानंतर मात्र त्याला शेळीपासून तोडून चरण्यास सोडावे.
पैदाशीच्या बोकडाची जोपासना
  • पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची निवड करावी.
  • निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे, तो मारका नसावा.
  • अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा, खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
शासकिय योजना :
  • राज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी 40 + 2 शेळयांचे 50% अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे.
  • सदर योजनेमध्ये एकूण 660 गट वाटप करायचे आहे.
  • या योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई व कोकण आणि अवर्षण प्रवण भाग वगळून) या योजनेमध्ये लाभार्थीची निवड जिल्हा स्तरीय समिती मार्फत या महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचे स्तरावर करण्यांत येईल.
राज्यातील शेळी-मेंढी पालन करणा-या सहकारी संस्था:-
महाराष्ट्रात एकण २२५० शेळी-मेंढयांच्या सहकारी संस्था आहेत. त्यांचा तपशिल खालिलप्रमाणे
१. पश्चिम महाराष्ट्र – ४५०
२. मराठवाडा – ३८०
३. विदर्भ – १७०
४. कोकण – २५
५. खानदेश – १२००
एकूण – २२२५
महाराष्ट्र राज्यातील शेळया-मेंढयासाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्था
१. निंबकर अग्रिकल्चर रिसर्च इन्सिटयुट (NARI) फलटण.
२. BAIF डेव्हलपमेंट रिसर्च फॉऊंडेशन उरळीकांचन पुणे.
३. अंतरा, पुणे.
४. BOSCO, ग्रामिण विकास केंद्र, कडेगांव, नगर-पुणे- मार्ग, अहमदनगर.
५. रुरल अग्रिकल्चर रिसर्च इन्सिटयुट नारायणराव (RAIN).
६. कृषी विज्ञान केंद्र बारामती जिल्हा पुणे.

सोमवार, २१ मार्च, २०१६

"जंगल' उभारणारा ध्येयवेडा अवलिया माणूस

"जंगल' उभारणारा ध्येयवेडा अवलिया माणूस



लातूर - एखादं रोपटं लावून त्याची प्रसिद्धी घेणाऱ्यांची संख्या समाजात लक्षणीय आहे. परंतु प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहत गेली 36 वर्षे अव्यह्यातपणे झाडे लावत आसाममधील ब्रह्मपुत्रे वालुकामय प्रदेशाला जंगलाचे रूप देण्याचे काम एका आदिवासी व्यक्तीने केले आहे. या व्यक्तीच्या कामाची देशानेच नव्हे तर जगानेदेखील आता दखल घेतली आहे. जादव पायेंग असे या अवलिया व्यक्तीचे नाव आहे. "ग्रीन इंडिया‘चे ते स्वप्न पाहत आहेत. 

येथील "वेध‘च्या व्यावसायिक प्रबोधन परिषदेच्या निमित्ताने श्री. पायेंग येथे आले होते. त्यांनी "सकाळ‘ गप्पा मारत करत असलेल्या कामाची माहिती दिली. पायेंग दहावीत शिकत असताना एका वर्षी उष्माघातामुळे ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर शंभर ते दीडशे साप मरण पावल्याचे त्यांना दिसून आले. साप कशाने मृत्युमुखी पडले?, साप वाचविण्यासाठी काय केले पाहिजे? हे ते शोधत असताना गावातील कृषी तज्ज्ञ येदूनाथ बेसबुरवा यांनी साप वाचविण्यासाठी झाडे लावण्याचा त्यांना सल्ला दिला. तेथूनच त्यांनी झाडे लावण्याच्या कामाला सुरवात केली. 

ब्रह्मपुत्रेच्या वालुकामय प्रदेशात दररोज झाडे लावण्याचा पायेंग यांचा उपक्रम सुरू आहे. केवळ झाडे लावायचेच नाही तर ते जगली पाहिजेत, या करिता ते प्रयत्न करीत आहेत. हे काम करीत असताना लोकांनी त्यांना वेडंही ठरवलं. पण एक ध्येय घेऊन ते काम करीत आहेत. झाडे लावणे हे त्यांचे जीवनकार्य समजून 36 वर्षांत 25 किलोमीटर अंतरात एक हजार 370 हेक्‍टर क्षेत्रात जंगल उभारले आहे. 

आदिवासी समाजात लग्नही लवकर केली जातात. पण जादव पायेंग यांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. झाडे लावण्याचा इतका छंद त्यांना जडला गेला की ते लग्नही करायलाही वेळ लागला. वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी लग्न केलं. त्यांचे कुटुंब आज त्यांच्या कामात आहे. 

पायेंग यांनी उभारलेल्या या जंगलात बांबू तसेच अनेक वनौषधी आहेत. सर्व खाण्याच्या वस्तू त्यांना जंगलातूनच मिळतात. त्यांच्या या जंगलाचा मोह प्राण्यांनाही पडला. यातूनच आज या जंगलात 150 हत्ती, पाच वाघ , शंभर पेक्षा जास्त हरीण आहेत. 

काही वर्षांपूर्वी हत्तींनी परिसरातील पीक नष्ट केलं होतं. त्यातून ग्रामस्थ त्यांना मारण्यासाठीही उठले होते. त्यावेळी पायेंग यांनी अगोदर मला मारून टाका नंतर हत्तीला मारा, अशी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांना व प्रशासनालाही नरमाईची भूमिका घ्यावी लागली. एक माणूस जंगल उभारू शकतो हे कोणालाही खरे वाटत नाही. पण ते काम पायेंग यांनी केले आहे. देशानेच नव्हे तर जगाने त्यांची दखल घेतली आहे. आजपर्यंत त्यांच्या या जंगलाला अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, इस्त्राईल, थायलंड, चीन, बेल्झीयम, कॅनडा , दक्षिण कोरिया, अशा अनेक देशाच्या प्रतिनिधींनी भेट दिली आहे. 

राष्ट्रपतींच्या अखत्यारित "जंगल‘ असावे 
जंगल ही आपली संस्कृती आहे. वाढत्या लोकसंख्येत ती नष्ट केली जात आहे. भविष्यात आणखी वृक्ष तोड होण्याची भीती आहे. राजकीय हस्तक्षेप वाढत चालल्याने जंगलतोड होत आहे. त्यामुळे देशातील सर्वच जंगल राष्ट्रपतींच्या अखत्यारित देण्याची गरज आहे. "झाडे लावा झाडे जगवा‘ हे केवळ पुस्तकात सांगून किंवा पर्यावरण दिन साजरा करून चालणार नाही तर दहावीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या ऑक्‍सिजनसाठी किमान दोन झाडे लावून ती जगवली पाहिजेत 
- जादव पायेंग, फॉरेस्ट मॅन, आसाम 






- हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2016 - 10:15 AM IST

'नागार्जुन’ वनौषधी उद्यान

नागार्जुन’ वनौषधी उद्याननागार्जुन’ वनौषधी उद्यान



अकोल्याचं हे नागार्जुन वनौषधी उद्यान. दुर्मिळ वनौषधींचं जतन करणारं उद्यान म्हणून नागार्जुन उद्यानाची ओळख आहे. १९७६ साली अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या उद्यानाची सुरुवात झाली. आयुर्वेदात मोठं योगदान देणाऱ्या नागार्जुन ऋषीचं नाव या उद्यानाला देण्यात आलं. गेली ३५ वर्षे हे उद्यानं दुर्मिळ अशा वनौषधी वनस्पतींचं जतन करत आहे.
देशातल्या वेगवेगळ्या भागातून गोळा केलेल्या दुर्मिळ वनस्पतींचं या उद्यानात जतन केलं आहे. १९९४ हे वर्ष या उद्यानासाठी सुवर्ण वर्ष ठरलं. १९९४ रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने म्हणजेचं आयसीएआरने (I.C.A.R) केलेल्या मदतीनंतर या उद्यानाने खऱ्या अर्थाने कात टाकली.
आय.सी.ए.आर.च्या औषधी आणि सुगंधी वनस्पती या अखिल भारतीय समन्वयक प्रकल्प प्रकल्पांतर्गत उद्यानाची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर नागार्जुन उद्यानाने कधी माग वळून पाहीलच नाही.
नागार्जुन उद्यानात शतावरी, काळमेघ, अश्वगंध, सफेद मुसळी, इसबगोल, सताब, खडसिंग यांसारख्या दुर्मिळ वनौषधी वनस्पतींचाही समावेश आहे. यातील बऱ्याचशा वनस्पतींचा संग्रह मेळघाट, विंध्य आणि पूर्वोत्तर भागातूनही केलाय़. नागार्जुन उद्यानात केंद्र सरकारनं घोषित केलेल्या यादीतील अनेक दुर्मिळ वनस्पतींचं जतन केलं आहे.
नागार्जुन हे उद्यान आता फक्त वनौषधी संवर्धनापुरतंच मर्यादित नाहीए, तर या उद्यानाच्या माध्यमातून विद्यापीठाने आता वनौषधी शेतीचा प्रसारही सुरु केला आहे. एखाद्या शेतकऱ्याला वनौषधी शेती करायची असेल तर त्यांना तंत्रज्ञान, बीज आणि कलमं पुरवण्याची सोयही इथे आहे. नागार्जुन उद्यानातून कलमं घेऊन अनेक शेतकऱ्यांनी वनौषधी शेतीची सुरुवात केली आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या वनौषधी विभागाच्या मुख्यालयाचा दर्जा या उद्यानाला देण्यात आला आहे. नागार्जुन हे वनौषधी उद्यान म्हणजे देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं केंद्र आहे. अनेक शेतकरी आणि विद्यार्थी या उद्यानाला भेट देतात.
आज वनौषधी उत्पादनात चीनचा मोठा दबदबा आहे. त्या तुलनेत आपल्या देशाला या क्षेत्रात फार मोठी मजल मारायची आहे. सध्या आपल्या देशात १०हजारांवर आयुर्वेदिक औषधांचे कारखाने आहेत. त्यासाठी लागणाऱ्या ९५ टक्के वनस्पती जंगलातून आणल्या जातात. ७० टक्के वनस्पती चुकीच्यापद्धतीमुळे समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या आपल्या देशातील ४० मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याच्या वाटेवर आहेत.
First Published: Thursday, 12 May 2011 1:14 AM--- ABPMajha

वनौषधी संवर्धन प्रकल्प

शेतकरी राबवणार वनौषधी संवर्धन प्रकल्प

मालवण तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून वनौषधींचे जतन व्हावे तसेच दुर्मीळ होणा-या वनौषधींची लागवड होऊन संवर्धन करता यावे, यासाठी वनौषधी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 
मालवण- मालवण तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून वनौषधींचे जतन व्हावे तसेच दुर्मीळ होणा-या वनौषधींची लागवड होऊन संवर्धन करता यावे, यासाठी वनौषधी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तालुक्यातील सात गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून सुमारे १०० शेतक-यांना याचा फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
मालवणमध्ये मोठय़ा प्रमाणात वनौषधी उपलब्ध आहे. तसेच वनौषधी उपचार करून घेणा-या रुग्णांचीही संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. तालुका कृषी विभागाने ‘आत्मा’अंतर्गत २०१०-११मध्ये तालुक्यातील वैदूंची कार्यशाळा सुरू केली होती. या कार्यशाळेला मोठय़ा संख्येने स्त्री-पुरुष वैदूंनी हजेरी लावली होती. यानंतर या वैदूंना प्रमाणपत्र देण्यात आले. तालुक्याचे हवामान वनौषधी लागवडीला पोषक आहे. तसेच येथील वैदूंना औषधी वनस्पतींबाबत पारंपरिक चांगले ज्ञान आहे. आयुर्वेदाकडे लोकांचा कल वाढत आहे. स्थानिकरीत्या वनौषधीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे मालवण तालुक्यात औषधी वनस्पती लागवड प्रकल्प राबवण्यात यावा, असा अधिका-यांचा मानस आहे. त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करत राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे पाठवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या प्रधान सचिवांसमोर हा प्रकल्प सादर करण्यात आला असून त्याला सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
१० हेक्टर क्षेत्रफळात हा प्रकल्प करण्यात येणार असून आंबडोस, साळेल, आंबेरी, वडाचापाट, हिवाळे, तळगांव, सुकळवाड या गावांत प्रकल्पाला प्रस्थापित करण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे १०० शेतकरी वनौषधी शेती करणार आहेत. नामशेष होणारी वनौषधी लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त पडीक जमीन या शेतीच्या लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योगासाठीही मोठा वाव असून प्रकल्प यशस्वी झाल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
प्रकल्प अंमलबजावणीनंतर वैद्यांना नवीन तंत्रज्ञान मार्गदर्शन, गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतीची ओळख, काढणीपश्चात तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने वनौषधी विक्रीला मोठा वाव आहे. त्यामुळे वनौषधी आधारित छोटे उद्योग उभे करण्यास संधी राहणार आहे. वनस्पतींचे संवर्धन करून अर्क व आयुर्वेदिक गोळय़ांच्या विक्रीसही चालणार मिळणार आहे. शेती शाळा, शेतकरी सहल, प्रात्यक्षिके, पल्पराइझर असे उपक्रम सरकार राबवणार आहे. पॅकिंग युनिट, साठवणी व वळवणी केंद्र उभारला जाणार आहेत.
या वनौषधींची होणार लागवड
प्रस्तावित औषधी लागवड प्रकल्पांतर्गत शतावरी, अश्वगंधा, सर्पगंधा, अडुळसा, कळलावी, सफेद मुसळी, वेखंड, ब्राह्मी, गुळवेल, गुंज, वावाडिंग, रक्तचंदन, बिवळा, बिबा, हिरडा, बेहडा, आवळा, बेल, ऐन, सीताअशोक, अर्जुन, केवडा या वनौषधी लागवडींवर भर राहणार आहे.
केंद्राकडून राज्यासाठी ९ कोटींचा निधी प्राप्त
औषधी वनस्पती लागवड सहकारी तत्त्वावर अधिक फायदेशीर ठरते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियानांतर्गत औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन कार्यक्रमासाठी ९ कोटी १३ लाख २१ हजार रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. मंजूर आराखडय़ानुसार ८० प्रकारच्या वनौषधी वनस्पतींची राज्यात लागवड केली जाणार असून यासाठी ६५ लाख ७६ हजार रुपये उपलब्ध निधीत तरतूद करण्यात आलेली आहे. ६९५ हेक्टरवर वनौषधी लागवड केली जाणार आहे.






सौजन्य - दै. प्रहार ६.१.१४  

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

भविष्यासाठी पाणी वाचवा

भविष्यासाठी पाणी वाचवा

विजेनंतर घरात सर्वाधिक वापरली जाणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पाणी. खरं तर विजेइतकंच पाणीदेखील आपण अतिशय बेजबाबदारपणे वापरत असतो, ज्याची बचत करणं आजच्या काळात अधिक गरजेचं आहे. घरातला पाणीवापर कसा आटोक्यात ठेवता येईल ते आपण पाहूया.
CONSERVE-WATER-GLOBE-HANDSअसं म्हटलं जातं की जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरूनच होईल. आता जागतिक युद्धाचं राहू द्यात पण पाण्यावरून गल्ली-मोहल्ल्यात कितीतरी भांडणं होताना आपण रोजच पाहत असतो. पाणीटंचाई केवळ ग्रामीण भागातच जाणवते असं नाही तर तिची तीव्रता शहरी भागातदेखील तेवढीच आहे. शहरात फक्त घराघरात हाताशी धो धो पाणी वाहणारे नळ असतात, त्यामुळे ही तीव्रता तेवढय़ा गंभीरतेनं जाणवत नाही एवढंच. पण शहरातही कित्येकदा अचानक बोअरिंग वेलचा पंप बंद पडल्यानंतर किंवा नगरपालिकेनं पाणीकपात जाहीर केल्यावर नळाचंच नव्हे तर आपल्याही तोंडचं पाणी पळतं व त्रेधा उडते. परंतु अशी वेळ येण्यापूर्वीच आपण पाण्याची बचत केली तर चांगलं नाही का.. घरात आपण दहा टक्के पाण्याचा वापर हा एकटय़ा किचनमध्ये करत असतो. शिवाय कपडे-भांडी धुणं, स्वयंपाक आणि इतर कामांसाठीही करत असतो. त्याव्यतिरिक्त पाणी अंघोळीसाठी, शौचालयात व साठवण्याच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर वापरलं जातं. आता हे प्रमाण आपल्याला नियंत्रणात कसं ठेवता येईल ते पाहू. पाण्याचा जास्त वापर स्वयंपाकासाठी केला जातो. तिथं पाण्याचा वापर कमी होतो आहे असं वाटलं तरी ते बरेचदा फुकट जात असतं.
  • भाज्या, तांदूळ, डाळ धुतलेलं पाणी शक्यतो साठवून ठेवावं आणि इतर ठिकाणी वापरात आणावं. उदाहरणार्थ हेच पाणी तुम्ही कुकरमध्ये तळाला घालू शकता.
  • डिप फ्रिझरमधून वस्तू काही तास आधीच काढून ठेवाव्यात, त्या नॉर्मल तापमानाला आणण्यासाठी पाण्यानं धुऊ नयेत.
  • अन्नपदार्थ उकडण्यासाठी पाण्याऐवजी शक्यतो वाफेचा वापर करावा.
  • किचनमधील भाज्यांसारखे पदार्थ किंवा वस्तू धुण्यासाठी एकाच मोठय़ा भांडय़ात पाणी घेऊन त्यातच धुवा, वाहत्या नळाचा वापर करू नका.
आज भरून ठेवलेलं पाणी उद्या फेकून देण्याची चूक कधीही करू नका. साठवणीच्या पाण्याच्या बाबतीतही अनेक जण बेपर्वाईनं वागत असतात. अनेकांच्या घरी एक किंवा दोन पाण्याच्या टाक्या असतात. त्यामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी अशी माणसं पर्वा करत नाहीत. टाकी साफ करायची वेळ येईल तेव्हा शक्यतो पाणी कामांसाठीच वापरून टाकी रिकामी करा, नंतरच ती साफ करायला घ्या. बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये आपण घरातल्या ७५ टक्के पाण्याचा वापर करतो. यात सर्वाधिक पाणी फुकट जातं ते शॉवरखाली अंघोळ केल्यामुळे किंवा वाहत्या नळाखाली भांडी घासणं, कपडे धुणं या प्रकारांमुळे. त्याऐवजी मोठय़ा टबात आवश्यक तेवढंच पाणी साठवून ही कामं केली तर पाण्याची खूप बचत होईल. झाडांना पाणी घालताना शक्यतो ऋतुमानानुसार पाण्याची गरज ओळखूनच झाडांना पाणी घालावं. उन्हाळ्यात ठिबक सिंचनाचा वापर करावा. एकूणच वाहत्या नळाखाली काम करणं टाळलंत तर बरीच मोठी पाणीबचत होईल. शेवटी पाण्याची बचत म्हणजे आपल्या भविष्यासाठीचीच बचत या दृष्टीनं आजच पाण्याचा योग्य तितकाच सांभाळून वापर करायला सुरुवात करा आणि एका चांगल्या भविष्याची सुरुवात करा.






सौजन्य : दै- प्रहार

जलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा!

जलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा!

'पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती' ही बाब आज सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी. पाणी म्हणजे जीवन असल्याकारणानं ते सर्वांनाच हवंय. पण याच पाण्याची उधळपट्टी न करता, पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आज प्रत्येकानंच जलसाक्षर होण्याची गरज आहे. यापुढची युद्धं पाण्यावरून होतील असं भाकीत केलं जातंय. त्यामुळं या समस्येकडं गांभीर्यानं बघायला पाहिजे. जागतिक जलदिनानिमित्त जलसाक्षरतेमुळं कशी प्रगती होते, याचाच घेतलेला एक आढावा.
 

image'पाणी-प्रत्येक थेंब महत्वाचा'
जागतिक तज्ज्ञांच्या मते भारताची लोकसंख्या २०२५ सालापर्यंत १५० कोटी होणार आहे. माणसाच्या दैनंदिन गरजेसाठी माणशी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरलं जातं. नागपूर, पुणे-मुंबईसारख्या शहरात तर हेच वापरायचं प्रमाण २०० प्रति लिटरपर्यंत जातं. पाण्याचा असाच वापर होत राहिला तर येत्या दहा-पंधरा वर्षात पाणी समस्या उग्र रूप धारण करील असं भाकीत केलं जात आहे.

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती
आपल्या देशात सर्वाधिक पाण्याचा वापर शेतीसाठी होतो. मात्र शेतीसाठी आता पारंपरिक पद्धती सोडून ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास उपलब्ध पाण्यात चारपट पीक घेता येऊ शकतं, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झालंय. मात्र अजूनही या नव्या पद्धतींचा स्वीकार शेतकर्‍यांनी म्हणावा तितका केला नाही.


दूषित पाण्याचा पुनर्वापर- औद्योगिक क्षेत्रानं घ्यावा पुढाकार
शेतीपाठोपाठ उद्योगधंद्यासाठीही पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या उद्योगधंद्यासाठी वापरात आणलेलं पाणी बहुतांश ठिकाणी पुन्हा नदीच्या पात्रातच सोडलं जातं. त्यामुळं रासायनिक प्रक्रियेनं दूषित झालेल्या पाण्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊन ते धोक्यात येतं. त्यानं आपलंच नुकसान होत आहे. अशा दूषित पाण्यानं महाराष्ट्रासह नदीकाठी वसलेल्या शहरांमधील नागरिकही पार बेजार झाले आहेत. हेच पाणी जर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपयोगात आणलं तर त्याचा चांगलाच लाभ होणार आहे. शेतीसाठीही या पाण्याचा वापर होऊ शकतो. यासाठी कारखान्यांनी प्रक्रिया यंत्रणा बसविण्याची गरज आहे.

यंदा उन्हाळ्यापूर्वीच राज्यात पाणीटंचाई उद्भवली असून अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. यावर उपाय करण्यासाठी नद्यांवर धरण बांधणं, नद्याजोड प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प साकारायला हवेत. पाणी योजनांवर गुंतवलेला पैसा पाणीपट्टीच्या रूपानं गोळा व्हायला हवा. जलसंधारणासाठी विशेष उपाय योजना करायला हव्यात. यासगळ्यांचा वापर ज्यांनी केला त्यांच्या गावात, शेतात या दुष्काळी परिस्थितीतही पाणी आहे आणि त्यांची पिकं चांगली डुलतायेत.

गरज जलसाक्षर होण्याची

playहिवरे बाजार-
अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातली बरीच गावं टॅंकरवर अवलंबून आहेत, काही ठिकाणी पाण्याशिवाय जगणं अशक्य झाल्यामुळं लोक स्थलांतर करतायत. तर चाऱ्यापाण्याची आबाळ झाल्यानं पोराबाळाप्रमाणं जपलेली जनावरं लोकांनी विक्रीला काढलीत. पण दूरदृष्टी असलेला नेता गावाला मिळाला तर नक्कीच बदल घडतो... काटेकोर नियोजन करून गाव पाण्यानं स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच लोकसहभागातून गावाचा विकास साधण्याची किमया केलीय अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपटराव पवारांच्या आदर्श हिवरे बाजारनं. शिवाय इथल्या जिल्हा परिषद शाळेनं आपल्या विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा वसा हाती घेतला असून इथल्या शाळेत सौर ऊर्जेच्या मदतीनं चक्क मोटरनं बोअरमधून पाणी उचललं जातं आणि आपसूक पाण्याच्या टाकीत भरलं जातं पाणी.

playकडवंची, जालना-
सगळ्यात जास्त दुष्काळाचा फटका बसलेल्या जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावानं जलसाक्षरतेचं एक उदाहरण सर्वांपुढं ठेवलंय. कडवंची गावानं पाण्याचा योग्य ताळेबंद मांडून, पिकांचं व्यवस्थापन करून आणि पाणी वापराचं काटेकोर नियंत्रण करून सर्वांपुढं दुष्काळाच्या भस्मासुरालाही योग्य नियोजनानं यशस्वी तोंड देता येतं हे आपल्या आदर्शानं दाखवून दिलंय.

playपैठण, औरंगाबाद -
मराठवाड्यात पसरलेल्या दुष्काळाची झळ आता राज्यभरात चांगलीच जाणवायला लागलीय. दुष्काळामुळं मोसंबीचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फळबागांना कुऱ्हाड लावण्याची वेळ आली. पण जिद्द असेल तर काय होऊ शकतं हे औरंगाबादच्या पैठणमधील एका शेतकऱ्यानं आपल्या उदाहरणानं दाखवून दिलंय.

playकमळगंगा नदी, मूर्तिजापूर-
नदी म्हणजे जीवन. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीकाठानं हिरवीगार शिवारं डुलतात. समृद्धी, सुख, समाधानाची टवटवी सर्वत्र दिसते. पण हीच नदी उन्हाळ्यात आटते आणि शेताशिवारांवर दिसू लागते, दुष्काळाची काळी छाया. याचं कारण गाळानं भरलेल्या नद्या. अरुंद झालेली नदीपात्रं. गाळामुळं नदीत पाणी साचत नाही. सगळं काही रूक्ष होऊन जातं... यावर उपाय शोधलाय, अकोल्यातल्या मूर्तिजापूर गावानं. त्यांनी गावच्या कमळगंगा नदीचंच चक्क पुनर्भरण केलंय. त्यामुळं इतरत्र दुष्काळ असतानाही नदी भरलेली आहे. सारा परिसर हिरवागार आहे.

playवरूड, अमरावती-
अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके म्हणजे संत्र्यांचं आगार! संत्रा बागांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीला इतकी भोकं पाडून ठेवली, की बेसुमार पाणीउपशामुळं हा भाग ड्रायझोन म्हणून जाहीर झाला. आता राष्ट्रीय पेय जल सुरक्षा अभियानांतर्गत या दोन्ही तालुक्यांतील १९० गावांमधील गावकरी आर्थिक अंदाजपत्रकाप्रमाणं पाण्याचं अंदाजपत्रक तयार करतायत. पाण्याचं पुरतं महत्त्व कळल्यानं थेंबाथेंबाचं नियोजन करण्यात ते सध्या गुंग आहेत.

playमेळघाट, अमरावती -
मेळघाटाच्या भाळी कुपोषण पाचविला पुजलंय. दारिद्र्य, शिक्षण याबरोबरच पायाभूत सुविधांचा अभाव त्याला कारणीभूत आहे. वीज नाही म्हणून इथल्या आदिवासी पाड्यांना शुद्ध पाणीपुरवठा करता येत नाही. त्यावर आता प्रशासनानं सौरऊर्जेची मात्रा लागू केलीय. यामुळं जवळपास पन्नासहून अधिक पाड्यांना नळानं शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागलाय. दारात पाणी आल्यानं आदिवासींच्या जगण्याचे संदर्भच बदलले असून, महिलांना मुलाबाळांकडं लक्ष द्यायला वेळ मिळतोय.

playपुसेगाव, सातारा-
दुष्काळी भागातील यात्रा म्हणजे पुसेगाव इथला सेवागिरी महाराजांचा रथोत्सव. इथल्या रथोत्सवात येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दहा, शंभर, पाचशे रुपयांचे हार अर्पण करत असतात. लोकांनी सढळ हातानं दिलेल्या या पैशांचा काळजीपूर्वक वापर करून इथल्या देवस्थान ट्रस्टनं जलसंधारणाच्या विविध योजना राबवल्यात. याचा फायदा इथल्या भागातील लोकांना होतोय.

playजुन्नर, पुणे- 
शिवनेरी गडावरील टाक्यांना पाणी आहे, तर जवळच सह्याद्रीच्या रांगेत राहणाऱ्या आदिवासींची पाण्यासाठी परवड का, या प्रश्नाचा ध्यास तहसीलदारांनी घेतला. राबून प्रामाणिकपणं काम केलं. त्यांनी कातळात खोदलेली 10 टाकं आज पाण्यानं भरल्यानं इथल्या आदिवासींचं जीवनही भरून पावलंय. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर खडकालासुद्धा पाझर फुटून पाणी उपलब्ध होऊ शकतं, याचं हे उदाहरण.

एकूणच काय तर आपण जलसाक्षर झालो तर पाण्याच्या योग्य नियोजनातून दुष्काळावर मात करता येऊ शकते, हेच या उदाहणांवरून स्पष्ट होतं.

जाता जाता पाण्याचं महत्त्व सांगताना कवी बा.भ. बोरकरांची ही कविता...

तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी
कवी- बा. भ. बोरकर











सौजन्य : भारत फॉर इंडिया.क्वाम

माझ्याबद्दल